मराठी भाषा दिन २०१७: इमान (विमान) - (मालवणी)

Primary tabs

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in लेखमाला
24 Feb 2017 - 7:03 am

1

इमान (विमान)

"रे मायझया, हय इमान उतारला बघ." कानातली काडी भायर काढत पांडगो बोललो. "खय ता?" म्हणून बाबल्यान वळान बगल्यान आणि बगीतच रवलो. "इमान नाय हवाइसुंद्री म्हण." मसूरकरांचा शुभला पार्लरातसून भायर पडत होता. केसांची बट बोटात खेळवत खेळवत, पांडगो आणि बाबल्याकडे न बगता, ता निघान गेला. नेहमी उलटा होय. गावातल्या समस्त भगिनी वर्गाकडे कावळ्यासारखे वळून वळून बगणारी ती दोगा शुभल्याकडे कधी ढुंकूनही बगत नसत. तसा त्येच्याकडे कोणच बगी नाय .

शुभला होताच तसा. अजागळ, बावळट. वयात इल्यावर ढोर सुदिक अप्सरा दिसता असा म्हणतत. पण शुभल्याक मतदानाचो हक्क मिळानसुद्दा तेच्यात काय्येक बदल झालो नाय. मळकट चुरगळलेली साडी,तीसुद्धा पायापासून वीतभर वरती काठीयेक गुंडाळतत तशी. भलत्याच रंगाचो ढगळ हातभर लांब बाह्यांचो पोलको, खांद्याभोवती गुंडाळलेलो पदर पाठीत पोक आणि मुंडी खाली घालून चाल. नेहमी उघड्या तोंडातून भायर इलेली जीभ. एका रबरबँडान बांधलेलो केसाचो बुचडो. वयात इल्यानंतर परकराची जागा साडीयेन घेतली एवढोच काय तो बदल. बाबलो म्हणा, "मसूरकरणीथय आरसो तरी असा काय रे?"

मुंबैसून येणारी एष्टी फ्याशन घेऊनच गावात येय. गावातल्ये मुली हळूहळू पंजाबी ड्रेस वापरूक लागलेल्ये. पण शुभल्याक तो वारो कधीच लागाक नाय. तरी एक बरा होता. बापाशीन कायतरी लटपटी करून त्येका शाळेत कारकून म्हणान चिकटवल्यान. पण नोकरीचा गाजर दाकवूनसुदा शुभल्याक कोणी पसंत करूंक नाय. हळूहळू स्थळांचो रीघ कमी झालो. एक दिवस काका बामणान शुभल्यासाठी सोयरीक आणली. मुंबयचो झिलगो होतो. सरकारी नोकरीत होतो.आणि लग्नाचो रवलेलो होतो. मसूरकराक आता आशा उरली नव्हती पण नाय कित्याक म्हणूचा म्हणान तो शुभल्याक दाखवूक तयार झालो.

दाखवूच्या दिवशी सुटाबुटातलो एकदम हिरो सारखो पोरगो, एष्टीयेतसून उतारलो. असो मुलगो अख्ख्या गावान कधी बगेलेलो नाय. चाकरमानी येवन रुबाब दाखयत पन ह्या पाणी येगळाच व्हता. त्येचो रुबाब, कपडे, बूट अग्गो बाय! त्येका बगल्यान अन शुभला गारच झाला. असा कधी आजपातूर झाल्लला नाय. चाय पोये देताना पयल्यांदाच शुभल्याचो हात थरथर कापाक लागलो. तो पोरगो शुभल्याकडे बगुन असलो भारी हसलो की शुभल्याच्या पायाखालची जमीनच सराकली. मुंबैवालो तो, म्हणालो, "मला मुलीशी पाच मिनिटं एकट्यानं बोलायचंय." ता ऐकान शुभला हराकला. थरथर कापणारा शुभला आणि तो वावरातल्या बावीवर गेले. वाईचशान खाकरून तो बोलूक लागलो, "शुभांगी, तुमचं नाव खूप छान आहे. खरं सांगू? मी आईच्या इच्छेखातर मुली बघतोय. पण मला आत्ता लग्न करायचं नाही. मी तुम्हाला नाकारेन पण ते तुम्ही आवडला नाही म्हणून नाही. तेव्हा प्लीज वाईट वाटून घेऊ नका." शुभल्याक काय बोलाचा सुदरेना. थोडो टायम मरणाची शांतता पसारली. पाच मिंटा तशीच गेली आणि ती दोगा पुन्ना वाणशीत इली. चाय पिऊन पावणे निगान गेले.

शुभल्याक नकाराची सवय होती. पण ह्या टायमाक मनात कायतरी हलला. त्येका आजपातूर या भाषेची सवय नवती. त्येच्या आजूबाजूचे सगळे एकमेकांका गाळीये देउनच बोलत. "मेल्या, भडव्या, मायझया .... " पण आज पयल्यांदाच शुभल्याक कुणीतरी त्येच्या सोत्ताच्या नावान हाक मारली. शुभल्याक वाटला, आत्ता नाय पण कधीतरी तो लगीन करतलोच ना आणि आपण आवडलो नाय असा तर म्हणाक नाय? काय पण चिकणो पोरगो होतो! एका दिवसात शुभला बदलून गेला. कधी नाय ता आरशासमोर तासंतास उभ्या रवाक लागला. धुतलेली साडी बोळो करून ठेवच्या ऐवजी, घडी करून गादीयेखाली ठेवूक लागला. चापून चोपून साडी नेसूक लागला. आणि एक दिवस शाळा सुटल्यार शुभला, गावात नवीनच चालू झालेल्या श्री जरीमरी देवी ब्युटी पार्लरात गेला. थयसून भायर इल्यार म्हादगो नि बाबलोच काय अख्खो गाव त्येका बगीत रवलो.

आधी लोकांनी चेष्टा केली. "श्रीदेवी, खय चल्ला?" "मेल्या शुभल्या, तुका पिच्चरात घेतल्यानी काय?" "आता रेखाक रिटायरमेंट घेऊक सांगाक व्हया." शुभला कधी त्येंच्या तोंडाक लागा नाय. मग सगळ्याक वाटला, खयतरी त्येचा सूत जमला असतला. माशाचो वास इल्याशिवाय मांजर नाचाचा नाय. लोकांनी आडून आडून इचारला , "मग आता आईस्क्रीम कवा ?" पण शुभला काय कोणाक दाद देईना. ता आपणहून कायतरी सांगात म्हणून मसूरकरणीन पण वाट बगली. पण छे! शुभला आपल्याच तारेत रवा. झाकपाक कपडे घालून शाळेत जाय. कुणाशी जास्त सलगी नसली तरी पूर्वीचा तोंडाचा ओपन पोष्ट जाऊन हसतमुख रवा. आता जर खयचा स्थळ इला तर नक्की त्येका पसंत करीत या आशेन आवशीन त्येच्याकडे पुन्हा लग्नाचो इषय काढलो. पण शुभला काय तयार होईना .

तसो एकदा बाबल्यानं पण खडो टाकून बगल्यान ,नाय असा नाय. बाजारपेठेत त्येच्या बापाशीचा किराण्याचा दुकान व्हता. दुकान म्हणजे काय गिरायका कमी अन उंदीर जास्त अशी परस्थिती! पण कधीमधी उधारी चला म्हणून मसुरकर थयसून सामान भरी. शुभल्या पण बापावांगडा जाय. आता मात्र शुभल्या इला की बाबलो थयच घुटमळीत रवा. सामानाच्ये पिशये सायकलीवरून त्येच्या घरी पोचवून देय. चिल्लर देताना हळूच एखादी रावळगाव सरकवी. पण शुभला आपल्याच तंद्रीत रवा. एकदा, दुकानात बापूस किंवा कोण गिरायका नाय (ती तर कधीच नसत) ही संधी साधून बाबल्यानं धीर करान शुभल्याक डायरेक लग्नाचा इचारल्यान. शुभला असला पिसाळला म्हणान सांगा. "मेल्या वांदरा, तोंड बगलास कधी आरशात? माका लग्नाचा इचारतस तो?" शुभल्यान बाबल्याच्या बेचाळीस पिढयांचो उद्धार केलो. बिचारो बाबलो! खयसून बुद्धी झाली अन म्हशीची शेपटी पिरगळली असा त्येका झाला. त्यातल्यात्यात ही फजिती कोणाक कळली नाय, ता एक बरा झाला म्हणान तो हात चोळीत गप बसलो. त्या दिवसानंतर शुभला कधी त्येच्या दुकानाची पायरी चढूक नाय.

बरीच वर्षा उलाटली. शुभल्याच्या बापाशीचो पिंडदान पण झालो. पण शुभल्याच्या चेहऱ्यावरचो मेकअप काय उतारलो नाय. त्येच्या बरोबरच्ये बाकी मुली आता थोराड दिसुक लागल्ये. कधी एके काळी, वेणी नाय फणी उभी केरसुणी, असा दिसणारा शुभला मात्र वयाची चाळीशी इली तरी टापटिप दिसा. गाव तर केव्हाच बदलान गेल्लो. दंडवत्यांनी रेल्वे काय आणली अन गावाचो कायापालटच झालो. सायकली जाउन फटफटी इली. पूर्वी एष्टी बरोबर गावात येणारी नवी फ्याशन आता टीवीमुळं झटक्यात गावात शिराक लागली. बाबल्याचा किराणा दुकान जाऊन त्येचा चकाचक न्यू भारत ग्राहक भांडार झाला. गावात दहा पंधरा ब्युटी पार्लरा उघाडली. गावाची लोकसंख्या वाढली. आता शाळा अपुरी पडाक लागली. म्हणान नवी इमारत बांधुची ठरली. सरकारी ग्रांट मिळण्यासाठी खटपटी चालू झाले.

त्यात एक दिवस हेडमास्तरानी शाळेत सरकारी इनिस्पेक्शन असल्याची बातमी दिली. मुबैसून कुणी मोठठो अधिकारी येवचो होतो. त्येच्या स्वागताची शाळयेत जोरदार तयारी चालू झाली. नोटीशीवर शुभल्यान त्या अधिकाऱ्याचा नाव वाचला आणि ता तीन ताड उडाला. इतके दिवस मनात कोपऱ्यात दडवून ठेवलेला ताच ता नाव व्हता. पुढले दोन दिवस शुभला हवेत तरंगत व्हता. दोन दिवस भुर्र्कन उडान गेले. इनिस्पेक्शनच्या दिवशी शुभल्या शाळेतल्या सगळ्या मास्तरणीहून भारी दिसा व्हता. इनिस्पेक्टर इले. शाळेची राउंड घेतल्यानी. हेडमास्तरांच्या खोलीयेत येऊन बसले. मास्तरांनी शिपायाकडसून शुभल्याक फायली घेऊन बोलावल्याचो निरोप धाडलो. शुभल्या दबकत दबकत आत शिरला. समोर सायेब बसलो होतो. शरीर खुर्चीत मावत नव्हता. सुटलेला पोट, तुळतुळीत टक्कल, गुटख्याचो घमघमाट, तोंडात चमकणारे दोन तीन सोन्याचे दात, सुजलेलो चेहरो, आधीचो रुबाब जाऊन तोंडावर इलेलो ओशट ओंगळवाणो सरकारी उर्मटपणा.

"हात मेल्या." करून शुभल्यानं रागान सायबासमोर फायली जोरात आपटले अन ता ताडताड भायर निघून गेला. मास्तरांक काय झाला समजूकच नाय. ते आणि साहेब आ वासून बगीत रवले.

इतक्या वर्षांनंतर शुभला त्या संध्याकाळी न्यू भारत ग्राहक भांडाराच्ये पायरे चढा होता.
.
1

प्रतिक्रिया

पैसा's picture

24 Feb 2017 - 7:21 am | पैसा

जबरदस्त लिहिलंय!

एस's picture

24 Feb 2017 - 7:40 am | एस

लय भारी!

फार मजा आली वाचताना !!! मस्त !!

अभिजीत अवलिया's picture

24 Feb 2017 - 9:15 am | अभिजीत अवलिया

मस्त लिवलस रे सायबा.

हाहा! मजा आली वाचताना.शेवट छान.

हाहा! मजा आली वाचताना.शेवट छान.

अजया's picture

24 Feb 2017 - 9:50 am | अजया

क्लास!
चुकलामाकला बर्याच दिवसांनी!

सतिश गावडे's picture

24 Feb 2017 - 10:08 am | सतिश गावडे

हाहा... भारीच.

तात्या विन्चू's picture

24 Feb 2017 - 10:37 am | तात्या विन्चू

एकदम भारी.....

"माशाचो वास इल्याशिवाय मांजर नाचाचा नाय" ...हे जाम आव्डला !

चिगो's picture

24 Feb 2017 - 11:16 am | चिगो

खुपच छान कथा..

बबन ताम्बे's picture

24 Feb 2017 - 11:25 am | बबन ताम्बे

"पूर्वी एष्टी बरोबर गावात येणारी नवी फ्याशन आता टीवीमुळं झटक्यात गावात शिराक लागली. "
हे बाकी १०० टक्के खरे.
मजा आली कथा वाचताना.
एक प्रश्न - मालवणीत मुलगी, स्त्रीला पण आला, गेला, तो असे पुरुषवाचक शब्दांनीच संबोधतात का?

होय.
उदा. 'ती गावाला गेली' हे वाक्य 'ता गावाक गेला' असे म्हणतात.

राही's picture

24 Feb 2017 - 5:11 pm | राही

ता गावाक गे(ग्ये)ला हे खरे तर तां गावा ग्येलां असे पूर्वी होते. मराठीतही एके काळी अनुस्वारामुळे लिंग-वचन स्पष्ट होत असे. प्रमाणित मराठीतून अनुस्वार उडाले आणि हे अस्सल कोंकणी अनुस्वार कोंकणातल्या बोलीभाषांतूनही अदृश्य झाले. जेव्हा एखादी गोष्ट छोटी, चिरपुट असते तेव्हा ती कोंकणीत बहुधा नपुंसकलिंगी असते. ते पोरगं=तां पोरग्यां पण आता ता पोरग्या. लहानपण किंवा कमी आदर दाखवायचा असेल तर हे तिसरे लिंग वापरतात. मुलींना शेवंत्यां, सखलां (सखी), चारग्यां(चारू) असे म्हणतात. पुंलिंगासाठी कर्त्याला आणि क्रियापदाला 'ओ' लावतात. जसे विनगो(विनय)/बाबलो(बाबी)/रावलो(राहुल) आदगो(आदित्य) या सगळ्यांना आयलो/इलो हे क्रियापद वापरतात. विनगो इलो. पण लहान मुलगी असेल तर विनलां (विनया) इलां/आयलां.

संजय पाटिल's picture

24 Feb 2017 - 11:43 am | संजय पाटिल

मस्त...

पियुशा's picture

24 Feb 2017 - 11:43 am | पियुशा

किती गोड भाषा !!!!!!

माका देजा वू फिलिंग इलो!! पण चांगला लिवलात महो.

प्रीत-मोहर's picture

24 Feb 2017 - 12:42 pm | प्रीत-मोहर

वा!!काय लिवलास . मजा इली.
इतक्यां खणखणीत मालवणी मोपश्या दिसांनी वाचलंय.
लिवत रवा हो!"

sagarpdy's picture

27 Feb 2017 - 5:22 pm | sagarpdy

+१

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Feb 2017 - 12:52 pm | डॉ सुहास म्हात्रे

मजा आली !

खालचे कोकणी तडके खास आवडले...

गावात नवीनच चालू झालेल्या श्री जरीमरी देवी ब्युटी पार्लरात गेला.

दुकान म्हणजे काय गिरायका कमी अन उंदीर जास्त अशी परस्थिती!

खयसून बुद्धी झाली अन म्हशीची शेपटी पिरगळली असा त्येका झाला.

भारी लिहिल्यात पण कोकणात बायल माणसांक "मेल्या, भडव्या, मायझया .... " हे गाळी कोणी घातलेले कधी ऐकूक नाय.

यशोधरा's picture

24 Feb 2017 - 1:45 pm | यशोधरा

पुरुष मंडळीही "भडव्या, मायझया .... " अशे एकमेकांक नेहमीच्या बोलण्यात म्हणनत नाय. आणि "मेल्या" ही शिवी नाय. तो प्रेमान उच्चरुचो शब्द आसा. तितकी ओळख, जवळीक मात्र व्हयी. वगी अनोळखी कोणाक मेल्या म्हटलास तर काय खरां नाय.

सस्नेह's picture

24 Feb 2017 - 2:22 pm | सस्नेह

भाषेचा ठसका एकदम जोसात ! आणि कथाही खटकेबाज !

मित्रहो's picture

26 Feb 2017 - 8:59 pm | मित्रहो

भाषेचा ठसका जबरदस्त
शेवट मस्त
मजा आली.

संजय क्षीरसागर's picture

27 Feb 2017 - 5:20 pm | संजय क्षीरसागर

मजा आली वाचतांना.

भिंगरी's picture

28 Feb 2017 - 12:08 am | भिंगरी

शुभल्याच्या जागी 'सुसल्या'डोळ्यापुढे उभी राहिली.

एमी's picture

22 Mar 2017 - 4:05 pm | एमी

लय भारी! मस्त!!

चुकलामाकला's picture

29 Mar 2017 - 11:18 am | चुकलामाकला

सर्वाना धन्यवाद!