गणपुले काकू

आनंद भातखंडे's picture
आनंद भातखंडे in जनातलं, मनातलं
24 Jul 2012 - 1:22 pm

(जानेवारी २०१२ मध्ये हा लेख लिहिला होता. माझ्या आयुष्यात ज्या माऊलीने अमुलाग्र बदल घडवून आणला त्या गणपुले काकू यांच्या बद्दलच्या भावना या लेखात प्रकट केल्या आहेत.)

काही दिवसांपूर्वी राहुलचा फोन आला होता. म्हणत होता सोमवार, १६ जानेवारी बद्दल कळलं ना??? फेसबुकवर मेल टाकलं आहे. काकूंचा वाढदिवस साजरा करायचा आहे, शुभमंगल हॉलमध्ये, संध्याकाळी ७ ते ९. जरूर ये.पण काकूंना काही बोलू नकोस, त्यांना हे सरप्राईज आहे. मी येतो म्हटलं आणि १६ ला संध्याकाळी कुठलही काम ठेवायचं नाही असं मनाशी पक्कं केलं. बायकोला पण सांगितलं आणि गणपुले काकूंचं आमंत्रण म्हटल्यावर ती कसलीही आडकाठी करणार नाही हे माहीतच होतं. १६ जानेवारीला बरोब्बर ७ वाजता हॉलवर पोहोचलो. गणपुले काकूंच्या बद्दल आपुलकी, सद्भावना असलेली कित्येक जण तिथे उपस्थित होते. वाढदिवस सोहळा चालू झाला. राहुल भाषण करायला उभा राहिला आणि माझं मन मात्र आठवणींवर स्वार झालं.

राहुल गणपुले माझा ठाणा कॉलेजमधील मित्र. शिक्षण पूर्ण झाल्यावर राहुलने डोंबिवली मध्ये Edit या अग्रणी संस्थेच्या मदतीने Computer aided Graphics चा क्लास काढला. त्यावेळीच तो मला म्हणत होता एखादा छोटा मोठा कोर्स करून घे …. भविष्यात संगणकाशिवाय तरणोपाय नाही. पण माझ्या डोक्यावर उच्च शिक्षण, पी.एच.डी. इ. चं भूत मानगुटीवर बसलं होतं. मी मुंबईच्या विज्ञान संस्थे मध्ये प्रवेश घेतला आणि राहुल एडीट च्या व्यवसायात गुंतला. वाटा वेगळ्या झाल्या असल्या तरी तो कायम संपर्कात होता. २ वर्षांनी माझं M.Sc. पुर्ण झालं. आणि काही अपरिहार्य कारणामुळे मला तो मार्ग सोडून अर्थार्जनासाठी काही वेगवेगळे मार्ग चोखंदळावे लागले. त्याकाळी संगणक प्रशिक्षण घेऊन चटकन नोकरी मिळत होती. “लॉजिक” हा काय प्रकार असतो हे माहित नसलेल्या माझ्या मेंदूला coding/programming झेपणारे नव्हते. याचं काळात राहुल भेटला आणि त्याने मला क्लास वर बोलावले.

Counseling करायला समोरच्या खुर्चीत एक पन्नाशीच्या आसपासच्या बाई होत्या. शिडशिडीत अंगकाठी, वयोमानापरत्वे पांढरे झालेले केस, डोळ्यात सात्विक भाव आणि आवाजात एक वेगळ्या प्रकारचा प्रभाव होता. राहुलने ओळख करून दिली, “ही माझी आई. आईच इकडचं सगळं बघते” हीच माझी आणि काकूंची पहिली भेट. मी काकूंना माझी सगळी तत्कालीन परिस्थिती सांगितली. त्यांनी मला सगळं समजावून सांगितलं. ज्या मुलाने कॉम्पुटरला कधी हात पण लावला नव्हता तो शिकायला येणार होता. काकूंनी दोन तीन दिवस क्लास मध्ये बसण्यास अनुमती दिली आणि मग “झेपलं” तर कोर्स सुरु कर असं सांगितलं. शुभस्य शीघ्रम म्हणत त्यांनी लगेच मला “Web Multimedia” च्या कळपात घुसवल.तेंव्हा पासून जो ऋणानुबंध जुळला तो आजतागायत तसाच आहे. काकू क्लास मध्ये असल्या की म्हणतात ना तसं “COOL” वाटायचं. पण गणपुले काकांचा दरारा असायचा. त्यांच्या दमदार आवाजाची एक वेगळीच जरब होती. दोघांची विचारसरणी वेगवेगळी, काका सडेतोड आणि रोखठोक तर काकू कलाकलाने घेणाऱ्या. काका काकूंना नेहेमी म्हणायचे “कशाला लागतेस या मुलांच्या मागे, त्यांना कळत नाही का आपलं बरं वाईट कशात आहे ते? पाहिजे तर करतील नाही तर जातील … फी भरली आहे ना?” पण काकू त्यांच्या कडे दुर्लक्ष करून सतत आमच्या मागे असायच्या. एखादे दिवशी क्लासला कुणी नाही आलं तर दुसऱ्या दिवशी त्याची चौकशी ठरलेली. आणि त्याच्या बद्दल जरा काही शंका आली तर उलट तपासणी चालू व्हायची. पण या सगळ्या मागे त्या विद्यार्थ्याच्या बाबतीत असलेली काळजीच असायची. काका पण प्रेमळ होते. वरून शहाळ्यासारखे टणक असले तरी मन मात्र गोड पाण्याप्रमाणे होतं. काका दोन बोटात विल्सची सिगारेट धरून खिडकीत उभे असायचे. येणाऱ्या जाणाऱ्या वर करडी नजर असायची. त्या खिडकीला मी टेहळणी बुरुज म्हणायचो कारण तिथून शिवाजी पुतळ्याच्या आजूबाजूचा बराचसा टापू नजरेत यायचा. काकूंकडे दुजा भाव कधीच नव्हता. विद्यार्थी ताब्यात आला की त्याला शिकवून सावरून मार्गी लावायचं हेच ध्येय आणि हाच वसा. त्या खऱ्या किमयागार, माझ्या सारख्या अगणित मुलांना योग्य मार्गदर्शन करून स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा आत्मविश्वास निर्माण करणे म्हणजे काही सोपं काम नाही. काकू आणि एडीट मुळे अश्या कितीतरी मुलांच्या आयुष्याचे सोने झाले आहे.

माझी गरज म्हणा किंवा शिकण्याची आवड म्हणा, काकूंनी मागे लागून माझा कोर्स वेळेआधी पूर्ण करून घेतला. जसा कोर्स संपत येतो तसं काकू सगळ्यांना इंटरव्ह्यू साठी पाठवत असतं. इंटरव्ह्यूची सवय व्हावी हाच एक त्या पाठचा उद्देश. एखादा विद्यार्थी इंटरव्ह्यूला जाऊन यायच्या आत काकूंकडे त्या इंटरव्ह्यूचा रिपोर्ट तयार असायचा. आणि त्या दृष्टीने काकू त्याला मार्गदर्शन करत असत. एखाद्या स्टुडंटला नोकरी मिळाल्याचा आनंद हा कदाचित त्याच्या पालकांपेक्षा काकुंनाच अधिक होत असावा. हातात सापडलेलं मुलं कुठेतरी नोकरीला चिकटवला की कर्तव्यपूर्तीचा आनंद त्यांच्या चेहेऱ्यावर दिसायचा त्याचे वर्णन शब्दात करता येणार नाही. पेढा द्यायला आलेल्या एखाद्या नाठाळ मुलाला देखील प्रेमाने म्हणायच्या “इथे तरी निट काम कर म्हणजे झालं … नाही तर येशील उद्या परत … काकू जॉब द्या म्हणत”. इतके असून सुद्धा काही महाभाग होतेच ज्याना वाटत असे की काकूंनी त्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी नाही मिळवून दिली नाही. अश्या मुलांकडे दुर्लक्ष्य करून काकूंनी घेतलेला वसा देवपूजे प्रमाणे चालू ठेवला.

एकंदरीत पाहता काकूंना माझ्याकडून थोड्या जास्तच अपेक्षा होत्या असं मला वाटतं. सुंदर, गुणवान मुलीच्या बापाला जसं तिच्या लग्नासाठी उंबरठे झिजवावे लागत नाहीत असंच काहींस माझं आणि माझ्या नोकरीबाबत काकूंना वाटत असावे.वेगवेगळया ठिकाणी मी इंटरव्ह्यू द्यायला जात होतो.सगळे इंटरव्ह्यू उत्तम जायचे पण पुढे काहीच हालचाल व्हायाची नाही.काकूंना माझा रिपोर्ट चांगला यायचा पण कुणीही नोकरी द्यायचे नाही. आणि नोकरी न देण्या मागचे ठोस कारण पण कळायचे नाही. एक नाही दोन नाही तब्बल २१ इंटरव्ह्यूची जुडी माझ्या नशिबाच्या पायावर वाहून झाली होती. मी अशा सोडली होती आणि काकू कधी नव्हे त्या हतबल दिसत होत्या. त्यांनी माझा डेमो इंटरव्ह्यू घ्यायचे ठरवले. माझ्या resume मधील शब्द न शब्द डोळ्याखालून घातला. तेंव्हा त्या वातानुकुलीत खोलीत पण मला घाम फुटला होता. काकूंनी नेहेमीच्या स्टाईलने डोळ्यावरून चष्मा काढून ठेवला आणि म्हणाल्या “resume तर ठीक आहे”. माझा अर्धा जीव भांड्यात पडला. आमचा इंटरव्ह्यू चालू झाला. काकूंनी बऱ्याच प्रश्नांची तयारी केली होती. माझ्या प्रत्येक उत्तरागणीक काकूंच्या चेहेऱ्यावरील चिंता कमी होत होती. मग काकूंनी माझ्या उच्च शिक्षणाबद्दल विचारले. जे मी आधीच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितले तोच रट्टा इथे पण मारला. माझ्या बोलण्यातून माझ्या शिक्षणातील विषयाची आवड, त्या क्षेत्रात काम करण्याची तळमळ जाणवत होती. काकूंना मला नोकरी न मिळण्याचे कारण कळले होते. माझं बोलून झाल्यावर त्या शांतपणे मला म्हणाल्या “तुझं उच्च शिक्षण आणि तो विषय या बाबतचे खूळ डोक्यातून काढून टाकलंस तरच तुला नोकरी मिळेल. नाहीतर कितीही ठिकाणी गेलास तरी आज पर्यंत जे होत आलं तेच होणार”. मी माझी चूक समजलो होतो आणि काकूंनी सांगितल्या प्रमाणे त्याची लगेच अमलबजावणी केली. त्याचे फळ पुढच्याच इंटरव्ह्यू मध्ये मिळाले. काकू मनातल्या मनात म्हणत असतील ‘चला एकदाचं गंगेत घोडं न्हायलं’. त्या नंतर देखील काकूंची साथ सुटली नाही. कोर्स पूर्ण होवून २ वर्ष झाली होती तेंव्हा सुद्धा त्यांनी मला नोकरी मिळवायला मदत केली. इथे इतर क्लास सारखी व्यावसायिकता नाही …. आहे तो फक्त प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी.

हा सगळा गतकाळ माझ्या मिटलेल्या डोळ्यांसमोर फिरत होता.जेंव्हा डोळे उघडले तेंव्हा काकूंचे औक्षण चालू होते. सगळी कडून अभिष्टचिंतनाचा वर्षाव चालू होता. काकूंच्या डोळ्यातून समाधानाचे आणि आनंदाचे अश्रू वाहात होते. त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची अनुभूती तिथे परत जाणवली. शांत, निश्चल आणि समाधानी. काकूं बद्दल मी काय बोलणार. बोलायला गेलो तर केवळ डोळ्यात अश्रू उभे राहातात आणि शब्द मनातल्या मनात भिजून जातात. माझ्यासारखे कितीतरी आहेत ज्यांच्यावर या माउलीचे अनंत उपकार आहेत जे जन्मजन्मांतरी फेडता येणं शक्य नाही. काकूंचं प्रेम, आपुलकी, माया म्हणजे कधीही न तुटणारे ऋणानुबंध आहेत, जणूकाही आम्हांला मिळालेली दैवी देणगीच. ही देणगी त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनात मोरपिसाप्रमाणे जपली आहे. मी मुद्दाम इथे पुस्तकात जपून ठेवलेल्या नाजूक जाळीदार पिंपळाच्या पानाची उपमा नाही देणार कारण माझ्या मनातल्या पुस्तकातील हे पान कायमच हिरवं राहील …. अगदी कालच जपून ठेवलं असल्या सारखं.

कथासमाजजीवनमानरेखाटनप्रकटनसद्भावनालेखमतअनुभवमाहितीप्रतिभा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

24 Jul 2012 - 1:53 pm | मुक्त विहारि

छान लिहिले आहे..

मन१'s picture

24 Jul 2012 - 1:58 pm | मन१

अगदि ज्येष्ठ श्रेष्ठ दवणे ह्यांच्या तोडीचं वाटलं.
व्यक्तिमत्वाने भारावून गेलो.

स्वैर परी's picture

24 Jul 2012 - 2:02 pm | स्वैर परी

सरळ साधा परंतु मनाला भावणारा लेख! :)

जे.पी.मॉर्गन's picture

24 Jul 2012 - 2:12 pm | जे.पी.मॉर्गन

कृतज्ञता व्यक्त करणारं व्यक्तिचित्र आवडलं. तरी काकूंबद्दल अजून वाचायला आवडलं असतं - हे कुठेतरी थोडंसं अपूर्ण वाटतं आहे.

लेख अर्थातच आवडला.

जे पी

RUPALI POYEKAR's picture

24 Jul 2012 - 3:46 pm | RUPALI POYEKAR

खुपच छान ले़ख.

इरसाल's picture

24 Jul 2012 - 4:25 pm | इरसाल

शेवटच्या चार ओळीतर कळस चढवण्यात यशस्वी.
आवडला.

"शेवटच्या चार ओळीतर कळस चढवण्यात यशस्वी " हेच लिहिणार होतो.

प्रभाकर पेठकर's picture

24 Jul 2012 - 6:28 pm | प्रभाकर पेठकर

काकूंबद्दलचा जिव्हाळा चटकन जाणवतो. छान आहे.

लेख छान आहे.
गणपुले काकू आवडल्या.

निवेदिता-ताई's picture

24 Jul 2012 - 7:54 pm | निवेदिता-ताई

छानच ...

आपल्या गणपुले काकु म्हणजे एक आख्याईका आहेत.
नाहितर आजकाल क्लास म्हणजे फक्त पैसा मीळविण्याचे साधन झालेय.
माऊलीची आठवण आली ... आता लवकरच क्लासला भेट द्यायला हवी.

जाई.'s picture

24 Jul 2012 - 8:40 pm | जाई.

लेख आवडला

सुमीत भातखंडे's picture

24 Jul 2012 - 8:42 pm | सुमीत भातखंडे

लेख. आवडला

किसन शिंदे's picture

25 Jul 2012 - 1:14 am | किसन शिंदे

गणपुले काकूंच वर्णन वाचतानाच माझ्या नजरेसमोर शाळेतल्या 'जोशी बाई' उभ्या राहिल्या. :)

शिल्पा ब's picture

25 Jul 2012 - 3:19 am | शिल्पा ब

छान लिहिलंय.
नाव वाचल्यावर मला एकदम पु.लं.च्या गणपुल्यांची आठवण आली अन तसाच एखादा लेख आहे काय वाटलं.

अप्रतिम लेख आणि गणपुले काकू पण. म्हणतातना

"देणारयाने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे,
देणारयाने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे."

गणपुले काकूंचा वसा आपणही पुढे चालवाल अशी खात्री वाटते. अश्या गोष्टींचा खूप प्रभाव पडतो आपल्या आयुष्यावर.

माधवी भावे

सुर्र's picture

25 Jul 2012 - 11:26 am | सुर्र

खुप्च च्चान लिहिल अहे. अशा मान्साची गर्ज अहे.