फसवणूक-प्रकरण १२: प्रकल्प "A/B" (Project A/B)

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
21 May 2010 - 11:27 pm

फसवणूक-प्रकरण १२: प्रकल्प "A/B" (Project A/B)
© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)

१९८९ साली अधिकारग्रहण केल्यानंतर बुश-४१ अमेरिका-पाकिस्तान संबंधांना नवी दिशा देतील असा प्रचार करण्यात आला होता. अशी कळकळीची विनंती करणार्‍यांमध्ये सगळ्यात जास्त प्रभावी सूर होता जेरार्ड स्मिथ यांचा. ते अमेरिकेचे अण्वस्त्रप्रसारविरोधात (NPT) सर्वात जास्त अधिकारवाणीने बोलणारे व आयसेनहॉवर, निक्सन व कार्टर यांच्या सरकारांत काम केलेले अधिकारी होते. आगाशाहींना 'व्हाईट हाऊसमध्ये बाजूला नेऊन 'अण्वस्त्रे निर्मिल्यास तुम्ही मृत्यूच्या दरीत प्रवेश कराल' असा सज्जड दम देणारेही तेच होते!

Foreign Affairs या आंतरराष्ट्रीय विषयावरील अव्वल समजल्या जाणार्‍या नियतकालिकात लिहिलेल्या लेखाद्वारे त्यांनी असे बजावले होते. त्यांनी कार्टर व रेगन यांना अमेरिकन जनतेला फसविल्याबद्दल दोष दिला व सोविएतसंघाबरोबरच्या युद्धात पाकिस्तानचा सहभाग चालू ठेवण्यासाठी व सोविएतसंघाचा पराभव करण्यासाठी पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाला 'नाइलाज' या नावाखाली प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष मदत करून त्याला अण्वस्त्रसज्ज केल्याबद्दलही स्मिथ यांनी त्यांना दोष देऊन सांगितले कीं सोविएत पराभवापेक्षा अमेरिकेचे अण्वस्त्रप्रसारविरोधाचे धोरण जास्त महत्वाचे होते व प्रयत्न केला असता तर या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या असत्या, पण असा प्रयत्नच झाला नाही असे प्रतिपादनही त्यांनी केले.

स्मिथ यांच्या मते अमेरिकेच्या पाकिस्तान धोरणाचा दारुण पराभव झाला होता. 'व्हाईट हाऊस'ने पाकिस्तानबद्दल वारंवार अनुमतीपूर्ण उदारमतवादी धोरण राबविले होते व त्यामुळे अण्वस्त्रप्रसारविरोधी कराराची परिणामकारकता व विश्वसनीयता कमालीची कुरतडली गेली होती. पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पात पाकिस्तानला अमेरिकेची मदत झालेली असल्यामुळे अमेरिकेचा तो एक मोठा नैतिक अधःपात होता व त्याचा फायदा घेऊन अण्वस्त्रनिर्मिती करू इच्छिणारी इतर राष्ट्रे आता ती मिळविण्यासाठी जोमाने प्रयत्न करू लागतील ही भयकारी चित्र स्पष्ट होऊ लागले होते. "आपल्याला वाळीत टाकलील" अशी अण्वस्त्रे बाळगण्याचा अधिकार असलेल्या विकसित राष्ट्रांची जी भीती बदमाष राष्ट्रांना वाटत असे त्या अण्वस्त्रप्रसारबंदीकराराच्या गाभ्याच्याच अशा तर्‍हेने ठिकर्‍या उडाल्या होत्या.

स्मिथ यांच्या मतें NPTच्या पथ्यांना १९६०च्या दशकात जितके महत्व होते त्याहून जास्त महत्व १९८९च्या दशकात होते. कारण होते अन्वस्त्रांची असाधारण संहाराची शक्ती. आणि सर्व जग आता परस्परांशी असे कांहीं बांधले गेले होते कीं कुणी असे अस्त्र वापरल्यास त्या घटनेचे तीव्र पडसाद सार्‍या जगात उठून जग एका संपूर्ण व जागतिक विध्वंसाच्या कड्यावर उभे व्हायचे. अमेरिकेच्या राष्ट्रीय डावपेचांत या पथ्यांना इतर सर्व कमी महत्वाच्या बाबींपेक्षा अग्रहक्क मिळणे जरूरीचे होते.
पाकिस्तानबद्दल कांहींतरी भक्कम उपाययोजना करायला हवी अशी धोक्याची घंटी १९९०च्या शरदऋतूत वाजली. बुश्-४१ना CIAकडून एक अहवाल आला. त्यात पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाला ब्रेक लावण्यासाठी त्याला हायटेक साधनसामुग्री विकण्यावर अमेरिकेने घातलेली बंधने पाकिस्तानकडून निर्दयपणे झुगारली जात होती. त्यामुळे पाकिस्तानची निर्भत्सना करणे व त्यावर कडक निर्बंध घालणे याबद्दल एकमत झाले होते. बुश-४१ व राजदूत ओकली यांनी राष्ट्रपती इशाक खान व बेग यांना वारंवार सांगितले कीं पाकिस्तानने आपला अण्वस्त्रनिर्मितीचा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केला होता हे अमेरिकेला माहीत होते. त्यामुळे अमेरिकेकडे पाकिस्तानवर कडक निर्बंध घालणे आवश्यक बनले आहे. तरीही पाकिस्तान ढिम्म राहिला. मग १ ऑक्टोबर १९९०रोजी बुश-४१ यांनी घोषणा केली कीं ते त्यावर्षी प्रेस्लर घटनादुरुस्तीला आवश्यक असलेले पाकिस्तानकडे अण्वस्त्रे नाहींत या अर्थाचे प्रशस्तीपत्रक देऊ शकणार नाहींत. त्यामुळे ५६-५७ कोटी डॉलर्सची अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाने १९९१सालासाठी आधीच मंजूर केलेली आर्थिक व लष्करी मदत गोठविण्यात आली आणि पाकिस्ताने जनरल डायनामिक्सवर ऑर्डर केलेली F-16 जातीची ३० विमानेही अरीझोनाच्या ट्यूसन (Tucson) येथील गोदामात ठेवण्यात आली!

पण स्मिथ यांचे म्हणणे जरा वेगळे होते. त्यांना अमेरिकेकडून पाकिस्तानवर त्यांचा अणूबाँबप्रकल्प बंद करण्याबद्दल किंवा कमीत कमी आवरता घेण्याबद्दल दबाव आणून पाहिजे होता. तसेच परराष्ट्रमंत्रालयाचे व 'व्हाईट हाऊस'चे दुटप्पी धोरण थांबविण्याबद्दल आग्रह होता व त्यांची सूचना अशी होती कीं आपले गांभिर्य दर्शविण्यासाठी एक शिक्षा म्हणून 'व्हाईट हाऊस'कडून आर्थिक मदत आखडती घेतली जावी व परराष्ट्रमंत्रालय व अमेरिकन संरक्षणमंत्रालय यांच्याकडून पाकिस्तानला धमक्या देणे, समजावणे व त्याच्यावरच्या लगामाची पकड आवळणे अशा कारवाया करण्यात याव्यात. पण झाले भलतेच. आधी दहा वर्षे पाकिस्तानला मागेल ते दिल्यानंतर एकाएकी पूर्ण मदत बंद केल्याने ही अण्वस्त्रे नको त्या हाती पडण्याची शक्यता वाढली व ते अमेरिकेच्या हिताचे नव्हते!

ACDAचे कनिष्ठ उपसंचालक नॉर्म वुल्फ यांच्या आठवणीनुसार पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाकडे कुणीच लक्ष देत नव्हते. त्या कार्यम्रमांना खीळ घालण्याचे आमचे सर्व प्रयत्न मागे पडले. पाकिस्तानमध्ये राष्ट्राध्यक्ष इशाक खान यांच्या हुकुमानुसार बनविलेल्या काळजीवाहू सरकारला इतका प्रचंड धक्का बसला कीं त्यांनी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री साहबजादा याकूब खान यांना अण्वस्त्रप्रकल्प बंद करण्याच्या आश्वासनासह वॉशिंग्टनला पाठविले. पण जेंव्हां त्यांनी अमेरिकेच्या अणूबाँबचे केंद्रस्थानाचे भाग नष्ट करण्याची व ते पुन्हा निर्माण करण्याची कार्यक्षमता नष्ट करण्याची मागणी अमान्य केली तेंव्हां त्यांच्या इतर विनंत्या मान्य न करता त्यांना रिकाम्या हाताने परत पाठविण्यात आले. त्या वेळी पाकिस्तानात लोकशाहीच्या प्रथेवर पुन्हा वार केले जात होते. एकेकाळचे ISI चे हस्तक असलेले व "भुत्तो हटाव" चळवळीचे अध्वर्यू हुसेन हक्कानी म्हणाले कीं पाकिस्तान एक धोकादायक चक्री वादळात सापडला होता. याच हक्कानींचा पुढे ISIबद्दल इतका भ्रमनिरास झाला कीं त्यानंतरच्या काळात ते राज्यावर येणार्‍या प्रत्येक पंतप्रधानाचे सल्लागार/वकील बनले.

लष्कर पाकिस्तानातील मुलकी पक्षांना समर्थ होऊ देत नव्हते. उलट या पक्षांनी ज्यांना ISI चे अधिकारी त्यांच्या बोटावर नाचवू शकतील असे लोभी उमेदवार उभे केले.

बेनझीर यांच्या सरकारला १९९०च्या ऑगस्टमध्ये बडतर्फ केल्यानंतर इशाक खान यांनी सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. पण लष्कर, गुप्तहेरखाते व धर्मांध पक्ष एकमेकांच्या नरडीचा घोट घेत होते. जो कुणी पंतप्रधानपदी निवडून आला असता तो लष्करावर इतका अवलंबून राहिला असता कीं इशाक खान, बेग व गुल या त्रयींने आधीपासूनच योजलेल्या पाकिस्तानच्या धोरणांवर त्याचा कुठलाच प्रभाव पडला नसता. नव्या पंतप्रधानाने अफगाणिस्तानातील वाढत्या कट्टर धार्मिक शक्तींच्या कारवायांत आणि अण्वस्त्रप्रकल्पात ढवळाढवळ करू नये व भारताबरोबर शांतता प्रस्थापित करायची इच्छा असेल तरी नव्या पंतप्रधानाने काश्मीरमधील ISI प्रणीत बंडखोरीला पाठिंबा द्यावा अशाच या त्रयीच्या अपेक्षा होत्या.
अमेरिकेच्या पाठिंब्याशिवाय निवडणुकीत उतरलेल्या बनझीरबाईंच्या समोर उभे होते IJI[२] चे उमेदवार. सेवानिवृत्तीपूर्वीचे एक वर्ष उरलेले बेग व बेनझीरबाईंनी काढून टाकलेल्या गुल या दोघांनी या उमेदवारांना 'तयार' केलेले होते व त्यांच्याकडून त्यांना PPP चा नायनाट करायचा होता. बेग यांना ले.ज. असद दुरणी नावाच एक नवा दलाल/सेवक मिळाला होता. त्यांनी १९८० ते १९८४ च्या दरम्यान लष्करी 'आताशे' म्हणून जर्मनीतील पाकिस्तानी दूतावासात काम केले होते व त्याकाळी जर्मनी हा कहूताप्रकल्पाच्या खरेदीजाळ्याचा केंद्रबिंदूच होता. दुराणींनी खानसाहेबांच्या कामाशी संबंध असल्याचे नाकारले होते.

खरे-खोटे देव जाणे, पण दुराणींना पदोन्नत्या मिळत-मिळत ते शेवटी लष्करी हेरखात्याचे Director General झाले व बेनझीरबाईंच्या बडतर्फीनंतर ISI चालविण्यासाठी बेगनी त्यांना निवडले होते.
बेग व दुराणींनी निवडणुकीचे 'अपहरण' करायचे ठरविले. १५ कोटी रुपयांचे 'लोन' घेऊन धर्मांध व सनातनी गटांना पैसे उपलब्ध करून देऊन त्यांनी बेनझीरबाईंविरुद्धच्या निवडणुकीत सनातनवादी सूर लावला. त्यात बेनझीरबाईंनी कार्टरसरकारात अधिकारी असलेल्या मार्क झीगल या ज्यूला सल्लागार म्हणून नेमले. पाकिस्तानी राजकारणात एकाद्या यहूद्याला सल्लागार नेमणे म्हणजे एकाद्या जिवंत बाँबवर बसण्यासारखेच होते. त्याची संभावना 'बेनझीरचा ज्यू' अशी केली जाऊन बेनझीरबाईंची अमेरिका-ज्यू कारस्थानातल्या भूमिकेसाठी अवहेलना करण्यात आली व परिणामत: बेनझीरबाईंची मोहीम या अप्रत्यक्ष आरोपात वाहून गेली व IJI चे बेग-गुल पुरस्कृत उमेदवार नवाज शरीफ निवडून आले.

१९४९सालच्या नाताळाच्या दिवशी जन्मलेले नवाज़ शरीफ हे महम्मद शरीफ या धनाढ्य कारखानदाराचे दुसरे सुपुत्र व महत्वाकांक्षी शहाबाज़ यांचे थोरले भाऊ! त्यांना खरे तर राजकीय महत्वाकांक्षा नव्हती पण झियांच्या वतीने जिलानी नावाच्या ISI च्या अधिकार्‍याद्वारा (जे पंजाबचे राज्यपालही होते व स्वतःसाठी वारस शोधत होते) आमंत्रण आले म्हणून आले व आल्यावर त्यांना हे राजकीय जग आवडले. १९८५ साली ते पंजाबचे राज्यपाल झाले आणि १९९०साली पंतप्रधान!

ते अमेरिकाद्वेष्टेही नव्हते किंवा धर्मवेडेही नव्हते पण त्यांच्याकडे एकाच वेळी परस्परविरोधी मते बाळगण्याची एक सावध क्षमता होती, उदाहरणार्थ लष्कराच्या .बाजूने व लष्कराविरुद्ध. कधीकधी कमी ऐकू येत असल्याचा बहाणा करून इतरांना निर्णय घेण्यास भाग पाडत. त्यांना संदिग्ध उत्तरे द्यायची संवय होती त्यामुळे लोकांना ते थोडे निर्बुद्ध वाटत. ते निर्बुद्ध नव्हते पण तसे दाखवत. पाच वेळ नमाज पढून धार्मिक असल्याचा देखावाही करत. ते सत्ताधार्‍यांच्या विरुद्ध प्रतिक्रियेपोटी निवडून आलेले होते म्हणून ते स्वतःला व्यावसायिकांच्या बाजूचे, पाश्चात्य मते असलेले व मध्यममार्गी पण जरासे उजव्याबाजूला झुकणारे राष्ट्रीय नेते असे दाखवून आपली छाप उमटवू इच्छित होते.

अमेरिकेने जर इस्लामाबादकडे दुर्लक्ष केले तर पाकिस्तान आणखीनच चुकीच्या मार्गाने जाईल असे स्मिथ यांचे मत होते तर अफगाणिस्तानला वार्‍यावर सोडून दिल्यास तो देश पाकिस्तानच्या ढवळाढवळीमुळे कट्टर पाश्चात्यविरोधी बनेल आणि अतिरेक्यांच्या हल्ल्यांच्या कारस्थानाचे केंद्र बनेल अशी काळजी CIA ला होती. एकेकाळचे स्वातंत्र्ययोद्धे स्वातंत्र्य मिळाल्यावर 'सवत्या सुभ्यां'चे 'सुभेदार' झाले होते आणि त्यांनी अफगाणिस्तानात क्रूर असे यादवी युद्ध पेटविले होते. त्यांच्याकडे भारत व पाकिस्तानकडच्या एकत्र हत्यारांपेक्षा जास्त छोटी हत्यारे होती. त्या राष्ट्रात हत्यारे व मुल्ला भरपूर संख्येने होते व दोन्हीत ISI ची लुडबुड होती!

इस्लामाबादमध्ये बेग व गुल पाकिस्तानच्या नव्या भागीदारांबरोबरचे नवे डावपेच आखत आपले बस्तान बसवत होते आणि लष्कराच्या गुप्त योजनांच्या आर्थिक गरजा नव्या पंतप्रधानांच्या पाठिंब्यासह किंवा शिवाय भागविता येण्याचे मार्ग शोधत होते. झिया असते तर त्यांनी मुस्लिम धर्माच्या व नीतिमत्तेच्या उल्लेखांवर, अण्वस्त्रसज्ज मुस्लिम राष्ट्रांची चंद्रकोर नाटोला शक्ती व परिणामकारकतेत नाटोच्या तोडीस तोड होईल असल्या गोष्टींच्या उल्लेखांवर भर दिला असता, पण बेग यांचा विश्वास होता "पैसा हाच परमेश्वर" यावर! प्रत्येक राष्ट्राला अण्वस्त्रें बाळगण्याचा हक्क आहे आणि NPT हा विकसित राष्ट्रांनी आधी तंत्रज्ञान आधी मिळवून अविकसित राष्ट्रांशी चालविलेली दादागिरी आहे ही त्यांची मतें ते कळकळीने व्यक्त करत असत.

निवडक व छोट्या पाकिस्तानी नियतकालिकांत उर्दूत लिहिलेल्या त्यांच्या लेखांत ते लिहीत कीं पाकिस्तानने आपले परमाणू तंत्रज्ञान चांगल्या व सकारात्मक उपयोगांसाठी विकले तर त्यात कांहींच गैर नाहीं. हा आपली कर्जे फेडण्याचा पाकिस्तानच्या हातातला सर्वोत्तम मार्ग आहे. अशा रीतीने पाकिस्तान परकीय चलन सन्माननीय मार्गाने मिळवू शकेल असेही ते म्हणत.
पाकिस्तानच्या अण्वस्त्रनीतीतील खरेदीकेंद्रित व्यवसायाकडून विक्रीकेंद्रित व्यवसायापर्यंत गेलेल्या एकाद्या भूकंपाएवढ्या प्रचंड बदलाबद्दल अमेरिका उदासीन/निर्विकार तरी होती किंवा पार झोपलेली/अज्ञानी तरी होती. खानसाहेब लष्कराला कुठल्या राष्ट्राला कुठल्या तंत्रज्ञानाची गरज आहे याबद्दलमार्गदर्शन करत. बेग यांनी त्यांच्याबरोबर गुप्त संगनमत करून छुप्या विक्रीच्या मोहीमा सुरू केल्या व अमेरिकेच्या पाठीत खंजीर खुपसला. परदेशांशी अशा प्रकारचे सौदे बिनबोभाट होण्यासाठी बेगनी ISI ची मदत घेतली. ISI च्या प्रमुखपदी अफगाणिस्तानच्या युद्धात कट्टर सनातनी बनलेले नवे Director General जाविद नासीर आले होते. त्यांना मुस्लिम धर्माचा नवा आविष्कार झालेला होता व ते तब्लीघी जमात (TJ-धर्मांतर संघटना) या पुनरुज्जीवनवादी चळवळीचे प्रमुखही झाले होते. TJ संघटनेने तिच्या सभासदांत अनेक ज्येष्ठ पाकिस्तानी नेते, लष्करातील आणि गुप्तहेरसंघटनेतील ज्येष्ठ अधिकारी सामील झाले व त्यांच्या वार्षिक संमेलनात इतके लोक हजर असत कीं त्याहून मोठी संख्या फक्त मक्केतील हाज यात्रेलाच व्हायची.

कळकळीने काम करणार्‍या नासीरसाठी बेगनी अतीशय संवेदनाशील उत्तर कोरियाचा दौरा आखला होता. बरोबर खांद्यावरून डागता येणारे अमेरिकेच्या 'स्टिंगर' क्षेपणास्त्राची भेटही पाठविलेली होती. हे ISI ने अफगाणिस्तानहून चोरलेल्या साठ्यापैकी होते. कोरियन लोकांना त्याचे reverse-engineering करता येईल कां हे विचारायचे होते. बेगनी हे क्षेपणास्त्र एक रुचिवर्धक (appetizer) म्हणून दिले होते. त्यांना पाकिस्तानबरोबर संबंध ठेवल्यास ते त्यांनाही कसे उपयुक्त ठरतील हे त्यांच्या मनावर ठसवायचे होते. शिवाय पाकिस्तानला ही स्टिंगर्स इराणला रोखीने विकायची होती!

बेग यांच्या धोरणात पैशाखेरीज दुसरे कुठलेच तत्व नसल्यामुळे त्यांनी त्याच वेळी सद्दाम हुसेन यांच्याशीही एक कहूता येथील अधिकारी तिथे पाठवून संपर्क साधला. गंमत म्हणजे याच वेळी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीने 'जरूर त्या सर्व कारवाया' करून सद्दामला कुवेतमधून हाकलून देण्याच्या मोहिमेला एकमताने परवानगी दिली व सद्दाम यांच्या सैन्याला हुसकून काढण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली फौजेची जमवाजमव सुरू झाली. बेग यांच्या दूताने सद्दामला अणूबाँब देऊ केला. त्यांचा स्वतःचा प्रकल्प इस्रायलच्या 'उसीराक' येथील reactor वर केलेल्या हल्ल्याने उध्वस्त झाला होता व सद्दाम व त्यांच्या शास्त्रज्ञांनी त्या प्रकल्पाचे पुनरुत्थान करण्याचे प्रयत्न चालूच ठेवले होते. मुनीर खान व डॉ. खान हे दोघे मिळून इराकला संपूर्ण साधन सामुग्री व चालवायचे तंत्रज्ञान द्यायला तयार होते.

याबद्दलची गुप्त माहिती जर त्या वेळी फुटली असती तर तिने आखाती युद्धाबद्दलची आखणीच मुळापसून बदलली असती कारण कुठल्याच अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने आपले हजारो सैनिक राजीखुषी एकाद्या अण्वस्त्रसज्ज विक्षिप्त राष्ट्राच्या सैन्याशी भिडविले नसते. पण पाकिस्तान-इराक कराराची खरी हकीकत बाहेर यायला आणखी पाच वर्षें जावी लागली. जेंव्हां IAEA च्या निरीक्षकांनी गेरी डिल्लन यांच्या नेतृत्वाखाली बगदादच्या बाहेरील एका शेतावर धाड घातली तेंव्हां कुठे हे रहस्य बाहेर आले. सद्दाम यांचे जावई ज. हुसेन कामेल या शेताचा मालक होता व Military Industrialization Authority चा संचालक या नात्याने तो इराकच्या अण्वस्त्रप्रकल्पाचा प्रमुख होता. तिथे त्यांना कागदपत्रांनी भरलेली खोकी सापडली ज्यात पाकिस्तानच्या प्रस्तावाबद्दल अतीशय स्पष्ट उल्लेख होता. त्यांना "अतीशय गुप्त प्रस्ताव" असे शीर्षक असलेले व "प्रकल्प A/B"[३] हे सांकेतिक नाव असलेले मुखबरत या इराकी गुप्तहेरसंघटनेचे ६ ऑक्टोबरचे एक पानी पत्र मिळाले. PC-3 मधील एका निनावी मध्यस्थाला उद्देशून लिहिलेल्या या पत्रात पाकिस्तानी शास्त्रज्ञ डॉ. अब्देल कादीर खान यांचा "युरेनियमच्या अतिशुद्धीकरणाच्या व अण्वस्त्रनिर्मितीच्या प्रकल्पा"त मदत देण्याच्या शक्यतेबद्दलचा प्रस्ताव सोबत जोडल्याचा उल्लेख होता. त्या प्रस्तावात दुबईमधून संतुलित केलेल्या कंपन्यांतून अणूबाँबप्रस्तावाची संरचना व जरूर त्या घटकभागांचा युरोपमधून पुरवठा याबद्दल माहिती होती. कुवेतवरील आक्रमणामुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे याबाबतची बैठक ग्रीसमध्ये घ्यायचाही प्रस्ताव होता व या प्रकल्पात पाकिस्तानचा उद्देश होता पैसे!

कागदपत्रांच्या अधिक छाननीत पाकिस्तानचा आणखी एक उल्लेख सापडला. तो KRL[४] ने १९८७ साली इराणला दिलेल्या प्रस्तावासारखा होता. त्यात ५० लाख डॉलर्सची आगाऊ पेमेंट व प्रत्येक खरेदीवर १० टक्के दलाली असा प्रस्ताव होता. पण हा प्रकार इराकला 'रंगे हाथ' पकडायचा सापळा असू शकतो अशी भीतीमुळे इराकी अधिकारी साशंक होते. एका कमी लौकिक असलेल्या अरब देशाला सरळसरळ अणूबाँब विकायचा हा प्रस्तावच इतका असाधारण होता कीं याबद्दल सद्दाम यांच्यासारख्या धाडसी नेत्यालाही तो संशयी वाटला.

PC-3 ने सुचविले कीं पूर्णपणे हिरवा झेंडा दाखवायच्या आधी इराकने पाकिस्तानकडून कांहीं नमुने मागवावेत. पण इथेच कागदपत्रांतून मिळणारी माहिती संपली. त्या बैठकीत भाग घेतलेले एक गृहस्थ डिलननी ऑस्ट्रेलियात शोधले. पण त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. डिलन यांच्याकडून अमेरिकेला सांगूनही उपयोग झाला नाहीं. पण याबद्दल अमेरिकेत कुणी पडायला तयार नव्हता. डिलन यांच्या मते ती कागदपत्रें अस्सल होती. विचार करता-करता डिलन यांची ट्यूब पेटली व त्यांच्या लक्षात आले कीं सांकेतिक नावातली 'A/B' ही अक्षरें 'अ‍ॅटम बाँब' साठी होती!

इराकच्या अण्वस्त्रप्रकल्पाच्या रहस्यस्फोटाला एक उदास व भीषण बाजूही होती. डिलनना ज. हुसेन कामेल व क. सद्दाम कामेल यांच्या शेतावर नेण्यात आले होते ते हे दोघेही आपापल्या बायका व नऊ नातवंडे घेऊन जॉर्डनला पलायन करून देशांतर केल्यानंतर. पण सद्दामने त्यांना माफ केले नाहीं तर त्यांना खोटी आश्वासनें देऊन परत बोलावून त्यांना व त्यांच्या सासरच्या अनेकांना त्याने त्यांच्याच घरात जिवे मारले!

अण्वस्त्रतंत्रज्ञानाचा रोखीचा सौदा फिसकटला तरी बेगनी खूप कष्ट घेऊन इस्लामाबाद-बगदाद यांच्यातील संबंध खूपच सुधारले. जेंव्हां अमेरिकन सैन्य कुवेतमध्ये घुसले तेंव्हां बेगनी नवाज़ शरीफना मुखबरतचा उल्लेख न करता पाकिस्तानने सद्दामला पाठिंबा द्यायला हवा असे सुचविले. शरीफना धक्काच बसला व त्यांनी ती सूचना धुडकावून लावली. कारण मध्यपूर्वेच्या संरक्षणासाठी बनविण्यात आलेल्या मुस्लिम युतीत सहभागी व्हायचे पाकिस्तानने आधीच वचन दिले होते व सौदी अरेबियाला सैन्य धाडायचेही मान्य केले होते. ते स्वतः अरब राष्ट्रांचा दौरा करून ही युती मजबूत करण्याचे प्रयत्न करत होते. या उलट सद्दामने एका मुस्लिम राष्ट्रावर आक्रमण केले होते व तो पाकिस्तानच्या समर्थक असलेल्या सौदी अरेबियावरही आक्रमण करण्याच्या धमक्या देत होता.

या घटनेमुळे बेगनी लष्करातील अधिकार्‍यांत नवाज़विरोधी मत निर्माण केले अशी शंका नवाज़ना आहे.
KRL चे तंत्रज्ञान सद्दाम यांना विकण्यात खानसाहेबांनी जरी आनंदाने भाग घेतला असला तरी त्यांना बेग यांच्या सद्दामच्या मागे उभे रहाण्याबद्दलच्या सूचनेचा धक्काच बसला. कारण सौदी अरेबियासारख्या समर्थकाकडून मिळणार्‍या आर्थिक सहाय्यावरच KRL किती अवलंबून होता हे सर्वात जास्त त्यानाच माहीत होते! त्यांनी शरीफ यांचे सल्लागार हक्कानींशी संपर्क साधून सांगितले कीं पाकिस्तानने सौदींचेच समर्थन केले पाहिजे याबद्दल त्यांनी जागरुक रहावे मग या प्रसंगी अमेरिकेच्या बाजूने उभे रहावे लागले तरी बेहत्तर[५]! हक्कानींनी हा निरोप शरीफना दिला पण त्यांचेही हेच मत असल्याने त्याबद्दल त्यांचे मन वळवायची जरूरच नव्हती!

लष्कराविरुद्ध घेतलेल्या भूमिकेच्या पडसादांबद्दल शरीफना वाटलेली चिंता खरीच निघाली. शरीफ यांनी बेग यांची सद्दामना पाठिंबा देण्याबाबतची सूचना धुडकावून लावल्यानंतर बेग आणि गुल यांनी IJI मध्ये 'शरीफ पुरेसे फर्वंट नसल्याचे' भासवायची चळवळ सुरू केली. लगेच ISI व इतर गुप्तहेर संघटनांच्या इशार्‍याने जमलेले निदर्शक सद्दाम यांच्या विजयाच्या बाजूने निदर्शने करू लागले. या घडामोडीमुळे अमेरिका आणखीच संतापली. या सभांचा आणखी एक उद्देश होता. शरीफ यांच्या सहकार्‍यांनी त्यांना इशारा दिला कीं या निदर्शनांना वेळीच आवर न घातल्यास बेग आणि गुल या मॉबचा/संधीचा फायदा घेऊन कुदेता (Coup d'Etata किंवा तख्तापालट) घडवून आणतील. ते दोघे शरीफ यांना पदच्युत करण्यात यशस्वी होण्यापूर्वीच त्यांना खच्ची करणे आवश्यक होते.

सद्दाम यांचा पराभव होणार हे उघड दिसू लागताच बेगनी पुन्हा लीलया 'घूम जाव' केले. त्यांनी शरीफ व अर्थमंत्री इशाक दर यांच्याशी संपर्क साधला आणि एक नवी डावपेचांची योजना सुचवली. बेगनी १९८८ साली बेनझीरबाई निवडून आल्यानंतर त्यांच्याबरोबर झालेल्या बैठकीची आठवण करून देणारी होती. बेगनी सरळ मुद्द्याला हात घातला. इराणसारख्या पाकिस्तानच्या एका मित्रराष्ट्राला १२०० कोटी डॉलर्सना परमाणूतंत्रज्ञान विकण्याची ही योजना होती. या पैशात बेग १० वर्षांचे संरक्षणमंत्रालयाचे अंदाजपत्रक आखू शकत होते. बेगनी अर्थमंत्र्यांना या 'प्रकल्प A/B' या गुप्त तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणयोजनेत सहभागी व्हायची विनवणी केली. शरीफ आणि दर आश्चर्यचकित झाले पण त्यांनी ही योजनाही धुडकावून लावली.

पण बेग यांनी माघार घेतली नाहीं. त्यांनी लष्करातील एक ज्येष्ठ अधिकार्‍याचे बंधू असलेल्या चौधरी निसार अली खान या पेट्रोलियम व प्राकृतिक साधनसंपत्तीच्या मंत्रांशी संपर्क साधला. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून आपल्याकडील तंत्रज्ञान विकून पाकिस्तान ती परिस्थिती बदलू शकतो असे त्यांनी अलीखानना पटविण्याचा प्रयत्न केला व शरीफ यांना गळ घालण्याची विनंती केली.
अलीखाननी शरीफना निरोप पोचवला. बेग यांचा आग्रही पवित्रा बघून शरीफ यांना जाणीव झाली कीं लष्कराच्या गळफासातून मुलकी नेत्यांना मुक्तता करण्यासाठी पाकिस्तानातील सत्ता राबवीण्याची प्रथा बदलणे आवश्यक होते.

पण बेगना शरीफ यांच्या किंवा लष्कर व KRL च्या बाहेरील कुणाही व्यक्तीच्या विचारांची पर्वा नव्हती. जसे बेनझीरबाईंच्या कारकीर्दीत ते तेहरानला गेले होते तसेच शरीफ यांच्या कारकीर्दीतही गेले. १९९१ साल उजाडेपर्यंत P-1 प्रकारच्या सेंट्रीफ्यूजेसच्या घटकभागांचा पुरवठा पूर्ण झाला होता व KRL कडून पूर्णपणे चालू परिस्थितीतील कांहीं सेंट्रीफ्यूजेसही पुरविली गेली होती.

ते तेहरानला पोचले तेंव्हां त्यांना धक्काच बसला. इराकच्या Iraq Atomic Energy Commission चे माजी प्रमुख हुसेन अल-शाहरिस्तानी यांच्या पाहुणचारात इराण गुंतला होता. गुप्तपणे अणूबाँब बनविण्याच्या प्रकल्पात भाग घेण्यास नकार दिल्याबद्दल सद्दामने त्यांना तुरुंगात टाकले होते. ते नुकतेच बगदादच्या अल-घारिब तुरुंगातून पळून आले होते आणि ते इराकच्या अण्वस्त्रप्रकल्पाबद्दलचे तपशील जाहीरपणे देत होते. इराक आणखी सहा महिन्यात अणूबाँबसज्ज झाला असता असे सांगून ते म्हणाले कीं इराकमध्ये १९८० पासून पाश्चात्य कंपन्यांच्या सहाय्याने युरेनियमचे ९३ टक्के शुद्धीकरण करू शकणारी १५ सेंट्रीफ्यूजकेंद्रे उभारली होती. पाश्चात्य कंपन्यांनी अल-हिलाल येथे असलेल्या Military Industrialization Authority complex मध्ये अण्वस्त्रांचा यशस्वी स्फोट करविण्यासाठी लागणारे प्रज्वलक बनवायला इराकी लष्कराला मदत केली होती. हे केंद्र सद्दाम यांचे जावई चालवत असत.
मात्र शाहरिस्तानींनी पाकिस्तानच्या सहभागाबद्दल कांहींच उल्लेख केला नाहीं. पण इराणी विरोधी पक्षाच्या सूत्रांकडून असे सांगण्यात आले कीं बेगनी पुन्हा पूर्ण अणूबाँब किंवा अणूबाँब बनविण्यासाठी लागणारी ड्रॉइंग्ज देण्याचा प्रस्ताव पुढे ढकलला होता. अब्जावधी डॉलर्सच्या मोबदल्यात कझाकस्तानमार्गे चार अणूबाँब देण्याचे ठरले. त्यावेळी कझाकस्तान स्वतःची अण्वस्त्रेही विकत होता त्यामुळे काळाबाजार करायला हा मार्ग सुकर होता.

इराणकडे खर्चायला पैसे होते व त्यांनी ४२० कोटी डॉलर्स १९९१-९४ सालच्या परमाणू कार्यक्रमासाठी राखून ठेवले होते. पाकिस्तानच्या सहभागाला कझाकस्तानच्या परमाणू सुरक्षाविभागाच्या प्रमुखांनीही दुजोरा दिला. हे नंतर कझाकस्तानचे अमेरिकेतील राजदूत नेमले गेले व तिथेही त्यांनी त्यांचा याबाबतीत सल्ला घेतला गेला होता असे निवेदन केले होते (पण याचा बेग व गुल यांनी स्पष्टपणे इन्कार केला.) अमेरिकेच्या ऊर्जा खात्याच्या राष्ट्रीय परमाणू संरक्षण संघटनेचे भूतपूर्व वरिष्ठ अधिकारी लियोनार्ड स्पेक्टर यांनाही या आरोपांचा वास आला होता त्यांनी आरोप केला कीं पाकिस्तानने जरी अमेरिकेला तो परमाणू तंत्रज्ञान इतर राष्ट्रांना देणार नाहीं असे सांगितले असले तरी पाकिस्तानचे हात हे परमाणू तंत्रज्ञान इराण व इराकला देण्यात भरपूर रंगलेले आहेत. शेवटी इराणबरोबरचा करार रद्द झाला तो राष्ट्राध्यक्ष इशाक खान यांच्या असले संवेदनाशील तंत्रज्ञान एका शेजारी राष्ट्राला तेही एका सनातनी शिया राष्ट्राला देण्याबाबतच्या आक्षेपामुळे. पण बाकीचे सौदे चालूच राहिले. पाकिस्तानने सौदी अरेबियाला त्यांनी खरीदलेल्या चिनी CSS-II प्रक्षेपणास्त्रांवर बसविण्यासाठी अणूबाँब विकायचा करार केला होता आणि KRL अधिकार्‍यांनी हा सौदा त्यासुमारास पक्का झाल्याचे मान्य केले होते. जेंव्हां इस्रायली व भारतीय हेरखात्यांना या कराराचा सुगावा लागला तेंव्हां ही राष्ट्रें इतकी चिंताग्रस्त झाली कीं त्यांनी CIA व 'व्हाईट हाऊस' नी चौकशी करावी अशी मागणी करू लागल्या.

सौदी अरेबियाच्या अण्वस्त्रांच्या खरेदीबद्दलची अफवा सगळीकडे पसरली होती आणि ती व्हिएन्ना येथील IAEA पर्यंत पोचली होती. तिथे ती अमेरिकेचे इराण, इराक व उत्तर कोरिया यांच्या अण्वस्त्रप्रकल्पाबद्दलचे तज्ञ असणारे मार्विन पीटरसन यांच्या कानावर आली व त्यांनी ती वॉशिंग्टनला कळविली. पण तिथे त्यांना उदासीनताच दिसून आली.

१९७०पासून Top-security-clearance मिळविलेले पीटरसन व्हिएतनाम युद्धात भाग घेऊन परतल्यावर आधी संरक्षणमंत्रालयात, तिथून परराष्ट्रमंत्रालयात व तिथून १९९० मध्ये IAEA ला पोचले होते. त्यांनी पाकिस्तानकडून सौदी अरेबियाच्या अणूबाँब खरेदीबद्दलची काळजी वॉशिंग्टनला कळविली पण अमेरिकन सरकारने सौदींचे उत्तर ग्राह्य धरले. अमेरिकेने सौदी परराष्ट्रमंत्रालयाला परमाणूतंत्रज्ञानाच्या देवाण-घेवाणासंबंधीच्या पाकिस्तानबरोबरच्या सहकार्याबद्दल फक्त 'होय' किंवा 'नाहीं' एवढेच कळवायला सांगितले. सौदींनी पाकिस्तानबरोबर कसलाही करार नाहीं असे कळविल्यावर अधीक चौकशी न करता अमेरिकेने ते उत्तर मान्य केले. (इराकचे हेच उत्तर अमेरिकेने मान्य केले नाहीं.)

IAEA च्या पीटरसनसारख्या अधिकार्‍यांनी अन्वेषण करू नये म्हणून सौदी-पाकिस्तान करारावरील चौकशीला बंदी घालण्यात आली. त्यामुळे परमाणू तंत्रज्ञान देवाणघेवाणीचे पाकिस्तानचे इतर गुप्त प्रकल्पही अज्ञात राहिले. जर सौदी करारावरचे झाकण उघडले असते तर पाकिस्तान्च्या अणूबाँबनिर्यातीच्या जाळ्याचे इतर देशांतील धागे व त्या जाळ्याचे दुबई हे केंद्र उघडकीस आले असते व त्यामुळे अमेरिका/IAEA त्यावर फार उशीर व्हावयाच्या आधीच आवर घालू शकली असती. पण सौदी-पाकिस्तान अणस्त्रकराराच्या अन्वेषणास घातलेल्या या बंदीमुळे पाकिस्तान निश्चिंतपणे कांहीं ना कांहीं तंत्रज्ञान जो नगद घेऊन ते घ्यायला आला त्याला विकून मोकळा होऊ शकला!

इराणहून परतल्यावर बेगनी शारीफ यांच्यामागे खानसाहेबांना आणि PAEC ला आणखी द्रव्यनिधी पुरविण्यासाठी तगादा लावला. पण लष्करा खर्च आधीच GDP च्या ८ टक्के व एकूण देशाच्या अंदाजपत्रकाच्या २७ टक्क्यावर पोचला होता. पण त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात पाकिस्तानच्या आधीच छोट्या असलेल्या पण महत्वाकांक्षी अशा मध्यमवर्गीय जनतेला खूष ठेवण्यासाठी व पाकिस्तानच्या कंबरडे मोडलेल्या अर्थव्यवस्थेला दुरुस्त करण्यासाठी तजवीज असल्यामुळे शरीफ यांनी त्यांना नकार दिला. त्याच वेळी बेनझीरबाईंच्यापेक्षा धूर्त असलेल्या शरीफनी त्यांच्या लष्करातील शत्रूंविरुद्धही त्यांनी मोर्चा उघडला.

ISI च्या डावपेचांच्या कार्यपद्ध्तीच्या पुस्तातील चाल खेळून त्यांनी १६ ऑगस्ट १९९१ रोजी ज. बेग यांच्या सेवानिवृत्तीची तारीख व त्यांच्या पदावर येणार्‍या अधिकार्‍याचे नांव जाहीर केले. तीन महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार्‍या बेगना त्या काळात त्यांना सोयीच्या गुल यांना पदोन्नती द्यायची होती. बेगना सार्वजनिकपणे अपमानित करून दुबळे केल्यावर शरीफ यांनी ISI विरुद्ध आक्रमक हालचाल केली व ISI च्या स्पर्धक संघटनेच्या (Intelligence Bureau[६] i.e. IB) प्रमुखपदी आपले खास सहकारी ब्रि. इम्तियाज़ अहमद यांची नेमणूक केली. यानीच पूर्वी नुसरत भुत्तोंचे राष्ट्राध्यक्ष फोर्डओबर नाचतानाचे फोटो उकरून काढले होते.

त्यांना आणखी एकाचा वचपा काढायचा होता. गुल यांची बदली त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या तक्षीला या औद्योगिक भागात असलेल्या रणगाड्यांच्या पुनरुत्थानाच्या कारखान्यात केली. गुल यानी ते पद स्वीकारण्यास नकार दिल्यावर त्यांना जानेवारी १९९२ साली सक्तीची सेवानिवृत्ती दिली गेली. शरीफ व अमेरिका या दोघांना गुल लष्करप्रमुखपदी नको होते असे गुल यांचे म्हणणे होते. पण त्यांची जिगर कायम राहिली व त्यांनी जिहादींना प्रोत्साहन द्यायचे ठरविले. त्यांची खात्री होती कीं शेवटी जिहादीच पाकिस्तानचा ताबा घेतील कारण त्यांच्या मतें राजकीय नेते व लष्कर या दोघांनीही पाकिस्तानी जनतेला निराश केले होते.

लष्कराचा विळखा सैल केल्यावर शरीफनी कहूताप्रकल्पाचा कबजा घेऊन अमेरिका व पाकिस्तान यांच्यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. पण याची जाहीर वाच्यता केल्याने त्यांनी पाकिस्तानकडे अणूबाँब असल्याचे जाहीर केले. लपवून ठेवलेला अणूबाँब ही पाकिस्तानची नेहमीचीच अडचण होती. पण जाहीर केल्यावर वाटाघाटी करण्याची गरज भासली. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाहरियार खान यांनी 'वॉशिंग्टन पोस्ट'ला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानकडे कमीतकमी एक अणूबाँब बनविण्याइतके घटकभाग असल्याचे कबूल केले.

पाकिस्तानी जनतेवर भाव मारण्यासाठी शरीफ कहूताला खानसाहेबांबरोबर १९९२ च्या ऑगस्टमध्ये भेट दिली. अशी भेट देणारे ते पहिले निर्वाचित पंतप्रधान ठरले. त्यांनी पाकिस्तानला गर्वाचे स्थान मिळवून देणार्‍या खानसाहेबांचे व त्यांच्या शास्त्रज्ञांच्या टीमचे तोंडभरून कौतुक केले व खानसाहेबांना "अणूबाँबचे पिताश्री" असे प्र्शस्तीपत्रकही दिले. पण यामुळे त्यापूर्वीच्याच वर्षी PAEC तून सेवानिवृत्त झालेल्या मुनीर यांना विसरले. हा तसे पहाता निरर्थक किताब खानसाहेबांना आजन्म चिकटला व हे प्रशस्तीपत्रक कहूताच्या कार्यालयात झियांनी दिलेल्या प्रशस्तीपत्रकाशेजारी लावले गेले. पण या प्रकारांनी बुश-४१ सरकारला संताप आला यात काय नवल?

हळू-हळू पाकिस्तानाबद्दलच्या बातम्यांना महत्व मिळेनासे झाले. दोन वर्षांच्या शोधानंतर जर्मनीतून अमेरिकेच्या स्वाधीन केले गेलेल्या सेवानिवृत्त ज. इनाम उल-हकवर १९९२मध्ये फिलाडेल्फियाच्या कोर्टात बेरिलियम व माराजिंग प्रतीचे पोलाद पाकिस्तानला निर्यात केल्याबद्दल न्या.मू. जेम्स गाइल्स यांच्या जिल्हापातळीवरील कोर्टात खटला लावला गेला. दहा वर्षे कैद व पाच लाख डॉलर्स दंड इतक्या कठोर शिक्षेला पात्र अशा या गुन्ह्यासाठी न्या. मूं. नी इनामला फक्त तोपर्यंत घडलेला तुरुंगवास व दहा हजार डॉलर्स दंडाची शिक्षा दिली. याच न्या. मूं. नी पूर्वी १९८७ मध्ये इनामचा सहकारी अर्शद परवेज़ यालाही हलक्या शिक्षेवर सोडले होते. खरे तर इनाम हा त्याच्यासाठी बार्लोंनी लावलेल्या सापळ्यातून सुटला होता व त्यात त्याला परराष्ट्रमंत्रालयातील दोन अधिकार्‍यांचीच मदत झाली होती. तरी इनाम स्वत:ला ते इस्रायल-भारतधार्जिण्या व पाकिस्तानविरोधी कारस्थानाचा बळी होते असे प्रतिपादन होते.
मात्र शरीफ यांनी घेतलेली पावले पाकिस्तानला वाढत्या अस्थिरतेपासून वाचवू शकली नाहींत. बेग व गुल यांना मार्गातून दूर केले तरी ISI व लष्करामधील इस्लामधार्जिणे गट शरीफ यांच्याविरुद्ध प्रचार करतच राहिले. त्यांनी देशातील वांशिक व धार्मिक विभाजनांचा उपयोग करून गोंधळ व भयग्रस्त परिस्थिती निर्माण केली व त्याचा फायदा घेऊन लष्कराला पुन्हा हस्तक्षेप करून अण्वस्त्रप्रकल्पावर कबजा करण्यासाठी एक निमित्त्य पुरविले.

इस्लामाबादपासून हजारो मैल दूर असलेल्या जागी झालेल्या एका प्रचंड बाँबस्फोटाने केवळ पाकिस्तानच नव्हे तर इतर दूर-दूरच्या प्रदेशांना होऊ घातलेले सगळे धागे व धोके उघड केले. या बाँबस्फोटाने अमेरिकेचे पाकिस्तानच्या अण्वस्त्रांबाबतचे दूरदर्शीपणाचा अभाव असलेले व ढापणे चढविलेले परराष्ट्रधोरणही उघड केले ज्यामुळे अमेरिकेला व पाश्चात्य जगाला एका महाभयंकर प्रमाणाच्या संकटाला सामोरे केले. २६ फेब्रूवारीला १९९३ रोजी World Trade Center च्या बेसमेंट पार्किंगच्या जागेत झालेल्या प्रचंड स्फोटाचे धागेदोरे ISI च्या प्रशिक्षणकेंद्रात इतर अरब व पाकिस्तानी अतिरेक्यांच्याबरोबर तयार झालेल्या रामझी यूसेफ उर्फ पाकिस्तानी नागरिक अब्दुल करीम याच्यापर्यंत व पाकिस्तानपर्यंत पोचले. अफगाणिस्तानातील युद्धानंतर तो मुजफ्फराबादजवळच्या ISI प्रणीत काश्मिरी संरक्षणकेंद्रांत प्रशिक्षक म्हणून काम करत होता.

जरी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाकडून सतत युसेफ पाकिस्तानचा नसून तो पाकिस्तानात नाहीं असे ठासून सांगितले जात असले तरी अमेरिकेचा त्यावर विश्वास नव्हता[७]. World Trade Center वरील बाँबहल्ल्याने पाकिस्तान जागतिक अस्थिरपणाचा केंद्रबिंदू झाल्याचे प्रथमच जगाला दाखविले होते. त्यानुसार अमेरिकेने शरीफ यांच्याकडे सर्व दहशतवाद्यांची प्रशिक्षणकेंद्रें बंद करायची मागणी केली. संबंध सुधारण्याच्या हेतूने शरीफ यांनी मान्यही केले, पण असे प्रयत्न सुरू केल्यावर ISI ने ती फक्त हलवली! पाकव्याप्त काश्मीरच्या भागातून दहशतवाद्यांची टोळकी अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील अज्ञात वाळवंटी भागात हलविण्यात आली. इथली केंद्रें ISI च्याच Joint Intelligence North (JIN) या विभागाच्या अखत्यारीत होती. शरीफ यांनी मान्य केले कीं त्यांच्याकडे ISI चा लगाम खेचण्याची ताकत नव्हती[८]. ISI ला विश्वासच नव्हता (किंवा फिकीरही नव्हती) कीं अशाने अमेरिका पाकिस्तानला शिक्षा करेल.

१९९२ साली सोविएत सैन्य परतले व महम्मद नजीबुल्लाला प्रधानमंत्रीपदावरून हटवून हमीद गुल यांचा पित्त्या असलेले व कट्टर-जहरी अमेरिकाविरोधी गुलबुद्दिन हिकमत्यार गादीवर आले. पण अफगाणिस्तानला स्थैर्य लाभले नाहीं. एका वर्षातच यादवी युद्ध पेटले व अफगाणिस्तानचा मध्यभाग शियाधर्मीय हजारांच्याकडे होता, दक्षिणेकडून पश्तून व हिकमत्यार लढत होते तर उत्तरेकडून उझबेकी व ताजीकी सैन्याचा ताबा होता. पाकिस्तानला त्यावेळी आपल्या आवडीचे सरकार स्थापण्याची त्यावेळी संधी होती पण ISI व पाकिस्तानी लष्कराने यादवी युद्ध पेटू दिले. या सर्व गोंधळात ISI ने केलेले दहशतवाद्यांचे स्थलांतर फारसे कुणाच्या नजरेत आले नाहीं.

पण या आणीबाणीवर मात करण्याऐवजी शरीफ आपल्या आवडल्या गोष्टींकडे वळले: स्वतःची खुर्ची टिकविण्यासाठी फोन टॅप्पिंग व कारस्थाने रचणे. आठव्या घटनादुरुस्तीचा उपयोग करण्याच्या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकाराच्या काळजीने त्यांनी इशाक खान यांच्याकडे आपला मोर्चा वळवला, पण ते त्यांना झेपले नाहीं. उलट गैरकारभार, वशीलेबाजी व लांचलुचपत या नेहमीच्या व अंशतः बरोबर असलेल्या कारणांवरून एप्रिल् १९९३ मध्ये त्यांनीच शरीफ यांना पुन्हा बडतर्फ केले. शरीफ यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली व राष्ट्राध्यक्षाचा निर्णय तात्पुरता उलटवण्यात ते यशस्वी झाले. इशाक खान व शरीफ यांची जुंपली पण जानेवारी १९९३ साली लष्कराची सूत्रे नव्याने हाती घेतलेले वाहिद ककड मध्ये पडले व त्यांनी दोघांना जुलै १९९३ ला राजीनामा देण्यास भाग पाडले. व अशा तर्‍हेच्या वाढतच जाणार्‍या राजनैतिक अंदाधुंदीने KRL च्या गुप्त तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीच्या काळ्या व्यवहारांवर पांघरूण घातले!
पाकिस्तानच्या या र्‍हासाकडे सारे जग पहात होते आणि अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणखीच बिघडत चालली होती. पण नव्याने अधिकारावर आलेल्या राष्ट्राध्यक्ष क्लिंटननीही यात कांहींच सकारात्मक योगदान दिले नाहीं. डेमोक्रॅटिक पक्षाचा राष्ट्राध्यक्ष आला कीं पाकिस्तान नाराज असे. कार्टरच्या कारकीर्दीत काय झाले होते याची सगळ्यांना चांगलीच आअठवण होती. आधी पाकिस्तानवर निर्बंध घालले गेले, मग त्याला वाळीत टाकण्यात आले व शेवटी संबंध इतके दुरावले कीं अमेरिकेच्या मदतीला "Peanuts" असे हिणवून ती नाकारण्यापर्यंत मजल गेली. क्लिंटन यांच्या वॉरन क्रिस्टोफर या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानला व ब्रह्मदेशाला एकाच तराजूत टाकून मानवी मूल्यांची पायमल्ली होत असलेले टाकाऊ देश असे विधान केले. पाकिस्तानला कधीही न आलेल्या क्रिस्टोफर यांनी असे विधान करायला नको होते असे भूतपूर्व परराष्ट्रमंत्री आगाशाहींचे म्हणणे होते.

क्लिंटनसरकारने पाकिस्तानसंबंधी सुसंबद्ध परराष्ट्रधोरण बनविण्याची खटपट केली. World Trade Center मध्ये बाँबस्फोट झाल्यावर क्लिंटन यांचे नवे CIA संचालक जेक्स वूल्सी यांनी मुस्लिम दहशतवादावर लक्ष केंद्रित केले व क्लिंटनना सल्ला दिला कीं पाकिस्तान हे एक दहशतवादी राष्ट्र बनण्याच्या बेतात आहे. राजनीतीविभागाचे उपपरराष्ट्रमंत्री अ‍ॅर्नॉल्ड कँटर यांनी इस्लामाबादला कडक शब्दात स्पष्ट निरोप पाठविला कीं हे प्रकार चालू राहिले व पाकिस्तान एक दहशतवादी राष्ट्र ठरविले गेले तर प्रेसलर घटनादुरुस्तीच्याही पलीकड जाऊन पाकिस्तान-अमेरिका संबंध संपुष्टात येतील.

पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाशी झटपट करायचा एक तर्‍हेवाईक प्रयत्न क्लिंटनसरकारने केला. त्यांनी रेगन यांचा एक बदनाम डावपेचाचे पुनरुज्जीवन केले. "F-16 विमानांच्या बदल्यात परमाणू कार्यक्रम बरखास्त करणे". झियांनी ३० विमानांच्या ऑर्डरबरोबर २० कोटी डॉलर्स आगाऊ दिल्याला ४ वर्षें झाली तरी अमेरिकेने ही विमाने पुरवली नव्हती. ही विमाने दिली तर पाकिस्तान कदाचित आपला परमाणू कार्यक्रम गोठवेल किंवा सोडून देईल व दहशतवाद्यांवर लष्कराद्वारा वचक बसवेल.

F-16 विमाने अण्वस्त्रवहनक्षम आहेत कीं नाहीं हे ठरविण्याची जबाबदारी सिनेटर ग्लेन यांच्यावर पडली. त्यांनी उलटतपासणी घेतांना उपदर्यासारंग पेंडलींना विचारले कीं पूर्वी होता तसाच आजही पाकिस्तान F-16 विमानांना अण्वस्त्रवहनक्षम बनवायला असमर्थ आहे कां? पेंडलींनी सांगितले कीं परिस्थितीत कांहींच बदल नाहीं, आजही तो असमर्थ आहे. परराष्ट्रमंत्रालयाने उपपरराष्ट्रमंत्री टॅल्बट यांना या सौद्यासाठी इस्लामाबादला पाठवायची तयारी केली. ACDAचे कनिष्ठ उपसंचालक नॉर्म वुल्फना वाटले कीं जणू काळ आहे तिथे थांबला होता!

रिचर्ड बार्लो F-16 विमाने अण्वस्त्रवहनक्षम आहेत कीं नाहींत याबद्दलची चाललेली छाननी थक्क होऊन पहात होते. बार्लोंनी ही विमाने पाकिस्तानने तीन वर्षांपूर्वीच जरूर ते फेरबदल करून अण्वस्त्रवहनक्षम केली होती अशा निष्कर्षाच्या अहवालाची संरक्षणमंत्रालयात चिरफाड करून बनवलेली थाप अजूनही वापरली जात होती. ग्लेन समितीच्या चौकशीची एक प्रत बार्लोंच्या वकीलांनी त्याला पाठविलीही होती. चौकशीतील अनुमान तंत्रज्ञांच्या मताविरुद्ध होती व असत्य होती.

पण प्रतिनिधीगृहाने एक चांगली गोष्ट केली. त्यांनी संरक्षणमंत्रालयाचे सर्व अधिकार असलेले लोकायुक्त इन्स्पेक्टर जनरल (IG) यांना पेंटॅगॉनबद्दल, १९९१ च्या बार्लोंच्या खटल्याबद्दल पुन्हा अन्वेषण करायला सांगितले. त्यांनी जरी बार्लोंनी केलेल्या आरोपांत तथ्य आहे असा निष्कर्ष काढला असला तरी त्यांचाही अहवाल कांहींसा गुळमुळीतच होता. पण नंतर बार्लोंच्या वकीलांनी केलेल्या गौप्यस्फोटावरून बार्लोंनी उकरून काढलेली माहिती दडपून टाकायला पेंटॅगॉन कुठल्या थराला जायला तयार होता याचा अंदाज आला.

या पेंटॅगॉनच्या खुनशी वृत्तीमुळेच कदाचित् १९९३मध्येही या असत्य माहितीचा उपयोग केला जात होता. बार्लोंचे मूळ अहवाल व त्यांचे १९८९ पासूनचे एकूणच काम पेंटॅगॉनच्या दफ्तरातून जणू पुसून टाकण्यात आले होते. सहाजिकच लोकायुक्तांच्या अहवालात पेंटॅगॉनच्या खोटेपणाचा व अधिकार्‍यांनी खोट्या साक्षी दिल्याचा कुठेच उल्लेख आला नाहीं यात काय आश्चर्य?

बार्लोंचा विश्वासच बसेना. समितीच्या अधिकार्‍यांनी व इतरांनी सांगितले कीं त्यांची दिशाभूल करण्यात आल्याबद्दल त्यांना कल्पना नव्हती कारण त्यांचे सर्व अहवाल बदलण्यात आले होते व बार्लोंना खच्ची करण्यात आले होते. त्यांचे निष्कर्षही १४० कोटींच्या F-16 च्या सौद्याच्या पक्षात बदलण्यात आले होते. त्यामुळे ग्लेन यांच्या सुनावणीत F-16 हे अण्वस्त्रवहनक्षम नाहींत असाच निष्कर्ष काढण्यात आला. पण बार्लोंच्या मते ती रंगसफेती होती.

बार्लोंच्या वकीलांनी मग १९९३च्या F-16 च्या सौद्यावर सह्या केलेल्या प्रतिनिधींकडे आपला मोर्चा वळवला. सिनेटची लष्कराबद्दलची समिती, सिनेटचीच हेरखात्याबद्दलची खास समिती व सिनेटची सरकारी कामकाजाबद्दलची समिती या सगळ्या मग यात गुंतल्या. त्यांनी संरक्षणमंत्रालयाला असंख्य पत्रे लिहिली पण आलेली उत्तरे मुख्य मुद्द्याला बगल देत होती. शेवटी बार्लोंच्या वकीलांना संरक्षणमंत्रालय, परराष्ट्रमंत्रालय व CIA या सर्वांच्या इन्स्पेक्टर जनरल्सकडून एक संयुक्त चौकशी करविण्यात बार्लोंचे वकील यशस्वी झाले. त्यांच्या निष्कर्षांचा मसूदा त्या तीघा IG ना देण्यात आला. परराष्ट्रमंत्रालयाचे शेर्मन फंक यांनी तो जणू शब्दन् शब्द वाचला. त्यातली एकही गोष्ट त्यांना आवडली नाहीं व त्यांनी आपले विचार संरक्षणमंत्रालयाच्या IG ला ठळकपणे व उघडपणे कळविले व IG चा अहवाल खरोखर काय झाले याची जी माहिती त्यांनी शोधली ती देण्यासाठी पुन्हा लिहावा असा आग्रह धरला.

फंक यांच्या लक्षात आले कीं बार्लोंची त्यांच्या वरिष्ठांकडून कामात ढिला असलेला, पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाची गुप्त माहिती प्रतिनिधीगृहातील सभासदांना अनधिकृतपणे सांगणारा असे आरोप करून फसवणूक करण्यात आलेली आहे. असल्या खोट्या अफवांमुळेच बार्लोंचे सर्व Security clearances रद्द केले गेले होते. या समजाला कुठल्याही पुराव्याची पुष्टी सापडली नाहीं. त्यामुळे बार्लोंची बडतर्फी अन्याय्य व असमर्थनीय होती.

फंकना आणखी एक जास्त कावेबाज बाब सापडली.: ही अफवांची मोहीम बार्लोंच्या बडतर्फीच्या थोडीशी आधी व बडतर्फीनंतर संरक्षणमंत्रालयाकडूनच सुरू करण्यात आली होती. फंकना कुठेही बार्लो मनोरुग्ण असल्याचा, त्यांनी कुणाचा विश्वासघात केल्याचा, कामचोरपणाचा, नियमोल्लोंघन केल्याचा, मद्यपी असल्याचा किंवा स्त्रीलंपट असल्याचा पुरावा सापडला नाहीं. बार्लो इतके कामात बुडून गेलेले असायचे कीं विश्रांती किंवा करमणूक त्यांना वर्ज्यच होती अशी त्यांच्या भूतपूर्व पत्नीची तक्रार होती. फंकनी निष्कर्ष काढला कीं बार्लोंचे Security clearances रद्द करणे चुकीचे होते व त्यांना सर्व वरिष्ठांनी वेढून संपविले होते.

चुकीच्या धोरणांना मान्यता द्यायला नकार दिल्यामुळे बार्लोंना बळीचा बकरा बनविण्यात आले होते! पण फंकना त्यांच्याच सही केलेल्या अहवालाची प्रत मिळाली तर त्यात त्यांचे निष्कर्ष बदलले गेल्याचे आढळून आले. त्यांनी ती गोष्ट त्यांच्या इतर दोन IG च्या लक्षात आणून दिली. त्यांनी आपल्या संरक्षणमंत्रालयातील IG लिहिले कीं आता हा अहवाल सगळीकडे प्रसृत झाला असल्याने काय करावे हे कळत नाहींय्.

धक्का बसलेल्या परिस्थितीत फंकनी सिनेटला "मी बार्लोंच्यावरील अन्वेषण अहवालाची मान्यता मागे घेत आहे" असे लिहून त्या अहवालाला बोथट करण्याचा प्रयत्न केला. पण जेंव्हां बार्लोंच्या वकीलांनी संरक्षणमंत्रालयाकडे चौकशी केली तेंव्हां त्यांचे वकील मिलरनी त्यांना सांगितले कीं अन्वेषणसमितीने संरक्षणमंत्रालयाला निर्दोष ठरविले आहे आणि पाकिस्तान अणूबाँब टाकायला व F-16 विमानांत फेरबदल करण्याला असमर्थ असल्याच्या चुकीच्या गुप्त माहितीला अनुमोदन दिले होते.

"अणूबाँबच्या पिताश्रीं"ना अमेरिकेतील F-16 विमाने अण्वस्त्रवहनक्षम आहेत कीं नाहींत ही सारी चर्चा 'करमणूकप्रधान' वाटली. खानसाहेब आता उजळ माथ्याने वावरत होते व प्रत्येक उद्घाटनाला व सामाजिक समारंभांना त्यांची हाजरी आवश्यक बनली होती व त्यांचा अण्वस्त्रप्रकल्प जोरात प्रगती करत होता. खानसाहेबांचे कराचीस्थित मानसोपचारतज्ञ डॉ. हारुन अहमदना हे सार्वजनिक कौतुक खानसाहेबांवर कसा विपरीत परिणाम करीत आहे हे दिसले. त्यांना वाटू लागले कीं त्यांच्या अणूबाँबचे पिताश्री या कितबामुळे त्यांनी जे पूर्वी केले व जे ते पुढे करणार होते ते सर्व कायदेशीर झाले आहे. त्यांना आपण पाकिस्तानचे उपकारकर्ते आहोत असे वाटू लागले होते!

खरी परिस्थिती अशी होती कीं सरकारला खानसाहेबांवर नियंत्रण राखणे दिवसेंदिवस कठीण होत चालले होते! इतक्या अत्यंत गोपनीय अशा विभागाचे प्रमुख व अतीशय संवेदनाक्षम अशा निर्यातीत गुंतलेले असले तरी खानसाहेबांचे तोंड कायम सैल सुटलेले असे. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले ISI चे प्रमुख दुराणींना सर्व सरकारी कार्यक्रमांच्या वेळी सरकारी गाड्यांवर लक्ष ठेवणार्‍या एका नम्र खबर्‍याकडून कळले कीं खानसाहेब फारच जास्त बोलायचे. तो स्वतः नगण्य असला तरी त्यांने खानसाहेबांना "तुमचे खाते अतीशय गुप्त प्रकारचे आहे तरी गप्प रहा" असे बजावलेही. पण त्यांना रागावणे कठीणच होते!

खानसाहेबांना पदकें व किताब मिळविण्याचे व्यसनच लागले. त्यातले बरेचसे त्यांच्याच इच्छेनुसार निर्मिले गेले होते! १९८४ ते १९९२ च्या दरम्यान त्यांनी ११ सुवर्णपदकें 'मिळविली' आणि तीही Lions Club of Gujarat, Institute of Metallurgy and the Citizens of Rawalpindi अशा भिन्न संस्थांकडून. "Man of the Nation" हे पदक तर त्यांनी लाहोरच्या Pakistan Institute of National Affairs कडून स्वतःला 'देवविले'.

खानसाहेबांना ते सरकारी कामकाजात व त्यातल्या गूढ घडामोडींच्या केंद्रस्थानी असल्याचा फार अभिमान वाटायचा. पण ते कुठल्याही विषयावर बोलू लागले, पैसे गोळा करू लागले व कुठल्याही संस्थेशी त्यांनी संबंध ठेवले त्यांच्या कडून किताबाची अपेक्षा ठेवू लागले! डॉ. अहमद यांची मुलगी अण्वस्त्रांच्याविरुद्ध होती व एक अण्वस्त्रविरोधी संस्था चालवीत होती. त्यांनी एकदा अहमद यांच्या घरी तिला पाहिले व तिला बोलावून ५०,००० डॉलर्स भरलेले पाकीट तिच्या हाती देऊन म्हणाले, "अण्वस्त्रांवर जरूर बंदी आण"!

डॉ. अहमद यांच्या मनोरुग्णालयाकडेही त्यांचा मोर्चा वळला व त्यांनी अहमद बाहेरगांवी गेले असताना एक अलीशान पोर्च बांधविले व अनेक वातानुकूल यंत्रें पाठविली. ते मोफत इस्पितळ असल्यामुळे ती बसवणे व चालविणे त्यांना परवडण्यासारखे नव्हते. पण खानसाहेब ऐकेचनात! पुढे-पुढे त्यांचे इस्पितळावरील नियंत्रणच सुटू लागले आहे असे डॉ. अहमदना वाटू लागले.

खानसाहेब इतरांशीही मस्तीने वागू लागले होते. त्यांच्या KRL च्या सहकार्‍यांनाही ते अपमानास्पद वागणूक देऊ लागले. एकदा आपल्या ग्रिफिन या जुन्या मित्रावरही ते घसरले. तेंव्हां त्यांनी उलट हल्ला केला व सांगितले कीं त्यांनी नम्रतेने वागावे कारण ते कसे बदलले आहेत हे तेही अनेक शब्दांत सांगू शकतील. ते निघून गेल्यावर खानसाहेब धुमसत राहिले व त्या खोलीतील इतर लोक त्यामुळे शर्मिंदगे व गोरेमोरे झाले.

पण खानसाहेबांचा खास रोष होता प्रथितयश परमाणू पदार्थविज्ञानतज्ञ व इस्लामाबादच्या कायदेआझम विश्वविद्यालयाचे प्रध्यापक प्रा. परवेज हूदभॉय यांच्यावर. एकदा त्यांनी अण्वस्त्रें चुकून डागली जाऊ नयेत म्हणून त्यांच्या सुरक्षिततेबद्दल पाश्चात्य देशांत जी Permissive Action Links (PALs)-command-and-control mechanism नावाची पद्धती वापरतात ती पाकिस्तानमध्येही अनुसरावी अशा अर्थाचा लेख लिहिला. त्याबरोबर त्यांचा सर्वनाश करण्याच्या उद्देशाने खानसाहेबांनी त्यांच्याविरुद्ध एक खुनशी मोहीम उघडली. थोड्याच दिवसात त्यांना CJCS[९] शमीम आलम खान यांच्याकडून बोलावणे आले. पण ते बाहेर बसलेले असतांना CJCS यांच्या खोलीतून खानसाहेब बाहेर आले व त्यांच्याकडे रागारागात बघून निघून गेले. त्यांनी नम्रपणे CJCS यांनी मात्र त्यांना PAL म्हणजे काय याबद्दल त्यांना अथवा खानसाहेबांना कांहींच माहिती नसल्याने ते काय आहे व बाहेरदेशात ते कसे अनुसरले जाते चौकशी केली. हूदभॉय थक्कच झाले! 'नेमेचि येतो...' अशा वक्तशीरपणे कुदेता होणार्‍या राष्ट्राच्या लष्करप्रमुखाला आपली अण्वस्त्रे दहशतवाद्यांपासून कशी सुरक्षित ठेवावी ही माहिती नसावी याचे त्यांना आश्चर्यच वाटले.
मग बरेच दिवस हूदभॉय यांनी याबद्दल कांहींही ऐकले नाहीं. मग एक दिवशी त्यांना कळले कीं खानसाहेब कायदेआझम विश्वविद्यालयाच्या संचालकमंडळावर नियुक्त झाले आहेत. त्यांनी आल्याबरोबर विश्वविद्यालयाच्या परिसरातील जागा विकायचा प्रस्ताव मांडला त्याला हूदभॉयनी विरोध केला. त्याबरोबर त्यांच्या नावाचे "गवतातला सांप", इस्लामविरोधी", "इस्रायल व अमेरिकेचा हस्तक" असे फलक लागले. त्यांच्यावर देशाबाहेर जाण्याला कारणे संगितल्याशिवाय निर्बंध घातले गेले. ते रागारागाने गृहमंत्र्यांना भेटायला गेले व त्यांनी आपली फाईल पहायला मागितली. दोन इंच जाड अशा फाईलीत पहिल्याच पानावर खानसाहेबांची हस्तलिखित तक्रार होती. मंत्र्यांनी त्याना विचारले कीं तुम्ही पाकिस्तानी अणूबाँबविरोधी कांहीं लिहिले आहे कां? हूदभॉयनी होकारार्थी उत्तर देऊन सांगितले कीं ते एक मतप्रदर्शन होते. त्यावर मंत्र्यांनी फक्त खांदे उडवले व फाईल बंद केली. जणूं खानसाहेब लोकांना "रिमोट कंट्रोल"च्या सहाय्याने नाचवत होते! (शब्दसंख्या: मराठी रूपांतर-५५७९, मूळ लेख-९८००)
--------------------------------------------------------------------------------
टिपा:
[१] Arms Control and Disarmament Agency
[२] Islami Jamhoori Itihad
[३] या संदर्भावरून या प्रकरणाचे शीर्षक "प्रकल्प A/B" असे ठेवण्यात आलेले आहे.
[४] Kahuta Research Laboratory. झियांनी त्यांच्या पहिल्या भेटीत खानसाहेबांच्या कामगिरीवर खुष होऊन तिचे Khan Research Laboratory असे पुनर्नामकरण केले. असा सन्मान एकाद्या शास्त्रज्ञाला त्याच्या जिवंतपदी मिळण्याचे हे एकुलते एक उदाहरण असावे. अशा माणसाला मुशर्रफसारख्या स्वार्थी माणसाने स्वतःची कातडी बचावण्यासाठी अण्वस्त्रतंत्रज्ञानाच्या विक्रीबद्दल वैयक्तिकरीत्या जबाबदार धरून बदनाम केले हा एक घोर अपराध आहे व त्याला 'देशद्रोह'च म्हणावे लागेल.
[५] या विधानावरून अमेरिकेबद्दल खानसाहेबांसारख्या उच्चशिक्षित व चांगल्या सांपत्तिक परिस्थितील पाकिस्तानी लोकांना अमेरिकेबद्दल किती तिटकारा होता हे लक्षात येते. पण अमेरिकेला ते कसे समजणार?
[६] ही इंग्लंडच्या MI5 च्या तोडीची संघटना आहे.
[७] भारताला यात कांहींच नवीन नाहीं. दाऊद कुठे पाकिस्तानात आहे? कसाबही (आधी) पाकिस्तानी नव्हताच! हा पकिस्तानचा नेहमीचा निर्लज्जपणा आहे.
[८] अशी आहे दयनीय परिस्थिती पाकिस्तानच्या मुलकी सरकारांची. आजचे गिलानी-जरदारी सरकारही याला अपवाद नाहीं. माझ्या वाचनानुसार लष्करशहांचेसुद्धा ISI वर पूर्ण नियंत्रण नाहीं. ही संघटना 'स्वयंभू'च असावी असे मला वाटते.
[9] Chairman of Joint Chiefs of Staff
-------------------------------
सर्व प्रकरणांचे दुवे:
Foreword-Core: http://www.misalpav.com/node/10857
Chapter 1-Angry Young Man: http://www.misalpav.com/node/10935
Chapter 2-Operation Butter Factory: http://www.misalpav.com/node/11039
Chapter 3-In the valley of death: http://www.misalpav.com/node/11139
Chapter 4-Peanuts: http://www.misalpav.com/node/11266
Chapter 5-The Ties That Bind: http://www.misalpav.com/node/11433
Chapter 6-The figment of Zionist Mind: http://www.misalpav.com/node/11738
Chapter 7-A Bomb for the Ummah: http://www.misalpav.com/node/11798
Chapter 8-Pineapple Upside-Down Cake: http://www.misalpav.com/node/11936
Chapter9-The Winking General: http://www.misalpav.com/node/12145
Chapter 10-Gangsters in Bangles: http://www.misalpav.com/node/12224
Chapter 11-Guest of the Revolutionary Guard: http://www.misalpav.com/node/12301
Chapter 12-Project A/B: http://www.misalpav.com/node/12421
-------------------------------

राजकारणभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

22 May 2010 - 2:16 am | मदनबाण

असल्या कारस्थानी पाकड्यांबरोबर आपण "अमन की आशा" बाळगुन कार्यक्रम करतो ,,,असा मुर्खपणा करणारे लोक जगात दुसरीकडे शोधुन सापडणार नाहीत !!!

बाकी पाकड्यांच्या विघातक टाळक्याचे कौतुक करायला हवे...म्हणजे बघा ना इतके सगळे झोल करुन त्यांना जे मिळवायचं होत ते त्यांनी मिळवलच आणि जे करायचं होत ते करुन मोकळे झाले...ते सुद्धा अमेरिकेला फाट्यावर मारुन्...त्यांची हुशारी इतकी प्रगल्भ आहे की इतके करुन सुद्धा आजच्या घडीला अमेरिका त्याना दानशुरपणाने मदत करतच आहे आणि चीन छुपे पणाने मदत करत आहे...
आपले नेते मात्र ट्वीटरबाजी आणि बयानबाजी करुन स्वत:च्याच सरकारला अडचणीत आणुन दुनिये समोर वेगळ्याच कौशल्याचे प्रदर्शन करत आहोत.

पाकड्यांना आणि त्यांना सतत मदतीचा हात पुढे करणार्‍या अमेरिकेला या सर्व उद्योगाचे परिणाम नक्कीच भोगायला लागतील...
अंब्याची कोय रुजवलीत तर त्याला फणस येणार नाहीत...

मदनबाण.....

Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.

विनायक रानडे's picture

25 May 2010 - 9:40 am | विनायक रानडे

भारताच्या पडद्या मागील / पुढील सरकारची प्रथमिकता खुर्ची सांभाळणे, आप्त्तांची / मीत्रांची मालमत्ता वाढवणे हे असल्याने बाकी सगळे मुद्दे निरनिराळ्या माध्यामातून गोंधळ माजवून जनतेला चक्रावून टाकण्यात वापरात आहेत. सगळ्या टॉक शो मधून हेच दिसून येते. गोंधळ माजवणारे मुद्दे उकरून काढले जातात, घडवले जातात. तशाच प्रकारच्या बातम्या तयार केल्या जातात. हे सगळे टिपीकल ब्रीटीश चाणाक्य नीतीचे धडे आहेत. आम्हाला ब्रीटीशांनी गोंधळ घालण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. असल्या गोंधळ्यांना मुदाम महत्व देउन सगळी कडे पेरुन ठेवलेले आहे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजलेले व समजावणारे तुरुंगात टाकले गेले व जातात.

ईट हॅपन्स ओनली इन इंडिया, अरे बजाव रे बजाव, नाचो गाओ ऍश करो. एक पल है जीना एक पल है मरना. कसला आलाय स्वाभिमान, देशाभिमान, देशभक्ती असला खुळचट पणा कोणी सांगितलाय!

सुधीर काळे's picture

25 May 2010 - 7:09 pm | सुधीर काळे

भगवद्गीतेतील 'संभवामि युगे युगे' ही ओळ सगळ्याच देशा-धर्माला लागू आहे. भारतीय जनतेला तर नक्कीच असे वाटत आहे कीं, "कृष्ण भगवान, अब नहीं आओगे, तो कब आओगे?"
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.

संताजी धनाजी's picture

22 May 2010 - 5:34 pm | संताजी धनाजी

वाचतो आहे. प्रकरण ९ आणि १० कुठे आहेत?
- संताजी धनाजी

संताजी धनाजी's picture

22 May 2010 - 5:35 pm | संताजी धनाजी

१० आणि ११ कुठे आहेत?
- संताजी धनाजी

सुधीर काळे's picture

22 May 2010 - 9:08 pm | सुधीर काळे

इथे वाचा!
फसवणूक-प्रकरण ९-नेत्रपल्लवी करणारे ज. आइन्सेल (The Winking General):
http://www.misalpav.com/node/12145
फसवणूक-प्रकरण दहावे-"बांगड्या ल्यायलेले बदमाष!":
http://www.misalpav.com/node/12224
फसवणूक-प्रकरण अकरावे-"क्रांतिकारी रक्षकांचे पाहुणे" (Guest of the Revolutionary Guard):
http://www.misalpav.com/node/12301
------------------------
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण चौथे: http://tinyurl.com/293h432
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.

संताजी धनाजी's picture

23 May 2010 - 7:49 am | संताजी धनाजी

आभार!
- संताजी धनाजी

टारझन's picture

22 May 2010 - 9:52 pm | टारझन

दमलो , स्क्रोल करुन :)

अमित भोकरकर's picture

7 May 2015 - 2:06 am | अमित भोकरकर

पुढिल भागची लिन्क मिळेल का?