पाऊलखुणा....... (भाग - ३)

सौरभ वैशंपायन's picture
सौरभ वैशंपायन in जनातलं, मनातलं
7 Sep 2008 - 8:12 pm

दिवस दुसरा:

फटफटत होतं. अंगाभोवती पांघरुण कवटाळुन नुसते बसुन राहिलो. बसल्या जागेवरुन समोरचा किनारा दिसत होता, कोणी प्राणी दिसत आहेत का म्हणुन बघत बसलो होतो. अमित देखिल उगीचच तोंडावरुन पांघरुण घेऊन झोपला होता. दर २ मिनिटांनी तो कुशी बदलत होता. शेवटी बापूकाका उठले आणि खाली उतरले. टॉवरचं मॅनहोल उघडावं लागलं अर्थात त्यावर पसरलेल्या अमितला उठावं लागलं. पटापटा आवरुन ७ वाजता भटाकंतीला निघालो. अमितने बापूंना समोरचा डोंगर दाखवुन विचारले - "बापू, तो डोंगर कसला?" बापुंनी लांब हात पसरला - "त्यो? झुंगटिचा किल्ला!! कोणी नाय जात तिथं!" किल्ला शब्द ऐकल्यावर आमचे कान अपोआप टवकारले गेले. "चला मग जाऊन येऊ!!" - अमित. बापूंनी मानेनेच नाहि नाहि म्हणत सुरुवात केली - " काय बघायचयं? काय गावनार नाय!" पण अमितने त्यांना राजी केलं. चालता-चालता वरच्या फांद्यांवर माकड उड्या मारत होतं. अंऽऽ हं माकड नव्हे शेकरु होतं. शेकरु म्हणजे मोठि खार, मोठि म्हणजे मांजरी इतकि मोठि खार! आमचे पाय झुंगटि किल्ल्याकडे पडत होते. मधेच अमितने मिनलला विचारले - "मिनल लायटर कुठे आहे?" मिनलने खालचा ओठ बाहेर काढुन खांद्यावरच्या बॅगकडे अंगठा हलवला. " वा! म्हणजे अस्वल आलं तर काय टाईम प्लिज! म्हणुन बॅगमधुन लायटर काढणार आहे का?" - अमित. मी विचारले - " लायटरने अस्वलाला काय होणार? डोंबल?" त्यावर अमित उत्तरला अरे चटकन खालचा पाचोळा पेटवायचा कि ते पळुन जातं." एव्हाना मिनल तो लायटर काढुन तो पेटवायचा प्रयत्न करत होती, पण काहि केल्या तो पेटत नव्हता. अमित पुढे झाला आणि मिनलच्या खांद्यावर हात ठेवुन म्हणाला "घे काढला अस्वलाने तुझा कोथळा बाहेर!!" आम्हि सगळे खी-खी करुन हसलो. इतका वेळ बापू आमचे उद्योग बघत होते. "अहो! नाई काई होनार, आसं कसं अस्वल येईल उगाच?? माणसाला बघुन दुर जानार ते! आपन त्याच्या रस्त्यात आलो किंवा जखमी आसल तरच येड्यावानी अंगावर येतय!!

आम्हि परत बापूंच्या मागे चालायला सुरुवात केली. मध्ये मिनलला थोडि सुकलेली विष्ठा मिळाली. ती उचलुन तिने बापुंना विचारले हि कोणाची असेल? बापुंनी बरीक डोळे करुन बघितले - "हेऽऽऽ साळिंदराचं असणार!" आजुबाजुला चौकस नजर टाकत आम्हि पुढे झालो. आता चांगलाच चढ आणि रेताड जमिनीचा पट्ट सुरु झाला. खसाखसा पाय घसरत होते. मी सोडुन बाकि सगळ्यांकडे काठ्या होत्या. त्या आधारावर ते पुढे जात होते. मला काठिचा अडथळा वाटतो, म्हणूनच मी नव्हती घेतली काठि. शिवाय एका हातने मला कॅमेरा सांभाळायचा होताच. शेवटी चार जण बसतील इतपत जागा आली, तसे विसावा घेण्यासाठि थांबलो. पाण्याची देवाणघेवाण झाली. वरची झाड खसखसली परत ’शेकरु’. हे शेकरु बर्‍यापैकि धीट असतं. तो झाडाच्या शेंड्यावरुन खाली उतरत आमच्या डोक्यावरील फांदिवर आलं आणि आमच्याकडे बघु लागलं. अमित त्याचा फोटो काढणार तोच त्याने दुसर्‍या झाडावर उडि मारली आणि परत वरती झरझर निघुन गेलं. आम्हि देखिल पुढे कुच केलं. झुंगटीच्या त्या पट्ट्यात एक मोठ्ठ झाड लागलं. त्या झाडाच्या खोडात ३ जण सहज बसु शकतील इतकं मोठं खोड होतं आणि उंची म्हणाल तर आसपासची झाडं त्याच्या अर्ध्यावर देखिल पोचत नव्हती. त्या झाडाला बघुन उगीच माझे अष्टसात्विक भाव जागृत झाले. सगळं सोडुन त्या झाडाखाली तप करायला बसायचा मोह मला क्षणभर झाला. गौतम बुध्दाला देखिल त्या बोधीवृक्षाकडे बघुन असचं काहिसं वाटलं असेल कदाचित. अर्थात एखादि अप्सरा तपोभंग करायला येईपर्यंतच मी तप केले असते.....असो, तर सांगण्याचा मुद्दा असा - "पेड हो तो ऐसा, वरना ना हो!" ते झाड कॅमेराच्या कुठल्याहि अँगलच्या बाहेरचं होत याचं मला आजहि अतोनात दु:ख होतय.

शेवटी साधारण २ तास ते अंगावर येणारं रान तुडवल्यावर अचानक डोक्यावरचं छप्पर उडाल्यागत प्रकाश दिसला. आता सगळी खांद्या इतकी कारवी वाढली होती, ती पार सुकली होती. चालताना त्याच्या बीया कपड्यांवर लगटत होत्या. हि कारवी असते तिला सात वर्षातुन एकदाच फुले येतात. एका ठिकाणी बापु थांबले पलीकडे खो‌ऽऽऽल दरी दिसत होती - "हे, आपण सातार्‍यात नी समोरचे डोंगर रत्नागिरीतले. आपण दोघांच्या शीमेवर उभे र्‍हाईलो! आहोत!" मग बापु आमच्याकडे वळुन म्हणाले - " गेल्या १०० वर्सात प्राणी नी कातकरी सोडुन कोन बी आलं नसेल हिथं!" आम्हाला जवळपास अमेरिगो फर्डिनांडला अमेरीकेचा किनारा मिळाल्यावर जितका आनंद झाला असेल तितका आनंद झाला. रत्नागिरीतील त्या काळ्याकभिन्न पहडांना डोळ्यांत साठवत आम्ही शेवटचा टप्पा चढायला सुरुवात केली. वाटेवर मधे २-३ ठिकाणी ताजं शेण पडलं होतं. सगळ्यात पुढे जाणार्‍या अमितला बापु म्हणाले - "पुढं चाहुल घ्या, एखादा गवा असल, दिसला तर तसेच मागे फिरा! आल्या पावली निमुट वळुया!" पण सुदैवाने गवा नव्हता. आम्ही झुंगटीच्या किल्लावर पोहोचलो. पण तो किल्ला वगैरे काहि नव्हता नुसतेच पठार होते. साधारण १००X१५० फुटाचे असेल जेमतेम बाकि सगळा उतार आणि रखरखाट. आजुबाजुला आम्ही अंदाज घेतला पण बांधुन काढल्याची एकहि खुण आम्हाला मिळाली नाहि. जरा निराशा झाली पण आम्हि उजव्या हाताला खाली बघितले - कोयनेचा अख्खा झुंगटि भाग मी कॅमेरात बंद केला. फारच सुंदर दृष्य होते ते.

त्या पठारावर जाऊन दरीच्या टोकाशी फतकल मारली आणि बंद मोबाईल सुरु केले. घरी एक-एक फोन लावुन "अजुन तरी सुखरुप आहोत!" असा निरोप दिला. मग थोडं खाणं झालं. आदल्या रात्री एका भांड्यात मी घरुन आणलेले मुग-मटकि व सोयाबीन भिजत घातले होते. सकाळी निघताना मीठ घालुन बांधले होते. पौष्टिक ते पौष्टिक शिवाय तहान लागत नाहि. अशा दोन्हि सोयी भिजल्या कडधन्यात असतात. अर्धातास त्या पठारावर काढला. आमच्या समोर थोडासा उजव्या हाताला ३-४ डोंगर रांगा ओलांडुन ’वासोटा’ किल्ला आम्हाला खुणावत होता. साधारण १०:४५ ला आम्ही परतीला लागलो. खाली उतरताना परत शेकरुने दर्शन दिले. हा मगाशीच दिसलेला शेकरु असावा. साधारण ११:४५ ला आम्ही मुक्कामावर आलो. आज आंघोळ करायचीच हा निश्चय केला होता. उतरताना मी अमितला सुध्दा तयार केलं.

आम्हि मुक्कामावर पोहोचताच "चला पोहायला जाऊया!" या अमितच्या वाक्यावर चष्म्यावरुन बघत मिनल म्हणाली - "मला कांदे-बटाटे कापून द्या आणि मग जे करायचे आहे ते करा!!" आमच्या पोहण्याच्या उत्साहावर मिनलने अख्ख्या कोयनेचे पाणी फिरवले. नीमुटपणे १५-२० मिनीटे खुऽऽऽप काबाडकष्ट करुन कांदे-बटाटे चिरुन दिले, आणि...... पाण्याकडे धूम ठोकली - येऽऽऽऽऽधबाऽऽक!!! अडिच दिवसांनी आंघोळ होत होती. आधी घामाचे घाण कपडे व्यवस्थित धुवुन घेतले. वारा इतका भणाणा होता कि पिळुन कपडा आडवा घातला न घातला कि अर्धा वाळुनहि जायचा. कपडे-मोजे धुतल्यावर मग किमान पुढचा सव्व तास - " कोयना जळी खेळु खेळ कन्हैय्या काऽऽऽऽ लाजता??? सुरु होते. मी स्वत: दिड वर्षांनी असा भरपुर पाण्यात पोहायला उतरलो होतो. वा!वा!! तो सव्वा तास जे काहि पोहणे-डुंबणे झाले काय सांगावे? कोयना आमच्या तिर्थरुपांनी आम्हाला आंदण दिल्यासारखी त्या गाऽऽऽर पाण्यात आम्हि उंडारत होतो, पण मिनलला आमचा तो आनंद फार काळ बघवला नाहि. सव्वा तासाने तिने आम्हाला - "बास झालं!!जेवायला चला आता!" अशी वरुनच हाक मारली. मिनल तेव्हा फार दुष्टपणे वागल्याचा आरोप आम्हि तिघांनी दाखल केला. कोणाहि सहृदय माणसाच्या अंतकरणाला दयेने पाझर फुटावा असे उतरलेले चेहरे घेऊन आम्हि नाईलाजाने बाहेर पडालो. टॉवेल उचलेपर्यंत वार्‍याने अर्धे अंग कोरडे झाले होते. धुवुन वाळत घातलेले कपडे कडकडित वाळले होते. परत तेच स्वच्छ कपडे अंगावर चढवुन तो चढ मोठ्या कष्टानं चढु लागलो. चढ पुर्ण होत आला आणि आऽऽहाहा गरमा गरम खिचडिचा जो काहि घमघमाट नाकात शिरला कि बस्स्स! इतका वेळ पाण्यात राहुन ’भुक’ नावाची गोष्ट या जगात असते याचा विसर पडला होता, त्या स्मृतीभ्रंशातुन आम्ही चटकन बाहेर आलो. धावा-धाव करुन आम्हि ताटे घेऊन "ओम। भवती भिक्षां देहि!" करत बसलो. मग आमच्या अन्नपुर्णेने आम्हाला पोटभर जेवु घातले. अन तिच्यावरील "त्या" दुष्टपणाच्या आरोपातुन आम्हि तिची "बाईज्जत" मुक्तता केली.

- सौरभ वैशंपायन(मुंबई).

वावरसमाजराहणीप्रवासभूगोलदेशांतरलेखमाहिती

प्रतिक्रिया

रामदास's picture

7 Sep 2008 - 8:35 pm | रामदास

मस्त जमतंय लिखाण. उत्सुकता वाढते आहे. फोटो टाकले तर आणखी बहार येणार.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

सहज's picture

8 Sep 2008 - 9:17 am | सहज

फोटो टाकाच. आधीच्य दोन भागात देखील फोटो टाकाच.

मेघना भुस्कुटे's picture

8 Sep 2008 - 11:49 am | मेघना भुस्कुटे

होय होय, फोटो टाकाच.

यशोधरा's picture

7 Sep 2008 - 8:41 pm | यशोधरा

>>कोयनेचा अख्खा झुंगटि भाग मी कॅमेरात बंद केला

कुठेय? पाहू देत आम्हांला पण. लेखन सुरेखच जमतेय, पटपट पुढचे भाग टाका.

धनंजय's picture

8 Sep 2008 - 6:44 am | धनंजय

अनुभवकथन मस्त जमलंय.

शिवा जमदाडे's picture

8 Sep 2008 - 9:08 am | शिवा जमदाडे

एकदम फक्कड जमले आहे.... फोटू पण टाकले तर अजुन दुवा देवू रे..... टाक फोटू आणि घे दुवा........

अनिल हटेला's picture

8 Sep 2008 - 9:31 am | अनिल हटेला

राजे !!

फक्कड जमले आहे !!!

टाक फोटू आणि घे दुवा........

येउ देत पुढील भग लवकर !!!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मिंटी's picture

8 Sep 2008 - 10:37 am | मिंटी

मस्त लिहिलं आहे तुम्ही पण फोटो टाकले तर आणखी मजा येईल.............. :)

स्वाती दिनेश's picture

8 Sep 2008 - 11:55 am | स्वाती दिनेश

तुमचे हे रानातले अनुभव फार सुरेख चितारत आहात ,
लेखात फोटो टाका बुआ.. वरील सर्वांशी १००% सहमत.
स्वाती

प्राजु's picture

8 Sep 2008 - 8:46 pm | प्राजु

स्वाती ताई दिनेश च्या पावलावर पाऊल..वर्णन अतिशय सुरेख. फोटो टाकले असते तर आणखी मजा आली असती.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दुर्गविहारी's picture

20 May 2016 - 5:52 pm | दुर्गविहारी

उद्या बुध्द्पौर्णिमा. त्यानिमीत्त धागा वर आणत आहे. यानन्तरचा लेख मिसळपाव वर नसल्याने, ब्लॉग ची लिन्क देत आहे.
पाउलखूणा