पाऊलखुणा....... (भाग - १)

सौरभ वैशंपायन's picture
सौरभ वैशंपायन in जनातलं, मनातलं
1 Sep 2008 - 6:19 pm

मे महिन्याच्या दिवसात, दुपारी जेवणात मोठ्ठ्या वाटित आमरस घ्यावा त्यात २ चमचे तुप सोडावे व तो ओरपावा, अशा साधारण ४ वाट्या पोटात गेल्या कि मग झकास अंधार होईल अश्या दारे-खिडक्या लावाव्यात. एक उशी जमिनीवर टाकावी. पंखा फुल्ल स्पिडवर करुन त्याखाली प्रफुल्ल मनाने आडवं व्हावं, म्हणजे खरंतर टेबलवर ’डिसेक्शनला’ आलेल्या बेडकासारखं तंगड्या ताणुन झोप घ्यायची, यासारखं सुख दुसरं नाहि. निदान मे महिन्याच्या टळटळित दुपारी तरी हि सुखाची इतपत हिरवळ देखिल खुप होते!

पण सुख बोचतं-बोचतं म्हणातात तसं काहिसं होऊन, घराच्या बाहेर सोडुन द्या, मी प्रत्यक्ष मुंबई बाहेर निघालो. मी-मिनल आणि अमित. व्याघ्र-गणनेसाठी कोयना धरणाजवळ. मुंबई-परळहुन रात्री १०:३०ला सातार्‍यासाठि निघालो. सकाळि ०४:४५ ला सातारा. गाडित अर्थात सुखाची झोप मिळालीच नाहि. परत कोयनानगरकडे जाणारी गाडि कधी?? यावर उत्तर मिळालं ०७:१५ म्हणजे किमान २ तास तरी "हरी-हरी". पण शेवटि थोडं फ्रेश होऊन सातारा S.T. कॅन्टिन मध्येच २ मिसळ/शिरा/उपिट आणि चहा हाणंल आणि गाडिची वाट बघत बसलो. शेवटि साधारण ०६:५०ला सातारा-रत्नागिरी गाडि लागली. हि कोयनानगरमार्गे जाते. त्याच गाडित बसलो. धावाधाव करुन जी जागा मिळवली होती ते आरक्षित होती - बोंबला!! पण ’जिसका कोई नहि होता उसका खुदा होता है!’ गाडित पाठिमागे आम्हाला ३ जागा मिळाल्याच ते देखिल पुढिल अडिच तास. आमच्याच शेजारी पंडित नावाचे गृहस्थ होते तेहि आमच्यासारखेच Tiger Census साठि जात होते.

हळु हळु गप्पांचा ओघ व्यंकटेश माडगुळकर-चित्तमपल्ली-गो.नि.दां. कडे वळला आणि मग आमच्या बाजुच्या सीट्वरुन एक मध्यम वयाचे गृहस्थ नाटकात संवाद म्हणत-म्हणत रंगमंचावर येतात तसे आमच्यात घुसले. आणि मग पुढले दिड तास ते किर्तन करत होते आणि आम्ही श्रवणभक्ती. त्यांना रत्नागिरीला उतरायचे होते म्हणुन त्यांच्याकडे आमच्यापेक्षा मोप वेळ होता. त्यांच बोलण चालु असताना मध्ये वाटायच कि आम्ही वाचलेल्या पुस्तकांची यादि त्यांना द्यावी निदान त्याने तरी ते गप्प बसतील. शेवटि कोणत्यातरी थांब्यावर ते चहा पिऊन आले, तदनंतर वर्तमानपत्रात डोकं खुपसलं म्हणुन निभावलं. अखेर कोयनानगरला पोहोचलो. गाडितुन उतरल्यावर एक व्यक्ती अमितपाशी आली आणि "Tiger Census" साठि आलात का? वगैरे विचारु लागले. तेहि त्याचसाठि आले होते, त्यांच आड्नाव डोईफोडे होतं. त्यांच्याबरोबर चिपळुणचे दोघेजण होते - दिक्षीत आणि काणे. त्यांच्याशी ओळख करुन घेतली. परत थोडं खाऊन आम्ही वन अधिकार्‍यांच्या कार्यालयाकडे कुच केले. ’मोहितेसाहेब’ आत आलेल्यांची नावे नोंदवुन घेत होते. अमीतला बघताच त्यांनी ’या मेंगळे’ करुन आत बोलावुन घेतलं. अमीत सलग चौथ्यावर्षी येत असल्यानं त्याला ते ओळखत होते. आम्हाला नंतर वाघाचे ठसे कसे घ्यायचे? कसे मोजायचे? ते कागदावर कसे उतरवायचे आणि सरते शेवटी त्यांचा साचा कसा तयार करायचा याची सीडीच दाखवली.

सीडी दाखावल्या नंतर आम्हाला मागच्या अंगणात नेले तिथे कोयनानगरचे प्रमुख अधिकारी नाईक साहेब बसले होते. त्यांनी माहिती द्यायला सुरुवात केली - "जंगलात सिगारेट, दारु, तंबाखु, बिडी, गुटखे हे प्रकार चालणार नाहित. जंगलातुन तुम्हाला काहिहि बाहेर नेता येणार नाहि, २५००० रु. चा दंड होईल तो वेगळाच. जंगलातल्या प्रत्येक काडिवर फक्त जंगलाचाच हक्क आहे. तुमचे ग्रुप लिडर जसे सांगतील तसेच वागा. स्वत:ची अक्कल लावु नका. एकटे-दुकटे विनाकारण झाडि-फांदितुन फिरु नका. वाघ-बिबट तुमची चाहुल लागताच लपतील, पण चुकुन अस्वल समोर आले तर मोजुन मिनीट्भरात तुमच्या बरगड्या मांसातुन मोकळ्या करेल. ते खाणार नाहि तुम्हाला, मात्र चोथा बनवुन फेकुन देईल. म्हणुन प्राण्यांना त्रास होईल असे वागु नका. तुम्ही पाहुणे आहात ते मालक आहेत, पाहुण्यांसारखेच वागा. तुम्हाला वाघाचे आणि बिबट्याचे ठसे मिळवायचे आहेत. आत्ता आत जसं दाखवलय तसे त्याचे साचे बनवायचे आहेत. कदाचित दोन वेगवेगळ्या खोर्‍यातल्या ग्रुप्सना एकाच वाघाचे ठसे मिळतील, काहि प्रॉब्लेम नाहि उलट आपल्याला वाघाचे क्षेत्र समजेल. आणि ज्यांच नशीब असेल त्यांनाच वाघ बघायला मिळेल. मी गेली ३२ वर्ष सर्विस करतोय महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जंगलात पण मला फक्त ३ वेळाच समोरा-समोर वाघ दिसलाय. फार बुझरं जनावर आहे ते. घाबरत नाहि पण समोर यायला लाजतं. म्हणून काळाजी घ्या परफ्युम्स-डिओ असल्या गोष्टि जवळ बाळागु देखिल नका, इथेच काढुन ठेवा. जंगल हे परफ्युम लावुन फिरण्याचं ठिकाण नव्हे. तुमचाच वास प्राण्यांना १-२ km पर्यंत सहज समजतो, त्यातुन डिओ वापरलेत तर जनावर दिसणं देखिल मुष्किल होईल. वाघ सोडाच दुसरा कोणताहि प्राणी देखिल दिसणार नाहि. आणि महत्वाची गोष्ट - झुंगटि, मालदेव, पाली, आणि बामणोली या ४ ठिकाणी वाघाचा ठसा मिळायलाच पाहिजे!!! ४६४ रनिंग km. च्या जंगलातुन तुम्हाला हे सगळं शोधायचं आहे. मेहनत घ्या नक्कि ठसा-विष्ठा मिळेल, किंवा म्हणालो तस नशीब असेल तर वाघ-बिबटहि बघायला मिळेल. आता इतर महत्वाच्या सुचना - कोणाला काहि गंभीर आजार? त्याची औषधे? सगळं व्यवस्थित आहे ना? कारण देव न करो पण कोणाला काहि झालेच तर तुमच्या मदतीसाठि यायला आम्हाला किमान ३ तास आणि परतीच्या प्रवासाला ३ तास असे ६-७ तास कोयनानगरला पोहोचायला लागतील. कोणाला दमा-ब्लड्प्रेशर असे त्रास असतील तर त्यांनी आत्ताच सांगा. त्यांना फिरण्या ऐवजी तितकेच दुसरे महत्वाचे काम देऊ! नंतर तुम्हा-आम्हाला त्रास नको. शिवाय आता रेडिओ-गाणी ८ दिवस विसरा, जंगलात मोठ्याने बोलायचे-हसायचे नाहि. कोणी इथे पिकनिक किंवा ट्रेकसाठि आलेलं नाहिये. हिमालयात ट्रेक केला याची मिजास इथे नकोय, इथल्या दगड-माती समोर टिकाव लागेल याशी शाश्वती नाहि. असो All the best!!"

आमच्या ७०-७५ जणांचे छोटे ग्रुप करुन कोयनेच्या वेगवेगळ्या खोर्‍यातले विभाग वाटुन दिले. आम्हाला "झुंगटि" विभाग आला होता. आमच्या तिघांबरोबर तेजस डांगरे हा चौथा भिडु देखिल दिला. शिवाय अभयारण्याची माहिती असलेला माहितगार माणुस आम्हा प्रत्येक ग्रुपला दिला. आमच्या ग्रुपचे लिडर होते - "बापू गुरव" पण ते कोयना नगरला आले नव्हते. ते आम्हाला लॉंच मधुन जाताना अवसारी सब-स्टेशनला भेटणार होते. यानंतर सगळे जेवायला पांगले. आम्हाला उन्हात चालत जाऊन हॉटेलमध्ये जायचा कंटाळा आला होता. म्हणुन मिनलने आणलेले ४-४ ठेपलेच आम्ही घश्याखाली उतरवले आणि गप-गुमान लॉंचकडे घेऊन जाणार्‍या जीपची वाट बघत बसलो. जवळपास दिड-दोन तास वाट बघावि लागली. मधल्या वेळेत आम्हाला एक काच, स्केच-पेन,मोठ्ठा प्लास्टिक मग, ट्रेसिंग पेपर्स, प्लॅस्टर ऑफ पॅरीस आणि ७-८ किलोचा तांदुळ-तेल-मसाले असा शिधा दिला. आधीच आमच्याकडे सामान भरपूर त्यातुन काच आणि बरोबर ८ किलोचा शिधा. बर!!तो शिजवणार कशात हा आमच्या पुढिल यक्षप्रश्न होता, कारण आम्हि बरोबर भांडि आणलि नव्हती. पण मग मोहिते साहेबांनी अवसारी स्टेशनला नोरोप ठेवला कि बापू गुरवांबरोबर २ भांडि-पातेलि पाठवा. अखेर दोन तास उन्हात तिष्ठत काढल्या नंतर एक जीप्सी-जीप आली आणि म्हणता-म्हणता भरली देखिल. मला आणि तेजसला मागे लटकुन उभ रहावं लागलं. ५ मिनीटांचा वळण-वाटांचा रस्ता संपवुन "कोयना धरण" अशी पाटि लावलेल्या महाद्वारातुन आत गेलो. आत शिरताच उजव्या हाताला प्रचंड मोठ्ठे धरण आणि डावीकडे नजर जाईल तिथपर्यंत पाणीच-पाणी. भणाण वारा सुटला होता.

जीप थांबली तिथे समोर थोडं खाली ३-४ लॉंच लाटांवर डुलत होत्या. आम्हाला एका मोठ्या लॉंच मध्ये बसण्यास सांगितले त्यात ऑल्रेडि एक पुण्याचा ग्रुप बसला होता. आम्हि सामान आत टाकुन फतकल मारली. अजुन काहि ग्रुप आले कि निघु हे उत्तर आम्हि जवळपास दिडतास ऐकत होतो. आम्हि बसलेल्या ठिकाणी उन येत होत. अखेर एक-एक ग्रुप येऊ लागला. आम्हि मांडि सोडुन शेवटि फोर्थ सीट वरती आलो. सामान आणि माणसं यांनी लॉंच खच्चुन भरली आणि सरते शेवटि संध्याकाळी ०५:१० ला आम्हि कोयनानगरचा किनारा सोडला. लॉंच पाण्याच्या मध्यभागी आल्यावर कोयनेचं पाणी आमच्या अंगावर उडु लागलं. अर्ध्या तासाने मात्र त्या अवघडुन गेलेल्या लॉंचचा आम्हाला कंटाळा येउ लागला. अधुन-मधुन मिनल-अमीत बरोबर गप्पा चालु होत्या. शिवाय पुण्याच्या त्या ग्रुप मध्ये २ मुली होत्या, त्यातली एक दिसायला चांगली होती! तेव्हढाच कंटाळा कमी करायला तिचा हातभार लागत होता. अखेर तासभर लॉंच गेल्यावर अवसारी आलं. तिथे २ माणसं लॉंच मध्ये चढली. त्यातच आमचे ग्रुप लिडर "बापू गुरव" होते.

साधारण साठिकडे झुकणारं वय, बारीकशी पण काटक अंगकाठि, काळा रंग, समोरचा एक दात पडलेला, अर्ध टक्कल आणि उरलेल्या केसांची चांदि झालेली एक मध्यम उंचीची मुर्ती ३-४ पिशव्या आणि खांद्याला बंदुक लावुन लॉंच मधे शिरली. लॉंच मधील गर्दी अजुन वाढली. त्यांनी बरोबर २ पातेली आणली आहेत हे कळल्यावर आमचा जीव त्याच २ भांड्यांमध्ये पडला एकदाचा. त्यापुढे जवळपास दिड-पावणेदोन तास लॉंच चालुच होती. लॉंचची अवस्था "स्वदेस" मधल्या त्या तराफ्या सारखिच झालि होती. अमितचे हे चौथे वर्ष असल्याने आम्हि त्याला त्याचे अनुभव विचारत होतो. अमित सांगत होता - "सर्वात महत्वाची गोष्ट म्हणाजे अर्ज विनंत्या करुन देखिल वर्षभर कोणालाहि आत सोडत नाहित. अशा ठिकाणी आपण ७ दिवस राहणार आहोत. इतक्या कोअर एरियात कोणालाच जाऊ देत नाहित. खुप घनदाट जंगलात आपण जाणार आहोत, जिथे सुर्याचे किरणहि जमिनीला स्पर्ष करु शकत नाहित. माहितगार माणासाशिवाय कोणी आत गेलाच तर वाट मिळणं कठिण आहे." लॉंच थांबली तेव्हा आम्ही ५ जण झुंगटि पश्चिमेला उतरलो. रात्रीचे साधारण ८ वाजले होते. अंधाऽऽऽर होता. आकाशात चंद्रकोर होती तितकाच काय तो प्रकाश. आम्हाला भरपुर खडकाळ भागात उतरवुन लॉंच निघाली. लॉंचचा दुर जाणारा आवाज आमचा एकटेपणा वाढवत होता. २-४ मिनीटात लॉंचचा आवाज ऐकु येईनासा झाला आणि... रातकिड्यांचा सुरु. नजर चंद्रप्रकाशाला सरावल्याने आता आजुबाजुचं थोडं थोडं दिसु लागलं होतं. तरी बॅटरीच्या प्रकाशात आम्ही आमचं सामान मोठ्या दगडा जवळ रचुन घेतले. खरंतर आमच्या बरोबर मिनल असल्याने आम्हाला सुरक्षीततेच्या दृष्टिने टॉवर दिला होता. पण बापूकाका म्हणाले "समोरच्या झाडितच आहे तो टॉवर, पण रात्री समोरची भुसभुशीत माती चढुन जाणं कठिण आहे! इतकं सामान त्यातुन हि बायडि बरोबर आहे, आज आपण उघड्यावर काढु, फटफटंलं कि जाऊ तिथं!!" तरी डोक्यात प्रश्नचिन्ह घेउन आम्हि त्यांना हो म्हणालो.

कोयनेचा बापू -
बापू गुरव त्या चंद्रप्रकाशात आम्हाला जंगलातले किस्से त्यांच्या गावरान भाषेत सांगत होते - "आमचा जनमच जंगलामधला, रात्री-बेरात्री सुदिक आम्हि इथं उठ-बस करतो. या बापू गुरवाला इथल्या समद्या वाटा माहित हायेत! उन-पाऊस काय पण फरक नाय पडत. जनावराचं पण भय नाय, कमरेला कोयता असला कि झाल. मी आत्ता बंदुक आणलिये पण ती नुसती आवाज करायला. पण त्याची गरजच नाय, माणसाची चाहुन लागली कि जनावर दुर जातं." आम्हि श्रवणभक्ती करतच होतो. ते ऐकता-ऐकता त्यांची तांदुळाची भाकरी आणि चटणी बाहेर आली आणि आमचे ठेपले. बापू चालुच होते "जनावरांत अस्वल लई येडं, खात नाय पण फाडुन टाकतं पाकं(पार)! मागं एकदा ३ बायड्यांना माज्यापाठि जंगल बघायला पाठिवल हुतं, हे दगड दिसतय? तसच गोल दगड होतं, त्यापाठि अस्वल अस्स बसलं हुत! एक बाई ओरडायला लागली पर म्या जरा बाजु-बाजुनं नेलं, ती एकच वाट हुती कारण, अस्वल बी न हलता बसुन र्‍हायल. बघा जनावर केव्हा काय करल न्हाय सांगु शकत!!" मध्येच पाण्याकडे बघुन म्हणाले - "या साली लई पाणे हाय! मागल्या वर्षी नव्हतं, तेव्हा पाणी पाकं खालि गेलतं, मग काय रातभर कधी अस्वलाची चाहुल, कधी बिबट्याची कधी रान डुकराची! यंदा भरपुर पाणी हाय, जनावराला जास्त खाली सरकायची गरज नाय!"
जेवण(?) झाल्यावर ते समोरच्या दगडामागे डोकावले आणि "अरे रे! लई चिखल हाय आत. हा दगड आतुन पोकळ हाय! ३ माणुस सहज झोपेल, शिवाय वर भोक पडलय, त्यामुळ कय शिजवलं तर धुर वरती निघुन जातु. पर यंदा साली पाणी भरपुर हाय म्हणून आत चिकल हाय! आता इथचं जरा साफ करुन झोपु, मी अस्सा थोडा वरच्या बाजुला झोपेल!" असं म्हणून ते तिथले गोटे साफ करु लागले. मी-अमित-तेजस त्यांना मदत करु लागलो ५ मिनीटात "झोपणेबल" जागा झाली एकदाची. स्लिपिंगमॅट जोडुन त्यावर चादर पसरली .... गाऽऽर वारा अंगाला झोंबत होता. मोजुन १० फुटांवर पाणी होते. "झोपा बिनधास्त!!" - इति बापू गुरव. त्यांनी त्यांचे अंथरुण पसरले, एक कांबळ घेतली नी आडवे झाले. आम्हाला काय डोंबल झोप लागणार? एकतर पाण्याच्या लाटांनी चुबुक-चुळबुक-चुबुक-चुळबुक असे आवाज येत होते, त्यामुळे सारखं पाण्यावर कोणीतरी जनावर आलयं असंच वाटायचं, मधुनच झुळकिने पाचोळा वाजायचा कि डोळ्यांवर आली-आली म्हणणारी झापडे जायची. शेवटी रात्री १०:३०-११:०० ला झोप लागली असावी. परत थंडिने जाग आली तो या क्षीतीजापासुन त्या क्षीतीजी पावतो सगळं आकाश लाख्खो तार्‍यांनी भरुन गेलं होतं, इतकं सुंदर आकाश मी ७-८ वर्षांपुर्वी भिवपुरीतच बघितलं होतं. घड्याळात बघितलं, साधारण २:३० होत होते. परत थंडि आण सावधपणा यामुळे तासभर त्या चांदण्या मोजण्यात गेला. परत डोळे मिटले. मधेच एक पक्षी आमच्या डोक्याशीच येउन ओरडायला लागला म्हणुन जिला कदाचित झोप म्हणता येईल अशी काहितरी अवस्था देखिल चाळवली गेली - तेजसने मोबाईलवर ०४:३०चा अलार्म लावला होता आणि साहेबांनी पक्ष्याचा आवाज अलार्म म्हणून ठेवला होता, इतके करुन साहेब डाराडुर आणि आम्हि तिघे टकटकित. परत पुढचा तास या कुशीवरुन त्या कुशीवर करण्यात गेला.

.
- सौरभ वैशंपायन.

वावरसमाजजीवनमानराहणीप्रवासभूगोलअनुभव

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

1 Sep 2008 - 6:42 pm | बहुगुणी

येऊ द्यात, वाट पहातोय.

यशोधरा's picture

1 Sep 2008 - 6:53 pm | यशोधरा

सहीच आहे अनुभव, पुढचं लिहा लवकर...

शितल's picture

1 Sep 2008 - 6:55 pm | शितल

पाऊलखुणा-२ लवकर वाचायला मिळु दे.
सुरूवात छान झाली आहे.
:)

विद्याधर३१'s picture

1 Sep 2008 - 7:19 pm | विद्याधर३१

अनुभवकथन आवडले....
पुढचा भाग लवकर येउ दे....
पु. ले. शु.
आपला
विद्याधर सह्यगिरीकर.

सुनील's picture

1 Sep 2008 - 7:19 pm | सुनील

लेख आवडला. पुढील भाग येउद्यात..

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

अनिल हटेला's picture

2 Sep 2008 - 12:51 pm | अनिल हटेला

येउ द्यात पुढील भाग !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

श्रीमंत दामोदर पंत's picture

2 Sep 2008 - 1:02 pm | श्रीमंत दामोदर पंत

पहिला भाग आवडला.........
सुरुवात फारच मस्त केली आहेत तुम्ही.....
पुढचा भाग लौकर येऊद्यात....:)

मेघना भुस्कुटे's picture

2 Sep 2008 - 1:28 pm | मेघना भुस्कुटे

जबराट आहे. लवकर लिहा पुढचा भाग. वाट पाहायला लावू नका..

सुमीत भातखंडे's picture

2 Sep 2008 - 1:42 pm | सुमीत भातखंडे

सही सुरुवात.
पुढचा भाग लौकर येऊद्यात. वाट पाहतोय

स्वाती दिनेश's picture

2 Sep 2008 - 5:32 pm | स्वाती दिनेश

सुरूवात तर एकदम थरारक झाली आहे,प्रत्यक्ष जंगलातले अनुभव तर किती रोमांचक असतील?
पुढचा भाग लवकर येऊ दे.
स्वाती

लिखाळ's picture

2 Sep 2008 - 7:51 pm | लिखाळ

मस्त अनुभवकथन आहे..
पुढचे भाग वाचण्यास उत्सुक आहे..

मी सुद्धा एकदा भीमाशंकरच्या रानात 'प्राणी गणनेसाठी' वनखात्याच्या योजनेमध्ये जाउन बसलो होतो ते आठवले.
--लिखाळ.

सौरभ वैशंपायन's picture

4 Sep 2008 - 5:00 pm | सौरभ वैशंपायन

खरतर आल्यावर फक्त पहिल्या ३ दिवसांचच लिखाण केलय कारण त्या ६ दिवसांत इतके अनुभव घेतले कि कोणत्या दिवशी कुठला अनुभव घेतला तेच नीटसं आठवत नव्हतं.

मात्र अमुक एका दिवशी कुठला/ले प्राणी बघितले याची यादि केल्यानी त्याचा फायदा होतोय. उरलेले २-३ दिवस नीट लिहुन काढीन.

दुर्गविहारी's picture

20 May 2016 - 5:49 pm | दुर्गविहारी

उद्या बुध्द्पौर्णिमा. त्यानिमीत्त धागा वर आणत आहे.