चलती का नाम गाडी- ७ : ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकीमध्ये संधी

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
23 Sep 2015 - 10:57 am

चलती का नाम गाडी- ७ : ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकीमध्ये संधी

भाग -१
भाग -२
भाग -३
भाग -४
भाग -५
भाग -६

मागील सहा भागांमध्ये आपण ऑटोमोटिव्ह क्षेत्रातल्या काही घडामोडी आणि त्याचं आर्थिक गणित थोडक्यात पाहिलं. सध्या कधी नव्हे तो वाहन उद्योग भारतात फोफावला आहे. फोर्ड आणि ह्युन्दै यांचे मुख्य निर्यात केंद्र भारत होतंय. जपानी आणि युरोपीय कंपन्या इथला पसारा वाढवत आहेत. हे ऐकत- पहात असताना आपणही त्याचा फायदा करून घ्यायला हवा असं वाटतं !

या भागात आपण सर्वसाधारणपणे ऑटोमोटिव्ह इंजिनियरिंगमधल्या करीयर्स विषयी थोडी माहिती घेऊयात. सध्या घरोघरी अभियंते तयार होतायत किंवा होऊ घातलेत. या अभियांत्रिकी विद्यार्थ्याना या क्षेत्रात काय संधी आहेत याचा हा थोडा उहापोह. कांही मिपाकरांनी या विषयी लिहिण्यास सुचवले. सध्याच्या करियर मार्गदर्शनाच्या वातावरणात ते पटलेही. त्यामुळे अंतिम भाग पुढे आणत आहे. सर्व निरीक्षणे भारतातल्या परस्थितीनुसार नोंदवली आहेत. मी कांही या क्षेत्रातला तज्ञ नाही, माझी मतं वैयक्तिक असून वेगळ्या मतांवर देखील चर्चा व्हावी ! एकीकडे आयटी कंपनीत काम करणे कमी फायद्याचं आणि जास्त जोखमीचं होत असतांना या क्षेत्रात खूप संधी येताना दिसत आहेत. ऑटोमोटिव्ह इंजिनियरिंग हे वरकरणी मेक्यानिकल अभियांत्रिकीची शाखा वाटली तरी तशी ती आता मर्यादित राहिली नाहीय. हल्ली सगळ्या प्रकारचे अभियंते या क्षेत्रात कामासाठी हवे असतात.

अर्थविषयक वाहिन्यांवर आर्थिक आणि औद्योगिक क्षेत्रातल्या घडामोडी वाचताना, प्रगतीचे निकष मांडताना नेहमी शेती-उर्जा- औद्योगिक उत्पादन-वाहन उद्योग या कसोट्यांवर चर्चा होते. मला नेहमी प्रश्न पडत असे की एकदा उद्योग म्हटल्यावर वाहन उद्योग पुन्हा वेगळा का काढतात? गेल्या काही वर्षात भारतीय उद्योगात औषध निर्माण, ऑटोमोटिव्ह, आयटी हे उल्लेखनीय कार्य करून राहिलेत. ही क्षेत्रं अधिक नोकऱ्या देत आहेत आणि एकूण व्यवस्थेत त्यांचं योगदान मोठं होत आहे. वाहन उद्योग हा असाच मोठा रोजगार निर्माण करतो आणि त्यातली आर्थिक उलाढाल लक्षणीय असते. साहजिकच त्यात संधी वाढत आहेत.

ऑटोमोटिव्ह इंजिनियरिंगमध्ये भारतात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. मुख्यत्वे अभियांत्रिकी, प्रत्यक्ष कुशल कामगार आणि व्यवस्थापन या तीनही प्रकारात काम करणारी खूप माणसं येत्या पंचवीस वर्षांत लागणार आहेत. त्याशिवाय इतर सेवा आणि कंत्राटी व्यवसाय, सल्लागार पण लागणार आहेत. इथे आज आपण फक्त ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी लागणाऱ्या अभियांत्रिकी कौशल्यांचाच आढावा घेतो आहोत.

इलेकट्रोनिक्स अभियांत्रिकीला शिकत असताना आम्ही वेगवेगळे कॉम्पोनन्टस- अगदी रोधकापासुन आयसी चिपपर्यंत, कमर्शियल ग्रेड, ऑटोमोटिव्ह ग्रेड आणि मिलिटरी ग्रेड असे मुख्य प्रकार शिकलो. त्यानुसार त्या सुट्ट्या भागांची स्पेसिफिकेशन्स याच क्रमाने कठोर होत जात असत. त्याप्रमाणे ते कंपोनंटस महागही होत जात असत. ते इथल्या बाजारात पहायला उपलब्ध नसत- कारण त्या काळी भारतात त्यांचा तसा खपच नसे.

तेव्हां असा प्रश्न पडत असे की काय विशेष असतं त्यात? मिलिटरी ग्रेड एकवेळ ठीक आहे, सैनिकाची उपकरणं कठीण वातावरणात चालली पाहिजेत म्हणून सगळे सुटे भाग उणे ४० ते १५० डिग्री सेंटीग्रेड ला चालली पाहिजेत, जलरोधक पाहिजेत, उंचावरून टाकली तरी चालली पाहिजेत वगैरे -पण ऑटोमोटिव्हला विशेष ग्रेड का बुवा? त्याचं समाधानकारक उत्तर त्यावेळी मिळालं नव्हतं. कारण १९९०-९५ मध्ये आम्ही पहात होतो त्या गाड्यांमध्ये साहजिकच इलेकट्रोनिक्स कुठेच नसे. पण आता तसं राहिलं नाही. चौथ्या भागांत पाहिल्याप्रमाणे आता किमान भारत- स्टेज चारच्या (प्रदूषण न करणाऱ्या ) गाड्याच आता सगळ्यांना घ्याव्या लागतील. सध्या साधी अल्टोसुद्धा चारसहा इलेकट्रोनिक मोड्यूल्स वापरून बनलेली असते.

ऑटोमोटिव्ह ग्रेड कॉम्पोनन्टस वापरण्याचं मुख्य कारण म्हणजे ते वापरलेल्या गाड्या जगात कुठेही चालतील अश्या डिझाईन कराव्या लागतात. अगदी स्क्यानडीनेव्हियन थंडीपासून ते भाजणाऱ्या डेझर्ट सफारीपर्यंत अशी कुठेही ही गाडी चालू शकते. रस्त्यांची अवस्था खूप चांगली ते अतिशय खराब असू शकते. गाडीत विविध ठिकाणी थरथरणारे भाग असतात. त्यामुळे त्यावर बसवलेले इतर भाग पण तसेच थरथरतात. ते सगळे कांही सरळ भिंतीवरच्या घड्याळासारखे नसतात. अत्यंत कमी जागेत क्लिष्ट रचना केलेले असतात. त्यांचं प्रतल वेगवेगळं असतं. कन्झुमर इलेक्ट्रोनिक्समधे उदा. - रेडिओ किंवा टी व्ही कसे ? आपण छान टेबलावर किंवा कुठेतरी नीट ठेवून पहातो-ऐकतो. छताला ६० अंशात लटकवत नाही. आणि मुख्य म्हणजे आपलं घर पण सतत स्थिर असतं! हाच मुख्य फरक आहे- त्यामुळे खडतर परीक्षेतून पास झालेले सुटे भागच वाहनात वापरले जातात. त्यांच्यावर गरम वाळू किंवा बर्फाचे फवारे, पाऊस यांचा परिणाम होता कामा नये. हे भाग किमान पंधरा वर्षे छान चालावेत अशी अपेक्षा असते. त्याने warranty चा खर्च कमी होतो आणि विश्वासार्हता वाढून कंपनीचं नाव चांगलं होतं !

गाडीत सर्वात जास्त तापणारे भाग म्हणजे बॉनेटखाली इंजिन आणि बाकी गाडीखाली ऐक्झोस्ट पाईप्स. त्याच्या जवळपास वापरले जाणारे भाग आणि मोड्यूल्स खास डिझाईन केलेले असावे लागतात. सगळे काही -४०°C ते १२५°C तापमान आणि खडतर रस्ते विचारात घेऊन बनवलेले असतात. त्याना जोडणाऱ्या वायर्स टेफ्लोन विलेपित आणि कनेक्टर्स पण तसेच उच्च तापमानाला चालणारे असतात. गरज पडल्यास त्यांच्या भोवती उष्णता विरीधी धातू- कवच पण लावलं जातं. आणि हे करत असतानाच त्याचं वजन वाढणार नाही यासाठी कसरत करावी लागते. कारण वजन वाढलं तर गाडी प्रदूषण चाचणीत नापास होऊ शकते. त्यामुळे गाडीतल्या स्टेपनीसह सगळ्या गाडीचं वजन अगदी पहिली गाडी तयार करायच्या आधी पासून- म्हणजे दोन वर्षे आधी माहीत असावं लागतं . म्हणजे डिझायनर बरोबर गाडीला पण डाएटवर राहावं लागतं. काही मंडळी सदासर्वकाळ गाडीचं वजन कमी करण्यावर काम करत असतात.

याशिवाय अजून एक समस्या असते ती विद्युतचुंबकीय गोंगाटाची. ( electromagnetic noise -वाईट भाषांतर!) गाडी सुरु- बंद होताना,दिवे लागताना खूप तीव्र क्षमतेच्या तात्कालिक विद्युतलाटा प्रक्षेपित होतात. याशिवाय चालू गाडीतही फिरणाऱ्या - मोटारयुक्त भागांमुळे असा गोंगाट तयार होतो. त्यामुळे मोड्यूल्सच्या कामात बाधा येण्याची शक्यता असते. त्यासाठी गेले शतकभर खूप संशोधन झाले आहे. आणि आता यावर पूर्ण नियंत्रण ठेवले जाते.

हे झाले इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगसंबंधी. इतर विभागांमध्ये त्यांच्या समस्या असतात. जसे उष्णता, जलरोधन, थरथराट, दिलेल्या जागेत सगळे भाग मावतील हे पहाणे, सगळ्यांना अंतरराष्ट्रीय नियमावलीत आपले भाग बसवायचे असतात. कुठलीही गाडी आधीच्या कुठल्यातरी मॉडेलवर आधारित असते, पण जे काही बदल येतात त्यासाठी नव्याने भरपूर काम येते.

तात्पर्य: आव्हाने अनेक आहेत आणि त्यात भर म्हणून नवे नवे कायदे आणि निकष दरवर्षी येत आहेत आणि अनिवार्य होत आहेत! हे सगळं करायला भलीमोठी तांत्रिक टीम असावी लागते. उदा. एक नवी SUV बाजारात आणायचं अभियांत्रिकी बजेट, रुपयांत एक हजार ते तीन हजार कोटींचं असतं!

सध्याच्या प्रचलित अभियांत्रिकीच्या आणि अन्य विद्याशाखा, आणि त्यात असणाऱ्या संधी पाहूयात :

इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग:

ही अतिशय दुर्लक्षित अशी ही शाखा राहिली आहे. पूर्वी तर इंजिनियर होऊन 'एम एस ई बी' त जायचं किंवा एखाद्या कंपनीत मशीन मेंटेनन्सला काम करायचं नाहीतर कंत्राटदार व्हायचं असे ढोबळ पर्याय असत. कुठलंही खासगी अभियांत्रिकी महाविद्यालय पहा- कोअर इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग शाखा तिथे नसतेच,- काही अपवाद आहेत. त्याउलट प्रगत देशांत इलेक्ट्रिकल, इलेकट्रोनिक्स आणि कधी संगणक शाखाही इलेक्ट्रिकल विभागामध्ये एकत्रित चालतात. थोडक्यात- मूळ विषयांवर भर देऊन ऐच्छिक विषयांमध्ये कालानुरूप नवे नवे विषय शिकवले जातात. आपल्याकडे या शाखेकडे अक्षम्य दुर्लक्ष्य झाल्यामुळे त्यांचे हे सर्व काम इलेक्ट्रोनिक्स इंजिनियर्स करताना दिसतात.

इलेक्ट्रिकल इंजिनियरला वाहनाची जीवनगंगा असलेल्या वायरिंग हार्नेस, ब्याटरी आणि पॉवर सप्लाय ही क्षेत्रे मोकळी आहेत. थोड्याश्या प्रशिक्षणानंतर ते सोफ्टवेअर मधेही काम करू शकतात. येत्या काळात या लोकांनी पावर इलेक्ट्रोनिक्स अपडेट करत राहिले तर २०२० पर्यंत हायब्रीड आणि विद्युत वाहनांमध्ये अमर्याद संधी येणार आहेत.

इलेक्ट्रोनिक्स इंजिनियरिंग:

यापूर्वीच्या सर्व भागांमध्ये चर्चा झालीच आहे- पण त्यांपैकी बहुतांश गोष्टीसाठी इलेक्ट्रोनिक्स अभियंते लागतात. मुख्य म्हणजे हार्डवेअर आणि सोफ्टवेअरचा काही विशिष्ठ भाग याच लोकांनी करायला हवा असतो. कारण त्यासाठी मुख्य विषयाचे ज्ञान आणि सोफ्टवेअरचे ज्ञान एकत्रितपणे आवश्यक ठरते. या दोन्हीमध्ये जितके काम करू तितक्या आपल्याच मर्यादा दिसून येतात आणि आपल्याला अजून अभ्यासाला प्रोत्साहित करतात. हे क्षेत्र अफाट मोठे आहे, त्याविषयी अजून सविस्तर माहिती पुढे येईलच.

मेकॅनिकल इंजिनियरिंग:

या अभियंत्याशिवाय कुठलीही गाडी तयार होऊ शकत नाही. या मंडळींना सर्व विभागांमध्ये भरपूर संधी आहेत . यांच्यासाठी डिझाईन, टूलरूम आणि प्रोडक्शन शॉप फ्लोअर, दर्जा निरीक्षण आणि नियंत्रण हे मुख्य विभाग, पण कित्येक अन्य विभागांत - जसे नियोजन, मटेरियल्स, खरेदी, विक्रीपश्चात सेवा, warranty आदि क्षेत्रात खूप संधी आहे. ऑटोमोटीव्ह अभियांत्रिकीचे जास्तीचे प्रशिक्षण घेऊन ठेवले तर अधिक चांगले. याशिवाय CAD / CAE मध्येही जास्तीजास्त शिकून घ्यावे. प्लास्टिक, रबर, कांच, शीट मेटल, पाइप्स, हीट अभियांत्रिकी यापैकी कशात तरी विशेष प्राविण्य असलेले बरे!

सॉफ्टवेअर इंजिनियरिंग:

ऑटोमोटिव्ह क्षेत्रात असतील तर या मंडळीची आजही चांदी आहे. हे डेव्हलपर, टेस्टर किंवा क्वालिटी एश्युरन्स या ढोबळ प्रकारांमध्ये काम करू शकतात. वाहन उद्योगाला काय हवंय हे ज्यांना कळलं त्याना सतत मागणी आहे. निव्वळ पाट्या टाकणारे इथे बाजूला पडतात. हे सगळीकडे लागू असलं तरी या क्षेत्रात मुळीच चालवून घेतलं जात नाही. विकसनापेक्षा तपासणीचं काम इथे भारतात जास्त असतं. मात्र ऑटोमोटिव्ह डेव्हलपर म्हणून काम करायचं तर ऑटोसार, कॅनसंबंधी अभ्यास वाढवावा.

केमिकल, पेंट प्लास्टिक पॉलीमर इंजिनियरिंग:

पूर्वी फक्त रसायन अभियांत्रिकी शाखा होती. आता या वरील विषयांच्या स्वतंत्र विद्याशाखा तयार झाल्या आहेत. पुण्यात फर्गसन महाविद्यालयात तर खास सरफेस कोटिंग तंत्रज्ञानाचा पदविका अभ्यासक्रम गेल्या तीस वर्षांपासून चालतो. गाडीचा नुसता रंगच नव्हे, तर पत्रा आणि अन्य भागांचा टिकाऊपणा वाढण्यासाठी विविध प्रक्रिया केल्या जातात.त्यासाठी यंत्रसामुग्री घेणे, विविध प्रक्रिया करणे, सुट्या भागांची गुणवत्ता तपासणे, किंमत नियंत्रण अशा अनेक विभागात हे अभियंते काम करत असतात.

क्रॉस डोमेन इंजिनियरिंग शाखा:

आपल्या शाखेचे काम करून इतर संबंधित विषयात काम करणे हे अधिकाधिक इंटरेस्टिंग होत जातं. या मंडळींना खूप मागणी आहे. आपल्या मूळ शाखेचे चांगले ज्ञान असायलाच हवेच, पण अजून एक शाखा हळूहळू अभ्यासाने पक्की केली तर अजून चांगल्या संधी येतात. हे करायला किमान तीनचार वर्षांचा अनुभव असावा लागतो. त्या दरम्यान अधिकृत ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी डिप्लोमा करता येतो किंवा इतरांना त्यांच्या कामात मदत करण्याच्या निमित्ताने किंवा जादा जबाबदारी अंगावर घेऊन ज्ञान वाढवता येते. यात बेसिक्स, नवी सोफ्टवेअर्स शिकणे, वाचन आणि प्रत्यक्ष काम यांचा समावेश असू शकतो.

विशिष्ठ आणि दुर्मिळ कौशल्य:

वरील प्रकार सगळ्यांनाच जमेल असं नाही. त्या लोकांनी आपल्याच शाखेचं वाहन क्षेत्रात लागणारं एखादं दुर्मिळ कौशल्य आत्मसात करावं. यासाठी खूप मेहेनत घावी लागेल. उदाहरणार्थ स्टायलिंग, सिस्टीम मॉडेलिंग. हे सगळ्यांना नाही जमत. त्यासाठीलागणारी महागडी सोफ्टवेअर्स वापरायला मिळालेली नसतात. थिअरी पक्की असेल तर जेव्हां संधी मिळेल तेव्हा तिचे सोने करता येते. पण नेहमीच्या कामाव्यतिरिक्त उच्च दर्जाचे बौद्धिक काम, वाचन ज्यामुळे संस्थेचा वेळ, पैसा वाचू शकेल असे कुठचेही स्किल आत्मसात करावे. जागतिक सोसायटीचे सभासदत्व घेऊन अपडेटेड रहावे. याविषयी माहिती खाली दिलेल्या 'ए आर ए आय' च्या संस्थळावर मिळेल.

वाणिज्य शाखा:

वाहन उद्योग अतिशय डिमांडिंग आहे. तुम्ही विशेष काही करून दाखवल्यास त्याची दखल इतरांना घ्यावीच लागते. बहुतेक सर्व सुटे भाग एकाच देशात बनवून जगभर वितरीत होतात, त्यात करबचत, वाहतूक साठा किती करायचा, यावर निर्णय घेऊन पैसे वाचू शकतात. इथे एकेक रुपया नव्हे पैसाही मोजला जातो. कोणत्याही मार्गाने गाडीमध्ये अगदी दहावीस रुपये वाचवून दाखवणारा इसम मोठ्या कौतुकास पात्र ठरतो. कारण व्हॉल्यूम. तुम्ही वाचवलेले दहा रुपये चार-सहा लाख गाड्यांवर वाचतात ही मोठी गोष्ट आहे !

त्याचं बक्षीस नक्की मिळतं. हे अभिनव उपाय पुढे अभियांत्रिकी प्रक्रियेचा भाग बनतात. त्यामुळे पुढचा प्रकल्प अजुनच आव्हानात्मक होतो.

कला शाखा:

थोडं आश्चर्य वाटेल पण कलाकार मंडळी स्टायलिंग, व्हिज्युअलायझेशन, फोटोग्राफी, व्हिडीओ मेकिंग, जाहिरात विभाग वगैरे कामासाठी मजबूत पैसे कमावतात. खूप कमी संधी असल्या तरी बालवयापासून गाड्या हाच आवडीचा विषय असलेले, आणि ध्यास घेतलेले लोक या क्षेत्रात चांगले काम आणि नाव मिळवतात. आमच्या कंपनीत असे कालाशाखेतून BA झालेले काहीजण उत्तम कामामुळे त्यांच्या बॉसपेक्षा अधिक महत्व मिळवून आहेत !

व्यवस्थापन शाखा:

व्यवस्थापन किती महत्वाचं आहे ते आपण सगळेच जाणतो. तरी अभियांत्रिकी किंवा वाणिज्य शाखेनंतर थोडा अनुभव घेऊन मग व्यवस्थापन शिकणे महत्वाचे. व्यवस्थापन शाखेतून बाहेर पडणारे बहुसंख्य उमेदवार, त्या कामासाठी थेट योग्य नसतात. अनुभव सोडा, विचारांची क्षमताही कमी असते . अभियांत्रिकीइतकीच वाईट अवस्था याही क्षेत्राची आहे- कारण त्यातले शिक्षणसम्राटही तेच थोर लोक आहेत. सेल्स, शॉपफ्लोअर, वाहनविमा किंवा अभियांत्रिकी सेवा कंपन्या यांत काम करायला या मंडळींना भरपूर वाव आहे. तेंव्हा चांगल्या व्यवस्थापन संस्थेतच जाण्यासाठी नेहेमी प्रयत्न हवा.

अन्य व्यावसायिक:

ज्यांचे छोटेसे का होईना स्वतःचे जॉबवर्क करण्याचे शॉप आहे किंवा अन्य तांत्रिक कंत्राटी व्यवसाय आहे त्यांनी एखाद्या छोट्या भागाच्या उत्पादनाने सुरुवात करावी. सुरुवातीला तांत्रिक समस्या येणारच. पण एकदा मानके, चाचण्या यांची माहिती झाली आणि दर्जा गाठल्यावर दरवर्षी नियमितपणे त्या भागाची लाखात ऑर्डर मिळू शकते. तद्नंतरही सतत गुणवत्ता आणि किंमत कमी करण्याचं आव्हान रहातंच, पण अतिशय स्पर्धात्मक आणि फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो. दहाएक वर्षांनी कंपन्या तुम्हाला शोधत येतात.

इथे माझ्या एका मित्राचं उदाहरण देतो- तो डीझेल गाड्यांसाठी एअर फिल्टरचे दर्शक (Indicators) बनवतो. गाडीचा फिल्टर इंजिनकडे येणारी हवा गाळून घेताना धूलीकण, कचरा थांबवतो. म्हणजे कालांतराने एअर फिल्टर खराब झाला की त्या दर्शकावर लाल रंगाची रेघ येते आणि ही फिटरला तो फिल्टर बदलण्याची सूचना असते. हा छोटासाच भाग साधारण वीस लोकांना रोजगार देतो आणि उत्पादकाला अजून नवनवीन भाग बनवायला- संशोधनासाठी पैसाही पुरवतो. भारतातल्या काही अतिसामान्य वाटणाऱ्या अनेक वर्कशॉप्समधून आयातपर्यायी भाग बनतात. तर काहीजण अतिविशिष्ठ भागांची निर्यातदेखील करतात.


भांडवलदार:

वरीलपैकी कुठल्याच अभ्यासक्रमात किंवा व्यवसायात तुम्ही नाही आहात? पण पैसा बक्कळ बाळगून आहात? मग डीलरशिप घ्या राव. मोक्याच्या जागी दोन तीन हजार वर्गफूट जागा आणि दोन-तीन कोटी टाकलेत तर पैशाकडे पैसा जातो या नियमानुसार एखाद्या मोठ्या ब्रांडचे- किंवा अगदी गेलाबाजार सुट्ट्या भागांचे सेल्स आणि सर्विस शोरूम काढू शकता. हे मॉडेल अजून इतर शहरांत वाढवू शकता - थोडक्यात काय, वाहन उद्योगात अमर्याद संधी आहेत!

सगळंच चांगलं असेल तर मग या क्षेत्रात काही जोखीम आहे काय? याचं उत्तर 'होय' असं आहे. काहीशी - किमान जोखीम सगळ्याच क्षेत्रात असते. जेव्हा जागतिक मंदी येते, किंवा कररचना उद्योग क्षेत्राच्या वाढीविरोधात जाते तेव्हा या क्षेत्रात काम मिळणे कठीण असते. असलेले जॉब्स जाऊ शकतात . पण त्याचबरोबर अशा समस्या संधी घेऊन येतात. कार्यक्षम, चांगले ज्ञान असलेल्यांना नोकरीवरून काढतांना मंदीत सुधा कंपनी दहादा विचार करते!

मोठे वाहन प्रकल्प मधेच थांबवता येत नाहीत, ते चार वर्षं आधीच सुरु होतात आणि मंदीतही सुरूच ठेवावे लागतात. त्यात थोडे बदल होतात इतकेच. अश्या मंदीच्या तीन वेळां गेल्या वीस वर्षांत आल्या आहेत. पण उद्योग बहरतच चालला आहे.

कुठलाही अभ्यासक्रम घेणाऱ्या व्यक्तीला वाहनांची आवड असल्यास वाहन उद्योगात काहीतरी काम मिळू शकतेच ! पदवीनंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी कांही संदर्भ खाली दिले आहेत. असे अजून खूप अभ्यासक्रम आहेत, पण कांही चांगली उदाहरणे दिली आहेत.

तर मंडळी, विद्यार्थ्यांना पडणारे कांही प्रश्न चर्चिले आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्याच्या नजरेतून अगदी बाळबोध असलं तरी हे उपयुक्त ठरेल अशी आशा आहे . आपली मते आणि अनुभव, ऐकीव माहिती, शंका पण मांडावीत, म्हणजे इच्छुकांना आणि त्यांच्या पालकांना त्या चर्चेचां लाभ मिळेल.

विशेष प्रशिक्षण :

व्ही आय टी वेल्लोर

ए आर ए आय पुणे

मर्सिडीज बेंझ आणि महाराष्ट्र शासनाचा संयुक्त उपक्रम

आखेन विद्यापीठ- जर्मनी (किंवा तत्सम विद्यापीठे)

(क्रमश:)

धोरणमांडणीतंत्रविज्ञानअर्थकारणप्रकटनविचारसमीक्षाअनुभवमत

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

23 Sep 2015 - 5:35 pm | बहुगुणी

या क्षेत्रातलं काडीइतकंही ज्ञान नसलेल्या मला देखील बरंच काही नवीन शिकायला मिळालं, तेंव्हा ज्यांना यात दिलेल्या ज्ञानशाखांमधलं शिक्षण आहे त्यांना तर हे क्षेत्र किती पुढे नेऊ शकेल याची अतिशय उपयोगी माहिती एकत्रित स्वरुपात दिलेली आहे. शेवटी दिलेले दुवेही संग्रहणीय आहेत. धन्यवाद!

मार्मिक गोडसे's picture

23 Sep 2015 - 7:35 pm | मार्मिक गोडसे

उपयुक्त माहिती.

वाहन विषयक सर्वांगीण घटकांचा विचार केलेले खुप कमी लिखाण आज पर्यंत वाचले आहे. या लेखमालेचा प्रथम क्रमांक लागेल...

फार छान लेखमालिका. पुभाप्र.

श्रीरंग_जोशी's picture

25 Sep 2015 - 1:29 am | श्रीरंग_जोशी

या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणार्‍यांसाठी व या क्षेत्रात रस असुनही करिअरबाबत नेमके न ठरवलेल्या तरुणांना ही सर्व माहिती अत्यंत उपयुक्त आहे.

त्याखेरीज सामान्य ज्ञान म्हणून इतरांनाही उपयोगी आहेच.