न्यू यॉर्क : ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
17 Mar 2017 - 12:45 pm

==============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...
              ३५ : जगातले सर्वात मोठे अँग्लिकन कॅथेड्रल, सेंट जॉन द डिव्हाईनचे कॅथेड्रल...

===============================================================================

सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल (Cathedral of St. Patrick किंवा St. Patrick's Cathedral) ही न्यू यॉर्क शहरातली एक महत्त्वाची खूण (लँडमार्क) समजली जाते. ख्रिश्चन धर्मातील पंथाच्या विभागीय मुख्य चर्चला, जेथे बिशपच्या स्तराचा धर्माधिकारी असतो, कॅथेड्रल असे म्हणतात. ५वा अ‍ॅव्हन्यू आणि ५० व ५१व्या स्ट्रीट्सच्या मध्ये असलेले सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल हे रोमन कॅथॉलिक पंथाचे अमेरिकेतील (युएसए) मुख्यालय आहे. ते रॉकंफेलर सेंटरला लागून आहे आणि सेंट बार्टच्या चर्चपासून चालत पाच मिनिटांच्या अंतरावर आहे, त्यामुळे ही तीन ठिकाणे एका फेरीत आणि अर्ध्या-पाऊण दिवसात पाहता येण्यासारखी आहेत... आम्हीही या तीन प्रेक्षणीय स्थळांना अशीच भेट दिली होती. मात्र, या कॅथेड्रलचा प्रत्येक भाग अगदी जवळून बघायचा असेल तर रविवारची गर्दी टाळून इतर दिवशी जाणे योग्य होईल.

या चर्चच्या जागेचा इतिहास रोचक आहे. शहराच्या त्या वेळच्या मुख्य वस्तीपासून ४-५ किमी दूर असलेली ही जागा १८१० साली जेसुईट समुदायाने खरेदी करून तेथे एक महाविद्यालय सुरू केले. १८१४ साली कॉलेज बंद पडले आणि ती जागा ख्रिश्चन मुख्यालयाने (diocese) विकत घेऊन फ्रान्समध्ये होणार्‍या छळापासून पळून आलेल्या ट्रॅपिस्ट नावाच्या पंथाच्या लोकांना दिली. आपले चर्च चालवण्याखेरीज या लोकांनी ३३ अनाथ मुलांची जबाबदारीही उचलली. पुढच्याच वर्षी नेपोलियनचा पाडाव झाल्याने परिस्थिती सुधारली आणि ट्रॅपिस्ट फ्रान्सला परत गेले. त्यामुळे, अनाथगृहाची जबाबदारी मुख्यालयाने उचलली आणि मोकळी पडलेली चर्चची जागा भविष्यात दफनभूमी बनवण्यासाठी राखून ठेवली गेली. सन १८४० साली बिशपने परिसरातल्या लोकांसाठी आणि जवळच्या मुकबधिर आश्रयगृहात काम करणार्‍या कॅथॉलिकांसाठी तेथील प्रार्थनागृह (चॅपल) परत सुरू केले. मुख्यालयाने १९४१ साली तेथे एक लहानसे चर्च बांधले. त्याचा खर्च दानधर्माची तिकिटे विकून चालविण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. कर्जबाजारी झालेल्या चर्चला १८४४ साली लिलाव करून विकले गेले.

जवळच्या महाविद्यालयातील एका सदनाचा तात्पुरते चर्च म्हणून उपयोग करून, रेव्हरंड मायकेल ए कुर्रान (Rev. Michael A. Curran) नावाच्या एका तरुण तडफदार धर्माधिकार्‍यावर चर्चची इमारत परत विकत घेण्यासाठी पैसे जमा करण्याचे काम सोपवले गेले. त्या सुमारास आयर्लंडमध्ये भयानक दुष्काळ (The Great Irish Famine) पडला होता, तरीही तेथील लोकांनी स्वतःचे पोट मारून चर्चसाठी सढळ हाताने दान दिले. अश्या रितीने या चर्चची जागा, न्यू यॉर्क शहरवासींच्या नव्हे तर आयरिश लोकांच्या त्यागातून मुख्यालयाच्या परत ताब्यात आली. १८५३ साली येथे एका मुख्यालय-चर्चची (कॅथेड्रल) गरज आहे असे ठरवले गेले तोपर्यंत या जागेवरचे सर्व कर्ज फिटले होते. १५ ऑगस्ट १८५८ साली कॅथेड्रल बांधणीचे काम सुरू झाले, पण अमेरिकन यादवी युद्धामुळे (सिविल वॉर) ते खंडित झाले आणि सर्व काम पुरे होईपर्यंत १८७८ साल उजाडले. २५ मे १८७९ ला कॅथेड्रलचे उद्घाटन केले गेले. त्यानंतरच्या काळात मुख्य इमारतीचा विस्तार केला गेला आणि तिच्या आजूबाजूला अनेक छोट्यामोठ्या बांधकामाची भर पडत गेली आहे. निओगोथिक शैलीत बांधलेल्या मुख्य इमारतीत १८८८ साली दोन निमुळत्या मनोर्‍यांची भर पडली तेव्हा ती त्या काळची न्यू यॉर्क शहरातली सर्वात उंच आणि अमेरिकेतील दुसर्‍या क्रमांकाच्या उंचीची इमारत बनली होती.

या कॅथेड्रलचे चित्रण व उल्लेख अनेक सामाजिक माध्यमांत झालेले आहेत. उदाहरणार्थ : Planet of the Apes (1970) व Gremlins 2: The New Batch (1990) हे चित्रपट; Futurama ही टीव्ही मालिका; Cathedral (Nelson DeMille, 1981) व Empire of Dreams (Giannina Braschi, 1994) या कादंबर्‍या; आणि Not A Love Story (Kait Kerrigan and Brian Lowdermilk) हे गाणे.

या कॅथेड्रलला अनेक अतिरेकी हल्ल्यांना तोंड द्यावे लागले आहे. १३ ऑक्टोबर १९१४ साली इमारतीच्या पश्चिमोत्तर कोपर्‍याजवळ जमिनीत अर्धा मीटर खोल खड्डा पडेल इतक्या शक्तीच्या बाँबचा स्फोट झाला. यामागे कम्युनिस्टांचा हात असावा असे म्हटले जाते. त्यावेळी पूर्ण भरलेल्या कॅथेड्रलमध्ये प्रार्थना चालू असूनही, सुदैवाने, भाविकांपैकी कोणालाही इजा झाली नाही. कॅथेड्रलजवळून जाणार्‍या एका मुलाला धातूचा एक तुकडा चाटून गेला, ही एकच इजा त्या स्फोटामुळे झाली. २ मार्च १९१५ ला फ्रँक अबार्नो नावाच्या एका इटालियन अराजकवाद्याने (anarchist) कॅथेड्रलमध्ये बाँब आणला होता. पण पोलिसांनी त्याला स्फोट करण्याआधी पकडले. तो आणि त्याच्या साथीदाराला कोर्टाने ६-१२ वर्षांच्या कैदेची शिक्षा केली. १९५१ आणि १९५२ या दोन वर्षांत या कॅथेड्रलला उडवून देण्याच्या, पत्राने आणि फोनवरून, एकूण सहा धमक्या दिल्या गेल्या. सुदैवाने या कॅथेड्रलची सुंदर इमारत अजूनही सुखरूप आणि दिमाखाने उभी आहे. आजही रविवारच्या प्रार्थनेला हे कॅथेड्रल भाविकांनी ओसंडून जाते.

***************

सेंट बार्टच्या चर्चवरून चालत आम्ही सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रलकडे जात असता वाटेत ही कलाकारी दिसली. जवळ गेल्यावर लक्षात आले की त्या एकुलती एक धातूची तार वळवून बनवलेल्या कलाकृती होत्या. पांढर्‍या कागदाच्या पार्श्वभूमीमुळे, दुरून ती कागदावरची रेखाटने असल्याचा आभास होत होता !...



धातूची तार वाकवून केलेली कलाकारी

जरा पुढे गेल्यावर आधुनिक गगनचुंबी इमारतींच्या जंगलात, आपल्या बांधकामशैलीच्या वैशिष्ठ्याने उठून दिसणारी, कॅथेड्रलची इमारत दिसू लागली...

    
कॅथेड्रलचे प्रथमदर्शन

आजूबाजूच्या गगनचुंबी इमारतींमुळे कमी उंचीच्या वाटणार्‍या या इमारतीचा खरा आवाका, तिच्या जवळपास गेल्यावरच आपल्या नजरेत भरतो. शहराचा एक पूर्ण ब्लॉक व्यापून असलेल्या या इमारतीची लांबी १०१.२ मी (३३२ फू), रुंदी ५३ मी (१७४ फू) आणि निमुळत्या मनोर्‍यांसह उंची १००.६ मी (३३० फू) आहे. ती एकवेळेस ३००० भाविकांना सामावून घेऊ शकते. मध्यभागी भव्य प्रवेशद्वार आणि दोन बाजूंना उंच मनोरे असलेली ही इमारत "डेकोरेटेड निओ-गोथिक (अमेरिकन पुनरुज्जीवन, American Gothic Revival)" शैलीत बांधलेली आहे.


सेंट पॅट्रिकच्या कॅथेड्रलचा प्लॅन (जालावरून साभार)

कॅथेड्रलचा दर्शनी भाग

या कॅथेड्रलची भव्यता एकाच प्रकाशचित्राच्या चौकटीत पकडायची असेल तर त्याच्या समोरचा रुंद ५वा अ‍ॅव्हन्यू ओलांडून पलीकडच्या फूटपाथवर शक्य तितके दूर उभे रहावे लागते...


सेंट पॅट्रिकच्या कॅथेड्रलचा पूर्णाकृती दर्शनी भाग

इमारतीच्या जवळ गेल्यावर तिच्या आणि तिच्या मध्यभागच्या प्रवेशद्वाराच्या भव्यतेची खरी कल्पना आपल्याला येते. मुख्य प्रवेशद्वार पितळ वापरून बनवलेले आहे. त्याच्या दरवाजाच्या प्रत्येक फळीचे वजन ४२०९ किग्रॅ (९२८० पाउंड) आहे. मात्र, त्यांची दरवाज्यातली ठेवण इतकी संतुलित आहे की दार उघडण्यासाठी एका व्यक्तीने लावलेला जोर पुरेसा असतो. दरवाज्यावर संतमहात्म्यांची ठाशीव चित्रे आहे. दरवाज्याच्या वरच्या पितळी कमानीत येशू ख्रिस्त, हवेत उडणारे देवदूत आणि भोवताली भाविकांची गर्दी दाखवणारे ठाशीव चित्र आहेत. दरवाजाच्या दोन्ही बाजूला गोलाकार भिंतीत असलेले कोलोनेड प्रकारचे खांब प्रवेशद्वाराची भव्यता आणि सौंदर्य अधिकच खुलवतात...


कॅथेड्रलचे प्रवेशद्वार

प्रवेशद्वारावरच्या समोर उभे राहून वर पाहिल्यास वरच्या कसबी कोरीव कमानी आणि त्यांच्या दोन्ही बाजूने सुळक्यांसारखे वर जाणारे निमुळते मनोरे पाहताना डोक्यावरची टोपी सहज खाली पडेल !...


इमारतीच्या जवळून दिसणारा कॅथेड्रलचा वरचा दर्शनी भाग

प्रार्थनागृह व वेदीगृह (Altar)

कॅथेड्रलमध्ये शिरल्या शिरल्या भाविकांनी पूर्ण भरलेले मुख्य प्रार्थनागृह आणि त्याच्या दूरच्या टोकाला असलेले वेदीगृह समोर आले. इमारतीचा अंतर्भाग, धार्मिक मुख्यालयच्या स्थानाला साजेसा भव्य आणि प्रभावी बनविण्यात कोणतीच कसर ठेवलेली दिसत नाही. प्रत्येक रचना... खांब, छत, भिंती, खिडक्या, आसने, इत्यादी... भाविकांच्या मनावर दीर्घकालीन छाप पाडेल अश्या प्रकारे काळजीपूर्वक काटेकोरपणे सजवलेली दिसत होती. एकंदरीत हे कॅथेड्रल सुंदर आणि सधन असल्याच्या खाणाखुणा सर्वत्र दिसत होत्या.

आम्ही गेलो तेव्हा तेथे रविवारचे खास प्रवचन चालू होते. बसायच्या सर्व जागा भरल्या असल्याने अनेकजण मागच्या बाजूला उभे होते. आमच्यासारखे पर्यटक त्यांच्यामागून व त्यांच्यातून वाट काढत समारंभ आणि कॅथेड्रल दोन्ही जमेल तेवढे पाहून घेत होते. कॅथेड्रलचे सर्व भाग जवळून पहायचे असले तर रविवार टाळून तेथे जाणे जास्त चांगले हे आधी म्हटले आहे ते यामुळेच.

तेथे काढलेले हे काही फोटो...


प्रार्थनागृह आणि त्याच्या दूरच्या टोकाला असलेले वेदीगृह


प्रवचन चालू असताना काढलेला वेदीगृहाचा (sanctuary) फोटो (जवळून, झूम इन करून)

गोथिक आर्केड शैलीचे छत


प्रार्थनागृहाच्या छतावरची पारंपरिक आर्केड्स असलेली गोथिक नक्षी

रोमन कोलोनेड शैलीचे खांब व गॅलेरिया

  
प्रार्थनागृहातील रोमन कोलोनेड शैलीचे खांब, त्यांच्यावरील गॅलेरिया

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग

प्रवचन शेवटच्या भाविकापर्यंत पोहोचण्यामध्ये प्रवचनकारापासूनचे अंतर किंवा खांब (कोलोनेड) यांचा अडथळा येऊ नये यासाठी आधुनिक दृक्श्राव्य तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग केलेला दिसत होता...


भाविकांच्या सोयीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग

रंगीत काचांच्या नक्षीदार खिडक्या

पारंपरिक प्रथेप्रमाणे या कॅथेड्रलच्या खिडक्या रंगीत काचेच्या चित्रांनी सजवलेल्या आहेत. या कामासाठी, नामवंत अमेरिकन आणि युरोपियन कलाकारांना पाचारणे केले गेले होते...

    
रंगीत काचांच्या चित्रांनी आणि नक्षीने सजवलेल्या खिडक्या

उपमंदीरे आणि कलापूर्ण धार्मिक प्रतीके

मुख्य प्रार्थनागृहाच्या भिंतींना लागून अनेक उपमंदीरे आणि धार्मिक प्रतीके आहेत. त्यापैकी प्रत्येक आपापल्यावैशिष्ठ्यपूर्ण कलाकुसरीने बघण्यासारखे आहे. त्यातील काहींचे फोटो..


एक उपमंदीर

    
इतर काही उपमंदीरे


भिंतीवरची एक सागवानी कलाकृती

इथले ऑर्गन्स प्रसिद्ध आहेत. त्यातल्या मुख्य ऑर्गनला ९००० पाइप्स, २०६ स्टॉप्स, १५० रॅक्स आणि १० डिव्हिजन्स आहेत. प्रार्थना (सर्विस) चालू असल्याने तो जवळून बघू शकलो नाही.

एकंदरीत संपूर्ण कॅथेड्रल जवळून पहायला मिळाले नाही तरी, जेवढा भाग पहायला मिळाला तो सुद्धा पुरेसा प्रभावी होता. पुढे केव्हा शक्य झाले तर, रविवार सोडून इतर कोणत्या दिवशी या चर्चला भेट देण्याचे ठरवून बाहेर पडलो.

(क्रमशः )

==============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वमिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...
              ३५ : जगातले सर्वात मोठे अँग्लिकन कॅथेड्रल, सेंट जॉन द डिव्हाईनचे कॅथेड्रल...

===============================================================================

प्रतिक्रिया

स्टेन्ड ग्लास जब्बरदस्त आहेत.
हिरवा हिरवा आजचा सेंट पॅट्रिक डे ह्याचाच काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Mar 2017 - 9:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

आजचा (१७ मार्च) सेंट पॅट्रिक डे ज्याच्या नावाने साजरा केला जातो त्याचेच नाव या कॅथेड्रलला दिलेले आहे. सेंट पॅट्रिक आयर्लँडचा पॅट्रन सेंट आहे, त्याचमुळे आयर्लंडमध्ये भयानक दुष्काळ चालू असताना तेथिल लोकांनी, आपले पोट मारून, या कॅथेड्रलसाठी भरभरून मदत केली.

पिलीयन रायडर's picture

17 Mar 2017 - 11:00 pm | पिलीयन रायडर

चांगला मुहुर्तावर आणलात की हा लेख!!!

हे एक अत्यंत अप्रतिम चर्च आहे. मी इतकं सुंदर चर्च पाहिलंच नाही कधी. अर्थात बार्ट्सच्या ऑर्गनची सर इथल्या ऑर्गनला नाही. पण ह्याच्या भव्यतेला तोड नाही!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Mar 2017 - 11:08 pm | डॉ सुहास म्हात्रे

हा लेख योगायोगाने सेंट पॅट्रिक डे ला आला. मलाही ते वर अभ्या.. ने लिहिलेल्या प्रतिसादावरून कळले. :)

असो, या निमित्ताने, सेंट पॅट्रिक प्रसन्न होऊन माझ्या मनोकामना पूर्ण करो :)

पिलीयन रायडर's picture

17 Mar 2017 - 11:10 pm | पिलीयन रायडर

मला वाटलं ठरवुन टाकलात!! भारीच की हो काका! सगळ्या मनोकामना पुर्ण होणार तुमच्या. लेख प्रकाशित करताना हिरवे कपडे घातले असतील तर अजुनच उत्तम! =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Mar 2017 - 2:15 am | डॉ सुहास म्हात्रे

:)

हिरवे-पिवळे कपडे घालून गोविंदा आणि आप्ले ते... प्रसिद्ध शिघ्रकविराज यांना ('ट' ला)टशन देण्याची इच्छा आजपर्यंत तरी झालेली नाही... भविष्यातही तसे होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही =)) =)) =))

पिलीयन रायडर's picture

17 Mar 2017 - 11:13 pm | पिलीयन रायडर

अजुन एक - इथे ह्या चर्चचा ३६० डिग्री व्ह्यु आहे. अगदी चर्चम्मध्ये उभे असल्या सारखे वाटेल. नक्की पहा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Mar 2017 - 11:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारी आहे !

सूड's picture

20 Mar 2017 - 6:33 pm | सूड

भारीच!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Mar 2017 - 12:54 am | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांसाठी आणि प्रतिसादकांसाठी धन्यवाद !

बरखा's picture

23 Mar 2017 - 4:06 pm | बरखा

अजुन एक - इथे ह्या चर्चचा ३६० डिग्री व्ह्यु आहे. अगदी चर्चम्मध्ये उभे असल्या सारखे वाटेल. नक्की पहा.
भारी आहे.