Dear Camera

Primary tabs

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
23 Mar 2018 - 6:21 am

Dear Camera,

देवाने आम्हाला दोन डोळे दिले, पण त्यात एकच लेन्स बसवली. तू आलास, आणि मला तिसरी, चौथी, पाचवी.... कितवी तरी लेन्स मिळाली. जग तुला तिसरा डोळा म्हणते. मी म्हणत नाही. कारण तिसरा डोळा उघडला कि हाहाकार माजतो. मी तुला अंतर्चक्षु म्हणते. आतले डोळे.

तू आलास, आणि मी एकटी चालायला शिकले. दूरदूर. चालण्याचा परीघ विस्तारला कि थांबण्याचा केंद्रबिंदू समृद्ध होतो. तुझी सोबत असली, कि नेहमीचे रस्ते नकोसे वाटतात. आडवळण अपोआप प्रिय होते. घरापासून चालत दूर गेले , मनाच्या जवळ बसता येते. मनाच्या जवळ बसले, कि तुझ्याबरोबर खेळणे चालू होते. आजूबाजूचा प्रचंड विस्तार, सुबक होतो. मनात त्याच्या फ्रेम्स तयार होऊ लागतात. मग तुझ्या वरचे शटर काढून त्या फ्रेम्स टिपायला सुरुवात होते. माझ्या डोळ्यांनी पाहिले, ते तुझ्या डोळ्यांनी टिपले, इतकी समरसता आली, की त्या तसवीरीत जान येते.

तुझ्या बरोबरचा एकांत चित्रातल्यासारखा. सहजासहजी डिस्टर्ब न होणारा. तुझ्या बरोबरचा मंत्र एकच-एकाग्रता. प्रचंड एकाग्रता. तल्लीनता. तासंतास, दिवसेंदिवस प्रयत्न करून शेवटी एक छोटासा पक्षी आवाक्यात येतो, क्लिक व्हायला आणि तो चंचल उडून जायला एकच गाठ पडते, आणि स्क्रीनवर त्याची ब्लर प्रतिमा उमटते.... ती पाहून शेवटी हसूच येते. मन ‘next time’ म्हणते.

गर्दीतला एकएक माणूस स्वतः बिनचेहऱ्याचा होत होत, गर्दीलाच एक मोठा चेहरा देतो. तसला गर्दुल्ला चेहरा एकसंध बघायला तू मला शिकवलेस...... आणि जेव्हा माणूस एकटाच असतो तेव्हा त्याची देहबोली पहायलाही तूच मला शिकवलेस. माणसे एकटी असतात तेव्हा ती सहसा हरवलेली असतात - स्वतःत नाहीतर बाहेर कशात तरी – पण हमखास हरवलेली असतात. त्यावेळी त्यांचे डोळे विलक्षण दिसतात. अशी एकेकटी माणसे जर समुद्रकिनारी बसलेली असतील, तर ते दृश्य समुद्राहून खोल असते. एकटा माणूस समुद्राकडे पाठ करून सहसा बसत नाही. माणसातले एकटेपण दूर राहून इतक्या जवळून पहायला तूच शिकवलेस ...... आणि मी बदलून गेले.

तुझ्या बरोबर चालत गेले, कि मैत्र जुळते. एखाद्या पोज पुरता कुणी खेडूत हसतो, स्टाईलमध्ये उभा राहतो. हे असे मध्येच उभे राहून मस्त पोज देणारे जे मॉडेल्स असतात, ते ‘बघू कसा आलाय माझा फोटो’ असं विचारत नाहीत सहसा! पण पोज पुरते त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू उमटते, ते फार वेगळे असते. म्हटले तर कृत्रिम.... पण फार नैसर्गिक. फोटोत मी छान, सुंदर दिसलो पाहिजे, म्हणून माणूस स्वतः जवळचे instant सौंदर्यप्रसाधन वापरतो – हसू. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचे हसू कायम जवळ ठेवणे तुझ्यामुळे शक्य झाले. अशा फ्रेम फ्रेम हसणाऱ्या चेहऱ्यांकडे पाहणे सुद्धा नंतर आरामदायी असते.

तू आलास, आणि माझ्यासोबत पक्षी आले. हे चंचल पक्षी म्हणजे लहान मुलांसारखे. जेवढे देखणे आणि छोटे, तेवढे अस्थिर. तुझे आणि त्यांचे काहीतरी सख्य असावे. कारण जो तुला प्रेमाने जवळ घेतो, तो पक्ष्यांना आणि लहान मुलांनाही जवळ करतोच करतो. त्यांचा चंचलपणा टिपणे, म्हणजे आधी स्वतःला प्रचंड स्थिर करणे. त्यांचे पाण्यासारखे बदलणारे भाव टिपणे म्हणजे, आपले चित्त आरशासारखे स्वच्छ ठेवणे.

पक्ष्यांच्या मागेमागे जाता जाता, त्यांचे स्वतःचे जगणे लक्षात आले. इतके कळून चुकले, कि अरे, आपण त्यांच्यासाठी जे धान्यपाणी ठेवतो, ते त्यांच्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी ठेवतो. त्यांना त्यांची कोठारे माहित असतात. आपली भूतदया ही खरेतर स्वतःवर केलेली दया असते. हे सत्य जरा कडवट असले तरी औषधी आहे. तुझ्या लेन्समधून असे अनेक कडवट साक्षात्कार होतात, तेव्हा मनाचे आजार गळून पडतात. मन स्वच्छ होऊ लागते. त्यामुळेच तू माझ्यासाठी यंत्र नाही मित्र झालास..... जिथे आजूबाजूला माणूस नसते, तिथे तुझ्या सोबतीने हरेक वस्तूत नवा चेहरा पाहता येतो. त्याची आठवण म्हणून तुला हे छोटेसे पत्र.

तुझी
मैत्रीण.

वाङ्मयसाहित्यिकतंत्रप्रवासभूगोलछायाचित्रणप्रकटनविचारमाध्यमवेधअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

23 Mar 2018 - 7:25 am | उगा काहितरीच

आवडला लेख...

किल्ला नावाचा एक नितांतसुंदर मराठी सिनेमा आहे.
दिग्दर्शक हा मुळात कॅमेरामन आहे. कॅमेराच्या माध्यमातून प्रत्येक फ्रेम जिवंत आणि बोलकी केलेली आहे .
अर्थात यामुळे कधीकधी आशयाला बाधा येते.
हे समजूनही किल्ला चित्रपट पहाच कॅ,एर्‍याच्या भाषे साठी.

मार्मिक गोडसे's picture

23 Mar 2018 - 9:01 am | मार्मिक गोडसे

अशी एकेकटी माणसे जर समुद्रकिनारी बसलेली असतील, तर ते दृश्य समुद्राहून खोल असते
खरंय.
लेख आवडला.

चौथा कोनाडा's picture

24 Mar 2018 - 9:35 pm | चौथा कोनाडा

सुंदर लेख !
लेखनशैली क्लासिक !
उदा:
गर्दीतला एकएक माणूस स्वतः बिनचेहऱ्याचा होत होत, गर्दीलाच एक मोठा चेहरा देतो.
सुरेख !

समाधान राऊत's picture

25 Mar 2018 - 7:55 am | समाधान राऊत

आवडला लेख खरोखरीच