मराठी भाषा दिन २०१७: जागृत (बाणकोटी)

Primary tabs

सूड's picture
सूड in लेखमाला
23 Feb 2017 - 6:26 am

1

जागृत

तं झाला काय, सगलीकडना काय बायशा बातम्या येईत. आज ह्या गावातला पोर पलवून बाटवलीन, उद्या त्या गावातल्या ल्येकीबालीला उचलून न्हेलीन. सगल्या गावात निस्ता भय, कंदी काय व्हयल त्याजा पत्त्या नाय. येका येलं त्या घुआगरातनं का कायशी बातमी आली, का म्हनं समुंद्रावरना लोका येईत आनि रोज नंदर ठेवीत, यकांदी बरी दिसनारी पोर न्हेईत आनि लांब दर्यात फेकून देईत. वान्या-बामनाच्या पोरी दिसाय कशा आप्सरंसार्‍या!! सगल्या भितीन् गारटून गेलंल्या. येकदोगीनी होरंत उडी मारलंनी. तिकडनं आमचा गाव काय तसा लांब नाय हो, काय समाजलांव!! आमच्या गावच्या शिवंपाशी कंदीबी येयल हा संकट, म्हनून सगल्यांच्या पोटात मुरडं पडलीलं. बायाबापड्यांचं पायरव दिवस मावलायच्या आतच बंद झालीलं.

ह्याजा कायतरी बंदोबस्त करियालाच होवा. रात्ची जेवना झाली, सगली वायच आशी आंगन्यात लकाटल्याली. आमच्या घरात काय चाल्लाय आयकाय पायजे म्हनुन वायच डोलं मिटल्यासारं केलं नि चिप र्‍हायलो. मोटी सून म्हनं, "जल्ला काय ठेवलांय ह्या गावांत? बाबांला सांगाय होवा, गुंडाला सगला बाडबिस्तारा नि लांब जाव सगली कुटंतरी दुसर्‍या गावात". ल्येक म्हनं, "तां खरां गं वयनी, पन बाबांला कोन सांगयाचां. मना फुडं करशील तं मी शाप मागं फिरन. तुमांला वाटत आसंल तं तुमी सांगा". मायला, मोटी सून आन ल्येक लईच कमजोर निंगाल्या. धाकटी सून म्हनं, "ह्या आपला गाव हाय, आपन कसा पलून जायाचा? मना काय ह्या खरां नाय वाटत, तुमांला काय करियाचा तां करा. ह्या घर काय मी सोडियाची नाय."

आता आम्च्या घरामंदी ह्या चाललिला तसा परतेक घरी चाललीला असनार. ह्याचा काय करियाचा ता ईचार करीतच डोलं मिटलं नि आंगन्यातच निजलो. नागान् दर्शन दिलान, हा येवडा मोट्टा नाग. बगीत र्‍हायलो, मना वाटला आता चावताय का काय!! नरडं सुकलीलं, तोंडातना शबद नाय फुटं, पन मना काय आटवला आसंल? घरच्या देवाचा नाव घ्येतला. तसा तो नाग मानसासारा बोलं. म्हनं, "घर सोडूनशान चाललाईव? मंग मना कोनी बगियाचा?". वायच धीट होवन ईचारला, "कोन रं बाबा तू?" तं म्हनं, "तुमच्या ह्या जागंचा राखनदार हाय मी, सगला नीट होयल. पर ह्या घर सोडियाचा नाय." येवडा आयिकला न मला आली जाग!! सगला सपान व्हता. तेवड्यात कुपनापल्याडच्या भागीच्या कोंबड्यान बांग दिलान. फाटं पडलिला सपान हाय, खरांच तां. हितंच र्‍हायचा आनि संकट दारावं आल्याला!! निस्त्या इचारान पोटात कसा झाला नि लोटी घेवन पांदीकं ग्येलो. परत येताना भटाचा म्हातारा नंदरं पडला, नि मांज्या डोक्यात कायसा झाला.

घरी आलो आंगोली हुरकल्या नि नातवाला बलिवला, म्हटला पलत जा नि भटाच्या आनि गुरवाच्या म्हातारबाला बलिव. नातू आला नि मांगं दोनय म्हातारं आलं. आमी तिगंव नाकाचा शेंबूड पुसत आसल्यापासना येकमेकांला वलकीत व्हतंव. आमच्या तिगात काय ठरला तं हिकडचा तिकडं समजत नसं. गुरवाला त्याच्या ठरलील्या तांब्यात वायच ताक दिला. नि मंग इचारला, "ह्या जा काय गावांत चाल्लाय त्याचा बंदोबस्त करियाचा हाय, पर मी सांगताय तां पटतांय तं बगा." तसा मी जा काय यवजलीला व्हता तां सांगतला. दोगंय म्हातारे राजी झाले. आता भय न्हवता, सगली वाट बगीत व्हतो, कंदी ही वश्शाडी येताईत नि आमी त्यांच्या पाटानीत फटके देतंव. येक मन म्हनं का आनि कोनाला ह्या सांगाय होवा. पर गावभर झाला तं काय राम नाय. तिगंव गप बसलो पर गावकर्‍यांला येक ताकीद दिली, असा कोनंव आलीला दिसला, त्याला सरल धरुन रामवरदायनीच्या देवलात घेवन येयाचा.

येक्या आवसंला शिवंपल्याडल्या गावात कंदाल झालिशी खबर आली. आता गावकर्‍यांला शेवटचा बलवून सांगतला, "सगली तयार हांव ना? जा कोन येयल त्याला देवलात आनियाचा. दोन-तीन मानसा असली तरी आपला सगला गांव हाय. घाबरायचा काम नाय!!" दुसर्‍याच राती सुताराचा सदू कायसा इपरित वाटला म्हनून जागा झालंला, तं त्याला कायसा फिरत आसलीला दिसला, पुनव जवल आलंली, तं चांदन्यात मानूस वलकू येय. हा काय गावातला मानूस नायसां दिसतां. असा म्हटल्यावं त्यानं कोयती घेऊन जी त्याज्या मांगं बोंब ठोकलान आनि चार लोका जागी झालंली. चुलीतला कोलीत, झाडू, काय हातात मिलंल ता घेवन ह्या मानसाला पकडलीन. सगला गाव जागा झालीला. खबर लागली तसा गुरवाचा नि भटाचा म्हातारा संगाती घेवन सगली देवलात गेलंव.

बगतलां तं हा काय वलकीचा दिसं नाय? तो सारका सांगं मना सोडा, मना सोडा. आमी आशी बरी सोडतंव!! सदून लगोलग मानंवं कोयती धरलान. तसा म्हनं, खबर काडाय पाटवलीला हाय मना. किती घरां हायत, किती नि कंदी जाग असते गावात असा सगला. नि सगली खबर काडून्शान मंग कुटल्या घरातनं कोनाला उचलून न्हेयाचा ता व्हनार. ह्ये आयकलं तसा यवजल्यापरमानं गुरव घुमाय लागला. चैती पुनवंला त्याज्यावं रामवरदायनीचा वारा येय. पर ह्या आज केलीला सगला नाटक!! ता केल्याबिगर लोकांचा धीर चेपलसा वाटत न्हवता. आलंला मानुस तो परधर्माचा!! त्यास काय नाय उमगं ह्या काय चाललीला हाय तां. भटाच्या म्हातार्‍यान जानवंजोड हातात घेतलान नि कायसा पुटपुटाय लागला. गुरवान गुलाल बुक्का ह्या मानसाच्या डोकीव लावलान नि भटान त्याला जानवंजोड घातलान. गुरव आन्नि मोट्यान घुमाय लागला. तसा मी म्हटला, "आरं लोकांना काय बाटवताइव? आज तुला बाटवलीला हाय आमच्या ह्या गावान. जा, नि तुज्या त्या म्होरक्यास खबर देस. पुन्ना का हिकडं आलांव तं तंगडीच तोडतंव. आता निस्ता बाटवलीला हाय, म्होरल्या येलं पाटानीला चांगलं त्येल लावन या. आमची लोका हितं बांबू घेवन्शानी तयारच हायत तुमान्ला सडकून काडाय. चल निंग!!"

तो गेला तसं गावकरी म्हनत देवी जागृत!! संकट दूर केलान!! मी, गुरव नि भटाचा म्हातारा नंदरंला नदर देवन गप बसलंव.

1

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

23 Feb 2017 - 7:59 am | प्रीत-मोहर

वा!! बरी गोष्ट सांगलंनीत आजोबा!!

स्रुजा's picture

23 Feb 2017 - 8:13 am | स्रुजा

हेहे ! आवडली हो !

स्रुजा's picture

23 Feb 2017 - 8:13 am | स्रुजा

बाणकोटी कुठली भाषा?

सतिश गावडे's picture

23 Feb 2017 - 9:40 am | सतिश गावडे

ही भाषा रायगड जिल्ह्याचे दक्षिणेकडील तालुके आणि बराचसा रत्नागिरी जिल्ह्या यांच्या ग्रामिण भागात बोलतात.

हा अजून एक परिच्छेद या भाषेत लिहीलेला:

मी तवा लय ल्हान व्हतो. शालेत पन जात न्हवतो. आमच्या गावाजवल आमचा येक श्यात हाय. आलुचा माल म्हनुन. तितं बय आनि बाबा म्हंजे माजं आजोबा सोबत घेवून गेलं. भौतेक पयला पावूस पडून ग्याला व्हता. जमिन जरा वली झाली व्हती. बाबांनी आदी नांगर फिरवला. नांगर फिरवल्यावर श्यातात म्होटी म्होटी ढीकला श्यातात व्हतात. ही ढीकला मंग फली फिरवून बारीक कराय लागतात. तसा क्याला का जमीन सपाट व्हते. आणि मंग त्याज्यावर भात प्यारायचा आस्तो. तं बाबांनी बईल जॉकडाला जुपलं आनी जॉकडाला फली पन बांदली. पन फली हालकी आसते. तवा त्या हालक्या फलीन ढिकला फुटत नाय. म्हनून त्या फलीवर येक तं म्हॉटा दगड ठ्यावतात नाय तं ल्हान पॉराला बसवतात. तं बाबानी मना फलीवर आनी फली फिरवायला सुरुवात केली. दोन तीन ख्यापा झाल्या आनि येक म्हॉटा ढीकाल फलीला लागला. आनी फली याका बाजून उचलली. मी फलीच्या फुडच्या बाजूला पडलो आनि माज्यावरना फली ग्येली. मना काय लागला बिगला न्हवता पन ज्याम घाबारलो म्हनुन रडाय लागलो. बय तितं बांदावर बसली व्हती. ती लगेच माज्यावल धावत आली. मना जवल घ्येउन बाबाना म्हंजे माज्या आजोबांना वरडाय लागली. तुमाना कलत नाय काय, माजा ल्येक मांगं फलीवर बसलेला हाय तवा जरा संबालून हाकलावा बयलाना. ती मंग मना श्याताच्या बांदावर घ्येऊन ग्येली आनि मना पानी बिनी दिलान. श्यातात काय चिकल बिकल झाला न्हवता तवा मना काय माती बिती लागली न्हवती. आनि पयल्या पावसान श्याताची जमिन मव झाली व्हती तवा लागला पन न्हवता मना.

पैसा's picture

23 Feb 2017 - 10:27 am | पैसा

मस्त!

प्रीत-मोहर's picture

23 Feb 2017 - 10:32 am | प्रीत-मोहर

ह्या पन मस्त्च हां.

मोठं लिहा ना प्लीज :)

सविता००१'s picture

23 Feb 2017 - 8:55 am | सविता००१

आवडली गोष्ट

हाहाहा! भारी उपाय शोधून काढला...! कथा आवडली.

बादवे, बाणकोटी आणि संगमेश्वरी यांच्यामध्ये काही फरक आहे का?

मंदार कात्रे's picture

24 Feb 2017 - 9:08 pm | मंदार कात्रे

नाही फारसा फरक. संगमेश्वरी जवळपास अशीच आहे . आमचा तालुका संगमेश्वर,पण आम्ही संगमेश्वर पेक्षा रत्नागिरीला जवळ आहोत

संदीप डांगे's picture

23 Feb 2017 - 10:20 am | संदीप डांगे

मस्त! रेकॉर्ड करुन टाका ना... ऐकून अजून जास्त मजा येईल..!

पिलीयन रायडर's picture

23 Feb 2017 - 11:39 pm | पिलीयन रायडर

गुड आयडीया!

ह्य उपक्रमातले सगळे लेख त्या त्या लेखकाने रेकॉर्ड करुन दिले तर मिपाच्या चॅनलवर टाकुया. तुम्ही वाचलेला लेखही लहेजासकट ऐकताना जास्त मजा आली होती.

येस्स ! प्रिमो च्या लेखावर पण सुचवलंय हे कुणीतरी. अगदी १००% अनुमोदन.

प्राची अश्विनी's picture

23 Feb 2017 - 10:20 am | प्राची अश्विनी

आवडली.

इडली डोसा's picture

23 Feb 2017 - 10:29 am | इडली डोसा

समजली आणि आवडली.

सस्नेह's picture

23 Feb 2017 - 10:51 am | सस्नेह

बाणकोटी वऱ्हाडी पेक्षा समजायला सरळ आहे.
खरं म्हणजे या सगळ्या बोलींना एक विशिष्ट जो हेल असतो, त्यासह त्या ऐकण्यात त्यांचे खरे सौदर्य आहे.

सपे-पुणे-३०'s picture

23 Feb 2017 - 11:01 am | सपे-पुणे-३०

भाऊ गोष्ट मस्त सांगितलाव !
ह्या भाषेक 'बाणकोटी' म्हनतात ह्या म्हाईती नव्हता. ही तं आमची रत्नांग्रीतली कोकणी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2017 - 11:10 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं !

या गोष्टीच्या वाचनाचे रेकॉर्डिंग करून टाका. भाषेच्या बोलण्याचा लहेजा, ठसका आणि हेल ऐकल्यावरच तिचे खरे स्वरूप नीट समजते.

वेल्लाभट's picture

23 Feb 2017 - 12:34 pm | वेल्लाभट

वा ! काय मस्त वाटतं असं वाचायला वेगळ्या बोलीतलं लिखाण

मस्त ! पडघवली वसली ती गोष्ट तरळून गेली हे वाचताना :)

किसन शिंदे's picture

23 Feb 2017 - 12:43 pm | किसन शिंदे

वैभव मांगले बोलतो ती हीच का बाणकोटी?

बाकी सुरूवातीला वाचताना गोष्ट शिवकाळातील वाटली.

पद्मावति's picture

23 Feb 2017 - 12:46 pm | पद्मावति

:) वाह, आवडली गोष्ट.

अभ्या..'s picture

23 Feb 2017 - 1:18 pm | अभ्या..

मस्त रे सूडक्या.
मालवणीपेक्षा टोटलच वेगळेय रे हे.

सतिश गावडे's picture

23 Feb 2017 - 1:22 pm | सतिश गावडे

आमची भाषा आहे ती ;)

आयला धन्या, तु पण का बाणकोटी? कधी बोलत नाहीस बे ह्या टोनमध्ये?
.
तरीच सूडक्या न तू शेजारी आहात व्हय? आत्ता समजलं. ;)

व्हय तर!! सगल्या रत्नांग्रीत तुमान्ला ह्याच सापडंल. बोलत नसलंव म्हनून काय झालां, मोप आयकलिला हाय ल्हानपनापासना. =))
जल्ली सगली आपापल्या भाषेतना लिवाय लागली मंग रत्नांग्री मांगं र्‍हावन कशी चालंल?

सतिश गावडे's picture

24 Feb 2017 - 12:01 pm | सतिश गावडे

मी तं घरी ग्याल्यावर आये बाबांशी ह्याच भाषेत बोलतो. :)

नूतन सावंत's picture

23 Feb 2017 - 5:04 pm | नूतन सावंत

मी तर लहानपणात पोचले.माझी आई,आजी शेतात कामाला आलेल्या पयऱ्यांबरोबर अशा बोलायच्या,त्यांच्याच भाषेत.त्यामुळे जे बंध निर्माण होत, ते आम्ही अजून अनुभवतो,आजोळी गेल्यावर.

नूतन सावंत's picture

23 Feb 2017 - 5:07 pm | नूतन सावंत

आणि हो,एक सांगायचंच राहिलं,माझं आजोळ गुहागर (आरे).

वरुण मोहिते's picture

23 Feb 2017 - 5:50 pm | वरुण मोहिते

खाडीजवळ असलेल्या गावांचा कारण रत्नागिरीत अजून वेगळा हेल असतो बोलायचा, बाकी उत्तम

यशोधरा's picture

23 Feb 2017 - 6:46 pm | यशोधरा

भारी लिहिलंय!

उल्का's picture

23 Feb 2017 - 8:26 pm | उल्का

मस्त!

पियुशा's picture

24 Feb 2017 - 11:54 am | पियुशा

मस्त लिहिल्य !

चिगो's picture

24 Feb 2017 - 4:02 pm | चिगो

मस्तच. आवडली.. आणि 'बाणकोटी' म्हणून बोलीभाषा आहे, हे आज पहील्यांदाच कळलं..

मंदार कात्रे's picture

24 Feb 2017 - 9:09 pm | मंदार कात्रे

खूप छान सूड काका

लईच आवडली

बबन ताम्बे's picture

25 Feb 2017 - 3:49 pm | बबन ताम्बे

मस्त वाटली भाषा.

पिशी अबोली's picture

26 Feb 2017 - 9:58 pm | पिशी अबोली

हल्लीच या बोलीच्या आसपासचे खूप नमुने ऐकणं, ग्रियर्सनमध्ये वाचणं झालं. त्यामुळे खूप छान वाटलं, आणि कुणीतरी बोलतंय अशी कल्पनापण करता आली..

मस्त गोष्ट!

साती's picture

27 Feb 2017 - 9:30 pm | साती

ही आमची भाषा बरं का!
मस्तच.
जल्ला दुसरे धर्मातले मानसास जानव्जोड घालू आपुनच बाटवायची आयड्या लय ब्येस.
हीच आंदीच्या लोकांना सुचती हारी तं कोनी बाटतां नाय हारी!

कोकणातली माणसं विशेषकरुन रायगड-रत्नागिरी भागातली भूतकाळात रमणारी, त्यांना अमक्यातमक्याच्या लग्नामुंजीतले, बारश्यातले किस्से विचारावे आणि मग किमान दीडेक तासाची निश्चिंती!! त्यामुळे तसंच काहीसं लिहायचं होतं. आणि गोष्ट सांगत असल्याचं भासवायचं होतं. त्यामुळे वर मितान म्हणत्ये तसं पडघवलीच आठवलं. त्याची सुरुवातच कथा सांगत असल्याच्या थाटात होते. पडघवली डोक्यात चमकली आणि सिद्दीची माणसं बाटवायला येत हे आठवलं, आणि हळू हळू कथा सरकत गेलॉ. कथेचा काळ शिवकाळ का वाटला हे कळलं नाही, पण मी साधारण अठरावं शतक डोक्यात ठेवून लिहायला सुरुवात केली.

बाणकोटी, संगमेश्वरी मध्ये फरक म्हणाल तर मलाही जाणवण्याइतपत दिसला नाही. वेळ मिळेल तसं रेकॉर्ड करुन पाठवेन, अगदीच जमत नाहीय असं वाटलं तर मात्र सगा सरांनी अभिवाचनाला मदत करावी ही विनंती. ;)

आडस. गाव रत्नांग्रीचा असून हि बोलता येत नाही हा खेद आहे. आमचा गाव तसा लहान. त्यात माझे आणि तीर्थरुपांचेही समवयस्क सगळे शाळेत गेलेले त्यामुळे शब्द पुस्तकी मराठीचे . हेल मात्र शिल्लक आहे. वाचन अगदी ती हेल धरूनच केलं. मजा आली.

सतिश गावडे's picture

1 Mar 2017 - 10:36 am | सतिश गावडे

मुंबईवरुन गोव्याला जाताना एकदा पेण सोडलंत की अगदी कणकवलीच्या आधीचं खारेपाटण सोडेपर्यंत ग्रामिण भागातील लोकांच्या तोंडी हीच भाषा ऐकायला मिळते. खारेपाटण सोडल्यावर मात्र हळूहळू मालवणीचा अंमल सुरु होतो. :)