गोष्ट होऊ घातलेल्या जहाजाची

पराग१२२६३'s picture
पराग१२२६३ in जनातलं, मनातलं
6 Apr 2024 - 9:54 pm

5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस रॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत. अशाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतात प्राचीनकाळी जहाजबांधणीसाठी वापरल्या जात असलेल्या शिलाई पद्धतीचं पुनरुज्जीवन करून एक शिडाचं जहाज बांधलं जात आहे.

प्राचीन तंत्रावर आधारित जहाजबांधणीच्या या प्रकल्पासाठी 9 कोटी रुपये खर्च येणार असून तो संपूर्ण खर्च संस्कृती मंत्रालय करणार आहे. अशा प्रकारच्या जहाजाच्या बांधणीतील शिलाईचे काम या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले बाबू संकरन यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले आहे. प्राचीन तंत्रानुसार या जहाजाच्या लाकडी फळ्यांना सांगाड्याच्या आकाराशी सुसंगत बनवण्यासाठी पारंपारिक वाफेच्या पद्धतीचा वापर केला जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक फळी दोराने दुसऱ्या फळीशी शिवली जाईल. त्या फळ्यांमधील फटी बुजवण्यासाठी नारळाचे फायबर, राळ आणि माशाच्या तेलाच्या मिश्रणाचा वापर केला जाईल. जहाजाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर प्राचीन दिशादर्शक तंत्राच्या मदतीनं भारतीय नौदल या जहाजाला प्राचीन सागरी व्यापारी मार्गांवरून प्रवास घडवेल.

शिलाई जहाजबांधणीत खिळ्यांपेक्षा दोराने लाकडी फळ्या एकत्र जोडलेल्या असल्यामुळं ती जहाजं लवचिक, वेगवान आणि अतिशय टिकाऊ असत. अशा जहाजांचं उथळ समुद्रात आणि समुद्रातील वाळूच्या पट्ट्यांपासून संरक्षण करता येत असे. युरोपियन सत्तांच्या भारतातील आगमनानंतर येथील पारंपारिक जहाजबांधणीचा व्यवसाय लोप पावला असला तरी आजही काही ठिकाणी छोट्या मासेमारी बोटी शिलाई तंत्रज्ञानानं बनवल्या जात आहेत.

शिलाई जहाजाचं भारतीय तंत्रज्ञान सुमारे 2,500 वर्षे जुनं आहे. भारताच्या इतिहासात, जडणघडणीत समुद्राचा, त्याद्वारे चालणाऱ्या व्यापाराचा वाटा बराच मोठा राहिला आहे. भारताच्या सागरी व्यापाराचे लिखित पुरावे सिंधू संस्कृती आणि गुजरातमधील लोथल येथील प्राचीन गोदीच्या उत्खननात सापडलेले आहेत. ते पुरावे इसवीसन पूर्व 2,500 वर्षांपूर्वीचे आहेत. भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार, अन्य प्रदेशांशी सांस्कृतिक देवाणघेवाण आणि अन्वेषणात शिलाई जहाजांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. आजही भारताचा 90 टक्के व्यापार सागरी मार्गानंच होतो आहे.

प्राचीन तंत्रावर आधारित या जहाजाची बांधणी करण्यासंबंधीचा करार भारतीय नौदल, संस्कृती मंत्रालय आणि मेसर्स होडी इनोव्हेशन यांच्यात 18 जुलै 2023 ला करण्यात आला होता. त्या करारनुसार 22 महिन्यांमध्ये या जहाजाची बांधणी पूर्ण केली जाणार आहे.

link
https://avateebhavatee.blogspot.com/2024/04/blog-post.html

संस्कृतीइतिहासमुक्तकसामुद्रिकआस्वादसमीक्षालेखबातमीमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राचीन भारतीय तंत्रज्ञान / विद्येविषयी रोचक माहिती. आजवर दुर्लक्षित या विषयावर आता प्रत्यक्षात काही घडू लागले आहे, ही अतिशय मोलाची बाब आहे.
याबद्दल पुढे काय काय घडते ते जाणून घ्यायला आवडेल. या धाग्यावर किंवा नवीन लेख अवश्य देत रहावेत ही विनंती. लेखाबद्दल अनेक आभार.

.
प्राचीन भारतीय जहाजाचे उठाव- शिल्प.

.
इ.स. पहिल्या शतकातील भारतीय समुद्र मार्ग.

.
सातवाहन नाणे.

.

.

याविषयावरील विडियो आणि लेखः
https://www.youtube.com/watch?v=M03ikNNDukQ&ab_channel=CACHEINDIA
https://youtu.be/m1uBAZlmLu4?feature=shared
https://brewminate.com/naval-warfare-in-ancient-india/
https://www.crystalinks.com/indiaships.html
https://www.indiadivine.org/indias-ancient-great-maritime-history/

पराग१२२६३'s picture

7 Apr 2024 - 9:59 pm | पराग१२२६३

चित्रगुप्त, तुमचेही खूप खूप आभार ह्या लिंक शेअर केल्याबद्दल

रामचंद्र's picture

7 Apr 2024 - 4:04 pm | रामचंद्र

ते नाव 'रॉयल्टी' नसून 'लॉयल्टी' होतं अशी माहिती मिळते. एकूणच सरकारचा हा एक चांगला उपक्रम वाटतो. पूर्वी टिम सेव्हरिन, थॉर हेयरडाह्ल यांसारख्यांनी अशाच मोहिमा केलेल्या होत्या. आपल्याकडे ओरिसात कटकला कार्तिक पौर्णिमेपासून आठवडाभर बाली यात्रा ही मोठी जत्रा असते. या मुहूर्तावर पूर्वी स्थानिक दर्यावर्दी आग्नेय आशियात व्यापारासाठी जायला निघत असत त्याची आठवण म्हणून ही जत्रा असते. मात्र अलिकडे अशी खरीखुरी सागरी मोहीम काढल्याचे माहीत नाही.
अलिकडे तीसएक वर्षांपासून भारतीय नौदलातर्फे वेगवेगळ्या शांतताकालीन साहसी सागरी मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. त्यात लेखात उल्लेखलेल्या मोहिमेसारख्यांनी तर अजूनच चांगली भर पडेल.

पराग१२२६३'s picture

7 Apr 2024 - 10:02 pm | पराग१२२६३

धन्यवाद रामचंद्रजी. चूक दुरुस्त केली आहे.

पराग१२२६३'s picture

7 Apr 2024 - 10:09 pm | पराग१२२६३

'रॉयल्टी'ऐवजी 'लॉयल्टी' वाचावे.

रामचंद्र's picture

7 Apr 2024 - 4:27 pm | रामचंद्र

टिम सेव्हरिनच्या 'सोहार' या सिंदबादच्या सफरींवर आधारित मोहिमेवरचा व्यंकटेश माडगूळकरांचा लेख ललितच्या दिवाळी अंकात वाचल्याचं आठवतंय.

इंग्रजांनी भारतीय सीमावर्ती तसेच एकूणच व्यापारी सागरी वाहतूक आपल्याच हातात ठेवली होती. या अधिकृत मक्तेदारीला आव्हान देणं हे एतद्देशीय व्यावसायिकांना अशक्यच होतं. मात्र त्यावरही मात करण्याचा एक प्रयत्न केरळात झाला. आपल्याकडे वालचंद हिराचंदांनी धाडस करून डावपेच लढवत गांधीजींच्या चळवळीला पाठिंबा देत लॉयल्टीचा म्हणजेच सिंदिया स्टीमशिप कंपनीचा प्रयोग संपूर्ण यशस्वी करून दाखवला. वालचंदांची दृष्टी आणि धमक याला तोड नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Apr 2024 - 10:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन माहितीपूर्ण आहे. बाय द वे, लेख वाचतांना चहा पिता पिता माझ्या मनात विचार आला. की, समुद्रपार करणे जिथे शास्त्रसंमत नव्हतं किंवा पाप मानल्या जात होतं त्या त्यापूर्वीचा काळ अतिशय प्रगतीचा होता असे म्हणावे लागेल. पाप मानल्या जायचं तो काळ अगदी अलिकडचे असावा असे वाटते.

रामायण, महाभारत, काही धर्मग्रंथात समुद्र-प्रवास होत होता असे दिसते. अभ्यासु- जिज्ञासू भर घालतीलच.

व्यापार- धन-लोभाच्या अपेक्षेने, सुंदर स्त्रीच्या अपेक्षेने आपले भारतीय लोक समुद्रात दुरवर फेरफटका मारुन समुद्र धोक्याची रिस्क घेत होते, असे दिसते. ( संदर्भ )

नवीन जहाज बांधणी आणि या निमित्ताने भारतीय सागरी व्यापार, भारतीय संस्कृती, सांस्कृतिक देवाण घेवाणात जहाजांची जी ऐतिहासिक-सांस्कृतिक भुमिका होती तीही समजून घ्यायला आवडेल.

-दिलीप बिरुटे
(अभ्यासू )

प्रतिसाद आवडला. पूर्वी ब्रिटिश बोट बांधणी तज्ञ इथे मराठा आरमाराचे काम बघायला (किंवा त्यांना चार गोष्टी शिकवायला) आले होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात बोट बांधणीविषयक माहिती आणि कागदपत्रे पाहून ते थक्क झाले आणि आम्ही तुम्हाला काय शिकवणार अशा आशयाचे बोलले.. असे कोणत्या तरी व्याख्यानात ऐकले होते किंवा कुठेतरी वाचले होते. पण नेमका संदर्भ मजजवळ नाही .

शिलाई पद्धत हे नाव पूर्वी ऐकले नसले तरी फळ्या वाकवून आणि बऱ्यापैकी या तंत्राने कोंकणात लहान ते मध्यम मच्छीमार बोटी बांधताना बघितले आहे. फणसाचे लाकूड असे. आणि कसले तरी तेल.

लेख रोचक.

लिओ's picture

10 Apr 2024 - 1:43 pm | लिओ

या आधी भारतीय नौदलाने १९९७ च्या आसपास INS Tarangini नावाचॅ जहाज आपल्या ताफ्यात दाखल केले. हे जहाज जरी डिझेल इंजिन ने सज्ज असले तरी या जहाजावर शीडाची यंत्रणा आहे,

डिझेल इंजिन आणि वारा या दोन्हीच्या सहाय्याने हे जहाज भ्रमंती करते.

पराग१२२६३'s picture

10 Apr 2024 - 9:27 pm | पराग१२२६३

तंरंगिणी जहाज नाविकांच्पा प्रशिक्षणासाठी वापरलं जात आहे.

पराग१२२६३'s picture

10 Apr 2024 - 9:30 pm | पराग१२२६३

तरंगिणी

अहिरावण's picture

10 Apr 2024 - 1:54 pm | अहिरावण

मुसलमान भारतात आल्यानंतर हिंदूंची वाताहात झाली.

चित्रगुप्त's picture

10 Apr 2024 - 2:41 pm | चित्रगुप्त

इस्लामी आणि ख्रिस्ती सत्तांचा हिंदु संस्कृतीवर झालेला परिणाम - या विषयावर कुणीतरी विस्तृत लेख लिहावा असे सुचवतो. अशी काही पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत का?

विवेकपटाईत's picture

10 Apr 2024 - 3:52 pm | विवेकपटाईत

लेख आवडला.