कोरोना विरूध्द भारताचा लढा

radio ga ga

Primary tabs

क्षितिज जयकर's picture
क्षितिज जयकर in जनातलं, मनातलं
27 Sep 2019 - 1:40 pm

RADIO GA GA………………
ह्या लेखाचं शीर्षक जरी इंग्लिश मधून असलं तरी ते मराठीत सुद्धा तितकंच सार्थ आहे. रेडिओ गा!!!!! गा!!!!. १९८४ साली QUEEN ह्या ब्रिटिश वाद्यवृंदाने हे गाणं रचनाबद्ध केलं , ते आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपल्याला रेडिओ वर हमखास ऐकायला मिळतं. मला हा लेख लिहिण्यासाठी जी स्फूर्ती मिळाली ती ह्याच गीतावरून. त्यामुळे सर्वप्रथम ह्या गाण्याबद्दल थोडीशी माहिती देतो.

मगाशी लिहिल्याप्रमाणे QUEEN ह्या वाद्यवृंदाचा DRUMMER (त्याला ढोल वादक म्हणणं माझ्या जीवावर येतं) रॉजर टेलर याने ते १९८३ साली प्रथम ते रचनाबद्ध केलं , आणि मग १९८४ साली ते स्वरबद्ध करून सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आलं. तो काळ संगीतासाठी (आणि एकंदरीतच कला, साहित्य, नाटक) अत्यंत दैदिप्यमान असा काळ होता. परंतु त्याच काळात रेडिओ बरोबरच टेलिव्हिजन तितकाच लोकप्रिय होत चालला होता. कित्येक वर्षांची रेडिओची मक्तेदारी आता टेलिव्हिजन, हे दृक आणि श्राव्य अश्या नव्या स्वरुपामधलं माध्यम हळूहळू तोडून टाकत होतं. याच वेळी MTV हे चॅनेल १९८१ साली TV वर सुरु करण्यात आले आणि ह्या MTV ने बघता बघता सगळी कडे आपला जम बसविण्यास सुरवात केली. श्रोत्यांना आता संगीताच्या ध्वनीबरोबरच त्याच संगीताच्या "MUSIC VIDEO" चा सुद्धा आस्वाद घेण्यास मिळत होता. कित्येक रेकॉर्ड कंपनीज गाण्यांबरोबर त्यांचे व्हिडिओज सुद्धा प्रसिद्ध करू लागल्या होत्या. परंतु ह्या सगळ्या भानगडी मध्ये संगीताच्या प्रामुख्याने "श्राव्य" या भागाचे महत्व कमी होऊन त्याच्या "दृक" पणाचे महत्व जास्त वाढू लागले. या सर्वांची खंत ह्या गाण्यामधून व्यक्त करण्यात आली.

ह्या आकाशवाणीची सुरवात आपल्या भारतामध्ये झाली तो काळ इंग्रजांचा होता. १९२३ साली भारतामध्ये प्रथम आकाशवाणीचे प्रसारण करण्यात आले. बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब आणि अश्या इतर रेडिओ क्लब वरून हे प्रसारण सुरु झाले. त्यानंतर २३ जुलै १९२७ साली "THE PRIVATE INDIAN BROADCASTING COMPANY (IBC)" ही संस्था स्थापन करण्यात आली, आणि तिला प्रथम मुंबई केंद्रावरून व नंतर कोलकाता केंद्रावरून प्रसारण करण्याची परवानगी मिळाली. पण खऱ्या भारताने अखिल भारतीय आकाशवाणी हे नाव प्रसिद्ध होण्यास १९३६ साल उजाडावं लागलं.

आपल्या भारतीय संगीतामध्ये आकाशवाणीचे अनन्यसाधारण महत्व आहे. भारतीय संगीतामधल्या कित्येक नावाजलेल्या गायक, गायिका, गीतकार, संगीतकार, वादक ह्यांना खरी ओळख मिळवून दिली, आणि सर्व भारतात नावारूपास आणण्यास मदत केली ती या आकाशवाणीनेच. कारण त्या काळी हे सर्व संगीत श्रोत्यांना उपलब्ध होण्याचे माध्यम रेडिओ हेच होते. ऑडिओ कॅसेट्स बनून त्या टेपरेकॉर्डरवर ऐकायला मिळायला अजून अवकाश होता. त्यामुळे आपल्या आवडीची भावगीते, भक्तिगीते, अभंग, नाट्यगीते, हे सगळं ऐकायला मिळणे हा एका प्रकारचा सोहळा असावा. त्या काळी मुंबईमध्ये चाळ संस्कृती नांदत असल्याने एका घरात चालणाऱ्या रेडिओचा आस्वाद सगळी चाळ घेत असे. आपल्या मराठी संगीतामध्ये आकाशवाणी मुंबई केंद्रावरून अनेक अजरामर झालेली गाणी जेंव्हा प्रथम प्रसारित करण्यात आली असतील, तेंव्हा ती ऐकून श्रोत्यांना झालेला आनंद हा अद्वितीय म्हणावा लागेल. मराठी संगीत सृष्टीतील अनेक प्रसिद्ध कलावंत हे बहुतेक सगळे आकाशवाणीमध्ये काम करत असल्यामुळे तेंव्हाचे "चांदणे शिंपीत जाशी" किंवा "शुक्रतारा मंद वारा" ह्या आणि अश्या गीतांच्या रेकॉर्डिंग चे अनेक मनोरंजक किस्से हे आज ही कार्यक्रमांमध्ये सांगितले जातात.

आज मात्र रसिक श्रोते आकाशवाणी पासून थोडे दुरावले गेले आहेत. त्याची कारणं अर्थातच आपणास ज्ञात आहेत. आज प्रत्येकाकडे भ्रमणध्वनी आहेत. ज्याचा शोध हा प्रामुख्याने आपण घरी नसताना, आपल्या कुटुंबामधल्या व्यक्तींबरोबर, आपल्या नातलगांबरोबर किंवा आपल्या ऑफिस मधील सहकर्मचाऱ्यांबरोबर संवाद साधता येईल यासाठी लावण्यात आला, त्या भ्रमणध्वनी वर आजच्या युगात आपण कोणतीही गाणी डाउनलोड करून ऐकू शकतो. YouTube किंवा NETFLIX सारखी APPS डाउनलोड करून आपण जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही कोपऱ्यातले कार्यक्रम, चित्रपट अगदी सहज बघू शकतो. परंतु त्याच मोबईल फोनवर रेडिओ जरी उपलब्ध असला तरी त्याचा वापर मात्र सहसा होताना दिसत नाही.

मला रेडिओ ऐकण्याची सवय मी इंजिनियरिंग कॉलेजला असताना लागली. कॉलेजला ट्रेनने जात असताना जो काही तास / दीड तास मिळायचा त्यात रेडिओ अगदी मनसोक्त ऐकायला मिळायचा. त्यामधून रेडिओवरचे वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्याची सवय लागत गेली ती आजही टिकून आहे. आज आपल्याकडे जवळ जवळ १० ते १५ रेडिओ स्टेशन्स ऐकण्यासाठी उपलब्ध आहेत. पण त्यापैकी माझी सर्वात आवडती स्टेशन्स म्हणजे १०७.१ FM Rainbow आणि १००.१ FM Gold.
माझी दिवसाची सुरुवातच मुळी १०७.१ FM Rainbow वर मराठी गाण्यांचा कार्यक्रम ऐकून होते. त्यानंतर सकाळी १० ते ११ ह्या वेळे मध्ये रॉक विथ द जॉक हा पाश्चात्य संगीताचा कार्यक्रम लागतो, ज्यात आपण व्हॉट्सऍप किंवा इमेल ह्या माध्यमातून आपल्या आवडीच्या गाण्यांची पसंद कळवू शकता आणि त्या गाण्यांचा रेडिओ वर आस्वाद घेऊ शकता. सकाळी १० ते दुपारी ३ ह्या वेळेत १००.१ FM Gold ह्या स्टेशन वर मराठी कार्यक्रम प्रसारित होतात. त्यामध्ये भावधारा, आठवणींच्या गंधकोषी हे मराठी भावगीतांवर आधारित कार्यक्रम, वनितामंडळ हा सामाजिक कार्यक्रम, सायन्स कॉर्नर हा विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याशी निगडित प्रसिद्ध व्यक्तीच्या मुलाखतीचा कार्यक्रम, कोकणी कार्यावळ हा खास कोकणी भाषेतला कार्यक्रम, कृषिवाणी व माझं आवार माझं शिवार हे शेतीविषयक कार्यक्रम, नादब्रम्ह हा शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम असे वेगवेगळ्या विषयांवरचे अत्यंत मनोरंजक व तितकेच उद्बोधक कार्यक्रम प्रसारित होतात. २०१९ हे वर्ष महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे ह्यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने महिन्याच्या दर पहिल्या व शेवटच्या गुरुवारी "पुलोत्सव" हा पु. लं च्या चतुरस्र योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा कार्यक्रम प्रसारित केला जातो. हल्ली तर ही सर्व रेडिओ स्टेशन्स आपण अखिल भारतीय आकाशवाणीने नुकत्याच उपलब्ध केलेल्या NEWSONAIR ह्या मोबाईल app वर जगाच्या पाठीवर कुठेही इंटरनेट च्या माध्यमातून ऐकू शकता. हे सर्व कार्यक्रम ऐकत दिवस कधी सरतो ते कळतंच नाही.

हा लेख लिहिण्यास कारण असे कि हा लेख वाचून आपणास पुन्हा एकदा रेडिओ ऐकण्याची ईच्छा होवो आणि आपणास रेडिओ वरच्या मनोरंजक, माहितीपर, संगीतमय अश्या विविध रंगांनी नटलेल्या कार्यक्रमांचा आस्वाद मिळो हीच ईश्वरचरणी सदिच्छा.

संगीतइतिहाससमाजजीवनमानविचारलेखमतशिफारसविरंगुळा

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Sep 2019 - 1:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

काही गाणी रेडिओअवरच सापडतात आणि रेडिओवरच छान वाटतात.

जगभरच्या बर्‍याच रेडिओ स्टेशन्सवरची गाणी/कार्यक्रम, जगात कुठेही मोबाईलवर ऐकण्यासाठी, "रेडिओ गार्डन" हे मस्त अ‍ॅप आहे...

https://radio.garden/

गवि's picture

27 Sep 2019 - 2:05 pm | गवि

छान आहे.

बगल्सचं "व्हिडीओ किल्ड द रेडिओ स्टार" हे गाणंही या प्रकारचं आहे.

क्षितिज जयकर's picture

27 Sep 2019 - 2:11 pm | क्षितिज जयकर

धन्यवाद. व्हिडीओ किल्ड द रेडिओ स्टार हे गाणं आत्ताच ऐकलं. मला वाटतं हिंदी मध्ये ह्या चालीवरून एक गाणं आहे बहुदा.

गवि's picture

27 Sep 2019 - 4:31 pm | गवि

कोई यहां नाचे नाचे..

कुमार१'s picture

27 Sep 2019 - 3:23 pm | कुमार१

हा लेख लिहिण्यास कारण असे कि हा लेख वाचून आपणास पुन्हा एकदा रेडिओ ऐकण्याची ईच्छा होवो

इथे तुम्हाला अनेक रेडीओप्रेमी भेटतील .

क्षितिज जयकर's picture

27 Sep 2019 - 10:13 pm | क्षितिज जयकर

धन्यवाद . तुमचा लेख व त्यावरच्या प्रतिक्रिया मनापासून आवडल्या.

पैलवान's picture

28 Sep 2019 - 8:48 am | पैलवान

आमच्या घरात रेडिओ ऐकला जायचा. अगदी सकाळी पुणे केंद्र लावलं की नऊ पर्यंत तेच असायचं. 1975 पासून घरात टीव्ही आणि 1996 पासून केबल असली तरी रेडिओ ऐकला जायचा. 2001-02 च्या आसपास एफ एम वर मिर्ची वाहिनी आली. सुरुवातीला ऐकायचो, त्या वयात ते आकाशवाणी आणि विविधभारती हून वेगळं असल्यानं आवडलही.
त्यावेळी खोखो पाटील लै फेमस होता. लोक आवर्जून त्यावेळेला ते ऐकायचे, इतका लोकप्रिय होता.
पण मुळात आर जे आणि खाजगी एफ एम वाहिन्या हे प्रकरण काही आम्हाला पचलं नाही. विविध भारती आणि पुणे केंद्र (ए एम) ह्यांची आवड कायम राहिली.
पुढे 2003 मध्ये आमचा व्हिडिओकॉन टेप रेकॉर्डर कम रेडिओ (एफेम, ए एम, sw) वारला. तोपर्यंत केबल वर वाहिन्या वाढल्या होत्या. दोन मराठी वाहिन्या सेट झाल्या होत्या, मग घरातल्यांना रेडिओ ची तितकी गरज राहिली नव्हती. मग एक व्हीसीडी player घेतला. शंभर पेक्षा जास्त कॅसेट्स होत्या त्या गायब झाल्या. हळू हळू शंभर एक सीडी आणि VCD जमल्या. 2008 मध्ये dvd player घेतला.

त्याच वेळी घरात कॉम्प्युटर आला, घरात मोबाईल वर एअरटेल च्या सिग्नल शेजारी G ऐवजी E दिसायला लागलं, आणि मग डाऊन लोडींग सुरू झालं. पाच रुपये दिवसाला unlimited downloads.

तर हा असा रेडिओ पासून तुटण्याच्या प्रवास.

मागच्या महिन्यात मिपा वरच एक धागा आलेला, तो वाचून प्रसार भारती चं ऍप घेतलं.
आता ते नॉस्टॅल्जिक कार्यक्रम परत ऐकायला मिळतात.

सुधीर कांदळकर's picture

28 Sep 2019 - 7:47 pm | सुधीर कांदळकर

रिक्षावाले, टॅक्सीवाले, शिंपीकाम करणारे कामगार, सुतारकाम करणारे कामगार या वर्गात मोठ्या प्रमाणावर ऐकला जातो. त्यांच्यासाठी खास कार्यक्रम देखील होतात. एफ एम विविध भारतीवर एसएमएस द्वारा फर्माईश पाठवल्यावर गाणे ऐकवणारा एक तर दुसरा ई-मेलने फर्माईश पाठवल्यावर गाणे ऐकवणारा कार्यक्रम आहे. तर काही कार्यक्रमात श्रोते फोनवरून बोलतात देखील. इतर कार्यक्रमात आरजे पोरींची अखंड टकळी असते. त्यांना बडबड करून कंटाळा कसा येत नाही याचेच आश्चर्य वाटते.

मुंबई आणि इतर काही शहरात आईम्स एफएम, रेडिओ मिरची, रेडिओ सिटी, कोल्हापूरचा रेडिओ टोमॅटो पण आहे. काही कार्यक्रमात श्रोत्यांचि फिरकी घेऊन मोरू पण बनवतात. गोव्याच्या एफएम रेडिओ वाहिन्यांवर इंग्रजी, हिंदी, मराठी आणि कोंकणी अशी चार भाषांची मिसळ ऐकायला मिळते.

तेव्हा ऐकणारे आहेत आणि रेडिओ वाहिन्या पण भरपूर. काळजी नसावी.

छान लेख, धन्यवाद.