औद्योगीक इसापनीती भाग तीन - मुंगळा, माशी आणि माकड

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
2 Jul 2008 - 6:36 am

भाग एक- http://www.misalpav.com/node/2330
भाग दोन- http://www.misalpav.com/node/2345

मुंगळा, माशी आणि माकड
एका झाडावर उंच ठीकाणी मधाचे एक पोळे होते. त्यातून अधुनमधून मधाचे थेंब, पोळ्याचे छोटे तुकडे खाली पडत होते. झाडाखाली एक मुंगळा ते गोळा करून हळुहळू एका ओंडक्याखाली नेऊन ठेवत होता. प्रत्येक खेपेला थोडा थोडा करून असा बराच मध त्याने ओंडक्याखाली जमवला होता. त्याचे कार्य अगदी शांतपणे आणि नेटाने सुरू होते. एक आळशी माशी त्याचा हा उद्योग पाहून तिकडे आकर्षित झाली. मुंगळ्याच्या प्रत्येक खेपेबरोबर माशी त्याच्या डोक्यावरून गुणगुण करीत उडत उडत झाडापासून ओंडक्यापर्यंत जात होती. अशा खूप खेपा झाल्या. मुंगळ्याचे काम अविरत सुरू होते.

माशीची गुणगुण ऐकून एक माकड तिथे आले. त्याला पाना पानांखालून जाणारा बारीकसा मुंगळा काही दिसला नाही. पण त्याने पाहीले, ही माशी झाडापासून ओंडक्यापर्यंत खेपा मारीत काहीतरी करीत आहे. त्याने माशीला विचारले "तुझे हे चालले तरी काय आहे?" त्याच्या मोठ्या आकाराकडे पाहून माशीला वाटले ह्याला आपल्या बाजूने करायला हवे. ती माकडाला म्हणाली, "मी कष्ट करून मध जमवत आहे. पण एक मुंगळा त्या मधावर डाका घालत आहे." असे सांगून तिने माकडाला नुकताच ओंडक्यापासून झाडापर्यंत जाणारा मुंगळा दाखवला. माकडाला ती गोष्ट खरीच वाटली. त्याने एका फटक्यात मुंगळ्याला उडवून दिले. त्यानंतर ओंडक्या खालच्या मधाचा आस्वाद घेऊन, माशीकडे ढुंकूनही न पहाता माकड तिथून चालते झाले.

बोध-
१) होणारे काम जरी द्रष्य असले तरी काम करणारा सहसा अद्रष्य असतो.
२) उंच जागेवरून काम करणारे दिसत नसले, तरी आपण काम केल्याचा डंका पिटणारे आवाज नक्कीच ऐकू येतात.
३) उंच जागी बसलेल्याला बारीक सारीक गोष्टींकडे दुर्लक्ष कर्‍न फक्त मलाई खाता येते.

कलावाङ्मयकथासमाजजीवनमानप्रकटनविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

2 Jul 2008 - 9:16 am | प्रकाश घाटपांडे

अशी अनेक माकडे शासनयंत्रणेत असतात, समाजात असतात, साहित्यात असतात.
आपण आपले गांधीजींच्या माकडांकडे बघतो.
प्रकाश घाटपांडे

विजुभाऊ's picture

2 Jul 2008 - 11:15 am | विजुभाऊ

या गोष्टीमधुन मुंगळ्याने काय बोध घ्यावा.....
माकडाने काय बोध घ्यावा.....
अधुन मधुन माकड आणि मुंगी असणारा विजुभाऊ

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अरुण मनोहर's picture

3 Jul 2008 - 10:20 am | अरुण मनोहर

विजुभाऊ, अहो तुम्हाला माहित आहेच! गोष्टीतल्या पात्रांनी बोध घ्यायचा नसतोच. त्यांनी तो घेतला, तर गोष्टच संपेल ना!

अवांतर ओरीजीनल इसापाने सांगीतलेला बोध लोकांनी तरी कुठे पाळलाय आजपर्यंत? म्हणून तर आज औद्योगीक इसापनीती लिहायला मसाला मिळतोय! ;)

(-- नुसतीच गुणगुण करणारी माशी)

मनिष's picture

2 Jul 2008 - 12:30 pm | मनिष

सिरीज आवडली, अजून येऊ द्या.

वरदा's picture

2 Jul 2008 - 8:46 pm | वरदा

मी यातून असा बोध घेतला की मला मदत हवी असेल तर मी स्वतःचं स्वतः बघून घ्यावं कुठल्याही माकडाला मधे घालू नये...काहीही फायदा होत नाही..असली फायदा नसलेलीच माकडं बर्‍याचदा आसपास असतात्...'कामापुरता मामा ताकापुरती आज्जी' असं मानणारे....

सॉलीड चाल्लेय इसापनीती....

पुलेशु..

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt