मराठी भाषा दिन २०१७: सौदा (कोल्हापुरी)

सस्नेह's picture
सस्नेह in लेखमाला
27 Feb 2017 - 6:49 am

1
वडगाव (बुद्रुक), कारखानावालं, आसलं जंक्शन नाव वडगावला कुणी दिलं, कुणाला ठावं. यष्टीच्या बोर्डावर काय ते मावत नव्हतं. तालुक्याला जाणाऱ्या शेवटच्या यष्टीनं गावकुसाबाहेर पडताना झाम्मदिशी यू टरन घेतल्याबरुबर यष्टीच्या लायटीचा उजेड नदीकडच्या उतारावरच्या देशी बारच्या दरवाजातून आत शिरला आन भिताडापशी वळीनं मांडल्याल्या बाटल्या हिरकणीसारक्या झागमाग करून गेल्या. यष्टीनं जणु धक्का दिल्यागत लगोलग मावळतीकडनं साकर कारकान्याचा भोंगा भ्यां करून आरडाय लागला.

चुलीजवळनं उटून गुत्त्याची मालकीन सावाक्कानं बसल्या जाग्यावनंच दाराकडं फुडा केला आन बारक्याला हाळी मारली.

‘’ये बारक्या, लायटी पेटीव रं , गिरायकाची येळ झाली !’

बारक्याचं सावट दिसंना तशी तिनं चुलीपसनं बूड उचललं आनी ती भायेरच्या खोलीत गेली. खोली कसली, सोप्यालाच दोन बाजवांनी तट्ट्या मारल्याला आन तिसऱ्या बाजूला टेबलावर फळी टाकून कौंटर आनी गल्ला मांडल्याला. फळीवर चार पाच बरण्यातनी भडंग, फरसाण, खारी डाळ आसला चकणा भरून ठेवल्याला. समूर आर्द्याला जास्ती जाग्यात पाच सा टेबलं मांडल्याली. तेच्या भवताली बाकडी. बाकडी अशासाटनं की, खुर्च्या ठेवल्यावर पिऊन उटताना गिरायक खुर्चीसकट पडू नये.

सावाक्कानं भिताडावरली लायटीची बटनं खटाटा खालवर केली. त्यासरशी सोप्यात दोन टूबांचा चकचकीत उजेड पडला. दारात यून तिनं डोळ्यावर हात धरून लांब अंधुक दिसतेल्या कारकान्याच्या फाटकाकडं नदर पोचती का आदमास घेतला. नुसताच दाटत आल्याला अंधार डोळ्यात घुसला. कायबी दिसंना, तशी ती आत वळली. मागल्या खोलीतला बल लावून परड्याच्या दारातनं भायेर आली. बारक्या आन संब्या तितं बिडीचा धूर काडत हुबं आसल्यालं बगून तिनं खालचा दगुड उचलला.

‘मुडद्यानु, हितं उलातलायसा व्ह्य ? चला बगू हाटिलात, गिराईक चालू हुईल आता !’

त्यासरशी दोगं हातातल्या बिड्या टाकून पळाली. बारक्यानं कोपऱ्यात झाकून ठेवल्याल्या भगुन्यातलं टप उचललं आनी मोकळ्या बिस्लेरीच्या बाटलीत मोसंबीची धार धरली. संब्यानं भरलेल्या दोन बाटल्या हातात उचलल्या आनी तो सोप्यात गेला.

सावाक्कानं चूल शांतवली चुलीवरली भांडी झाकून ठेवली आनी ती भायेर आली. तिनं साईबाबा आनी भैरोबाच्या फोटूच्या कोपऱ्याला उदबत्त्या खोचल्या आनी कौटरमागल्या खुर्चीत जाऊन बसली.

रामुनाना चार वर्सामागं महापुराच्या लोंढ्यात गप झाला तवापास्नं सावाक्काच गुत्ता संबाळायची. तवा रामुनाना आन सावाक्कासारकं चकोट जोडपं आख्ख्या गावात दुसरं नव्हतं. दरवर्षी काचरीच्या पुरात उडी घालून नारळ देणारा त्यो एकटाच गडी गावात. पोटाला प्वार न्हाई म्हनून भर पुरातनं पवत नदीपल्याड जाऊन दरवर्षी भैरोबाला नारळ द्यून याचा. खरं त्यो आसा देखारेखी गेल्यावर सावाक्काला त्येचाच कामधंदा, म्हंजे ह्यो गुत्ता चालीवन्याबिगर दुसरा काय रस्ता सुधरंना. पन्नाशीची बाई. नाकीडोळी ठसठशीत आनी तेवडीच हिम्मतवान. हातात पा-पाच तोळ्याच्या पाटल्या, बिल्वर आन बोटात हिऱ्याच्या दोन, सोन्याच्या दोन आन नवरत्नाची एक आश्या पाच आंगठ्या घालून गल्लावर बसली म्हंजी आक्षी हिरकणीवानी चमकायची. पोटच्या पोरावानी संबाळलेल्या संब्या आन बारक्याला हाताशी धरून ती नेकीनं गुत्ता संबाळीत हुती.

सावाक्का गल्ल्यावर जाऊन टेकली न टेकली तवर दारातनं बजाबा आत आला.

‘का आक्का, काय काय जुळणी आच्ची ?’

‘चाललंय की ! भिशीची पारटी जनु हितंच करत्यात काय की, कामगार ! म्हनून जादाची भट्टी जोडलीया.’

बजाबा गुमान जाऊन कडंच्या टेबलावर एकटाच बसला.

गिरायकं याला चालू झाली तशी बारक्या आनी संब्याची आतबाहेर गडबड चालू झाली. आर्दा घटका गेला आनी भाईर मोटरसायकलीचा फटार्रर्र फाट फाट आवाज आला. मोटरसायकलीची किल्ली बोटाभवती खेळवत शंकऱ्या मुकादम आत आला. आत यून त्येनं सोप्यात नदर फिरवली. बजाबा दिसला तसा त्यो नीट गेला आन बजाबाच्या फुड्यात जाऊन बसला. शंकऱ्या सुपर व्हायझर. त्येला बाकी कामगारांच्याजवळ बसायला कमीपना वाटायचा.

‘काय बजा, आज लौकर ?’ शंकऱ्यानं कोपऱ्यात पानाची पीक टाकली.

‘व्हय जी, जरा काम हाय राती शेताव राकनीचं म्हंताना लौकरच आवरायलोय.’ बजा म्हनाला.

शंकऱ्यानं गुत्त्यावरून नदर फिरवली. त्येला आज कायतरी नूर येगळाच दिसला गुत्त्यात. न्हेमीपरमानं सावाक्का गल्ल्यामागं बसल्याली दिसत न्हवती. संब्या आनी बारक्याबी आतच हुतीत. दोन-चार गिराईकं गप गलास घ्यून बसल्याली. आतनं सावाक्काचा घाबऱ्याघुबऱ्या दबक्या आवाजात आरडा ऐकू येत हुता.

‘आरं, नीट हुडीक जरा कोपऱ्यात. साळुता मार तिकडल्या कोपऱ्यात आनी एक डाव !...’

‘ये संब्या, बगत काय हुबारलाईस ? तितं टेबलाखाली बग वाकून, हाय काय !’

‘आरं, कपाटात काय तुज्या बाचं गटूळं ठिवलय व्हय ? पल्याड बग, फरशीवर !’

कायतरी हुडकायचं काम चालल्यासारकं दिसत हुतं जनु. चार हाका मारूनबी संब्या, बारक्या कोनच यीनात म्हंताना शंकऱ्या जाग्यास्नं उटला आनी दारापत्तर ग्येला. अर्धवट उघड्या पडद्यातनं आत नदर टाकून त्येनं आवाज दिला, ‘ये संब्या !’

‘आलो, आलो..’ संब्या टेबलाखालनं मुंडी भाईर काडून वरडला.

‘काय सावाक्का ? काय चाल्लंय म्हनायचं ?’

आतल्या खोलीच्या दारापस्नं हातभर आत चवड्यावर उकिडवी बसून सावाक्का खोलीभर टकाटका बगत हुती, ती चपापल्या वानी झाली. ‘कुटं काय ? ह्ये आप्लं रोजचंच की ! बसा, बसा, देतो लावून त्येला.’

ताटदिशी हुबी ऱ्हावून ती तरातरा गल्ल्याव जाऊन बसली. शंकऱ्या आत बघत बघतच टेबलाव जाऊन बसला.

संब्यानं यून टेबलावर बाटली ठेवली आन त्यो शंकऱ्याला म्हनाला,

‘आन्ना, मालकीनबाईंनी उधारी आज भरायला सांगिटल्या.’

शंकऱ्यानं भिवया उचलून संब्याकडं एक डाव बगिटलं.

‘भरू म्हनं सावकास ! तिच्या मायला, कुटं दोन हजार म्हंजी लाक-दोन लाखाचा खजिना असल्यागत करायलाईस की ! जा, फुटानं आन जा जरा !’

संब्या मान खाली घालून माघारी फिरला.

‘आयला, लैच म्हातारी टिवटिव कराय लागली की ! व्हय, बजा ?’ शंकऱ्या डोळे वटारून बोलला.

‘’न्हाईतर काय, मालक ! उतरून ठिवायला पायजे तिला जरा !’ बजाबानं शंकऱ्याची री वडली.

बजाबा म्हंजे गावावर ववाळून टाकल्यालं ब्येनं . ईन-मीन पंचवीस वय खरं, महा इब्लिस, बारा भानगडीचा गडी ! खोड्या काडन्यात आनी कलागती लावन्यात तेचा हात कोण धरनार नाय. घरची बरी शेती, बा आन थोरला भाऊ बगायचा. बजा हुशार म्हनून तालुक्याला कालिजात जाऊन बारावी शिकला. फुडंबी शिकला आस्ता, खरं, त्येची उंडगेगिरी बगून कालिजातल्या प्रोफेसरांनी एकसाथ ठराव करून त्याला कालिजातनं हाकलला. तवापासनं भैरोबाचा वळू सोडल्यागत त्यो गावात नुसता फिरायचा.

संब्यानं इंगळागत लालभडक दिसत्येलं बरणीतलं वटानं-फुटानं बशीत घालून टेबलावर आनुन ठेवलं आनी त्यो माघारा वळनार येवड्यात शंकऱ्याची थाप त्येच्या खांद्यावर पडली.

‘ये संब्या, काय चाललंय रं आत ? धांडोळा कसला घ्यालायसा ?’

संब्यानं गल्ल्यावर बसलेल्या सावाक्काकडं एकडाव नदर टाकली आन त्यो हळूच म्हनला, ‘मालकीनबाईंची आंगटी..तिच्यातला खडा पडलाय कुटंतरी. मगाधरनं हुडकाय लागलोय, कुटं गावंना झालाय..’

‘काय सांगतुईस ? कसला खडा आनी कदी पडला म्हनं ?’ शंकऱ्याचं डोळं बारीक झालं.

‘दुपारी तर हुता की आंगटीत. आत्ताच घंटाभर झाला, कुटं दिसंना ! ईस हज्जारचा हाय म्हनत्यात सावाक्का. आसला येवडा, मोट्ट्या चिच्चुक्यायवडा हुता ! ’

‘ईस हज्जारचा ... ? ‘

‘तर ? हिरा हाय हिरा ! रामुनाना मालकांची आटवन हाय म्हनं ती. पुरात व्हावून गेलं तवा मालकांनी नदीला जाताना हातातली हिऱ्याची आंगटी काडून दिल्ती सावाक्काकडं. त्योच हिरा पडला म्हून लै नाराज झाल्यात वो !’

‘संब्या, चार लंबरला काय पायजे बग जरा..’ सावाक्काची हाळी आयकून संब्या पळाला.

‘मज्जा बगतायसा न्हवं, शंकर आन्ना ?’ बजाबा डुलत डुलत बोलला.

‘मज्जा कसली रं त्यात ? बाई हैरान झालीया की ! रामूदाची आटवन हुती म्हनं.’ शंकऱ्या दाढी खाजवत बोलला.

बजाबानं डोळं तिरकं करून सावाक्काकडं नदर टाकली आनी फुडं वाकून त्यो कुजबुजला,

‘मला ठावं हाय, त्यो कुटं हाय ते !’

‘कोन ? रामुदा ?’ शंकऱ्या दचकला.

‘हिरा, हिरा ! खी: खी: खी: !’ बजाबानं दात इचाकलं. ‘…आंगटीतनं पडल्याला !’

‘आं ? तुला काय ठावं ?’

‘मला न्हाय तर आनी कुनाला ? मीच बघितलो त्यो पडला तवा...’

‘कवा ? कुटं पडला त्यो ? आन तू कुटं हुतास तवा ?’ शंकऱ्याचं डोळं लांडग्यावानी दिसाय लागलं.

‘मी ? मी उश्शेर आलुय हितं. ती पोरं बाटल्या भरत हुती आनी मालकीन शाम्पल तपासून बगत हुती ...’

‘आनी ?’

‘आनी काय पडला की त्यो हिरा आसा माज्या समूर ....!’

‘आं ? तुज्या समूर ? आन उचलला का न्हाईस मग ? आक्काला तरी सांगचील का न्हाई ?’

‘सांगिटलं न्हवं, मी मजा बघतोय ...! ही ही !’

...तिज्यायला, हे खरंच सांगतंय का आंबं पाडायलय ? ...का चढली ह्येला ? शंकऱ्या मनात म्हनाला.

बजाबा जाग्यावरनं उटला आनी सोप्याच्या दुसऱ्या दारातनं भाईर गेला. सोप्याच्या त्या बाजूला जरा लांब एक पडकं भिताड हुतं. पिऊन घाईची लागली, की मोकळं व्हायला पिंडकी लोकं त्या भिताडामागं जाईत. बजाबा धार मारून आला तवा त्येच्या चालीकडं बगून तरी त्येला चढलीया आसं काय वाटत न्हवतं.

‘चला, शंकर मालक चाल्लो बगा. नीट शेतावर जातो आता...’ बजाबानं आपली पिशवी उचलली.

‘ये, थांब की जरा !’ शंकऱ्यानं त्येला हाताला धरून खाली बसवलं.

‘काय सांगीत हुतास, मगाशी ? ... आंगटी पडल्याली बगितलास ?’

‘आंगटी न्हवं, मालक, हिरा !’

‘आन मग सांगीत का न्हाईस कुटं पडली त्ये ?’

‘मी ? आन तुमाला ? ते कशापाई सांगू ?’ बजाबा शुद्धीत असल्याचा आजून एक पुरावा मिळाला !

‘आरं, तू दोस्त न्हवं माजा ?’

‘मी ? न्हाय बा !’ बजाबानं ह्या कडंस्नं त्या कडंपतूर मुंडी हालवली.

‘आरं ...?’ शंकऱ्या हैरान झाला.

‘बरं हे बग, शंकऱ्यानं खिशातनं एक निळा गांधी काडून हळूच बजाबाच्या खिशात ठेवला.

गांधीबाबा बगून बजाबाचा मुखडा चांदन्या रातीच्या चांदागत चमकाय लागला.

‘आत्ता म्हंजे ! तुमी म्हंजे मालक, लैच हुश्शार बगा शंकर आन्ना !’

‘मग बोल की लेका !’

बजाबा हळूच टेबलावर फुडं झुकला. शंकऱ्याच्या कानांत फुसफुसत म्हनला, ‘बाटली, बाटली !’

‘आं ? कंची बाटली ?’

‘तितं आत बाटल्या ठिवल्याल्या दिसत्यात न्हवं ? त्यातल्या एका बाटलीत पडला त्यो हिरा ! मी सोताच्या ह्या s डोळ्यांन बगितला.’

शंकऱ्यानं बघितलं. भिताडाच्या देवळीतल्या पंचवीस बाटल्या सोडून आनी वीस एक बाटल्या मोडक्या निळ्या दुधाच्या क्रेटमधी घालून कोपऱ्यात ठेवल्या हुत्या. तिकडंच बजाबाच्या डोळ्याचा इशारा हुता.

‘त्या दारूच्या बाटल्या ?’

‘व्ह्य जी ! आसं मी आत आलो. त्यो संब्या बाटल्या भरीत हुता आनी सावाक्का बाटल्यास्नी टोपान लावीत हुती. आसा मी बगतुय, बगतुय तवर आंगटीतला खडा एका टोपनात आडिकला आनी माज्या नदरंसमुर त्या बाटलीत पडला ! ‘

‘आन मग ?’

‘मग काय, मालकीनबै हाताला टोचल्यावणी झालं म्हनून हात खाजीवल्या आनी परत टोपनं लावाय लागल्या. मी गुमान हितं यून बसलो...’

‘त्या क्रेटातल्या बाटलीत पडला ? खरं सांगतुईस ?’

बजाबानं लाल झाल्यालं डोळं शंकऱ्यावर रोखलं.

‘माजा बा आनी आज्जा नरकात जाईल ह्ये खोटं ठरलं तर ! बजाबा पाटील हाय नावाचा मी ! सोम्यागोम्या न्हवं !’ भादरलेल्या मिशीवर ताव देत त्यो बोलला.

‘....आरं पन मग सांगितलं का न्हाईस सावाक्काला ?’

‘कशाला सांगू ? तिला सांगाय ती काय सासू, व्हय, माजी ?’ बजाबा फुस्कन हसला. ‘बसंना हुडकत रातभर. मी चाल्लो !’

‘आरं, आरं..!’ शंकऱ्यानं धरायच्या आत बजाबा पिशवी उचलून पसार झाला.

शंकऱ्याच्या चक्कीत जाळ झाला ! ईस हजाराचा हिरा ! चंदनशेठ मारवाड्याला मागच्या दारानं इकला तरी पंद्रा हजाराला तरी मरान न्हाई. इचाराच्या तंद्रीत गलास कवा रिता झाला त्येला कळ्ळंच न्हाई. बाटली जरा कमी अर्धी हुती ती तशीच सोडून शंकऱ्या उटला. दोन ढांगात कौंटरपशी पोचला.

‘सावाक्का,..’

सावाक्का रंजीस आल्यागत गल्ल्यापशी बसली हुती. तिनं नदर उचलून शंकऱ्याकडं बगितलं. नुस्त्या भिवया तण्णावून तिनं काय म्हनून इचारलं.

शंकऱ्यानं हळूच तिच्या हाताकडं बगितलं. हातात न्हेमीच्या दोन हिऱ्याच्या आंगट्यांच्या जागंला येकच दिसत हुती !

‘त्ये न्हवं, आज घराकडं गावाकडचं पावनं येनार हैत.’

‘मग ?’

‘काय न्हाय, एक धा-ईस बाटल्या लागतील..’

‘आत्ता गं बाई ! इकत्या बाटल्या कशापायी ? पारटी हाय जनु ?’ सावाक्कानं हनवटीला मुठ लावून इच्चाrलं.

‘व्ह्य, व्ह्य, पारटीच म्हनायची !’ शंकऱ्या खुशीत यून बोलला.

‘शंकर आन्ना, आदीचं उधारीचं काय ? आज तर भिशी हाय कामगारांची ! आरडर आदीच सांगून ठेवलीया मदन्यानं ! आनी तुला कुटल्या दिऊ ?’

‘मदन्या न्हवं ? त्यो कुटला रोकडा पैसा देतोय ?’

‘तर ! आनी तू रोकडा देतोस व्हय आन्ना ?’ सावाक्का पचकन खिडकीतनं थुकली.

‘तसं न्हवं, सावाक्का, आज हाईत पैसं माज्याकडं ! किती रुपय बोल ह्या सगळ्या बाटल्यांचं ?’ शंकऱ्यानं खिशातनं हिरव्या गांधीबाबाची एक लड भाईर काडली. सावाक्काचं डोळं बशीयेवडं झालं !

‘कुटं दरोडा घाटलास का येटीयेम लुटलास रं आन्ना ?’

‘हे, हे.. ! दरोडा कशाला घालू ? आज शुक्कीरवार, पगार न्हवं का ?’

‘असूंदे खरं, पन ह्या ईस आरडरीच्या बाटल्या हाईत , त्या मी काय दुसऱ्या कुनाला द्याची न्हाय ! त्यो मदन्या आला तर काय डोच्कं फोडू व्हय त्येज्याफुडं ?’

शंकऱ्याला आता दम निगंना ‘ये सावाक्का, माजीबी नड हाय न्हवं ! ह्ये बग, ईस बाटल्या म्हंजी दोन हजार हुत्यात. चल, तीन हजारात घेतो बग...’ सा हिरवे गांधी शंकऱ्यानं सावाक्काच्या तोंडाफुडं नाचवले.

तरीबी सावाक्का काय बधंना. पुन्ना आनी तिचं त्येच गानं, ‘नको रं बाबा, त्यो मदन्या चार चौगात सांगत सुटंल. आपुन आपलं येव्हारानं ऱ्हावाव. जेला देतो म्हनलय, त्येलाच द्याव...’

मग मातर शंकऱ्या लैच घाईला आला, ‘ह्ये बग, शेवट सांगतो..ह्ये पाच हजार घे आन द्यून सोड सगळ्या बाटल्या ! खल्लास !’

सावाक्काच्या डोळ्यात चलबिचल झाली. ‘आसं म्हन्तोस ? पाच हजार ?’

‘व्हय, व्हय, पाच हजार ! चल, काड माल भाईर..’ शंकऱ्यानं मोजून दहा हिरवेगार गांधी कौटरवर वळीनं मांडले आनी क्रेटला हात घातला.

सावाक्का ताटकरनं गल्ल्यावरनं उटली आनी क्रेट तिनं मागं वडला.

‘आनी अन्ना, पैल्याचं दोन हजार ? उदारीचं ? त्ये कोण द्याचं ?’

शंकऱ्या मनात चरफडला खरं पन वरवर मातर त्वांड भरून हासला.

‘आगं आक्का, तेबी चुकीवतो की सगळं ! ह्ये घी !’

आनी चार गांधीबाबा फळीवर रांगेत जाऊन बसले.

शंकऱ्यानं ईस बाटल्या मोजून ताब्यात घेतल्या. मग सावाक्काकडनंच एक टिक्क्याची पिशवी घेतली आन त्यात बाटल्या घालून मोटरसायकलीला मागं बंदोबस्तात बांदल्या. बांदलेल्या सुतळीचा तुकडा बारक्यानं कापला न कापला, तवर शंकऱ्याची मोटरसायकल फटर्रर्र फट फट करून रस्त्याला लागलीसुदीक !

मोटरसायकल लांब वळनाच्या पलीकडं जाऊन तिचा आवाजबी याचा बंद झाला, आनी मुत्रीच्या पडक्या भिताडाच्या मागनं बजाबा भाईर आला. सोप्याच्या दारातनं आत न जाता त्यो भिताडाला वळसा घालून थेट परड्यात गेला. सावाक्का तितंच हुबारलीती.

‘ग्येला काय सोद्या ? झक्कास झालं बग स्वांग !’ सावाक्का त्वांड भरून हसली.

‘आलं न्हवं पैसं सगळं उदारीचं ? याजासकट ?’ बजाबाबी डोळा बारीक करून हसाय लागला.

‘तर ! तुजी आयड्या लै नामी बर्का !’ सावाक्कानं उजव्या हाताचा आंगटा आनी पैलं बोट जोडून ‘मस्त’ आशी खुण केली. त्याबरुबर तिच्या हातातल्या तिसऱ्या बोटातल्या आंगटीतला खडा लख्खकरनं चमकला ! हिराच त्यो, त्येची चमक न्यारीच !

‘लै पिडलंतं रे ह्या भाड्यानं ! फुकट्या रोच्ची एक बाटली उचलून न्हेत हुता सोद्या ! पैशाला जोर क्येला, तर ह्यो पोलिसांचं भ्यां दावनार आन आपुन दादागिरी करनार. डोचक्याला निस्ता वाळ्ळा ताप झाल्ता ! ....आज बरुब्बर सगळी वसुली झाली ! बस म्हनाव भाड्या आता घरात जाऊन हिरा हुडकीत !’

‘खी: खी: ! ! ...आता इलायती देतो म्हनलं तरीबी याचा न्हाई सुक्काळीचा फुकट दारू ढोसायला !’

दोगंबी ठ्यां ठ्यां हसले.

‘...ह्ये घे तुजं बकशीस !’ सावाक्का म्हनली.

.... बजाबाच्या खिशात निळ्याच्या जोडीला एक हिरवा गांधीबी अल्लाद जाऊन बसला !

1

प्रतिक्रिया

पैसा's picture

27 Feb 2017 - 7:00 am | पैसा

जबरदस्त कोल्लापुरी हिसका!

शिवोऽहम्'s picture

27 Feb 2017 - 7:37 am | शिवोऽहम्

वाट बघतच होतो आमच्या कोल्लापुरी ठसक्याची..

प्राची अश्विनी's picture

27 Feb 2017 - 7:49 am | प्राची अश्विनी

:)भारीये.

वरुण मोहिते's picture

27 Feb 2017 - 9:11 am | वरुण मोहिते

वाट बघत होतो म्हटलं अजून आमच्या गावचं नाव कसं नाही.

सविता००१'s picture

27 Feb 2017 - 10:54 am | सविता००१

कोल्हापूरचा ठसका मस्तच

अॅस्ट्रोनाट विनय's picture

27 Feb 2017 - 10:57 am | अॅस्ट्रोनाट विनय

तेच म्हणत होतो आजुन झणझणित कोल्हापुरी मेनू कसाकाय चाखायला नाही मिळाला.

संजय क्षीरसागर's picture

27 Feb 2017 - 11:07 am | संजय क्षीरसागर

.

अभिजीत अवलिया's picture

27 Feb 2017 - 11:11 am | अभिजीत अवलिया

:)

पद्मावति's picture

27 Feb 2017 - 12:38 pm | पद्मावति

मस्तच.

चिगो's picture

27 Feb 2017 - 1:47 pm | चिगो

एक नंबर कथा.. मजा आली.

विनिता००२'s picture

27 Feb 2017 - 2:00 pm | विनिता००२
विनिता००२'s picture

27 Feb 2017 - 2:01 pm | विनिता००२

सुरेख :)

इशा१२३'s picture

27 Feb 2017 - 3:06 pm | इशा१२३

भारीच! !

बापू नारू's picture

27 Feb 2017 - 3:48 pm | बापू नारू

चांगलीच भागीवली शंकऱ्याची......

एस's picture

27 Feb 2017 - 6:13 pm | एस

एक नंबर.

'आंबं पाडायलाय' हा वाक्प्रचार आवडला आहे. मिपावर हवाबाण वाक्यांना वापरण्यात येईल. ;-)

'आंबं पाडायलाय' हा वाक्प्रचार आवडला आहे. मिपावर हवाबाण वाक्यांना वापरण्यात येईल.

+१

'आंबं पाडायलाय' हा वाक्प्रचार आवडला आहे. मिपावर हवाबाण वाक्यांना वापरण्यात येईल.

+१

नूतन सावंत's picture

27 Feb 2017 - 6:32 pm | नूतन सावंत

मस्त किस्सा.

आक्षी झ्याक लिवलंसा!!

मितान's picture

27 Feb 2017 - 7:22 pm | मितान

भारी !!!!!!

एकनाथ जाधव's picture

28 Feb 2017 - 11:18 am | एकनाथ जाधव

सौदा जमलाय बरका स्नेहांकिता.

स्मिता_१३'s picture

28 Feb 2017 - 11:47 am | स्मिता_१३

भारी आहे

हेहेहेहे,
अंगूठीमें नगिना.

यशोधरा's picture

28 Feb 2017 - 12:15 pm | यशोधरा

=))

इडली डोसा's picture

28 Feb 2017 - 12:36 pm | इडली डोसा

कोल्लापुरी मान्सं जगात एक नंबर !

स्वीट टॉकर's picture

28 Feb 2017 - 3:04 pm | स्वीट टॉकर

लिहिलीही आहेत सही!

Pradeep Phule's picture

28 Feb 2017 - 3:43 pm | Pradeep Phule

गोष्ट खूप छान होती..
आणि शेवट अनपेक्षित होता..
तो खूप आवडला..

सचिन काळे's picture

28 Feb 2017 - 6:13 pm | सचिन काळे

झक्कास ष्टोरी लिव्हलीसा!!!

आषाढ_दर्द_गाणे's picture

1 Mar 2017 - 1:13 am | आषाढ_दर्द_गाणे

एक नंबर!

तालुक्याला जाणाऱ्या शेवटच्या यष्टीनं गावकुसाबाहेर पडताना झाम्मदिशी यू टरन घेतल्याबरुबर यष्टीच्या लायटीचा उजेड नदीकडच्या उतारावरच्या देशी बारच्या दरवाजातून आत शिरला आन भिताडापशी वळीनं मांडल्याल्या बाटल्या हिरकणीसारक्या झागमाग करून गेल्या.

इंग्रजीत "यू हॅड मी ऍट हॅलो!" म्हणतात त्या धर्तीवर 'पहिल्या परिच्छेदातच घेतलेत!'
मनःचक्षूंना ती एस्टी, तिच्या दिव्याची वळणारी तिरीप, आणि अंधाऱ्या खोलीत उजळलेल्या (कदाचित रिकाम्या) बाटल्या हे अक्खे पाच सेकंदांचे दृश्य स्वच्छ दिसले....
धन्यवाद!

धन्यवाद!

आंग आश्शी! टांगा पलती घोडे फरार कथा एकदम !! लय भारी स्नेहा ताई.

पिशी अबोली's picture

1 Mar 2017 - 1:24 am | पिशी अबोली

और ये लगा कोल्हापूरका ठसका!!!

पिशी अबोली's picture

1 Mar 2017 - 1:24 am | पिशी अबोली

और ये लगा कोल्हापूरका ठसका!!!

पियुशा's picture

2 Mar 2017 - 11:40 am | पियुशा

ह्ये जबरी लिवल की ग आक्के :)

खुशि's picture

2 Mar 2017 - 12:45 pm | खुशि

अक्का!लई ब्येस एकदम कोल्हापुरी तांबडारस्सा झटकेदार.

कविता१९७८'s picture

2 Mar 2017 - 3:13 pm | कविता१९७८

मस्तच

राधी's picture

2 Mar 2017 - 11:33 pm | राधी

Kathaa awadli, paN evdhya barkavyasahit kashi lihilee asavi yaachaa vichaar karte aahe.

Kolhapur he ThikaaN, tithli bhasha aani manse he khup awadichi gosht.

सस्नेह's picture

3 Mar 2017 - 10:57 am | सस्नेह

paN evdhya barkavyasahit kashi lihilee asavi yaachaa vichaar karte aahe.

याचे कारण म्हणजे मी याच परिसरात लहानाची मोठी झाले.
मिपावर मराठीत टाईप करण्यासाठी ctrl + g दाबा.

मंदार कात्रे's picture

3 Mar 2017 - 12:07 pm | मंदार कात्रे

लय भारी

पूर्वाविवेक's picture

3 Mar 2017 - 12:12 pm | पूर्वाविवेक

Kolhapuri baj jabardast!

चिर्कुट's picture

3 Mar 2017 - 5:08 pm | चिर्कुट

एक लंबर... :)

सई कोडोलीकर's picture

11 Mar 2017 - 11:27 am | सई कोडोलीकर

अगदी झणझणीत, कोल्हापुरच्या मातीतली कथा लिहिलीये.
एक छानशी शॉर्टफिल्म होऊ शकेल. सगळा मसाला आहे आणि पटकथेसारखी बांधेसूद कथा आहे.

मित्रहो's picture

11 Mar 2017 - 12:17 pm | मित्रहो

एकम कोल्हापुरी हिसका

एमी's picture

25 Mar 2017 - 11:28 pm | एमी

:-D :-D लय भारी!!