शतजन्म शोधितांना....

Primary tabs

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
17 May 2019 - 4:26 pm

'झाडाच्या फांद्यांना जमिनीला आलिंगन देता येत नाही.
म्हणून ती बेहद्द असोशीने वाढत जातात
….आणि मुळांना निरोप पोहचतो, मग मुळे खोल खोल पसरत जातात.
मुळे खोल खोल जातात, फांद्या बहारदार होत जातात.

मुळांचा निरोप फांद्यांना, फांद्यांचा निरोप मुळांना मिळत जातो.
जमिनीतली ओल फांद्यांपर्यंत,आणि हवेतला गंध मुळांपर्यंत पोहचत राहतो.
त्यांच्यातले हितगुज अत्तर होते.

एके दिवशी, फांदीवर कळी उमलते.
त्यासरशी सगळ्या फांद्या मोहरतात.
मग, कळीचे फूल होते.
वाऱ्यावर डुलते.
आपल्या रंगरूपाने आसमंत भारून टाकते.
फांद्या जमिनीकडे पहात राहतात.
किती असोशी!
फांद्यांना वाटते, आता तरी आपण जमिनीला स्पर्श करू.
तिच्या मिठीत शिरू.
पण, दोघे एकमेकांकडे नुसते नुसते पहात राहतात...

.... आणि एके संध्याकाळी फूल निघून जायची वेळ येते...
ते जमिनीवर पोहचण्याआधी सगळ्या फांद्या त्या फुलाचे चुंबन घेण्यासाठी आवेगाने धावतात.
त्या निमिषमात्रात आपली जन्माची असोशी त्या चुंबनात ठेवतात.

फूल जमिनीवर ओघळते ....
त्याक्षणी मुळे कूस पालटतात आणि रंगरूप झडून गेलेले फूल आवेगाने जमिनीच्या मिठीत शिरते.

कुणाकुणाचे नशीब असे झाड होऊन जन्म काढते.'

-शिवकन्या

मांडणीवावरवाङ्मयमुक्तकसाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटनप्रतिसादलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

इरामयी's picture

17 May 2019 - 9:15 pm | इरामयी

वनस्पतींंचं प्रजनन हे एक भल्या मोठ्ठा आवाका असलेल्या गणिताचा आविष्कार वाटतो.

मला तुम्ही केलेला कल्पना विलास आवडला.

जालिम लोशन's picture

18 May 2019 - 12:47 am | जालिम लोशन

सारखी माॅडर्न कविता आहे का ही?

हेट स्टोरी मधल्या एका गाण्यात असे शब्द आहेत...

टूटे तो टूटे तेरी बाहो मे ऐसें के शाखो से पत्ते बेहया।

हे वाचताना राहून राहून तेच आठवत होतं!!

चाणक्य's picture

25 May 2019 - 8:46 pm | चाणक्य

शेवटच्या ओळीसाठी सलाम.

यशोधरा's picture

25 May 2019 - 9:59 pm | यशोधरा

क्या बात!!

राघव's picture

26 May 2019 - 12:44 am | राघव

विसंगती नेमकी पकडलीत. :-)