माय, मावशी नि माझी लेक!

भोचक's picture
भोचक in जनातलं, मनातलं
25 Jul 2009 - 4:51 pm

जैसी हरळामाजी रत्नकिळा
की रत्नांमजी हिरा निळा
तैसी भाषांमाजी चोखळा
भाषा मराठी
फादर स्टिफन्स या आंग्ल माणसाने लिहिलेले मराठी भाषेचे वर्णन वाचून छाती अभिमानाने फुगली. तोच आमची साडेतीन वर्षाची लेक आली. तिच्या हातात बाहूली होती. तिला तिचे कपडे बदलायचे होते. तिने 'ऑर्डर' सोडली, बाबा, मला जरा बाहूलीचे कपडे 'निकलून' द्या ना ! क्षण दोन क्षण काय बोलली ते कळलंच नाही. मग मेंदूपर्यंत झण्णकन गेल्यासारखं काही तरी झालं. 'कपडे निकालके दे ना' या हिंदी वाक्यातल्या 'निकलके'चा लचका तोडून तिने मराठी वाक्याला जोडून माझ्यासमोर आदळला होता. तिला हवं ते करून देत मी निमूटपणे 'भाषांमाजी साजिरी
मराठिया' च्या हिंदी अवतारावर विचार करत बसलो.

सव्वादोन वर्षाच्या इंदूरी वास्तव्यात आमच्यापेक्षा आमच्या कन्येने मराठीच्या या मावशीला आमच्यापेक्षा जास्त आपलेसे केल्याचे लक्षात आले. सुरवातीला आम्ही महाराष्ट्रातून आलेलो, म्हणजे आमचे मराठी म्हणजे 'नेटिवां'पेक्षा खासच अशी एक उगाचच मिजास स्वभावात होती. कन्येने ती मिजास उतरवून टाकण्याचा पार विडाच उचलला. याची खरी सुरवात झाली ती शाळेत जायला लागल्यावर. तिने हिंदी चांगले बोलावे ही आमची अपेक्षा होतीच, पण मराठीत हिंदी शब्द यायला नको असं आम्हाला आपलं वाटायचं. (इंदुरी मुलांसारखं आपली मुलगी 'हिंमराठी' बोलायला नको अशी खाज उगाचच मनात असावी!) तिच्या आधीच्या नर्सरीत मराठी भाषक लहान मुले होती. पण प्रामुख्याने बोलणे हिंदीतच व्हायचे. मग हेच हिंदी शब्द तिच्या मराठीच्या हद्दीत येऊन घुसखोरी करायला लागले. सुरवातीला भातात खडे लागल्यासारखे लागायचे, पण आता या भाताचीही आम्हाला सवय झालीय. व्हॅनवाल्या 'शंकरभय्या'पासून ते शाळेतल्या 'मॅम'पर्यंत आणि सगळ्या फ्रेंडसोबत आमची कन्यका हिंदीत सराईत संवाद साधते.

त्यांच्याशी बोलताना हिंदी छान बोलणारी आमची कन्या आता आमच्याशीही हिंदाळलेल्या मराठीत बोलायला लागलीय. 'बाबा चिल्लाऊ नकोस' असं एकदा माझ्यावर ओरडल्यानंतर मी गप्प. काय बोलणार? ती शाळेत जाण्यासाठी 'तैय्यार' होते. डिस्नेवरच्या आर्ट एटॅकसारखं ती काही तरी फरशीवर करते नि म्हणते 'बाबा बघ, मी कसं 'शेहर' बनवलं.' 'आई, मला गोदीत घे ना' असं म्हटल्यावर तिच्या आईलाही आपल्याला धरणीने गिळंकृत करावंसं वाटतं. ती आमच्याशी चर्चा नाही 'गोष्टी' करते. मैत्रिणींशी 'बातें' करते. लपाछपीत ती 'छुपून' बसते. तिला 'गर्मी' होऊन 'पसीना' येतो. 'चिडियाघर'मध्ये गेल्यानंतर 'शेर' तिला 'डरावना' वाटतो. 'बंदर' पाहून मजा वाटते. भिंतीवर 'चिपकली' असते. ती शाळेत नाही, 'स्कूल'मध्ये जाते. तिला 'पढायचं' असतं.

या घुसखोरीपर्यंतही ठीक आहे, पण मराठी शब्दांनाही ती हिंदीचा आधार देऊ लागलीय. हिंदीत प्रत्येक शब्द वेगळा असतो, तिथे प्रत्यय नावाची भानगड नाहीये. त्यामुळे कन्येनेही तिच्या मराठी बोलण्यातले बरेचसे प्रत्यय उडवून लावलेत. ती गाय'ला' पोळी घालते, गायीला नाही. 'चोर'ला पकडायला पाहिजे, असं ती म्हणते. हा 'वाला' तो 'वाला' असं म्हणणारी माझी लेक 'लालवाला स्कर्ट पेहनायचाय' असं सहज म्हणून जाते.

खरी गंमत तिचा अभ्यास घेताना होते. तिला गोष्ट तीन भाषांमध्ये सांगावी लागते. मराठी भाषांत शिकलेल्या आम्हाला तिला गोष्ट सांगताना भयंकर शाब्दिक फरफट करावी लागते. ती जाते, इंग्रजी माध्यमात. पण तिथे 'मॅम' समजावून सांगतात, ते हिंदीत. आणि आम्ही घरी बोलतो मराठीत. पण गोष्ट सांगताना तिच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आम्हाला आमच्या तोडक्यामोडक्या हिंदीचाच आधार घ्यावा लागतो. अनेक शब्द आठवावे लागतात. मराठीला पर्यायी हिंदी शब्दांचा पाठलाग करून त्यांना पकडावे लागते. कोल्हा म्हणजे की 'भेडिया' चमकादड म्हणजे वटवाघूळ, उल्लू म्हणजे घुबड हे लक्षात ठेवावं लागतं. तिला गोष्टीही खरगोश-कछुवा, चुहा- बिल्ली यांची सांगावी लागते.

तिच्या अभ्यासात येणार्‍या शब्दांकडेही नीट लक्ष द्यावं लागतं, नाही तर आमचीच एखाद्या गाफिल क्षणी विकेट उडण्याची शक्यता असते. आम्ही अ अननसाचा शिकलो होतो. आ आईचा होता. पण तिच्या शाळेत अ अनारचा, आ 'आम'चा इ इमलीचा आणि ई 'ईख'चा( उस) असतो. तिची बाराखडीचीही गाणी आहेत. 'अम्मा आई आम लायी..' हे सुरवातीच्या शाळेतलं गाणं आता आणखी वेगळं झालंय. 'अ अनार का मीठा दान आ आम को चूसके खाना' असं झालंय. 'एडी ढोलो ऐनक ले लो, ओखली में मूसल कांड, औरत ने फिर पकडा कान' यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आधी आम्हाला समजून घेऊन तिला सांगायला लागलाय. आमच्या लहानपणीची गाणी तिला आम्ही शिकवलीय, पण ज्या गाण्यांचा पगडा तिच्यावर बसलाय अर्थातच ती हिंदी आहेत. कारण ती शाळेत घोकून घेतली जातात. 'खबडक खबडक घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा' म्हणणारी माझी कन्या आता 'लकडी की काठी काठी पे घोडा' सहजपणे म्हणून जाते. मराठीतून पोहणारी आमची मासोळी तिच्या तोंडी 'मछली जल की रानी है. जीवन उसका पानी है' अशी झालीय. 'कोरा कागद निळी शाई' म्हणणार्‍या आम्हा आई-बापांची ही लेक खेळातही हिंदी गाण्यांवर 'झुमते'. 'अटकन मटकन दही चटाकन, राजा गया दिल्ली, दिल्ली से लाया बिल्ली, बिल्ली गई लंडन' 'ओ मीनो सुपर सीनो, कच्चा धागा रेस लगाओ' ही सध्या तिची खेळातली गाणी.

एका अरूंद पुलावर दोन बकरे आले आणि भांडता भांडता दोघांनी पलीकडे जाण्याचा उपाय शोधला ही गोष्ट ' एक सकरे पुलपर दो बकरे' अशी हिंदीत आहे. कन्या सांगत असतानाच त्याचा अर्थ कळला, पण दहावीपर्यंत हिंदी विषय असूनही 'सकरे' म्हणजे अरूंद हे समजायला मुलगी हिंदी माध्यमाच्या शाळेत जावी लागली.

तिच्या हिंदीतले शब्दच फक्त मराठीत घुसखोरी करतात असं नाही. तर हिंदीची वाक्यरचना तिच्या मराठीत डोकावते. म्हणूनच जाईल्ले, करील्ले, खाईल्ले हे उच्चारही तिने नकळत आत्मसात केले आहेत. शिवाय 'गडबड होऊन जाईल, 'गोष्टी करून घे' 'मी तर तैय्यार झाले', अशी हिंदीच्या चालीवरची मराठी वाक्येही ती बोलून जाते.

पण आता या सगळ्याची आम्हाला सवय झालीय. मराठीचा आग्रह आम्ही सोडलाय. तिला मराठी यायला हवं हे नक्की. पण आम्ही जसं बोलतो तसं ती कसं बोलेल? दोघांची बालपणं वेगळ्या वातावरणात गेली. त्यातला फरक असा मिटवता येणार नाही याचीही कल्पना आलीय. एक मात्र नक्की तिचं हिंदी उच्चारणही अगदी इकडच्यासारखं टिपीकल होतंय. आमची मात्र हिंदीची झटापट अजूनही सुरूच आहे. हिंदी बोलताना येणारा मराठी लहेजा लपवू म्हणता लपत नाही. आणि मुलगी मात्र मावशीच्या कडेवर बसून जगाच्या खिडकीबाहेर नजर टाकतेय.

संस्कृतीप्रवासदेशांतरविनोदसमाजजीवनमानभूगोलविचारअनुभवमाहितीभाषांतर

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

25 Jul 2009 - 4:59 pm | श्रावण मोडक

...
चांगलं लिहिलं आहे. पण नेमके काय म्हणावे या परिस्थितीवर हेच सुचेनासे झाले आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Jul 2009 - 5:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण तुमची लेक मात्र एकदम आवडली ... तिला विचाराल का माझ्यातर्फे, 'माझ्याशी दोस्ती करणार का?'

अदिती

वेताळ's picture

25 Jul 2009 - 5:02 pm | वेताळ

इथ पण निशब्द प्रतिसाद? अहो नाही कोणी चांदणी देणार तुम्हाला.

वेताळ चांदणे.

सहज's picture

25 Jul 2009 - 5:08 pm | सहज

अजुन एक दोन भाषा शिकवा. नक्की त्या देखील शिकेल. हुशार आहे मुलगी.

अभिनंदन!

स्वाती२'s picture

25 Jul 2009 - 5:30 pm | स्वाती२

छान!
माझी चुलत भावंड दिल्लीत वाढली. त्यांच मराठी असच होतं. पुढे मोठी झाल्यावर महाराष्ट्रात स्थाईक झाली. ६-७ महीन्यात सुरेख मराठी बोलू लागली.

शैलेन्द्र's picture

25 Jul 2009 - 7:26 pm | शैलेन्द्र

जर यु पी कर भय्यांने इथे मराठी बोलले पाहीजे, तर आपण नको तिकडे हिंदी बोलायला?

बाकी शुध्ध् अशुद्ध सोडा हो... इंदुरी मराठी छान वाटते ऐकायला.

प्राजु's picture

25 Jul 2009 - 8:00 pm | प्राजु

अहो.. जसं शाळेतलं बोलणं वागणं असतं तेच मुलं आत्मसात करतात.
माझा मुलगा जेव्हा मला म्हणतो.. आई, मला अ‍ॅप्पल ईट करायचं आहे..(मॉम आय वॉन्ट टू इट अ‍ॅन अ‍ॅप्पल चं सरळ सरळ भाषांतर) तेव्हा माझ्या डोक्यातला सफरचंदाला हजारो मुंग्या ओरबाडून खात आहेत असं मला वाटायला लागतं. पण इलाज काही नाही. तो मराठी बोलतो चांगला. पण त्यामध्ये होणारा असा इंग्रजी वाक्यरचनेचा प्रभाव नाही घालवता येणार, हे ही माहिती आहे. १-२ महिने भारतात दौर्‍यावर जाऊन आलो की पुन्हा स्वारी काहीदिवस मराठीत असते. त्यामुळे चालायचंच.
असो.. आपला लेख मात्र खूप आवडला. असंच इंदौर अनुभव वाचायला आवडतील आणखीही.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

25 Jul 2009 - 8:19 pm | नितिन थत्ते

सुंदर प्रकटन.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

जाणकार's picture

25 Jul 2009 - 8:27 pm | जाणकार

भोचक साहेब मलापण सुरवातिला हाच त्रास झाला होता तुम्हि तरि इन्दोर ला मराठि भाषिक जागेत राहता आहात मला तो पण त्रास आहे आजुबाजुला सगळे जण हिंदी बोलणारे,पण आम्हि घरि त्याच्या बरोबर आपण जसे आपसात बोलतो तसेच मराठि बोलातो आता तो पण व्यवस्थित मराठि बोलतो.आता आम्हि त्याला मराठि लिहायला आणि वाचायला लावतो.इन्दोर ला घरपोच मराठि वाचनालय पण आहे तेथुन पुस्तक घेतो आणि जे महाराष्ट्रातुन नातलग येतात त्यांना पण आणायला सांगतो.पण तुम्हि मराठीचा आग्रह सोडु नका नंतर ति जेव्हा बाकिच्या नातलगांत जाइल तेव्हा ति त्यांच्या मधे मिसळु नाहि शकणार.

अश्विनीका's picture

25 Jul 2009 - 10:02 pm | अश्विनीका

सुंदर प्रकटन
- अश्विनी

नंदन's picture

26 Jul 2009 - 12:20 am | नंदन

आवडला. सकरेसारखे शब्द वाचून 'बालादपि सुभाषितं ग्राह्यम' खरं असल्याची पुन्हा जाणीव झाली :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती दिनेश's picture

26 Jul 2009 - 1:18 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला,
खरं तर इतर भाषिक प्रदेशात राहिले की असे थोडेफार होतच असावे.
बेळगाव,धारवाडात राहणारी आमची नातलग मंडळी कन्नड साजात मराठी बोलतात ,बनारसी, नागपुरी नातेवाईक हिंदाळलेले मराठी आणि फ्रांकफुर्टातली मराठी किवा हिंदी जर्मनचा हात हातात घेऊन बोलते. :)
स्वाती

विंजिनेर's picture

26 Jul 2009 - 1:51 pm | विंजिनेर

सहमत.
माझ्या परिचयातले दोन कुटुंबे जपानात राहत होती. एक अमेरिकन आणि एक भारतीय - पुणेकर.
दोघांचीही मुले तिथेच वाढली त्यामुळे एकाच्या इंग्रजीत आणि दुसर्‍याच्या मराठीत जपानीची सरमिसळ सर्रास चालायची.
म्हणजे व्हायचे काय की एखादी "जाम भारी" गोष्ट "अत्ताच्या अत्ता" आई/बाबाला सांगायची असेल तर मराठी (/अमेरिकन मुलगा: इंग्रजीत) त सुरुवात व्हायची आणि शब्द आठवले नाही तर बिनधास्त जपानी शब्द/क्रियापदे घुसडली जायची :)
नंतर थोडे आणखी वय वाढले आणि ह्याच मुलांना दोन्ही भाषा इतक्या सहजी आणि सुरेख येतात की आपण तोंडात बोट घालून ऐकत रहावे...

- मुळात भिन्न भाषीक-प्रदेशात राहणार्‍या मुलांच्या मनात कुठली भाषा बोलायची ही विभागणी नसतेच मुळी. तो अट्टहास आपण मोठे लोक करतो(आणि मग अडखळतो/भाषा बोलताना येत नाही म्हणून बिचकतो). तुम्ही ह्या मुलांशी ज्या भाषेत बोलाल/प्रश्न विचाराल त्या भाषेत तुम्हाला (त्यांच्या नकळत) उत्तर येईल ही खात्री बाळगा..

तेव्हा काळजी नसावी असं माझं मत.
ही एक भाषिक शिक्षणातील सहज प्रक्रिया आहे.

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

विकास's picture

26 Jul 2009 - 2:28 pm | विकास

छान लिहीले आहे. वर इतरांनी म्हणले तसे हा अनुभव कमी अधिक फरकाने स्वतःच्या भाषिक प्रांताबहेर रहाणार्‍या प्रत्येकालाच येतो.

माझ्या एका मित्राची मुलगी लहान असताना, आय अ‍ॅम वाचिंग (म्हणजे मी वाचते!) असे अथवा मी इटतेय (खात आहे) अशी सरमिसळ करायची. माझ्या दुसर्‍या एका ओळखीच्या कुटूंबातील तुमच्या मुलीच्याच वयात तेंव्हा असलेली मुलगी अचानक घरात पडी गयो वगैरे शब्द वापरायला लागली... मग लक्षात आले की तीला गुजराथी बाईच्या पाळणाघरात ठेवले असल्याने असे होत आहे!

आमची मुलगी एकदम लहान (वर्षाच्या आत) असताना जरी आम्ही तिच्याशी मराठीतूनच बोलायचे ठरवले होते तरी त्यातही भर म्हणून की काय पण तिच्या गोर्‍या डॉक्टरीण बाईंनी आम्हाला आग्रहाने सांगितले की तुमच्याच भाषेत तिच्याशी बोला. इंग्रजी अजिबात वापरू नका, एकदा शाळेत आणि घराबाहेर मुलांमधे गेल्यावर ती भाषा येणार आहेच. आम्ही तसेच केले. एक लहान मुलांचे तत्कालीन टिव्हीवरील इंग्रजी कार्यक्रम सोडले तर सर्व मराठीतच. असे म्हणतात, की वयाच्या सहा वर्षापर्यंत मुले कितीही भाषा त्यांच्या वयाला साजेशा आत्मसात करू शकतात. (आमच्या मुलीला पण थोडे स्पॅनिश शाळेत शिकवले होते तर ते येयचे, अर्थात कालांतराने नंतर विसरून गेली कारण बालवाडीत शिकवले आणि नंतर नाही!)

आता जसजशी मोठी होऊ लागली तस तसा इंग्रजी प्रभाव वाढला असला तरी अजून पण भाषा बर्‍यापैकी पटापटा बदलता येतात. तरी देखील घरात आणि आमच्याशी बोलतान मराठीतच बोलते (भांडायचे असले अथवा हट्ट करायचा असला की इंग्रजीत!). अगदी तिच्या गोर्‍या मैत्रिणी घरी आल्या असल्या अथवा आम्ही शाळेत गेलो असलो तरी, तो जर समुह संवाद नसला आणि ती आमच्याशी इतरांच्या समोर बोलत असली तरी, मराठीतच बोलते. आमचा हट्ट नसतो पण ते आपोआप होते. आता झगडा आहे तो मराठी लिहीणे आणि वाचणे. पण ते चालू ठेवले आहे. सातत्याने करणे इतकेच त्याला उत्तर. मात्र त्याच वेळेस आपण आग्रह धरत असताना दुराग्रह धरत नाही आहोत ना याची काळजी घ्यावी. कारण नाहीतर त्याचा परीणाम उलटा होऊ शकतो.

त्या व्यतिरीक्त हा प्रकार थोडाफार व्यक्तीसापेक्ष असतो असे ही वाटते. आणि तसे असले म्हणून बिघडत नाही. पण आपण सहज सातत्याने बोलत रहायचे. माझ्या जवळच्या माहीतीतील जुळ्या मुलींपैकी एक (३-४ वर्षांच्या) वयाला साजेसे गोड मराठी बोलते तर दुसरी हमखास गोड इंग्रजी!

अवांतरः मुलगी लहान असताना मराठीच येयचे तर आमची इंग्रजी ही गुप्तभाषा होती, आता इंग्रजी येऊ लागली तर हिंदी गुप्त भाषा झाली. आता लक्षात आले की तीला हिंदी पण समजते. त्यामुळे सध्या आमच्या कडे भाषेचा प्रश्न हा मुलीसाठी नसून आमच्यासाठी आहे, कुठली शिकायची कन्नड की चायनीज असा :-)

मृदुला's picture

27 Jul 2009 - 12:27 am | मृदुला

लेख आवडला. बंगलोरात असताना तिथल्या मित्रमंडळींची लहान मुले आपापसात कानडी तर घरात त्यांची असेल ती मातृभाषा बोलताना दिसली. त्या घरातल्या भाषेतही कानडी वळण यायचेच. पण एकंदरित ही मुले पुष्कळ भाषा बोलत. तशीच तुमची लेकही बहुभाषिक होईल. एकूण काय, फायदाच आहे.

पाषाणभेद's picture

27 Jul 2009 - 3:53 am | पाषाणभेद

छानच वर्णन केले आहे.
बर्‍याच दिवसांनी दिसलात.
झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड

सुबक ठेंगणी's picture

27 Jul 2009 - 6:09 am | सुबक ठेंगणी

नाहीतरी मराठीत `माय मरो पण मावशी जगो 'असं म्हणून आपण मावशीचं महत्त्व मान्य केलेलंच आहे. हिंदीतही 'मां सी'च म्हणतात. :)
बहुभाषिक (सध्यातरी त्रिभाषिक) असलेल्या तुमच्या मुलीचं मला खरंच कौतुक वाटतं.
विकास आणि इतर अनेकांनी म्हटल्याप्रमाणेच परदेशात राहिलं की इतर भाषांचा चंचुप्रवेश बोलण्यात होतंच रहातो. ह्याला मोठी माणसेही अपवाद नसावीत.
फक्त भाषाशुद्धीच्या आग्रहापायी संवाद साधण्याची इच्छा, काहीतरी व्यक्त करण्याचा उत्साह मारला जाऊ नये ह्याची काळजी घेतली की झालं.
आदिती म्हणाली तसंच 'माझ्याशीही दोस्ती करशील का?' असं विचारा! :)

विसोबा खेचर's picture

27 Jul 2009 - 8:10 am | विसोबा खेचर

भोचकगुरुजी,

सुंदर प्रकटन..

इंदूरी मराठीही मस्त! :)

आपला,
तात्याभैय्या देवासकर,
देवासकरांची कोठी, इंदौर.

अ-मोल's picture

27 Jul 2009 - 11:40 am | अ-मोल

हिंदी भाषक प्रांतात राहताना होणारा हा अपरिहार्य परिणाम आहे.
माझी पुतणी इंग्रजी मीडियममध्ये शिकते आणि तिथेही हिंदीचा वापर मोठृया प्रमाणावर होतो. हे वाचताना तिची आठवण झाली.
मराठीतून पोहणारी आमची मासोळी तिच्या तोंडी 'मछली जल की रानी है. जीवन उसका पानी है' अशी झालीय.
- आवडले!

भोचक महाशय, तुमच्या निरीक्षणांची दाद द्यायलाच हवी. शिवाय वर्णनही अशा बहारीने केले आहेत की 'मजा आला'.

झकास लेख.

मनोगत ह्या संकेतस्थळावर मागे गीता सप्रे ह्यांचा मध्यप्रदेशातली 'मध्यप्रदेशातील मराठी भाषा' हा लेख

  1. ग्वाल्हेर, सागर, इंदूरच्या मराठी भाषेचे नमुने
  2. जबलपुरी मराठी भाषेचे नमुने

दोन भागांत दिला होता. जरूर वाचावे.

स्वप्नयोगी's picture

27 Jul 2009 - 6:45 pm | स्वप्नयोगी

बहोत मस्त लिख रिया रे !!!!!!!!!!!

पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.