सन २५१३ मधला मिसळपाववरील ऐक लेख…

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in जनातलं, मनातलं
8 Apr 2015 - 6:46 pm

टीप १ : *** अत्यंत अत्यंत अत्यंत काल्पनिक ……!

टीप २ : (लेखाची पार्श्वभूमी, २१ व्या शतकातल्या वाचकांसाठी ::
१६ मार्च २२८० रोजी, ३ मैल व्यास असलेली १९५०-डीए नावाची उल्का पृथ्वीवर ताशी ३८ हजार मैलांच्या वेगाने आदळली. अर्थातच ती पृथ्वीच्या जवळ येण्यापूर्वी तिच्या ठिकऱ्या करण्याचे किंवा मार्ग बदलण्यासाठी, पृथ्वीवासियांनी, तिच्यावर अण्वस्त्रांचा मारा केला होता. परंतु उल्केच्या छोट्या ठिकऱ्या होऊन, त्यांचा छर्रेरूपाने पृथ्वीवर वर्षाव झाला आणि त्यामुळे असंख्य छोट्या अणुस्फोटासारखा प्रभाव निर्माण होऊन, पृथ्वीवरची बहुतांश सृष्टी नष्ट झाली, त्यावेळच्या मानवाने, तोपर्यंत आपली सर्व संस्कृतीक-साहित्यिक-वैज्ञानिक-ऐतिहासिक माहिती ही डिजिटली, संपादित व संग्रहित केलेली होती, तीही स्फोटांमुळे उद्भवलेल्या तीव्र चुंबकीय विकिरणांमुळे नष्ट झाली. उरलेल्या मानवीसमूहाने आपल्या स्मृतीतील सांस्कृतिक गोष्टी मौखिक रूपाने पुढच्या पिढीकडे जतनासाठी सोपवल्या. त्यामुळे २२८० पासून नवीन सिविल इतिहासच नवीन मानवास माहिती राहिला. बाकी सर्व विस्मृतीत गेलं.)

*****************************************************************************

पृथ्वीचा इतिहास आणि संस्कृती अतिप्राचीन आहे. त्यामुळे कित्येक ऐतिहासिक व्यक्ती आणि घटना वादग्रस्त आहेत. त्यावर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. उदा. जय, बिरू , ठाकूर, बसंती, गब्बरसिंग, धन्नो यासारख्या अनेक व्यक्ती व त्यांच्याशी संबंधित असलेल्या घटना. गेल्या दोन-अडीचशे वर्षापासून असे अनेक वाद चालू आहेत. अशा वादांना मुख्त: परग्रहवासियांनी खतपाणी घातले. पण तरीही कित्येक एतद्देशी विद्वानांनी वस्तुनिष्ठ पुरावंच्या आधारे त्यांना समर्पक उत्तरे दिली. पण असे असले तरी या अनेक व्यक्ती आणि घटना, ह्या ऐतिहासिक सत्ये आहेत की केवळ दंतकथा आहेत, याविषयी समाजाचा संभ्रम कायम आहे.
'शोले' हे आर्ष महाकाव्य प्राचीन असून ते मानवाच्या इतिहास आणि संस्कृतीचा मानबिंदू आहे. समस्त समाजाच्या मनामध्ये आजही या महाकाव्यांविषयी अत्यंत आदर व पूज्यबुद्धीची भावना आहे. आपल्या दलनेत्याच्यामते 'शोले' हा सत्य इतिहासच आहे. तरीही पुरातत्त्वशास्त्राच्या नियमाप्रमाणे पाहता हा ‘इतिहासपूर्वकाळ’ ठरतो. याचे कारण फिल्मी या प्राचीन भाषेतील आपल्या पूर्वजोक्त साधनांमधून या काळाविषयी वेगवेगळ्या प्रकारची बरीच माहिती मिळत असली तरी या काळातील मानवाने बनविलेल्या निरनिराळ्या वस्तू आणि त्याने निर्मिलेल्या वास्तू उत्खननांमधून दिसत नाहीत. अर्थात ‘शोले’ या सालीम्जावेदबाबा रचित ग्रंथावर भाष्य करणारे ग्रंथ अनेक विद्वान संशोधकांनी लिहून प्रसिद्ध केले आहेत. या महाकाव्यांमधून उल्लेख केलेल्या व्यक्ती व घटना खरोखरच ऐतिहासिक आहेत की त्या निव्वळ दंतकथा आहेत, याविषयी विस्तृत चर्चा केली आहे. त्यासाठी या संशोधकांनी पुरातत्त्वशास्त्राबरोबरच, भूगोल, खगोलशास्त्र, गणित इत्यादी काही शास्त्रांची मदत घेतली आहे.
शोलेतील एक प्रसिद्ध नाव म्हणजे जय. युद्धकांडामध्ये जयबद्दल माहिती आलेली आहे. त्याचबरोबर सुप्रसिद्ध प्रकांडपंडित सिबुब्लेव म्याबा यांनी त्यांच्या ‘प्राचीन विकी-चरित्र कोश’ या ग्रंथात त्याबद्दल माहिती दिली आहे. त्याचबरोबर सांबा, कालिया यांच्याबद्दल माहिती आली आहे. जय याचे वास्तव्य आजच्या सेक्टर २ मधील स्लाविक परिसरात होते. शोलेनुसार बसंतीचा शोध घेण्यासाठी बिरू जयबरोबर दक्षिण दिशेला गेला होता. जय या जमातीतील सर्वश्रेष्ठ योद्धा होता. तत्कालीन समाजात त्याला मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. 'बिरू - गब्बर' युद्धात एक योद्धा या नात्याने त्याने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. बिरूने जयला आपला पार्श्वरक्षक म्हणून त्याची नियुक्ती केली होती. सांबा, कालिया आणि बागी या गब्बरपक्षी राक्षसांशी त्याने युद्ध केले होते. बिरूने त्याच्यासह बसंतीला युद्धक्षेत्रा पासून सुरक्षित दूर नेण्याची कळकळीची विनंती त्यानेच बिरूला केली होती. परंतु गब्बरपतनानंतर ठाकूर पक्षाचा विजय झाल्याची आनंदवार्ता ऐकण्यापूर्वीच त्याने आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. असा हा जय, देवांच्या आशीर्वादाने पुढील जन्मात दानशूर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध पावला, गरजूंना केवळ नाममात्र १०-१२ प्रश्न विचारून, उत्तराचे पर्याय सुद्धा देत असे, गरजूलोकांनी जेवढी योग्य उत्तरे दिली तेवढे मोठे दान तो त्यांच्या झोळीत टाकत असे, काही ऐतिहासिक लेखात आढळले आहे. या काव्यात अनेक व्यक्ती, घटना, कथा यांची सरमिसळ त्यामध्ये झाली आहे. अर्थात सालीम्जावेदबाबानी लिहिलेल्या मूळ शोलेचा विस्तार किती आहे, तसेच त्यामध्ये कोणत्या कथा वा घटनांची भर घातली गेली आहे, हे नीरक्षीरविवेकाने लक्षात येते. थोडक्यात सांगायचे म्हणजे जय, बिरू, बसंती ह्या ऐतिहासिक व्यक्ती होत्या हे निर्विवाद आहे. याच्याचसाठीच्या संशोधनपरंपरेचे एक ठळक उदाहरण सांगतो. नाबू या उद्योगपतीच्या वाचनात एकदा हे महाकाव्य आले. तो मार्सवरून सेक्टर २ मधे आला आणि सालीम्जावेदबाबानी आपल्या महाकाव्यात उल्लेखिलेली ठिकाणे प्रत्यक्षात अस्तित्वात होती की नाही, तसेच महाकाव्यात उल्लेख केलेल्या घटना प्रत्यक्षात घडल्या की नाही याचा शोध घेण्याचे त्याने ठरविले. तोपर्यंत शोले म्हणजे केवळ दंतकथाच आहेत असा समज संपूर्ण पृथ्वीतलावर होता. तो सेक्टर २ मधील हिस्सारलिक या ठिकाणी आला आणि त्याने पुरातत्त्वज्ञाच्या भूमिकेत शिरून तेथे उत्खननास सुरूवात केली. जवळजवळ 20 वर्षे उत्खनन केल्यानंतर त्याने तेथील वसाहतींचे अभ्यासांती नऊ कालखंड पाडले आणि त्यातला सहावा कालखंड शोलेचा आहे हे सिद्ध केले. २४०० च्या सुमाराला त्याचे निधन झाले.
पण लेखाच्या सुरूवातीलाच म्हटलप्रमाणे जय-बिरू आदींचे ऐतिहासिकत्व अजूनही वादाच्या भोवर्यात अडकले आहे. ह्या ऐतिहासिक व्यक्ती होत्या की केवळ एक दंतकथा अथवा सालीम्जावेदबाबानी आपल्या प्रतिभेने निर्माण केलेली पात्रे होती, असा वाद गेली शे-दोनशे वर्षे चालूच आहे. यांचे ऐतिहासिकत्व सिद्ध करायचे असेल तर त्यापूर्वी 'शोले' खरोखरच घडले की नाही आणि जर घडले असेल तर त्याचा काळ निश्चित ठरविता आला पाहिजे. अंत:स्थ आणि बहि:स्थ प्रमाणे पाहता शोलेचा काळ २३ व्या शतकापूर्वीचा असला पाहिजे. हे निश्चित आहे. वर्तमानयुगाचा प्रारंभकाळ हा वर्ष २२८० असा ठरविण्यात आला आहे. त्यामुळे शोलेत वर्णन केलेल्या घटना साधारणपणे २१ व्या शतकापूर्वी घडल्या असल्या पाहिजेत.

संस्कृतीधर्मइतिहासवाङ्मयकथाबालकथामुक्तकसमाजजीवनमानमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

वारल्या गेलो आहे.
आणि महाराज
लेखाची पार्श्वभूमी, २१ व्या शतकातल्या वाचकांसाठी ::
१६ मार्च २२८०

हे २१ व्या शतक कसे हो :)

ठाकूरपक्षाचा अध्वर्यू बलदेव याने गब्बरचा आपल्या पायांनी वध केल्याचीही एक कथा आहे. परंतु सेन्सारऋषींनी सिद्ध केलेल्या प्रतीत मात्र गब्बरवर बलदेवने पाय चालवण्याआधीच पोलीस येतात असे चित्रण आहे. आता कोणती कथा खरी आणि कोणती प्रक्षिप्त हे उपलब्ध पुराव्यांवरून समजणे कठीण आहे.

शोलेकाळाचे ज्येष्ठ अभ्यासक बुना यांच्या इतर समकालीन दस्ताऐवजांच्या अभ्यासानुसार पोलीस नेहेमी व्हिलन मेल्यावर येतात. त्यामुळे सेन्सारऋषींची कथा प्रक्षिप्त आहे असे मानायला वाव आहे.

ठाकूरपक्षाचा अध्वर्यू बलदेव याने गब्बरचा आपल्या पायांनी वध केल्याचीही एक कथा आहे.

हस्तलिखितांत अजूनेक बारकावा असा आहे की बलदेवाने गब्बरच्या उदरावर लत्ताप्रहार केल्यानंतर तो मागे ढकलला गेला, आणिक तिथल्या तोरणस्तंभातल्या एका बाणवजा लोहमय अस्त्राने घुसून त्याचा प्राण घेतला. आजवर वीर एकमेकांवर अस्त्रे फेकीत, पण साक्षात् वीरालाच अस्त्राकडे फेकण्याची ही बहुधा काव्येतिहासातलीही पहिलीच वेळ असावी. शिवाय हे लोहमय अस्त्र ज्या तोरणस्तंभात स्थित होते त्याच तोरणस्तंभांशी ठाकूरकडून बद्धावस्थेत हस्तदान घेण्यात आले होते.

मूळ महाभारतात व रामायणात जशा अनेक प्रक्षिप्त कथा घुसडल्या गेल्या, तोच प्रकार इथेही झाला. नंतरच्या समाजाला रुचेल अशाच कथा सेन्सॉरऋषींनी घुसडल्या, परिणामी मूळ इतिहास पुसला गेला. यास्तव काही प्रतींत त्यांचा उल्लेख 'शेणसार' ऋषी असाही केल्या गेलेला आहे. मूळ संस्कृत ग्रंथात हा एकच शब्द प्राकृतात कसा काय आला, याबद्दल विद्वानांत अजूनही मतमतांतरे आहेत. काही विद्वानांच्या मते सेन्सॉर हा यावनी शब्द शेणसार नामक प्राकृत शब्दावरून आलेला आहे, तर काहींच्या मते दोन्ही शब्द एकाच 'सन्सार' नामक संस्कृत शब्दावरून आलेले आहेत.

आदूबाळ's picture

8 Apr 2015 - 7:36 pm | आदूबाळ

'शेणसार' ऋषी
=))

बॅटमॅन's picture

8 Apr 2015 - 7:41 pm | बॅटमॅन

;)

हा शब्द आमचा नव्हे. फेबुवर पाहिलेला.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Apr 2015 - 10:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

_/\_ शिष्य करुन घेतोस का _/\_

संदीप डांगे's picture

8 Apr 2015 - 10:39 pm | संदीप डांगे

_/\_ चमत्कारी प्रतिसाद...

मास्टरमाईन्ड's picture

8 Apr 2015 - 11:10 pm | मास्टरमाईन्ड

'शेणसार' ऋषी
मस्तच
खरोखरच कधी कधी शेण सार असल्यसारखं वाटतं

होबासराव's picture

8 Apr 2015 - 7:21 pm | होबासराव

लगे हाथो पार्श्वरक्षक का मतबल भी समझाई दियो जरा.

जौन है तौन से
भामटे काका (अंतिम भाग ७७ वा)

संयुक्त मयप्रदेशांमधे कायद्याचे प्रहरी नेहमी जोडीनेच कार्य करतात, पहिला प्रहरी काही संशयास्पद वास्तुमधे वा प्रदेशांमधे प्रवेश करताना, आपल्या सह-प्रहारीला आपल्या पार्श्वरक्षणासाठी बरोबर घेतो, त्याला त्यांच्या भाषेत BackUp Police Officer असे म्हणतात.

बॅटमॅन's picture

8 Apr 2015 - 7:48 pm | बॅटमॅन

तारीख-ए-गब्बरी या फारसी ग्रंथाच्या उर्दू भाषांतरातही वरील कथेचा उल्लेख आलेला आहे. त्यात बलदेव-गब्बर संघर्षाकडे वर्गसंघर्षाच्या अँगलने बराच विस्तृत आणि रोचक उहापोह आहे. शत्रुपक्षाकडच्या स्त्रीवर जबरदस्ती न करण्याचा आदर्श त्याने रावणाकडून घेतला. शिवाय त्याची राहणीही एकदम साधीसुधी होती, इ.इ. बराच उहापोह त्यात आहे. रामगढ़वासीयांकडून जरूरीपुरते धान्य घेण्यात काही जुलूम नाही, याची त्याला पक्की जाण होती. पण इतकेही न घेऊ देता बलदेव आणि त्याचे दोन मारेकरी गब्बरच्या जिवावर उठले, सबब त्याने जरासा प्रतिकार केला आणि पारंपरिक व्यवस्थेला छेद देण्याचा एक अभिनव क्रांतिकारक प्रयोग केला.

शोलेविच-आताबास्की नामक वरील ग्रंथाच्या रशियन भाषांतरातही हे विवेचन अधिक विस्ताराने करण्यात आलेले आहे. मार्क्स, लेनिन, ट्रॉट्स्की, वस्कनोरड्लास्की, इ. च्या क्रांतिकारक विचारसरणीचा एक तगडा आणि उत्फुल्ल आविष्कार म्हणून शोलेकडे बघण्यात यावे अशी त्यात आग्रहाची शिफारस आहे.

पॉइंट ब्लँक's picture

8 Apr 2015 - 7:56 pm | पॉइंट ब्लँक

लै भारी राव.

असा हा जय, देवांच्या आशीर्वादाने पुढील जन्मात दानशूर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध पावला, गरजूंना केवळ नाममात्र १०-१२ प्रश्न विचारून, उत्तराचे पर्याय सुद्धा देत असे, गरजूलोकांनी जेवढी योग्य उत्तरे दिली तेवढे मोठे दान तो त्यांच्या झोळीत टाकत असे, काही ऐतिहासिक लेखात आढळले आहे.

हसून हसून पोटात दुखायला लागले. :)

बॅटमॅन's picture

8 Apr 2015 - 8:00 pm | बॅटमॅन

अगदी असेच म्हणतो =)) =)) =))

याशिवाय बलदेवकथा, जयवीरभारत, वसंतिदूत, धन्नोमोक्ष, इमामसन्नाटा, मौसीपन्ह, गब्बरोपाख्यान, सांबार आव्हानमु, कालियामर्दन, तसेच संवादचंपू (सकल कथेतील संवादांचे वर्णन), फिफ्टी शेड्स ऑफ गब्बर, ठाकुरप्पधिकारम्, इ. अनेक भाषांतील ग्रंथ अजून अप्रकाशित आहेत. त्यांचाही कुणीतरी अभ्यास केला पाहिजे. नपेक्षा हा सर्व अमोलिक सांस्कृतिक वारसा काळाच्या पडद्याआड कधी जाईल ते समजणारच नाही.

"शोले च्या इतिहासाची साधने" यावर पी हेच डी करणार्‍यांना वरील सर्व ग्रंथ नजरेखालून घालावे लागतील. मार्गदर्शक म्हणून आपले नाव सुचविण्यात येत आहे.

बॅटमॅन's picture

8 Apr 2015 - 8:11 pm | बॅटमॅन

बहुत धन्यवाद!

-बॅ.का. राजवाडे.

हाडक्या's picture

8 Apr 2015 - 8:15 pm | हाडक्या

फिफ्टी शेड्स ऑफ गब्बर

अग्गागा.. नै ते हात टांगलेला ठाकूर, बीरु इत्यादि. इत्यादि अन मागे उभा असलेला गब्बर आठवला.. (सगळ्या कंशेप्टच भ्रष्ट झाल्या.. ;) )

[ता.क. चित्रपट पाहिला असेल तर संदर्भ कळेलच.. तसेही सूज्ञास अधिक सांगणे न लगे..]

बॅटमॅन's picture

8 Apr 2015 - 8:18 pm | बॅटमॅन

माझे स्मरण बरोबर असेल तर...गब्बरच्या हातात त्याचा 'प्रतोद' उर्फ चाबूकही असतोच. ;)

शिवाय हातात सापडलेल्या बसंतीला असे सोडून देणे वगैरे पाहिले म्हणजे संगती लागूही शकेल, नै ;)

होबासराव's picture

8 Apr 2015 - 8:12 pm | होबासराव

आता बास कि.... ह्ह्पुवा

नगरीनिरंजन's picture

8 Apr 2015 - 8:26 pm | नगरीनिरंजन

=))
सगळे पटाईत झालेत विडंबन करण्यात.ब्याटम्यान राजवाडेंनातर शि.सा.न. _/\_

मंदार कात्रे's picture

8 Apr 2015 - 9:10 pm | मंदार कात्रे

अश्वरथचालक बसन्तीदेवी व त्यांचेवर बहुत प्रीती असणारे वीरुदेव आणि त्यांची मौसी यांचा एक पुराणप्रसिद्ध प्रवेश ... वीज नसलेल्या गावात पाण्याची टाकी , त्यावर चढून मरना कॅन्सल .... म्हणनारे वीरुदेव , यावरदेखील काही येवु द्या की राव !

रामगढ की मौसी, रहे सज्जन शीलवान, उनकी भांजी बसंती, रूप-गुणों की खान ।
विवाह के योग्य हुई जब, चढ़ यौवन-सोपान, ख्याति गांवमें फैली, सूर्य-किरण समान ।
बिरूके मन बसी, रामगढ की पार्थकन्या। करते कामना बने पत्नी, कामिनी वह धन्या ।
बिरूके अस्त्रकौशल सुन, वह भी थी आकर्षित, तेजस्वी वीर के प्रति, मन ही मन में समर्पित ।
जिसने हराये अधर्मी डकेत अनगिनत, वही होवे पति मेरा, अगर है भाग्य में निहित ।
योद्धा बिरूने, करके युक्ति विचार, सूचित कर मित्र जयको, अपने दिलका भार ।
वृद्धा मौसीसे बिरू ने जाकर कहा, बिरूके साथ ब्याह दो भांजी बसंती यहा ।
मौसीको बसंती स्वयंपुत्रीसम प्रियप्रकार, विवाहप्रस्ताव सुन, प्रथम होवे प्रसन्न अपार ।
किंतु जयमुखे सुनकर बिरूकर्मकथा सुरम्या, न करती कामना बने पत्नी, अपी शत्रूकन्या ।
नगर के बाहिर जल का पर्वत भव्य अपार, करके सोमरसपान चाहे बिरू प्राणोका व्यापार ।
यमभेट के हेतूसे बिरू अपने प्रण को धरा, मौसीमन जागृत की स्वीकृती अभीधारा ।
विवाहवचन प्राप्तकर त्यागी यमभेट तत्पर, बसंती पाणिग्रहणमात्रे , बिरू होवे सत्वर ।

बॅटमॅन's picture

9 Apr 2015 - 2:01 pm | बॅटमॅन

क्लिंटन ज्यों आप पर
श्रीगुर्जी माई पर
त्यों कहि शोले पर
गजोधरवा ही है!!!

काळा पहाड's picture

9 Apr 2015 - 11:09 pm | काळा पहाड

मालक, दंडवत घ्या.
बाकी चाल आरतीची ठेवावी काय? की हनुमान चालीसाची?

आजानुकर्ण's picture

8 Apr 2015 - 9:15 pm | आजानुकर्ण

मजेशीर धागा... गब्बरच्या चक्रव्यूहात शिरणारा सलीमही आठवला.

एक एकटा एकटाच's picture

8 Apr 2015 - 9:43 pm | एक एकटा एकटाच

अशक्य आहे हे सगळं

वाचुन

आय यम गडाबडा "लोळींग"

रामपुरी's picture

8 Apr 2015 - 10:23 pm | रामपुरी

बिरूने जयला आपला "पार्श्वरक्षक" म्हणून त्याची नियुक्ती केली होती
ह ह पु वा

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Apr 2015 - 10:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

=))))

हर्शरन्ग's picture

8 Apr 2015 - 11:08 pm | हर्शरन्ग

मस्त .. मजा आली वाचून .. :)

रुपी's picture

9 Apr 2015 - 3:20 am | रुपी

मस्त

नाखु's picture

9 Apr 2015 - 9:39 am | नाखु

आचरण्मुल्यांचा उगम या निमित्तने झाला असे थोर इतिहास संशोधक श्री शोलोबा रामगडकर यांनी आमचे भोकरवाडीच्या दै "पिपाणी" च्या प्रतिनिधीशी वार्तालाप करताना नमूद केले:
त्यातील काही सारांश देत आहोत.(मूळ पुस्तकासाठी व्य्नी करावा टपाल्खर्चासहीत्-अजुन हिथ)

पि.प्रः नमस्कार ,तुम्ही नक्की काय आचरण्मुल्यांचा अभ्यास केलाय, आम्च्या वाचकांना उत्सुकता आहे.
शोरामः राम राम (आम्च्या रामगडात आम्ही फक्त राम राम म्हणतो) काही घटनाच इतक्या वैवीध्यपूर्ण आणि विलक्षण परिणामकारक आहेत की त्याच्यावरून आचरण्मुल्यांचा उगम झाला. उदा =
पळत्याला काठीचा आधार

तुम्हाला तुरुंगातून पळायचे असेल तर पैसे-शस्त्रे अशी खर्चीक उपाय योजना करण्यापेक्षा पिस्तूल आकाराची काठी तासता आली तरी पुरेसे फक्त त्या काठीला घाबरेल असा आणि हरिराम नेट्वर्कवाला जेलर शोधायचा म्हणजे तुमचे काम फत्ते !

एखाद्याचा सूरमा भोपाली होणे =

हे उदाहरण तर तुम्ही बर्‍याचदा हाफिसात्/लग्नसमारंभात पाहीले असेल.एखादा अग्दी बढाया मारीत अस्तो मी कुणाला घाबरत नाही अग्दी अमक्य-तमक्याला कसा झापला/चेपला वगैरे आणि नेम्का तोच अमका-तमका नकळत त्याचे मागेच उभा असतो.

"मावशी राजी तर भाचीचे हाजी"
तुमच्या लक्षात आले असेल भोळा विरू पहिल्यांदा मावशीचे मन वळवतो आणि मगच बसंतीला पळवतो. या आचरण्मुल्यांचा अगिकार करायचा असेल तर मावशी चढू शकणार नाही अशी मोठी टाकी शोधून ठेवावी.जवळपास पोलिस नाहीत याची खात्री करावी. माझे तर ठाम मत आहेकी रामगडवाल्यांनी मावशी टाकीवर चढून जाण्याच्या प्रयत्नात आख्खी टाकीच कोसळून रामगढ पाणी-टंचाई होऊ नये म्हणून बसतींचे लग्नाचा कमी खर्चाचा आणि बिनभांडवली रास्त पर्याय सुचवला.(ग्राम सभेची कल्प्ना तिथून आली काय यावर एकदा संशोधन करावे लागणार बहुतेक)

शोरामः सगळी आचरण्मूल्ये इथे दिली तर पुस्तक कोण घेईल..

पि.प्रः तर हे होते आपले शोराम आद्याक्षर असेलेले रामगढचे संशोधक. काही जण या आचरण्मूल्यांना आचरट्मूल्य असेही म्हणतात पण प्रत्येकाला आप्ले मत मांडण्याचा अधिकार आहे असे आमच्या दै "पिपाणी" चे ठाम मत आहे.

दै "पिपाणी"
पिर्पीर तुमच्या कानी !
दै "पिपाणी" !

बॅटमॅन's picture

9 Apr 2015 - 11:58 am | बॅटमॅन

ठ्ठो =)) =)) =))

जेपी's picture

9 Apr 2015 - 9:50 am | जेपी

___/\___

आनन्दा's picture

9 Apr 2015 - 10:31 am | आनन्दा

फार काही बोलत नाही..पण लेख ओरिजिनल वाटला नाही... किंवा लेख तुमचाच असेल, पण रामायणावर लेख लिहून त्याच्यामध्ये गाळलेल्या जागा भरल्या आहेत असे वाटले.
सॉरी.. नाही आवडला.
बाकी कल्पना भारी. त्यासाठी +१०००००००

प्राचीन विद्वान शैरीश कंनेकर यांचा "फिल्ल्म गोष्टी" हा जिर्ण ग्रंथ आजचे थॉर संशोधक नाकाशी माशा यांच्या हाती लागला. खूप पाने फाटली होती पण एका पानावर विरू आणि जय हे कोणत्याशा जेल मधे दगड फोडून उपजिवीका करत असतात असा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. एक अंग्रेज जमान्यातील जेलर आचरटानी (हा कोणता जमाना हा पण संशोधनाचा विषय आहे) त्यांच्यावर नजर ठेवून होता.नाकाशी माशांनी उत्तर दिशेला बरेच उत्खनन केल्यानंतर त्यांना तिहार नामक एका जेलचे अवशेष सापडले. तसेच जेलरचे नाव करन भेदी असे होते असेही संशोधनाअंती आढळून आले. यावरून सालीम्जावेदबाबानी लिहीलेले शोले हे काल्पनिक महाकाव्य असावे या विधानास पुष्टी मिळते.

चौथा कोनाडा's picture

9 Apr 2015 - 1:09 pm | चौथा कोनाडा

भन्नाट धागा अन त्यावरचे सुपर भन्नाट प्रतिसाद वाचुन हसुन हसुन पुरेवाट झाली ! ब्याटम्यान, नाद खुळा व बबन ताम्बे या महापंडितांचे प्रति-पादन वाचुन बेशुद्ध पडायची वेळ आली !

मजा आली ! होऊ द्या दंगा, पगला गजोधर ढंगा !

'पिंक' पॅंथर्न's picture

9 Apr 2015 - 9:24 pm | 'पिंक' पॅंथर्न

एकदम जबराट !!!!

लेख आणि प्रतिसाद सुद्धा !!!

व्हॉट्सवरच्या फालतु इनोदांच्या जमान्यात ब-याच दिवसानंतर अगदी मनसोक्त हसलो ......बाकी चालु द्या !!!