पहिली फ्लाइट . . . . . . जरा हटके

स्वीट टॉकरीणबाई's picture
स्वीट टॉकरीणबाई in जनातलं, मनातलं
28 Apr 2016 - 10:13 am

माझी मुलगी पुनव कमर्शियल पायलटचं शिक्षण घ्यायला मेलबर्न, ऑस्ट्रेलियाला गेली होती. त्यांच्या कोर्सच्या दरम्यान कुठलीशी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना प्रवासी घेऊन जाण्याची परवानगी मिळते. तशी तिला मिळाली. बरोबर शिकणारे इतर विद्यार्थी एकमेकांबरोबर प्रवासी म्हणून बसायला उत्सुक असतातच. पण तिनं ठरवलं होतं की तिची पहिली पॅसेंजर बनण्याचा मान तिच्या आईला (म्हणजे मला) द्यायचा. मलाही तिच्या ह्या निर्णयाचं कौतुक वाटलं. (मुली लहानपणीच घरातनं बाहेर पडल्या की त्यांच्या बद्दल वाटणारी काळजी आणि कौतुक, दोन्ही जरा निष्कारण अतीच असतं.) तिच्या क्रिसमसच्या सुट्टीत मी तिला भेटायला जाणारच होते. त्याप्रमाणे गेले.

आम्ही तिच्या फ्लाईंग क्लबवर पोहोचलो आणि तिथल्या विमानांचा छोटा आकार बघून मी चरकलेच ! वारा नाममात्र होता तरी सगळी विमानं बांधून ठेवली होती आणि जागच्या जागीच हलत डुलत होती ! विमान हे दळणवळणाचं सगळ्यात सुरक्षित साधन असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं ती विमानंच वेगळी! इतक्या छोट्या विमानात बसण्याची माझी पहिलीच वेळ. पहिली आणि शेवटची. मी तिथल्या तिथे ठरवून टाकलं.

असं म्हणतात सौंदर्य सापेक्ष आहे. खरं तर प्रत्येक गोष्टच सापेक्ष आहे. ज्या विमानांचे पुनवनं पाठवलेले फोटो मी कौतुकानं बघत असे, ती प्रत्यक्षात बघितल्यावर आकारानं मला आपल्या गावाकडच्या जत्रेच्या स्टुडिओत फोटो काढायला बनवलेली असतात तेवढी छोटी वाटली!

पण चेहर्यावर भीती दाखवून चालणार नव्हतं. मी एक स्मितहास्य चिकटवलं आणि पुनवच्या मागोमाग नाखुषीनीच जायला लागले. विमान नेण्याआधी पायलटला कागदी घोडे नाचवावे लागतात. त्यात काहीतरी अडचण आली. शिवाय भयानक उकडत होतं. पुनवची चिडचिड झाली. मला आशेचा किरण दिसला! “अगं आज जाऊ दे. पुन्हा कधीतरी येऊ.”

“छे छे! मी खूप दिवसांपूर्वीच बुक केलंय विमान. मिळणार कसं नाही बघतेच.”

प्रत्येक स्त्रीला आपले हक्क स्वतःच मिळवावे लागतात. ते सहजासहजी मिळत नाहीत हे मी तिला नेहमीच शिकवत आले होते. ते उगीच शिकवलं असं क्षणभर वाटलं. पण मग स्वतःचीच लाज वाटली. शेवटी एकदाचं विमान मिळालं आणि आम्ही दोघी आत बसलो.

“एखादी चक्कर मारू आणि लगेच लँड करू.” मी. चिकाटी माझ्या स्वभावातच आहे.

“हॅह! दोन तासांकरता घेतलंय प्लेन.” पुनव.

“दोन तास???” माझा आवाज मलाच ओळखला नाही. लगेच खाकरून सावरून घेतलं. खर्जात बोल, खर्जात बोल – स्वतःला बजावलं.

स्त्रीहक्कांचा अतिरेक झालेला होता.

“लांब भटकून येऊ. आणि कसलं हॉरिबल उकडतंय! पाच हजार फुटांवर बघ कसं थंड वाटतं ते.” पुनव.

“ऑ!!!” मी विचार करण्याआधीच तोंडातून बाहेरच पडलं. उद्गारवाचक चिन्हांसकट.

लांब? उंच? पाच हजार फूट? पाच हजार फुटांवर जायचं असेल तेव्हां मी माझी जाईन की महाबळेश्वरला. तो विचार आला आणि आठवलं की घाटात आमची गाडी गरम झाली म्हणून ‘आ’ वासून उभी ठेवायला लागली होती. विमानाचं इंजिन तर गाडीहून लहान वाटत होतं. कसं होणार! वर स्वीट टॉकर फोनवर म्हणणार, “तुला पुनवबरोबर भटकायला मिळतंय ना? यू आर सो लकी!”

डोकं आणि काळीज यांच्यात वाद सुरू!

“कशालाही न घाबरणारी तू, तुझी अशी अवस्था कशी झाली?”

“ही एवढीशी मुलगी, तिची प्रत्येक अ‍ॅक्टिव्हिटी – अभ्यास, खेळ, मित्रमैत्रिणी, ट्रेकिंग, स्वयंपाक, कपडे खरेदी, ड्रायव्हिंग - सगळ्यांमध्ये माझादेखील सहभाग असायचा. कधी प्रत्यक्ष, कधी अप्रत्यक्ष. माझा अनुभव तिच्याहून प्रत्येक बाबतीत जास्त होता. ती देखील निर्णय घेताना माझ्या नाहीतर तिच्या बाबाच्या मताचा विचार करायची. आता ‘कॉकपिट’मध्ये तर माझा अजिबात उपयोग नाही. वर बर्यापैकी वजनच. आणि इथे तिनं घेतलेल्या निर्णयांवर आमच्या दोघींचे जीव अवलंबून! एकोणीस वर्षाची तर आहे. घेता येतील तिला अचूक निर्णय?”

“तिच्या शिक्षकांनी तिला विमानाची पूर्ण जबाबदारी दिली आहे, ती तिची तयारी बघूनच ना?”

“पाश्चात्त्य देशातल्या शिक्षकांचं काय? सोळा वर्षांपुढील मुलं म्हणजे मोठीच समजतात इकडे!”

“प्रश्न वयाचा नाहीये. जरी विद्यार्थी तीस वर्षांचा असला तरी त्याची व्यवस्थित तयारी झाल्याशिवाय त्याला एकटा कधीच सोडत नाहीत. त्यातून पॅसेंजर घेऊन तर नाहीच नाही.”

उफ्फ !!

मन चिंती ते वैरी न चिंती! नशीब, पुनवचे ‘प्री-फ्लाइट चेक्स’ चालले होते. माझी घालमेल तिला लक्षातच आली नाही. माझी सीट बरीच खाली होती त्यामुळे मला बाहेरचं नीट दिसत नव्हतं. पण मला त्यात अजिबात रस नव्हता. कधी एकदा फ्लाइट सुखरूपपणे संपते याच्याचकडे डोळे लागलेले. टेक ऑफ करण्याआधीच!

“आई, तू रिलॅक्स हो आणि मजा बघ.”

“हो. हो. अगदी रिलॅक्स्ड आहे.” प्रश्न संपण्याआधीच उत्तर देऊन मोकळी झाले! मग लक्षात आलं, तिनं प्रश्न विचारलाच नव्हता. विधान केलं होतं.

माझ्याही डोक्याला हेडफोन लावले होते. कंट्रोल टॉवरमधला ऑस्ट्रेलियन त्याच्या अगम्य इंग्रजीत काहीतरी बोलला. त्यात मला ‘गो, डिपार्ट किंवा बायबाय’ असे माहितीतले शब्द काहीच ऐकू आले नाहीत. पण पुनव म्हणाली, “ओके मॉम, लेट्स गो!” काहीतरी होऊन आमची फ्लाइट रद्द होण्याची उरलीसुरली आशा मावळली.

विमान रनवेवर धावायला लागलं. भरपूर आवाज आणि थरथराट! आवंढा गिळायचा प्रयत्न केला; पण शक्य नव्हतं. तोंडाला भयंकर कोरड पडली होती. आता उडेल, मग उडेल, टेक ऑफच होई ना! दोघींचं मिळून वजन विमानाला फार तर नसेल झालं? मान न वळवता डोळ्यांच्या कोपर्‍यातून पुनवकडे बघितलं. ती आरामात होती. बहुदा माझाच वेळेचा आणि अंतराचा अंदाज चुकला असावा. शेवटी उडालं एकदाचं.

तशी मी पटकन् सावरते. माझा श्वास चालू झाला, सीटमध्यी रुतलेली नखं बाहेर आली, पोटातला गोळा देखील कमी झाल्यासारखं वाटलं. अचानक विमान माझ्या बाजूला कललं! आता मात्र मी चटकन् मान वळवून पुनवकडे बघितलं. ती शांतच होती. तिनीच वळवलं असावं.

आता मला माझ्या खिडकीतून नको तितकं दिसायला लागलं! माझ्या बाजूचं दार जर उघडलं तर मी सरळ खालीच की! समोर बघितलं तर क्षितिज तिरपं ताकडं. परमेश्वरा!!

“आई, आपलं घर दिसतंय?”

“कुठे आहे?” तोंडातून प्रश्न बाहेर पडला अन् लगेचच मूर्खपणाचा पश्चात्ताप झाला. मला नीट दिसावं म्हणून विमान आणखी तिरपं!

मी खिडकीकडे तोंड करून डोळे घट्ट मिटून घेतले. नखं पुन्हा सीटमध्ये रुतली. “हो! हो! दिसलं दिसलं.”

“केवढंस्सं दिसतंय ना! तरी आपण फक्त एक हजार फुटांवर आहोत.” पुनव.

“तरीच मला दरदरून घाम फुटला आहे. नाही का? थंड तर पाच हजार फुटांवर वाटणार आहे!” असा विचार माझ्या डोक्यात आला आणि माझ्या विनोदाचं मलाच हसू आलं.

मी डोळे उघडून पुनवकडे बघितलं. शांतपणे विमान चालवत होती. व्हील हलक्या हातात धरून बारीक बारीक अ‍ॅडजस्टमेंट्स हातांनी आणि पायांनी सहजपणे करत होती, मला अजिबात न कळणार्‍या इंग्रजीत कंट्रोल टॉवरबरोबर संभाषण करंत होती. मी तिच्याकडे पाहातिये हे लक्षात आल्यावर माझ्याकडे बघून हसली. दिव्याचं बटण दाबावं आणि अंधार खाडकन् नाहिसा व्हावा तशी माझी भीती गायब झाली.

माझं मन क्षणात सोळा वर्षं मागे गेलं. पुनवच्या शाळेचा पहिला दिवस संपला होता. तिला घरी नेत होते. मी उजवीकडे होते. व्हीलवर. ती छोटुकली डावीकडे. नेहमी बडबडणारी आता मात्र काही बोलत नव्हती. तिच्या बालमनात काय चाललं असेल असा विचार मी करंत होते. आईनं एकदम अनोळखी लोकांत सोडलं म्हणून रागावली असेल का? का घाबरली असेल? मी तिच्या डोक्यावरून हात फिरवल्यावर माझ्याकडे बघून खुदकन् हसली होती.

आजही आम्ही तशाच बसलो होतो. पण आज व्हील डावीकडे होतं. तिच्या हातात. मात्र हे व्हील माझ्यापेक्षा खूपच जास्त जबाबदारीचं होतं. हे हाताळायला जास्त कौशल्याची तर जरूर होतीच पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे, जर का चूक झाली तर त्याचे परिणाम जबरी असणार होते. पण त्याला तिची तयारी होती.

माझ्या पाखराच्या पंखात बळ आलं होतं आणि हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं.

मी थांबवण्याआधीच दोन अश्रू खळकन् निखळलेच! ओठ घट्ट मिटून आवंढा गिळला. तिला दिसू नये म्हणून मी खिडकीतून बाहेर बघायला लागले.

आता पाच हजार फुटांवरच काय, जर ती व्हीलवर असेल तर पाचही खंडांवर जायला मी तयार होते!

कथाविनोदसमाजkathaaप्रवासविचारलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

28 Apr 2016 - 10:28 am | श्रीरंग_जोशी

हा अभिमानाचा प्रसंग आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या कन्येला खूप शुभेच्छा.

संजय पाटिल's picture

28 Apr 2016 - 10:31 am | संजय पाटिल

हसता हसता एकदम काळजाला भिडनारं...

पिलीयन रायडर's picture

28 Apr 2016 - 10:32 am | पिलीयन रायडर

किती प्रचंड सुंदर लिहीलय!!!!!

माझा मुलगा कविता म्हणण्याच्या स्पर्धेत पहिला आला तर मी दिवसभर आनंदात तरंगत होते!! तुमची मुलगी विमान चालवतेय हे बघताना तुम्हाला किती किती अभिमान वाटला असेल?!!!!

फार फार आवडला हा लेख!

आणि हो.. पुनव नावही खुप गोड आहे!

एस's picture

28 Apr 2016 - 10:43 am | एस

+१.

मस्तच लिहिलंय, नात्याचे बंध खरच अनेकपदरी. मनापासून लिहिलेले मनाला भावतातच.

आदूबाळ's picture

28 Apr 2016 - 10:50 am | आदूबाळ

छान. खूपच छान.

mugdhagode's picture

28 Apr 2016 - 11:00 am | mugdhagode

हे खरे आहे की स्वप्न ?

वेल्लाभट's picture

28 Apr 2016 - 11:01 am | वेल्लाभट

बापरे. इतकं सुरेख लिहिलंय हे तुम्ही की तुम्हालाही कल्पना नसावी. मनातले भाव, मधेमधे स्वत:शी केलेले संवाद, पुनवशी झालेले संवाद, सगळं इतक्या नाजुकपणे गुंफलंयत की धागा वाचता वाचता मलाही हवेत असल्यासारखं वाटत होतं.

निव्वळ अप्रतिम.

बाकी तुमच्या मनातल्या भावनांबद्दल काय बोलावं कळत नाही. पण तुम्हाला काय वाटलं असेल क्ल्पना करायचा प्रयत्न करतो.

पुनवला आणि तुम्हालाही अशा अनेक भरार्‍यांसाठी शुभेच्छा !

ब़जरबट्टू's picture

28 Apr 2016 - 1:38 pm | ब़जरबट्टू

निव्वळ अप्रतिम लिहिलेय...
खुशखुशीत तरी शेवटी डोळ्याच्या कडा ओल्यावल्याच..
पुलेशु...

खेडूत's picture

28 Apr 2016 - 1:56 pm | खेडूत

+१

काय सुरेख लिहीलंय...!

मोदक's picture

29 Apr 2016 - 12:06 pm | मोदक

सुरेख लिहीलंय...! +१११११

असंका's picture

28 Apr 2016 - 11:02 am | असंका

काय हिंदोळे....!!
जबरदस्त!

धन्यवाद!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Apr 2016 - 11:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भावनिक चलबिचल डोळ्यासमोर उभी राहीली. सुरेख शब्दचित्रण. मधेच असलेला खुसखुशीतपणा आवडलाच.
जियो. कधी कधी प्रतिसादातही काहीच लिहु नये असं.

दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

28 Apr 2016 - 11:38 am | प्रचेतस

उत्कृष्ट लेखन.

आई आणि लेक यांच्या भूमिकांची अदलाबदल किती नेमक्या शब्दात उतरवली आहे !

क्रेझी's picture

28 Apr 2016 - 12:49 pm | क्रेझी

+१

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Apr 2016 - 11:22 am | कैलासवासी सोन्याबापु

अप्रतिम !!!

पूर्वाविवेक's picture

28 Apr 2016 - 11:35 am | पूर्वाविवेक

खूप सुंदर, सहज, मनाला भिडणारं लेखन.
एकाच वेळी किती अनुभव घेतलेत तुम्ही! अभिमान, कौतुक, भीती, कुतूहल, अविश्वास-विश्वास अश्या सगळ्याच भावनांची सरमिसळ झालीय.
पुनवला जीवनातील अनेक भरार्‍यांसाठी शुभेच्छा !

मी-सौरभ's picture

28 Apr 2016 - 11:37 am | मी-सौरभ

आवडल्या गेले आहे

विटेकर's picture

28 Apr 2016 - 11:46 am | विटेकर

काय झकास लिहिलय !
पण अजून लिहा की , ५००० फूटावर गार वाटले की नाही ?

गवि's picture

28 Apr 2016 - 11:50 am | गवि

उत्कृष्ट अनुभव.

त्यांनाही इथे लिहायला सांगा ना अनुभव.

टवाळ कार्टा's picture

28 Apr 2016 - 12:07 pm | टवाळ कार्टा

साधे सोपे सरळ तरी मस्त :)

शरभ's picture

28 Apr 2016 - 12:11 pm | शरभ

अगदी मस्त अनुभवकथन. सुरेख लिहीलय.

प्रमोद देर्देकर's picture

28 Apr 2016 - 12:18 pm | प्रमोद देर्देकर

अप्रतिम , पहिले तुमची उडालेली त्रेधातिरपिट आणि त्यातुन निर्माण झालेला विनोदी लेख नंतर हळवा करुन गेला.
आणि पुनवला जीवनातील अनेक भरार्‍यांसाठी शुभेच्छा !

कानडाऊ योगेशु's picture

28 Apr 2016 - 12:22 pm | कानडाऊ योगेशु

तुमची लिखाणाची शैली सुरेख आहे. प्रत्यक्ष तुम्ही घेतलेला अनुभव वाचकालाही अनुभवायला लावता!

नपा's picture

28 Apr 2016 - 12:32 pm | नपा

दोघींसाठी अभिमानादास्पद हवाई अनुभव.....अप्रतिम

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Apr 2016 - 12:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर मनोगत ! खुसखुशीत भाषेत हृद्य प्रसंग सांगण्याची विरळ हातोटी आहे तुमच्याकडे !

लिहीत रहा. अजून काही वाचायला नक्की आवडेल.

राजेंद्र मेहेंदळे's picture

28 Apr 2016 - 12:43 pm | राजेंद्र मेहेंदळे

आई मुलीचे नाते हळुच पायलट आणि प्रवासी मध्ये बदलत गेलेले बघुन मजा वाटली. बाकी शेवट एकदम जबरदस्त जमलाय. तुमच्या कन्येला पुढील करीयर साठी शुभेच्छा!!

मस्त लेख आणि विमानाची इतकी जबरदस्त सफर घडवून आणल्याबद्दल आभार :) असेच अजुन अनुभव लिहीत रहा :)

विवेक ठाकूर's picture

28 Apr 2016 - 1:03 pm | विवेक ठाकूर

वेगळा अनुभव आणि सुरेख मांडणी.

नीलमोहर's picture

28 Apr 2016 - 1:09 pm | नीलमोहर

अप्रतिम लेखन आणि 'पुनव' हे नावही किती सुरेख !!

स्वीट टॉकरीणबाई's picture

28 Apr 2016 - 1:32 pm | स्वीट टॉकरीणबाई

सर्वजण,
फार फार धन्यवाद. माझ्याकडून आणि पुनवकडून सुद्धा.
पिलियन रायडर – अभिमान वाटला यात शंकाच नाही. मात्र ती ‘पायलट झाली’ या पेक्षा सुद्धा तिनी शाळेत असतानाच “मी पायलट होणार” असं निक्षून सांगितलं आणि ते कधी बदललं नाही याचा अभिमान वाटला.
पौर्णिमेचा जन्म म्हणून नाव ‘पुनव’.
मुग्धागोडेताई – खरे. ती आता ‘गो एअर’ कंपनीत पायलट आहे.
वेल्लाभट – “बापरे. इतकं सुरेख लिहिलंय हे तुम्ही की तुम्हालाही कल्पना नसावी.” तुमच्या या कौतुक करण्याच्या हटके शब्दप्रयोगावर मी आणि स्वीट टॉकर खूप हसलो.
तुम्हाला नाही. तुमच्याबरोबर हसलो.
वेगळ्या शब्दांनी भावना पोहोचविल्यात!
डॉ. बिरुटे सर – मग आम्हाला कळणार कसं की तुम्हाला आवडलं आहे ते!
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद!

मधुरा देशपांडे's picture

28 Apr 2016 - 1:42 pm | मधुरा देशपांडे

अतीव सुंदर लेखन. अप्रतिम.

अंतरा आनंद's picture

28 Apr 2016 - 1:43 pm | अंतरा आनंद

सुंदर आणि मनाला भिडणारा अनुभव नेमक्या शब्दात.
नुकतीच दहावीची परिक्षा दिलेली माझी मुलगी हल्लीच ट्रेनने एकटी जायला लागली. जी काही दिवसांपूर्वी क्लास ते घरापर्यंतचा पाच मिनिटांचा रस्ताही मोबाईलवर माझ्याशी बोलत कापायची, तिने काल मला फोनही न करता गूगल मॅप्सच्या मदतीनं जाण्याचं ठिकाणं शोधलं. त्यामुळे तुमची आधीची तगमग आणि नंतरचं डोळ्यातलं पाणी नीटच समजलं. शेवटी माझ्याही डोळ्यात पाणी आलं.
तुमची पूनव अशीच नवनवीन क्षितिजं गाठू दे या शुभेच्छा.

त्रिवेणी's picture

28 Apr 2016 - 1:49 pm | त्रिवेणी

प्रचंड सुंदर लिहिल आहेत.
मला आयुष्यात ज्या थोड्या गोष्टींची भीती वाटते त्यात विमान आहे. पुढच्या महिन्यात पहिल्यांदा विमनाने प्रवास करणार आहे(जाहिरात) त्याचे टेंशन टिकट बुक केल्या दिवसापासून आलय मला.

पद्मावति's picture

28 Apr 2016 - 2:02 pm | पद्मावति

अप्रतीम लेखन!!

स्वप्नज's picture

28 Apr 2016 - 2:11 pm | स्वप्नज

खुपच छान...

भम्पक's picture

28 Apr 2016 - 2:15 pm | भम्पक

अहो हसवता काय ....मनातल्या खळ बळीत आम्हालाही शरीक करून घेता काय आणि शेवटी राहिलेली कसर म्हणून वर रडवता काय....hats ऑफ तुमच्या लेखनशैलीला....

विजय पुरोहित's picture

28 Apr 2016 - 2:32 pm | विजय पुरोहित

सुंदर... अगदी तुफान विनोदी लिहिलंय.
पण शेवटी हसता हसता एकदम काळजाला स्पर्शून गेलं...

दिपक.कुवेत's picture

28 Apr 2016 - 2:33 pm | दिपक.कुवेत

जब्राट अनुभव आणि लेखन सुद्धा. खुप दिवसांनी निखळ लेख वाचला.

अनिरुद्ध प्रभू's picture

28 Apr 2016 - 2:42 pm | अनिरुद्ध प्रभू

सुरेख अनुभव..........तेवढीच अप्रतिम मांडणी..

रिम झिम's picture

28 Apr 2016 - 2:45 pm | रिम झिम

अतिशय सुंदर...

वैभव जाधव's picture

28 Apr 2016 - 2:56 pm | वैभव जाधव

छान लिहिलंय...

सुजल's picture

28 Apr 2016 - 3:01 pm | सुजल

खूप छान :)

सतिश गावडे's picture

28 Apr 2016 - 3:17 pm | सतिश गावडे

वाह... खुप सुंदर लिहिलंय. शेवट खुप हळवा केला आहे.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

28 Apr 2016 - 3:17 pm | भाग्यश्री कुलकर्णी

अप्रतीम लेखन. हसता हसता डोळ्यात पाणी आले.

होकाका's picture

28 Apr 2016 - 11:40 pm | होकाका

+१ ... जब्बरदस्त लिहिलंय !!

अप्रतिम लिहिलंय.हे तुम्ही आधी फेसबुक लिहिलं होतं का? मी यापूर्वी हे वाचलंय.

उल्का's picture

28 Apr 2016 - 4:13 pm | उल्का

अभिमान, भीती, कौतुक अशा भावनंचे 'विनोदी' कोलाज मस्तच! अगदी डोळ्यांसमोर उभा केलात तो प्रसंग.
माझी लेकही आता मोठी झाल्यामुळे शेवटचा भाग अगदी पटला.

स्मिता चौगुले's picture

28 Apr 2016 - 5:03 pm | स्मिता चौगुले

अप्रतिम !!!

जेपी's picture

28 Apr 2016 - 5:55 pm | जेपी

लेख आवडला..

बबन ताम्बे's picture

28 Apr 2016 - 6:18 pm | बबन ताम्बे

ओघवती आणि खुसखुशीत लेखणशैली.

अनुप ढेरे's picture

28 Apr 2016 - 6:25 pm | अनुप ढेरे

सुंदर लिहिलय! खूप आवडला लेख.

किलमाऊस्की's picture

28 Apr 2016 - 7:56 pm | किलमाऊस्की

छान लिहिलंय.

रेवती's picture

28 Apr 2016 - 8:06 pm | रेवती

लेखन आवडलं.

शान्तिप्रिय's picture

28 Apr 2016 - 8:13 pm | शान्तिप्रिय

तुअसआ
तुमचे अनुभव सम्रुद्ध आहेत.
असेच लिहा.

स्वीट टॉकरीणबाई's picture

28 Apr 2016 - 9:15 pm | स्वीट टॉकरीणबाई

सर्वजण,
पुन्हा धन्यवाद!

अजया - फेसबुकवर नसेल. मी फेबु वर कार्यरत नाही. चार पाच वर्षांपूर्वी हा लेख 'सकाळ' मध्ये छापून आला होता.
शिवाय 'मायबोली'वर देखील टाकलेला आहे. यापैकी एके ठिकाणी तुमच्या वाचण्यात आला असेल.

मी हा लेख माबो वर वाचला होता. तिथे वामा असते त्यामुळे प्रतिसाद दिला नाही. पण आज पुन्हा वाचताना देखील त्याच संमिश्र भावना अनुभवल्या. मला मुल नाहीये सो आईचा अनुभव मला नाही पण मी लहान असताना , माझ्या महत्त्वाच्या टप्प्यांवरची आईबाबांची धुसर नजर आज पुन्हा एकदा आठवली. अप्रतिम लेख !! तुम्ही दोघे मिपाला अचानक सापडलेला गोड खजिना आहात.

स्रुजा ला १०००००० वेळा बाडीस , मिपाला अचानक सापडलेला गोड खजिना आहात. :)

रातराणी's picture

28 Apr 2016 - 9:39 pm | रातराणी

अप्रतिम!!

जव्हेरगंज's picture

28 Apr 2016 - 10:06 pm | जव्हेरगंज

तुम्ही एकदम कसलेल्या लेखिका वाटताय !

जबरदस्त !!!

स्त्रीहक्कांचा अतिरेक झालेला होता. >> :D फार सुरेख लिहिलंय!

तुषार काळभोर's picture

29 Apr 2016 - 6:16 am | तुषार काळभोर

हळूच काळजाला भिडणारा अनुभव!

एक एकटा एकटाच's picture

29 Apr 2016 - 7:02 am | एक एकटा एकटाच

आवडलं

मुक्त विहारि's picture

29 Apr 2016 - 8:19 am | मुक्त विहारि

एक पालक म्हणून तर जास्तच मनाला भिडला.

देशपांडे विनायक's picture

29 Apr 2016 - 9:12 am | देशपांडे विनायक

अशा वेळी घर कुठूनही दिसते हो
फार सुंदर लिहिले आहे

स्वीट टॉकरीणबाई's picture

29 Apr 2016 - 10:08 am | स्वीट टॉकरीणबाई

सर्वजण,
धन्यवाद.
सुजा - आम्हाला 'गोड खजिना' म्हणून लाजवता आहात. "तिथे वामा असते" याचा अर्थ मला समजला नाही.
जव्हेरगंज - कसलेली वगैरे काही नाही. खरं तर तुम्ही आणि बाकी कित्येक लेखक जे फिक्शन लिहिता त्यांचं मला कौतुक वाटतं. फिक्शनला कल्पनाशक्ती खणखणीत लागते आणि शब्दसंपत्ती देखील. इथे ते काहीच लागत नाही.

ब़जरबट्टू's picture

29 Apr 2016 - 10:17 am | ब़जरबट्टू

वामा - वाचनमात्र..
म्हंजी नो प्रतिसाद, नो वाद .. :)

नाखु's picture

29 Apr 2016 - 10:36 am | नाखु

वाचनखूण साठवली

आणि पंखात बळ देणार्या समर्थ मातेला आणि कर्तुत्ववान पिल्लाला अनेक शुभेच्छा !!!

पाल्कायनी नाखु.

ता.क. लेखन सहाय्यकांनी साहित्य सन्यास का घेतला आहे?

अपरिचित मी's picture

29 Apr 2016 - 10:36 am | अपरिचित मी

जबरदस्त लिहिलंय!!!
मलाच तुमच्या जागी बसल्या सारखं वाटलं... अप्रतिम !!!

केवळ_विशेष's picture

29 Apr 2016 - 12:16 pm | केवळ_विशेष

पावर बाज

मृत्युन्जय's picture

29 Apr 2016 - 12:32 pm | मृत्युन्जय

सुरेख लिहलय. मिपाला दोन चांगले लेखक मिळाले म्हणायचे स्वीट टॉकरांच्या रुपात.

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Apr 2016 - 12:47 pm | ज्ञानोबाचे पैजार

अतिशय आवडला अनुभव, आणि तो सांगण्याची शैली सुध्दा,
पैजारबुवा,

प्रास's picture

29 Apr 2016 - 4:02 pm | प्रास

सुंदर लिखाण!

ब्राव्हो!

सुधांशुनूलकर's picture

29 Apr 2016 - 5:38 pm | सुधांशुनूलकर

खूपच स्वीट्ट लिहिता.
दोन स्वीट टॉकर्स -- स्वीट रायटर्स -- तुम्ही दोघे मिपाला सापडलेला स्वीट खजिना आहात या सुजाच्या प्रतिसादाशी प्रचंड सहमत.

उगा काहितरीच's picture

29 Apr 2016 - 7:08 pm | उगा काहितरीच

मस्त लेख... मनापासून लिहीलेलं + पॉलिश्ड !

मेघना मन्दार's picture

3 May 2016 - 2:04 pm | मेघना मन्दार

वाह ..काय सुरेख लिहिलंय!!

चिगो's picture

3 May 2016 - 3:18 pm | चिगो

खुप सुंदर हृदयस्पर्शी लेख.. खुप आवडला..

बोका-ए-आझम's picture

3 May 2016 - 4:06 pm | बोका-ए-आझम

लेखनशैलीही मस्त! दुस-या एका स्वीट टाॅकरीणबाई - मंगला गोडबोलेंची आठवण करुन देणारी!

भारी फ्यमीली हाय तुमची. स्विट टॉकर जहाजावर, मुलगी विमानात.
बाकी भारीच लिहीलय तुम्ही , मस्त शैली, हसवता हसवता एकदम डोळ्यात पाणी आणलत.

अनिंद्य's picture

26 Mar 2018 - 1:57 pm | अनिंद्य

@ स्वीट टॉकरीणबाई,

हे आजच वाचलं. सॅक्रिन स्वीट !

'व्हील ऑफ टाईम' आणि 'व्हील ऑफ वेहिकल' दोन्हींचे आवर्तन खूप आवडले :-)

अनिंद्य

स्वीट टॉकरीणबाई's picture

27 Mar 2018 - 1:42 pm | स्वीट टॉकरीणबाई

@अनिंद्य - धन्यवाद! तुमच्या प्रतिसादाच्या निमित्तानी मी माझा लेख पुन्हा वाचला आणि सगळं पुन्हा अनुभवलं. पुन्हा धन्यवाद.