आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर,
पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला.
एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. (नावे त्यांच्या उपस्थितीच्या वेळेनुसार नाहीत.)
चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन कुलकर्णी, प्रशांत (मालक), अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (जुना आयडी: वल्ली), कुमार१ , चौथा कोनाडा, रामचंद्र, बिपीन सुरेश सांगळे, MipaPremiYogesh, मुक्त विहारी (ऑनलाईन उपस्थिती).
मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो
उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली.
बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर
सर्वात आधी प्रचेतस- वल्ली हे अचूक दहाच्या आधीच पोहोचले होते. त्यानंतर साधारण १०:०५ ला मी पोहोचलो. तेथील लेण्याच्या खोलगट भागात पावसाचे पाणी साठलेले होते. ते मी बघत खाली गेलो तेव्हा त्यांनीच मला मिपाकर का? असे संबोधले. मागे मिपाकट्टा आवाहन धाग्यात सतिश गावडे जसे बोलले तसेच होत गेले. ("तिथे एखादा लोकांचा घोळका असेल तर "तुम्ही मिपाकर का?" असे बिनधास्त विचारायचे. घोळका नाही दिसला तर घोळका बनण्याची वाट पहा. भिडस्त नसाल तर एकट्या दुकट्या व्यक्तीलाही "तुम्ही मिपाकर का?" असे विचारु शकता.") त्यानंतर जो जो येत गेला त्याला कुणालाही फोन करण्याची किंवा आम्हाला शोधण्याची गरज पडली नाही. आंतरीक इच्छा असेल तर एक मिपाकर दुसर्या मिपाकराला बरोबर ओळखतो हे सिद्ध झाले. असो.
मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो
मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश
खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (वल्ली), कुमार१, चौथा कोनाडा
आज पावसाने बर्यापैकी उघडीप दिली होती. मधूनच भुरभुरत तो येत होता पण त्यात काही जोर नव्हता.
नंतर लगोलग इतर मिपाकर येत गेले. त्यात कर्नल तपस्वी, चष्मेबद्दूर, अमरेंद्र बाहूबली, नितीन सोलापूरकर, MipaPremiYogesh आले. मी अमरेंद्र बाहूबलीला या आधी नाशिक मध्ये भेटलो आहे. पण यावेळी त्यांनी चष्मा लावलेला असल्याने त्यांना ओळखताच आले नाही. अर्थात नंतर ओळख पटली. त्यानंतर इतर म्हणजे टीपीके, धनावडे, अनिकेत वैद्य, कुमार १, MipaPremiYogeshआले. थोडे उशीरा राजेंद्र मेहेंदळे व चौथा कोनाडा आलेत.स्वःत मिपामालक- प्रशांत उपस्थित झाले हा कौतूकाचा अन आनंदाचा धक्का सर्वांनाच बसला.
अमरेंद्र बाहूबली हे त्यांच्या ओरीसातील प्रोजेक्टचे काम थांबवून खास कट्याला येण्यासाठी परवा पुण्यात आले! काल देखील ते मुलाच्या आजारपणामुळे रात्री चार पर्यंत झोपूही शकले नसतांना कट्याला आज उपस्थित होते.
त्याच दरम्यान बिपीन सुरेश सांगळे उपस्थित झालेत. रामचंद्र मात्र त्यांच्या घरी काम असल्याने कट्यातील एक दोन जण कट्टा संपला तेव्हा निघून गेले होते तेव्हा आले. (उपस्थित प्रत्येक सदस्यांच्या लेखातील संदर्भ देऊन त्यांनी ओळख करून दिली. प्रत्येकाचे लेखन त्यांच्या लक्षात आहे हे कौतूकास्पद आहे.)
मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो
मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश
खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (वल्ली), कुमार१, चौथा कोनाडा
जसजसे मिपाकर येत होते तसतशी ओळख होत होती. काही पुणेकर मिपाकर एकमेकांना आधीच भेटून परिचीत होते. त्यामुळे त्यांच्या जुन्या आठवणी निघत गेल्या. पाऊस भुरभुरत होता. त्याच दरम्यान कर्नल तपस्वींनी व्हिडीओ फोन करून मुक्त विहारी यांना सामील करून घेतले. (आज फेसबूक लाईव्ह वगैरे करता आले नाही. त्यामुळे क्षमस्व.)
त्यांच्या फोननंतर पाऊस थोडा सुरू झाल्याने आम्ही पाताळेश्वर लेण्यातील एका छत असलेल्या भागात थांबलो, बसलो. तेथे कर्नल तपस्वींनी चितळेंचे पेढे व बाकरवडी आणली होती त्याचा आस्वाद घेतला. तेथे परत एकदा ओळख परेड झाली.
पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण
पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण
अधे मधे फोटो काढले गेले. अर्थात फोटो काढण्यापेक्षा मंडळींना गप्पांतच जास्त रस असल्याचे जाणवले. त्यामुळे हा धागा वाचकांना खुपसार्या फोटोंचा आस्वास घेता येणार नाही. जे काढले ते अपलोड केले आहेत.
कोरम पूर्ण भरल्यानंतर प्रचेतस (वल्ली) यांनी सुत्र हातात घेतली. आम्ही मुख्य मंदीर असलेल्या लेण्यात गेलो. तेथे प्रचेतस यांनी लेणी, किल्ले, भटकंती इत्यादी केलेल्या अभ्यासाचा परिचय झाला, म्हणजे त्यांनी आम्हाला पाताळेश्वर लेण्यातील साधारण इतिहास, तेथील शिल्पांचा मागोवा इत्यादींचा परिचय करून दिला. सदर लेणी (एकच लेणी कोरलेली आहे, व समोर नंदीसाठीचे मंदीर (दगडाचा स्लॅब असलेले व खांबार तोललेले) आहे. ही लेणी एकाच अखंड दगडातून कोरलेली आहे हे वैशिष्ठ मानावे लागेल. लेण्यात सप्तमातृका, हत्ती वरील शिल्प, शंकराची पिंड असलेले मंदीर, कोरलेले सारीपाट, द्वारपाल बाहेरील भागातील देवनागरीतील शिलालेख इत्यादींची ओळख प्रचेतस (वल्ली) यांनी करून दिली.
पाताळेश्वर लेण्यातील भाग
पाताळेश्वर लेण्यातील भाग
पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह
पाताळेश्वर लेण्यातील नंदीगृह - मोठा फोटो
मंदीरातील कर्मचार्याने बाहेर जाण्यास सांगितल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही मंदीरासमोरील भागात आलो. तेथेच मोठे कोंडाळे करून आम्ही उभे राहीलो. तेव्हा बिपीन सांगळे यांनीदेखील आणलेल्या पेढ्यांचा पुडा फोडला. पुन्हा एकदा कर्नल तपस्वींनी व बिपीन सांगळे यांनी आणलेल्या खाऊचा आस्वाद घेत मंडळी गप्पा मारत उभी राहील. कुमार१ यांना उभे राहण्याचा थोडा त्रास जाणवत होता तरीदेखील ते उभे राहून गप्पांत सामिले होत राहीले.
तेथे निघालेल्या आठवणी व चर्चांतील विषय:
- प्रशांत (मालक) यांना मिपाकर चित्रमिपाकर पॅरीस मध्ये अचानक भेटले. तोपर्यंत त्यांना प्रशांत हे मिपाकर आहेत वगैरे माहीत नव्हते. त्यांनी साक्षात मालकांनाच मिपावर सदस्य व्हा वगैरे आवाहन केले. मग तुम्ही कोण वगैरे प्रश्न चित्रगुप्तांनी विचारल्यावर प्रशांत यांनी त्यांची मिपासंदर्भात ओळख करून दिली.
- इतर आधी भेटलेले सदस्य जुन्या आठवणी काढत होते.
- कुणी काय लिहीले, कसे लिहीले, त्यांचा आवडलेला धागा
- काही जण फक्त वाचक असतांनासुद्धा तेथे उपस्थित होते हे कौतूकास्पद आहे.
- चौथा कोनाडा यांची चित्रकारी. लॉकडाऊन मध्ये मिपाकरांची ऑलनाईन झुम मिट झाली त्यावेळी त्यांनी काढलेल्या चित्राची आठवण झाली.
- मिपा व इतर संकेतस्थळांमधील सदस्यांतील फरक
- दिवाळी अंक लेखन तसेच मिपामध्ये काय बदल अपेक्षित आहेत त्या सुचना मालकांच्या कानावर प्रत्यक्ष गेल्यात.
- मिपाचे नवे व्हर्जन, त्यात फोटो अपलोड करण्याची सुविधा असणार आहे.
- ऑनलाईन लेखन करणारे लेखक व ऑफलाईन लेखन करणारे (वृत्तपत्र, मासिक यांत प्रसिद्ध होणारे साहित्य) यांत काय तफावत आहे त्याबद्दल चर्चा. बिपीन सांगळे हे खूप अनुभवी व ऑफलाईन लेखन प्रकाशित करणारे लेखक आहेत. त्यांनी त्यांचे या संदर्भात अनुभव व्यक्त केले.
- कर्नल तपस्वी हे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर हिंदीतून मराठी लेखन करण्याकडे कसे वळाले याचा परिचय
- अमरेंद्र बाहूबली यांचे सध्याचे लेखन - तमिळनाडूचा इतिहास यावर माहिती
- मिपाचा इतिहास साक्षात मिपामालकांकडून ऐकणे, तात्यांची आठवण
- पुन्हा कधी भेटणे यावर चर्चा,
- भेटीचे नवे ठिकाण जे बसून बोलण्यायोग्य असेल ते
या व इतर अनेक विषयांवर चर्चा, बोलणे होत गेले. बारा वाजलेले असल्याने व आधीचे ठरलेले काम असल्याने चष्मेबद्दूर, राजेंद्र मेहेंदळे, प्रशांत, कुमार१ बिपीन सांगळे, चौथा कोनाडा, MipaPremiYogesh, नितीन सोलापूरकर इत्यादी हळूहळू बैठकीतून बाहेर पडले.
जेवण, खादाडीचे काहीच प्रयोजन नसल्याने, व जेवणाबद्दल इतरांचे आधीच ठरल्याने या कट्यात खादाडी झाली नाही.
त्याच वेळी रामचंद्र आलेत. त्याचे उशीरा येण्याचे कारण व प्रत्येक सदस्यांचे लेख, संदर्भ लक्षात ठेवण्याची हातोटी वर उल्लेखलेलीच आहे.
त्यानंतर मी, प्रचेतस, कर्नल तपस्वी, अनिकेत वैद्य, धनावडे, बिपीन कुलकर्णी, रामचंद्र इत्यादी लेण्यांच्या गेटवर आलो. बाहेरच्या गेटवर एक दगडात कोरलेले शिल्प भटकंती व लेणी प्रेमी, इतिहासाची आवड इत्यादी नजर असल्याने प्रचेतस यांच्या नजरेने हेरले. त्याचे त्यांनी फोटो काढले.
पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली.
नंतर आम्ही पाचच जण उरलो, मी, अमरेंद्र बाहूबली, धनावडे, रामचंद्र व बिपीन कुलकर्णी. समोरच आम्ही चहा घेत गप्पा मारल्या. तेथे पुन्हा एकदा चर्चेला बहर आला. रामचंद्र यांनी बाबा आढाव यांच्या एका पुस्तकाची ओळख करून दिली. रामचंद्र यांच्या पुण्यातील टेकड्यांवरच्या पायी भटकंतीचे किस्से, अमरेंद्र बाहूबली यांच्या वजन कमी करण्याच्या पद्धतीविषयी चर्चा, धनावडे यांनी वाईला कट्टा करण्याचे आवाहन इत्यादी विषयी बोलणे झाले.
वरील फोटोंत रामचंद्र यांचा एकही फोटो नाही. कट्यात उपस्थितांपैकी कुणाच्या मोबाईल मध्ये असल्यास तो अपलोड करावा.
जवळपास दीड, पावणेदोन वाजले होते. त्यानंतर आम्ही पाच जणांनी एकमेकांचा निरोप घेऊन मिपाकर भेटीची, कट्याची यशस्वी सांगता झाली.
कट्टा आयोजनात व वृत्तांतलेखनात काही उणीव असल्यास आपण आम्हाला क्षमा कराल ही अपेक्षा.
पुढील कट्टा या पेक्षा मोठा, गाजत वाजत करूया या सदिच्छा!
प्रतिक्रिया
17 Sep 2022 - 9:50 pm | बिपीन सुरेश सांगळे
अरे वा !
मस्त - आला कि वृत्तांत !
पाभे कौतुक न आभार .
17 Sep 2022 - 10:03 pm | कुमार१
मस्त वृत्तांत !
17 Sep 2022 - 10:21 pm | श्रीगुरुजी
मस्त झालेला दिसतोय कार्यक्रम! प्रकाशचित्रे दिसत नाहीत.
17 Sep 2022 - 10:21 pm | सुमो
पण माझा गणेशा झालाय बहुतेक 😕
17 Sep 2022 - 11:16 pm | कर्नलतपस्वी
कट्टा आयोजित होणार या पाभेंच्या घोषणेनंतर व त्यावर झालेल्या उहापोह वरून एक वेगळाच अनुभव असणार याची कल्पना आली.पुढे पर्जन्यराजाच्या अतीकृपेमुळे एक दिवस आगोदर पर्यंत कट्टा होतो किंवा नाही साशंकच होतो.
पाभेंच्या दृढनिश्चय पुढे वरुणराजाने नांगी टाकली व कट्ट्याच्या दिवशी संपूर्ण शरणागती पत्करून मिपाकरानां भेटण्याची मुभा दिली.
मी जरा दूरच रहात असल्याने थोडा लवकर निघालो पण मित्रांना पहिल्यांदाच भेटणार रिकाम्या हाताने कसे जायचे म्हणून सुदाम्याचे पोहे घ्यावे या विचाराने पुण्यातल्या नामी बल्लवाच्या(चितळे) दुकानात घुसलो. कदाचित माझ्या दृढनिश्चयाची परीक्षा घ्यावी या उद्देशातून वरुणराजाने अचानक आघाडी उघडली. पण हाडाचा सैनिक, सगळी शस्त्र अस्त्र बरोबर होती. रेनकोट चढवला व दुचाकीवरून पुढील प्रवास सुरू केला. शेवटी वरूणालाच काय वाटले त्याने आपली सर्व कुमक परत बोलावून घेतली. या सगळ्यात टाईमीग चुकलेच. पण नागरी आयुष्यात आता पुर्ण पणे रूळल्यामुळे उशीर झाला तरी फारसे वाईट वाटून घेतले नाही.
दुचाकी लेण्या समोरच पार्क केली. आतमधे गेल्यावर एक दोन ठिकाणी घोळके दिसले पण सुरक्षारक्षाच्या नजरेतून बघुन मिपाकर कोण याचा आदांज घेत एका घोळक्यात घुसलो. आदांज बरोबर निघाला.
असो, स्वताचा परिचय दिल्यावर घोळक्यातल्या प्रत्येकाचे चेहरे निरखत असताना असे भाव दिसले की "किती जुनी ओळख आहे आपली".
मोकळ्या गप्पा सुरू झाल्या. माझ्या मनात प्रत्येक सदस्याबद्दल त्यांनी दिलेल्या प्रतिसादा वरून एक पुर्व प्रतिमा होती त्याला धक्का बसला.
प्रचेतस यांचे लिखाण व ज्ञान बघुन कोणीतरी ढुढ्ढाचार्य असेल असे वाटले होते. उलट निघाले तरूण तुर्क निघाले.
पाभे एक तिशीचा यंग एनर्जेटीक उतावळा तरूण असावा. पण उलट मध्यमवयीन, शांत, मृदुभाषी व आत्मविश्वास आणी आत्मीयता ठासून भरलेले व्यक्तिमत्व दिसले.
आणी असेच बाकीच्या सदस्यांबद्दल. चश्मेबद्दूर यांचे लेखन किवा प्रतीसाद न वाचल्यामुळे काहीच कल्पनाच नव्हती ,नवीनच ओळख झाली. प्रसन्न व्यक्तिमत्त्व व आत्मीयता या दोन गोष्टी मनावर छाप सोडून गेल्या..
आयुष्य डाॅक्टर जाती बरोबरच घालवल्यामुळे कुमारएक यांना ओळखण्यास वेळ लागला नाही.
सर्वांबद्दल लिहीत बसलो तर एक वेगळाच धागा काढावा लागेल. तरीसुद्धा अबा, अमरेन्द्र बाहुबली यांच्यावर लिहील्या शिवाय पुढे जाऊच शकत नाही. अबा एक दबंग, भांडखोर मोठ्ठा माणूस असेल उलट हॅण्डसम,चार्मींग व अफेक्शनेट व्यक्तिमत्त्वाचा उमेदितला तरूण मनावर कायमची छाप सोडून गेला. अल्झायमर झाला तरी त्याला विसरू शकणार नाही.
एक आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा रामचंद्र यांनी प्रत्येकाचे लिखाण व त्यावरील त्यांचे प्रतिसाद या बरोबरच ओळख करून घ्यायला सुरवात केली. प्रचंड उत्साह व सामान्य ज्ञान व आत्मीयता पाहून आनंद झाला. असे मिसळून गेले की दुधात साखर.
एक आणखीन खास निरक्षणाअंती असे दिसले की सर्व सदस्य फिजीकली फिट व हसमुख होते. कदाचित माझीच प्राॅपर्टी(तोंद) जास्त होती. इतके दिवस आवरून ठेवल्याने तीने सुद्धा बंड पुकारले आहे.
बाकी कट्ट्यावर काय झाले हे पाभेंनी स्वविस्तर लिहीलेच आहे.
थोडक्यात,आजच पुणे मिपा कट्टा संपन्न झाला. एक वेगळाच अनुभव होता.
"कट्ट्यावरती गंध पसरला
नाते मनाचे
कोणीच कोणा ठावे नसता
जुळती बंध रेशमांचे"
परवलीचा शब्द होता," मिपाकर का?".
नवल वाटले.
शेवटपर्यंत होतो,चहा पिला व मगच गेलो. या चारपाच तासात माझे वय मी विसरलो एवढे मात्र नक्कीच.
खादंन्ती नव्हती मग जवळच्याच प्रसिद्ध हाटेलातून दोन प्लेट वांग्याची भाजी,ज्वारीची भाकरी ,झणझणीत ठेचा व मिक्स भजी घेऊन घराकडे प्रस्थान केले. कट्ट्यावर बरेच नवीन मित्र मिळाल्याने मी खुश होतो. चुलतसासूबाईंची(स्वयंपाक) आराधना करावी लागली नाही म्हणून गृहमंत्रालय पण खुश.
एकुण दिवस मस्तच गेला.
17 Sep 2022 - 11:51 pm | शशिकांत ओक
आपल्या चुरचुरीत लिखाणातून कट्टा रंगला होता हे जाणवले. अचानक एन्ट्री घेऊन आपण सरप्राईज दिले ते भावले. अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाने निवृत्त सेनादलाच्या व्यक्तींचा गौरव केला त्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने येता आले नाही. पावसाने दडी मारल्याने सोय झाली. असो.
18 Sep 2022 - 9:05 am | सतिश गावडे
कट्टा उपवृत्तांत आवडल्या गेल्या आहे.
22 Sep 2022 - 6:11 pm | चौथा कोनाडा
सुंदर उप - वृतांत !
💖
कर्नलसाहेब, कट्ट्यामध्ये तुम्हाला भेटून जाम एनर्जेटीक वाटले.
झाल्या त्या गप्पा कमीच वाटल्या.
पाहूया पुन्हा भेटायचे योग कधी येतात ते !
17 Sep 2022 - 11:20 pm | इंद्रधनू
छान वृत्तांत
पुण्यात असूनही या वेळी नाही जमले याची खंत आहेच
पुढील कट्टा नक्की
मलाही फोटो दिसत नाहीत
17 Sep 2022 - 11:41 pm | योगी९००
छान वृत्तांत..
फोटो का दिसत नाहीत बरे?
17 Sep 2022 - 11:51 pm | पाषाणभेद
फोटोचा गणेशा का झालाय ते समजले नाही. उद्या दुरूस्ती करतो.
तो पर्यंत कृपया वाट पहावी.
17 Sep 2022 - 11:51 pm | पाषाणभेद
फोटोचा गणेशा का झालाय ते समजले नाही. उद्या दुरूस्ती करतो.
तो पर्यंत कृपया वाट पहावी.
18 Sep 2022 - 2:46 am | कपिलमुनी
वृत्तान्त आवडला..
यालाच घाबरून जुनेजाणते मिपाकर आले नाहीत असे सूत्रांनी सांगितले
18 Sep 2022 - 7:03 am | कॉमी
पुढील कट्ट्यास नक्की येणार.
18 Sep 2022 - 7:54 am | Bhakti
लयी धमाल केलेली दिसतेय!
पातळेश्वरचे फोटो कमाल आलेत.
पुण्याच्या एखाद्या कट्ट्याला नक्की येणार!
18 Sep 2022 - 10:41 am | प्रदीप
तुम्हाला ह्या लेखातील फोटो कसे काय दिसले ? म्हणजे काय डिव्हाईस व ब्राऊझर वापरून? मला माझ्या लॅपटॉपवरून अथवा मोबाईलवरून, दोन्ही ठिकाणी क्रोम वापरून ते दिसत नाही आहेत. एज वापरून पाहिले तरीही ते दिसत नाही आहेत.
(हा प्रामाणिक प्रश्न आहे, खिल्ली उडवणारा नाही).
18 Sep 2022 - 8:09 am | मुक्त विहारि
पण, व्हिडियो काॅल मुळे, ती कसर भरून निघाली ...
18 Sep 2022 - 9:04 am | सतिश गावडे
भारी झाला कट्टा. मात्र प्रचि दिसत नाहीत.
18 Sep 2022 - 9:46 am | आनन्दा
मी पण खरं तर आलो होतो, पण उशिरा पोचलो.. नाहीतर भेट झाली असती..
18 Sep 2022 - 10:13 am | तुषार काळभोर
मुख्य वृत्तांत आणि उप-वृत्तांत यातून चित्र उभं राहिलं...
पण मुख्य चित्रे का बरं दिसेनात!!
गॅस शेगडीच्या बंद बटणासारखं दिसतंय.
18 Sep 2022 - 10:37 am | खेडूत
अभियंता दिनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून एका कॉलेज मध्ये परिक्षक होतो. हा पूर्व नियोजित कार्यक्रम सरकवता न आल्याने कट्ट्याला येता आले नाही, पण व्रृत्तांत वाचून छान वाटले.
पुढील वेळी नक्की येणार.
फोटो दिसत नाहीत..
18 Sep 2022 - 11:43 am | पाषाणभेद
कालच्या फोटोंचा गणेशा झाल्याने बराचस हिरमोड झाला. आता ते फोटो येथे डकवतो आहे.
मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो
उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली.
बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर
लेणीचा परिसर या फोटोत दाखवणे हा उद्देश आहे.
मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो
उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली.
बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर
मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो
मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश
खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, कुमार१, प्रचेतस (वल्ली), चौथा कोनाडा
मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो
मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश
खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (वल्ली), कुमार१, चौथा कोनाडा
पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण
पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण
पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी
पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह
पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली
सर्वात शेवटी रामचंद्र आले, तो पर्यंत बरेचसे मिपाकर निघून गेले होते. लेण्याबाहेरील जंगली महाराज रस्त्यावरील फोटो.
डावीकडून: अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, मिपाप्रेमी योगेश, रामचंद्र, धनावडे, अनिकेत वैद्य, टीपीके, पाषाणभेद
सर्वांना भेटून खूप आनंद झाला. भेटूया पुढील कट्टा भेटीत.
18 Sep 2022 - 1:11 pm | श्रीगुरुजी
या प्रतिसादातील सुद्धा एकही प्रकाशचित्र दिसत नाही.
18 Sep 2022 - 5:48 pm | रामचंद्र
मलाही दिसत नाही. मात्र धाग्याची सुरुवात करणाऱ्या पाभे यांच्या लेखातील दहा प्रचि दिसत आहेत.
18 Sep 2022 - 11:51 am | शाम भागवत
फोटोच्या लिंका (इमेज अॅड्रेस) बरोबर वाटत नाही आहेत.
18 Sep 2022 - 11:52 am | शाम भागवत
आता मला फोटो व्यवस्थित दिसत आहेत.
फोटो मस्त.
18 Sep 2022 - 11:59 am | पाषाणभेद
मला तर मिपावर लॉगईन असतांनाच फोटो दिसत आहेत. नक्की काय गडबड आहे समजत नाही.
इतरांनाही मिपावर लॉगईन असतांनाच दिसत असावेत. कमीत कमी तेवढ्यानेही दिसत असेल तर ठिक आहे.
18 Sep 2022 - 1:06 pm | शाम भागवत
फोटो पाहण्यासाठी मिपावर लॉग इन होण्याची गरज नाही. मी लॉग आऊट करून पाहू शकलो.
गुगल लॉग इन आवश्यक आहे का? ते तपासायला पाहिजे.
18 Sep 2022 - 2:14 pm | टर्मीनेटर
सर्व फोटोज नव्याने अपलोड केले आहेत 👍
मला काल रात्री वृत्तांत वाचला तेव्हाही सगळे फोटोज व्यवस्थित दिसत होते. अत्ता काहीजणांचे फोटो दिसत नसल्याचे सांगणारे प्रतिसाद वाचल्यावर सर्व फोटोज आधी डाउनलोड आणि मग अपलोड करून धाग्यातल्या लिंक्स अपडेट केल्या आहेत. आता सर्वांना फोटो दिसत असावेत अशी अपेक्षा करतो.
अवांतर: कालच्या कट्ट्याला मी, माझी बायको आणि मिपाकर ज्योती अळवणी असे तिघेजण येणार होतो आणि त्यादृष्टीने तयारीही केली होती, पण वरुणराजाने अवकृपा केल्याने आम्ही नाही येऊ शकलो ह्याची खंत आहे. आमच्यावर अवकृपा झाली असली तरी कट्टेकऱ्यांवर कृपा झाल्याचे वाचून आनंद झाला आणि ह्या सुखद कट्टानुभवाला मुकल्याचे दुःखही!
असो, कट्ट्याचा सचित्र वृत्तांत आवडला आहे हे.वे.सा.न.ल. पुणे कट्ट्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल पाषाणभेद ह्यांचे आणि सर्व उपस्थित मिपाकरांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹
18 Sep 2022 - 2:30 pm | कुमार१
पुन्हा कधी जरूर यावे.
🙏
19 Sep 2022 - 4:35 pm | MipaPremiYogesh
तुमची आठवण काढली होती
20 Sep 2022 - 10:09 am | टर्मीनेटर
@ MipaPremiYogesh
🙏
कट्ट्याला यायची खूप इच्छा होती, पण नाही येऊ शकलो!
पुन्हा कधी तरी भेटूच... 👍
18 Sep 2022 - 2:26 pm | विवेकपटाईत
18 Sep 2022 - 2:37 pm | श्रीगुरुजी
आता मुख्य लेखातील प्रकाशचित्रे दिसताहेत.
18 Sep 2022 - 3:48 pm | यश राज
पुण्यात नसल्याने कट्टा मिसला.
फोटो व कट्ट्याचा वृत्तान्त छान.
मजा आली वाचून .
18 Sep 2022 - 5:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वृत्तांत चाळला. तपशीलवार वाचला नै. पण, भारी कट्टा झालेला दिसतो.
सर्वांना पाहुन बरं वाटलं. चश्मेबद्दूर कोणी पुरुष, डु आयडी असेल असे वाटायचे. ( हे राम)
बाकी, ते कुमार १ काका मनमोकळे वगैरे असतील असे असतील अशी अपेक्षा करतो.
(पळा)
-दिलीप बिरुटे
18 Sep 2022 - 7:22 pm | शाम भागवत
अगदी. अगदी.
18 Sep 2022 - 9:58 pm | चष्मेबद्दूर
चला म्हणजे माझा हेतू सफल झाला असे म्हणते. पण मी सोडून एकही महिला, अतिविशाल किंवा नविशाल कोणीही, का बरे आली नाही याचं आश्चर्य वाटले. असो, अडदीच गालबोट लागू नये म्हणून का होईना माझा सहभाग होता याचं बरं वाटलं.
बाकी कट्टा कट्ट्यासारखाच झाला. आवडला. नवीन ओळखी झाल्या. मी अगदीच नवीन आल्याने श्रवणभक्ती करायला मजा आली. परत भेटायला नक्कीच आवडेल.
सर्वांना धन्यवाद.
18 Sep 2022 - 5:35 pm | अनन्त्_यात्री
आणि उप-वृत्तांत !
18 Sep 2022 - 5:46 pm | सुरिया
जोरात झाला की कट्टा.
मस्तच.
18 Sep 2022 - 6:01 pm | प्रचेतस
एकदम खुसखुशीत वृत्तांत. काही मिपाकर आधीपासून ओळखीचे होतेच, तर काही मिपाकरांशी नव्याने ओळख झाली. गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, त्याअनुषंगाने देखील काही गप्पा झाल्या. पाभे यांनी कट्ट्याचे नेमके आयोजन केले होते त्याबद्दल त्यांचे खास आभार.
दिवाळीच्या आधी पुन्हा एकदा एक पुणे कट्टा आयोजित करण्याचा विचार सुरू आहे अर्थात वेगळ्या ठिकाणी. त्याबाबद्दल नियोजन करून जाहीर करूच.
18 Sep 2022 - 7:56 pm | कर्नलतपस्वी
कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले,
मलाही खुप आनंद झाला.
फार दुरचे नाही,
अ चा भाऊ ब
ब चा भाऊ क
मग अ क चा कोण
अगदी तसेच.
मिपामुळे ते आता खुपच जवळचे झाले.
18 Sep 2022 - 8:15 pm | सुरिया
म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;)
एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :)
18 Sep 2022 - 10:06 pm | कर्नलतपस्वी
म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;)
एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :)
आरारा रा, इतक्या खालच्या पातळीवर जाल कल्पनाच केली नव्हती.
सुरैया जी आपल्या आकलेचे दिवाळे निघाल्या सारखे वाटते.
या संकेतस्थळावर बहुतांशी सर्व एकमेकांस लिखाणा वरूनच ओळखतो. प्रकाशित होणारा प्रत्येक लेख, लेखकाच्या व्यक्तीमत्वाचे प्रतिबिंब सुद्धा बरोबर घेऊन येतो.
असे कट्टे होतात,योगायोग की अचानक कुणी कुणाला भेटते.विचार जुळल्यास जवळीक होते.
टोपणनावाने सर्व लिहीतात. कोण पुरूष, कोण स्त्री, वयाने लहान मोठा काहीच कळण्यास मार्ग नाही. अशा परिस्थितीत सर्वचजण एकाच पातळीवर मानून प्रत्येक जण सभ्यतेच्या मर्यादा पाळून आपआपले प्रतीसाद लिहीतात.ते लेखनावर असतात व्यक्तीवर नाही.
मी गेली दोन वर्षांपासून या संकेतस्थळावर वावरत आहे. प्रचेतस माझ्या खुप आगोदर पासुन इथे आहे. बरेच वेळा मी त्यांना सर म्हणून संबोधले. नम्रपणे त्यांनी मला सर नका म्हणून म्हणले.
कट्टा झाला म्हणून नातेसंबंध कळाले. नाहीतर कळण्यास काहीच मार्ग नव्हता.
हिच गोष्ट मी सुद्धा लिहू शकलो असतो पण नाही लिहीले कारण अशा अपरिपक्व प्रतिसाद येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.आणी माझी शंका आपण खरी ठरवली. बारा गावचे पाणी पिलेला मी....
प्रचेतस एक हसमुख,सरळमार्गी,आपल्या विषयात पारंगत ज्याला संपुर्ण संकेतस्थळा मानते. सरळ स्वभावानुसार आनंदात त्याने आमच्या नातेसंबंधाचा प्रतिसादामधे उल्लेख केला. सहाजिकच आहे.
आपण मला किंवा मी आपल्याला व्यक्तीगत पातळीवर अजीबात ओळखत नाही.
दुसरे आसे की आमची बॅटिंग झाली ,एक्स्ट्रॉ ओव्हर पण संपल्या. सामना संपायची वाट बघतोय. स्वानंदासाठी जगणे हाच उद्देश. चांगलं म्हणता येत नसेल तर वाईट, अपरिपक्व प्रतिसाद सुद्धा आपल्याजवळच ठेवा. स्वयंभू आहे. थोडक्यात काय शानसे जिते है ,शानसे ही मरेंगे l गालबोट लावू नका.
हर दिन नया था हर साल चुनौती।
कभी जशन मनाया कभी लगी पनौती।
बाऱीश देखी सुखा देखा खुब लगी धूप।
जीदंगी के झमेले मे पापड भी बेले खुब।
किसी ने दिया साथ तो किसी ने बढने से रोका।
मीला किसीका आशिश तो किसीसे मीला। धोका।
खुब कमाया खुब लुटाया खाया मिल बाँट के ।
कभी किसीका रंज न किया जिंदगी गुजारी ठाठसे।
कभी किये फाँखे कभी खायी रस मलाई।
सारी माया प्रभूकी जीसने ऐश करायी।
तसं पण आपल्या सारख्यांच्या फडतूस प्रतिसादाची काय पत्रास .
उत्तर देण्याची जरूर होती,प्रचेतस कदाचित देणार नाहीत पण कुठल्याच प्रकारचे "शिट" कधीच जवळ बाळगले नाही ज्याचे त्याला देऊन टाकले तसेच आपले आपल्याला.
कदाचित आपण हल्के घ्या म्हणाल पण एवढे मोठे ओझे हलके घेऊ शकत नाही.
पूर्णविराम.
18 Sep 2022 - 11:39 pm | सुरिया
वर्दीला विनोदाचे वावडे हे पटवले बघा पुन्हा.
.
पूर्णविराम ऐवजी विश्राम घ्या. सतत सावधान नसावे.
19 Sep 2022 - 7:20 pm | कर्नलतपस्वी
वर्दीला विनोदाचे वावडे
"आता उनाड शब्द वळावयास लागले !
..सारे लबाड अर्थ कळावयास लागले",
22 Sep 2022 - 5:55 pm | चौथा कोनाडा
आपण पण दूरचे नातेवाईक आहोत की काय ही तपासून पहायचे राहिलेच त्या दिवशी :-)
22 Sep 2022 - 6:09 pm | प्रचेतस
अगदी :)
गप्पांच्या नादात तो विषय बाजूलाच पडला.
18 Sep 2022 - 7:19 pm | शाम भागवत
मला आता मूळ धाग्यातील फोटो दिसायला लागेल आहेत. मला पहिल्याच फोटोतील पाषाणभेद यांचा मांडी घालून मस्त रिलॅक्स मोड मधला प्रसन्न चेह-यातला फोटो आवडला. लागलीच प्रतिसाद टाकला. आता पुढचे फोटो बघतो.
19 Sep 2022 - 12:02 pm | चांदणे संदीप
कट्टा चांगलाच यशस्वी झाला हे पाहून आनंद झाला. पाषाणभेद यांचे विशेष कौतुक. मी शनिवारपर्यंत कट्ट्याच्या धाग्यावर प्रतिसाद देणे टाळले कारण रविवारचे काम नक्की होत नव्हते. अखेर रविवारीही न टाळता येण्यासारखे काम मागे लागल्यामुळे येता आलेच नाही. असो, पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करीन.
सं - दी - प
19 Sep 2022 - 3:06 pm | सस्नेह
जोरदार झाला कट्टा. बरेच दिवसांनी असा जबरी कट्टा वृ आला मिपावर. फोटो एकदम झकास!
19 Sep 2022 - 4:41 pm | MipaPremiYogesh
कट्टा एकदम मस्त पार पडला. बऱ्याच नवीन ओळखी झाल्या . बाकरवडी, पेढे ह्यांनी मजा अली. त्याबरोबच प्रचेतस कडून खूप मस्त माहिती मिळाली. गाव वाले (धुळेकर) भेटले आणि एकूणच २-३ तास मजेत गेले.
19 Sep 2022 - 5:43 pm | श्वेता व्यास
छान फोटो आणि वृत्तांत.
19 Sep 2022 - 6:24 pm | जुइ
वृतांत आणि फोटो दोन्हीं झक्कास!
19 Sep 2022 - 10:41 pm | चौथा कोनाडा
कट्ट्याच्या दिवशीच काम असल्यामुळे मी कट्ट्याला येऊ शकेन की नाही याची शेवट पर्यंत खात्री नव्हती ! त्यामुळे धाग्यावर कुठेच याबाबत बोललो नव्हतो.
मागच्या प्राधिकरण कट्ट्याला उपस्थित होतो त्याला ७-८ वर्षे झाली होती ! त्यावेळी सौ सुद्धा सोबत असण्याचा योग आला ! तेव्हाची धमाल परत येणार होती !
इच्छा तेथे मार्ग या उक्तीनुसार काही ऍडजेस्टमेंट नंतर कट्ट्याला उपस्थित राहण्याची संधी मिळून गेली, सौ तिच्या व्यग्रते मुळे येऊ शकणार नव्हती ! पावसानं ही ब्रेक घेत सहकार्य केलं अन घाईत लोकल पकडून कट्ट्याला येऊन पोहचलो. पावसाच्या साचलेल्या पाण्यात सुरुवातीसच असलेल्या नंदी मंडपाचे प्रतिबिंब लोभस दिसत होते ! गर्दीच्या शहरातून कातळशिल्पाच्या आसमंतात शिरताना उल्हसित झालो होतो.
मी अर्धा पाऊण तास उशिरा पोहचलो, बाहेर माणसांचे दोन तीन थवे दिसत होते ते मिपाकरांचे वाटत नव्हते .. मग थेट लेण्यांमध्ये पोहोचलो .... एक ग्रुप दिसला ... “कट्टा का ??” म्हणून विचारल्यावर “हो” असा गलका झाला. मी चौको अशी ओळख देताच जोरदार स्वागत झाले ... एका आयडी माझा ताबा घेऊन एक छोटी पिशवी माझ्याकडे सुपूर्द करून हुश्श केलं ! ते टीपीके होते, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने लगेच मला आपलेसे करून टाकले ! कंजूस सरांनी एक कला विषयक पुस्तिका माझ्या कडे देण्यासाठी त्यांच्या हाती दिली होती, पण दोघांच्याही कार्यबाहुल्यामुळे भेट होऊ शकली नव्हती ! बऱ्याच वेळा व्यनि व फोन संभाषण झाले होते पण भेट व्हायचे योग येत नव्हते , ते या कट्ट्याने आले. मी मागे चित्रकार अन्वर हुसेन यांच्यावर लेख लिहिला होता त्यासंदर्भात ती पुस्तिका होती !
धन्यवाद कंजूस सर ... पुस्तिका माझ्या पर्यंत पोहिचली ... धन्यवाद, टीपीके !
लगेचच “मी बिपिन” म्हणत बिपिन सांगळे यांनी उबदार स्वागत केले, त्यांच्याशी काही वेळा व्यनि आणि फोनवर संभाषण होत असल्यामुळे ही गोष्ट लेखक कसे दिसत असतील याची उत्सुकता होती ! मग यथावकाश इतर सर्वांशी “हॅलो हाय” झाले. मग सर्वजण लेण्याबाहेरील मोकळ्या जागेत आलो, एकेकाशी ओळख पटत होती ! ! मी उशिरा पोहोचल्यामुळे प्रचतेसवल्लीचा हेरिटेज वॉक मिसला (बेटर लक नेक्स्ट टाईम, कट्ट्याचा आनंद घेण्यास सुरुवात केली !
प्रशांत .. साक्षात “मिपा मालक” यांना भेटून, बोलून रोमांचित व्हायला झाले !
पाषाणभेद यांनी धडपड करून निर्धाराने हा मिपा कट्टा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले !
लोकांना एकत्र करण्याचा " हाय पॉसिटीव्ह ऍटीट्युड" असणारे मनमोकळे पाभे मनाला भावून गेले !
पा भे, हॅट्स ऑफ .. हा सुंदर कट्टा आयोजित केल्याबद्दल ! कट्टा वृतान्त आणि प्रचि, दोन्ही मस्तच !
कुमार१ यांच्या ज्येष्ठज्ञानी व्यक्तिमत्वाने भारावून गेलो, त्यांचे कित्येक ज्ञानवर्धक, आरोग्य विषयक माहितीपूर्ण धागे डोळ्यासमोर तरळून गेले ! त्यांनी अंतर्नाद सारख्या नावाजलेल्या नियतकालिकात लेखन केले आहे ही भारावून टाकणारे होते ! अमरेंद्र बाहूबली, नितीन सोलापूरकर, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचतेसवल्ली यांच्याशी बोलून छान वाटले. नितीन सोलापूरकर आमचा जिल्हा पार्टनर असल्याने आपुलकी वाटली. कट्ट्यानंतर घरी परत जाताना नितीन बरोबर जायला मिळाले, खुप गप्पा मारता आल्या. थॅंक यू नितीन माझी अगदी “डोअर डिलिव्हरी केली ! पुढच्या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचता आले !
कर्नलतपस्वी यांच्या कणखर लष्करी व्यक्तिमत्वाने आणि आपुलकीने खुप भारी वाटले !
अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या “दि ओन्ली अनहिता इन कट्टा” प्रोफेसर वाटणाऱ्या जर्मन भाषेच्या शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या चष्मेबद्दूर यांच्याशी बातचीत करताना मजा आली ! पेढे व बाकरवडी यांनी आनंद द्विगुणित झाला ! थॅंक यू, कर्नल साहेब !
बिपिन सुरेश सांगळे यांच्याशी अधूनमधून संपर्क असल्याने त्यांच्या लेखनाचा परीघ माहीत झाला. त्यांनी इत्यादि सारखे दर्जेदार मासिक आणि दिलीप प्रभावळकर यांच्या सारख्या दिग्गज लोकांबरोबर काम केलेले आहे, त्याच बरोबर बालमित्र साठी प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांच्याबरोवर कथा माला केली होती हे ऐकून त्यांच्या त्यांच्या या क्षेत्रातील दिग्गजपणा लक्षात यावा ! त्यांच्याबद्दचा आदर दुणावला !
कट्टयात मन रमून गेले होते पण एका कार्यक्रमासाठी परतायचे असल्याने निघणे भाग होते. अनायसे नि३ सोलापूरकर तिकडेच जाणार असल्याने त्याच्याबरोबर निघता आले, गप्पा झाल्या ! थॅंक यू नि३ फॉर लव्हली लिफ्ट !
एकंदरीत कट्टा एक नंबर संस्मरणीय झाला !
मित्रांनो, भेटूयात पुन्हा !
- चौको
20 Sep 2022 - 3:40 am | श्रीगणेशा
पुण्यात असतो तर कट्ट्याला आवर्जून हजेरी लावली असती. पाताळेश्वरच्या बऱ्याच आठवणी आहेत, कॉलेजच्या दिवसात अधून-मधून सकाळ-संध्याकाळ एखादी फेरी ठरलेली असायची.
एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)
20 Sep 2022 - 1:15 pm | चौथा कोनाडा
अगदी ....
पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो !
श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !
21 Sep 2022 - 1:02 am | श्रीगणेशा
हा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल.
आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
नक्कीच!
21 Sep 2022 - 12:37 pm | चौथा कोनाडा
संकल्प करून ठेवलाय म्हणजे योग येणारच !
शुभेच्छा श्रीगणेशा
20 Sep 2022 - 10:10 am | योगी९००
जोरदार कट्टा...
प्रत्येकाची मुळ नावे काय आहेत?
20 Sep 2022 - 10:49 am | कंजूस
म्हणजे त्यांनी कधी स्वत:च इकडे लेखनात सांगितले तरी सांगता येईल.
20 Sep 2022 - 1:23 pm | पाषाणभेद
मला कट्टा हा शब्द जरा निराळा वाटत आला आहे. त्यामुळे मी कट्टा भेट हा उल्लेख करत आलेलो आहे.
कट्टा नियोजनात सर्वांनी माझे आभार मानले, माझे जरा जास्तच कौतूक होते आहे हे पाहून मला लाजल्यासारखे झाले आहे. मी तर खरेच काहीच केले नाही. फक्त कट्टा ठरवला व त्याला मिपाकरांनी साथ दिली.
तसे पाहिले तर कोणताही कार्यक्रम, प्रसंग, इव्हेंट, सादरीकरण, प्रवास, भेट किंवा कोठेही साधे जायचे असेल तरी माझे नियोजन पक्के असते. तुम्ही सर्वांनी कुणी एकाचे ऐकून या कट्यात सहभागी झालात याचे मला अपृप, कौतूक आहे.
मिपावरील अशा भेटी, कट्टा सांगून करण्यात मला आता अंदाज येत चालला आहे. काही ठोकताळे मनात पक्के झाले आहेत. यापुढील अशा नियोजनात मला माझा खारीचा वाटा उचलायला निश्चितच आवडेल.
पुढील कट्टा यापेक्षा मोठा व्हावा, एखादे मंगलकर्यालय, हॉल भाड्याने घेण्याइतका समारंभ व्हावा किंवा साहित्यसंमेलनासारखा कार्यक्रम व्हावा या सदिच्छा.
20 Sep 2022 - 1:35 pm | कर्नलतपस्वी
+१
21 Sep 2022 - 12:35 pm | चौथा कोनाडा
पाभे
+१०१
20 Sep 2022 - 6:29 pm | सविता००१
छानच वृत्तांत, फोटो
21 Sep 2022 - 4:02 am | पर्णिका
मस्तच... मला फार आवडतात अशा गाईडेड टूर्स !
फोटो आणि वृत्तांत छानच... :)
प्रतिसादही आवडले.
21 Sep 2022 - 9:11 am | कंजूस
तेव्हा काही जण अगोदरच जमा झालेले होते. पण त्यांना "मिपाकर का?" विचारावे लागले नाही कारण लहान थोर सर्व वयोगट होता आणि एक फलक झाडाला बांधत होते. - 'भारत इतिहास मंडळ'
@पर्णिका, या गटाचा शोध घ्या.
( *डॉक्टर सुहास म्हात्रे यांनी बोलावलेला 'अनिवासी' यांच्याशी गप्पा कट्टा)
22 Sep 2022 - 5:45 pm | चौथा कोनाडा
मस्त होता कट्टा
ऑडीयो क्लिपस नाही सापडल्या !
21 Sep 2022 - 7:29 am | श्रीरंग_जोशी
जोरदार झालेला दिसतोत पुणे कट्टा. मुख्य आयोजक पाषाणभेद साहेब व त्यांच्या सहकार्यांचे तसेच सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक अभिनंदन.
फोटोज उत्तम आहेत.
दहा वर्षांपूर्वीच्या मुंबईजवळच्या एका कट्ट्याच्या वृत्तांतातल्या फोटोजला काहींनी धुरकट म्हंटले होते. दहा वर्षांत छायाचित्रणाच्या (सरासरी) दर्जाच्या बाबतीत लक्षणीय प्रगती झाली आहे असे निरीक्षण नोंदवतो.
22 Sep 2022 - 2:29 am | nutanm
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या जळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?
22 Sep 2022 - 5:50 pm | मुक्त विहारि
डोंबिवली येथे, (जागतिक केंद्र) , कट्टा आयोजित करू...
22 Sep 2022 - 2:29 am | nutanm
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या जळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?
22 Sep 2022 - 8:01 am | कर्नलतपस्वी
असे भेट कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील.
पुणे कट्टा आयोजित करण्यात पाषाणभेद यांचा पुढाकार होता तर शिकागो साठी विजुभाऊ यांचा.
आयोजनासाठी असे काही विषेश काही करावे लागत नाही.
निर्लेप, निस्वार्थ, अपेक्षा विरहीत भेट आजकाल दुर्मीळच त्यामुळे अशी मित्र भेट झाली की आंनद होतो.
आजची सामाजीक परीस्थीती काहीशी अशी आहे,
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ?
आमच्या सारखे बॅटिंग पुर्ण करून बसलेल्याची या पेक्षाही वाईट परिस्थिती,
मन कशात लागत नाही
अदमास कशाचा घ्यावा ?
अज्ञात झर्यावर रात्री
मज ऐकू येतो पावा
असे कट्टे थोडासा दिलासा देऊन जातात.
22 Sep 2022 - 5:15 pm | चौथा कोनाडा
+१
22 Sep 2022 - 8:17 am | श्रीरंग_जोशी
'मध्यवर्ती ठिकाण' व 'कट्टा' या शब्दांद्वारे मिपावर शोधल्यास सर्वाधिक कट्टे डोंबिवली येथेच आयोजित झाल्याचे आढळून येईल.