हिरकणी (कविता)
आसमंत तो काळोखाने
पूर्ण व्यापला होता
रायगडावर अडकुन पडली
सैरभैर ती माता
मावळतीला गेला सूर्य
बंद जाहली दारे
दंडक होता शिवरायांचा
शिस्त पाळती सारे
कष्टकरी ती नार अपूर्व
नाव जाणती हिरा
गडाखालती राहत होती
वाळूसरेतील घरा
दूध विकाया रायगडावर
ती मायमाऊली जाई
उरकुन जाता काम रोजचे
घरास परतुन येई
एके दिवशी गड सोडण्या
वेळ जाहला तिला
उघडण्याला बंद ती दारे
त्यांनी नकार दिला
घरास होते बाळ तान्हुले
कंठ दाटुनी आला
राहावयाचे कसे लेकरु
गलका मनात झाला