दमा (Bronchial Asthma ) - चला समजावून घेऊ (भाग - १)

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
29 Aug 2017 - 8:07 pm

प्रास्तविक : माझे वडील गेल्या ३७ वर्षांपासून श्वसनविकार व ॲलर्जीतज्ञ म्हणुन प्रॅक्टीस करत आहेत, सुरवातीच्या ८-९ वर्षांनतर त्यांना रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रमाची कल्पना सुचली तेव्हापासून आमच्या दवाखान्यात दमा ,COPD आणि टिबी या आजारांसाठी रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रम घेतला जातो .... ह्या कार्यक्रमाची २००९ साली लिमका बुक आॅफ रेकाॅर्डस् मध्ये नोंद घेतली गेली (१०,००० पेक्षा जास्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना प्रशिक्षीत केलं गेलं) आणि इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड मध्ये देखिल दखल घेतली गेली आहे. मी internship दरम्यान काहीकाळ ह्या उपक्रमात असायचो , गेल्या ७ वर्षांपासून श्वसनविकार विषयात पदव्युत्तर झाल्यापासून नियमीतपणे (१ला व ३रा शनिवार) रुग्ण प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी आहे...

स्वत:ची जास्त जाहिरात न करता त्याच कार्यक्रमात दिली जाणारी माहिती इथे लेखमालेद्वारे देण्याचा प्रयत्न करतो आहे..

तर मित्रमंडळींनो ह्या भागात दमा किंवा अस्थमाची लक्षणं जाणून घेऊयात

१.खोकला : दम्याबद्दल बोलतांना पहिलं लक्षण दम लागणे हे असलं पाहीजे असं बऱ्याच जणांना वाटत असेल पण तसं नाहीये ; तर रात्री झोपतांना येणारा ,हसल्यावर येणारा, मोठ्यानी बोलल्यावर येणारा , लहान मुलांमध्ये जोरात रडल्यावर येणारा खोकला ..... सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे (पण सर्वच रुग्णांना खोकला असेलच असं नाही ).बहूतांशी कोरडाच खोकला असतो , पण कफ/बेडका म्हणजे ओला खोकला सुध्दा दम्याचं लक्षण आहेच.

२.दम लागणे किंवा धाप लागणे : वेगानी चालतांना , जिना चढतांना , सामान घेऊन किंवा छोट्या बाळाला घेऊन चालतांना नेहमीपेक्षा जास्त दम/धाप लागत असेल तर ; वातावरण बदलानंतर काहीना दम लागतो (बऱ्याच ढगाळ वातावरणात श्वासाचा त्रास होतो , पण सर्वच दमा असणाऱ्यांना त्रास होईल असं अजिबात नाही)... घरात साफसफाई केल्यानंतर , जुनं सामान/कपडे यांच्या सफाईनंतर (जुनी धुळ आणि त्यातील जंतू /house dust mites) यांचा संपर्क आल्यानंतर दम लागत असल्यास हा देखील दमा...

३.श्वासाचा आवाज : शिट्टी सारखा सू-सू आवाज येतो, बरेचदा झोपेत असा आवाज येतो त्यामुळे पेशंटचे नातेवाईक ह्या लक्षणाबद्दल जास्त सांगतात.. छातीतून घरघर आवाज येतो (जणु काही कफ अडकलेला असावा असा )... ह्याचं कारण असं की श्वासनलिका आकसलेल्या असल्या कारणानी त्यातून
बाहेर पडणाऱ्या हवेचा असा आवाज येतो.

४.छातीवर येणारा दबाव किंवा आवळ्ल्यासारखं वाटणं - हे एक common लक्षण, बरेचदा रुग्ण सांगतात की काहीतरी वजनदार वस्तू छातीवर ठेवल्यागत भार जाणवतो म्हणून.

५.सर्दी: दमा असणाऱ्या ६०-७०% रुग्णांमध्ये सर्दी त्रास जाणवत असतो , केवळ सर्दी म्हणून येणारे बरेचसे रुग्ण मुळात दमा असलेलेच असतात , one airway one disease ह्या थिअरी प्रमाणे वारंवार सर्दी होणाऱ्या रुग्णांमध्ये दमा होणाच्यं प्रमाण वाढतं... खास करून ज्यांना ऋतुबदल होतांना सर्दी होते ती अॅलर्जीची सर्दी .... seasonal allergies; पण जे वर्षभर सर्दीमुळे ग्रस्त असतात ते perennial allergy वर्गात मोडणारे ...

६.पोटातले येणे: तान्ह्या मुलांमध्ये आढळणारं लक्षण !! लहान मुलांमध्ये श्वसानाचे स्नायू पूर्णपणे विकसीत न झाल्यामुळे पोटाचे स्नायू श्वास घेण्यासाठी मदत करतात आणि ती आत-बाहेर होणारी हालचाल (हापसल्यासारखं ) पोटातलं आलं असं म्हटल्या जातं आणि खेडेगावातून किंवा छोट्या गावांमधून असा गैरसमज आहे की पोटातलं आलं म्हणजे करणी/भानामती , काळा जादू वगैरे... आणि मग अघोरी उपचार सुरू होतात... तान्ह्या बाळांना पोटाला डागण्या दिल्या गेलेल्या पाहील्या आहेत....
पण ह्या रुग्णांचा योग्य उपचार झाला तर पोटातलं येणं पूर्ण थांबतं !!
ह्या शिवाय दुध पिता न येणं, श्वासाचा आवाज येणं, छातीवर हात ठेवला तरी घरघर जाणवते , बाळाचं वजन योग्यरीतीने वाढत नाही अशी साधीच पण महत्वाची लक्षणे दमा निदान करण्यास उपयुक्त ठरतात...

७.ॲसिडीटी किंवा आम्लपित्त : दमा असणाऱ्या रुग्णांनध्ये ॲसिडीटी चा त्रास खुपच common आहे ... ॲसिडीटी वाढली की दमा वाढतो आणि vice versa... हे लक्षण महत्वाचं आहे कारण दमा असणाऱ्या रुग्णांमध्ये ॲसिडीटी च्या औषधाची मात्रा दुप्पट द्यावी लागू शकते ...

पुढील भागात बघूया ... दम्याची कारणं

आरोग्यऔषधोपचारविज्ञानशिक्षण

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

29 Aug 2017 - 8:11 pm | सुबोध खरे

उत्तम लेख मालिका..
तज्ञ व्यक्तीकडून अशा विषयावर लेख येणे हे फार महत्त्वाचे आहे.
कारण दमा या आजाराबद्दल फार मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत आणि बऱ्याच लोकांचे स्वतः चे पूर्वग्रह सुद्धा.
ते दूर होण्यास नक्की मदत होईल.

डॉ श्रीहास's picture

29 Aug 2017 - 8:16 pm | डॉ श्रीहास

धन्यवाद सर.... _/\_

वाचतोय, पुभाप्र, पुलेशु

mayu4u's picture

29 Aug 2017 - 8:35 pm | mayu4u

जमल्यास थोडे मोठे भाग टाका.

डॉ श्रीहास's picture

29 Aug 2017 - 9:25 pm | डॉ श्रीहास

जरा दमानं घ्या हो..

अरिंजय's picture

29 Aug 2017 - 8:37 pm | अरिंजय

महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शनपर लेखमाला सुरु केल्याबद्ल धन्यवाद डॉक.

शलभ's picture

29 Aug 2017 - 9:19 pm | शलभ

+100

हॅट्स ऑफ टु डॉक..

अत्रन्गि पाउस's picture

29 Aug 2017 - 8:38 pm | अत्रन्गि पाउस

तुमच्या विशेषज्ञत्वचा खूप जणांना उपयोग होणारे
पुलेंशु

स्थितप्रज्ञ's picture

29 Aug 2017 - 9:09 pm | स्थितप्रज्ञ

सर्वप्रथम तुमच्या वडिलांना आणि तुम्हाला हा उपक्रम अविरत चालू ठेवल्याबद्दल सलाम!
खूपच उपयुक्त माहिती मिळत आहे. पुढच्या लेखांची चातकासारखी वाट बघण्यात येत आहे.

एस's picture

29 Aug 2017 - 11:15 pm | एस

+१.

असेच म्हणतो.

डॉ श्रीहास's picture

30 Aug 2017 - 9:59 am | डॉ श्रीहास

आभारी आहे...

पैसा's picture

29 Aug 2017 - 9:40 pm | पैसा

मला अ‍ॅलर्जिक सर्दी गेली कित्येक वर्षे आहे त्यामुळे उत्सुकतेने पुढील लेखांची वाट पहात आहे.

डॉ श्रीहास's picture

30 Aug 2017 - 9:57 am | डॉ श्रीहास

तुम्ही प्रश्न विचारणं सुरू करा.... बरेचदा ज्या गोष्टी लेखातून लिहील्या जाणार नाहीत त्या प्रश्नोत्तरातून येऊ शकतील

पैसा's picture

30 Aug 2017 - 10:36 am | पैसा

प्रशांतशी आधी बोलले होते, त्याप्र्माणे शक्य होईल तेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष भेटणार आहे. अ‍ॅलर्जी निर्मूलन कट्टा करूया! =)) तोपर्यंत सध्या लेख बारकाईने वाचेन आणि शंका येईल तसे प्रश्न विचारीन.

प्रीत-मोहर's picture

30 Aug 2017 - 4:38 pm | प्रीत-मोहर

मला नक्की सांग ग!! मी पण allergy च्या बोटीत.

Doc, किती आभार मानु या लेखमालेसाठी तुमचे!! Rhank u so much. This will definitely help me a lot.

प्रश्न विचारत जाईनच

डॉ श्रीहास's picture

30 Aug 2017 - 5:36 pm | डॉ श्रीहास

मस्त आयडिया !!

झेन's picture

29 Aug 2017 - 9:51 pm | झेन

अतिशय दुर्लक्षीत पण आजकालच्या प्रदूषित शहरीकरणामुळे अत्यंत महत्त्वाच्या विषयावर छान लेख.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Aug 2017 - 11:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

एका अत्यंत महत्वाच्या आणि बर्‍याच जणांमध्ये असलेल्या आजाराबद्दल तज्ञाकडून लिहिली जाणारी ही लेखमाला बरेच समज/गैरसमज सुधारायला मदत करेल. डॉक्टरांचे आधिचे लेखन वाचल्यामुळे हे असे होईलच यात अजिबात संशय नाही !

Nitin Palkar's picture

29 Aug 2017 - 11:20 pm | Nitin Palkar

तुमची लेखनशैली खूप आवडते. पुभाप्र. पुलेशु.

ज्योति अळवणी's picture

30 Aug 2017 - 12:49 am | ज्योति अळवणी

खूप सोप्या भाषेत आणि विस्तृत लिहिलं आहे दम्याबद्दल. पुढचा भाग लवकर टाका

डॉ श्रीहास's picture

30 Aug 2017 - 9:54 am | डॉ श्रीहास

सोप्या भाषेत सांगणं हे बऱ्यापैकी अवघड काम आहे..... प्रतिसादासाठी धन्यवाद

राघवेंद्र's picture

30 Aug 2017 - 2:21 am | राघवेंद्र

मस्त लिहिले आहे.
खूप उपयोगी माहिती मिळत आहे. पु. भा प्र.

कंजूस's picture

30 Aug 2017 - 3:16 am | कंजूस

तुम्ही तुमच्या शास्त्राप्रमाणे माहिती देत आहात हे आवडलं.
( प्रत्येक वैद्यकशाखा काही आजारांच्या उपचारांबाबत गंडलेली असते. दमा हे अलोपथीमधला एक असा आजार. परंतू हा लेखाचा विषय नाही. थांबतो.)

सुबोध खरे's picture

30 Aug 2017 - 10:01 am | सुबोध खरे

प्रत्येक वैद्यकशाखा काही आजारांच्या उपचारांबाबत गंडलेली असते. दमा हे अलोपथीमधला एक असा आजार.
हा एक इतर शाखांनी जाणून बुजून पसरवलेला गैरसमज.
खरं तर माझ्या अनुभवात आयुर्वेदिक किंवा होमीयोपॅथीक व्यावसायिकांनी दम्यावर रामबाण उपाय करतो म्हणून स्टिरॉइड्स दिल्याने पायाचे हाड मोडलेल्या असंख्य(शेकड्यात) तरुण किंवा मध्यमवयीन व्यक्ती मी पाहिल्या आहेत/ पाहतो आहे.(साधारण हे हाड साठी सत्तरी नंतर हाडे ठिसूळ झाल्याने मोडते विशेषतः बायकांमध्ये जांघेतील हाड दुखते म्हणून एक्स रे केल्यावर चाळीशीच्या माणूस किंवा बाईचे हाड मोडलेले दिसते. त्यावर तुम्ही कोणते औषध घेता विचारल्यावर दम्यावर आयुर्वेदिक/ होमीयोपॅथीक/ जडीबुटीचे- गावठी औषध घेतो असे सहसा उत्तर मिळते. एक्स रे पाहिल्यावर लक्षात येतेच कि हे पुदी किंवा पांढऱ्या गोळीतून स्टिरॉइड दिले गेले आहे.
यावर लक्षावधी लेख मिळतील. त्यातील एक साधा सरळ लेख दुव्यात देत आहे.
https://www.ebmconsult.com/articles/mechanism-risk-factor-steroid-avascu...
लक्षात ठेवा -- इतर उपचार पद्धतीचा वापर करण्याअगोदर तो व्यावसायिक प्रामाणिक आहे आणि आपल्याला स्टीरॉइड देत नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.
मूळ विषयापासून थोडा विलग असा प्रतिसाद आहे पण येथे आवश्यक वाटलं म्हंणून (डॉक्टरांची क्षमा मागून) देतो आहे.

डॉ श्रीहास's picture

30 Aug 2017 - 11:17 am | डॉ श्रीहास

मुळ विषयाला धरूनच आहे तुमचा प्रतिसाद .... पुढच्या भागात ह्या विषयी लिहीणार आहेच... Asthma वर ॲलोपथी अनेक drug trials झालेली आहेत आणि सध्या चालू आहेत... evidence based medicine हा सर्वोत्तम उपचार पध्दतीचा अवलंब केला जातोय ....

अशा त्वरित प्रश्नोत्तरांच्या लेखांमुळे रुग्णांचे शंका निरसन नक्कीच होईल. शिवाय इथे मराठीत आणि कायम स्वरुपी माहिती उपलब्ध होत राहते हे लक्षात आल्यावर मिपावाचक वाढतील,त्यातले काही लिहितील याची खात्री आहे. रेडिओवरचे कार्यक्रमांत प्रश्नोत्तरे असतात परंतू वेळेअभावी कार्यक्रम गुंडाळला जातो. दिवाळी अंक विशेषांक निघतात परंतू एकतर्फीच माहिती छापली जाते.
डॅा खरे म्हणतात तसे काही दावे करून फसवणूक करणाय्रा व्यक्तिंपासून सावध राहायलाच हवे

सस्नेह's picture

30 Aug 2017 - 4:59 pm | सस्नेह

))))) लक्षात ठेवा -- इतर उपचार पद्धतीचा वापर करण्याअगोदर तो व्यावसायिक प्रामाणिक आहे आणि आपल्याला स्टीरॉइड देत नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे ((((((
हे कसे ओळखायचे ?

डॉ श्रीहास's picture

30 Aug 2017 - 5:35 pm | डॉ श्रीहास

सोप्पा उपाय....

काय औषधं देताय ते विचारा ... नुसत्या पुड्या देत असतील तर त्यातील contents , expiry date , side effects ह्यावर बोलता येणार नाही ... मग उडवा उडवीची उत्तरं, डाॅक्टर कोण तुम्ही का मी असा प्रतिप्रश्न .... असं घडलं तर तुम्हाला ठरवायला वेळ नाही लागणार !!

होमिओपॅथी वाले साबुदाण्याच्या गोळ्या देतात नि अगम
्य नावे सांगतात.

सस्नेह's picture

30 Aug 2017 - 8:54 pm | सस्नेह

अगम्य औषधांची नावे

दुर्दैवाने खऱ्या गुरूंपेक्षा भोंदू बाबांकडे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे असतात तसेच
चांगल्या आयुर्वेदाचार्य किंवा होमीयोपॅथ पेक्षा असे धांदल करणारे लोक जास्त "व्यवहारचातुर्य" असलेले असतात त्यामुळे असे लोक रुग्णांना गोलात घेऊन इतके छान पटवून देतात कि त्यात स्टिरॉइड आहे हे त्यांना तुम्ही पटवून देऊच शकत नाही.
आमच्या सुदैवाने एक्स रे खोटं बोलत नाही आणि मोडलेले हाड स्पष्ट दिसते त्याबद्दल वाद होऊ शकत नाही.
एका अशा हुशार होमियोपाथशी बोलताना मला समजले कि साबुदाण्याच्या गोळ्या वर डेक्सामेथासोन ड्रॉपचे थेम्ब टाकून देतात किंवा गोळ्यांबरोबर कुठला तरी द्रावाचे दोन थेम्ब घ्यायला सांगतात त्यात डेक्सामेथासोन असते. २४ मिग्रॅ एका मिली मध्ये असलेले ड्रॉप्स घेऊन त्याचे दोन थेम्ब घेतले तरी २.४ मिग्रॅ होतात हे दिवसातून तीनदा घ्यायला सांगतात. वर होमियोपॅथीचा परिणाम हळूहळू होतो हे सांगितलेच असते. रुग्णाला तिसऱ्या दिवशी अराम पडला तर तो चार ठिकाणी मोठ्या तोंडाने सांगायला मोकळा कि "माझ्या" होमियोपॅथी डॉक्टरचा हातगुण किती चांगला तिसऱ्या दिवशी मला दम लागणे थांबले.स्टिरॉइड चा साईड इफेक्ट म्हणून वजन वाढते. मग १५ वर्षाच्या मुलीचे वजन वाढले तर वयात येते म्हणून वाढले ४५ च्या बाईचे वाढले तर मेनोपॉज मुळे वाढले कारणे शोधायला काय ?
तुम्ही एकदा हे "ब्रम्हास्त्र" वापरले कि दुसरी कोणतीच औषधे लागू पडत नाहीत. मग रुग्ण हे डॉक्टर सोडून दुसरीकडे गेले कि परत दम लागणे चालू. मग काय परत येरे माझ्या मागल्या.
वर लिहिलेले १०० टक्के खरे आहे.
चांगला डॉक्टर शोधणे हे चांगले सद्गुरू शोधण्याइतकेच कठीण आहे.

सुबोध खरे's picture

31 Aug 2017 - 9:59 am | सुबोध खरे

डाॅक्टर कोण तुम्ही का मी असा प्रतिप्रश्नअत्यंत प्रथितयश डॉक्टरही विचारताना आढळतात? यात डॉक्टरांचा इगो असतो आणि डॉक्टर जितका वरिष्ठ आणि प्रथितयश तितका इगो जास्त मोठा.
अर्थात त्यात अतिशय सज्जन अशा आमच्या वरिष्ठ डॉक्टरानी शेवटी कंटाळून कटकट्या रुग्णापासून सुटकारा मिळवण्यासाठी किंवा जालावरील माहिती 'डॉक्टरना' आहे का हे तपासून पाहण्याची वृत्ती असणाऱ्या "आधुनिक" रुग्णाशी वितंडवाद टाळण्यासाठीही असे विचारलेले मी पाहिले आहे.

डॉ श्रीहास's picture

31 Aug 2017 - 10:13 am | डॉ श्रीहास

हा इगो मला कधीच येऊ नये _/\_....

माझ्या बाबांचं आवडतं वाक्य - if you treat a patient he/she benighted for time being but if you teach a patient he/she benighted for lifetime!

सोपं आहे ओळखायला परंतू या लेखात गोंधळ नको म्हणन देत नाही. बघू नंतर दुसय्रा कोणत्या लेखात.

भ ट क्या खे ड वा ला's picture

1 Sep 2017 - 10:40 am | भ ट क्या खे ड वा ला

व्यावसायिक प्रामाणिक असणे फार महत्वाचे

स्टिरॉइड्स आणि पायाचे हाड मोडण्याचा नक्की काय संबंध आहे डॉक्टर ? कृपया स्पष्ट करा.

असे ऐकिवात आहे कि खेळाडू देखील स्टिरॉइड्स घेतात. त्यांनाही असा प्रॉब्लेम येतो का?

अप्पा जोगळेकर's picture

30 Aug 2017 - 10:33 am | अप्पा जोगळेकर

चांगला विषय. छान.

श्री गावसेना प्रमुख's picture

30 Aug 2017 - 11:02 am | श्री गावसेना प्रमुख

डॉ. वजन जास्त असल्याने चालतांना बोलतांना जी धाप लागते ती ही दम्याचा प्रकार असेल का?

डॉ श्रीहास's picture

30 Aug 2017 - 11:09 am | डॉ श्रीहास

तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे..... वजन कमी करूनही धाप लागली तरच दमा किंवा ईतर आजारांविषयी विचार करता येईल .... तोपर्यंत तुम्ही BP आणि हिमोग्लोबिन तपासून घ्या .

श्री गावसेना प्रमुख's picture

30 Aug 2017 - 11:14 am | श्री गावसेना प्रमुख

डॉ.दमा अनुवंशीक असतो का? म्हणजे आई ला असला कि मुलीला ही होउ शकतो .

डॉ श्रीहास's picture

30 Aug 2017 - 12:23 pm | डॉ श्रीहास

पुढच्या भागात Pathophysiology म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कारणेमीमांसा देणार आहेच.... तिथं अनुवंशिकता ह्यावर लिहीतो आहेच , तेव्हा सविस्तर बोलता येईल...

डॉ श्रीहास's picture

30 Aug 2017 - 12:39 pm | डॉ श्रीहास

ह्या भागात लक्षणांबद्दल लिहीलं आहे .... त्या अनुशंगानी प्रश्नोत्तर झालीत तर जास्त योग्य चर्चा होईल ... पुढच्या भागामधून कारणं, श्वसनसंस्थेची रचना , निदान (diagnosis) , उपचार असे भाग करणार आहे ....

उपयुक्त लेखमाला... पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

ऋतु हिरवा's picture

30 Aug 2017 - 2:50 pm | ऋतु हिरवा

चांगला विषय. माहिती देत रहा.

इरसाल कार्टं's picture

30 Aug 2017 - 3:31 pm | इरसाल कार्टं

खूप सोप्या भाषेत आणि विस्तृत लिहिलं आहे दम्याबद्दल. पुढचा भाग लवकर टाका.

राजाभाउ's picture

30 Aug 2017 - 3:49 pm | राजाभाउ

वरील पैकी निदान काही लक्षण दमा नसेल तरी सुध्दा (ईतर कारणांनी )असताता उ.दा. खोकला, दम लागणे किंवा धाप लागणे, श्वासाचा आवाज,सर्दी, ॲसिडीटी किंवा आम्लपित्त तर मग दमा आहे कि नाही त कसे ठरवणार ?

डॉ श्रीहास's picture

30 Aug 2017 - 4:54 pm | डॉ श्रीहास

ही बऱ्यापैकी common लक्षणं आहेत.... पण दमा निदान करण्यासाठी detail history, family history, triggers, ठरावीक तपासण्या , ह्यांचा वापर केला जातो....

सालदार's picture

30 Aug 2017 - 4:32 pm | सालदार

उत्तम लेख. अश्या मराठी लेखांची खुप गरज आहे. तुमचं काम स्तुत्य आहे.
एक प्रश्न : दमा आणि अ‍ॅलोपेशिआ यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का?

डॉ श्रीहास's picture

30 Aug 2017 - 4:55 pm | डॉ श्रीहास

धन्यवाद....

तुमच्या प्रश्नाचं उत्तर : नाही

प्रीत-मोहर's picture

30 Aug 2017 - 4:41 pm | प्रीत-मोहर

Doc ,asthma आणि त्यामुळे होणारे इतर आजार जसे त्वचेच्या allergies ह्याबद्दलही लिहिणं शक्य असल्यास लिहा प्लीजच.

प्रीत-मोहर's picture

30 Aug 2017 - 4:44 pm | प्रीत-मोहर

आणि allergic rhinitis पण

डॉ श्रीहास's picture

30 Aug 2017 - 5:29 pm | डॉ श्रीहास

Allergic Rhinitis,eczema & asthma ... एकत्र आढळू शकतात , अश्या वेळेस spirometry & Allergy test दोन्ही द्वारे निदान करणं उत्तम ...

Allergic Rhinitis, eczema (त्वचेच्या अॅलर्जीचा प्रकार )आई-वडील किंवा आजी-आजोबांमध्ये असल्यास पुढच्या पिढीत दमा येण्याची शक्यता वाढते .... ॲलर्जी अनुवंशीकतेने येताना वेगळ्या स्वरूपात येऊ शकते त्याचं हे उदाहरण !!

या लेखमालिकेचा उपयोग नक्की होणार. माझ्या मुलाला बालदमा होता. तो ७ वर्षे चालला. अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेद असे दोन्ही उपचार चालू होते. आता पूर्णपणे बरा झालाय. तुम्ही सांगितलेल्या लक्षणांपैकी क्र. १, ३, ५, ६ ही लक्षणे होती. अजूनही स्प्रिंग सिझन आला की महिनाभर आधी विशिष्ठ आयुर्वेदिक गोळ्या चालू करतो. गरज भासत नाही पण खबरदारी म्हणून.

Spirometry नावाची तपासणी करून घ्या वर्षातून एकदा (स्प्रिंग मध्येच करा हवी तर) नाॅर्मलच आली तर औषधं देऊच नका ..... खबरदारीच घ्यायची असेल तर दर वर्षी swine flu ची लस द्या (flu shot)

स्पायरोमेट्री सल्ल्याबद्दल धन्यवाद.
फ्लू शॉटबद्दल एक सागायचे आहे. एकेकाळी आम्ही सगळेजण फ्लू शॉटस वर्षातून एकदा घ्यायचो आणि हमखास आजारी पडायचो. मग जेंव्हापासून घेणे बंद केले एकदाही आजारी पडलो नाही. आणि हे फक्त आमच्या बाबतीत नव्हे तर बर्‍याच भारतीय कुटुंबांच्याबाबतीत घडले आहे. सगळ्यांनी फ्लू शॉटस घेणे बंद केले. हे बरोबर आहे का?

धडपड्या's picture

30 Aug 2017 - 9:02 pm | धडपड्या

उत्तम लेखन...

(विषय आणि रचना, दोन्ही...)

माम्लेदारचा पन्खा's picture

31 Aug 2017 - 12:35 am | माम्लेदारचा पन्खा

खूप प्रश्न आहेत . . . . . . विचारतो हळूहळू . . . . .

चौकटराजा's picture

31 Aug 2017 - 8:09 am | चौकटराजा

रक्ताभिसरण जेवढे चर्चिले जाते तसे रक्ताचे प्राणवायुकरण चर्चिले जात नाही. प्राधान्याने पेशीला प्राणवायू हा महत्वाचाच. म्हणून या विषयाचे महत्व. दमावाला माणूस घरात असणे हे एक परीक्षा देण्यासारखेच असते. ज्याना बालदमा होता त्याना पुन्हा वय ५५ नंतर दमा उदभवतो असे काही " को रिलेशन " आहे का ?

सुमीत भातखंडे's picture

31 Aug 2017 - 10:27 am | सुमीत भातखंडे

उत्तम लेखमालेची सुरुवात. भरपूर उपयुक्त माहिती मिळेल.

मी दम्याचा पेशंट असुन मागील दहा वर्षांपासुन तुमचे वडील डॉ. सुहास सरांची नियमित ट्रिटमेंट घेतोय आणि नियमित औषधे घेतल्यास मला दम्याचा त्रास होत नाही, हे सहर्ष सांगतो.

स्वच्छंदी_मनोज's picture

1 Sep 2017 - 1:18 pm | स्वच्छंदी_मनोज

अत्यंत उपयुक्त विषय आणि लेखमाला. डॉक, ह्या थोड्याश्या दुर्लक्षीत विषयावरची लेखमाला सुरु केल्या बद्दल अनेक धन्यवाद. ह्या लेखमालेमुळे इथे बर्‍याच जणाना फायदा तर होईलच पण आमच्यासारख्या सामान्य माणसांचे बरेच गैरसमज दुर होण्यास मदत होईल.
पुढचा भाग सवडीने आलातरी चालेल पण डीटेल येऊदे.

चामुंडराय's picture

2 Sep 2017 - 7:46 am | चामुंडराय

छान लेखमाला डॉक्टर

पुढचे लेख येऊ द्या दमा दमानं

गुल्लू दादा's picture

2 Sep 2017 - 2:46 pm | गुल्लू दादा

खूपच उपयुक्त अशी मालिका आहे सर.