चेन्नई पुणे चेन्नई -- भाग -१

मराठमोळा's picture
मराठमोळा in जनातलं, मनातलं
1 Apr 2011 - 12:10 pm

चेन्नई - पुणे - चेन्नई.

नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो,
आयुष्याच्या प्रवासात आपण बरेच काही अनुभवतो. चुका करतो, हसतो रडतो, गमती बघतो. केलेल्या चुकांना आपण अनुभव म्हणतो आणी ईतर गोष्टींना आठवणी. आयुष्याच्या शेवटी हेच काय ते उरत असावं बहुदा. असो...

चार महिन्यापुर्वी कंपनीने आम्हाला चेन्नईला जाणार का विचारले, अर्थातच विचार न करता "नो" म्हणालो. कंपनीला या उत्तराची अपेक्षा होतीच, मग लगेच बाहेर जावं लागेल असा दम दिला. अर्थात मला खाजगी कारणास्तव २-३ महिने भारत सोडता येणार नाही हे माहित असल्याचा गैरफायदा कंपनीने बरोबर घेतला आणि नाइलाजास्तव मी चेन्नईचे काम हाती घेतले, आठवड्याकाठी पुण्याला येऊ शकेल इतकी काळजी कंपनीने दाखवली. अर्थात दर आठव्ड्याला प्रवास करण हे एखाद्याला प्रतिष्ठेचं, सोपं, आणि गमतीचं वाटत असलं तरी ते करणार्‍याला किती त्रास होतो हे त्यालाच माहित. ( कृपया गैरसमज नकोत. इथे काहीही दाखवण्याचा क्षीण/ताकदवान प्रयत्न नाहीये. धिस इज ओन्ली बॅकग्राउंड ;) ).

उतरलो तेव्हा पहिली जाणीव झाली ती दमट हवा आणि आपण पासपोर्ट शिवाय एका नव्या देशात आलोय याची. इथे पासपोर्ट म्हणजे तामिळ भाषा बोलता-समजता येणे. संध्याकाळची वेळ. चेन्नईमधे वादळी पाऊस झाला होता. टॅक्सी, रिक्षा सर्वांचीच कमतरता झाली होती. प्रीपेड कॅब घ्यायचा प्रयत्न केला तर १-२ तास लागतील अशी माहिती मिळाली. बाहेर आलो. काही काळ्या-पिवळ्या टॅक्सी शेअरींग मधे चालु आहेत असं दिसलं. ८-१० किमी अंतरासाठी किती पैसे लागतील असा विचार करुन जवळ गेलो तर चक्क ३५० रुपये म्हणाला, त्यात पण दाटीवाटी करुन ४-५ जण टॅक्सीत बसणार, मला इथे आपल्या १०-१२ कमी कपड्यातल्या ललनांना आजुबाजुला घेउन बसणार्‍या बॉलीवुड हिरोंची फार आठवण झाली. पण काय करणार आलेया भोगासी.. मी ३५० रुपये द्यायला नकार दिला, माझ्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकुन एकही शब्द न बोलता टॅक्सी ड्रायवर ने माझी बॅग काढुन बाहेर चिखलात ठेवली, दरवाजा बंद केला आणी निघून गेला. पाऊस पुन्हा सुरु झाला मी बिचारा भर पावसात दोन बॅग घेऊन टॅक्सी ची वाट बघत उभा.

एका टॅक्सीवाल्याला माझी दया आली की त्याला घरी जायचं होतं म्हणून मला केवळ ३०० रुपयात घेऊन जायला तयार झाला. गाडीत बसलो, टॅक्सी जी.एस.टी रोडच्या दिशेने निघाली. ड्रायवर उगाचच ईंग्लीश बोलता येते हे दाखवायचा क्षीण प्रयत्न करत होता, अर्थातच हिंदी त्याच्या माग्च्या ७ पिढ्या ही बोलल्या नसतील आणि पुढच्याही कदाचित बोलणार नाहीत.

ड्रायवरः "सार. फस्ट टैम चेन्नई सार?"
मी: "येस्स. फस्ट टाईम" खरं सांगाव की नाही या भ्रमात होतो, कारण रात्रीची वेळ, लुटले जाण्याची शक्यता.
ड्रायवरः "विच कांट्री सार?" मला चक्कर आली... मी समोरच्या आरशात फॉरेनर तर दिसत नाहीये याची खात्री करुन घेतली आणि कदाचित त्याला कोणत्या राज्यातुन आलास असे विचारायचे असेल असा समज करुन घेतला. मग मी पुणे म्हणालो.
ड्रायवरः "वोके वोके. हिंदी.. हिंदी..." च्यामारी ह्यांच्या.. नॉर्थ ईंडीया मधे दुसरी भाषाच नाही काय?
मी: "नो हिंदी.. ओन्ली मराठी अँड ईंग्लिश."
ड्रायवरः "चेन्नई गुड सार.. तामिळ इजी.. काना काया - सापटिंगला.. " ड्रायवर मला तामीळ शिकवायचा क्षीण प्रयत्न करु लागला. अर्थात त्याला राज्याबाहेर राहण्याची जाणीव असावी अशी मला शंका आली.
मी: "सापटिंगला??? म्हणजे जेवण केलं का?" आयला इथे किती साप माझ्या किती टिंगला करणार आहेत देव जाणे असं म्हणून मी सुस्कारा सोडला. तेवढ्यात माझं हॉटेल आलं, पैसे दिले सामान घेतलं रिसेप्शन लॉबीमधे आलो.
रिसेप्शन मधे मॅनेजर फोनवर बोलत होता.

मी: एक्स्क्युज मी. मी असं म्हणताच मॅनेजर ने माझ्याकडे पाठ फिरविली आणि फोन संपेपर्यंत माझ्याकडे वळला नाही.
मॅनेजरः "कडतडडज्ड्ड्कल्जज्द्लज " बाम्बू तुटताना जसा आवाज येतो तसं काहीसं तो बोलला.
मी: "आय हॅव रेजर्वेशन." मी त्रासिक मुद्रेने त्याच्याकडे पहात.
मॅनजरः "क्द्कजद्ग्द्ट्ट्सोस्द्द॑झ्झ." त्याने एक फॉर्म पुढे केला. नशिबाने तो ईंग्रजी मधे होता.

फॉर्म भरुन मी रुमवर आलो, टीवी लावला.. सर्व चॅनेल्स वर बांबु तुटत होते.. शेवटी मी माझ्या लॅपटॉपवर गाणे लावली आणि उद्या हॉटेल बदलुया असा विचार करत झोपी गेलो.

क्रमशः
आपला मराठमोळा.

विनोदसाहित्यिकसमाजजीवनमानप्रवासनोकरीमौजमजाप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

प्यारे१'s picture

1 Apr 2011 - 12:29 pm | प्यारे१

>>>>शेवटी मी माझ्या लॅपटॉपवर गाणे लावली आणि उद्या हॉटेल बदलुया असा विचार करत झोपी गेलो.

त्याऐवजी आणखी लिहिले असतेत तर वाचायला आणखी मजा आली असती ना????

सापटींगला- जेवण झाले का?

नागडोल्ला- .....???

आवडेश.

छोटा डॉन's picture

1 Apr 2011 - 12:38 pm | छोटा डॉन

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
वाचतो आहे.

बाकी सगळ्याच शहरांची काही काही खासियत असते व त्यासगट शहर आवडुन घ्यावे, तिथली संस्कृती आणि समाज कस्टमाईज न करता आहे तस्सा एंजॉय करावा, त्यात ज्याम मज्जा येते.

तुम्ही सांगितलेली सिच्युएशन ही प्रत्येक शहरात थोड्याफार फरकाने अगदी तश्शीच असते.
( इथे मी तुम्हाला तिथली लोकल भाषा येत नाही हे अ‍ॅज्युम करत आहे ).

समजा तुम्ही अशाच अवतारात पुण्यात स्वारगेट किंवा पुणे स्टेशनला उतरलात आणि तिथल्या रिक्षावाल्याकडे ( हो, पुण्यात टॅक्श्याबिक्श्याची चैन नाही हो ) चौकशी करायला गेलात की तो पहिल्या फटक्यात तुम्हाला 'नाही'च म्हणेल, तुम्हाला कुठल्या भागात जायचे हा प्रश्न नंतरचा. तुमच्या भागात जाणारी रिक्षा सापडली तर तो भाडे इतके मागेल की त्याच भाड्यात अजुन थोडे पैसे घातले तर एखाद्या नव्या गाडीचे डाऊनपेमेंट करुन तुम्ही नव्या गाडीतुन घरी जाऊ शकाल.
लोकल भाषा येत नसल्याचा तितकासा त्रास पुण्यात होत नाही, मात्र चुकुन तुम्ही पेठ किंवा एखाद्या 'कडव्या' एरियात घुसलात तर मात्र तुम्हाला हाच अनुभव येईल. बाकी तिथल्या चालीरिती लवकर शिकलात तर उत्तम नाहीतर 'आमच्या पुण्यात ना हे अजिबात असे नसते' वगैरे ऐकुन घ्यायची तयारी ठेवाच ...

समजा तुम्ही पहिल्यांदाच बेंगलोर / मुंबईला उतरता आहात तर तिथले स्टँड / रेल्वे स्टेशन ह्यांची 'भव्यता' पाहुन तुमची छाती तिथेच दड्पुन जाईल. शिवाय तिथली भयंकर पळापळ आणि फास्ट लाईन पाहुन जे दडपण येईल ते वेगळेच. प्रथेप्रमाणे इथले रिक्षा / टॅक्सीवाले तुम्हाला व्यवस्थित चुना लावतीलच. समजा लोकल भाषा येत असेल तर काम थोडेफार सुलभ होईल इतकाच काय तो फरक ...

समजा तुम्ही फ्रांकफर्टच्या टर्मिनलवर उतरलात आणि शहरात निघालात आणि तुम्हाला जर्मन येत नाही असे असल्यास मिलॉर्ड मामला जरा कठिण आहे. तुम्हाला मदत करायला उत्सुक असलेले लोक पावलापावलावर आढळतील पण त्यांना जर्मन सोडुन इतर भाषा ना के बराबर येतात, इंग्रजीही अगदीच तुमच्या त्या चेन्नैच्या कॅबवाल्यासारखी. सगळे फलक, उद्घोषणा वगैरे सगळे सगळे जर्मनमध्ये.
हॉटेलमध्ये चेक-इन कराल तर ढिगभर जर्मन / फ्रेंच चॅनेल्स आणि बीसीसी / सीएनएन असे १-२ इंग्रजी चॅनेल्स.
बोलणे अघळपघळही नाही आणि अगदी तुसडेपणाही नाही.
पैशाच्या बाबतीत अगदी हापापलेपणा नसला तरी किमत बडी जास्तीच आहे जनाब ...

समजा तुम्ही पंढरपुर / तुळजापुर च्या स्थानकावर उतरलात तर तुमचे असे स्वागत होईल आणि इतके लोक तुमची आस्थेने चौकशी करतील की ज्याचे नाव ते. तुम्हाला 'मालक, यजमान, देवा, साहेब' अशा अनेक विशेषणांनी अलंकृत केले जाईल, तुमच्या बॅगा वगैरे उचलुन तुमची सेवा केली जाईल. ५ श्टार सुविधा देतो म्हणुन बंद पडलेल्या पंख्याखालच्या डुगडुगत्या कॉटवर तुम्हाला स्थानपन्न केले जाईल आणि शेवटी तुमचा खिसा मजबुत कापला जाईल.
मात्र गोड बोलणे आणि सरबराईची आव आणणे ह्यात गुंजभरसुद्धा काटकसर नाही बरं.

असो, वरचेच पुन्हा लिहतो.
सगळ्याच शहरांची काहीना काही खासियत असते व त्यासगट शहर आवडुन घ्यावे, तिथली संस्कृती आणि समाज कस्टमाईज न करता आहे तस्सा एंजॉय करावा, त्यात ज्याम मज्जा येते.
बाकी नव्या शहरात आवर्जुन एंजॉय करावी ती गोष्ट म्हणजे तिथली खाद्यसंस्कृती !
तुम्ही चेन्नैत आहात म्हणजे ह्या बाबतीत तुम्ही नशिबवान आहात. एखाद्या विकेंडला सकाळपासुनच ही खाद्ययात्रा सुरु करा आणि संध्याकाळी येताना आकंठ पोट भरुनच परत या.
दक्षिणेत अलमोस्ट कुठेही मिळनारी 'फिल्टर कॉफी' हे प्रेमात पाडणारे रसायन आहे.
चैन्नेत आहात तर एखादा रजनीचा मुव्ही चक्क 'थेट्रात' जाऊन वेंजॉय करा.

एवढे सगळे करता करता पाहता पाहता तुमचा मुक्काम संपुन जाईल आणि आपल्या देशी परताताना बिलिव्ह मी तुम्ही त्या शहराला 'मिस' कराल :)

इति लेखनसीमा :)

पुढच्या भागाची वाट पहात आहे ..

- छोटा डॉन

बाकी बर्‍याच दिवसांनी डॉण्रावांचा लेखापेक्षा मोठा प्रतिसाद पाहुन उर भरुन आला. :)

ममो.. वाचतोय आंदो औरभी.

मृत्युन्जय's picture

1 Apr 2011 - 2:05 pm | मृत्युन्जय

तो त्यांनी लेख म्हणुनच लिहिला होता पण मिपावर टाकता टाकता इतका उशीर झाला की प्रतिसाद म्हणुन कामी आला

नि३'s picture

1 Apr 2011 - 2:12 pm | नि३

ते पंढरपुर ,जर्मन,पुणे,मुंबई, बँगलोर ते सर्व ठीक आहे पण चेन्नई????? या बाबतीत
डॉन यांच्याशी प्रचंड असहमत..

चेन्नई मधे राहण्याचा ३.४ वर्षाचा माझाच नाही माझ्या बरोबर जेही महाराष्ट्रीयन आणी ईतर उत्तर भारतीय मित्र होते त्यांच्या आयुष्यातील अतीशय वाईट अनुभव आहे...

हा चेन्नई मधील काळ आम्ही कसा काढला ( होय काढला ) हे आम्हालाच माहीत आणी याबतीत लिहायचे झाले तर एक मोठा ग्रंथच लिहुन होईल्.असो..

आता आम्ही आमच्या ऊरलेल्या जिवनात आयुष्यात चेन्नईत जाने तर सोडा..जर कोणी तेथे जात असेल तर आम्हाला त्याची
अतंत्य किव वाटते.आमच्या दुश्मना लाही चेन्नई त जाण्याचे काम न पडो अशी ईश्वर चर्णी प्रार्थना..

लेख मालकाला लवकरच सदबुद्धी सुचो आणी ते नरकातुन लवकरच बाहेर यावे अशी ईश्वर चर्णी प्रार्थना

धन्यवाद

अवांतर : भावनाला खुप आवर घालुनच प्रतीसाद लिहला आहे..अन्यथा संपादकांना ऊगीच प्रतीसाद संपादीत करावा लागला असता.

छोटा डॉन's picture

1 Apr 2011 - 2:24 pm | छोटा डॉन

सहमत आहे.
प्रत्येकाचे अनुभव आणि त्यानुसार बनलेले मत वेगळे असु शकते, तुमचेही खरे आहे असे मानतो. जो अनुभव एकला आला तो दुसर्‍याला यावाच असे नाही.

- छोटा डॉन

आनंदयात्री's picture

5 Apr 2011 - 1:06 am | आनंदयात्री

पीटीआयः "माझे बंगलोरमधील दिलखेचक अनुभव" अशी लेखमाला लवकरच डॉनराव लिहणार आहेत असे सुत्रांकडुन खात्रीशीररित्या कळते. काही भागांचे नावे पण लिक करण्यात आम्हाला यश मिळाले आह, ते खालील प्रमाणे,

१. रंग माझा वेगळा
-दाक्षिणात्यांच्या रंगासारखा आपला रंग असेल तर आपण किती सहजगत्या मैत्रिणी मिळवु शकता याचे दिलखुलास वर्णन. (केशरचनेवर पानपुरके)

२. मेरु - सर्वसामान्य उच्चभ्रुंचे वाहन
- मेरुत दाटिवाटीने केलेल्या प्रवासाचे मजेशीर अनुभव (भर उकाड्यात)

३. लिवइन चे सोनेरी दिवस
- #$#$%$!%^^&!@*&*(*)(*!@!@%^&%!@*&!@^!^@

-
आंद्याराझ्झी

आनंद's picture

1 Apr 2011 - 12:40 pm | आनंद

एवढ काही वाइट नाहीए चेन्नै.
माझ तर ते एक आवडत्या शहरा पैकी आहे.
काय होत , मना विरुध्द कुठे ही जाव लागल की बरी गोष्ट ही वाइट वाटायला लागते.

छान सुरुवात
चोता दोन चा प्रतिसाद पण आवडला

पप्पुपेजर's picture

1 Apr 2011 - 12:48 pm | पप्पुपेजर

पुढील भागाची वाट पाहतोय !!!!!

तर्री's picture

1 Apr 2011 - 1:04 pm | तर्री

सर्वना भवन मध्ये भोजनाचा बेत आखा. भाताचे पर्वत परातीतून पानात पडताना पहा.....भाताचे लाडू करून तोंडात भिर्कवतानाची ऐट अनुभवा.
लेख चांगला आहे ....पु.ले.शु.

सविता००१'s picture

1 Apr 2011 - 1:06 pm | सविता००१

एकदम आवडेश.पु.ले.शु.

नगरीनिरंजन's picture

1 Apr 2011 - 1:15 pm | नगरीनिरंजन

छान! पहिला भाग आवडला.
छोटा डॉन यांचा लेखही आवडला ;-)

मैत्र's picture

1 Apr 2011 - 2:40 pm | मैत्र

लेखापेक्षा डॉन्राव बंगलोरी यांचा लेख आवडला आणि पटला.
चेन्नई जरा जास्त भीषण आहे बंगलोर / हैद्राबाद पेक्षा... विशेषतः रिक्षा आणी भाषा.
तसे बंगलोरचे रिक्षावाले चेन्नई च्या मग्रूरीला हरवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. पण अजून जमलं नाहीये पुरेसं.

त्या शहराची मजा समजून घेऊन राहिलात तर प्रत्येक ठिकाण एक वेगळा अनुभव असतो.

संस्कृतीचं आणि रचनांचं झपाट्यानं 'सपाटीकरण' (Flattenization) होण्याच्या काळात आपली बरी वाईट वैशिष्ट्यं टिकवून ठेवणं हे काही वाईट नाही. पुणे मुंबई, बंगलोर, चेन्नई, हैद्राबाद, दिल्ली सगळं एकाच पद्धतीचं एका साच्यातलं असेल तर मजा काय ? वाहतूकीच्या सोयी, स्टेशन आणि विमानतळ तसेही बरेच एकसारखे (standardize) झाले आहेतच की..

डॉन्रावांच्या सल्ल्याने आधी फिल्टर कॉफी मारा. थोडी शोधाशोध केली तर हवी ती कॉफी (अरेबिका / रोबस्टा) ताजी दळून मिळण्याची उत्तम ठिकाणं चेन्नई मध्ये मिळतील. सरवणा भवन चौका चौकात आहेत.
मज्जा करा. बस एक मुंबईला सुद्धा भारी पडणारी दमट हवा मात्र पार वाट लावते.

पु ले शु...

वपाडाव's picture

1 Apr 2011 - 1:27 pm | वपाडाव

रुंब नल्ला !!! रुंब नल्ला !!!
मस्तच झालाय हा भाग....
बांबु नुस्तेच तुटत आहेत हे बरे... बांबु बसायला नकोत ही ई. प्रा....

चेन्नई त आहात तिथल्या मैलापूर भागात जाऊन घराघरातून दरवळणार्‍या कॉफीच्या सुवासाचा मस्त आस्वाद घ्या.
तमिळ शिकणे खरोखरच तितके अवघड नाही. तुम्ही थोडा प्रयत्न केलात तर लोक खूप मदत करतात.
रजनीचा पिक्चर थेट्रात एन्जॉय करणे या सारखी मज्जा दुजी नाही.
थेट्रातल्या " यै यार यार पानमसाल " सारख्या झैराती त्या थुलथुलीत हिरॉईनी आणि तमील पब्लीक एन्जॉय करायला लागलात की तुम्ही पूर्ण तमीळ झालात म्हनून समजा.
एक मात्र करा "पॅरीस" भागातील फूटपाथवरील विक्रेत्यांकडे चुकूनही फिरकू नका.
त्याच भागात बॅन्क ऑफ महाराष्ट्र च्या खाली गुजरात मंडळ मध्ये तुम्हाला गुजराथी जेवण मिळेल.
खणावळी सारखे आहे पण चवीला एकदम पुण्यात गेल्यासारखे वाटेल

माझा मित्र चैन्नै ला गेला आहे नुकताच....!

आणि हो नवीन लग्न झालय हो त्याचं...
दोघेही तिथेच आहेत आता २ वर्ष..!

व्य नि ओळख करुन देउ का... तेवढाच आधार एकमेकाना...?

योगप्रभू's picture

1 Apr 2011 - 1:49 pm | योगप्रभू

मस्त वर्णन करताय. लिहित राहा.

एकदा मुंबईहून येताना नाईलाज म्हणून चेन्नई एक्स्प्रेसमध्ये (बहुधा मंगला एक्स्प्रेस म्हणतात तिला) घुसलो होतो. दाराशीच उभा होतो. दादर सुटताच तामीळ पब्लिकने डबे काढून दहीभात आणि लोणचे ओरपायला सुरवात केली. सगळा डबा आंबूस वासाने भरुन गेला. शिवाय मचमच करत खाणे आणि वचवच करत बोलणे, ही त्यांची मुरलेली सवय. खंडाळ्याच्या घाटात मोकळी हवा मिळाली तेव्हा सुटकेचा नि:श्वास टाकला.

झकास रे राक्या ..

एकदा मरीन बिच वर जा आनि कधीतरी एमजीआर ला ..सापडतील मराठी पण ;)

मस्त लिहिले आहे ...
वाचत आहे ...

आमचे पुणे - मुंबई - पुणे च असते ..
तरीही बाईक नसताना ही पुण्याचा त्रास वाटतो .. त्यामुळे तुमची स्थीती कळते आहे ..
तरी आनंद उपभोगत आहे अशयाविर्भावात मनाला समजावले की थोड्यावेळासाठी तरी प्रसन्न वाटेल ..

माझीही शॅम्पेन's picture

1 Apr 2011 - 2:00 pm | माझीही शॅम्पेन

"इनक तामिल तेरियद.."

अस काहीस वाक्य मी पाठ केल होत... जिकडे तिकडे तेच हानायचो !!

बाकी चेन्नई म्हणजे डोमेस्टिक फ्लिईट ने फॉरेन मध्ये काळ्या पाण्या साठी जाण्याच निखळ आनंद देऊन जात... :)

पु.ले.शु.

विंजिनेर's picture

1 Apr 2011 - 2:14 pm | विंजिनेर

अजूनही तिथेच असाल तर जीआरटी ग्रँडडेज मधे एकदातरी जेवायला जा. त्या एकाच जेवणाच्या चवीने चैन्नैवर जीव ओवाळून टाकाल.

लेखण छाण आहे .... पुढिल भाग वाचण्यास उत्सुक

परिकथेतील राजकुमार's picture

1 Apr 2011 - 2:16 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त रे राकु !

बर्‍याच दिवसांनी लिहिलेस :) पण अ‍ॅजयुज्वल झकास लिहिले आहेस.

पु.भा.प्र.

*डान्याचा प्रतिसाद अतिशय भिकारचोट आहे हे जाता जाता नमुद करतो.*

५० फक्त's picture

1 Apr 2011 - 2:18 pm | ५० फक्त

+१ टु तर्री,

मी आज पर्यंत दोनदाच गेलो आहे चेन्नईत पण, अजुन सुद्धा केळीच्या पानावर भात आणि रस्समची चव आयुष्यभर विसरणार नाही. तसेच सकाळी एका मोठ्या वाडग्यात काठापर्यंत भरुन रस्सम आणि त्यात तरंगणा-या ३-४ इडल्या. बास रे.,

आयला, तिन-चार डाळींची मसाला पावडर, कडिपत्ता, आलं आणि पाणि या एवढ्या पदार्थातुन अशी चव निर्माण करणं याला साष्टांग दंडवत.

असो, आत्ताच जेवण झालं आहे, आणि जवळ कधी तिकडं जायचा योग नाही, उगा आठवणि काढुन तोंड खवळायला नको.

आत्मशून्य's picture

3 Apr 2011 - 2:31 am | आत्मशून्य

तसेच सकाळी एका मोठ्या वाडग्यात काठापर्यंत भरुन रस्सम आणि त्यात तरंगणा-या ३-४ इडल्या. बास रे.,

एकदम खरं.

sneharani's picture

1 Apr 2011 - 2:29 pm | sneharani

पुढचा भाग येऊ दे लवकर!

श्रावण मोडक's picture

1 Apr 2011 - 2:53 pm | श्रावण मोडक

मी माझ्या लॅपटॉपवर गाणे लावली आणि उद्या हॉटेल बदलुया असा विचार करत झोपी गेलो.

हं. उठा आता. पुढचा भाग लिहायचा आहे...

योगेश सुदाम शिन्दे's picture

2 Apr 2011 - 7:01 pm | योगेश सुदाम शिन्दे

---आपण पासपोर्ट शिवाय एका नव्या देशात आलोय ------
सहमत ...

दीविरा's picture

2 Apr 2011 - 8:58 pm | दीविरा

छान!!

पुढचा भाग लवकर येऊ द्या.

प्रतिसाद वाचून मजा आली.

वाचते आहे. मला चेन्नैमध्ये चांगले वाईट असे दोन्ही प्रकारचे अनुभव आले.
पाऊस पडत असताना, पडून गेल्यावर तर पुण्याचे रस्ते गुळगुळीत म्हणता येतील इतके खड्डे असलेल्या रस्त्यांवरून अमाप पैसे घेउन रिक्षा, टॅक्सीवाले नेतात. अगदी त्याच प्रकारचे चांगले वाईट अनुभव न्युयॉर्कलाही आले.
डॉनरावांशी सहमत. ते सध्या बंगलोरला 'मिस' करत आहेत असे समजण्यास वाव आहे.;)

प्रशु's picture

3 Apr 2011 - 1:40 pm | प्रशु

मला माझ्या गुरगांवच्या वास्तव्याची आठवण आली, जिवघेणा उकाडा, एकटेपणा आणि एका रिक्शात सोळा सोळा जण बसुन केलेला प्रवास आठवला..

माझ्या आयुष्यातले एकदम बेकार दिवस...

लेख आणि छोटा डॉनचा प्रतिसाद दोन्ही छान.
मी केरळ आणि कर्नाटक या दोनच दक्षिण राज्यात गेलेय पण अनुभव छान आले. लोक अगदी प्रेमाने बोलायचे आणि वागवायचे. खासकरून कर्नाटकमधील लोक आणि त्यांचे जेवण दोन्ही मस्त. अपवाद फक्त एकच.
कधीतरी चेन्नईला जाऊन येईन म्हणते. मुंबई अन पुण्याचा अनुभव गाठीशी असल्याने फारसा त्रास होणार नाही अशी अपेक्षा करते.

अन्या दातार's picture

4 Apr 2011 - 2:49 pm | अन्या दातार

आमचे हैद्राबाद दि बेष्ट बगा या बाबतीत.
उर्दुमिश्रित हिंदी कळायला २-३ दिवस तरी जातातच. उदा. क्या चाहिये च्या ऐवजी क्या होना? (होना!!!)
एकदा दुकानात गेलो असता हा प्रश्न मला मलिंगाच्या यॉर्कर सारखा वाटला. मी खुळचटासारखे: "मुझे कुछ नही होना, सिर्फ पेन चाहिये" असे म्हणालो होतो!
बाकी रिक्षावाले एमजीबीएस वर लुटतात हे मात्र खरं आहे. बाकी शहरात फारसे लुटत नाहीत.

मैत्र's picture

5 Apr 2011 - 12:28 pm | मैत्र

अस्सल हैद्राबादी जसं क्या होना म्हणतो (अगदी रिक्षावाल्याला 'मेहदीपटनम / खैरताबाद जाना' म्हटलं तर फाउल. 'मेहदीपटनम होना' म्हटला की खरा इथला...)

तसंच अस्सल हैद्राबादी एमजीबीएस नाही म्हणत त्याला... इमली बन हेच खरं लोकल नाव :)
कोणा मियांला महात्मा गांधी बस स्टँड म्हणालात तर हैद्राबाद बाहेरचं कुठलं नाव आहे वाटेल :)

मृगनयनी's picture

5 Apr 2011 - 2:19 pm | मृगनयनी

म.मो. आणि छो.डॉ. यान्चे लेख ;) आणि बाकीचे माननीय... या सगळ्यांचे प्रतिसाद वाचले! :)

- ४-५ महिन्यान्पूर्वी "चेन्नई"ला जायचा सुयोग आला... तेव्हा प्रकर्षाने जाणवले...की "हे" लोक अतिथींचे स्वागत खूप छान पद्धतीने करतात. बर्‍याचदा .. "भाषा" एक अडचण बनतेही.... पण आपण जर त्यान्च्या पद्धातीने "इन्लिश" बोलले.. तर मग जास्त प्रॉब्लेम नाही येत! तसंच आपण तिथल्या "अन्कल" , "आन्टी" ला .. जर "आ$प्पा", "अ$म्मा" असे सम्बोधले... तर त्यान्ना ते जास्त "टची" वाटते.... आणि ते पटकन आपलेसे होतात! ;)

इथ्लं ऊनही खूप कडक असतं.. पण इथली एकही बाई किन्वा मुलगी (मुस्लिम सोडून) डोक्याला स्कार्फ किन्वा स्टोल किन्वा तत्सम रुमाल वगैरे वापरताना दिसत नाही!,.. जसं आपल्याकडे (पुण्यामध्ये) स्कीन टॅन होऊ नये म्हणुन बर्याच प्रिकॉशन्स घेतल्या जातात!

इथली मन्दिरं लाजवाब आहेत!... फक्त पुजारी लोक... खन्डणी वसूल करतात! तसंच मन्दिराबाहेर "पादत्राणं" फुकट / फ्री मध्ये साम्भाळणारे लोक सुद्धा नन्तर "खुशी खुशी" आपण त्यान्ना काही तरी द्यावं... म्हणून प्रचन्ड आग्रही असतात... या लोकान्ना "हिन्दी" विशेष बोलता येत नाही... पण "खुशी खुशी" हा शब्द मात्र येतो! ;)

आपल्यासारख्या २-व्हीलर वरती सर्रास फिरणार्या मुली मात्र चेन्नईला खूपच कमी दिसतात!
बाकी इथल्या बायका, मुली सावळ्या असल्या तरी खूपच सुन्दर, सभ्य आणि विनयशील असतात! :)

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Apr 2011 - 4:30 pm | llपुण्याचे पेशवेll

बाकी इथल्या बायका, मुली सावळ्या असल्या तरी खूपच सुन्दर, सभ्य आणि विनयशील असतात!
सहमत आहे. आणि त्यांचे पंखे इथे मराठी जालावरही पुष्कळ आढळतात. :)

मृगनयनी's picture

5 Apr 2011 - 4:52 pm | मृगनयनी

सहमत आहे. आणि त्यांचे पंखे इथे मराठी जालावरही पुष्कळ आढळतात.

=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))

अय्या!... पण "तातुष्का शेट्भ्यंकर" तर कर्नाटकच्या आहेत ना! ;)

पैसा's picture

5 Apr 2011 - 4:39 pm | पैसा

खुसखुशीत लेख! आणि डान्रावांची प्रतिक्रिया पण आवडली.

सुहास..'s picture

5 Apr 2011 - 4:45 pm | सुहास..

त्यांचे पंखे इथे मराठी जालावरही पुष्कळ आढळतात. >>>

=)) =)) =)) =))
=))=))=))
=))=))
=))

अट्टल आहेस ?

कलंत्री's picture

13 Apr 2011 - 9:20 pm | कलंत्री

चेन्नईला जाणार्‍यानी रजनीकांताचा उल्लेख आणि ओळख दाखविली तर शासकिय पद्धतीने सहकार्य आणि स्वागत होते असे ऐकले होते.

गमंतीचा भाग सोडला तर आपले पुर्वज पूर्ण भारतात भाषा, आहार, विहार आणि आचार/विचाराच्या विभिन्नता असतांनाही कसे फिरत होते याचे आश्चर्य वाटते.