माझ्या जातीपाती, माझे धर्म, माझा 'परजात'प्रवेश! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
5 Dec 2007 - 12:06 am

राम राम मंडळी,

तसा मी जन्माने हिंदू बरं का! अगदी कोकणस्थ ब्राह्मण! पण एकूणच आपला जातीपातीवर, धर्मावर तसा विश्वास नाही! अहो नाहीतरी आपल्याला 'मनुष्य-प्राणी' असंच म्हटलं आहे. म्हणजे ऍडव्हान्स बुद्धीचे (म्हणजे 'प्रगत'मेंदू का काय ते म्हणतात ते हो! शिवाय आपला मेंदू 'प्रगत' वगैरे आहे हे आपणच ठरवलं, इतर प्राण्यांनी, वाघसिंह, कुत्रामांजर, एकपेशीय अमिबा वगैरे मंडळींनी ते अद्याप मान्य कुठे केलंय?! अहो सूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय न दिसणार्‍या जंतूंमुळे आपल्याला साधी अमिबिक डिसेन्ट्री जरी झाली तरी आपण रात्रभर किमान दहा-पंधरा रेघोट्या तरी ओढतोच की! मग उगाच कशाला मारे प्रगत मेंदूची अन जातीधर्माची शेखी मिरवा? :)

हां, तर काय सांगत होतो? तर जरी आपण ऍडव्हान्स बुद्धीचे वगैरे असलो तरी शेवटी मनुष्यप्राणीच ना? आणि प्राण्याला कुठे असते जातपात? मग आपल्याला तरी जातीधर्माचं लेबल कशाला हवं?! 'कोकणस्थ वाघ' किंवा 'कुडाळ देशकर सिंह' किंवा 'गौड सारस्वत अस्वल' असं आपण कधी ऐकलं आहे का? किंवा 'मुस्लिमधर्मीय उंट' किंवा 'जैनधर्मीय हरणटोळ' किंवा 'बौद्धधर्मीय खवलेमांजर' असं तरी आपण कधी ऐकलं आहे का? मग तात्याची जात तेवढी कोकणस्थ! किंवा आमची प्रियाली तेवढी सारस्वत कुडाळदेशकर! किंवा आमचा मिलिंदा तेवढा देशस्थ दांडगा! अश्या जाती तरी का आणि कशाला हव्यात, ते सांगा पाहू! :))

तरीही मला या समाजात रहायचं आहे त्यामुळे समाजाच्या चालिरीती, जातपात, धर्म वगैरेची बंधने मला पाळावी लागणार आहेत. अहो समाजाचं सोडा, संकष्टी चतुर्थीला घरी ओल्या बोंबलाचं कालवण केलेलं माझ्या मातोश्रीला तरी चालणार आहे का? माझ्या कानाखाली दोन आवा़ज काढून 'मेल्या, तुला लाज नाही वाटत? कोकणस्थाच्या घरात जन्माला आलास ना? मग संकष्टीला आवर्तनं करायची सोडून ओल्या बोंबलाची कालवणं खायची स्वप्न बघतोस?' असं ती मला खडसावेल! :)

म्हणून मग मंडळी, मी काय गंमत केली आहे ते सांगू का? मी या सगळ्या जातीपाती, धर्म वगैरे माझ्या खाण्यापिण्याच्या सोयीसवयीनुसार ऍडजस्ट केल्या आहेत! सांगतो कसं ते...

आता संकष्टीचंच उदाहरण घ्या किंवा दत्तजयंतीचं उदाहरण घा! त्या दिवशी मी अगदी कोकणस्थ ब्राह्मण असतो. म्हणजे साबुदाण्याची गरमागरम खिचडी, खरवस, उत्तम दर्जाची ताजी मावा बर्फी (उपासाला चालते हो!), बटाट्याचा कीस, आमच्या गोखलेकडचं पियूष किंवा शिंगाड्याच्या पिठाचे किंवा साबुदाण्याचे गरमागरम वडे, उपासाची मिसळ असले पदार्थ अगदी मनसोक्त हाणतो! जिभेचे चोचलेही पुरले आणि जातीपारी जातही राहिली! उपास असलेला कोकणस्थ ब्राह्मण, तात्या अभ्यंकर! जोडीला एखादं आवर्तनही म्हणतो, साला गणपतीबाप्पा पण खुश!! :)
(ओल्या बोंबलाच्या कालवणाचा बदला पुन्हा केव्हातरी घेतोच!:)

मामलेदार कचेरीजवळची किंवा कोल्हापुरातली झणझणीत मिसळ चापतांना मात्र मी ब्राह्मण नसतो बरं का! सालं कुल्याला बेंड फुटेस्तोवर तिखट खाणं, ही भटाब्राह्मणांची कामं नव्हेत! :) मग त्या दिवशी मात्र मी मिसळीची तर्री चापणारा कुणी तात्या शिंदे, पाटील, किंवा तात्याबा म्हात्रे वगैरे असतो! ('मिसळीची तर्री चापणे' हा आमच्या अभिजितचा वाक्प्रचार बरं का! तो इथे मिसळीची तर्री चापण्याकरता येतो. लिखाळराव मात्र पुन्हा बहुतेक ब्राह्मणच असावेत, कारण त्यांना मिसळीनंतर थंडगार ताकही हवं असतं!) :) तर ते असो..

'अभ्यंकर' होऊन मिसळ खायला तेवढी मजा येत नाही हो! ती मजा कुणी शहाण्णव कुळी मराठा 'पाटील' बनूनच येते! त्यामुळे जसा खाद्यपदार्थ समोर असेल तशी जातपात, धर्म मी धारण करतो, मनाने त्या 'जाती'त जातो आणि मगच समोरचा पदार्थ चापतो! अगदी अस्स्ल चव लागते आणि वेगळीच मजा येते! आपणही अगदी अवश्य अनुभव घेऊन पाहा! नाहीतरी 'परकाया प्रवेश' नावाचा प्रकार असतोच ना! तसा माझा आपला 'परजात' किंवा 'परधर्म प्रवेश!' :)

छानपैकी सकाळची वेळ आहे, खास तमिळी उदबत्त्यांचा सुवास येतो आहे, कुठूनतरी एम एस सुब्बलक्ष्मींचं 'कौसल्या सुप्रजा' ऐकू येतंय, आणि समोर केळीच्या पानावर अस्सल तमिळी पद्धतीने केलेलं गरमागरम इडलीसांबार आहे! व्वा! तेव्हा मात्र मी तात्या सुब्रमण्यम असतो! मस्तपैकी तात्या सुब्रमण्यम किंवा तात्या अय्यर किंवा तात्या चिदंबरम बनून माटुंग्याच्या (पूर्वेला स्थानकाबाहेरच) श्रीकृष्ण बोर्डींग हाऊस मध्ये जावं आणि तमिळी भोजनावर यथेच्छ ताव मारावा! केळीच्या पानावर काय सुंदर जेवण वाढतात! अस्सल तमिळी चव असलेलं सांबार, गरमागरम रस्सम, भात, कच्च्या केळ्याची किंवा सुरणाची किंवा अश्याच कुठल्याश्या कंदाची सुंदर भाजी असते, कुठलंतरी छानसं तमिळ पद्धतीचं पक्वान्न असतं! तमिळ लोकांच्यात परजात प्रवेश करावा आणि गरमागरम सांबार भाताच्या राशीच्या राशी उठवाव्यात! मला तिथे बसून यथेच्छ रस्सम सांबार भात जेवताना श्रीकृष्ण बोर्डींग हाऊसचा मालक काय कौतुकाने माझ्याकडे पाहात असतो! समोरचं तमिळी अन्न भक्तिभावाने खातांना पाहून त्याला मी त्यांच्यातलाच कुणीतरी वाटतो! सोबत असलाच कुणी अस्सल तमिळी, तर जेवताजेवता त्याच्याशी 'ग्रॉस जी डी पी रेश्यो', 'बॅन्क रेट' यासारख्या विषयांवर विंग्रजीतून गप्पा माराव्यात! :) तीच तमिळी कथा रुईयाजवळच्या मणीजची! आहाहा, गरमागरम इडली खावी आणि उत्तम सांबार प्यावं ते 'मणीज'कडेच! साला 'मणीज'कडचं सांबार प्यायला नाही तो मुंबईकरच नव्हे!

छानशी दुपारची वेळ आहे, आणि मी गिरगावातल्या समर्थ भोजनालयात बसलो आहे! बर्‍याचदा खाकी हाफचड्डीत वावरणारा आमच्या शिंदुदुर्ग जिल्ह्यातला मालवणी बाल्या संज्या मला खास मालवणीत विचारतोय, "खय तात्यानू, बर्‍याच दिवसान? गरमगरम सुरमय देवू?" आहाहा! अहो संज्याच्या तोंडातली ती अमृतवाणी ऐकली की कान तृप्त होतात हो! मग काय, समोरचं ते परब्रह्म असलेलं मासळीचं भरलेलं ताट आणि मी! आता मात्र मी तात्या वालावलकर होतो! :) खाणावळीतली इतर मंडळीही ठार गिरणगावकर, गिरगावकर चाकरमानी. मासळीवर ताव मारता मारता मग सचिनच्या बॅटिंगवर चर्चा! भाईकाका म्हणतात त्याप्रमाणे अस्सल मुबईकर हा क्रिकेट हा खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय आहे असं समजतो, या वाक्याचा अनुभव समर्थ भोजनालयात येतो. तिथे सगळेच रमाकांत आचरेकर असतात! :)

मुन्शिपाल्टीत लायसन डिपार्टमेन्टला असलेला कुणी पांडुरंग मालंडकर, "मायझव तिच्यायला तात्यानूऽऽ, सालं क्रिकेटमध्ये हल्ली सगळं राजकारणच शिरलंय हो!" असं म्हणत बांगड्यावर ताव मारत असतो, 'बीईएसटी'त कामाला असलेला कुणी सुरेश पेडणेकर "नाय पण मी काय म्हणतो तात्याऽ, त्या गांगुलीला सचिनचं काय पण चांगलं झालेलं बघवत नाय बघा!" असं म्हणत कोलंबीची आमटी चापत असतो किंवा "अरे संज्या, जरा गरम मांदेली आण रे, आणि मटणात नळी दे म्हणून सांगितलं तुका तर नळी दिलीसच नाऽय! " अशी कंपलेन्ट कुणी वयोवृद्ध गिरणीकामगार करत असतो!

आहाहा! समर्थ भोजनालयात या टाईपच्या गप्पाटप्पा ऐकत ऐकत मासळीचं जेवायला काय मजा येते म्हणून सांगू! हां, पण तिथे मात्र मी तनमनधनानं 'वालावलकर', किंवा 'प्रभू', किंवा 'सावंत' असतो बरं का! तिथे तात्या अभ्यंकर किंवा तात्या चिदंबरम बनून गेलो तर साली मच्छी अळणी आणि बेचव लागेल! :)

चला, आता मुंबईपासून थोडं दूर जाऊ आणि जरा वेळाने पुन्हा मुंबईत परत येऊ!

हैद्राबादेतल्या चारमिनार परिसरात मिळणारं हलीम किंवा लखनऊच्या हनीफभाईची आख्ख्या लखनवात घमघमाट सुटणारी 'दम' केलेली गोश्त बिर्याणी खाताना मात्र मला जातच काय पण धर्मही बदलावा लागतो! छ्या, त्याशिवाय ती चव अनुभवताच येत नाही! जुन्या हैद्राबादेत रोज्याच्या दिवसात मिळणारं हलीम! आहाहा.. काय विचारता मंडळी! गव्हाची कणीक आणि मटण वापरून केलेला गुरगुट्या भातासारखा हा एक अजब पदार्थ! मग मी 'तात्या खान' किंवा कुणी 'अस्लम मुहम्मद तात्या' बनतो आणि गरमागरम हलीम अगदी चवीचवीने आणि अलगदपणे चमचा चमचा जिभेवर ठेवतो! आहाहा काय साली चव असते हलीमला!

तिच कथा हनीफभाईकडच्या लखनवी बिर्याणीची. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळेला लखनवात मनसोक्त भटकावं आणि किंचित दमून हनीफभाईकडे बिर्याणी खायला यावं! (जुनं लखनौ, बडीचावडी, मीरामहलच्याजवळ!) इथे मात्र मनानं 'तात्याशहा जफर' बनल्याशिवाय मला बिर्याणी खाताच येत नाही! आहाहा, मऊ लुसलुशीत गोश्त, कणीकेचा दम, मंद चवीचे, मुस्सलमानी ढंगाचे हनीफभाईच्याकडच्या पिढ्यानपिढ्यांचा वारसा सांगणारे ते पुश्तैनी मसाले! उगवती-मावळतीचे रंग फिके पडावेत अशी रंगसंगती असलेली, केशराचे पाणी शिंपडलेली ती गोश्त दम बिर्याणी! काय सांगू मंडळी तुम्हाला! जाऊ द्या झालं!...

तर मंडळी, अशी सगळी मजा! अजूनही माझ्या बर्‍याच जातीपातींबद्दल मला भरभरून लिहायचे आहे पण ते पुन्हा कधितरी मूड लागेल तेव्हा! :)

'माणूस शेवटी जातीवर जातो' असं म्हणतात. त्यामुळे सगळं फिरून झाल्यावर मीही पुन्हा एकदा 'कोकणस्थ तात्या अभ्यंकर' ही जात धारण करणार आहे आणि आपल्याला घेऊन जाणार आहे देवगडातल्या सकाळची कोवळी उन्हं पडलेल्या ओसरीवर! शिपणाच्या आवाजाच्या पार्श्वसंगीताच्या साथीने केळीच्या पानावरचा मऊभात खायला! गरमागरम मऊ गुरगुट्या भात, वर तुपाची धार, आणि सोबत पोह्याचा भाजलेला पापड व आंबोशीचं लोणचं!

घेऊन जाणार आहे आपल्याला भाईकाकांचा 'तात्या बर्वा' बनून रत्नांग्रितल्या मधल्या आळीत गर्‍यांची कढी खायला आणि बरक्या फणसाची सांदणं खायला! :)

असो...

गुरुवर्य भाईकाका म्हणतात ते खरंच आहे! इतर कुठल्याही कारणांसाठी नकोत परंतु खाद्यपदार्थांचे वैविध्य टिकविण्यासाठी तरी जातीपाती हव्यात!

मंडळी, कालच माझ्या स्वप्नात भाईकाका आले होते. म्हणाले, "तात्या गधड्या, तुझं ते रौशनी वगैरे पुरे आता, काहीतरी चांगलं खाण्यापिण्यावर, संगीतावर लिही रे! मी ते वाचेन कौतुकाने!":)

म्हणूनच हा एक मोडकातोडका, वेडावाकडा लेख भाईकाकांच्या चरणी समर्पित!

जय भाईकाका!
जय देवी अन्नपूर्णा!
समस्त जातीधर्मांचा विजय असो...

--तात्या अभ्यंकर.

संस्कृतीधर्मपाकक्रियावाङ्मयमौजमजाअनुभवआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

देवदत्त's picture

5 Dec 2007 - 12:16 am | देवदत्त

मस्त हो तात्या एकदम.
व्हेन इन रोम.... च्या तत्वावर जिथे आपण खातोय तिकडचेच होऊन खाल्ले तर वेगळीच मजा असते.

मी बंगळुरला २ वर्षे होतो, तिथे तसला व्ह्यायचा (खाण्याकरीता) प्रयत्न केला पण नाही तो खाण्याचा स्वाद अवगत करू शकलो. पण त्या वातावरणात राहून आपले नेहमीचे जेवणही त्याच जातीचे बनून चाखले.

बाकी नंतर...

सुनील's picture

5 Dec 2007 - 12:29 am | सुनील

वा तात्या, या बाबतीत आपली "जात"कुळी एकच!!

परवाच्या थँक्स्-गिविंगला "सनी" बनून टर्की चापायला काय मज्जा आली! "सुनील" राहून खाल्ली असती तर कदाचित वातड लागली असती!!

जे देशाबाबत तेच परदेशाबाबतही. आता सॅन फ्रान्सिस्कोसारख्या अठरापगड जाती-धर्माच्या पद्धतीचे जेवण देणार्‍या शहराच्या अगदी जवळ राहूनदेखील वर्षानुवर्षे नुसते डाळ्-भात खाणारे महाभागसुद्धा असतात हो!

असतात काही जण जन्मजात दुर्दैवी, काय करणार?

असेच खाण्या-पिण्यावर लेख येऊद्यात!!

सहज's picture

5 Dec 2007 - 12:43 am | सहज

बाकी सब झूट है.

तात्या एवढं लिहलत भूक खवळली बघा , काय बरे खावे आत्ता.

सर्किट's picture

5 Dec 2007 - 1:40 am | सर्किट (not verified)

सालं कुल्याला बेंड फुटेस्तोवर तिखट खाणं, ही भटाब्राह्मणांची कामं नव्हेत! :)

अगदी बरोबर !!!

तेथे पाहिजे "जातीचे" !

सुंदर लेख तात्या !

लहानपणी माझ्या मित्रमंडळीत मी एकटा ब्राह्मण होतो. त्यामुळे घरचा वरणभात सोडून मला काहीही आवडायचे !

"कुल्याला बेंडं" झाल्यावर हे सगळे कमी करावे लागले. पण अजूनही मस्त वर्‍हाडी ठेचा, जवसाचं तेल, आणि बाजरीच्या भाकरी असा एखाद्या "माउलीने" आशिर्वाद दिला, तर मागेपुढे न पाहता हाण हाण हाणतो !

इतर कुठल्याही कारणांसाठी नकोत परंतु खाद्यपदार्थांचे वैविध्य टिकविण्यासाठी तरी जातीपाती हव्यात!

क्या बात है !!

शिर्‍या सोनवणे किंवा रम्या जीवतोडे अशा माझ्या मित्रांकडे साधी पालकाची पातळभाजी (फदफदे) जो रंग आणि चव घेऊन जन्मायची, की पुण्यात्तल्या लग्नात जो त्याच नावाचा एक प्रकार मिळतो, त्याची कीव येते.

आमच्या खुशाल देवतळे किंवा मुरल्या नन्नावरे कडे "टकलाला घाम फोडणारी" कोंबडी खाताना त्यांच्या आया "बामनं बिगडली की" असे कौतुकाने बोलायच्या, त्याने त्या कोंबडीलाही पाझर फुटायचा !

- (देशस्थ दांडगा) सर्किट

तात्या, शेवटी जातीवर गेलातच म्हणायचे! पण ही अशा पद्धतीने जात दाखवायला लागलात, तर भारतीय दंडसंहितेच्या कोणत्याही कलमाअंतर्गत खटला भरता यायचा नाही; तेव्हा आगे बढो. असला जातीयवाद भारतात बोकाळणे हेच राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने हितावह नाही काय? ;)
(जातीयवादी)बेसनलाडू
बाकी सवड असताना (आणि मी मुंबईला असताना) दादरला वाट वाकडी केलीत तर सिंधुदुर्ग किंवा सायबिणीमध्ये सोलकढी भात आणि तळलेली कोलंबी किंवा सुरमई हाणू. घरी येणार असलात तर आईला सांगून डाळमेथी / बेळगावी मसुरीची आमटी / मुगागाठी, पापलेटचं भुजणं, सोलकढी भात आणि गरमागरम पोळ्या... काय म्हणता? नाश्त्याला येत असाल, तर आप्पे-चटणी, वरून साजूक तूप घातलेली खांडवी वगैरे :) कळवा मग!
(गौड सारस्वत अस्वल)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

5 Dec 2007 - 11:49 am | विसोबा खेचर

बाकी सवड असताना (आणि मी मुंबईला असताना) दादरला वाट वाकडी केलीत तर सिंधुदुर्ग किंवा सायबिणीमध्ये सोलकढी भात आणि तळलेली कोलंबी किंवा सुरमई हाणू. घरी येणार असलात तर आईला सांगून डाळमेथी / बेळगावी मसुरीची आमटी / मुगागाठी, पापलेटचं भुजणं, सोलकढी भात आणि गरमागरम पोळ्या... काय म्हणता? नाश्त्याला येत असाल, तर आप्पे-चटणी, वरून साजूक तूप घातलेली खांडवी वगैरे :) कळवा मग!

अरे एवढं सगळं देणार असलास तर आपण साला झालं गेलं सगळं विसरून पुन्हा विनायकाशी दोस्ती करायला तयार आहोत! :)

अगदी खरंच देवाच्यान! मस्करी नाय....! :) 'तात्या असं म्हणत होता' म्हणून वाटल्यास सांगून बघ त्याला! कोकणी माणूस आहे म्हणावं, मनात काही नसतं आमच्या!

असो, नक्की घरी येईन तुझ्या! सायबिणीत पण जाऊ. पण सॉरी टू से, शिंदुदूर्गवाला मात्र हल्ली बिघडला! पूर्वीची चव आता राहिली नाही!

तात्या.

बेसनलाडू's picture

5 Dec 2007 - 12:24 pm | बेसनलाडू

अरे एवढं सगळं देणार असलास तर आपण साला झालं गेलं सगळं विसरून पुन्हा विनायकाशी दोस्ती करायला तयार आहोत! :)
राहू द्या हो तात्या. आपण दोघेही लाचखोर नाही :)) खानेपिने की बात अलग अपनी जगह आप-मेरे बीच; लडाईझगडा, तात्त्विक वाद अलग अपनी जगह आप-मेरे बीच ;) मुंबईत आल्यावर दादरचा बेत बाकी आता पक्काच समजतो; त्याप्रमाणे पुढची तजवीज तेव्हा करता येईल :)
(वेगवेगळा)बेसनलाडू
पण सॉरी टू से, शिंदुदूर्गवाला मात्र हल्ली बिघडला! पूर्वीची चव आता राहिली नाही!
सिंधुदुर्ग मध्ये मिळणार्‍या फ्राय पापलेटचा नि हलव्याचा आकार जसजसा कमी होत गेला आणि हाटेल रिनोवेट केल्यावर आधीची लाकडी सजावट जाऊन श्टीलची चकचकीत, बाकदार नक्ष्यांची बाकडी लागली, तेव्हा चवीबद्दल शंका येऊ लागलीच होती. मागच्या भारतदौर्‍यात तेथे मोरी मसाला आणि सुरमई फ्राय हे दोनच आयटेम्स 'खाण्यायोग्य' राहिल्याचे लक्षात आले. पाण्यासारख्या, फिकट (गुलाबी म्हणता येणार नाही अशा) रंगाच्या सोलकढीने झालेली निराशा पुढे चवीचे काय होणार याचे भाकीत वर्तविण्यास पुरेशी होती. वर्षभरातच एक उत्तम हाटेल व्यापारीकरणाच्या लाटेत वाहून गेले की काय, असे वाटते.
(सिंधुदुर्गप्रेमी)बेसनलाडू

धोंडोपंत's picture

5 Dec 2007 - 1:38 pm | धोंडोपंत

तात्या,

फोकलीच्या, सायबिणीत जातांना आम्हाला विसरू नकोस. बेसनलाडवापेक्षा आपल्या घराच्या ते जवळ आहे.

तू गेल्यावेळी आला असतांना, आपण महाराष्ट्र बँकेसमोर पान खाऊन जिथे थुंकत उभे होतो, त्याच्या बरोब्बर समोर.

आपला,
(घाणेरडा) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

धोंडोपंत's picture

5 Dec 2007 - 2:01 pm | धोंडोपंत

अरे एवढं सगळं देणार असलास तर आपण साला झालं गेलं सगळं विसरून पुन्हा विनायकाशी दोस्ती करायला तयार आहोत! :)

अगदी खरंच देवाच्यान! मस्करी नाय....! :) 'तात्या असं म्हणत होता' म्हणून वाटल्यास सांगून बघ त्याला! कोकणी माणूस आहे म्हणावं, मनात काही नसतं आमच्या!

हे काय रे तात्या? काय वाचतोय आम्ही? एवढी अगतिकता? ?????

तेही ज्या माणसाने इतके किडे केले त्याच्यासाठी ?????

सर्कीटाची मेहनत पाण्यात गेली म्हणायची.

आपला,
(आश्चर्यचकित) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

किमयागार's picture

5 Dec 2007 - 8:57 am | किमयागार (not verified)

अध्यक्ष महोदय,
भाईकाका पून्हा स्वप्नात आले तर त्यांना हा लेख जरूर वाचायला द्या हो! परत असे उठसुठ कुणाच्याही स्वप्नात कडमडणार नाहीत ही ग्यारंटी आमची.
असे का म्हणून विचारताय? तुम्हाला फारसं पचत नाही, पण तरीही थोडं स्पष्टचं बोलतो हो!
अहो काय ही बौद्धीक दिवाळखोरी??
माणूस 'ऍडव्हान्स' बुद्धीमत्तेचा नाही म्हणता?? अहो मग हे इतर प्राण्यांनी कशाला सांगायाला पाहिजे??? कै च्या कै!!
ज्याला कुणाला शंका असेल त्याने आपला हा लेख वाचावा.

आणि प्राण्यांना कुठे असता जात विचारता?
अगदी बरोबर हो!! अल्सेशियन,पॉमेरियन, डॉबरमॅन ह्या तर माणसाच्याच जाती की!!उगीच नाही आम्ही आमच्या कार्यालयात बॉसला 'डॉबरमॅन' म्हणत!!

तुम्ही कुठे कुठे चरता ह्यावरच जर लेख खरडायचा होता, तर तुमचे सामाज्ञ ज्ञान स्पष्ट करणारे हे जाती पाती आणि प्राण्यांचे भारूड कशाला हो? नाही का?
तसेही तुम्ही कुठे कुठे चरता हे तुमच्याच लिखाणातून आम्ही पन्नासदा वाचले आहे. आता कंटाळा आला बुवा!! काही ताजे असेल तर लिहा. रौशनी सारखे चटकदार असेल अजूनच उत्तम!!

आपलेच संकेतस्थळ आहे म्हणून लोकांना तीच शिळी तर्री पुन्हा उकळी मारून वाढायची, हे योग्य आहे का अध्यक्ष?
-किगार
***********************************************************
अल्कोहोलचा परिणाम दुसरे काय?

विसोबा खेचर's picture

5 Dec 2007 - 9:14 am | विसोबा खेचर

तुम्हाला फारसं पचत नाही, पण तरीही थोडं स्पष्टचं बोलतो हो!

पचतं हो! आम्हाला सगळं पचतं! तुमच्या सारखे स्पष्ट बोलणारेदेखील आम्ही अनेकदा पचवले आहेत! किंबहुना तुम्ही केव्हा थुंकताय याची आम्ही वाटच पाहात होतो! :)

तसेही तुम्ही कुठे कुठे चरता हे तुमच्याच लिखाणातून आम्ही पन्नासदा वाचले आहे. आता कंटाळा आला बुवा!!

अहो मग नका ना वाचत जाऊ आमचे लेख!

आपलेच संकेतस्थळ आहे म्हणून लोकांना तीच शिळी तर्री पुन्हा उकळी मारून वाढायची, हे योग्य आहे का अध्यक्ष?

लोकांना आम्ही काय वाढायचं किंवा काय नाही हे आम्ही ठरवणार! आमचं लेखन वाचायचं किंवा नाही हे लोक ठरवतील!

तात्या.

ध्रुव's picture

5 Dec 2007 - 1:32 pm | ध्रुव

थुंकलात का? वा वा! छान...
हे आवडले....... पटले.
--
ध्रुव

धोंडोपंत's picture

5 Dec 2007 - 9:08 am | धोंडोपंत

वा वा वा वा,

तात्या अप्रतिम लेख. अभिनंदन. क्या बात है! अख्खा तात्या अस्सलपणे या लेखात उतरलाय.

सागुती, सोलकढी आणि सुरमई म्हणजे आमचा ही जीव की प्राण हो. अहाहा !!!! तात्या, जग खरचं सुंदर आहे रे.

गावाला झकास वाईचं ग्लासभर घेऊन त्यावर "बांगडोभाताचं "जेवण आणि त्यानंतर खळ्यातल्या बकुळीच्या झाडाखाली , खाटेवर लोळत आजूबाजूस पान-तंबाकूचे सडासंमार्जन , त्यानंतर झकास झोप.

वा वा वा वा. सुख सुख म्हणतात ते हेच.

आपला,
(सुखासक्त) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

पुष्कर's picture

6 Dec 2007 - 9:51 am | पुष्कर

सडासंमार्जन हा शब्द वाचताना चुकून मी "स" आणि "सं " च्या जागांची अदलाबदल केली. पण पुन्हा एकदा नीट वाचले तेव्हा उलगडा झाला. साला आपल्याच मनात खोट :-)

(आपल्याच लायनीत उभा असलेला) पुष्कराक्ष

जुना अभिजित's picture

5 Dec 2007 - 10:00 am | जुना अभिजित

एकदम झकास लेख.

हैदराबादेतला हलीमसुद्धा चापून आलेलो आहे. तुम्ही म्हणता त्यात यत्किंचितही चूक नाही.

जिथे जाऊ तिथलं बनून राहिलं की चेन्नैमध्येही अडचण येत नाही.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

नंदन's picture

5 Dec 2007 - 10:49 am | नंदन

लेख, तात्या. मटण-वडे, सुरमई, सोलकढी बरोबरच शिंदुदुर्गातल्या फणसाची भाजी, काकडीचा धोंडस, शेवेचे (खडखडे) लाडू, केळफुलाची भाजी, ओल्या काजूंची उसळ यासारख्या शाकाहारी पदार्थांनाही तोड नाही.

बाकी सम्राट/चेतना/पंचवटी गौरव किंवा मंगळदास मार्केटजवळच्या राजधानीत वेगवेगळ्या फरसाणांपासून डाळ-ढोकली, हांडवो, उंधियो हादडणार्‍या तात्याभाई पटेल/मेह्ता आणि सोड्यांची खिचडी, कोलमीचं कालवण, बिरडं इ.मध्ये रमणार्‍या तात्या गुप्ते/प्रधानाची वाट पाह्तोय :)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

बेसनलाडू's picture

5 Dec 2007 - 10:54 am | बेसनलाडू

शिंदुदुर्गात जाऊन शेवेचे लाडु वगैरे आठवले, पण मालवणचे खाजे नाहीत :( ये बात कुछ हजम नही हुई :(
('मालवणी'प्रेमी)बेसनलाडू

आनंदयात्री's picture

5 Dec 2007 - 11:05 am | आनंदयात्री

म्हणतो .... देशस्थ कुलकर्णी, जोशी व्हा की कधी, एक लेख होउन जाउद्या शाकाहारी .... काय म्हणता ? तसेच "ग्लेन फिडिच .." वैगेरे विषय पण अस्पर्शित आहे अजुन ....

(ग्लेन फिडिच अन समजातीय पेयांवर लेखांची वाट पहाणारा)
आनंदयात्री

विसोबा खेचर's picture

5 Dec 2007 - 11:25 am | विसोबा खेचर

शिंदुदुर्गातल्या फणसाची भाजी, काकडीचा धोंडस, शेवेचे (खडखडे) लाडू, केळफुलाची भाजी, ओल्या काजूंची उसळ यासारख्या शाकाहारी पदार्थांनाही तोड नाही.

क्या बात है नंदनशेठ, हे बाकी अगदी खरं! हे सगळं खाताना मी आलटून-पालटून 'अभ्यंकर-वालावलकर' असा असतो! :)

बाकी सम्राट/चेतना/पंचवटी गौरव किंवा मंगळदास मार्केटजवळच्या राजधानीत वेगवेगळ्या फरसाणांपासून डाळ-ढोकली, हांडवो, उंधियो हादडणार्‍या तात्याभाई पटेल/मेह्ता

हम्म! भातबाजारातल्या सुरती भोजनालयातील दूधपाक, पात्रा, डाळढोकली अने खमण! वा वा!

नंदनसेठ, तमे एकदम चोक्कस बात करे छे! :)

आणि सोड्यांची खिचडी, कोलमीचं कालवण, बिरडं इ.मध्ये रमणार्‍या तात्या गुप्ते/प्रधानाची वाट पाह्तोय :)

हम्म! बाजीप्रभूचे इमान सांगी..:)

बाकी ह्या सगळ्यासोबतच तात्या कारखानीसांना कानवलेही खूप प्रिय आहेत! :) साले कानवले करावेत तर कायस्थांनीच!

ग्रँटरोडच्या बी मेरवान आणि मंडळी किंवा मेट्रो जवळील कयानी-बास्तानी मधला मावा केक, ब्रुम-मस्का, डब्बल आमलेट, आणि पावमस्का खातांना आपण 'तात्या इराणी' किंवा 'तात्या बाटलीवाला' असतो! :)

क्रॉफर्ड मार्केट जवळील ग्रँट हाऊस कॅन्टीन मध्ये वर तळलेली हिरवी मिरची असलेला खिमा आणि सोबत पाव, किंवा तिकडचा झिंगा फ्राय राईस, किंवा गावठी कोंबडी खाताना मी ग्रॅटहाऊस समोरीलच पोलिस कमिशनरच्या हापिसातला अकाउंटस डिपार्टमेन्टचा हेडक्लार्क 'तात्या कानविंदे' असतो तर सायनच्या मॉडर्न लंच होम मध्ये पापलेट मच्छी कढी खातांना मी 'तात्या शेट्टी' असतो!

'तात्या दुबे' किंवा 'तात्या मिश्रा' बनून व्हीटी समोरील बोराबाजार स्ट्रीटच्या तोंडावरील 'पंचम पुरी' मध्ये पुरी पात्तळभाजी खायला किंवा फोर्टातल्या मथुराभुवनमधले पेढे आणि आटीव दूध प्यायला मजा येते!

मित्तल टॉवरमधल्या २० मजल्यावरच्या एका मल्टीनॅशनल कंपणीचा शी ई ओ 'तात्या ओबेरॉय'बनून कुणा 'पायल वडेधरा' नावाच्या 'आयटम!' शेक्रेट्री सोबत नरीमन पॉईंटच्या स्टेटस मध्ये जेवायला खूप मजा येते तर म्हापश्यात सांजच्या टायमाला 'तात्या डिकास्टा' बनून म्हापश्यातच बनलेली देशी दारू प्ययला आणि 'तात्या चिखलीकर' बनून कर्लीचं कालवण खायला खूप मजा येते! :)

आपला,
(बहुजन समाजातला) तात्या.

रामराजे's picture

5 Dec 2007 - 11:14 am | रामराजे

नमस्कार तात्या,

फारच चमचमीत लेख लिहिलात हं अगदी..... वाचुनचं पोटात कावळे ओरडायला लागले!

भाईंच्या 'माझे खाद्यजीवन' नंतर बर्‍याच दिवसांनी असं काहीतरी वाचायला मिळाले.

प्रकाश घाटपांडे's picture

5 Dec 2007 - 11:23 am | प्रकाश घाटपांडे

मंडळी, कालच माझ्या स्वप्नात भाईकाका आले होते. म्हणाले, "तात्या गधड्या, तुझं ते रौशनी वगैरे पुरे आता, काहीतरी चांगलं खाण्यापिण्यावर, संगीतावर लिही रे! मी ते वाचेन कौतुकाने!":)

भाईकाकांनी आत्ताच मला सांगितल कि तात्या "सध्या" शब्द लिहायचा विसरला. मला तेव्हा जे लिहिता आल नाही ते सूक्ष्म लिंग रुप धारण करुन तात्या करवी आता लिहिन.
प्रकाश घाटपांडे

ध्रुव's picture

5 Dec 2007 - 1:17 pm | ध्रुव

वा वा तात्या,
अगदी मनातले भाव लिहीलेत. पण खरं सांगतो, तुम्ही म्हणलात तसंच, जात बदलल्याशिवाय खाण्याची मजा नाही येत.
तुमचा,
--
(जातबदललेला)ध्रुव

शब्दवेडा's picture

5 Dec 2007 - 4:09 pm | शब्दवेडा

मस्त लेख आहे..
अगदी काळजातून पोटात शिरणारा...

झकासराव's picture

5 Dec 2007 - 5:25 pm | झकासराव

काय मस्ताड लेख आहे.
तात्या लय भारी लिवलय.
आज सकाळीच मी झणझणीत मिसळ चापली. त्यावर मागुन तर्री घेतली. तर तो हाटेलातला पोर्‍या घेवुन तर आला आणि मला म्हणाला सायेब तर्री आहे. सँपल नाही. त्यावर मी झकासराव पाटिल कोल्हापुरकर होतो म्हणुन असु दे वाढ असच म्हणालो. :)
जात पात मानत नाही किंवा मानतो ह्यापेक्षा अस मानन आवडल :)

केशवसुमार's picture

5 Dec 2007 - 6:06 pm | केशवसुमार

डोळयाला त्रास आणि **** उपास अशी अवस्था झाली आहे हे वाचून.
साला ह्या राणिच्या देशात जीभेचे भारी हाल हो..आणि आम्ही पडलो प्राण्याची प्रेते न खाणरे घासपूस वाले..
त्यात तात्या तुम्ही अस काहीतरी चमचमीत लिहा..
नोकरी गेली गा च्या गा त.. ...कधी एकदा परत येतोयं आणि ह्या चिभेचे चोचले भागवतो अस झालयं..
(प्राण्यांची प्रेते न खाणारा)केशवसुमार
(तात्याशेठ लेख आवडला हे सांगणे न लगे)

विसुनाना's picture

5 Dec 2007 - 7:30 pm | विसुनाना

वा! खावडीवरचा आणखी एक चविष्ट लेख.
असला जिव्हा चाळवणारा लेख वाचून मलासुद्धा परत एकदा एकेक करून जातधर्म बदलायला लागणार. :)
तात्याभाई शहा, तात्यामोशाय चट्टोपाध्याय, तात्यागारू रेड्डी या जातीप्रवेशाचे राह्यलेच की तात्या!
आणि हो तात्या, भाईकाका कितीही म्हणाले तरी रोशनी मात्र सुरू राहू दे.

विसोबा खेचर's picture

5 Dec 2007 - 7:51 pm | विसोबा खेचर

प्रस्तुत लेखातील समर्थ भोजनालय या खानावळीविषयीचा छायाचित्रांसहीत विस्तृत लेख इथे वाचता येईल..

धन्यवाद...

आपला,
तात्यामामा पेडणेकर.

आजानुकर्ण's picture

5 Dec 2007 - 8:25 pm | आजानुकर्ण

लेख फार आवडला. परजात प्रवेशाचे सुख काही वेगळेच ;)

- आजानुकर्ण

चित्रा's picture

6 Dec 2007 - 1:01 am | चित्रा

आता हे सर्व करून कोण खायला घालणार इथे?

सुनील's picture

6 Dec 2007 - 7:26 am | सुनील

जुन्या हैद्राबादेत रोज्याच्या दिवसात मिळणारं हलीम! आहाहा.. काय विचारता मंडळी! गव्हाची कणीक आणि मटण वापरून केलेला गुरगुट्या भातासारखा हा एक अजब पदार्थ! मग मी 'तात्या खान' किंवा कुणी 'अस्लम मुहम्मद तात्या' बनतो आणि गरमागरम हलीम अगदी चवीचवीने आणि अलगदपणे चमचा चमचा जिभेवर ठेवतो! आहाहा काय साली चव असते हलीमला!

तात्या, जरा हे वाचा (२ जाने २००६ ची पोस्ट). अगदी हनीफभाईसारखा नव्हे पण "खाणेबल" हलीम आम्हीदेखील बनवतो बरे का!! सध्या उसगावात आहे, एकदा ठाण्याल्या परतल्यावर खाऊ घालीन, अर्थात तुमची इच्छा असेल तर!!!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/91063.html?1156944743

सुनील (शेख)

प्राजु's picture

6 Dec 2007 - 8:08 am | प्राजु

अगदी भरभरून लिहिलं आहे हो!
तात्या,
बरं थोडंच लिहीलं आता, नाहीतर.. लगेचची फ्लाईट पकडून भारतात यावं लागलं असतं मला हे सगळे खाण्यासाठी.
अगदी छान झाला आहे हा लेख. एकदम प्रशस्त.

कोल्हापूर मधल्या बिंदू चौकातल्या "जयहिंद दरबार" या हॉटेल मध्ये जाऊन एकदा तिथे मटण कबाब, कोल्हापूरी चिकन, तांबडा आणि पांधरा रस्सा चाखून या... पण तिथेही तात्या खान बनूनच जावं लागेल. :)
तसेच, दिल्लीच्या करोलबाग च्या "काके दा ढाबा" मध्ये मस्त गरमा गरम तंदूर रोटी , कढाई पनीर आणि बेंगन दा भरता हे ही चाखून या.. तिथे मात्र तात्या सिंग किवा तात्या कौर बनून जावे लागेल...

असाच आणखीही एखादा लेख येऊदे.
* या खाण्या पिण्यासाठी रोशनीला नका विसरू. भाईकाका कधी पुन्हा आले स्वप्नात तर माझ्यातर्फे माफी मागा आणि रोशनी पूर्ण करा.

- प्राजु.

विसोबा खेचर's picture

6 Dec 2007 - 8:48 am | विसोबा खेचर

भरभरून प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचक खवैय्या मंडळींचे अगदी पोटभऽऽर आभार मानतो...:)

मिलिंदा, तुझ्या मित्रमंडळींची नांवं बाकी एकदम भारी आहेत! :)

केशवसुमारा, मांसाहारी पदार्थांना तू बहाल केलेला 'प्राण्यांची प्रेते!' हा भयानक शब्द आवडला! :)

नानासाहेब, आपण म्हणता त्याप्रमाणे तात्याभाई शहा, तात्यामोशाय चट्टोपाध्याय, तात्यागारू रेड्डी या जातीप्रवेशाचे उल्लेख राहिले खरे! विजयवाडा, गुंतूर इत्यादी ठिकाणी मी तात्यागारू रेड्डी बनून थोडीफार खादाडी केली आहे.

सुनीलराव,

अगदी हनीफभाईसारखा नव्हे पण "खाणेबल" हलीम आम्हीदेखील बनवतो बरे का!! सध्या उसगावात आहे, एकदा ठाण्याल्या परतल्यावर खाऊ घालीन, अर्थात तुमची इच्छा असेल तर!!!!

अगदी अवश्य! आपल्या हातचं हलीम खायला मी अतिशय उत्सुक आहे. केव्हा परतताय उसगावातून? :)

आणि माझी इच्छा का नसेल? कुणी प्रेमाने माझ्या आवडीचा पदार्थ करून खाऊ घालणार असेल तर त्याला 'नाही' म्हणण्याचा करंटेपणा मी कधीच करणार नाही! :)

प्राजू,

कोल्हापुरातल्या जयहिंद दरबारला एक दिवस नक्की भेट देईन.

* या खाण्या पिण्यासाठी रोशनीला नका विसरू. भाईकाका कधी पुन्हा आले स्वप्नात तर माझ्यातर्फे माफी मागा आणि रोशनी पूर्ण करा.

रौशनी जरूर पूर्ण करीन. आणि हो, माफीबिफी मागण्याइतपत भाईकाका रागावलेले नाहीत! :)

नाहीतर.. लगेचची फ्लाईट पकडून भारतात यावं लागलं असतं मला हे सगळे खाण्यासाठी.

लगेच निघून ये! नवर्‍याला म्हणावं, "तात्याच्या संगती समर्थ भोजनालयाच्या डेटवर जायचंय. चुपचाप परवानगी दे!" :)

असो, सर्वांचे पुन्हा एक डाव, एक पळी आभार...! :)

(अन्नपूर्णेचा भक्त) तात्या.

सर्किट's picture

6 Dec 2007 - 9:22 am | सर्किट (not verified)

मिलिंदा, तुझ्या मित्रमंडळींची नांवं बाकी एकदम भारी आहेत! :)

आणि ती माझी सर्वात जवळची मित्रमंडळी आहेत, आजवर !

ह्यात आमच्या महादेव सातपैशाच्या घरच्या घुगर्‍यांचा उल्लेख राहिला.

ऑक्टोबर नव्हेंबराकडे ह्य लोकांच्या शेतात पिकते. तेव्हा म्हादेव नेहमी शाळेत हजर नसायचा. त्याला एकदा विचारले, तेव्हा हे घुगर्‍यांचे गुपीत समजले.

घुगर्‍या हा सर्वोत्कृष्ट पदार्थ म्हणजे त्या काळात शेतात पिकलेल्या सगळ्या धान्यांची एकत्रित केलेली उसळ..

गहू, डाळी, आणि सगळी द्विदल किंवा एकदल धान्ये ह्यांची घनघोर तिखट घालून केलेली उसळ म्हणजे घुगर्‍या..,...

आमच्या म्हादेव सातपैशाबरोबर त्याच्या शेतात जावून ह्या घुगर्‍या त्याच्या आई-वडीलांसोबत काम करणार्‍या शेतमजुरांसोबत खाताना, त्यांच्या कष्टाचे चीज झाल्याची भावना त्यांच्या बोलण्यातून दिसणे, ह्यासारखे दुसरे भाग्य काय ?

- सर्किट सातपैशे

यनावाला's picture

8 Dec 2007 - 2:42 pm | यनावाला

श्री. तात्या यांचा हा अप्रतिम लेख वाचताना पु.ल.देशपांडे यांच्या "माझे खाद्यजीवन " या लेखाची आठवण अपरिहार्यपणे होते. ज्याची अन्नावरची वासना उडाली आहे, ज्याला भूक लागत नाही, जेवण जात नाही अशा माणसाने जर हा लेख वाचायला घेतला तर वाचता वाचताच त्याचा जठराग्नी प्रदीप्त होत जाईल.लेख वाचून संपल्यावर तो एखाद्या चांगल्या हॉटेलात जेवण्यासाठी धाव घेईल. असे या लेखात शब्दसामर्थ्य आहे. श्री. तात्या यांचा खाद्यानुभव समृद्ध आहे.अनुभवाविना असे लेखन अशक्यच असते. पण अनुभव शब्दबद्ध करण्यासाठी प्रेरणा लागते. ती त्यांना पु.लं. कडून मिळाली. स्वप्नात येऊन त्यांनी लिहायला सांगितले असे तात्या म्हणतात ते खरेच असले पाहिजे. तुकारामांनी आपल्या अभंगरचनेविषयी म्हटले आहे:
......नामदेवे केले स्वप्नामाजी जागे | सवे येऊनिया पांडुरंगे |
......सांगितले काम करावे कवित्व | वाउगे निमित्य बोलों नये ||
**
आपला,
स्वप्नविश्वासू
यनावाला

विसोबा खेचर's picture

8 Dec 2007 - 10:34 pm | विसोबा खेचर

ज्याची अन्नावरची वासना उडाली आहे, ज्याला भूक लागत नाही, जेवण जात नाही अशा माणसाने जर हा लेख वाचायला घेतला तर वाचता वाचताच त्याचा जठराग्नी प्रदीप्त होत जाईल.लेख वाचून संपल्यावर तो एखाद्या चांगल्या हॉटेलात जेवण्यासाठी धाव घेईल. असे या लेखात शब्दसामर्थ्य आहे.

वा! वरील ओळी हीच मी या लेखाची पावती समजतो! धन्यवाद यनावालाशेठ...

पण अनुभव शब्दबद्ध करण्यासाठी प्रेरणा लागते. ती त्यांना पु.लं. कडून मिळाली.

अगदी खरं, गुरूशिवाय विद्या नाही! गुरूच्या आशीर्वादाशिवाय संगीत, चित्र, शिल्प, नाट्य, लेखन इत्यादी कुठल्याही कलेचा उत्तम अविष्कार करणे शक्य होत नाही. भाईकाकांचा माझ्यावर नेहमीच वरदहस्त राहावा आणि माझ्याकडूनही काही चांगलंचुंगलं लेखन व्हावं असं वाटतं!

असो...

आपला,
(आभारी) तात्या.

मितभाषी's picture

18 Mar 2013 - 4:40 pm | मितभाषी

प्रतिक्रियेतल्या शब्दा शब्दाशी सहमत.

भावना कल्लोळ's picture

18 Mar 2013 - 5:16 pm | भावना कल्लोळ

तात्याची हि पोस्ट पुन्हा एकदा मिपा वर वाचुन छान वाटले, गूगल वर तात्याचा ब्लोग सापडला होता, तो वाचायला लागल्या पासून मी तात्याच्या लिखाणाची "Die Hard Fan" झाली आहे.

प्रसाद गोडबोले's picture

18 Mar 2013 - 5:31 pm | प्रसाद गोडबोले

भुक लागली लेख वाचुन !!

एकदा समर्थ भोजनालयात चक्कर टाकायलाच हवी आता !!