मराठी भाषा दिन २०१७: चड्डाळलेला हैदोस (बुलढाणा)

Primary tabs

अॅस्ट्रोनाट विनय's picture
अॅस्ट्रोनाट विनय in लेखमाला
24 Feb 2017 - 7:01 am

1
*******************************
कथेत वापरलेली भाषा बुलडाणा जिल्ह्यातील घाटावरील बोली आहे.

बुलडाणा हे उंचावरील ठिकाण आहे (घाट).
घाट उतरल्यावर जे तालुके लागतात, तो घाटाखालचा भाग ( मोताळा, मलकापूर वगैरे तालुके). या भागाला खानदेश जवळ असल्याने इथल्या भाषेवर खानदेशी प्रभाव आढळतो. थोडक्यात, इथली बोली म्हणजे वर्‍हाडी + खानदेशी + प्रादेशिक शब्द.

घाटावरील जे तालुके आहेत (खासकरून चिखली, मेहकर), ते मराठवाड्याला जवळ आहेत, म्हणून इथली बोली म्हणजे वर्‍हाडी + मराठवाड्याच्या जालना-औरंगाबाद जिल्ह्यांतील बोली + प्रादेशिक शब्द. (कथेतील बोली हीच )

याच कारणामुळे असेल, आमच्या जिल्ह्यातील माणूस ओळखणं कठीण काम आहे. मी जेव्हा अकोला-अमरावती भागात जातो, तेव्हा तिथले लोक विचारतात - "तुम्ही मराठवाड्याचे का?" अन मराठवाड्यात जातो, तेव्हा विचारतात - "तुम्ही वर्‍हाडातले का?" Lol

या बोलीचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही नवीन माणसालादेखील समजायला आणि वाचायला सोपी आहे
*************************************************************

राऊतवाडीतली राऊत बाई आज भलतीच खुशीत होती. बऱ्याच दिवसाच्या मेहनतीचं फळ आज तिच्या समोर चमकत होतं. गेला मह्यनाभर उठता बसता, चालता बोलता, दिवसा रात्री, हे करतांना अन ते करतांना तिनं नवऱ्याचं जिणं हराम केलं, तव्हा कुठं त्यानं तिले चपलाहार घेऊन देला. कधी एकदा हार घालून बायायसमोर मिरवते आसं तिले झालं होतं. ती रात्र तिनं कशीबशी तळमळत काढली. दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र होती. सकाळचे सगळे कामं तिनं भरभर आटपले. नंतर पावभर पेंडखजूर, दुधात भिजवलेले बदाम अन साताठ अंजिरं आसा किरकोळ फराळ करून स्कूटी वर टांग टाकली अन महादेवाच्या मंदिरात पळाली.

“नवीन हार घेतला वाटतं.” राउतबाईच्या गळ्याकडं पाहंत जाधवबाई बोलली. दोघी जणी मंदिराच्या आवारात उभ्या होत्या.

“अगं हो. कालच आमच्या ह्यांनी घेतला. मी तर नाहीच म्हणत होते पण तुला तर माहीत आहे ना आमचे हे. डायरेक आण्ला अन घातला.”

“अरे वा.“ जाधवबाई पुजेचं ताट एका हातात सांभाळत दुसऱ्या हातानं मणी चाचपडायले लागली.
“चांगला आहे, पण थोडा ओल्ड फॅशन वाटतो नाही?”

“लेटेस्ट आहे ही डिझाइन” राउतबाई कुत्र्यावानी तिच्या आंगावर वसकावली. "फलाना फलाना लाखचा आहे म्हटलं हार.”

“हो का? असेल असेल. अगं मीपण घेणार होते हार, पण लेटेस्ट डिझाइन नव्हत्या ना.मग हे कानातलेच घेतले.” जाधवबाई दोन्ही कान टवकारत बोलली.

वरील प्रेमळ संभाषण बराच वेळ चाललं. लोकं दर्शनाले येत होते जात होते. कोणाचं कोणाकडं लक्ष नव्हतं. पण बाजूले बसेल भिकारी मात्र तन मन धनानं या दोघीयचं बोलणं आयकत होता.

***********************

ती रात्र अमावशा नसूनबीन भयान वाटंत होती. बंधी चिखली डाराडुर झोपेल होती. राऊतवाडीचा राखणदार आसलेलं शाम्या कुत्रं मात्र विनाकारण भुकंत होतं. कोणाचीतरी चाहूल लागताच ते गप बसलं. तिन काळ्या आकृतीयनं गल्लीत प्रवेश केला अन ते गांडीत शेपूट घालून पळून गेलं.

त्या तिन चड्ड्या राऊतबाईच्या घराजवळ आल्या. प्रत्येकानं फक्त अंडरपॅंड अन ढवळं शांडो बनेन घालेल होतं. तोंडाले भुताचा रुमाल बांधेल होता अन गळ्यात होत्या पोस्टमनच्या झोळ्या. आर्ध्या तासात किचनच्या खिडकीचे गज कापून ते घरात घुसले. राऊतबाई हिऱ्याच्या हाराचं स्वप्न, नवरा व्हाट्सअपचे मॅसेज अन पोरगं तेच्या खोलीत बिप्प्या पाहत होतं. या तिघायले त्या तिघायनं उठवलं अन किचनमधे आणून एका लायनीत बसवलं. तिन्ही चड्ड्यायच्या हातात लंबेलंबे चाकू होते, तेच्यामुळं विरोध करायचा सवालच नव्हता. लाल चड्डी समोर अन इतर दोन चड्ड्या मागं उभ्या राह्यल्या.

“तुम्ही...तुम्ही चड्डी बनयेन टोळीचे चोर हाये का?” राऊतबाईनं भितभित विचारलं

“चोर नाय, हाफ रॉबिनहूड म्हण मोटे.” लाल चड्डी गुरकावली.

“म्हंजे?”

“म्हंजे रॉबिनहूडवानी श्रीमंतायले लुटायचं पण गरिबायले पैसे वाटायचे नाय.”

“आहो साहेब आम्ही….”

“शटाप… घरात ज्यो काही माल आसंल पटापट भायेर काढायचा.”

“नाही हो काही नाही घरात. आम्ही गरीब माणसं.” राऊतबाईचा नवरा काकुळतीले येत म्हणला.

“तू चुप रे बायल्या. चाब्या बाईकडं हायेत, तू कशाले बोलतो मधात.”

चोरायनं बरीच माहिती काढलेली दिसत होती.

“अहो खरं बोलले ते. काहीच नाही आमच्याकडं.”

“आस्सं?...बरं.” लाल चड्डीनं गरगरीत ढेरीवरून एकदा हात फिरवला “पिवळ्या, जरा जलवा दाखव बरं आपला”

पिवळी चड्डी दोन ढांगांत पुढं आली अन तेनं लंबालचक सुरा पोराच्या गळ्यावर ठेवला. कोणत्याबीन बाईचा नवऱ्यापेक्षा जास्त जीव पोरात आसतो, हे वैश्विक सत्य त्या चड्डीघाल्याले मालूम होतं.

“सांग कापू का गळा येचा?”

“नाहीSS” राऊतबाईनं बेडकावानी उडी मारत उठली

“मी देते आणून थोडे पैसे.”

“थोडे?? आम्ही का तुले भिकारी वाटलो का वं? चाबी आण इकडं.”

लाल्यानं चाबी हिसकाऊन घेतली अन काळ्याकडं फेकली.

“जाय सूरत लुटून आण.” हूकूम सुटला.

काळ्यानं अंडरपॅंडीच्या पट्ट्यात बोट अडकवलं अन ताणून फटाककन सोडून देलं. चाबी फिरवत त्यो निघून गेला.

थोड्याच वेळात सगळा ऐवज आणण्यात आला.

“गायब्या, सगळं आण्लं का?”

काळाभोर रंग अन वरतून काळी चड्डी घातलेली असल्यानं त्यो आंधारात गायब होता. म्हणून साथीदार त्याले गायब्या म्हणत.

“हाव बॉस आण्ला.”

त्यानं सगळा माल डायनिंग टेबलवर रिचवला. लाल्यानं पैसे, दागिने निरखून पाह्यले. करदोड्यात बोट घालून त्यानं गरगर फिरवायले सुरवात केली. बॉस चिडलेला हाये हे बाकी दोघायनं ओळखलं.

“मोटे चपलाहार कुठे??” लाल्या लालभडक डोळे वटारत आरडला.

राऊतबा घायबरुन ततमम करायले लागली.
“च च कोणता चपलाहार. नाही ए ….ए वढच हाये.”

“आस्सं?? मग सकाळी त्यो हार गळ्यात घालून तुहं भूत फिरत होतं का?” लाल्या फुत्कारला. हवेच्या फोर्सनं तोंडावरचा रुमाल थोडसाक खाली घसरला. पिवळ्यानं पटकन पुढं हून बॉसचा रुमाल नाकावर ओढला.

“ते…तो…माझा नव्हता हार.”

“आस्सं??.” म्होरक्यानं आपला हात गरगरीत ढेरीवरून फिरवला “पिवळ्याS .”

“नाही नाही देते आणून.”
आधीचा अनुभव आठवून राऊतबाई आरडली.

“जे ब्बात. नाऊ गिव दी चपलाहार टू थ्री डॅडीज.”
राऊतबाई चुपचाप उठली अन चालत भांड्याच्या रॅकजवळ गेली. पण हार भायेर काढायचं तिचं मन काही होत नव्हतं. काही सेकंद ती तशीच पुतळ्यावानी उभी होती.

“पिवळ्याSS”

“काढते काढते.”

तिनं पटकन एक पितळचा डब्बा भायेर काढला. आत मिस्टर राऊतच्या काळ्यागोऱ्या पैशातून विकत घेतलेला चपलाहार होता. जड मनानं त्यो तिनं लाल्याच्या हातात देला.
हार पाह्यताच तिकडी भयान खुश झाली. सगळी दौलत पोस्टमनच्या झोऱ्यात कोंबूण्यात आली.

“चाला येतो. मोटे, बायल्या, आंबटशौकीन तिघायले गुडनाईट. “

“आनी हो, मागच्या बाजूले लोखंडी ग्रिलची जाळी बसवून घ्या. चोरंफिरं येणार नीत.”

तिघं जणं आले त्या भोकातून निघून गेले. ते गल्लीबाहेर पडल्यावर शाम्या कुत्र्याचं भुकणं पुना सुरु झालं.

*************************

दुसऱ्या दिवशी दरोड्याची खबर पुऱ्या चिखलीत पसरली. खूंखार चड्डी बनेन टोळीचा हा तिसरा दरोडा होता. पैशावले घायबरले, कंगाल खुश झाले. पांढरा पैसा बँकायत पळाला, काळा पैसा लपून बसला. संपादकायनं पिटाळलेले पत्रकार रानडुकरावानी बेधडक पोलीस स्टेशनात घुसले. पण शाह्यना पियसआय सकाळीच गायब होयेल होता. हवालदारायनं ‘आम्हाले काय मालूम’ बोलून बगला दाखवल्या.

**************************

गांधीनगरातल्या लालाच्या घरात आज सिरीयस मिटींग भरली होती. खोलीच्या मधोमध आसलेल्या टेबलवर कंदील जळत होता. आसं केल्यानं क्रांतिकारी आसल्याचा फील येतो, यावर सगळ्यायचं एकमत होतं. कंदिलाच्या चारी बाजूनं गल्लीतले दिग्गज जमले होते. टुकार काट्टे कोपरेकापरे धरून बसले होते.

“दुसरीकडं काय धिंगाना घालायचा त्यो घाला म्हणा, पण चड्डीगँग आपल्या गल्लीत घुसायले नाही पाह्यजे.” पशा तावातावानं बोलला.

“बरोबर हाये. आज राऊतवाडीत दरोडा पल्डा, उद्या आपल्या गल्लीत पडल. काय भरोसा. आपल्याले सतर्क राहून….”

राजू दुकानदाराचं बोलणं काटून लंगडं बाल्या जोरजोरात हासायले लागलं.

“कह्याचा पडतो दरोडान फिरोडा. सगळे भिकारचोट लोकं हायेत आपल्या गल्लीत.”

सगळ्यायच्या नजरा गर्रकन तेच्याकडं वळल्या. आंधारातून एक मजबूत पंजा भायेर आला. बाल्याचं मानगुट पकडून त्याले घराबाहेर फेकण्यात आलं.

“हा, त मी म्हणत होतो की आपल्याले सावध राह्यनं पडंल. गल्लीच्या इज्जतीचा सवाल हाय. काहीबीन झालं तरी एकबीन चड्डी गल्लीत घुसली नाही पाह्यजे.”

“बरोबर हाये.”

“सही है भिडू.”

“जे ब्बात”

उजेडात बसलेल्यायचे दुजोरे मिळाले.

“घुसले त चड्ड्या फाडून टाकू.”

“टराटर टराटर.”

“हुSSप्प”

“ये सावित्रीबाय.”

आंधारातल्यायनं माजवण घात्लं.

“लाईट लाव रे, लाईट लाव रे, हाण्तोच एकेकाले.”
सगळा बारदाणा मुकाट बसला.

“आता हा विचार करा की काय करता यील.”

सगळे जण डोकं खाजवायले लागले. रिकामटेकड्यायं आयुष्यात पह्यल्यांदा भेजाले ताण देला.

“मी काय म्हण्तो, रात्री पहारा द्यायचा का? जवान पोरायनं रातभर जागायचं अन गल्लीत हिंडायचं.” डहाके बुढ्यानं आयडीया मांडली

“अन म्हताऱ्यायनं गांडा वर करून झोपायचं? जाय तिक्डं भोक्कात.” गण्यान टेबलावर रागानं मूठ आदळली. कंदिलाची वात जरशीक थरथरली.

“गण्या गप बसतो का आता.“ पशा दरडावलं.
लालानं पशाले हाताच्या इशाऱ्यानं शांत केलं.

“गणू, गल्लीची सुरक्षितता तुम्हा जवान पोरायच्याच हातात हाये बाबा. तुह्यासारखा एकजरी मर्द आसला, त काय बिशाद हाये एकाबीन चड्डीची गल्लीत पाय ठेवायची.”

या अनपेक्षित स्तुतीनं गण्याच्या डोळ्यांत पाणी आलं, छाती अन ढेरी अभिमानानं फुगली.

“अन तसंबीन आम्हा म्हताऱ्यायले रात्रीचं जागरण जमत नाही आता.” श्रीमान डहाके बुढा जांभळी देत बोल्ला.

“फोकनीच्या, तू त रात्री बारानंतर चुपचाप फॅशन टीव्ही पाह्यतो” तोंडातून भायेर पडणारे शब्द गण्यानं कसेबसे आवरले.

आजुन थोडावेळ बारीकसारीक गोष्टीवर चर्चा झाली अन नियम ठरला की रोज रात्री प्रत्येक घरातला एक जवान पोरगं नायतर माणूस पहारा द्यायले भायेर पडंल.

**************************

पहाऱ्याची रात्र उगवली. ड्यूटीवर नेमलेला प्रत्येक जण हातात काठी, लाठी, चाकू, झाडू जे मिळंल ते घेऊन भायेर पल्डा. पशानं तेच्या खापरपंजाची छर्र्याची बंदूक आणली. सगळे रिकामटेकडे तसेबीन रोज रात्री बारालोक रस्त्यावरच टाईमपास करत. आता तेच्यात चार घंट्याची भर पल्डी. अकरा वाजायपासून आता प्रत्येक जण आळीपाळीनं गल्लीत काठ्या आपटंत हिंडायले लागला. वरतून “जागते रहोSS, झोपू नका बे SS आशा आरोळ्या, "सो गया ये समा सो गया आसमां" आशे गाणे, नाहीतं "सगळे झोपले घरात, चड्ड्या आल्या दारात", "पहारा जोमात चड्ड्या कोमात" आसे स्वसंशोधित नारे घुमू लागले. पण या दांगडूमुळं लोकायच्या झोपेचं खोबरं व्हायले लागलं. सगळ्यायनं आपल्या पोराले, नवऱ्याले, नाताले घरात बोलवू बोलवू हाग्या दम देला, तव्हा हे प्रकार बंद झाले.

पण आता इतका वेळ टाईमपास काय करायचा, हा ले मोठा प्रश्न होता. पत्ते अन क्यारम दिवसभर खेळल्यानं रात्री खेळायचा प्रश्नच नव्हता. गाणे लावून नाचता येत नव्हतं. पण गपचुप बसणं तं कोणाच्याच रक्तात नव्हतं. काहीतरी थ्रील पाह्यजे होतं, धिंगाना पाह्यजे होता. शेवटी सगळ्यायनं एक टेरीफिक खेळ शोधलाच.
गल्लीच्या एका टोकाले खंडागळ्यायचा प्लॉट रिकामा पडेल होता. तिथंच ह्यो खेळ रंगणार होता.

पहाऱ्यावरचे सगळे वीर हातातले शस्त्र सावरत प्लॉटजवळ आले. दिवसभराच्या कष्टामुळं थकलेले स्वच्छ भारत अभियानाचे शिलेदार तिथं पेंगुळत पड्ले होते. वर्णभेद न मानता काळ्या अन पांढऱ्या रंगायचे ते डुकरं एकाच जागी विश्रांती घेत होते. पुल्लानं इशारा करताच डुकरायभोवती चुपचाप येढा घालण्यात आला. सगळ्यायनं हातातल्या काठ्या लाठ्या झाडू उगारले. त्या आंधुक उजेडात एकदा सगळ्यायची नजरानजर झाली अन नरड्याच्या शिरा ताणून गण्या आरल्डा- हाणाSSS

अन त्याबरोबर सगळे जण पुऱ्या ताकतीनं वराहझुंडीवर तुटून पल्डे. या अचानक झालेल्या हमल्यानं सगळे डुकरं खडबडुन जागे झाले. पण त्यह्यले काही कळायच्या आतच दणादण दणादण काठ्या आंगावर आदळायले लागल्या, पुल्लानं एक मोठ्ठा दगड आणून धपाककन एका डुकराच्या पाठाडात हाणला. डुकरं मोठमोठ्यानं ड्रूक ड्रूक आवाज काढत वाट मिळंन तिकडं पळायले लागले. पोरं छू छू ह्याSSट हाणा हाणा आरडत बेभानपणे तुटून पल्डे. येड्या सोन्यानं लहानलहान दगडं उचलले अन हाड हाड, शुक शुक करत लांबून हाणायले लागलं. टिप्या झोपेतून खडबडुन जागं होऊन रणभूमीच्या दिशेनं पळत आलं. कडं तोडून भायेर पडलेल्या डुकराच्या पिल्लाच्या ते मागं लागलं. काही सेकंदात सगळीकडं धुरळाच धुरळा पसरला, पायाखाली चिरडलेल्या लेन्ड्यायचा वास सगळीकडं दरवळला.

बराचवेळ चाललेल्या या धुमश्चक्रीतून सगळे डुकरं मार खात खात कशेबशे निसटले. शेवटी उरलं काळ्या रंगाचं एक शेवटचं डुक्कर. सगळ्यायनं तेच्याभोवती गोल रिंगण घात्लं. हरेक जणाच्या चेहऱ्यावर खुनशी हास्य होतं. भेदरलेलं डुक्कर घशातल्या घशात ड्रूक ड्रूक आवाज काढत उभं होतं.

“घायबरलं फोकनीचं.”

“आता याले सोडू नका. खेळवा.”

“आयला ले मजा आली भो. बंधी झोप उडून गेली.”

“कमॉन गेज वी कॅन डू इट”

“गेज नाही गाईज.”

“हा तेच ते.”

“छू छू”

“ह्याट ह्याट.”

डुक्कर बिथरलं अन डेन्जर वेगात पळत आलं. त्यो आवेश पाहून येडं सोन्या बिथरलं अन घायबरून बाजूले सरकलं. डुकरानं लगेच रिकाम्या फटीतून बाहेर मुसंडी मारली. कडं तुटलं, स्वातंत्र्याच्या कल्पनेनं ते खुश झालं. पण तेवढ्यात कड्याबाहेर आंधारात लपून बसलेल्या गण्यानं डुकरासमोर उडी घेतली अन स्वतःभोवती गर्रकन घूमून पुऱ्या ताकतीनं हातातली काठी कडाSलकन त्येच्या पाठाडात हाणली. डुक्कर बाहेर आलं तेच्या डबल स्पीडनं माघारी पळत गेलं अन पुन्हा कड्यात अडकलं. सगळ्यायनं तुफान हासत गण्याले टाळ्या देल्या.

**************************

सरागेचा बंगला आज आंग चोरून गुमान बसला होता. घरातले सगळे जणं गावाले जायेल आसल्यानं त्यो अंधारात डुबला होता. रात्रपहाऱ्याचे सारे शिलेदार डुक्करबाजीत गुंग आसल्यानं रस्त्यावर काळं कुत्रंबीन नव्हतं. आंधुक उजेड फेकणारी एकुलती एक ट्युबलाईटबीन डोळे मिचकावत होती.

थोड्याच वेळात दोन नंगी पावलं दबकत दबकत बंगल्यासमोर येऊन थांबली. नाईट पॅंड अन लुज टीशर्ट घालेल त्या माणसानं तोंडावरचा रुमाल ठीकठाक केला अन ढेरी खाजवत इकडंतिकडं नजर टाकली. रस्ता साफ होता. तेनं लोखंडी गेटच्या खाच्यात पाय फसवला अन जोर लावून गपकन शरीर वर उचललं. गेट कुचकुच करत कळवळलं. दूसरी टांग पलिकडं टाकून टी शर्टनं धपाक्कन उडी मारली. पण डुक्करबाजीच्या गोंधळात त्यो आवाज विरघळून गेला. नंगी पावलं मांजरपावलायनं बंगल्याच्या पाठीमागच्या बाजूले आली. मागच्या दरवाजाले भलंमोठं कुलुप लटकत होतं. नाईट पॅंड रुमालाआडून हासली. आजुबाजुले नजर फिरवून तेनं एक दगड उचलला्. उजव्या खिशातून चाबी भायेर आली अन आरामात कुलुप खोलल्या गेलं. नंतर ते जमिनीवर फेकण्यात आलं, दगडाचे दणके बसून पोलादी बॉडीचा पार चेँदामेँदा झाला.
आत आल्यावर नाईट पॅंडनं खिशातून टॉर्च काढली. एखाद्या सराईतासारखं चालत त्यो बेडरूममधे गेला अन खिशातून दुसरी चाबी काढून तिजोरी खोल्ली. आतले सगळे पैसे (एक लाख रुपये) उचलले. पैशाच्या त्या गड्डीकडं पाह्यताच पांडेब्वा संजय सरागे उर्फ संजाच्या डोळ्यायत पाणी आलं. स्वतः कमवलेले (अन खाल्लेले) पैसे त्याले बायकोले आणून देणं पडत होते. एकेक रूपयाचा हिशोब देणं लागत होता. पण हिशोब देता येत नाही आसे काही पुरुषी खर्चबीन आसतात, हे तिले कोण कोण सांगणार?

शेवटी संजानं एक प्लॅन बनवला- स्वतःच्याच घरात चोरी करायचा. आधी तेनं तिजोरीची डुप्लिकेट चाबी बनवून घेत्ली. नंतर “मी ऑफिसच्या कामासाठी दोन दिवस अकोल्याले चाललो” आसं सांगून बायको अन पोरीले सासुरवाडीले पाठवलं. स्वत: चिखलीतच मित्राच्या इथं थांबून रात्री भायेर पल्डा. सगळे पोऱ्हं डुकरं हाणण्यात बिझी झालेले पाहून घरात घुसला.

संजानं पैशाच्या गड्डीची पप्पी घेतली अन खिशात कोँबली. तिजोरी उघडीच ठेऊन त्यो मागच्या दरवाजातून भायेर आला.

आल्या मार्गानं वापस जाण्यात आता धोका होता, कारण समोरच्या घरातलं डहाके बुढं फॅशनेबल कार्यक्रम पाहून भायेर आलं होतं. आता हे मुतंल, मंग कमीत कमी एक सिगरेट फुकल अन शेवटी सहन न झाल्यानं ख्याक ख्याक करून खोकलंल, हे संजाले माहीत होतं. एवढा वेळ थांबणं तेले पुराणार नव्हतं, कारण एकदा का पोऱ्हं वापस आले की मग संजाच्या भुतालेबीन त्यह्यनं भायेर पडू देलं नसतं.

संजानं पटकन निर्णय घेतला अन बंगल्याच्या पाठीमागं आसलेल्या शिडीवरून चढून टेरेसवर आला. रक्षक टोळीचा आवाज आता जवळून यायले लागला, पण ते संजाले पाहू शकत नव्हते. तेनं एक मोकळा श्वास घेतला अन लांबवर नजर फेकली. एकाले एक जोडलेल्या गच्च्या नजर जाईन तिथलोक पसरेल होत्या. संजाची गच्ची त्यामानानं जरा उंच होती.

“पलिकडच्या ठेंगच्या माडीवर पोचलं की टेन्शन नाय. मग पटापट गच्च्या पार करून पलिकडच्या गल्लीत जाऊ अन मित्राच्या घरात घुसू.” संजानं मनात विचार केला.

पुढच्या दोनच मिनटात त्यो केबलले लोँबकळत अन भिंतीले घासत ठेंगच्या गच्चीवर पोचला. आता समोरचा रस्ता मोकळा होता, सोपा होता. संजानं खुश होऊन स्वतःची पाठ थोपटली. त्याले डिशच्या छत्र्यायले, धुणं वाळवायच्या दोऱ्यायले, सिंटेक्सच्या टाक्यायले, संडासच्या पायपायले आरडू आरडू सांगा वाटत होतं की मी सुटलो मी सुटलो. त्यानं पुन्हा एकदा खिशातून पैशाची गड्डी भायेर काढली. त्या हिरव्यागार गड्डीकडं पाह्यता पाह्यता त्यो काय प्यायचं, काय पाहायचं, कुठं बसायचं, कुठं झोपायचं आशा कल्पना लढवत गुंतला अन अचानक………….

इतका वेळ आयकू येणारा रक्षक टोळीचा आवाज थांबला. संजा भानावर येऊन मागं वळला. समोरचं दृश्य पाह्यताच तेचं बंधं आंग बधिर झालं. आंधारात उभे आसलेले दोन डोळे तेच्याकडंच रोखून पाहत होते. संजा अन समोर उभं आसलेलं डुक्कर, दोघायलेबीन काय करायचं सुचलं नाही अन दोनच सेकंदात क्षितीजातून सुर्य भायेर पडतो तेच्या हजारपट वेगानं मोकाट सांडायची टोळी तुफान आवाज करत ठेंगच्या गच्चीवर उगवली. संजा विजेच्या वेगानं सिंटेक्सच्या टाकीमागं लपला.

“अरे ते कोण हाये?“ गिरीशगुंड संजा आधी उभा होता तिकडं बोट दाखवत बोलला.

“कुठं कोण?”

“मले कोणतरी दिसलं आंधारात.”

समोर उभ्या आसलेल्या डुकरानं ड्रूक ड्रूक केलं. जणू ते म्याबीन पाह्यल म्याबीन पाह्यलं म्हणत होतं.
सगळे जणं डोळे ताणू ताणू पाहायले लागले. इकडं टाकीमागं लपलेल्या संजाची पारपूक झाली. गिरीश गुंडानं एखादी गोष्ट धरली त त्यो पिच्छा सोडत नाही हे त्याले माहीत होतं. आशा स्थितीत जर त्यो धरल्या गेला त मोठी पंचाईत झाली आसती. पैसे गेले आसते, नाचक्की झाली आसती अन बायकोच्या हातचे फटकेबीन भेटले आसते. त्याले लवकर काहीतरी करणं भाग होतं. जर त्यो पळाला आसता त आंगावरच्या कपड्यावून सगळ्यायनं त्याले ओळखलं आसतं.

“मले कोणीच नाही दिसलं.”

“मलेबीन नाही.”

सगळ्यायनं नकारघंटा वाजवली.

“मले दिसलं, मले दिसलं.” येडं सोन्या टाळ्या पिटंत चित्कारलं

“कुठे? कुठे?”

“तेकाय समोर.” येड्यानं समोरच्या डुकराकडं बोट दाखवलं.

दोन जणायनं सोन्याले आल्लद उचललं अन खाली उतरून नाऱ्याच्या गोबरगॅसच्या टाकीत बुडवलं
एवढ्या टायमात संजानं टीशर्ट अन नाईट पँट काढून टाकली होती. आता त्यो फक्त लाल अंडरपॅंड अन शांडो बनेनवर होता. तोंडाले बांधलेला रुमाल त्यानं आजुन घट्ट बांधला अन पैशाची गड्डी उजव्या मुठीत पक्की पकडली.

“चाला समोर जाउन पाहू कोणी हाये का.” गुंड्यानं आगेकुच केलं…अन त्याचक्षणी सिंटेक्सच्या टाकीमागून अर्धनंग्या संजानं जोरात उसळी घेतली अन वाघ मागं लागल्यावानी विरुद्ध दिशेले पळायले लागलं.
या अनपेक्षित प्रकारानं भांभावुन जाउन सगळे जणं ब्रेक लागल्यावानी जागीच थबकले.

“अरे त्यो चड्डी बनेन टोळीचा बॉस दिसतो, धरा त्याले.” कोणतरी आरडलं

“आक्रमणSSS”

अन हल्याबैलायची ती आख्खी फौज भणाण आवाजात चिल्लावत संजाच्या मागं धावायले लागली. गण्यानं जाताजाता डुकराच्या पाठाडात एक जोरदार लाथ घातली.

संजा मागं अजिबात वळून न पाह्यता पुऱ्या ताकतीनं पळत होतं. ऑफिसात पैसे खाताना धरल्या गेलं अन पोलीस मागं लागले त सराव पाह्यजे म्हणून ते रोज पळायचा सराव करायचं. हीच तालीम आता कामात पडत होती. आंगावरचे कपडे कमी झाल्यानं त्याले एकदम खुल्लं खुल्लं वाटायले लागलं होतं. संध्याकाळीच मालिश करेल आसल्यानं तेल लावेल आंग चमकत होतं.

पाठलाग करणारे पोट्टे हातातल्या काठ्या उगारुन गजब आरडाओरडा करत चड्डीफाड़ वेगानं दौडत होते. त्यह्यचं फक्त एकच लक्ष होतं - लाल चड्डीले धरायचं अन तेचे उरलेसुरले कपडे फाडून हागूस्तर हाणायचं.

माड्या एकाले एक जोडेल होत्या. सगळी टोळी एकामागोमाग एक गच्ची पार करत पळत होते. काही जणं पळत कमी होते अन बोंबलत जादा होते. ही टोळधाड ज्या ज्या घरावरून पळत होती, त्या घरातले लोकं दचकून उठत होते, कमजोर दिलाचे पलंगावून खाली पडत होते. दादा कोंडकेनं जर जेम्स बॉन्ड सिनेमा बनवला आसता, तर त्यातला पाठलाग जसा दिसला आसता तसा हा नजारा होता. सगळ्या पोरायच्या दोनचार गच्च्या मागं लंगडं बाल्या अन तेच्या एक गच्ची पुढं मोटं सुम्या पळत होतं. लंगड्यानं कटाळून दोनचार दगडं उचलले अन संजाच्या दिशेनं फेकले. पण लग्नात जसं मागं बसलेल्यायच्या अक्षदा नवरदेव नवरीले न लागता समोरच्या माणसाले लागतात, तसेच लंगड्यानं मारेल दगडं मोट्या सुम्याले लागले. सुम्यानं खिजुन मागं पाह्यलं अन दातओठ खात ते लंगड्याच्या मागं लागलं.

संजा मुंडेल्यायवरून फटाफट उड्या मारत होतं. बाकीच्यायसारखी प्यांड फाटायची त्याले भिती नव्हती. तेनं पळता पळता मागं नजर टाकली. हाग्यावेताळायची टोळी जवळ आली होती. सगळ्यायत पुढं होता पशा. चियरिंग द्यायले पोरं बोंबलत होते
“कमॉन पशा. धर त्याले धर.”

“पकडा पकडा हाणा.”

“छू छू छू”

“हुर्र हुर्र”

पशाले दुप्पट जोर चढला. पायाच्या भिंगऱ्या जोरात फिरायले लागल्या. अन काही सेकंदातच तेच्यातलं अन संजातलं अंतर कमी झालं. पाठीमागचा जल्लोष आजुन वाढला. शिट्ट्या वाजायले लागल्या.

आता फक्त एक गच्ची अंतर उरलं…. आर्धी गच्ची उरलं.
संजानं ऑलिंपिकमधले धावपटू कशे पळतात ते आठवलं अन ढेरी दाबून, छाती पुढं काढून टांगा फेकायले सुरवात केली.

अंतर पुन्हा वाढलं. आता फक्त चारपाच गच्च्या उरल्या होत्या. त्या पार केल्या की पलिकडच्या गल्लीत उडी मारता येणार होती. मग आंधाऱ्या गल्लीत घुसून गायब होता आलं आसतं. पण पशाबीन कच्च्या गोट्या खेळेल नव्हता. चार टाईम सनान खाऊन अन दिवसभर होबासक्या करून तेच्या आंगात ले रग जमा होयेल होती. ती इतक्या सहजासहजी जिरणार नव्हती. दातओठ खात तेनं शेवटचा गेअर टाकला. अंतर पुन्हा कमी व्हायले लागलं.

आता फक्त दोन गच्च्या उरल्या होत्या. संजान मागं पाह्यलं अन भितीनं तेचे आंजरपिंजर थरथरले…पशा जवळ पोहचलं होतं. संजानं वेग वाढवायचा प्रयत्न केला पण तेची लिमिट आता संपली होती.

“धरलं धरलं”

“ह्याSSट... छू छू छ्वॉ.”

“ पशा धर त्याले, तुले संगीची शप्पथ.”

“संगे पळ संगे पळ”

“पशा पशा पशा”

आशा शेकडो आरोळ्या एकाचवेळी घुमायले लागल्या. पण पशाचे कान सुन पडले होते. अर्जुनाले जसा पोपटाचा एक डोळा दिसत होता, तसंच त्याले याक्षणी फक्तन फक्त लाल चड्डी दिसत होती.

शेवटची एक गच्ची उरली, तसं त्यो संजाच्या आजुन जवळ पोचला. फक्त काही पावलायचं अंतर उरलं अन पशानं हनुमान उडी घेऊन संजाचं बखोटं पकडलं. पण तेल लावेल चोपड्या आंगावून पशाचा हात सटकला अन संजाची उडी पलिकडं फेकल्या गेली. पाठोपाठ कडम, धपाSक आवाज आला.

सगळ्यायनं मुंडेलीच्या खाली वाकून पाह्यलं.
साताठ फुट खाली टिनाचा संडास होता अन तेच्या छतावर संजा कण्हारत पडेल होता. नोटायची गड्डी उचलून त्यो उभा राह्यला. सगळे जणं थोबाडावर शिकार निसटल्याचे भाव घेऊन उभे होते. खाली उडी मारायचा कोणाच्याच गांडीत दम नव्हता. संजा त्या सगळ्यायकडं पाहून फिदीफिदी हासला, डोनाल्ड डकवानी डान्स करून तेनं वाकुल्या दाखवल्या.

नंतर संडासच्या पायपाले पकडून त्यो आरामात खाली उतरायले लागला.
पशानं खापरपंजाची बंदूक खांद्याले लावली अन नेम धरला. संजा पायपाले ढेरी घासत खाली उतरत होता.

“सपाक S”

आंधारात चमकणाऱ्या लाल पार्श्वभागावर छर्रा घुसला. संजा कोलमडून खाली पडलं. पशानं दुसऱ्यांदा नेम धरला हे पाहून त्यो विजेच्या वेगानं आंधाऱ्या बोळीत गायब झाला.

**************************

अपेक्षेप्रमाणं भल्या पायठच संजाले फोन आला. तिन घंट्यात त्यो बायको अन पोरीले घेऊन घरी पोचला. आतालोक तेच्या घराभोवती पुरी गल्ली गोळा होयेल होती. गर्दीतून सेलिब्रेटीवानी रस्ता काढत सगळेजणं घरात घुसले. आत साताठ गल्लीवाले आधीच येऊन बसेल होते. हॉलमधल्या पन्नास इंची टीव्हीवर क्रिकेटची मॅच चालू होती.

“संजूभाऊ, पाहा बरं कायकाय चोरीले गेलं?”
सोप्यावर पाय पसरून बसलेल्या लालानं ऑर्डर सोडली.

मिसेस संजय पळत बेडरूममध्ये गेली. संजा किचनमध्ये आला. दरवाजा लावून आधी तेनं पोटभरून हासून घेतलं, दादा कोंडके स्टाइलनं मायकल जॅक्सन डान्स केला. प्लॅन सक्सेसफूल झाला होता. थोडे संकटं आले, पण हरकत नव्हती.

“अरे देवाSS बंधे पैसे चोरीले गेले रे बापा.काय करू रे देवाSS” अपेक्षेप्रमाणं बाहेरून इवळायचा आवाज आला. हॉलमधला टीव्ही बंद झाला. संजानं पुन्हा एकदा हासून घेतलं, नंतर सिरीयस चेहरा करून हॉलमध्ये आला. तेची बायको जमिनीवर फतकल मांडून बसेल होती.

“कोण्या XXघाल्यानं चोरी केली रे बाप्पाSS”

“वहिनी, चड्डीबनेन टोळीवाला होता त्यो.” कोणतरी तोंड मारलं

“त्या मेल्याचं म्हसनात मडं जावो, तेची बायको रंडी बनो. तेचे पोऱ्हं…”

“बस झालं शोभे. कशाले जास्त शिव्या देती. म्हण्जे…आता जे गेलं ते वापस थोडी येणार हाये न” संजा रडवल्या आवाजात बोलला.

“भाभी कित्ते पैसे चोरीको गये?” आयजानं घसा खाकरत विचारलं

“सगळे गेले रे बापाSS”

“सगळे बोले तो किती?”

“ले मोठे होते नSS रे भो SS”

“ तरी कितीक होते? दो लाख चार लाख”

“इतके कुठून आले गरीबाकडं?”

गर्दीतून फिदीफिदी हासायचे आवाज आले.

आयजा पुढं काही विचाराच्या आत संजानं सनSकन तेच्या कानाखाली वाजवली.

“तू काय सिआयडी ची औलाद हाये करे फोकनीच्या? कशाले करून राह्यला एवढ्या चांभारचौकशा?”

तेवढ्यात सिद्धी “पप्पा पप्पा” आरडत डुप्लेक्सच्या जिन्यावरून खाली आली.

“बोल बेटा”

“पप्पा आपल्या वरच्या बेडरूममधला टीव्ही कुठे?”

संजा पळत वरच्या खोलीत गेला. नेहमी भिंतीवर आसलेला छोटा टीव्ही गायब होता. त्यानं पुन्हा पुन्हा चाचपडून पाह्यलं, पण टीव्हीची जागा रिकामी ती रिकामीच राह्यली. संजा पाय गाळून मटकन खाली बसला. काही मिन्टं गेले का सेकंद माहीत नाही, पण वर नजर गेली तव्हा खोलीचा दरवाजा बंद होता अन संजाच्या समोर, कमरंवर हात ठेवून गिरीश गुंड (गिगु) उभा होता.

“म्या घेतला तूहा टीव्ही.” त्यानं मी तुहं चॉकलेट घेतलं एवढ्या सहजपणे सांगून टाकलं.

संजानं रागानं उठून तेची कॉलर पकडली.
“वाटलंच होतं मले तू दुश्मनी काढशील म्हणून. सांग हरामखोरा, टीव्ही अन पैसे कुठे. सांग”

“टीव्ही मह्या घरी हाये पैसे मालूम नाही.”

“तू आसा नाही आयकणार. पोलीस स्टेशनात कंप्लेंटच ठोकतो तुही. खडी फोडायलेच पाठवतो तेच्या मायला. टिव्ह्या चोरतो, तिजोऱ्या फोडतो लोकायच्या. आता पाह्यच तू मजा.” संजानं खिशातून मोबाईल बाहेर काढला.

“मित्रा, फोन गिन नंतर लाव. आधी मह्याकडून हे गिफ्ट घे. तुह्या काळजीमुळं घेऊन आलो” गिगुनं हातातली बामची बाटली समोर केली.

“हे काय हाये?”

“बामची बाटली…गांडीवर चोळायले कामात येईन. तू एवढ्या वरून खाली आदळला, वरून पशाचा छर्रा. ले लागलं आसंल नं?”

संजाची बत्ती गुल झाली.
“तू…तू…तूले कसकाय मा…मा..मालूम ?”
“तुहे कपडे सापडले मले सिंटेक्सच्या टाकीमागं. म्या लगेच शाळा ओळखली. तिकडं सगळे पोऱ्हं तूह्या मागं लागले अन इकडं मी घुसलो बंगल्यात. घरचा टीव्ही खराब झाल्ता म्हणून ह्यो काढून नेला मी.”

“………”

“टेन्शन घ्यायचं नाय.तू महा राज सांगू नको, मीबीन तुहा सांगणार नाही. फिट्टमफाट.”
संजानं नंदीबैलावानी बुगुबुगु मान हालवली.

**************************

'बहादुर गांधीनगर वाल्यांनी केला चड्डी बनीयेन टोळीवर हमला'

'जागरूक नागरिकांच्या सतर्क पहाऱ्याला मिळाले यश'

'गांधीनगरवासियांचा एल्गार, प्रशांत माळोदेने केला चड्डीवर वार'

अशा नानाविध बातम्या पेपरायत छापून यायले लागल्या. प्रत्येक खबरीत गल्लीतल्या लोकायचा ग्रुप फोटो छापून यायले लागला. काही पेपरायनं काउबॉय हॅट घातलेल्या अन खांद्यावर बंदूक घेतलेल्या पशाचा फोटो चौकटीत छापला. चिखली केबल नेटवर्कवरनं सगळ्यायच्या मुलाखती दाखवल्या.

पोरगी द्यायले काचकूच करणाऱ्या पशाच्या मामानं संगीसोबत तेचं धडाक्यात लग्न लाऊन देलं.

गांधीनगर वाल्यायपासून प्रेरणा घेऊन पुऱ्या गावात पहारे सुरु झाले अन चड्डीबनेन टोळी चिखलीतून कायमची गायब झाली.

***********************
समाप्त
***********************
1

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

24 Feb 2017 - 8:25 am | प्राची अश्विनी

:):):)सही!!!!

एस's picture

24 Feb 2017 - 8:43 am | एस

अगगगग! लै भारी!

प्रीत-मोहर's picture

24 Feb 2017 - 12:50 pm | प्रीत-मोहर

Lol
लयच भारी की हो

पैसा's picture

24 Feb 2017 - 1:03 pm | पैसा

भयंकर, तुफान, बेक्कार, बेफाट!!! चौफेर फटकेबाजी केलीय. मिरासदारांची आठवण यावी इतकं सही जमलंय. याचं पण अभिवाचन येऊ द्या! जाम मजा येईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Feb 2017 - 1:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

खी खी खी !!!

ह्ये खाल्चं बार बाकी लै भारी...

खोलीच्या मधोमध आसलेल्या टेबलवर कंदील जळत होता. आसं केल्यानं क्रांतिकारी आसल्याचा फील येतो, यावर सगळ्यायचं एकमत होतं.

"सगळे झोपले घरात, चड्ड्या आल्या दारात", "पहारा जोमात चड्ड्या कोमात"

नाईट पॅंड रुमालाआडून हासली.

त्याले डिशच्या छत्र्यायले, धुणं वाळवायच्या दोऱ्यायले, सिंटेक्सच्या टाक्यायले, संडासच्या पायपायले आरडू आरडू सांगा वाटत होतं की मी सुटलो मी सुटलो.

ऑफिसात पैसे खाताना धरल्या गेलं अन पोलीस मागं लागले त सराव पाह्यजे म्हणून ते रोज पळायचा सराव करायचं.

एकुलता एक डॉन's picture

24 Feb 2017 - 1:53 pm | एकुलता एक डॉन

शीर्षक बदला हो
मचाक चा फील येतोय

संदीप डांगे's picture

24 Feb 2017 - 10:09 pm | संदीप डांगे

मचाक काय असतं?

वरुण मोहिते's picture

24 Feb 2017 - 2:28 pm | वरुण मोहिते

जमलय!!!

चिनार's picture

24 Feb 2017 - 4:46 pm | चिनार

भन्नाट कथा !!
लिहित रहा....

बबन ताम्बे's picture

24 Feb 2017 - 5:52 pm | बबन ताम्बे

मस्त कथा. आवडली.

आनंदयात्री's picture

24 Feb 2017 - 8:49 pm | आनंदयात्री

हा हा हा! मजा आली वाचायला. खतरनाक जमून आलीये कथा.

Nitin Palkar's picture

24 Feb 2017 - 8:56 pm | Nitin Palkar

झक्कास जमलय.

चावटमेला's picture

25 Feb 2017 - 1:20 am | चावटमेला

एक नंबर!!!!

बर्‍याच दिवसांनी इतका खळखळून हसलो!!!

एका's picture

25 Feb 2017 - 2:13 am | एका

राऊतवाडी, गांधीनगर, कथेतील पात्र, बंगला तो TV सर्व परिचयाच असल्यामुळे वाचतांना जे सुखद धक्के बसले ते खरच अवर्णनीय... बर्याच दिवसांनी एवढा दिलखुलास हसलो.

एका's picture

25 Feb 2017 - 2:13 am | एका

राऊतवाडी, गांधीनगर, कथेतील पात्र, बंगला तो TV सर्व परिचयाच असल्यामुळे वाचतांना जे सुखद धक्के बसले ते खरच अवर्णनीय... बर्याच दिवसांनी एवढा दिलखुलास हसलो.

एका's picture

25 Feb 2017 - 2:14 am | एका

राऊतवाडी, गांधीनगर, कथेतील पात्र, बंगला तो TV सर्व परिचयाच असल्यामुळे वाचतांना जे सुखद धक्के बसले ते खरच अवर्णनीय... बर्याच दिवसांनी एवढा दिलखुलास हसलो.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

26 Feb 2017 - 1:56 pm | अॅस्ट्रोनाट विनय

सर्वांना कथा आवडली याचा आनंद आहे Smile

अनुप ढेरे's picture

26 Feb 2017 - 5:10 pm | अनुप ढेरे

मस्तं!

बोबो's picture

26 Feb 2017 - 7:05 pm | बोबो

लै भारी

मित्रहो's picture

26 Feb 2017 - 8:40 pm | मित्रहो

मजा आली
बारदाण हा शब्द मराठवाड्यातला , चिखलीतल्या भाषेवर मराठवाड्याचा प्रभाव आहे हेच सांगनार.

अॅस्ट्रोनाट विनय's picture

27 Feb 2017 - 12:48 am | अॅस्ट्रोनाट विनय

बरोबर ओळखलं मित्रहो.

शेतीचा माल भरून ठेवण्यासाठी जे पोते असतात ते एकाच प्रकारचे नसतात. विविध आकाराचे, चांगले-फाटके, मजबूत -कमजोर पोते यांना एकत्रितपणे बारदाणा/बारदाण म्हणतात.
याचप्रकारे नानागुणांचे लोक एकत्र आले की त्यांना बारदाणा म्हणतात.

हे वाक्य पहा:
काय बारदाणा जमला बे. (बारदाण मराठवाड्यात प्रचलित तर बे शब्द वर्हाडित.)
थोडक्यात वर बोलल्याप्रमाणे घाटावरची भाषा = मराठवाड्याची भाषा + वर्हाडी + प्रादेशिक शब्द