मराठी भाषा दिन २०१७: ते का करुन रायली असन बा : फुकटच दुखण (वर्‍हाडी)

मित्रहो's picture
मित्रहो in लेखमाला
27 Feb 2017 - 6:51 am

1
.
ते का करुन रायली असन बा : फुकटच दुखण

माया एक सोबती हाय, पवन्या. हाय आमच्या गावचंच पोरगं, पण आता पुण्याले रायते तर सोताले साहेब समजते. दहावीत पहल्यांदी नापास झालता. ते इंग्रजी गाववाल्यायले रडवतेच न जी. मंग सप्लीमेंटरीच्या टायमाले म्याच माया काकाले घेउन त्याले पेपर तपासनाऱ्या मास्तरकड घेउन गेलतो. तसं पोरगं हुशार होतं, फक्त इंग्रजीच तरास देत होती. तसबी इंग्रजी शिकून कोठ कालेजात प्रोफेसर व्हाचं होतं? आमी त्या मास्तरले बंद बराबर समजावून सांगतलं, मास्तरले बी पटलं आन झालं पोरगं पास. पुढ जाउन आयटीआय केलं आन पुण्यात कोण्या कंपनीत जाउन चिकटलं. आता हे पोट्ट पुण्यात रायते तर मले शिकवते, "काहून नको म्हणत जाउ बे, का बरं म्हणत जा." म्या काय कमी हाय का, म्याच त्याले वर इचारतो, "काहून बा, काहून काहून नाही म्हणाचं? काहून म्हटल तर का बिघडल?" त्याच्या बहीणीचा तिळवा होता तवा तो संक्रांतीले गावाकड आलता. मले म्हणे, "चल, नागपुरात जाउ पिक्चर बिक्चर पाहू, थोडीसी दारु गिरु पिउ." तसे मले का कमी काम होते का सोयाबीन मार्केटात न्याच होत, कापसाले बाया पाहाच्या होत्या, तूरीवर फवारा माराचा होता, पण दोस्तीखातर जाच लागनार होत. बायकोले सांगतलं, "तू कापसाले बाया पायजो, म्या सोयाबीन मार्केटात नेउन टाकतो आन पवन्यासंग नागपुरले जाउन येतो. त्याले काही खरेदी कराची हाय म्हणे."

सकायी सकायीच सोयाबीन हिंगणघाटाच्या मार्केटात टाकलं, तेथूनच बस पकडून नागपुरले आलो. पवन्या म्हणे कोणचा का मराठी पिक्चर पाहू, 'ते का करुन रायली असन बा.' मी तर मराठी पिक्चर पाहतच नाही न जी. ते पुणे मुंबइवाले मराठी पिक्चर आपल्याले काही समजत नाही, तवा कायले फालतू टाइमपास कराचा? आता इतक्या वर्षात तो सैराटच का तो पायला होता. नाहीतर मराठी पिक्चरशी संबंधच नाही. माया सोबती पक्का पुणेवाला झाला. मले म्हणे, "आबे नाय तू पाय, मस्त पिक्चर हाय." दोस्तीखातर माणूस काहीबी कराले तयार रायते, तर मंग पिक्चर पाहाले का जाते? काहो?

तुमाले सांगतो राजेहो, हा पिक्चर म्हणजी मजाक हाय, बंदा पिक्चर मजाक मजाक मधी बनवलाय. पिक्चरची स्टोरी ना धड लवस्टोरी हाय, ना बदला हाय काहीतरी भलतीच मजाक हाय. मजाक मजाक मधी एकाच कालेजात शिकलेली पोर पोरी एकत्र येते. बसून दारु गिरु पेते, कालेजातले फोटो पायते. कालेजातल्या गोष्टी करते. आता हे नाही इचारच हे समद कराची जरुरत का हाय बा. आम्ही का कालेजात गेलो नाही का कधी? मले तर मालूम हाय, अर्ध कालेज चहाच्या टपरीवर गेल रायते आन अर्ध पानठेल्यावर गेल रायते. कालेज आठवाच म्हणजे का ते टपरी आठवाची का पानठेले? जाउ द्या, पुणेवाल्यायच कालेज हाय ते. त्यायन कान व्हाटसअप वर ग्रुप जमवून मिटिंग ठरवली. आपल्याच कालेजात शिकलेल्या पोट्ट्यायले भेटायले कायले य़ेवढ्या झंझटी पायजे. आमले तर नाही लागत, मायाकड फोन नाही अस नाही. वाटण्या होउन मले इस एकराची शेती आलती. कोरडवाहू शेतीत पंप लावले आन वलीत केल. आजही माणूस माणूस पऱ्हाटी उभी हाय आपल्या वावरात. मायाकड बी सॅमसंगचा फोन हाय. दुसरा तिसरा घेतच नाही आपण. ते व्हाटसअप बी हाय. रायले कालेजातले पोट्टे ते तर भेटतच रायते. पोट्टे जाउन जाउन जाइन कुठ जी, हिंगणघाटात नाहीतर वर्धेत, मोठच झाल तर नागपुरात. सणवार रायला का गावाकड येत रायते तवा भेट होतच रायते. कालेजातल्या पोट्ट्यायले भेटण्यात अस का खास हाय हेच मले समजल नाही. अशी स्टार्टींगच समजली नाही तर फुडं पिक्चर का समजन जी!

पिक्चरमधला हिरो, त्याच लगीन झाल हाय, त्याले बायको हाय, गोड पोरगी हाय, पिक्चरची हिरोइन तिचबी लगीन झाल हाय, तिलेबी नवरा हाय, तिलेबी गोड पोरगी हाय. अस दोघायचबी समद मस्त चालल असताना मंग 'ते का करुन रायली असन बा' अशी झंझट कायले पायजेन म्हणतो मी. फुकटच दिमागाले तरास द्याचा. काहो, तुम्हीच सांगा, फालतूचाच डोक्याले ताप हाय का नाही हा? पण नाही, हा लफूट पोट्ट्य़ावाणी तिच्या मांग मांग हिंडत रायते. चांगल्या शिकल्या सवरल्या संसारी माणसाले हे शोभते का जी? मले तर समजतच नाही पोट्टे शिकले का काहून जास्त इचार कराले लागते ते? तिच्या मांग लागूनबी याले का भेटनार होत, तिच तर लगीन झालत याचबी झालत. ना याले तिच्याशी लगन कराच होत ना तिले याच्याशी लगन कराच होत. मंग कायले भेटाची भानगड कराची? मले तर ते गणित काही समजल नाही. बरं, हा असा बहकला जाउ द्यास, पोट्ट व्हय, कधी नशेत बहकते. पण त्या पोरीन तरी बराबर वागाव का नाही? सांगाव ना, बाबा जे होत ते झाल गंगेल जाउन मिळाल, आता माया नवरा हाय, पोरगी हाय तवा आता माया मांग काही हिंडू नको. पण नाय तिले बी याले भेटाच रायते. भेटून का लगीन करनार होती का त्याच्याशी, आपल्या नवऱ्याले आन सोन्यासारख्या पोरीले टाकून त्याच्या मांग हिंडनार होती? आता तुम्हीच सांगा हे मजाक नाही तर काय? हा मजाक मजाक मंधी तिले भेटाले जाते आन तेबी मजाक मजाक मंधी याले भेटते. हे अशी मजाक पायत टाइमपास करण्यापेक्षा बर्डीवर मॉलमंधी हिंडू, सावजीले जाउन ताव मारु अस पवन्याले सांगाव म्हणून म्या पवन्याकड पायल. तर पायतो काय ते आमच गाववाल पोट्ट आता पार पुण्याच झालत. ते मधेच हासत का होत, त्याच्या डोयात पाणी का येत होत. पार येड झालत. मले तर समजतच नव्हत त्याच्याकड पाहून हासाव का रडाव. तवा म्या मस्त एसी मंधी ताणून देल्ली.

मधे मधे उठत होतो आन पिक्चर पाहात होतो आन पुन्हा झोपत होतो. येकदा पायल त्यान भावाची जिन्स घातली म्हणून त्याच कवतुक चालल होत. त्याले का लागते म्या तर अख्ख कालेज बापाची आल्टर केलेली पँट घालून काढल. दाहावीपर्यंत आम्ही हाफपँटीतच फिरत होतो, आमचा बाप फुलपँट देतच नाही म्हणे. तवा कालेजात गेल्यावर फुलपँट भेटली तर केवढ कवतुक आमाले, बापाची आल्टर केलेली पँट म्हणून का झाल फुलपँट तर होती. येथ यान भावाची जिन्स घातली म्हणून कवतुक, मजाक नाही तर का जी हे राजेहो? येकदा पायल पोरगी पोरायसाठी बापाची उरलेली दारु आणून देते. म्या बी चार पावसाळे पायले. जर कोणची पोरगी लग्नाअगुदर का तुमाले तिच्या बापाची उरलेली दारु आणून देत असन तर तिच्यासारखी बायको या जगात दुसरी कोणची नाही. य़ेकदम बेस नंबर वन. लग्नाअगुदर पासूनच तुमची प्याची सोय करनारी बायको सापडते का आजच्या जमान्यात. अशा पोरीले सोडून देनार पोरग भैताडच म्हणा लागन. हे असे भैताड अशा पिक्चमंधीच सापडते असली जिंदगानीत नाही सापडत. म्हणून म्हणतो मी, बंदा पिक्चर मजाक हाय.

पिक्चरचा येंड आला, तवा म्या जोरजोरात घोराले लागलो होतो. बाकीचे मायकड पाहात होते म्हणून माया दोस्ताले मायी लाज वाटली. त्यान मले उठवल. डोकच उठल माय. म्या पवन्याले इचारल ‘हे दोघ कोठ आले बे आंधाराचे?’ पवन्यान मले चूप बसाले सांगतल. आता याले येकट्यालेच पिक्चर पाहाचा होता तर मले कायले घेउन आलता देव जाने. म्या झोपलो होतो तर मले सांगाले का जाते जी? तेथ आंधारात बसून ते दोघबी लंबाले डायलाग फेकत होते. आता पिक्चरचा येंड आलता आन हे डायलाग फेकत होते. अस रायते का कधी? बर डायलाग फेकाचे असन तर आपण कोण आहो हे तर पायल पायजे का नाही? आपण का अमिताभ आहो का दिलीप कुमार, मंग कायले बकबक कराची? हे बकबकच, डायलाग नाही. येकदाची त्यायची बकबक संपली पिक्चर संपला. म्या सुटलो येकदाचा. कैदेतून सुटल्यावाणी झालत मले. आमच्या पवन्याले हे पिक्चर लयीच आवडल. मले म्हणे,

“याले म्हणते पिक्चर जन्या. कस आपल्या मनातल सांगते. आपल्याले बी वाटते ना कधी कधी ते आता का करुन रायली असन बा?”

“कायले वाटाले पायजे बे? सारेतली गोष्ट येगळी होती आताची येगळी. आता काही त्या साऱेतल्या सुबाभळीवाणी रायल्या नसन साऱ्या वडाच्या झाडावाणी सुटल्या असन. वडाच्या फांद्यावाणी येका खांद्यावर येक पोरग आन येका हातात दुसर पोरग. का करनार हाय बे त्या दुसर? बायाच्या मांग हिंडाच, घरचा सैपाकपाणी कराच, बाजाराले जाच. आपल्याच घरात पाहाच. जे आपल्या घरात चालल रायते तेच समद्यायच्या घरात. समदीकड मातीच्याच चुली हायेत पाय.”

“तस नाही जन्या, वाटत लेका. तुले कधी इमलीची आठवण येत नाही?”

म्या म्हणतो फोड बसल्यावर त्याच्यावरची खिपली कायले काढाची? जे व्हाच ते होउन गेल. खिपली काढून कायले पाहाच फोड बसला का नाही ते? फोड बसल्याबिगर का खिपली येते का? मले असा घुस्सा आलता. इमली आमच्या सारेत होती हायस्कूलले. येका वरसान लहान होती मायी सारा सुटल्यावरच म्या तिले पायल होत. ते दुसऱ्या गावावरुन बसन येत होती तिच्या गावात सारा नव्हती. आम्ही पोट्टेबाट्टे तेथच फाट्यावरच्या पानठेल्यावर बसून राहत होतो. तिले पायल न दिलखूष. येकदम सुबाभुळीवाणी होती. मंग तिच्या बसच्या टायमाले म्या तेथच बसून राहो. रोज तिले जसाजसा पाहत होतो तशीतशी पोरगी लइ आवड्याले लागली होती. तवा म्या आधी तिची चवकसी केली कणच्या गावची हाय, तिचा बाप का करतो. उद्या लफड नाही पायजे न जी. तिचा बाप चांगला दोन बैलजोडीचा कास्तकार होता तवा फुड जाउन काही लफड नव्हत. आमच्या बापाले पटवता आल असत. आपल बंद काम प्लॅनींगनच रायते.

येकदिस हिम्मत करुन तिच्यासंग बोलाच ठरवल. ते फाट्यावर उतरली आन गावाकड चालली होती, गाव थोड दूर होत. उन तापल हात तवा रस्ता तसा सुनसान होता. कोणी चिटपाखरु नव्हत. मनात मारुतीच नाव घेतल आन म्या तिले इचारल ‘तुय नाव का हाय व इमले?’ म्या अस इचाराची सोय आन ते अशी पराली जी. ढोऱ्यायच्या शेपटीखाली हात लावला का ढोर कसे परते तसी पराली जी. मले समजतच नव्हत म्या अस का केलत ते. म्या तर फकस्त नावच इचारल होत. तिच नाव मले मालूम होत पण काहीतरी बोलाच म्हणून नाव इचारल. त्या दिसापासून मायी तिच्याशी बोलाची हिम्मतच झाली नाय. मी चुपचाप रोज फाट्यावर तिची वाट पाहात होतो अन मंग कालेजले जात होतो. तिची दाहावी संपली आन तिच आमच्या गावात येन बंद झाल. मले काही चैन पडत नव्हती. रातभर झोप येत नव्हती. कसकस होत होत. कालेजात मन लागत नव्हत. म्या तिच्या गावात चकरा माराले लागलो. लय भेव वाटत होत. तिच्या गावच्या पोट्यायन पायल तर केवढ्याची आली असती? तरीबी रोज घरुन वावरात जात होतो आन तेथून चालत तिच्या गावात जात होतो. तेथूनच बस पकडून कालेजले जात होतो. कधी ते दिसत होती कधी नाही. तिले मालूम झालत का म्या तिच्यासाठीच तिच्या गावात येउन रायलो ते. गाडी येथच अडकली होती, फुडं का कराव काही समजत नव्हत. कोणाले इचारव बा त्याचाच इचार करत होतो तवा माया मामा घरी आलता. तो करंजीले रायते हे तरोड्यापासच करंजी. मामा मायाच वयाचा म्हणान जी पाच वरसान मोठा. त्यान बारावी करुन डियेड केलत आन कोण्या सारेत मास्तर होता. म्या त्याले बंद समजावून सांगतल. त्याले घेउन तिच्या गावात गेलो. त्या दिवशी ते आमच्यासंगच बसमंधी आलती, तिचा बाप, माय, भाऊ बंदे बसमंधी होते. कोठका लग्नाले चालले असन. मले मामान सांगतल,

“जन्या, हे पोरगी काही अशी भेटनार नाही. तू काही हिच्यापायी तुय कालेज बरबाद करु नको. तिच्या गावात तर जाउच नको. पकडल्या गेला तर लइ मार खाशीन. तू कालेज कर बराबर, मंग शिद्दा तिच्या बापालेच जाउन इचार.”

मामाच म्हणन मले पटल म्या तिच्या गावात जान बंद केल. ते घरुनच परीक्षा देत होती, तवा कधीकधी बसमंधी दिसे. साहा आठ महिन्यान मामाच लगन जमल. टिका लावाचा प्रोग्राम करंजीलेच होता. अस गडबडीतच लगन जमल होत, तवा मायले घेउन मलेच जा लागल. तवा मले समजल माया मामा लइ चालू निंगाला. कंसमामा तरी बरा पण हा नको. लेकान मलेच मामा बनवल.

‘ते का करुन रायली असन बा’ याच मले काही देनघेन, पण म्या का करुन रायलो ते तुमाले सांगतो राजेहो. दर दिवाळी आन दसऱ्याले करंजीले जातो, ...............................आसीरवाद घ्याले.

लिहिनार
जानराव जगदाळे
ता. हिंगणघाट, जि. वर्धा.

--मित्रहो
http://mitraho.wordpress.com/
.
1

प्रतिक्रिया

पैसा's picture

27 Feb 2017 - 7:01 am | पैसा

जानराव जगदाळे लै भारी समीक्षक आहेत! त्यांच्या आयुष्यात अशी कथा घडावी याचं मात्र वाईट वाटलं.

मित्रहो, तुम्हाला डार्क विनोद अप्रतिम जमतो आहे. जियो!

सविता००१'s picture

27 Feb 2017 - 10:34 am | सविता००१

भारी..

चिनार's picture

27 Feb 2017 - 10:52 am | चिनार

खूपच मस्त !!
मी तुमचा पंखा झालो आहे मित्रहो भौ..

पद्मावति's picture

27 Feb 2017 - 2:16 pm | पद्मावति

=)) मस्तं, मस्तं.

स्मिता_१३'s picture

27 Feb 2017 - 5:06 pm | स्मिता_१३

मस्तच !!!

अभिजीत अवलिया's picture

28 Feb 2017 - 9:56 am | अभिजीत अवलिया

मस्त होते लिखाण.

लग्नाअगुदर पासूनच तुमची प्याची सोय करनारी बायको सापडते का आजच्या जमान्यात. अशा पोरीले सोडून देनार पोरग भैताडच म्हणा लागन. हे असे भैताड अशा पिक्चमंधीच सापडते असली जिंदगानीत नाही सापडत.
---> लग्नानंतर तुम्हाला प्यायची असेल (घरात बसून) तर विनाकारण कोणताही वाद न घालता चकणा वगैरेची सोय करणारी तरी भेटते बऱ्याच जणांना.

इडली डोसा's picture

28 Feb 2017 - 11:49 am | इडली डोसा

गोष्ट आवडली

विनिता००२'s picture

28 Feb 2017 - 1:01 pm | विनिता००२

भारीये :)

नूतन सावंत's picture

28 Feb 2017 - 7:00 pm | नूतन सावंत

आवडली

जयन्त बा शिम्पि's picture

1 Mar 2017 - 10:02 pm | जयन्त बा शिम्पि

मस्त जमली भट्टी ! वाचतांना मजा आली . विशेषतः शेवट छान जमला. पुलेशु.

पिशी अबोली's picture

2 Mar 2017 - 10:10 am | पिशी अबोली

मस्त आहे!
भाषा पण समजली सगळी. आनंद झाला..

खेडूत's picture

2 Mar 2017 - 10:51 am | खेडूत

अतिशय सुंदर..!

बरखा's picture

2 Mar 2017 - 2:02 pm | बरखा

एकदम झ्याक लिवलयं

कविता१९७८'s picture

2 Mar 2017 - 5:43 pm | कविता१९७८

छान लेखन

गामा पैलवान's picture

2 Mar 2017 - 7:39 pm | गामा पैलवान

मित्रहो,

हा खास वऱ्हाडी ठेच्याचा झटका दिसतोय! :-)

माझ्या एका मित्राची कथा थोडीशी याच वळणाने गेली. मात्र शेवट मित्राच्या मनाजोगता झाला. त्याचा मामा असाच दोनतीन वर्षांनी मोठा. मित्राच्या शाळेतली एक मुलगी दहावीपासून मित्राच्या नजरेत होती. यथावकाश ग्राज्वेट होऊन एकदोन वर्षं नोकरी केल्यावर ती मामाला दाखवली गेली. तेव्हा या दोघांना अधिक कालक्रमण व्यर्थ असल्याचा साक्षात्कार झाला. मित्राने मग स्वत:चा बार निगुतीनं उडवला. इतके वर्षं काय करंत होतास म्हणून विचारलं की गप राहतो. ;-)

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

2 Mar 2017 - 8:06 pm | सुबोध खरे

अतिशय सुंदर..!

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2017 - 8:22 am | पिलीयन रायडर

क्लासच हो!!!

मित्रहो's picture

5 Mar 2017 - 7:34 pm | मित्रहो

सर्व मिपाकरांचे मनःपूर्वक आभार.

अभिजित सर
हो चकणा देनारी भेटते हल्ली.

गापै साहेब
असे घडू शकते असे माहीत होते पण प्रत्यक्षात घडल्याचे ऐकले नव्हते. आमच्या शाळतले सर नेहमी म्हणायचे अरे ह्या मुलींपैकी कुणी उद्या तुमची काकू, वहीनी नाहीतर मामी असेल. हा विचार ठेवून वागत चला.

एमी's picture

13 Mar 2017 - 10:38 am | एमी

भारी लिहलंय !!

मी तुमचा पंखा झालो आहे मित्रहो भौ.. >> +1

===
आता इतक्या वर्षात तो सैराटच का तो पायला होता. नाहीतर मराठी पिक्चरशी संबंधच नाही. >> इथे मात्र थोडंसं बेअरींग चुकल्यासारखं वाटलं. चुकलं नसेलही कदाचीत; पण मी तिथे अडखळले.

मित्रहो's picture

13 Mar 2017 - 10:44 pm | मित्रहो

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

साधारण वर्ष दीड वर्षापूर्वी आमच्या गावातल्या एका व्यक्तीने 'आपण मराठी पिक्चर टाकीजमंधी जाउन पाहतच नाही न भाऊ' हे ऐकवले होते. तेच पकडून लिहीले होते.

'आपण मराठी पिक्चर टाकीजमंधी जाउन पाहतच नाही न भाऊ' >> हां हे वाटतय वर्हाडी ढंगात. ती मी कोट केलेली वाक्यं प्रमाणभाषेशी जास्त जवळ वाटली... मला एकटीलाच तसं वाटत असेल कदाचीत. पण छान एका लयीत वाचत असताना तिथे अडखळले खरी :)

मित्रहो's picture

24 Mar 2017 - 8:00 pm | मित्रहो

धन्यवाद
सतत प्रमाण भाषाच बोलत असल्याने ही शैली प्रमाण भाषेची की बोली भाषेची असा गोंधळ नक्कीच उडू शकतो.

अभ्या..'s picture

14 Mar 2017 - 12:28 pm | अभ्या..

अरे खत्तरनाक लिहिले आहे.
एकच लंबर

किसन शिंदे's picture

14 Mar 2017 - 12:59 pm | किसन शिंदे

जबरदस्त लिहीलंय. भाषेची बेअरींग शेवटपर्यंत तशीच्या तशीच राहतेय.