कै. स गो बर्वे जन्मशताब्दी

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
24 Apr 2015 - 8:47 am

B

माजी सनदी अधिकारी व महाराष्ट्राचे माजी अर्थ आणि उद्योगमंत्री श्री स. गो. बर्वे (१९१४-१९६७) यांची १०० वी जयंती येत्या सोमवारी २७ एप्रिलला आहे. त्यानिमित्य त्यांचा छोटासा परिचय करून देणारा हा लेख :

कॉलेजात असताना मॉडर्न कॅफेचा चौक ''कै. स. गो. बर्वे चौक'' आहे हे माहीत होते पण त्यांच्याविषयी अधिक माहिती नव्हती. मुंबईत त्यांच्या नावाचा मार्ग , बर्वेनगरची बस वगैरे दिसत दिसत असे. कुतूहल म्हणून काही परिचित वयस्कर लोकाना माहिती विचारली ''बर्वे आमदार आणि खासदार होते, आणि त्यांनी पानशेतच्या पुरानंतर जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी परिश्रम घेतले'' इतपत माहिती त्यावेळी मिळाली होती. जालावर त्यांच्याविषयी काहीच माहिती मिळाली नाही. कालांतराने गेल्या वर्षी - म्हणजे वीसेक वर्षांनी कै. बर्वे यांच्या कुटुंबियांशी संवाद साधण्याचा योग आला आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती मिळाली त्यावरून केलेले हे संकलन:.

श्री सदाशिव गोविंद बर्वे यांचा जन्म २७ एप्रिल १९१४ या दिवशी तत्कालीन सातारा जिल्ह्यातल्या तासगांव इथं झाला. त्यांचे वडील उपजिल्हाधिकारी आणि नंतर सांगली संस्थानाचे दिवाण होते. बर्वे यांचे शालेय शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल पुणे आणि नंतर अर्थशास्त्राचे शिक्षण फर्गसन महाविद्यालयात झाले.

उच्च शिक्षणासाठी ते केम्ब्रिजला गेले आणि तेथून ट्रायपॉस म्हणजे बी ए, अर्थशास्त्र आणि आय. सी. एस. या तीनही परीक्षा उत्तीर्ण झाले. १९३६ साली भारतात परत येउन अहमदाबाद इथं उपजिल्हाधिकारी म्हणून सनदी सेवेत रुजू झाले. १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी ध्वजारोहण केले.

पुणे मनपा अस्तित्वात आल्यावर सुरुवातीची तीन वर्षे त्यांनी आयुक्त म्हणून काम पाहिले. आज ज्याच्याबद्दल फक्त हळहळ वाटते तो जंगली महाराज रस्ता याच काळातला! त्यांनी पुण्याभोवती रिंग रेल ची कल्पना मांडली पण राजकीय इच्छाशक्तीअभावी ती पूर्ण झाली नाही. पूर्ण झालेल्या योजनांमध्ये पर्वती आणि हडपसर औद्योगिक वसाहती, संभाजी, पेशवे, शाहू उद्याने, संभाजी पूल व धार्मिक स्थळे हलवून कांही रस्ते रुंद करणे इ. कामे झाली.

१९५३ मध्ये पंतप्रधानांनी फरीदाबाद शहराची नव्याने नियोजन करून उभारणी करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले . नंतर चिंतामणराव देशमुख यांनी त्यांना अर्थखात्याच्या कामासाठी बोलावून घेतले. या काळात आंतरराज्य विक्रीकर कायदा, खासगी विमा कंपन्यांचे LIC मध्ये विलीनीकरण झाले. पुढे १९५७ मध्ये ते PWD चे सचिव झाले. या काळात कोयना धरण बांधायला जागतिक बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अर्थखात्याचे प्रतिनिधी म्हणून ते अमेरिकेला गेले, कोयना धरणासाठी त्यांनी अडीच कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर करून घेतले.

प्रशासकीय काम करत असताना राज्यसरकारच्या शासन सुधारणा समितीवर काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी कॉंग्रेसवर सप्रमाण टीका केली. यशवंतराव चव्हाण यांनी ती टीका सकारात्मक रीतीने घेत त्यांना प्रोत्साहन दिले आणि सहकाऱ्यांना सुनावले. बदल घडवण्यासाठी स्वतः राजकारणात जावं असं त्यांना वाटू लागलं होतं. सकारात्मक बदल घडवायचा असल्याने आणि सत्ताधारी मंडळी रोजच्या संपर्कात असल्याने त्यांनी तत्कालीन कॉंग्रेसकडून निवडणूक लढवायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी सनदी नोकरीचा राजीनामा दिलां.

पण सेवामुक्त होण्याआधीच १२ जुलैला पानशेतची दुर्दैवी घटना घडली. त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मदत-पुनर्वसन कार्यासाठी बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली त्याच दिवशी समिती नेमली.

पुराच्या दुसऱ्या दिवशीपासून अडीच महिने ते कार्यालयातच रहायला गेले, सोबत साताठ कर्मचारीही होते. पहिल्या चार दिवसांत वीज आणि पाणीपुरवठा सुरळीत झाले. खडकवासल्याचा मुख्य स्त्रोत बंद झाला आणि बंधाऱ्याच्या दुरुस्तीला वेळ लागणार हे दिसत होते. मुळशी धरणातून पुण्यात पाणी आणण्याचा महत्वाकांक्षी प्रयोग तीन महिन्यात पूर्ण झाला. दोन आठवड्यात तीन लाख लोकांना प्रतिबंधक लस टोचून झाली. १०० केंद्रात ३६,००० नागरिकांना निवारा मिळाला. पूरस्थिती नियंत्रणात आणतानाच सर्व सरकारी विभागांचा ताळमेळ राखत प्रशंसनीय काम केले. त्यामुळे त्याचं हेच काम पुणेकरांच्या अधिक लक्षात राहिलं.

पुण्याच्या पुनर्वसनाची त्यांची कल्पना भव्य होती. एवीतेवी सर्व वाहून गेलंच आहे तर पुणं अधिक नियोजनबद्ध रीतीनं पुन्हा नव्यानं बनवावं असा त्यांचा आग्रह होता. दिल्ली आणि चंदीगडचे नियोजन त्यांच्यासमोर होते. सनदी अधिकारी फक्त सुचवू शकतात. शेवटी राजकारणी ठरवतील तसंच होतं. तत्कालीन परिस्थितीत लवकर होईल ते करायचं ठरलं - त्यामुळे पुणं काही फार बदललं नाही. पण जे काही थोडंफार नियोजन झालं ते लोकमान्यनगर - लाल बहादूर शास्त्री रस्ता आणि सहकारनगर इथं पुनर्वसनातून झालं. .

यानंतर यशवंतरावांनी त्यांना थेट राजकारणात आणले. १९६२ च्या निवडणुकीत शिवाजीनगर - पुणे येथून ते आमदार झाले. आणि महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुद्धा.

पुढे वसंतराव नाईक मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री झाले. मुंबईचा औद्योगिक बोजा कमी करून जिल्हा स्तरावर MIDC स्थापण्याची कल्पना त्यांचीच. या कामाचा झपाटा मोठा होता. पुण्याजवळ १०,००० एकर जमीन संपादन करून भोसरी MIDC सुरु झाली. त्यातून दीड लाख रोजगार तयार झाले. ठाण्याची वागळे इस्टेट आणि इतर अनेक औद्योगिक वसाहती, मुंबईतले खाडी पूल, दोन्ही एक्स्प्रेस हायवेज या महत्वाच्या गोष्टी त्यांनी मंजूर करून घेतल्या. या कामाची दखल घेत शास्त्रीजींनी त्यांना नियोजन मंडळावर उद्योग विभागाचे सदस्य म्हणून नेमले.

१९६७ मध्ये त्यांनी उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळचे विद्यमान खासदार व्ही के कृष्ण मेनन याना नाकारून कॉंग्रेसने बर्वे यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज मेनन यांनी अपक्ष लढायचे ठरवले. अपक्ष असूनही ते तुल्यबळ होते. पण अचानक शिवसेनेने मराठीच्या मुद्द्यावर त्यांना पाठींबा दिला अन बर्वे खासदार म्हणून निवडून आले. केंद्रात उद्योग खातं मिळालं असतं तर त्यांनी दूरगामी बदल घडवले असते हे निश्चित. दुर्दैवाने लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्याआधीच त्यांचे ६ मार्च १९६७ रोजी निधन झाले.

बर्वे यांनी सहकार, भारताचे नियोजन आणि आर्थिक धोरण, आणि सुशासानावर इंग्रजीतून ग्रंथलेखन ही केले. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे साहित्यिक मनाचे ,विद्वत्तेचा आदर करणारे नेता होते. बर्वे यांच्याबद्दल त्यांना विशेष आपुलकी होती. आपण केंद्रात गेल्यावर राज्यात विकासाच वेग राखण्यासाठी बर्वेनी मुख्यमंत्रीपद सांभाळावे असे मत त्यांनी आपल्या निकटवर्तीयाना बोलून दाखवले होते. पण त्यांना मुख्यमंत्री करण्याने जातीची गणिते चुकणार होती. त्यामुळे त्यांना अजून मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली नाही.

आत्ता दिल्लीत जे चाललंय ते पहातां पन्नास वर्षांआधी या सनदी अधिकाऱ्याने आधी सेवेत राहून आणि राजकारणात जाऊन केलेल्या कामाचं महत्व अजूनच ठळकपणे उठून दिसतं. समाजासाठी काम करायचं तर प्रत्येकवेळी पैसाच लागतो असं नाही तर असलेले कायदे आणि तरतुदी व्यवस्थित वापरून बरीच चांगली कामं करता येऊ शकतात हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले.

अवघ्या ५३ वर्षांच्या आयुष्यात दूरदृष्टीने सार्वजनिक कामाचे डोंगर उभे करणारी माणसे कमीच दिसतात. कुठेही काम करताना सचोटी, निस्पृहता त्यांनी सोडली नाही. लक्ष्य गाठण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत राहिले . त्यामुळे अनेक उल्लेखनीय कामं उभी राहिली. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता २६ एप्रिल २०१५ ला होत आहे.त्यानिमित्य कै. स. गो. बर्वे यांना आदरांजली!

***

(आभार: या लेखासाठी सदर माहिती आणि कै. स. गो. बर्वे यांचे चित्र पुरविल्याबद्दल पुण्यातल्या त्यांच्या नातेवाईकांचे आभार. त्यांच्याविषयी अधिक माहिती असल्यास किंवा इथे दुरुस्ती हवी असल्यास ज्येष्ठ मिपाकर तसे सांगतीलच.)

मांडणीजीवनमानअर्थकारणराजकारणप्रकटनविचारबातमीमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

पैसा's picture

24 Apr 2015 - 9:46 am | पैसा

उत्तम परिचय. फक्त ५२/५३ वर्षांच्या आयुष्यात कै. बर्वे यांनी खूपच काही केले.

आताच्या राजकारणात येणार्‍या सनदी अधिकार्‍यांद्दल जेवढे कमी बोलावे तेवढे चांगले!

क्लिंटन's picture

24 Apr 2015 - 10:38 am | क्लिंटन

मस्त लेख. स.गो.बर्व्यांचा परिचय करून दिल्याबद्दल आभारी आहे. शाळेत असताना मला भविष्यात आय.ए.एस करायची प्रचंड इच्छा होती.त्यावेळी ठेवलेल्या अनेक आदर्शांपैकी स.गो.बर्वे हे एक आदर्श होते.त्यावेळी त्यांच्याविषयी वाचले होते.पण त्यानंतर अनेक वर्षांनंतर त्यांच्याविषयी परत वाचायला मिळाले.त्या आठवणींना उजाळा या लेखाच्या निमित्ताने मिळाला.

आपण केंद्रात गेल्यावर राज्यात विकासाच वेग राखण्यासाठी बर्वेनी मुख्यमंत्रीपद सांभाळावे असे मत त्यांनी आपल्या निकटवर्तीयाना बोलून दाखवले होते. पण त्यांना मुख्यमंत्री करण्याने जातीची गणिते चुकणार होती. त्यामुळे त्यांना अजून मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली नाही.

दुर्दैवाने या साखळ्या कायमच आपल्या पायांमध्ये राहणार आहेत. आपल्या देशाचे जातीपाती या प्रकारामुळे किती प्रचंड नुकसान झाले आहे याची कल्पनाही करवत नाही.

माझे आजोबा पानशेत पुराच्या वेळी मुंबईला नोकरीला होते. बाकी कुटुंब पुण्यात. आमच्या घराच्या पायठणीला पाणी लागलेलं असलं तरी नुकसान काही झालेलं नव्हतं. पण आसपास वाताहत झाली असताना, भाग निर्मानुष्य झाला असताना आपल्या कुटुंबाला सोडून परत मुंबईला जावं का, असा प्रश्न त्यांना पडला. लुटालूट वगैरे व्हायची भीती वाटत असावी.

आजोबा मग बर्व्यांच्या मामलेदार कचेरीजवळच्या कमांड सेंटरमध्ये गेले. तिथे बर्व्यांचं एकंदर काम बघता त्यांना लक्षात आलं की लवकरच सगळं पूर्ववत होईल, आणि भिण्यासारखं काही नाही. मग ते निश्चिंत मनाने मुंबईला परतले.

ते ही आठवण नेहमी सांगत असत.

टीपीके's picture

24 Apr 2015 - 1:06 pm | टीपीके

छान ओळख. पु ले शु

बर्व्यांबद्दल इतकी माहिती पहिल्यांदाच पाहतो आहे. स गो बर्व्यांची याअगोदर कळलेली माहिती इतकीच, की गांधीहत्येनंतरच्या दंगलीत त्यांनी मॉडर्न कॅफे चौकात एक तोफ आणून ठेवलेली- इंटिमिडेशन टॅक्टिक म्हणून. वापरली नाही, पण अपेक्षित इफेक्ट झाला आणि दंगे फार भडकले नाहीत.

लेखाबद्दल बहुत धन्यवाद.

कै. स..गो. बर्व्यांना श्रद्धांजली!

मृत्युन्जय's picture

24 Apr 2015 - 1:35 pm | मृत्युन्जय

छान ओळख. बाकी जातीची गणीते वगैरे वाचुन महाराष्ट्र अजुन मागास का हे कळाले. एका चांगल्या माणसाला चांगले काम करु दिले नाही या जातीय्वाद्यांनी.

असंका's picture

24 Apr 2015 - 1:55 pm | असंका

या सुंदर लेखासाठी अनेक धन्यवाद.

एकनाथ जाधव's picture

24 Apr 2015 - 4:53 pm | एकनाथ जाधव

उत्तम व्यक्ती बद्दल उत्तम माहिती

सौन्दर्य's picture

24 Apr 2015 - 7:25 pm | सौन्दर्य

कै.स.गो.बर्व्यांना आदरांजली !

विकास's picture

24 Apr 2015 - 7:38 pm | विकास

मेनन विरुद्धची निवडणूक आणि नंतरचे आकस्मात - अकाली मृत्यू हे कायम ऐकलेले होते. त्यांच्या सनदी कामातील कार्यशैलीबद्दल वरवरच माहिती होती. आज हे या लेखामुळे वाचायला मिळाले. त्यांच्या कोणी कुटूंबिय वगैरे बद्दलची माहिती?

ठाऊक नाही, पण त्यांना अपत्य नव्हते इतकेच ऐकले आहे.

त्यांचे पुतणे वगैरे नातेवाईक एक ट्रस्ट चालवतात. जंगली महाराज मंदिराजवळ त्यांचे नावाने सभागृह आहे. त्यांच्या ट्रस्ट चा हा कार्यक्रम आज झाला, ज्यात बर्वेंच्याविषयी पुस्तकाचे केंद्रीय संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

बोका-ए-आझम's picture

27 Apr 2015 - 9:40 am | बोका-ए-आझम

लेख आवडला. त्यांच्या पुस्तकांची नावं मिळू शकतील का?

पुस्तके वाचलेली नाहीत. जालावर मिळालेली माहिती अशी :

Asia Publishing House: (अमेझोन)
Freedom and organisation (1967)
With Malice Toward None: A Critique of New India"s Plans and Aspirations (1964)

Indian Institute of Public Administration:
Good government : the administrative malaise and connected issues(1962)

Bombay Gandhi Smarak Nidhi (Vaikunth L. Mehta memorial lecture)
The co-operative principle : purpose and potential

Why Congress? (१९६८) /​ [with other essays by Balraj Madhok, Minu Masani, N.G. Goray and Surendranath Dwivedy.].

चौकटराजा's picture

27 Apr 2015 - 11:32 am | चौकटराजा

आमच्या लहानपणी आमच्या आडनावाचा अभिमान वगैरे वाटावा अशी फारच कमी मनुष्ये होती. स गो बर्वे यांचे नाव सर्वात अग्रक्रमाने घेतले जाई. आज पुण्याची औद्योगिक नगरी म्हणून जी ओळख आहे त्याचे फार मोठे श्रेय सगो ना दिले जाते. त्यावेळी आजच्या सारखा टोकाचा जातीय वाद राजकारणात नव्हता. गुंडगिरी वाद ही नव्हता. ब्राह्मणाना "चुनके..चुनके " बाजूला ठेवण्याची वृत्ती राजकारणात पैसा आल्याने निर्माण झाली. आज खरेच मायनॉरिटी मधे कोण आहेत हे फ्लेक्स वरची नावे वाचल्याने कळतेच आहे. अशा वेळी सगो बर्वे हा महाराष्ट्राचा स्वाभिमान होता याची नुसती जाणीव ही आज झाली तरी पुरे !

पॉइंट ब्लँक's picture

27 Apr 2015 - 11:39 am | पॉइंट ब्लँक

चांगली माहिती दिली आहे. तासगाव सांगली जिल्ह्यात आहे बहुतेक!

खेडूत's picture

27 Apr 2015 - 11:48 am | खेडूत

सर्वांचे आभार !

@ पॉइंट ब्लँक: सध्या सांगली जिल्हा आहे . त्यावेळी मात्र सगळा सातारा जिल्हाच होता!

चौकटराजा's picture

27 Apr 2015 - 11:50 am | चौकटराजा

त्यावेळी दक्षिण सातारा असा जिल्हा होता. उत्तर सातारा म्हणजे सध्याचा सातारा जिल्हा !