राजाची नियत

शिव कन्या's picture
शिव कन्या in जनातलं, मनातलं
2 Dec 2017 - 7:52 am

राजाची नियत
आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. राजा फार दयाळू आणि प्रजेचे हित पाहणारा होता. वेश पालटून आपल्या राज्यात फिरे. लोकांची सुख दुखे समजून घेई.

एकदा फिरता फिरता एका गावात पोहचला. तहान लागली होती. दूर एक लहानसे घर दिसले. घरा भोवती ऊसाचा मोठा मळा होता. तिथे गेला. एक म्हातारी सामोरी आली. त्याने प्यायला पाणी मागितले. ती शेतात गेली. एक उस तोडला. उभ्या कांडक्यावर आडवा कोयता मारला. एक मोठा ग्लास भर रस निघाला. राजा बघतच राहिला! उसावर कोयता मारायचा अवकाश कि लगेच एवढा रस! रस पिऊन राजा तृप्त झाला. त्याने विचारले, ‘माई, हा काय जादूचा ऊस आहे का? इतका रस? ते ही फक्त कोयता मारताच!’
म्हातारी हसली. ‘राजाची कृपा. माझा राजा दयाळू आहे. त्याची नियत चांगली आहे. गरिबाला नडत नाही. दांडग्याना सोडत नाही. राजा नेक दिलाचा, तर उस लाख मोलाचा!’

ऐकून राजा प्रसन्न झाला खरा.... पण त्याच्या डोक्यात निराळे चक्र फिरू लागले. त्याला वाटले, जिथे इतके पिकते, तिथे तसेच सगळे विकते. यांच्यावर आता कर लावू. वरून साधीगरीब दिसणारी माणसं आतून गबरगंड असतात. ते काही नाही, यांच्या वरही नवा कर बसवायचा. जिथे आहे, तिथे आणखी वाढवायचा. त्याच विचारात त्याने म्हातारीला हुकुम सोडला, ‘माझी तहान काही भागली नाही. अजून रस दे.’
‘का नाही! घरचाच उस आहे!’ म्हणत म्हातारी उठली.मळ्यात गेली.

इकडे राजा कुणावर कसा नि किती कर बसवायचा, त्याची अंमलबजावणी कशी करायची, विरोध झाला तर कसा मोडून काढायचा, नवे उत्पन्न किती होईल, त्यात काय करायचे, नवे युद्ध करायचे का.... या लोकांना आपण फुकटच पोसले आजपर्यंत..... अनेक विचार येत होते.

बराच वेळ झाला, तरी रस घेऊन म्हातारी आली नाही. तो चालत तिच्या जवळ पोहचला. पाहतो, तर म्हातारीने दहा बारा उसाची कांडकी तोडली होती. सगळ्यावर सपासप कोयते मारून झाले होते. शेवटी तिने ऊस हाताने पिरगळायला सुरुवात केली. पण दोन पाच थेंबा पलीकडे रस काही पडेना. म्हातारी हैराण झाली. राजाला नवल वाटले, मघाशी तर रस रसरसून वहात होता. आत्ता लगेच काय झाले? त्याने म्हातारीला विचारले. म्हातारी थांबली. त्याच्या कडे पहात कष्टाने म्हणाली, ‘ कदाचित माझ्या राजाची नियत बदलली असेल. त्याच्या मनात खोट आली असेल!’

तिचे उत्तर ऐकून राजा चपापला. त्याच्या मनातले विचार त्याला भंडावू लागले. तो तिथून चालता झाला.
पुढे राजाने काय केले असेल?

'गोष्टी ऐकल्या त्या लिहिल्या' मधून
-शिवकन्या

धोरणमांडणीवावरकथासाहित्यिकसमाजजीवनमानअर्थव्यवहारप्रकटनविचार

प्रतिक्रिया

babu b's picture

2 Dec 2017 - 8:45 am | babu b

छान

व्हाट्सप करत आहे. खाली मिपाची लिंक देत आहे.

मस्त आहे, तुमच्यासारखे सशक्त लिखाण क्वचितच वाचायला मिळते..

यावेळेस तुंही काय लिहिले ते कळल्यामुळे आनंदित झालेला
आनन्दा :)

माहितगार's picture

2 Dec 2017 - 1:30 pm | माहितगार

सुरेख

ज्योति अळवणी's picture

2 Dec 2017 - 5:59 pm | ज्योति अळवणी

आवडली

गामा पैलवान's picture

2 Dec 2017 - 10:37 pm | गामा पैलवान

शिव कन्या,

तुमची कथा फार आवडली. पुढे राजाने काय केलं असेल त्यावर कथा वाढवेन म्हणतो.

राजा चपापला. आपल्या मनात असे लुबाडणुकीचे विचार आलेच कसे असा त्याला प्रश्न पडला. एव्हढे नेकदिल होतो आपण आणि मध्येच अवदसा कुठून आठवली आपल्याला? मग शेवटी त्याने प्रधानाच्या कानावर ही हकीकत घातली. दुसऱ्या दिवशी या समस्येची उकल झाली पाहिजे असं बजावलं. प्रधान घरी आला. त्याने आपली दाढी खाजवली. काही सुचेना. मग डोळे मिटून काही घटका विचार केला. तरीपण समस्येचा थांग लागेना. मग तुंदिलतनु पोटावरून (स्वत:च्याच) हात फिरवला. आस्ते आस्ते हात फिरवतांना अचानक त्याची ट्यूब पेटली.

दुसऱ्या दिवशी त्याने राजाची भेट घेतली. म्हणाला की मला तुमच्या मनातले चोरीचे विचार कुठून उत्पन्न झाले त्याचा छडा मला लागला आहे. राजा आनंदला. प्रधान म्हणाला की त्याचं काय आहे राजेसाहेब, आपल्या राज्यात पप्पूपक्ष नामे एक राजकीय पक्ष आहे. त्यात भ्रष्ट लोकांची खोगीरभरती झालेली आहे. ही लोकं सदैव खाण्यात मग्न असतात. जेव्हा खात नसतात तेव्हा कसं खाता येईल याच्या विचारांत गढलेले असतात. प्रस्तुत काळी त्यांना खायला मिळंत नसल्याने त्यांचा बहुतांश वेळ खाण्याच्या गोष्टींची दिवास्वप्ने बघण्यात जातो आहे. त्यामुळे सृष्टी खाद्यविचारांनी संपृक्त झालीये. असाच एक दूषित खाद्यविचार तुमच्या मनांत घर करून राहिला. तोही इतक्या बेमालूमपणे की तुम्हांस त्याची जाणीवही झाली नाही. एकंदरीत पप्पूपक्षाचे लोकं मोठ्या हुशारीने खातात बरंका.

यावर राजाने पप्पूपक्षमुक्त राज्य बनवायची प्रतिज्ञा केली व प्रधानाला त्यासाठी योजना आखण्याचे आदेश दिले.

आ.न.,
-गा.पै.

नमकिन's picture

3 Dec 2017 - 8:18 pm | नमकिन

मूळ कथा सुरचित तर पुढे काय घडले याची उत्सुकता वाढवणारी होती पण पैलवानाने माती खाल्ली, असे म्हणावे लागेल.

गामा पैलवान's picture

4 Dec 2017 - 1:19 am | गामा पैलवान

नमकिन, विस्तारित कथा वाचून अभिप्राय दिल्याबद्दल आभार! :-)
आ.न.,
-गा.पै.

पैसा's picture

4 Dec 2017 - 9:30 am | पैसा

:)

शिव कन्या's picture

9 Dec 2017 - 3:58 pm | शिव कन्या

सर्व जाणत्या वाचकांचे आभार.

पगला गजोधर's picture

9 Dec 2017 - 4:02 pm | पगला गजोधर

शेवटी तात्पर्य काय, "राजाने राजधर्म पाळण्यात कसूर करू नये..."
मी नै म्हणत, राजघराण्यातील साध्याला वानप्रस्थाश्रमातील एक जुने मुनी म्हणत होते....