मला भेटलेले रुग्ण - १६

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
19 Jun 2018 - 2:49 pm

https://www.misalpav.com/node/42489

मुलगी आणि वडील दोघही पेशंट , दुसऱ्या व्हिसीटला आले होते. केबिन मध्ये शिरतांनाचा चेहरेच सांगत होते की चांगला फरक पडलाय , पण तरिही औपचारिकता म्हणून मी विचारलंच कसं वाटतंय म्हणून तर वडीलांनी उत्तर दिलं “ बरेच वर्षांचा त्रास गेल्या महिन्याभराच्या औषधांनी ईतका कमी झाला की नाहीसा झाला असं वाटतंय; त्यामुळे येतांना अजून दोन पेशंट सोबत घेऊन आलोय आणि त्या दोघांची गॅरेंटी घेतली आहे की जर फरक नाही पडला तर तुमची फी आणि औषधांचा जो काही खर्च झालाय तो मी परत करणार !”

मी म्हणालो “ अहो अशी गॅरेंटी तुम्ही कशी काय देता त्यांना, एक तर जिथे हातांची पाचही बोटं सारखी नसतात तिथे पेशंट कसे सारखे असतील ; काहीना लवकर आराम पडतो तर काहींना ऊशीरा ... बऱ्याच पेशंटचा आजार वेगळा असतो, माझ्याऐवजी दुसऱ्या स्पेशलीस्ट ची गरज पडू शकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तर ते दोन्ही पेशंट पाहीले देखील नाहीयेत ...”

पेशंट बोलला “ डाॅक्टर ते दोघं नक्कीच बरे होतील तुमच्याकडे , त्याची काळजीच नाहीये मला....”

पुढे काही बोलण्यासारखं नव्हतंच..... पण काहीतरी छान घडतय जाणवत राहीलं.

________________•________________

ह्या मावशी नियमीत येतात फाॅलोअपसाठी , सगळ्यात पहिल्यांदा मुलासोबत आल्या होत्या ( का कोण जाणे पण लक्षात राहीलं होतं) .... नंतर बऱ्याच फाॅलोअपसाठी आल्या तेव्हा बहूतेक वेळी एकट्याच तर क्वचित मुलीसोबत आल्या ....

एक दिवस त्या स्वत: बोलल्या “ डॉक्टर पहील्यांदा तुमच्याकडे आले होते तेव्हा मुलगा सोबत होता आणि दवाखान्यातून बाहेर पडतांना तो म्हणाला होता की इथेच दाखवत जाऊ ह्यापुढे आणि त्यानंतर काही दिवसातच एका अपघातात तो गेला .... “

हे बोलता बोलता डोळे भरून आले त्यांचे आणि तेव्हा लक्षात आलं की केवळ मुलानी म्हटलं होतं म्हणूनच त्या नियमीत येतात.

________________•________________

दुपारी चहाची वेळ होती , बाबांच्या केबिनमध्ये गप्पा मारत बसलो होतो .तेवढ्यात एक पेशंट आला, बाबांनी तपासणी आधी डिटेल्स विचारले तर म्हणाला “ डॉक्टर गेल्या आठवड्यातच येऊन गेलो होतो, तुम्ही ईसीजी करून घेतला आणि दोन गोळ्या देऊन हार्टस्पेशॅलिस्ट कडे जा असं सांगितलं होतं ... परवाच हार्टच्या डाॅक्टरांकडे जाऊन आलो तिथे ॲंजीयोग्राफी झाली आणि ॲंजीयोप्लास्टी देखील झाली , ३ क्रिटीकल ब्लाॅक्स होते . त्या डॉक्टरांनी सांगीतलं की अगदी वेळेवर आलात म्हणून !! सर तुमचे आभार मानायला आलो ... थॅंक्यू .”

अस म्हणून हा पेशंट निघून गेला , त्यानंतर मी बाबांना विचारलं की तुम्हाला हा पेशंट अजिबात आठवत नसणार ... बाबा हो म्हणाले .... बरेचदा असे प्रसंग घडून जातात पण जेव्हा पेशंट केवळ कृतज्ञता दाखवून जातात तेव्हा अगदी कृतकृत्य होतं आणि ह्या प्रसंगाचा साक्षीदार म्हणून माझ्या भावना मांडायचा केवळ प्रयत्नच करू शकतो आहे .

_________________॰_______________

तिसऱ्या व्हिसीट मध्ये देखील ह्या पेशंटला सांगीतलेल्या टेस्टस् करून आणलेल्याच नव्हत्या ....ही पेशंट दम्याच्या चौथ्या पायरीवर होती, एक्सरे वर हृदयाचा आकार वाढलेला दिसत होता त्यामुळे 2D ECHO नावाची हृदयाची तपासणी आणि हार्टस्पेशलीस्टला दाखवणं असं दोन्ही केलेलंच नव्हतं .... आणि जीव तोडून सांगातल्यावरही पेशंटच्या नातेवाईकांच्या चेहेऱ्यावरची माशी हलायला तयार नव्हती , वरून म्हणत होते की तुमच्या औषधांनी थोडं बरं वाटतंय म्हणून बाकीच्या टेस्ट करायची आम्हाला गरज वाटत नाहीये .....

हे ऐकून धन्यच झालो ... मला न राहवल्यामुळे म्हणालो “ अहो तुम्हाला वाटत नाहीये म्हणून तपासणी करायची नाही असं म्हणताय , उद्या औषधं बंद कराल का पेशंटची कारण तुम्हाला त्यांची पण गरज वाटणार नाही म्हणून .. “

हे सगळं बोलूनही काहीही फरक पडणार नाही समजून चुकलं होतं , पुढची औषधं लिहणं आणि न केलेल्या तपासण्या करून आणा हे परत लिहीण्याव्यतिरिक्त माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता .

_________________________________

आरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणप्रकटनविचारलेखअनुभवसल्लाप्रश्नोत्तरेआरोग्य

प्रतिक्रिया

एस's picture

19 Jun 2018 - 3:53 pm | एस

विलक्षण!

विशुमित's picture

19 Jun 2018 - 3:59 pm | विशुमित

छान..! नेहमीप्रमाणे आवडले.

धडपड्या's picture

19 Jun 2018 - 4:03 pm | धडपड्या

काहीतरी छान घडतय जाणवत राहीलंय....

खूप लोकांचे आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी...

डॉ श्रीहास's picture

19 Jun 2018 - 4:16 pm | डॉ श्रीहास

एस, विशुमित आणि धडपड्या .... तुमचे आभार......

हा भाग संपादित झाल्याच्या निमीत्तानी हे सांगू ईच्छीतो की हे सगळे भाग फेसबुकवर मिपाकर शिवकन्या शशी ह्यांनी मिशी नावाच्या ब्लाॅग (काय म्हणावं हे कळत नाहीये ) मध्ये पुर्नसंपादित करून अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवले .... त्याबद्दल त्यांचे पण अनेक आभार _/\_ .

छान..! नेहमीप्रमाणेच सुंदर आणि आवडले.

शलभ's picture

19 Jun 2018 - 4:46 pm | शलभ

खूप सुंदर डॉक.

नाखु's picture

19 Jun 2018 - 5:25 pm | नाखु

सन्गोवांगीच्या कथांपेक्शा असे सिद्ध्हस्त लिखाण जवळच वाट्ते.

नियमित लिहित रहा.

नियमित वाचक नाखु, वाचकांचीही पत्रेवाला

सप्तरंगी's picture

19 Jun 2018 - 5:57 pm | सप्तरंगी

नेहमीच छान लिहिता ...... रोजच्या जगण्यातलं, छोटं, सोपं, सुटसुटीत तरिही नेमकं परिणाम साधणारं आणि थेट मनाला भिडणारं

अत्रन्गि पाउस's picture

19 Jun 2018 - 6:04 pm | अत्रन्गि पाउस

सगळ्या भावना शब्दात नाही मांडता येत

डॉ श्रीहास's picture

19 Jun 2018 - 7:33 pm | डॉ श्रीहास

मला हेच तर सांगायचं असतं....

mayu4u's picture

19 Jun 2018 - 6:55 pm | mayu4u

नेहमीप्रमाणे!

सुबोध खरे's picture

19 Jun 2018 - 7:12 pm | सुबोध खरे

हे सगळं बोलूनही काहीही फरक पडणार नाही समजून चुकलं होतं
डॉक्टर साहेब
एक उदाहरण देतो आहे.
दारू मुळे पायाला आणि चेहऱ्याला सूज आलेल्या आणि लिव्हर सिर्र्होसीस झालेल्या रुग्णाला त्याच्या नातेवाईकांच्या समोर स्वच्छ शब्दात सांगतो "मला जितकं कळतंय त्यावरून मी तुम्हाला सांगतो आहे कि दारू पूर्णपणे सोडा आणि चांगल्या यकृत रोग तज्ज्ञाला दाखवा"
अन्यथा मी माझ्या भिंतीवर असलेली श्री गणपतीची २ फूट आकाराची तसबीर दाखवून सांगतो कि एवढा मोठा फोटो काढून ठेवा. केंव्हा भिंतीवर लावायला लागेल ते सांगता येणार नाही.
मागच्या वर्षी दोन रुग्णांनी या नंतर दारू सोडली. परंतु बरेच रुग्ण अजूनही दारु न सोडता परत परत आता स्थिती कशी आहे हे पाहायला येतात.
लोक केंव्हा उलटून तुम्हाला बोलतील कि "तुम्ही आम्हाला व्यवस्थित सांगितलं नाही" याचा नेम नाही.
मुतखडा, हृदयविकार, अतिरक्तदाब, कर्करोग यांचे निदान झाल्यावरहि हयगय करणारे आणि त्यामुळे रोग बळावणारे रुग्ण रोजच दिसतात.
"कर्मण्येवाधिकारस्ते" चा खोल अर्थ असा आहे.

डॉ श्रीहास's picture

19 Jun 2018 - 7:31 pm | डॉ श्रीहास

आपलं काम करत राहणं एवढच हातात असतं.

sagarpdy's picture

19 Jun 2018 - 7:43 pm | sagarpdy

पु भा प्र

शब्दानुज's picture

19 Jun 2018 - 7:52 pm | शब्दानुज

दंडवत

भ ट क्या खे ड वा ला's picture

19 Jun 2018 - 8:05 pm | भ ट क्या खे ड वा ला

छान लिहिता हो . प्रत्येक वेळी मानवी स्वभावाचे नवे नवे नमुने भेटताहेत.

सुधीर कांदळकर's picture

19 Jun 2018 - 8:09 pm | सुधीर कांदळकर

नेहमीप्रमाणे हृदयस्पर्शी लेखन. पण माझी एक विनंती आहे हो. अस्वस्थ करणारे अनुभव शक्यतो मध्ये आणि शेवट गोड असलेले शेवटी टाका. अस्वस्थतेचा ठसा खोलवर उमटतो. बराच वेळ सुन्नतेत जातो.

असो. सुंदर लेखनाबद्दल अनेक धन्यवाद

प्रमोद देर्देकर's picture

19 Jun 2018 - 8:25 pm | प्रमोद देर्देकर

वाचतोय.

स्थितप्रज्ञ's picture

19 Jun 2018 - 11:22 pm | स्थितप्रज्ञ

काही किस्से टचिंग!
अजून येत राहू द्या.

शाली's picture

20 Jun 2018 - 9:23 am | शाली

वा!
अजुन वाचायला आवडेल तुम्ही लिहिलेलं.
पुलेशु!!

लई भारी's picture

20 Jun 2018 - 10:05 am | लई भारी

पहिल्या प्रतिक्रियेलाच अनुमोदन. दुसरा शब्द सुचत नाही.
अशीच रुग्णसेवा होत राहो आपल्याकडून. आणि लिहीत राहाच :)
_/\_

देशपांडेमामा's picture

20 Jun 2018 - 12:43 pm | देशपांडेमामा

डॉक्टरांच्या अनुभवाबाबत नेहमी कुतूहल असते . डॉक्टरांचे भावविश्व खुले केल्याबद्दल परत एकदा धन्यवाद _/\_

पुभाप्र

देश

मोदक's picture

21 Jun 2018 - 12:32 am | मोदक

मामांशी सहमत..!!

लिहित रहा डॉक..

किरण कुमार's picture

20 Jun 2018 - 3:33 pm | किरण कुमार

मस्त आहेत एक एक अनुभव , लिखते रहो ..

विजय नरवडे's picture

25 Jun 2018 - 1:04 pm | विजय नरवडे

छान