मराठी भाषा दिन २०१७: हा सब झाला त कसा झाला?(झाडी बोली)

स्वामी संकेतानंद's picture
स्वामी संकेतानंद in लेखमाला
25 Feb 2017 - 6:25 am

1

"जा रे पोट्ट्याइवा, गवऱ्यायसाटी सेन जमा करून आन्जान."

माय असी बोलावसीन अना आमि घमेले, गंज्या घेऊनसन्यारि धावत निंगावसीन. मोहल्ल्यातले बाकिचे पोट्टे बी संगासंग चलत. आमी दुसऱ्या गावी रायत होतून. येति काइ आमच्या गाइभसी नोहोत्या. त्या सब आमच्या वस्तीवाल्या गावी. अना त्या जमान्यात गॅस बी पोवचला नोहोता. तं चुलीवर सब रांधा लागे. मंग गोवऱ्या बी लागत. मी, माह्या भाऊ, मोहल्ल्याचे बाकी पोट्टे असे सबजन घमेले, गंज्या घेउनसन्यारि गाइभसीइच्या मंगामंगा जात रायतोतो. मंग त बाप्पा बम मज्या येहे. कोन जास्ती सेन जमा कर्ते याचि शर्त लागे. हरेकले वाटे का आपुन सबदून ज्यादा सेन जमा कराले पाय्जे. मंग या गायिमंगा पर न त्या भसीमंगा पर. गाईनं पुस्टि असि अदर वर केलन का सब एकाखट्टे घमेले घेऊनसन्यारि धावत. तिच्या पुस्टिखाली आप्ला आप्ला घमेला घेऊन उभे रायत. कई कई त मज्याकच होऊन जाये. गाय पोयटा नोहोती टाकत न नुसति मुतरी धारच सोडे. मंग बाकीचे त्याले चिडवत.

तं भाऊ, आमचा सब बचपना असा गेला. आमची रविवार सकार असी गाइभसिइच्या मंगामंगा सेनासाटि धावत गेली. मज्या त बम्म ये. माहोल राहे. हा काम नाय राय्ला त आमि चक्के घुमवु गावभर. सायकल नाय्तर इस्कूटरचे पुराने चक्के गावभर घुमवाचा काम.

सायंकारी भवरे, गिल्लीदंडा, रातरी लपाछुपी खेलत होतून. रातच्या अंदारात मानूस सोधावाचा मंजे काई आसान नव्ता रायत भाऊ. तं कुल मिलाके मज्या ये. या सबतून येर मिळ्ला त अभ्यास बी करुन टाकून.

मंग लेकिन सब तेजीत बदलून जात राय्ला. गावात रपारप बदलाव आला. आता गावात गॅस आला तं पोट्ट्यायचा गाइभसीमांगं धावना बंद झाला, तं या पोट्ट्याइले आमि का मज्या केला ते काइ अनुभवाले नाइ भेटन. चांगला झाला का बुरा? चांगलाच झाला वाट्टे. पोट्ट्याइनी लिहावाचावचा, सिकावचा, सेन जमा कराले लंगलंग हिंडावचा नाइ. पर हे एक बेस गोस्ट झाली तं चार गोस्टी बुऱ्या बी झाल्या. जुने खेल बंद झाले असा नाई, तं बायेरचे खेलच बंद झाले. गाव असा पोट्ट्याइच्या कल्ल्याने जागा राहे, आता सब सुनसान! पोट्टे गेले कोटि? ते आयेत आपाप्ल्या घरी बसून! अभ्यास करून रायले का? तं काइ खास करून रायले असा तं वाटून नाइ रायला बोर्डाचा रिजल्ट पायला तं! गावातल्या पोट्ट्य़ाइले धड एक धडा वाचाले नही ये का गनित काही जमे नहीं! मंग हे पोट्टे करून रायले तं का करून रायले? का मालूम भौ!

बदलाव इतक्या तेजीत होऊन रायला होता, का आजुबाजुला का होऊन राय्ला आमाले काई समजलाच नाई. राखोडीनं हात धुनेवाले आमि हॅन्डवास कई वाप्रू लागलो आमाले मालुमच नाय पळ्ला. राखोडीच्या जागी लाइफ़बायचा तुकडा आला, मंग सग्गी लाइफ़बायच आली अना मंग हॅन्डवास आला. बुरा झाला मनावसिन काम नसे, चांगलाच झाला, पर कसा झाला, का झाला समजावले त पाय्जे ना जी! तं कालवरी आमच्या ज्याबी गोस्टि बापदाद्याइपासून चालू होत्या, त्या गेल्या झपन्यारी, त्यायच्या जागी ज्या आल्या त्याबी गेल्या झपन्यारी अना आता ज्या आल्या त्या बी जातीन झपन्यारी. तं आताच्या पोट्ट्य़ाइचा का चालुन राय्ला, त्याइले का पाय्जे, काइ समजून नाय रायला. गाईभसी कस्या पैल्या भकाभका खातेत अना मंग आरामात पचावाले बसतेत, तसा आमाले बदलाव पचावाले समयच नाइ मिळ्ला.

आता गावी जातो त असा वाट्टे का दुसऱ्या दुनियेत तं नाइ पोचलो. सेयराचा अना गावाचा अंतर गायब होऊन राय्ला.. बेस होऊन रायला, पर अंतर गायब करावच तं चेयरा, पैचान बी गायब झाल्या पायजे का? गोस्ट असी होऊन रायली का आमि ना धड इकड़चे रायलो ना धड़ तिकड़चे. माया वस्तीवाल्या गावी गेलो तं नात्यात माया चुलतभाऊ लागते पर मायादून चांग्ला एक्विस बाविस साल लहानाय अस्या एकाले मोट्या कौतुकानं विचारलो, "केतरी उमर से तोरि? कहान्‌ बाचनला जासेस? का का सिकावsसेती सारं मा? तोला कोनसो विसय आवडsसे?"

तं बाप्पा याले मी का बोलून रायलो समजूनच नाइ राय्ला! मंग याच्या आज्यानं - मंजे मायाबी चुलत आज्यानं मले सांगलन्‌ ना त्याले आप्लि भास्या नाइ ये! मले आस्चर्य वाटला! मले आटवला का कसा याचा आजाच पैले, आमी लहान होतून तई मने का "तुमाले तुमची भास्या नसन येत तं तुमाले तुमच्या जातीचा नाव लावाचा अधिकार नायाय" मनुन. असा का झाला या पंचवीस सव्वीस वर्सात का लोकाइचा आप्ल्या भासेच्या बारेमंदी बी सोचविचार सब बदलून गेला असन? पोट्टे त पोट्टे, बुढ्ढे बी बदलून गेले.

पर बदलाव संसाराचा नियमच रायते मनुनसन्यारि जे जे होइन ते ते पायत जाउन, आपुन बी बदलुनच रायलो, मंग गावचे बाकी सब बदलले याले का नवल? बम तेजीत झाला हा समजला पर हा सब कसा झाला, तो नाइ समजला, पचावले तं अखिन समय लागन.

1

प्रतिक्रिया

पैसा's picture

25 Feb 2017 - 6:43 am | पैसा

बदलाव नव्वदोत्तर साहित्यातले वगैरे पण लिहायचे होतंस ना रे!

बबन ताम्बे's picture

25 Feb 2017 - 1:15 pm | बबन ताम्बे

आमच्या गावात चौकात परमीट रुम , बीयर बार अन हॉटेलांत मिसळपाव जाऊन पंजाबी डिश आलेत .

मित्रहो's picture

26 Feb 2017 - 8:48 pm | मित्रहो

बदल घडले, आणि घडत राहनार.
पानठेले वाढले, चहाच्या टपऱ्या वाढल्या
त्याचबरोबर धुराच्या चुली जाउन गॅस आले, बैलांच्या जागी बऱ्याच कामाला ट्रॅक्टर आले.
भाषाही बदलत चालली हे मात्र दुःख आहे.

+११

स्वामी, लेखन आवडले हो !

अॅस्ट्रोनाट विनय's picture

27 Feb 2017 - 10:52 am | अॅस्ट्रोनाट विनय

झाडीबोली आतापर्यंत फक्त ऐकली होती. वाचतोय पहिल्यांदा.

खेडूत's picture

27 Feb 2017 - 12:26 pm | खेडूत

क्लास स्वामीजी!
-- आमचाबी सब बचपना असा गेला..!
-- आता गावी जातो त असा वाट्टे का दुसऱ्या दुनियेत तं नाइ पोचलो.
वीस पंचवीस वर्षांत हे सगळं झालं! :(

प्रीत-मोहर's picture

28 Feb 2017 - 8:24 am | प्रीत-मोहर

सुरेख!! निवांत वाचायला ठेवला होता, तर स्वाम्या सार्थक केलस त्याच. मले बम आवडला लेख.

एमी's picture

13 Mar 2017 - 10:33 am | एमी

छान. आवडला लेख.