हर्षयुक्त उमापती

देवदत्त परुळेकर's picture
देवदत्त परुळेकर in जनातलं, मनातलं
17 Feb 2015 - 10:04 am

आज महाशिवरात्री
शिवाचे वर्णन करणारा संत नरहरी सोनार महाराजांचा हा
लोकप्रिय अभंग आहे -

भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥
गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥
भूतें वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥
सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥

या अभंगात महाराज शिवाच्या रुपाचे तसेच स्वरुपाचेही वर्णन
करतात. कसा आहे तो महादेव ? नरहरी सोनार महाराज
वर्णन करतात -

भस्म उटी रुंडमाळा । हातीं त्रिशुळ नेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥

शिवाने भस्माची उटी अंगाला फासली आहे. शंकर हा स्मशानात
राहणारा, भस्माची उटी अंगाला फासणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे.
काय आहे याचे रहस्य ?
आपल्या पुराणांत ब्रम्हा हा सृष्टीचा निर्माता, विष्णु हा सृष्टीचे
पोषण करणारा तर शिव हा सृष्टीचा विनाश करणारा देव अशी
त्रयी मानलेली आहे. अर्थात शिवाचे कार्यक्षेत्र मृत्यूशी संबंधीत
असल्याने त्याचे वास्तव्य स्मशानात असते आणि तो चिताभस्म
अंगाला फासतो. शिव या आपल्या कृतीतून आम्हाला काय संदेश
देतो?
मृत्यू हे मनुष्य जीवनाचे सर्वात प्रखर आणि सर्वात स्पष्ट असे
वास्तव आहे. परंतू कित्येकवेळा आपण कसे वागतो ?
महाभारतात यक्षाने धर्मराज युधिष्ठीराला जे प्रश्न विचारले त्या
सुप्रसिद्ध प्रश्नातील एक प्रश्न असा आहे -
"जगातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट कोणती ?"
धर्मराजाचे उत्तर मोठे मार्मिक आहे. धर्मराजा म्हणतो, "जगात
पदोपदी मृत्युचे दर्शन होत असतानाही मनुष्य आपण जणू अमर
आहोत अशा थाटातच वावरत असतो, हेच सर्वात मोठे आश्चर्य
होय."
आपण आज ना उद्या स्मशानातच जाणार आहोत. तीच आपली
शेवटाची नक्की जागा आहे. एक ना एक दिवस आपलेही भस्म
होणार आहे. या सर्वाची आठवण शिव आपल्याला करुन देत आहे.
आपण जर सदैव मृत्युची आठवण ठेवली, प्रत्येकाचा मृत्यू अटळ
आहे आणि मृत्यू केव्हा येईल हे सांगता येत नाही याचे स्मरण
ठेवले तर आपण कोणतेही वाईट कर्म, दुष्कर्म करणार नाही.
पाप कर्मापासून आपण दूर राहू.
एकनाथ महाराज दररोज गोदेत स्नान करावयास जात. वाटेत एक
माणूस नाथांना दररोज शिव्या देत असे. नाथांच्या पत्नी गिरीजाबाईंना
हे सहन होईना. एकदा त्यांनी नाथांकडे या विषयी तक्रार केली.
नाथांनी हा प्रकार बंद करावयाचे आश्वासन गिरीजाबाईंना दिले.
दुसऱ्या दिवशी नाथ स्नानाला जाताना थेट त्या गॄहस्थाच्या घरी
गेले. नाथांना थेट आपल्या घरी आल्याचे पाहून तो गडबाडला.
नाथ त्याला म्हणाले, "तुम्हाला सावध करायला आलो. आज
सूर्यास्ताबरोबर तुमचा मृत्यू होणार आहे." असे सांगून नाथ स्नानाला
निघून गेले. या गृहस्थाची आता पाचावर धारण बसली. तो खूप
घाबरला. त्याला पश्चात्ताप झाला. त्याने भजनी मंडळ बोलावले.
भजन करु लागला. तोंडातून शिव्या येणे बंद झाले आणि देवाचे
नाम येवू लागले. संध्याकाळी नाथ त्याच्या घरी गेले. त्याने नाथांच्या
पायावर लोळण घेतली. अपराधाबद्दल क्षमा मागितली. येवढ्यात
सूर्यास्थ झाला. नाथ त्याला म्हणाले, "आपण अजून जिवंत कसे ?
हाच प्रश्न तुला पडला असेल. अरे तो दूर्वर्तनी शिव्या घालणारा
गृहस्थ आता मेला. आता तू मृत्यूची कायम आठवण ठेव म्हणजे
शिव्या घालयला तुला वेळच मिळणार नाही."

शिवाच्या गळ्यात रुंडमाळा आहे. मस्तक हे जीवाचे प्रतिक आहे.
जो आपला जीव देवाला अर्पण करतो, त्याला देव आपला म्हणतो.
तुकाराम महाराज म्हणतात - "जीव दिला पायातळी ।"
याचा अर्थ महाराजांनी देवाच्या पायावर डोके फोडून जीव दिला,
असा नव्हे. ’जीव दिला’ याचा अर्थ सारा अहंकार, सर्वस्व त्या देवाला
अर्पण केले. आता त्या भक्ताच्या मस्तकात तोच परमात्मा भरलेला
आहे. अशा भक्तांच्या मस्तकांची माळ करून मोठ़्या प्रेमाने शिव
आपल्या कंठी धारण करतो.

शिवाच्या हातात त्रिशूळ आहे. त्रिशूळाची तीन पाती सत्व, रज व तम
या त्रिगुणाची प्रतीक आहेत. या त्रिगुणांवर शिवाची सत्ता चालते.

शिवाच्या नेत्रात ज्वाळा आहेत. शिवाला त्रिनेत्र असेही म्हणतात.
या तिसऱ्या डोळ्यात ज्ञानाग्नी आहे. जेव्हा हा ज्ञानाग्नी जागृत होतो
तेव्हा तो सर्व विकारांचा नाश करतो. ही दृष्टी शिव देतो. म्हणून
या ज्ञानाग्नीच्या ज्वाळांनी शिवाने कामदेवाला जाळून टाकले अशी
कथा आहे.

गज चर्म व्याघ्रांबर । कंठीं शोभे वासुकी हार ॥ २ ॥

शिवाने गजचर्म आणि व्याघ्रांबर धारण केले आहे. हत्ती हा कामाचे
तर वाघ हा क्रोधाचे प्रतिक मानतात. यांची साल काढून त्यांच्यावर
शिवाने विजय प्राप्त केला आहे. कंठामध्ये शिवाने वीषयुक्त वासुकी
सर्पाचा हार धारण केला आहे. सर्प वीषयुक्त आहे पण शितल आहे.
तो थंड रक्ताचा प्राणी आहे. समुद्र मंथनाच्या प्रसंगी शिव हलाहल
वीष प्याला आणि ते वीष आपल्या कंठी धारण केले. त्यामुळे होणारी
आग शांत करण्य़ासाठी सर्प गळ्यात धारण केला. वीषावर वीषच
औषध म्हणून उपयोगी ठरते. जो विषम परिस्थितीत न डगमगता
वीष पचवतो, तोच खरा नेता होवू शकतो. तोच महादेव होतो.

भूतें वेताळ नाचती । हर्षयुक्त उमापती ॥ ३ ॥

शिवाचे गण भुते, वेताळ नाचताहेत. स्वामी विविकानंदांच्या सुप्रसिद्ध
शिष्या भगिनी निवेदिता म्हणतात, "भुते, पिशाच्च ही सर्वात खालच्या
योनीचे प्रतिक आहे. म्हणूनच शिव समाजातील सर्वात खालच्या
स्तरावरील लोकांचा लाडका देव आहे. तो सर्वांना आश्रय देतो."

हा उमापती शिव हसतो आहे. शिव एकटा आहे की दुकटा ?
शिव आणि त्याची शक्ती उमा भिन्न नाहीतच मूळी. शिव या शब्दातील
इकार म्हणजे शक्ती होय. हा इकार दूर केला तर शव उरेल.
शिव हा अर्धनारी नटेश्वर नटराज आहे. तो या त्रिगुणात्मक विश्वाच्या
उत्पत्ती, स्थिती, लयाचे नृत्य अखंड करतो आहे. नृत्य जसे नर्तकापासून
भिन्न करता येत नाही तसे विश्व शिवापासून भिन्न करता येत नाही.
पण नृत्य संपले तरी नर्तक शिल्लक राहतो हे लक्षात ठेवायला हवे.

सर्व सुखाचें आगर । म्हणे नरहरी सोनार ॥ ४ ॥

असा हा शिव सर्व सुखाचे आगर आहे असे नरहरी सोनार महाराज
अभंगाच्या शेवटी म्हणतात. ही ओळ ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाची
आठवण करून देते.
सर्व सुखाचे आगर । बापरखुमादेवीवर ॥
वारकरी सांप्रदायाप्रमाणे हरी आणि हरात भेद नाही. तो विठ्ठल आणि
शंकर एकच आहेत. त्या परमेश्वराच्य़ा चरणीच सर्व सुख आहे, याविषयी
सर्व संतांचे एकमत आहे. म्हणून सर्व सुखाच्या प्राप्तीसाठी त्या शिवाला
शरण जाऊ या.

- देवदत्त परुळेकर मो. ९४२२०५५२२१

संस्कृतीनृत्यधर्मइतिहासवाङ्मयविचारआस्वादलेखसंदर्भ

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

17 Feb 2015 - 11:23 am | स्पंदना

बरीच महिती मिळाली. विशेषतः शिव मधला इकारान्त.
धन्यवाद.

मदनबाण's picture

17 Feb 2015 - 2:54 pm | मदनबाण

लेखन आणि माहिती आवडली ! जय भोले नाथ ! बम भोले ! :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आद्य आम आदमी