नवोदित कवी
नकोत मजला टाळ्या चुटक्या
वाहवाही अन मान बढाई
कोऱ्या पाट्या तुमच्या आमच्या
रसिक आपुली बाप नि आई
कुणी कल्पतो आकाशगंगा
कुणी वर्णीतो प्रीत पतंगा
नाद कुणासी विठू रायाचा
रंगून जातो भलत्या रंगा
अलंकारे सजवी कुणी कविता
कुणाची वाहे दुःख सरिता
भलत्या भलत्या कल्पना स्फुर्ती
शब्द निराळे भाव पेरिता
नवकवी मीही धडपड करतो
फाटके तुटके शेले विणतो
तुमच्या दारी हात जोडुनी
कृपाप्रसादा निशिदिनी झुरतो
