फसवणूक-प्रकरण ९-नेत्रपल्लवी करणारे ज. आइन्सेल (The Winking General)

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
30 Apr 2010 - 8:16 am

फसवणूक-प्रकरण ९-नेत्रपल्लवी करणारे ज. आइन्सेल (The Winking General)

© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)

कुलदीप नायर यांनी खानसाहेबांबरोबरच्या भेटीचे केलेले निवेदन पूर्णपणे सत्य होते व ही गोष्ट CIA ला माहीत होती कारण पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाची तपासणी करणारा एक चमू CIA त होताच. CIA च्या लॅंग्ली येथील मुख्य कार्यालयात "शास्त्र व आयुध संशोधन कार्यालया"चे [Office of Scientific and Weapons Research (OSWR)] प्रमुख गॉर्डन ओलर हे एक विद्युत अभियंता होते व ते ज्ञानी व तत्वनिष्ठ गृहस्थ होते. यानंतर थोड्याच कालावधीत त्यांची शास्त्र, तंत्रज्ञान व अण्वस्त्रप्रसाराबद्दलच्या राष्ट्रीय गोपनीय अधिकारीपदावर पदोन्नती झाली व ते अमेरिकेच्या अण्वस्त्रप्रसाराविरोधी गुप्तचरयंत्रणेतील एक महत्वाचे अधिकारी बनले.

जरी रेगन यांचा कल अशा देखरेखीविरुद्ध असला तरी ओलर यांच्या नेतृत्वाखाली OSWR(१)ने पाकिस्तानच्या असल्या हालचालींवर खास नजर ठेवली होती. या विषयावर जमा केली जाणारी माहिती प्रचंड होती व त्याची ओलरना चांगली जाणीव होती व म्हणून त्यांनी १९८५ साली केवळ पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाच्या हालचालींचा अभ्यास करण्यासाठी रिचर्ड बार्लो नावाचा एक नवा अन्वेषण अधिकारी नेमला व त्याला संशोधनाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. त्यासाठी प्रत्येक माध्यमांतून जमविलेल्या माहितीपर्यंत पोचण्यासाठी लागणारा परवलीचा शब्दही ओलर यांनी बार्लोंना दिला होता(२).

बार्लोंनी कायम उत्तम प्रतीचे संशोधन सुरू ठेवले होते. त्यांनी जमा केलेल्या पकिस्तानबद्दलच्या माहितीचा नेहमीच दैनिक गोपनीय पत्रकात व राष्ट्राध्यक्षांच्या रोजच्या सारांशरूपी अहवालात समावेश असायचा. हे पत्रक म्हणजे आदल्या दिवशीच्या प्रमुख गोपनीय माहितीचा गोषवारा असायचा व तो राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्राध्यक्ष, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री व त्यांचे मोजके ज्येष्ठ मदतनीस यांनाच वाचायला मिळायचा. यामुळे रेगनसारख्या व इतर ज्येष्ठ नेत्यांना पाकिस्तानात काय चाललेय् याची संपूर्ण कल्पना असायची. १९८७ सालच्या उन्हाळ्यात जसजसा बार्लोंनी जमा केलेल्या माहितीपत्रकांचा ढीग त्यांच्या टेबलावर वाढू लागला तसतशी अमेरिकेला पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाबद्दल अतुलनीय व अचूक माहिती मिळत गेली व त्यामुळे रेगन सरकारला दुःखद जाणीव होऊ लागली कीं त्यांचे पाकिस्तानबद्दलचे धोरण सत्यपरिस्थितीच्या दबावाखाली कोसळण्याच्या बेतात आले आहे.

रेगननी प्रतिनिधीगृहाशी सोविएतविरुद्धच्या युद्धात यश मिळविण्याचा बहाणा वापरून, गृहाला सतावून व गृहाशी 'दादागिरी' करून नायर यांच्या गौप्यस्फोटाने निर्माण केलेल्या अडचणीवर जेमतेम ताबा मिळविला होता तेवढ्यात एक नव्या आणिबाणीची भर पडली! एका पाकिस्तानी वंशाच्या कॅनेडियन नागरिकाला २५ टन मारेजिंग प्रतीचे पोलाद विकत घेताना फिलाडेल्फियात अटक झाली! त्याला कल्पनाच नव्हती कीं तो ज्यांच्याबरोबर या सौद्याबद्दल वाटाघाटी करत होता ती सर्व लोक FBIचे व अमेरिकेच्या Customs खात्याचे छुपे अधिकारी होते. जुलै १९८७ साली झालेल्या या अटकेचे गांभिर्य प्रतिनिधीगृह व परराष्ट्रमंत्रालयाच्या अधिकार्‍यांपलीकडे फारसे कुणाला लगेच कळलेच नव्हते! परराष्ट्रमंत्रालयाचे ज्येष्ठ अधिकारी अब्राहम सोफाएर यांना ते कळले व त्यांनी ताकीद दिली कीं या ग्राहकाचे पाकिस्तानशी असलेले दुवे जर प्रस्थापित झाले तर सोलार्त्झ घटनादुरुस्ती लागू होऊन अमेरिकेची पाकिस्तानला दिली जाणारी मदत बंद करावी लागेल.

'व्हाईट हाऊस'ला या सौद्याची नोव्हेंबर १९८६पासून माहिती होती. कार्पेंटर स्टील या कंपनीकडून हे खास शक्तिशाली पोलाद विकत घेताना 'अर्शद परवेझ' गुप्तचरयंत्रणेच्या दृष्टिपथात आले होते. कार्पेंटर कंपनीच्या आंतरराष्ट्रीय विक्रीखात्याचे व्यवस्थापक आल्बर्ट टॉम्ली यांना या संशयास्पद ग्राहकाबद्दल शंका आल्याने त्यांनी ताबडतोब अशा तर्‍हेच्या निर्यातीवर नियंत्रण करणार्‍या उर्जाशक्तीखात्याला (Department of Energy) कळविले.

लगेच FBI व अमेरिकेच्या Customs खात्याच्या अधिकार्‍यांनी कार्पेंटर कंपनीच्या विक्रीखात्याच्या अधिकार्‍यांची जागा घेतली व त्यांनी परवेझ यांच्याबरोबर जवळीक करण्याचे नाटक केले. परिणामतः परवेझ त्यांच्याबरोबर बोलताना वहावत गेले व आपल्या पाकिस्तानातील लाहोर येथील एका कॉर्पोरेशनमध्ये काम करणार्‍या श्री. इनाम या गिर्‍हाइकाबद्दल बरळले! परवेझनी बर्‍याच लोकांना लांच देऊ केली होती व आगाऊ रक्कमही दिली होती. या प्रतिबंधित मालाबद्दलची आपली निवेदने परवेझ सारखी बदलत होते. कधी हे पोलाद टर्बाइन्ससाठी, कधी काँप्रेसर्ससाठी, कधी रॊकेट इंजिन्ससाठी, कधी कराची विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी प्रकल्पासाठी तर कधी ते वितळवून त्याचे इंगट बनविण्यासाथी अशा नाना कथा त्यांनी सांगितल्या, पण शेवटी चुकून ते कहूताप्रकल्पासाठी हवे आहे हेही सांगून मोकळे झाले व हे संभाषण ध्वनिमुद्रित केले गेले होते. ही माहिती बार्लोंनी जमविलेल्या माहितीशी जुळत होती. त्यांच्या मते असले पोलाद सेंट्रीफ्यूजेससारख्या प्रचंड वेगाने फिरणार्‍या यंत्रातच वापरले जायचे.
परवेझना २०लाख डॉलर्स किमतीचे या प्रतीचे आणखी पोलाद व बेरिलियम धातूही विकत घ्यायचे होते. (बेरिलियम अणूबाँबची विनाशशक्ती कमी न करता त्याचा आकार कमी करण्यासाठी एक परावर्तक म्हणून वापरले जाते.) यावरून पाकिस्तान छोट्या आकाराचे विमानातून टाकण्यायोग्य आकारचे अणूबाँब बनवत आहे असा बार्लोंना संशय आला.

परवेझ यांना शिक्षा होण्याच्या आधीच प्रतिहल्ला करण्याच्या उद्देशाने रेगन यांनी नेहमीप्रमाणे आक्रमक पवित्र्यात प्रतिनिधीगृहाला पाकिस्तानची मदत बंद करण्याच्या निर्णयाच्या दुष्परिणामांचा व गुंतागुंतीचा विचार करायला बजावले! १९८७च्या उन्हाळ्यात मुजाहिदीन सेनेने युद्धाची दिशा उलटविली होती व ते सोविएत सेनेविरुद्ध विजय मिळवू लागले होते. या वेळी मदत बंद केल्यास मुजाहिदीन अडचणीत येतील व सोविएत सैन्य अफगाणिस्तानातून परतायचा विचार बदलेल अशीही शक्यता होती. सरकारने असाही पवित्रा घेतला कीं परवेझ यांच्याबाबतीत पाकिस्तानचा उद्देश काय होता किंवा परवेझ पाकिस्तान सरकारसाठी काम करत होता हे कुठेच सिद्ध झालेले नाहीं. जेंव्हां फिलाडेल्फियाच्या सरकारी वकीलांनी "केंद्रीय अन्वेषकांनी परवेझना कुणी काम दिले होते ते अद्याप शोधून काढले नाहींय्" हे मान्य केल्यावर सरकारचा जीव भांड्यात पडला. मायकेल आर्माकॉस्ट या राजनैतिक विभागातील कनिष्ठ परराष्ट्रमंत्र्यांनी सिनेटच्या परराष्ट्रधोरणविषयक समितीपुढे दिलेल्या गुप्त साक्षीत "झियांची राजवट व परवेझ यांच्यात कांहीही संबंध नाहीं" असे ठासून सांगितले. त्याला फिलाडेल्फियाच्या कस्टम्स खात्याच्या अधिकार्‍यांनीही दुजोरा दिला(३).

पण सिनेटकडून सरकारवर दबाव वाढतच होता. अण्वस्त्रे मिळवू पहाणार्‍या राष्ट्राची अमेरिकन मदत ताबडतोब बंद करण्याची घटनादुरुस्ती आणणार्‍या सोलार्त्झनी रेगनना "पाकिस्तानच्या कृती अमेरिकेला कोंडीत आणत आहेत. जर कायदा मंत्रालयाकडे लेखी आरोपपत्र दाखल करण्याइतका पुरावा असेल तर रेगन यांच्याकडे कायद्यानुसार पाकिस्तानची मदत बंद करण्यासाठी पुरेसे समर्थन आहे" अशी ताकीदही दिली. सिनेटर जॉन ग्लेन यांचेही याबाबत एकमत होते. ते म्हणाले कीं अफगाणिस्तानातील अमेरिकेचे हितसंबंध तात्पुरते आहेत, पण अण्वस्त्रप्रसार होऊ न देण्यात अमेरिकेचे दीर्घकालीन हितसंबंध आहेत." सिनेटच्या परराष्ट्रधोरणविषयक समितीचे अध्यक्ष क्लेअरबोर्न पेल यांनी सरळ सांगितले कीं पाकिस्तानने अमेरिकन कायद्याचा अवमान (contempt of court) केलेला असून चारशे कोटी रुपयांची पाकिस्तानला द्यायची मदत ताबडतोब रद्द करावी!

पण 'व्हाईट हाऊस'ने आपले धोरण कायम ठेवले व पाकिस्तानकडे मोहरा वळविला. अमेरिकेचा ठाम निर्णय पाकिस्तानला सांगण्यासाठी आर्माकॉस्ट इस्लामाबादला गेले व त्या दौर्‍याबद्दलचा उद्देश जाहीर केला गेला कीं ते झियांच्या मनावर 'खासगी' ग्राहकांवर कडक कारवाई करण्याबद्दल दबाव आणण्यासाठी जात आहेत. या विधानातला 'खासगी' हा शब्द फारच महत्वाचा होता. खरे तर ती आर्माकॉस्ट व परराष्ट्रमंत्रालयातील एक वकील अब्रहॅम सोफाएर यांनी चातुर्याने समाविष्ट केलेली एक पळवाट होती. म्हणजे परवेझना काम दिलेले खासगी लोक होते व त्यांचा पाकिस्तान सरकारशी कांहींही संबंध नव्हता हे दाखवून सोलार्त्झ घटनादुरुस्तीची पाकिस्तानच्या मदतीत येणारी आडकाठी दूर करण्याचा तो प्रयत्न होता.
पाकिस्ताननेही या 'नाटका'त भाग घेतला. परवेझच्या नावाचे अटक वॉरंट काढण्यात आले. एक वार्तापत्रही (press briefing) काढण्यात आले. या वार्तापत्रात परवेझशी निगडित "निर्यात कारस्थाना"त झियांचा कांहींही हात नव्हता असेही अमेरिकेला सुचविण्यात आले. थक्क झालेल्या सोलार्त्झ यांनी या बाबतीतील मूळ गोपनीय कागदपत्रे पहाण्याची मागणी केली. असा त्यांना हक्कही होता. पण रेगन यांच्या राजकीय मतांशी अमूलाग्र एकरूप झालेल्या परराष्ट्रमंत्रालयाकडून व संरक्षणमंत्रालयाकडून मिळणार्‍या माहितीचा दर्जा विश्वासार्ह असण्याची कांहीच खात्री नव्हती!

सोलार्त्झ व त्यांच्या इतर सिनेटर सहकार्‍याना माहिती देण्यासाठी CIA च्या तात्पुरत्या निर्देशकांनी ज. डेव्हिड आईन्सेल यांची निवड केली व ती अर्थपूर्ण होती. कारण आईन्सेल यांची कारकीर्द कोरिया व विएतनाम युद्धांत व नंतर अण्वस्त्रांच्या वापरावर भर देण्यात गेली होती. CIAचे निर्देशक बिल केसी यांनी त्यांना १९८५ साली गुप्तहेरखात्यात आणले होते व तेंव्हापासून ते राष्ट्रीय गुप्तचरयंत्रणेत 'अधिकारी' म्हणून अण्वस्त्रप्रसारविरोधी कामावर देखरेख करत कीं ज्यात रेगन सरकारला मुळीच रस नव्हता. १९८०पासून ते कॅस्पर वाईनबर्गर या संरक्षणमंत्र्यांच्या हाताखाली अण्वस्त्रांच्या व रासायनिक अस्त्रांच्या सुधारणा, वापर व नियोजन यासंबंधीचे काम पहात. नंतर रेगननी त्यांना त्यांच्या आवडत्या "स्टार वॉर्स" कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक म्हणूनही निवडले होते व ते उदारमतवादी मंडळीना तोंड द्यायला समर्थ होते!

OSWR या संघटनेचे प्रमुख गॉर्डन ओलर व हेरखात्याचे उपसंचालक रिचर्ड केर यांना ही निवड अजीबात पसंत नव्हती. आईन्सेल यांचा सहभाग म्हणजे ही चर्चा दोन बलाढ्य पक्षांत होणार होती व त्यामुळे ओलर व त्यांचे सहाय्यक चार्ल्स बर्क चिंतेत पडले. बार्लोंना ते म्हणाले कीं त्यांना आईन्सेल प्रतिनिधींसमोर काय ठेवणार याबद्दल फारच काळजी वाटत होती. CIAचा पाकिस्तानाबद्दलचा तज्ञ म्हणून त्यांनी व बॉब गेट्स (त्यावेळचे CIAचे उपसंचालक व आजचे संरक्षणमंत्री) बार्लोंची निवड केली होती.

परवेझच्या केसबद्दल सर्व माहिती जवळ ठेवून व मागच्या बाकावर बसून आईन्सेलना लागेल ती माहिती पुरविण्यास बार्लोंना सांगण्यात आले होते. बार्लो म्हणाले कीं आईन्सेलच मुजाहिदीनबद्दलच्या कामावर देखरेख करणारे प्रमुख गुप्तहेर अधिकारी असल्याने एक अडचणच निर्माण झाली होती. एका बाजूला CIAच्या पैशाने अप्रत्यक्षरीत्या लढले जाणारे अफगाणिस्तानचे युद्ध व दुसर्‍या बाजूला अनेक गुप्तहेरसंघटनांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाबद्दलची जमा केलेली माहिती यांच्यामधील संघर्ष टाळण्यासाठी त्यांना निवडाण्यात आले होते. आईन्सेल 'winking general' या टोपणनावाने ओळखले जात(४) व ते सर्व चर्चा लढविणार होते.

बार्लोंनी या चर्चेसाठी कसून तयारी केली व स्वतःसाठी संरक्षणकवचही बनविले. ते चार्ल्स बर्क यांच्याबरोबर परराष्ट्रमंत्रालयात गेले व तिथले प्रमुख स्टीव्ह आओकी यांच्याशी चर्चा करून एकेक मुद्द्यावर त्यांचे मत विचारून घेतले. बार्लो काय-काय सांगू शकतात याची एक यादीही त्यांना देण्यात आली. प्रतिनिधीगृहातील एक परवलीचा शब्द असलेली खोली या चर्चेसाठी मक्की करण्यात आली. सोलार्त्झ त्यांच्या मदतनिसांबरोबर हजर होते. एका मोठ्या टेबलामागे आईन्सेल व बार्लो बसले. त्यांच्या बाजूला एक 'Babysitter' बाई बसली होती व CIA 'काँग्रेस'ऐवजी 'व्हाईट हाऊस'शी एकनिष्ठ राहील याची खात्री करण्यासाठी तिला तेथे बसवले होते! CIA च्या अण्वस्त्रप्रसारविरोधी विभागाचा जॉन सेरॅबियन नावाचा आणखी एक अधिकारीही तिथे होता. दुसर्‍या बाजूला बारा सिनेटर्स व प्रतिनिधी बसले होते. मागच्या बाजूला 'व्हाईट हाऊस'तर्फे चर्चेचे निरीक्षण करायला आलेले मध्यपूर्व व दक्षिण अशिया विभागाचे कनिष्ठ उपपरराष्ट्रमंत्री रॉबर्ट पेक व उपपरराष्ट्रमंत्री रिचर्ड मर्फी उभे होते.
आईन्सेल बोलायला उभे राहिले व बार्लोंना खूप मानसिक तणाव जाणवू लागला. कारण 'इराण-काँट्रा' या नावाने प्रसिद्ध असलेल्या लफड्यात खोटे बोलल्यामुळे अडचणीत आलेल्या ऑलिव्हर नॉर्थसारख्या अधिकार्‍यांची उलटतपासणी चालू होती. राजनैतिक संबंध नसतानाही इराणला गुपवुप शस्त्रे विकून मिळालेला पैसा CIAला परवानगी नसतानाही निकारग्वाच्या सत्तेला उखडून टाकण्यासाठी CIA वापरत होती. CIAचे ७० टक्के बजेट अफगाणिस्तानवर खर्च होत होते, तेही बंद होतेय् कीं काय अशा काळजीतच ही चर्चा सुरू झाली.

प्रतिनिधींकडून पहिला प्रश्न होता,"परवेझ व इनाम हे पाकिस्तानचे हस्तक होते काय"? आइन्सेल उत्तरले,"आम्हाला नक्की माहीत नाहीं." बर्लोंनी तर आवंढाच गिळला. कारण प्रतिनिधीगृहापुढे खोटी साक्ष देणे हा गुन्हा होता व या चुकीबद्दल 'इराण-काँट्रा' प्रकरणात अशाच चौकशी सत्रांत खोटे बोलल्याबद्दल शेजारच्याच खोल्यांत चौकशा चालू होत्या व त्यात रेगन यांचे ज्येष्ठ अधिकारी दर्यासारंग प्वांडेक्स्टर (कीं पॉइनडेक्स्टर?) व संरक्षणमंत्री वाईनबर्गरवर आरोपपत्रही दाखल होणार होते(५)! बार्लोंना (व आइन्सेलनाही) नक्की माहीत होते कीं परवेझ व इनाम हे पाकिस्तानी हस्तक होते. कारण बार्लो व आइन्सेल यांनी सारखेच पुरावे पाहिले होते.

परवेझकडील जप्त केलेल्या दस्तऐवजावरून इनाम हे 'इनाम उल-हक' नावाचे सेवानिवृत्त ब्रिगेडियर होते. त्यांनी परवेझला "पाकिस्तानच्या भल्या"साठी हा मारेजिंग पोलादाचा सौदा करायला लेखी स्वरूपात आग्रहाने उद्युक्त केले होते. १९८०पासून खानसाहेबांच्या खरेदीजालातील महत्वाचे हस्तक म्हणून ओळखले गेलेले असल्यामुळे इनाम हे CIA च्या नजरेखालीही होतेच. युद्धातील शौर्याबद्दल त्यांना किताबही मिळाला होता व ते झियांच्या खास जवळचे व ISI च्याही पसंतीचे गृहस्थ होते. हँक स्लेबोज इतके नसले तरी खानसाहेबांच्या हस्तकांच्या यादीत त्यांचे स्थान बरेच वर होते. इनाम यांचा सहभाग, त्यांचे जुने 'कर्तृत्व' आणि CIA कडे असलेल्या इतर भरपूर पुराव्यावरून कार्पेंटर कंपनीबरोबरच्या सौद्याचे ग्राहकत्व नक्कीच पाकिस्तान सरकारकडे होते. आणि तरीही आइन्सेल माहीत नसल्याचा दावा करीत होते! हे गुप्त अहवाल 'व्हाईट हाऊस'शी संबंधित असलेल्या आर्माकॉस्ट यांनीही पाहिले होते व त्यामुळे "सरकारला परवेझ, इनाम व पाकिस्तानी सरकार यांतील दुवे माहीत नव्हते" हे त्यांचे निवेदन निखालस चुकीचे होते!
इनाम उल-हक हे खानसाहेबांच्या युरोपियन विक्रेत्यांनाही माहीत होते. ग्रिफ्फिनही त्यांना दुबईत भेटले होते. इनाम यांच्या घरच्या लग्ना-कार्यांना ज्येष्ठ लष्करी व ISI अधिकारी जातीने हजर रहात. इनाम यांनी २००६मध्ये स्वतःच त्यांनी किती महत्वाचे काम केले होते हे आडवळणाने सांगून स्वतःची पाठही थोपटून घेतली होती!

खरे तर चार्ल्स बर्क यांनी बार्लोला सांगितले होते कीं जर आइन्सेल खोटी विधाने करू लागले तर त्यांनी सरळ उठून त्या खोलीबाहेर जावे. पण बार्लोंना तेवढी हिंमत झाली नाहीं. ते तिथे मान डोलवत बसले. त्यांना जाणवले कीं श्रोत्यांना सत्यपरिस्थिती माहीत नाहींय्. त्याने जमा केलेली गुप्त माहिती समोरच्या कुणापर्यंतच पोचली नव्हती व पाकिस्तानमध्ये काय चालले आहे याची त्यांना कांहींच कल्पना नव्हती!
सोलार्त्झना याची जाणीव झाली. त्यांनी बार्लोकडे वळून त्यांचे मत विचारले. बार्लो म्हणाले कीं परवेझ हे निःसंशयपणे पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाचे हस्तक आहेत. झाले! एकच गदारोळ माजला. "बार्लोला कांहींच माहीत नाहीं" असे किंचाळत आइन्सेल ताडकन् उभे राहिले!

सोलार्त्झनी सर्वांना शांत केले व त्यांनी विचारले,"१९८५पासून अशा इतरही घटना घडल्या आहेत कां? आइन्सेलनी "नाहीं" असे ठाम उत्तर दिल्यावर बार्लॊ पुन्हा मान डोलवू लागले. पुन्हा बार्लोंना तोच प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी सांगितले कीं अशा कित्येक घटना झालेल्या आहेत(६). खरे तर ते खूपच घाबरले होते पण बर्क व आओकींनी त्यांना हिरवा कंदील दाखविला होता त्याच्या जोरावर त्यांनी असे सत्य निवेदन केले.

रिचर्ड मर्फी व रॉबर्ट पेल यांचा चेहरा खर्रकन् उतरला. आइन्सेलनी सांगितले कीं या घटना केवळ संशयापोटीचे आरोप असून त्या अद्याप सिद्ध व्हायच्या होत्या व बार्लो त्याबद्दल पडताळून पहायच्या आधीच बोलत होते. खरे तर आइन्सेल हे सत्यावर एक पडदा पाडू इच्छित होते पण त्याचा परिणाम उलटाच झाला होता. बैठकीत पुन्हा गदारोळ माजला. 'बेबीसिटर' बाईने बार्लोंना दम भरला,"गप्प बस व आइन्सेलना बोलू दे". तेवढ्यात प्रतिनिधींच्या बाजूने एक चिठ्ठी आली,"बार्लो या इतर घटनांचे स्पष्टीकरण देतीला काय? आम्हाला त्यांचे म्हणणे ऐकायचे आहे. परराष्ट्रमंत्रालय नाराज आहे".

बार्लोंनी पुन्हा आवंढा गिळला पण ते गप्प राहिले. ते सर्वात कनिष्ठ (junior) होते व त्यांना हे सर्व असह्य झाले. चिडखोर व कडवट वातावरणात बैठक संपली. "या मूर्खाने (son of a bitch) साराच घोळ केलाय" असे ओरडत रॉबर्ट पेल बैठकीतून बाहेर पडले. बाहेर सगळेच छोट्या घोळक्यात जमून माहिती गोळा करू पहात होते व बार्लॊंच्याकडे येत होते. पण बार्लोंना CIA च्या गाडीत कोंबून त्यांना लँग्लीच्या कार्यालयाकडे पिटाळण्यात आले. प्रतिनिधींची झोंबाझोंबी सुरू होती व ते आता पाकिस्तानची मदत थांबवण्यासाठी पुरेशी माहिती जमा झाली आहे कां याचा विचार करू लागले होते!

आइन्सेल, सेराबियन व प्रतिनिधीगृहाच्या कारभारासंबंधीचा अधिकारी यांच्याबरोबर गाडीत बसून बार्लो पोटोमॅक नदी ओलांडून लॅंग्लीला परतले. संपूर्ण प्रवासात पूर्ण शांतता होती. त्यांच्या ऑफीसमधला फोन सतत खणखणतच होता. सर्व लोक प्रतिनिधीगृह पाकिस्तानची मदत बंद करणार असेच बोलत होते. बर्क व ओलर यांनी सेराबियनना काय झाले असे विचारल्यावर त्यांनी बार्लो प्रतिनिधींशी उद्धटपणे वागल्याचे सांगितले व त्या चार शब्दात बार्लोची कारकीर्द एका क्षणात संपली. बार्लोंनी बर्कच्या ऑफीसमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला आत जाऊ दिले गेले नाहीं. चर्चेबद्दलचा संपूर्ण लेखी वृत्तांत मिळेपर्यंत बर्क यांनी कुणाशीही कांहींही बोलायला नकार दिला. तो वृत्तांत मिळाल्यावर त्यांनी स्वतःला आपल्या ऑफीसात अनेक तास कोंडून घेतले. नंतर त्यांनी बार्लोंना बोलवून सांगितले कीं त्यांनी शक्य तितके चांगले काम केले होते. मग त्यांनी सेराबियनना आत बोलावले. त्यानंतर आतून आरडा-ओरड्याचे आवाज ऐकू येत होता.

प्रतिनिधीगृहापुढे खोटे बोलताना पकडले जाण्याची सरकारची ही पहिलीच वेळ नव्हती आणि हीच एक मोठी समस्या होती! बार्लोंनी आइन्सेल यांना अडचणीत टाकण्याआधी परराष्ट्रमंत्रालयात राजनैतिक-लष्करी विभाग सांभाळणारे व बार्लोंच्या मानाने बरेच ज्येष्ठ असलेले रॉबर्ट गालुच्ची हे अधिकारीही अशाच परिस्थितीत सापडले होते. सुरक्षासहाय्य, शास्त्र व तंत्रज्ञान हे विभाग पहाणारे उपपरराष्ट्रमंत्री विल्यम श्नाईडर यांच्या पाकिस्तानबद्दलच्या गुप्त साक्षीच्यावेळी गालुच्ची बार्लोंच्यासारखेच मागच्या बाकावर बसले होते. श्नाईडरनी चुकीची माहिती दिली व त्यामुळे गालुच्ची अस्वस्थ झाले. त्यांची ती अवस्था सगळ्यांच्या लक्षात आली कारण सारे लोक त्यांच्याकडेच पहात होते. गालुच्चींनी खरी माहिती दिल्यावर श्नाईडर रागावून कांहींही न बोलता निघून गेले व गालुच्ची अडचणीत आले.

असाच आणखी एक प्रसंग गालुच्चींना आठवत होता. पाकिस्तानला अमेरिकन सरकार एक चांगले व मैत्रीपूर्न राष्ट्र समजते. पण ते राष्ट्र एकदा नको त्या गोष्टी आयात करताना पकडले गेले. गालुच्चींना त्यातील प्रतिबंधित गोष्टी आयात केल्याबद्दलचा पुरावा काढून टाकण्याबद्दलचे एक पत्रही दिसले, पण त्यांनी त्या पत्राच्या खालच्या बाजूला मतभेद दर्शविणारी स्वतःची टीप लिहिली. या प्रसंगांमुळे गालुचींना बार्लोंच्याबद्दल सहानुभूतीपेक्षा बार्लोंना वाटणारे दुःख स्वतःचेच वाटत होते.

इतिहास 'नव्याने लिहिणे' हा पाकिस्तानच्या किचकट गुंतागुंतीमधील प्रमुख मुद्दा होऊन बसला! आइन्सेल, पेक ते थेट उपपरराष्ट्रमंत्र्यापर्यंतचे सारे अधिकारी बार्लोंच्या वरिष्ठ साहेबांशी तावातावाने बोलू लागले. त्यांनी गुप्तचरयंत्रणेचे उपनिर्देशक असलेल्या रिचर्ड केर यांच्याकडेही निषेध नोंदवला. शीतयुद्धात पारंगत असलेल्या अधिकार्‍यांना पाकिस्तानच्या मदतीवर येणार्‍या बंदीला वाचवायचा एकच मार्ग दिसत होता; तो म्हणजे बार्लोंना बदनाम करणे. त्यांना बार्लोंना नोकरीवरून काढून टाकायचे होते.

बार्लोंना वाटले कीं त्यांनी तिथल्या तिथे काय ते स्पष्ट सांगून आयुष्यभराची तडफड वाचवायला हवी होती. न्यूयॉर्क राज्याच्या मॅनहॅटन भागात वाढलेल्या बार्लोंना लष्करात शल्यविशारद असलेल्या वडिलांचा फारसा सहवास लाभला नव्हता. ते सहा वर्षाचे असताना त्यांची आई निवर्तली होती. वडिलांनी दुसरे लग्न करून बार्लोंना वसतीगृहाची सोय असलेल्या विश्वविद्यालयात पाठविले होते. आई-वडिलांचा सहवास नसल्याने दिशाहीन झालेले बार्लो न्यूयॉर्कमधील शिक्षण झाल्यावर थेट अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरील वॉशिंग्टन राज्यात उच्च शिक्षण घ्यायला गेले. तिथे शास्त्रशाखेत प्राविण्य मिळवीत असताना अण्वस्त्रप्रसारविरोधावर व्याख्यान देणार्‍या एका प्राध्यापकाच्या संगतीत आले व त्यांनी आपला शिक्षणक्रम बदलला. राजकारणशास्त्रातील उच्च शिक्षणात त्यांनी अण्वस्त्रप्रसारविरोधी गुप्तचरयंत्रणेवर प्रबंध लिहिला व परराष्ट्रसंबंधविषयक व्यवहारीपणा व अमेरिका कशी बर्‍याच गोष्टी जाणते पण त्यांच्यावर कारवाई करायला कशी कचरते वगैरे विषयावर शिक्षण घेतले. याचा अभ्यास करतांना त्यांचे लक्ष डॉ. खान यांच्याकडे गेले. पाकिस्तानसारख्या अण्वस्त्रप्रसारात गुंतलेल्या राष्ट्रांविरुद्ध टनावारी पुरावे असतानादेखील अमेरिका तिकडे दुर्लक्ष करते हेही त्यांनी पाहिले. त्यांना याचा अर्थ कळत नव्हता. कारण अमेरिकन सरकार अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून विश्वाच्या विनाशाशीच सौदा करीत होते.

सरकारच्या दुटप्पीपणामुळे व ढोंगीपणामुळे दुखावलेले बार्लो स्वतःला एकाद्या अमेरिकन अग्रेसराच्या (pioneer) भूमिकेत पाहू लागले. बार्लोंना दरम्यान परराष्ट्रमंत्रालयातर्फे सानुदान उमेदवारी मिळाली. पुढे १९८१मध्ये त्यांना ACDA(७) मध्ये नोकरी मिळाली जी त्यांना खूप आवडली. अण्वस्त्रप्रसारविरोधी खात्यात ते गुप्तचर अधिकारी म्हणून काम पाहू लागले. जरी सार्‍या जगातील अण्वस्त्रप्रसारविरोधी काम त्यांच्याकडे असले तरी मुख्यत्वाने पाकिस्तानी अण्वस्त्रप्रकल्पाच्या हालचालीच त्यांचा बहुतांश वेळ घेत. अभ्यासानंतर अण्वस्त्रात व इतरत्रही लागणारे व तंतोतंत सारखे असणारे घटकभाग पाकिस्तान कसे ऑर्डर करत होता व युरोपीय कारखान्यांची नफा करून घ्यायची हाव व डोळ्यावर ढापणे बसविलेली युरोपीय सरकारे या सर्वांपासून पाकिस्तानने कसा फायदा उठवला याचेही सखोल ज्ञान त्यांना झाले. विपुल गुप्त माहिती, शेकडो कागदपत्रें व त्यांचे याबाबतचे उच्च शिक्षण यामुळे अर्धवट ऐकलेल्या बातम्या व मध्येच छेडलेले संदेश या सर्वातून नेमके काय चालले आहे याचे चित्र डोळ्यासमोर उभे करणे त्यांना शक्य होऊ लागले.

पण त्यांचे हे काम रेगन यांच्या कार्यक्रमाच्या आड येत होते. म्हणून रेगननी ACDA हा विभागच बंद केला व बार्लो पुन्हा रस्त्यावर आले व किरकोळ कामे करू लागले. दरम्यान सिंडी (Cindy) या मैत्रिणीशी त्यांनी विवाहही केला. मग अचानक त्यांना CIA कडून बोलावणे आले. त्यानुसार त्यांना 'जेम्स बाँड' छापाचे काम मिळायचे होते. सहा महिने वेगवेगळ्या गुप्त ठिकाणी बैठकांना हजर राहिल्यानंतर त्यांना पुन्हा पाकिस्तानच्या अन्वस्त्रप्रकल्पाबद्दलचे संशोधन करण्याचे काम OSWRतर्फे(८) मिळाले.
अण्वस्त्रप्रसारबंदी व शीतयुद्धातील विजय या परस्परविरोधी ध्येयांमुळे रेगन यांच्या प्रत्येक खात्यात दुफळी माजली होती. एक फळी अमेरिकेच्या दीर्घकालीन फायद्याकडे बघत होती तर दुसरी जगाच्या भविष्याला आकार देऊ पहात होती. OSWRमधील लोकांना पाकिस्तानसारख्या देशांच्या हातात अण्वस्त्रे पडणे हे सोविएत संघराज्यापेक्षा जास्त खतरनाक वाटे. बार्लोंना द्व्यर्थी घटकभागांच्या काळ्या बाजाराचा अभ्यास करण्याचे काम मिळाले. पाकिस्तान अण्वस्त्रांसाठी लागणारे घटकभाग इतर ठिकाणी वापरण्याच्या बहाण्याने मागवत असे व बार्लो त्यावर नजर ठेवीत असत. असे भाग अमेरिका, इंग्लंड, जर्मनी व जगातील इतर ठिकाणांहूनही मागवत असे. पण बार्लोंचे या सर्वांकडे लक्ष होते.

युरोपमधील इतर देशांबरोबर समन्वय साधण्याच्या दृष्टीने बार्लोंनी MI6 या ब्रिटिश गुप्तचरसंघटनेबरोबरही संबंध प्रस्थापित केले. Travellers' Clubसारख्या सुमार हॉटेलांत बसून ते व त्यांचे ब्रिटिश सहयोगी 'जॉन स्टीड' खानसाहेबांच्या प्रकल्पाच्या दिशेबद्दल विचारविनिमय करीत. त्यावेळी 'लिझरोज' नावाच्या कंपनीवर नजर होती कारण या कंपनीतर्फेही मारेजिंग पोलादाची पाकिस्तानात निर्यात जर्मनीतून करण्याचे प्रयत्न सुरू होते! दोघे भरपूर कामही करीत व नंतर दारू पिऊन तर्रही होत!

CIAत बार्लो हे एक असामान्य बुद्धीचे मानले जाऊ लागले. आपल्या कामाचा त्यांना ध्यास असे व ते कामामुळे पछाडले गेल्यासारखे वागत. त्यांना CIA सारख्या युद्धखोर, झगडाळू संघटनेतील राजकारणाचा अनुभव नव्हता. सरकारी खाती त्यांनी OSWR साठी केलेल्या संशोधनातील फक्त सोयिस्कर भाग उचलून घेत. अशा लोकांबद्दल सहिष्णुताही त्यांच्याकडे नव्हती! शीतयुद्ध फळीच्या अधिकार्‍यांना बार्लोसारखे संशोधक आतल्या खोलीत हवे असत व त्यांना प्रतिनिधीगृहाच्या सभासदांपासून दूरच ठेवण्याकडे कल असे.

पाकिस्तान व खानसाहेब यांच्या फायलींचा सखोल अभ्यास करताना बार्लोंना एक पहिला आश्चर्यजनक शोध लागला तो म्हणजे वारंवार दिसणारी एकाच तर्‍हेची वर्तणुक (pattern)! जणू सगळ्यांना 'गिर्‍हाईकज्वर'च झाला होता. त्यांच्या लक्षात आले की परराष्ट्रमंत्रालय आपल्याकडील पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाबद्दलची गुप्त व महत्वाची बरीच माहिती दाबून ठेवत असे. त्यामुळे सरकारच्याच इतर खात्यांना ती वापरता येत नसे. उदा. निर्यात परवान्यांना मान्यता देण्याची जबाबदारी असलेल्या वाणिज्यखात्याला व त्यांवर कार्यवाही करणार्‍या कस्टम्सखात्याला आपले काम नीटपणे करण्यात आडकाठी येत असे.

बार्लोंनी अशी महत्वाची माहिती सर्वांना मिळावी यासाठी एक 'आंतरविभागीय गट' स्थापण्याच्या उद्देशाने मोहीम सुरू केली करण मिळालेली माहिती सर्वांमध्ये वाटण्याची गरज उघड दिसत होती. PAEC(९) खानसाहेबांचे सहाय्यक इतके 'बिंधास'पणे काम करीत कीं अनेकदा ते घटकभाग आपल्या घरच्या पत्त्यावर मागवीत. बार्लोंच्याकडे अशा लोकांचे इस्लामाबादमधील पत्ते होते, ते निर्यातीची कागदपत्रें पहाणार्‍या कस्टम्सखात्याला माहीत असते तर त्यांना अशा निर्यातींकडे खास लक्ष देता आले असते. बार्लोंच्या चिकाटीमुळे त्यांना कॅलिफोर्नियामधील एका 'चारचौघां'सारख्या दिसणार्‍या श्री व सौ अ‍ॅर्नॉल्ड व रोना मँडेल या दांपत्याचा शोध लागला. यांनी ९९३,००० डॉलर्स किमतीची हायटेक सामुग्री (संगणक, ऑस्सिलोस्कोप्स, प्रोग्रामेबल डिजिटलायझर्स वगैरे) हाँगकाँगला निर्यात केली होती व तेथून एका चिनी गृहस्थाने ती उचलली व PAECचे अणूबाँबच्या संरचना कार्यशाळेचे(१०) प्रमुख डॉ. मुबारकमंद यांच्या खासगी पत्त्यावर पाठविली होती. पण वाणिज्य किंवा कस्टम्सच्या अधिकार्‍यांना ही माहीती दिलीच गेली नव्हती.

१९८६साली बार्लोंच्या मोहिमेला यश अले व 'परमाणू निर्यात नियमभंगविरोधी कार्यकारी गटा'ची(११) स्थापना झाली. परराष्ट्रमंत्रालयातील अण्वस्त्रप्रसारविरोधी ज्येष्ठ अधिकारी फ्रेड मॅकगोल्डरिक त्याचे अध्यक्ष नेमले गेले. मग बार्लोंना आणखी एक प्रक्षोभक शोध लागला. परराष्ट्रमंत्रालय गुप्त महिती दाबून तर ठेवत असेच पण यापुढे जाऊन वाणिज्यमंत्रालयाने अण्वस्त्रप्रसारविरोधी भूमिकेतून हायटेक सामुग्रीच्या निर्यातींना परवाने नाकारलेले असताना वॉशिंग्टनमधील पकिस्तानी दूतावासाला अशा अनेक निर्यातींना परवाना देऊन 'मागच्या दाराने' अशा प्रतिबंधित वस्तूंच्या निर्याती सुलभ करून देत असे. पाकिस्तानातून येणार्‍या-जाणार्‍या तारांचा-केबल्सबाबत अधिक खोलवर अभ्यास केल्यावर बार्लोंच्या लक्षात आले कीं CIA व कस्टम्सविभागांनी रचलेले सापळे सावज पकडण्यात सारखे अयशस्वी व्हायचे. घटना व केबल्स यांचा स्भ्यास केल्यावर बार्लोंच्या लक्षात आले कीं परराष्ट्रमंत्रालयाकडून पाकिस्तानला निषेधखलित्यांच्या(१२) स्वरूपात अशा सापळ्यांची अचूक माहिती मिळायची. बार्लोंच्यामते हा सरळ-सरळ देशद्रोह होता!

या निषेधखलित्यांचा उगम नक्कीच परराष्ट्रमंत्रालयातील गुप्त माहिती पहाण्याची अनुमती (clearance) असलेले ज्येष्ठ अधिकारीच असणार याची बार्लोंना खात्री होती. त्यांनी शोध जारी ठेवला व शेवटी गुप्तचरयंत्रणेचे उपनिर्देशक रिचर्ड केर यांना ते भेटले. त्यांनी ताबडतोब लॅंग्ली येथील मुख्य कार्यालयात परराष्ट्रमंत्रालयातील सर्व ज्येष्ठ अधिकार्‍यांची एक बैठक योजली. त्यांनी सर्वांच्या लक्षात आणून दिले कीं या निषेधखलित्यांत व इतर खात्यांनी रचलेल्या सापळ्याच्या वेळापत्रकात विलक्षण संबंध दिसून येत होता. अशा कृत्यांना सरळ-सरळ घातपाती कृत्ये न म्हणता ते म्हणाले कीं हे प्रकार थांबले तर ते याबाबत अधीक सखोल तपास ते करणार नाहींत. परराष्ट्रमंत्रालयातील अधिकार्‍यांनी संमती दिली. या CIA व परराष्ट्रमंत्रालयातील समन्वयाचा फायदा असा झाला की यानंतर कांहींच दिवसात पाकिस्तानात जन्मलेले पण सध्या कॅनडाचे नागरिक असलेले एक 'सावज' बार्लोंच्या सापळ्यात अडकले.

वर सांगितलेली परवेझ यांची अटक तर परराष्ट्रमंत्रालयाला न सांगता गुप्तपणे केलेली कारवाई होती व ती यशस्वीही झाली. परवेझ व त्यांच्या इनाम या 'बोलविता धन्या'ला पेन्सिल्व्हेनियातील एका हॉटेलमध्ये बोलावण्यात आले. खर्‍या 'देवमाशा'ला पकडण्यासाठी त्यांच्याकडून 'लेटर ऑफ क्रेडिट' मिळविणे आवश्यक होते. ते देतांना त्या प्रसंगाचे छायाचित्रण व ध्वनिमुद्रण करण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. इनाम अमेरिकेत आहेत याची बार्लोंना माहितीही होती. अमेरिकन कायद्यानुसार अशा बाबतीत परराष्ट्रमंत्रालयाला माहिती देणे आवश्यक असल्यामुळे त्यांनी अगदी शेवटच्या क्षणी तशी माहिती त्यांना दिली. पर्वेझ आले, बडबडले व त्यांना अटकही झाली. त्याच्या कॅनडातील घरावर टाकण्यात आलेल्या छाप्यात मिळालेल्या कागदपत्रांवरून बार्लोंचा संशय बरोबर ठरला. पण इनाम मात्र त्या सापळ्यात अडकला नाहीं. याची पुढील चौकशी पूर्ण करण्याआधीच बार्लोंना सोलार्त्झ समितीच्या गुप्त व प्रक्षोभक बैठकीत बोलावले गेले. खूप दिवसांनंतर अनेक केबल्सच्या तपासणीनंतर बार्लोंना स्पष्ट पुरावा मिळाला कीं हा सापळाही अंतर्गत घातपातामुळेच अयशस्वी झाला होता व इनाम यांना त्या हॉटेलात न जाण्याबद्दल 'टिप' मिळाली होती.

केर व सोफाएर यांनी यांनी सुरू केलेल्या चौकशीत त्यांना परराष्ट्रमंत्रालयातील दोन ज्येष्ठ अधिकार्‍यांचा हात आढळून आला होता. त्यांनी तो निषेध खलिता वकीली जडजंबाळ भाषेत असा कांहीं 'गाडला' होता कीं पाठविणार्‍या अधिकार्‍याचे नाव समजणे कठीण होते. केर व सोफाएर यांनी सर्व पुराव्याचा अभ्यास केला. हा सापळा अयशस्वी करण्यात कनिष्ठ उपपरराष्ट्रमंत्री रॉबर्ट पेक व आणखी एक तशाच ज्येष्ठ अधिकार्‍याचा हात होता हे उघड होते. हे आरोप हताश करणारे होते! इनाम सापळ्यात न सापडण्याबद्दलचे सर्व पुरावे हे परराष्ट्रमंत्रालयातील ज्येष्ठ अधिकार्‍यांनी केलेले घातपाती कृत्य आहे हे उघड करत होते.

परराष्ट्रमंत्रालयाच्या वकीलांनी सर्व गोष्टींचा विचार केला. न्यायखात्याकडून पेक व दुसर्‍या अधिकार्‍याची चौकशी करविण्यासाठी एका स्वतंत्र वकील नेमावा लागेल व त्यानंतरच्या चौकशीत अनेक राष्ट्रीय गुपिते बाहेर येतील या कारणांमुळे त्यांनी अधीक चौकशी न करण्याचा निर्ण्य घेतला. त्याच वेळी प्रेस्लर घटनादुरुस्तीनुसार आवश्यक असलेले डिसेंबर १९८७ सालचे प्रशस्तीपत्रक देतांना रेगननी पुन्हा एकदा "पाकिस्तानकडे आण्वस्त्रे नाहींत"ची जपमाळ ओढली!

दुसर्‍याच दिवशी ज्यूरीने परवेझला बेकायदेशीरपणे मारेजिंग पोलाद व बेरिलियमच्या पाकिस्तानला केलेल्या निर्यातीच्या प्रयत्नासाठी दोषी ठरविले व त्यानुसार सोलार्त्झ घटनादुरुस्तीचा उपयोग करण्याची वेळ येऊन ठेपली. पण शेवटी सोलार्त्झ, बार्लो व ओलर यांचे परिश्रम वायाच गेले कारण १५ जानेवारी १९८८रोजी रेगननी राष्ट्रीय सुरक्षिततेचे कारण पुढे करून सोलार्त्झ घटनादुरुस्ती गैरलागू जाहीर केली! एवढेच नाहीं तर रेगन "भारतीय उपखंडात व इतर ठिकाणी अण्वस्त्रप्रसार होऊ नये ही माझी बांधिलकी कुठल्याही प्रकारे कमी झालेली नाहीं" हे सांगूनही मोकळे झाले!

बार्लोंचा सत्कार होऊ लागला. त्यांना CIAसाठी अत्युच्च किमतीची सेवा केल्याबद्दल "Certificate of Exceptional Accomplishment" देण्यात आले. गुप्तचरयंत्रणेतील कनिष्ठ उपसचीव रिचर्ड क्लार्ककडून "प्रदीर्घ व गुंतागुंतीच्या अन्वेषणातील लक्षणीय सहाय्या"बद्दल त्यांची प्रशंसा झाली. अब्राहम सोफाएर यांनीही त्यांच्या स्पष्ट, सुसंघटित व चांगल्या पद्धतीने लेखी स्वरूपात केलेल्या महत्वाच्या योगदानाबद्दल कौतुक केले.

पण ही बक्षिसें व कौतुकाचे शब्द मिळूनही बार्लोंना त्यांच्या CIA मधील सहकार्‍यांकडून चांगली वागणूक मिळत नव्हती. आइन्सेल तर त्यांना बदनाम करायला टपले होतेच! कुशल अन्वेषक व पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाबद्दलचे अग्रिम विशेषज्ञ असलेल्या बार्लोंना CIAमध्ये कांहीं महत्वच नव्हते कारण रेगन सरकार पाकिस्तानचा अण्वस्त्रप्रकल्प अस्तित्वातच नाहीं असे मानत होते! बार्लोला CIAच्या उपहारगृहात झिडकारले जात होते, आइन्सेल व सेराबियनसारख्यांच्याकडून हैराण केले जात होते. शेवटी बार्लोंच्या लक्षात आले कीं त्यांना मनापासून आवडणारे काम त्यांना सोडावे लागणार आहे.

घरीही परिस्थिती वेगळी नव्हती. त्याचे लग्नही मोडकळीस आले होते. बार्लो अत्यंत दुःखी असे व सिंडीला त्याच्या असल्या विषण्ण मनस्थितीत त्याच्याबरोबर रहाणे जड जात होते. पण त्यांच्या आइन्सेलबरोबरच्या भांडणानंतर व परराष्ट्रमंत्रालयाबरोबरच्या संघर्षानंतर त्यांना नोकरी कोण देणार होते? त्यामुळे बार्लोंचा धीर सुटत चालला.

शेवटचा उपाय म्हणून त्यांनी जेराल्ड ब्रूबेकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांची ओळख एका गुप्त कार्यकारी गटात असताना झाली होती व त्यांना बार्लो मित्र समजत होते. त्यांनी बार्लोंना पेंटॅगॉनमध्ये गुप्तचरयंत्रणेत अन्वेषकाची नोकरी देऊ केली व ती त्यांनी घेतली.

सालाबादप्रमाणे रेगननी २५ मार्च १९८८रोजी अण्वस्त्रप्रसारविरोधातले आपले शेवटचे वार्षिक निवेदन केले. पुढच्या वर्षी नवे राष्ट्रपती अधिकारावर यावयाचे होते व म्हणून हे त्यांचे शेवटचे निवेदन होते. परवेझ पाकिस्तानचा हस्तक होता हे त्याना माहीत असूनही, सोलार्त्झ यांच्याकडून वारंवार पाकिस्तान अण्वस्त्रनिर्मिती करत आहे अशा सूचना मिळूनही व त्यांच्या अनेक सहकार्‍यांवर पाकिस्तानला गुप्त माहिती पुरविल्याचे आरोप असूनही रेगननी आपली नेहमीचीच रेकॉर्ड पुन्हा वाजवली!

"शस्त्रास्त्रनियंत्रणाच्याबाबतीत माझे मुख्य ध्येय अण्वस्त्रे कमीत कमी करण्याचे व शक्य झाल्यास नाहींशी करण्याचे असून जगाची या सर्वनाशक शस्त्रांपासून सुटका करण्याचेच आहे" असे सांगून ते मोकळे झाले. अण्वस्त्रांचा प्रसार अण्वस्त्रे नसलेल्या देशांत होऊ न देणे हा त्या ध्येयाचा एक अविभक्त भाग आहे व या ध्येयासाठी अथक निश्चयाने व कळकळीच्या वैयक्तिक बांधिलकीने मी प्रयत्न करीतच राहीन असेही ते म्हणाले.

पण खासगीत बोलताना रेगनना त्यांच्या अण्वस्त्रप्रसारविरोधी धोरणाच्या चिंध्या झाल्याचे सांगण्यात आले होते. दक्षिण आशियात अण्वस्त्रांवरून गोष्टी इतक्या निकरावर आल्या होत्या कीं राष्ट्रीय सुरक्षा समितीकडून (NSC) रेगन यांच्यावर पाकिस्तानला अण्वस्त्रनिर्मितीचा प्रकल्प ताबडतोब थांबविण्याबद्दल समज देण्यासाठी दबाव आणण्यात आला. NSCचे ज्येष्ठ निर्देशक रॉबर्ट ओकली यांच्या आठवणीनुसार अशी संधी संरक्षणमंत्री फ्रँक कार्लुच्ची जेंव्हां अफगाणिस्तानमधून सैन्य मागे घेण्याबद्दलच्या सोविएत संघराज्याबरोबरच्या तहाच्या अटींवर चर्चा करायला इस्लामाबादला गेले तेंव्हां आली. ते यावेळी झियांना अण्वस्त्रांबद्दल खोटे बोलायचे थांबवण्याबद्दल बजावणार होते. पण झियांना फक्त अफगाणिस्तानबरोबरच्या तहाच्या अटींमध्येच रस होता.

या तहात सोविएत सेना बाहेर काढणे, त्यांची आर्थिक मदत बंद करणे व अफगाणिस्तानला आपला देश स्वतःच चालवू देणे हे अमेरिकेचे प्रमुख हेतू होते! पण झियांचे मत होते कीं आठ वर्षें अफगाण युद्धात मदत केल्यानंतर काबूलवर सत्ता गाजविण्याचा त्यांना अधिकार होता. रेगनबरोबर झालेल्या टेलिफोनवरील संभाषणात त्यांनी सांगितले कीं अफगाणिस्तानबरोबरच्या तहावर सही करण्यात त्यांना आनंदच होत होता, पण सोविएत सैन्य मागे घेतल्यानंतर मुजाहिदांचा शस्त्रपुरवठा बंद करणाची मॉस्कोने घातलेली अट पाळण्याचा त्यांचा मुळीच इरादा नव्हता! रेगननी झिय़ांना खोटे न बोलण्याबद्दल ताकीत दिल्यावर त्यांनी ताड्कन उत्तर दिले कीं गेली आठ वर्षें तिथल्या युद्धात सहभाग नसल्याबद्दल ते खोटेच बोलत आले होते व चांगल्या कामासाठी खोटे बोलायला इस्लाम परवानगी देतोच! फ्रँक कार्लुच्चींनाही त्यांनी तेच सांगितले! परत गेल्यावर आपल्या झियांच्या बरोबरच्या संभाषणाचा अहवाल देतांना ते म्हणाले कीं झियांनी त्यांना सांगितले होते कीं रेगन जसे अण्वस्त्रांबद्दल गेली कित्येक वर्षें खोटे बोलत होते व झिया स्वतः गेली दहा वर्षें अफगाणिस्तानबद्दल जसे खोटे बोलत आले होते तसे खोटे बोलणे ते चालूच ठेवणार होते!

एवढेच नाहीं तर अफगाणिस्तानच्या तहावर सह्या झाल्यानंतर थोड्याच दिवसात, १९८८च्या २६ एप्रिलला जिनीव्हा येथे, 'वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रांच्या महत्वाकांक्षांबद्दल सांगितले कीं पाकिस्तानने यश मिळविलेच आहे व आता ते आरामात ते यश उपभोगणार होते! Carnegie Endowment या अमेरिकन संस्थेच्या शिष्टमंडळापुढे बोलताना ते याहीपुढे जाऊन म्हणाले कीं आता पाकिस्तानने अण्वस्त्रनिर्मितीत यश मिळवले असून त्याचा प्रतिबंधात्मक छाप मारण्यासाठी उपयोग करणे चांगलेच आहे.

रेगन यांना आपला मुद्दा ठासून सांगण्याची गरज होती व ती संधी त्यांना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री साहबजादा याकूब खान यांच्या वॉशिंग्टन भेटीत मिळाली! कहूताप्रकल्प छोटा होण्याऐवजी वाढत कां चाललाय् या प्रश्नाला याकूबनी उडवाउडवीची उत्तरें द्यायला सुरुवात केली. हेही सांगितले कीं रेगन यांच्या १९८६च्या पत्रानुसार पाकिस्तानने युरेनियमचे ५ टक्क्यापेक्षा जास्त शुद्धीकरण केलेले नाहीं. पण जेंव्हा त्यांना अमेरिकेच्या गुप्तचरयंत्रणेने जमविलेली कहूताचे नकाशे, उपग्रहावरून घेतलेले फोटो व इलेक्ट्रॉनिक सहाय्याने जमविलेल्या माहितीची भेंडोळी दाखविण्यात आली तेंव्हा मात्र याकूबखान घाबरले. कारण त्यांनाही याची माहिती नसावी! ओकलींना संशय होता कीं पाकिस्तान आता परमाणूविद्या मध्यपूर्वेतील राष्ट्रांना विकू लागला होता. पण त्यांच्याकडे याकूबना हटकण्याएवढा पुरावा नव्हता.

पण ओकलींचा संशय खरा होता.

अफगाणिस्तानचा तह झाल्यावर अमेरिका पाकिस्तानला वार्‍यावर सोडणार अशी झियांना शंका होती. मग अमेरिकेच्या आर्थिक मदतीची भरपाई करू शकणार्‍या श्रीमंत व लष्करी मित्रांच्या ते शोधात होते. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी त्यांचे उपसेनापती मिर्ज़ा अस्लम बेग व ISIचे नवे प्रमुख हमीद गुल यांना या "कोलांटी उडी"ला मूर्त स्वरूप द्यायची जबाबदारी दिली.
या दोघांनी बनविलेल्या 'श्वेतपत्रिके'त अफगाणिस्तानमध्ये इस्लामाबादच्या पसंतीचे सरकार स्थापणे, इराणबरोबरच्या प्रस्थापित अण्वस्त्रप्रकल्प करारावर पुढे चर्चा करणे व इराणने आधीच विकत घेतलेल्या 'P-1' सेंट्रीफ्यूजच्या तंत्रज्ञानाची व्याप्ती आणखी वाढविणे, तसेच या गटात नाटोच्या दक्षिण टोकाला असलेल्या तुर्कस्तानला समावेश करून घेऊन युरोपपासून आशियापर्यंत इस्लामची चंद्रकोर तयार करणे व त्याद्वारे सर्वांच्या सुरक्षिततेत वृद्धी करणे असे मुख्य मुद्दे होते. श्वेतपत्रिकेत कुठेही पाकिस्तानच्या अणूबाँबचा उल्लेख नसला तरीही तो पार्श्वभूमीवर होताच. हा आलेख तयार होताच झियांनी बेगना तेहरानला धाडले. या डावपेचांबाबत इराणबरोबर एकमत तयार करणे व कहूता तंत्रज्ञानाच्या पुढील विक्रीबद्दल चर्चा करणे ही जबाबदारी त्यांना दिली गेली होती. त्यानंतर अनेक वर्षें बेग पाकिस्तान-इराण यांच्यामधील परमाणू तंत्रज्ञानाच्या संबंधांबाबतीत एक महत्वाचा दुवा बनले होते.
दुसर्‍या बाजूला खानसाहेब आपले व्यूह बनवत होते. कहूता आता छान चालले होते व चाळीस बाँब बनवता येतील इतके अतिशुद्धीकृत युरेनियम आता पाकिस्तानच्या गुदामात होते. खानसाहेबांना आपली उपयुक्तता संपल्याचे जाणवू लागले होते. बाँबच्या संरचनेबद्दल व निर्मितीबद्दल ते अंधारातच होते कारण ती जबाबदारी PAEC च्या डॉ. समर मुबारकमंद व त्यांच्या 'वाह'स्थित चमूकडे होती. शिवाय फ्रान्स व चीनकडून मिळवलेल्या क्षेपणास्त्रांबद्दलच्या तंत्रज्ञानाची जबाबदारीही मुबारकमंदांकडेच होती. हत्फ-१ व हत्फ-२ या क्षेपणास्त्रांची शीत-चांचणीही झाली होती व थारच्या वाळवंटात यशस्वी चांचणी केल्यावर मुंबई व दिल्लीवर हल्ला करण्याची पात्रता त्यांना प्राप्त व्हायची होती.

झियांनी खानसाहेबांच्या नकळत मुनीर यांच्या PAECसाठी अनेक करार केले होते. झियांनी चीनच्या अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता असलेल्या ३६ क्षेपणास्त्रांच्या सौदी अरेबियाबरोबरच्या सौद्यात भरीव मदत केली होती. या सौद्याची किंमत होती ३०० कोटी डॉलर्स. सौदींने ही क्षेपणास्त्रें आनंदाने विकत घेतली व चीनबरोबर राजनैतिक संबंधही प्रस्थापित केले. या कामाबद्दल चीनकडून व सौदी अरेबियाकडून पाकिस्तानला अण्वस्त्रप्रकल्पात वाढीव मदत व आर्थिक मदत असा दुहेरी फायदा झाला. त्याबदल्यात पाकिस्तानने मुनीर खान यांचा बाँब तयार होताच सौदी अरेबियाला गुपचुप तो देण्याचेही मान्य केले होते. सौदी अरेबियाला बाँब बनविण्यात रस नव्हता, त्यांना आणीबाणीसाठी 'तयार माल' गुपचुपपणे साठवून ठेवायचा होता. पाकिस्तानने तो देण्याचे मान्य केले होते. याच्या बदल्यात त्यांना कोट्यावधी डॉलर्स मिळणार होते!

पण याला मूर्त स्वरूप यावयाच्या आधीच १७ ऑगस्ट १९८८ रोजी 'camouflage' केलेले C-130 जातीचे पाकिस्तानी हवाई दलाचे विमान आकाशातून कोसळले व त्यात झिया, भूतपूर्व ISIचे प्रमुख व सध्याचे joint chief of staff रहमान, अमेरिकेचे राजदूत अ‍ॅर्नॉल्ड राफेल, अमेरिकेचे लष्करी अताशे ज. हर्बर्ट वस्सम व इतर २७ जण कालवश झाले. या अपघाताने 'किंमत मोजेल त्या राष्ट्राला' अण्वस्त्र तंत्रज्ञान व अण्वस्त्रे विकणार्‍या एका अघोषित अण्वस्त्रधारी राष्ट्राचा जणू शिरच्छेदच केला गेला व अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्रालयाला असा झटका दिला कीं हात चोळत बसण्याशिवाय त्यांना दुसरे कांहीं करताच येईना.
================================
टिपा:
(१) Office of Scientific and Weapons Research
(२) माहिती जमविण्याचे कांहीं प्रकार असे आहत: Humint (human intelligence) म्हणजे शत्रूच्या प्रदेशात पाठविलेल्या गुप्तहेराकडून जमविलेली माहिती; Photint (Photographic intelligence) म्हणजे उपग्रहाच्दारा किंवा अति उंचीवरून उडणार्‍या यू-२ सारख्या विमानांद्वारा काढलेल्या छायाचित्रांतून जमविलेली माहिती; Comint (Communication intelligence) म्हणजे संदेशांना मध्येच अडवून व ते उकलून जमविलेली माहिती; आणि royal म्हणजे अतीशय ज्वालाग्राही माहिती अतीशय गुप्तपणे मिळविलेलेई व मोजक्या लोकांनाच माहिती असण्याची अनुज्ञा असलेली. बार्लोंना ही सारी माहिती वाचण्याचा/तपासण्याचा अधिकार (clearance) दिलेला होता.
(३) रेगन सरकार कसे एककल्लीपणाने "single-track mind" विचार करीत असे व कसे सगळ्यांना आपल्या बाजूला वळवीत असे याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. साधारणपणे डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष अशा तर्‍हेने कारभार करत नाहींत किंवा करू शकत नाहींत. रिपब्लिकन पक्ष जास्त एकसंध आहे असे आजही आढळून येते.
(४) यावरून या प्रकरणाचे नाव The Winking General असे ठेवण्यात आले आहे.
(५) या चौकशीअंती १०-१२ जणांना शिक्षा झाली, पण सारे थोरल्या बुशच्या कारकीर्दीत किरकोळ तांत्रिक कारणावरून अपीलात सुटले तर वाईनबर्गरना थोरल्या बुशनी माफी दिली! यावरून अमेरिकेत न्यायसंस्थेची काय दारुण परिस्थिती आहे हे कळून येते!
(६) जरी बार्लोंनी हे सारे त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीनुसार केले असले व भारतावरच्या प्रेमाखातर केले नसले तरी भारत सरकारने बार्लोंचा मुलकी किताब देऊन सन्मान करावा असे मला वाटते. कारण असे केल्याने अमेरिकेतील सनदी नोकरवर्गात भारताला मित्र निर्माण होतील ज्यांची आज नितांत गरज आहे. सत्य हेही आहे कीं त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीनुसार काम केल्याने बार्लोंची नोकरी गेली, त्यांचे लग्न मोडले व आज ते एक निष्कांचन अवस्थेत मोंटानासारख्या आडवळणाच्या राज्यात जीवन कंठत आहेत! त्याची भरपाई कांहीं प्रमाणात तरी असे मुलकी सन्मान देऊन करता येईल. त्याचबरोबर आपली कृतज्ञताही व्यक्त करता येईल. (बार्लो यांच्या या कहाणीवरील सुधीर काळे यांचा स्वतंत्र लेख "उत्तम कथा" या मराठी मासिकाच्या २००९च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे.)
(७) Arms Control and Disarmament Agency
(८) Office of Scientific and Weapons Research
(९) Pakistan Atomic Energy Commission
(१०) PAEC’s warhead design workshop
(११) Nuclear Export Violations Working Group
(१२) Démarche
-------------------------------
सर्व प्रकरणांचे दुवे:
Foreword-Core: http://www.misalpav.com/node/10857
Chapter 1-Angry Young Man: http://www.misalpav.com/node/10935
Chapter 2-Operation Butter Factory: http://www.misalpav.com/node/11039
Chapter 3-In the valley of death: http://www.misalpav.com/node/11139
Chapter 4-Peanuts: http://www.misalpav.com/node/11266
Chapter 5-The Ties That Bind: http://www.misalpav.com/node/11433
Chapter 6-The figment of Zionist Mind: http://www.misalpav.com/node/11738
Chapter 7-A Bomb for the Ummah: http://www.misalpav.com/node/11798
Chapter 8-Pineapple Upside-Down Cake: http://www.misalpav.com/node/11936
Chapter9-The Winking General: http://www.misalpav.com/node/12145
Chapter 10-Gangsters in Bangles: http://www.misalpav.com/node/12224
Chapter 11-Guest of the Revolutionary Guard: http://www.misalpav.com/node/12301
Chapter 12-Project A/B: http://www.misalpav.com/node/12421
-------------------------------

राजकारणमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

II विकास II's picture

30 Apr 2010 - 8:35 am | II विकास II

मला काहीच दिसत नाही.
:(
---

प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.

नेत्रेश's picture

30 Apr 2010 - 12:34 pm | नेत्रेश

धन्यवाद.

चुकीच्या जागी पोस्ट झाल्यामुळे काढून टाकला आहे.

मदनबाण's picture

30 Apr 2010 - 10:54 am | मदनबाण

हा ही भाग आवडला...
पाकडे शब्दांचा खेळ करण्यात माहिर आहेत हेच दर वेळेला कळुन येते. आपली परराष्ट्र निती एव्हढी दुबळी का ? हा प्रश्न शेवटी उरतोच...भारताच्या विकासाला लगाम घालण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची मदत होत आहेच आणि चीन व अमेरिका दोघांना खुश ठेवुन पाकडे मात्र बरेच उद्योग करुन मोकळे झाले आहेत...क्षेपणास्त्र चीनी बनावटीची आणि विमाने अमेरिकन बनावटीची...म्हणजे सारी उंगलिया घी में....

अमेरिकेला तर लयं काळजी हाय पाकड्यांची अन् त्यांच्या सुबत्तेची...
http://www.america.gov/st/peacesec-english/2010/March/20100324164228esna...

आपण मात्र संवाद संवाद खेळणार !!! कोणशी ज्यांचा सगळा वेळ आपल्या देशा विरुद्ध कट कारस्थाने करण्यात जातो...
http://bit.ly/bPjUGB

पाकिस्तान सैन्याची हालचाल फार वेगाने आणि वेगवेगळ्या पद्धतीने करतो आहे...हा एक प्रकारचा फायदाच आहे त्यांना....सैन्याची हालचाल ज्याला सुलभपणे करता येते त्याला खर्‍या युद्धात त्याचा बराच फायदा होतो हे मात्र नक्की.सध्या हिंदुस्थानी सैन्याने शेवटचा युद्ध अभ्यास कधी केला होता ते आठवतोय..
कारगिल युद्धा नंतर हिंदुस्थानच्या सैन्यदला बद्धल अशी माहिती बाहेर आली...
http://news.indiamart.com/news-analysis/kargil-conflict-show-3367.html कॅप्टन कालिया सारखे शुर या देशात जन्माला येतात म्हणुन तुम्ही आणि मी सुखाने सामान्य जिवन जगतो...
पाकिस्तानने त्यांचा युद्ध अभ्यास सुर केला आहे,, म्हणे जो आत्ता पर्यंतचा सर्वात मोठा युद्ध अभ्यास असेल...
http://www.nytimes.com/2010/04/11/world/asia/11pstan.html

जाता जाता :--- तुम्ही गाफिल राहिला तर शत्रुला दोष देऊन काय उपयोग !!!

मदनबाण.....

Life is God's novel. Let him write it.
ISAAC BASHEVIS SINGER

पाकिस्तानी मुत्सद्देगिरीची पुन्हा सरशी :---
http://bit.ly/9ekroS

सातबारा's picture

30 Apr 2010 - 10:53 am | सातबारा

श्री. सुधीर काळेजी,

आपल्या लेखाची आतुरतेने वाट पहात होतो, आधाशासारखा वाचून काढला.

मला वाटते लोकशाही + देशाचा मोठा आकार (जसे भारत, अमेरिका ) हे काँम्बिनेशन त्या त्या देशासाठी प्रॉब्लेम ठरत असावेत.

आपल्या देशाला चीन सारखी एकपक्षीय लोकशाही आणि मुशर्रफ सारखा धूर्त नेता मिळाल्यास भारत महासत्ता होईल अन्यथा काही खरे नाही.

( मी तर गमतीने म्हणायचो - देश का नेता कैसा हो ? मुशर्रफ जैसा हो ) असो.

आपला बार्लो वरील लेख कसा वाचायला मिळेल ? (टीप ६ )

आपल्या सूचनेप्रमाणे आपणास व्यनि करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण मी येथे अजून नवखा असल्याने जरा चाचपडतो आहे.

---------------------
हे शेतकर्‍यांचे राज्य व्हावे.

सातबारा-जी,
http://www.misalpav.com/node/10046 या दुव्यावर हा लेख वाचायला मिळेल.
सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9

सुधीर काळे's picture

1 May 2010 - 11:14 pm | सुधीर काळे

परवेझ, रॉबर्ट पेकसारख्या खटल्यात रेगनच्या सहकार्‍यांनी केलेल्या लांड्यालबाड्या पहाता त्यांना कसलाच विधिनिषेध नव्हता हे लक्षात येते. पण डेमोक्रॅटिक पक्षाचे सिनेटर्स व रेप्रेझेंटेटिव्हमंडळी इतकी नक्काम कशी हे कळत नाहीं! विरोधी पक्षाचे काम असते सरकारला लाइनीत ठेवणे. हे काम ते करूच शकत नव्हते असेच या प्रकरणातील व आधीच्या प्रकरणांतील केसेसवरून लक्षात येते. (लक्ग्लेनसारखाअंतराळवीर-हे असे अक्षरांचे भजे कां होते? नीलकातना विनंती) अंतराळवीर जॉन ग्लेनसारखा 'हीरो' सिनेटर असूनही असा कसा परिणामकारकतेत शून्य निघाला? सोलार्त्झसुद्धा घटनादुरुस्ती करण्यापलीकडे कांहींच कसे कांहीं करू शकले नाहींत?
सिनेटच्या कमिट्यांकडे खूप अधिकार असतात. त्यांनी मनात आणले असते तर ते बार्लोला subpaena करू शकले असते (जसे पूर्वी निक्सनविरोधी चौकशीत खूप वेळा झाले, अगदी त्यांच्या टेप्सही 'expletives deleted' अवस्थेत subpaena करून मागविल्या गेल्या होत्या.)
अफगाणिस्तानच्या तहाच्या बाबतीत झियांनी केलेल्या वक्तव्यावरून तर त्यांचा धूर्तपणा, दूरदर्शीपण (व निर्लज्जपणा) दिसून येतो. "देशाच्या हितसंबंधांच्याप्र्क्षा दुसरे कांहींही महत्वाचे नाही" या निकषाप्रमाणे ते वागले. माझ्या मते देशाच्या नेत्यात हे गुण हवेतच! त्यांनी रेगननाही बजावले कीं "गेली आठ वर्षे वर्षें तुम्ही सगळ्यांना खोटे सांगत आलात, मग मला उपदेश कां देताय्?" हे त्यांच वाक्य वाचल्यावर तर मला "जय हो" म्हणावेसे वाटले! वर "चांगल्या कामांसाठी खोटं बोलायला धर्माचीही अडकाठी नाहीं" हे सांगून मोकळे!
शिवाय "हा बाँब सार्‍या मुस्लिम जगताचा" असे पहिल्यापासून म्हणणार्‍या झियांनी अण्वस्त्र तंत्रज्ञान मुस्लिम राष्ट्रांना विकायचा व (विकायचपैसेअमेरिकेची-हे असे अक्षरांचे भजे कां होते? नीलकातना विनंती) अमेरिकेची मदत बंद झाल्यावर त्यातून पैसे मिळवायचे हीही दूरदर्शी योजना आखली होती.
धूर्तपणात मुशर्रफही कमी नव्हते! '९/११'नंतर त्यांनी सफाईने तालीबान सरकारला (वर-वर पहाता) वार्‍यावर सोडले व आतून जुने धंदे चालूच ठेवले होते!
सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9

"दहा वर्षें ज. आरिफ यांनी झियांचे सेनाध्यक्ष (Chief of Army Staff) व कहूता प्रकल्पाचे उपाध्य़क्ष अशा दोन्ही जबाबदार्‍या पार पाडल्या. आता सेवानिवृत्त झालेले आरिफ ती दहा वषें पाकिस्तानातले सर्वात दुसर्‍या क्रमांकाचे बलवान नागरिक होते." पहा प्रकरण ३ "मृत्यूच्या दरीत".
आरिफ यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत. दोन्ही 'out of print' असून दोन्हीही वाचनीय असावीत. एक आहे "Working with Zia:Pakistan's Power Politics 1977-to1988" व दुसरे आहे "Khaki Shadows: Pakistan 1947-1997".
पहिले पुस्तक मला फ्लॉरीडा स्टेट युनिव्हर्सिटीत काम करणार्‍या माझ्या बहिणीच्या युनिव्हर्सिटीच्या पुस्तकालयात मिळाले. त्यात Epilogue मधील हे वाक्य मला खूप पटले. ते म्हणतात, "Politics in Pakistan is based on genes and means. Dynastic connections override efficiency." पाकिस्तानमधील लष्कराच्या राजकारणातील सततच्या दादागिरीचे मूळ या अपयशात आहे असे त्यांचे मत असावे असे Prologue आणि Epilogue वाचल्यावर वाटले.
आपल्या देशातही (केंद्रीय व राज्यस्तरांवर) घराणेशाही फोफावत आहे. "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" या न्यायाने आपण पाकिस्तानातील अपयशाकडे डोळसपणे पाहिले पाहिजे व आपल्या देशात लोकशाहीचा पराजय होऊ नये याकडे लक्ष दिले पाहिजे.
पुस्तक अद्याप पूर्ण वाचायचे आहे. जर मला ते आवडले (आवडेल असे वाटते) तर त्या पुस्तकाचा परिचय 'मिपा'करांना करून देण्याचा विचार आहे.
सुधीर काळे, या आठवड्यात तलाहासी, फ्लॉरीडा येथे धाकट्या बहिणीकडे!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9; प्रकरण दुसरे: http://tinyurl.com/2cptlvo

कांहीं कारणाने वरील टीप दोनदा Post झाल्यामुळे काढून टाकली आहे.