मला भेटलेले रुग्ण - १४

डॉ श्रीहास's picture
डॉ श्रीहास in जनातलं, मनातलं
7 Mar 2018 - 7:50 pm

http://www.misalpav.com/node/42101

“आपके बेटे को अस्थमा है।” बस् एवढं म्हणायचा अवकाश आणि त्या आईच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या.... खरं तर त्या ३ वर्षाच्या मुलाला गेल्या दिड वर्षांपासून हा त्रास आहे पण ॲलर्जीचा खोकला आहे , असं सांगीतल्या गेल्यामुळे फार काही वाटलं नव्हतं पण दमा आहे म्हटल्या म्हटल्या लगेच पालकांच्या चेहेऱ्यावरचे भाव बदलतात .... फार सिरीयस किंवा अतिगंभीर निदान केलं गेलंय आता पुढचं संपूर्ण आयुष्य अवघड जाणार असं काहीसं चित्र डोळ्यासमोर तरळतं ......हे काही योग्य नाही कारण दमा/अस्थमा हे फक्त नामकरण केलं गेलेलं असतं , आजार तर तोच आहे , लक्षणं देखिल तिच मग फरक काय पडतो ... डाॅक्टरांना बरेचदा रुग्णाला आजाराचं निदान केल्यावर नेमकं नाव सांगणं अवघड जातं, मग सोपं किंवा कमी intensity असलेली गोंडस नावं सांगीतली जातात.....

मी असं अजिबात करत नाही.... दमा किंवा टिबी हे आजार बरेचदा रुग्णांचे नातेवाईक त्यांच्यापासून लपवून ठेवतात आणि डाॅक्टरांना विनंती करतात की असं सांगा की काही नाही म्हणून किंवा साधा आजार आहे.... ह्यावर माझा एकच प्रतिप्रश्न असतो , जर रुग्ण औषधं घेऊन मेडीकलच्या दुकानात गेला आणि हे कशाचं औषध आहे विचारल्यावर फार वेळ लागत नाही उत्तर मिळायला !! मग मेडीकलवरच्या माणसानी आजार काय आहे ते सांगावं की डाॅक्टरांनी ? .....

ही हिंम्मत म्हणा किंवा धीटपणा म्हणा मी प्रत्येक वेळेस दाखवतो , भलेही पेशंट परत येईल किंवा नाही येणार पण तो/ती माझ्याकडून अर्धवट सल्ला किंवा निदान घेऊन जाणार नाही एवढं मात्र खरं.......

_________________•_______________

तिसरी व्हिसीट होती , नवरा (पेशंट ) आणि बायको समोर बसलेले मी रिपोर्ट बघून औषधं लिहून दिले आणि पुढची तारिख दिली....अजून काही विचारायचं आहे का असं विचारल्यावर बायकोनी विचारलं “डाॅक्टर साब और कितने दिन ईलाज करवाना पडेगा ? दवाईंया बहूत महंगी है और ईतकी तकलिफ कम जादा होती रहती है।”.......
मी म्हणालो “हमेशा!! ईलाज चलता रहेगा , टिबी के बाद ईनके दोनो फेफडे बुरी तरह से खराब हो चुके है। दमे की तकलिफ ना बढे और दमेका ॲटॅक ना आये , आयसीयू में ॲडमिट करने की जरूरत ना पडे ... बस ईस लिए दवा चालू रखे, रही बात खर्चे की अगर ४-५ दिन भी आयसीयू मे जाना पडा तो जितना खर्चा आयेगा शायद उतने पैसे मे १० महीनो की दवा आ जायेगी , अब आप ही सोचो क्या सही है।”.........

हा ३४ वर्षाचा कर्ता तरूण रिक्षा चालवतो , ३ लहान पोरं,बायको आणि आई असा संसार होता , आता १०-१५ पावलं चालणं म्हणजे जीवावरची कसरत होती... घरीच बसून असतो, काहीच करू शकत नाही ... तरिही मी म्हणालो “देखो भाई मेहनत नही कर पाओगे कभी पर ऐसा कुछ करो की जिसमे दिमाग चलाना पडे , जो अभीभी साबूत है... हार्ड वर्क नही लेकीन स्मार्ट वर्क तो कर ही सकते हो, काम मे जब तक दिमाग नही डूबेगा तब तक खाली वक्त दिमाग खराब करता रहेगा ।”

“आता हू सर ...” म्हणतांना डोळ्यातली तळी लकाकत होती .....

__________________•__________________

एक्सरे पाहीला आणि चर्रर्र झालं , फुफ्फुसाची जाळी झालेली होती सगळी ..... २३ वर्षाचा पोरगा बाजूच्या स्टुल वर बसलेला आणि त्याचा बाप केविलवाण्या नजरेनी समोर बसलेला....

एका मेडीकल काॅलेज मध्ये एक्सरे बघून टिबीची शंका असल्याचं सांगून ॲडमिट व्हायला सांगीतलेलं, सिटीस्कॅन देखील करायला सांगीतला होता.... परंतु रुग्ण वैद्यकीय सल्ल्याविरूद्ध (against medical advice)निघून आलेला... मी तपासलं; बिपी साधारण, नाडीचे ठोके वाढलेले आणि रक्तातील ऑक्सिजन (हे बघण्यासाठी pulse oximeter नावाचं यंत्र वापरलं जातं) ८४-८५% म्हणजे बरच कमी झालं होतं (किमान ९०% असावं लागतं नाहीतर पेशंटला घरीच ऑक्सिजन लावावं लागतं किंवा ॲडमिट तरी करावं लागतं).... असं सगळं चित्र होतं , मी बाप लेकाला जमेल तितक्या सोप्या भाषेत समजावून सांगितलं पण त्यांच्या चेहेऱ्यावरून असं जाणवत होतं की त्यांना फारसं न कळल्यामुळे गांभिर्य लक्षात येत नव्हतं.....

ह्या केस मध्ये फुफ्फुसावर जो काही परिणाम झालेला होता त्यावर काहीच ईलाज करणं शक्य नव्हतं, आजार वाढतच जाणार होता आणि नेमकं कारण कदाचित कधीच कळणार नव्हतं ... हा ILD असण्याची दाट शक्यता होती (सिटीस्कॅन शिवाय confirmation होणार नव्हतं) पण अनुभव हेच सांगत होता ....

मग पुढे काय ? ह्या तरूण मुलाचं आयुष्य कसं असणार ? ह्याला बायको मुलं असतील त्यांच काय? आईवडील काय करतील ?..... त्या आजारापेक्षा त्या आजारामुळे कुटूंबाचं काय होणार हे माझ्या पुढचं विदारक सत्य !! आपण संवेदनशील असणं हा आपल्याला मिळालेला शाप तर नाहीये ना असं क्षणभर वाटून गेलं, पण काय करता ह्या प्रोफेशनमध्ये हे सगळं येणारच आणि हे अनुभव घेतच पुढे जायचं हा एकमेव पर्याय..
आता वाट बघतोय त्याच्या सिटीस्कॅनच्या रिपोर्टची.......
_________________________________

आरोग्यऔषधोपचारव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणप्रकटनविचारअनुभवआरोग्य

प्रतिक्रिया

तुम्हाला सैल्यूट डॉक. असा व्यवसाय आमच्या काळजाला नसता झेपला.

देशपांडेमामा's picture

8 Mar 2018 - 10:49 am | देशपांडेमामा

गाविंशी सहमत. कितीही टोकाची परिस्थिती असली तरी रुग्णासोबत बोलताना आहे तसे सांगणे आणि पुढील उपचाररांबाबत चर्चा करत राहणे ही अत्यंत कठीण कसरत आहे. माझ्या वडिलांच्या उपचाराच्या वेळी आम्हाला डॉक्टर फारच रुक्ष आणि व्यवसायिक वाटायचे. पण आत्ता हे वाचल्यावर जाणवतंय की त्यांचा स्टॅन्ड बरोबरच होता. असेच लिहीत राहा

देश

प्रमोद देर्देकर's picture

7 Mar 2018 - 8:24 pm | प्रमोद देर्देकर

हृदयद्रावक अनुभव.
वर गवि म्हणतात त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक रुग्णांची काळजी करीत बसलो असतो आणि आजारी पडलो असतो.

प्रत्येक लेख काहीतरी देऊन जातो. एक डॉक्टर म्हणून जमेल तितक्या आस्थेवाईकपणे आणि तरीही ठाम तटस्थपणेदेखील रुग्णांवर उपचार करायला लागतात. सलाम!

अनुप कोहळे's picture

8 Mar 2018 - 2:30 am | अनुप कोहळे

डॉक्टरी पेश्यात असे अनुभव येणे साहजिक आहे. तटस्थ राहुन, भावनिक न होता रुग्णाला आजाराचं निदान आणि उपचाराची कल्पना देणे हे कौशल्य तुम्हा डॉक्टर लोकांना बरे जमते. मला डॉक्टर लोकांचा नेहमीच आदर वाटतो ते ह्याच कारणामुळे.
नेहमी पेक्षा वेगळे अनुभव आहेत हे. लिहत रहा...

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2018 - 8:03 am | प्रीत-मोहर

समुपदेशन अन वैद्यकी हे जेव्हा जमेल तेव्हाच तो वैद्य यशस्वी. आजकाल समुपदेशन करण्याइतका वेळच नसतो बहुतांश doc कडे.

आमचे म्हातारे doc काका अर्धा आजार नुसतं बोलण्यानीच बरा करतात. उरलेलं काम अौषधं अन डायट करतात. असे doc सगळ्यांना मिळो.

नि३सोलपुरकर's picture

8 Mar 2018 - 10:19 am | नि३सोलपुरकर

आपण संवेदनशील असणं हा आपल्याला मिळालेला शाप तर नाहीये ना असं क्षणभर वाटून गेलं __/\__. सलाम
आणि वर गवि म्हणतात तसे ,असा व्यवसाय आमच्या काळजाला नसता झेपला -१००% सहमत आहे .

हे भलते अवघड असते.... डॉक्टर लोकांना खरंच कस जमत हे, हा मला देखील पडलेला प्रश्न आहे...
असेच लिहीत राहा...

शिव कन्या's picture

16 Mar 2018 - 7:06 am | शिव कन्या

जितके संवेदनशील तितके तर्ककठोर.

सुधीर कांदळकर's picture

18 Mar 2018 - 11:56 am | सुधीर कांदळकर

काल एक लेख दिसला मग सगळे भाग उतरवून निवांतपणे वाचले. प्रामाणिक, संवेदनाशील मनाला आलेले अनुभव सहजसुंदर, ओघवत्या शैलीत मांडले आहेत. आपला आणखी एक गुण प्रकर्षाने जाणवला तो म्हणजे संभाषणचातुर्य. परखड, कठोर भाषा न वापरता आपण रुग्णाला हळुवारपणे सत्य सांगता. औषधविक्रेत्याकडून रोग समजण्याऐवजी डॉक्टरकडूनच समजावा ... हे तर फारच छान.

डॉ खरे आणि डो. सुहास म्हात्रे यांच्या प्रतिसादांमुळे वाचनाचा बोनस आनंद मिळतोय. प्रतिसादांपैकी सर्वात आवडला तो ७व्या भागातला डॉ. सुहास म्हात्रे यांचा किती वर्षांचा अनुभव ... तो प्रतिसाद. हा अर्थ वा अन्वयार्थ मला कळलाच नव्हता.

आपल्याला तसेच प्रतिसादकांना अनेक धन्यवाद.

ज्याच्या घरी ७-८ महिने राहून मी माझे घर बांधले त्या माझ्या बहुश्रुत चुलत बंधूचे सहाच महिन्यापूर्वी आयएलडी ने निधन झाले. एप्रिलमध्ये त्याला श्वासविकार जाणवू लागला. मालवणात क्षयरोगाचे निदान झाले. बघता बघता रोग बळावला चार महिन्यानी गणेशोत्सव चालू असतांना रुग्णालयात दाखल केले. त्यांनी मुंबईला न्यायला सांगितले. जेजे मध्ये खरे निदान कळले. परंतु फार उशीर झाला होता आणि तिथेच आठवडाभरातच त्याचे निधन झाले.

महाजालावर म्हटले आहे घातक रसायने हे देखील एक कारण असू शकते. हा बंधू शेतकरी - आंबा बागायतदार होता आणि कृषी विभागाच्या सल्ल्याने विषारी कीटकनाशके नेमाने वापरीत असे. असो. छान लेखमालेबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद _/\_

खरे सर आणि म्हात्रे सरांकडून कौतुक होणं हे मी माझं भाग्यच समजतो, ही पाठीवरची छोटीशी थाप देखील खूपच मोलाची आहे.

ILD बद्दल अनेक मतप्रवाह आहेत आणि बहूतांशी उपचार प्रणाली / treatment modality एकसारखी असते , ह्या आजाराची पसरण्याचा वेग वेगवेगळा असू शकतो कधी ५ वर्षे किंवा अधीक तर कधी ६ महिने एवढचं आयुष्य जगायला मिळतं काही पेशंट्स ना.... फारच वाईट आजार आहे हा.