मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हिरकणी (कविता)

शार्दुल_हातोळकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
आसमंत तो काळोखाने पूर्ण व्यापला होता रायगडावर अडकुन पडली सैरभैर ती माता मावळतीला गेला सूर्य बंद जाहली दारे दंडक होता शिवरायांचा शिस्त पाळती सारे कष्टकरी ती नार अपूर्व नाव जाणती हिरा गडाखालती राहत होती वाळूसरेतील घरा दूध विकाया रायगडावर ती मायमाऊली जाई उरकुन जाता काम रोजचे घरास परतुन येई एके दिवशी गड सोडण्या वेळ जाहला तिला उघडण्याला बंद ती दारे त्यांनी नकार दिला घरास होते बाळ तान्हुले कंठ दाटुनी आला राहावयाचे कसे लेकरु गलका मनात झाला भिरभिर फिरली रायगडावर शोधित तिथल्या वाटा उंच कडा एक दिसला जेथे ना पहारा फौजफाटा उतरु लागली मरणकडा तो बाळासाठी जीव तुटे खरचटला तो सारा देह तिला परंतु भान कुठे? अशक्य ऐसा उतरुन गेली प्राणपणाने उंच कडा शिकवुन गेली प्रित आईची मरणालाही आज धडा ऐकताच ती तिची कहाणी अपार राजे गहिवरले वस्त्रालंकारांनी तिजला शिवरायांनी गौरविले बुरुज बांधुनी त्याच कड्यावर हिरकणी ऐसे नाव दिले अलौकिक त्या वात्सल्याला शिवरायांनी वंदियले साक्ष द्यावया मातृप्रितीची अजुनी बुरुज तो उभा तिथे अभेद्य कणखर सह्याद्रीही नतमस्तक तो होतो जिथे - शार्दुल हातोळकर

वाचन 11156 प्रतिक्रिया 0