जी जी त्याला भेटली तिला तिला तो गुलाब देत गेला. ती काही का म्हणेना पण त्याचं गुलाब देणं काही चुकलं नाही. साध्यासुध्या दिसणाऱ्या मुलींनाही त्याने आखीव रेखीव अन् आकर्षक गुलाबपुष्प सादर केले होते. त्यावेळी त्या सामान्य मुलीच्या डोळ्यांतील आश्चर्ययुक्त भाव वाचणे त्याला भारी आवडायचे. तिच्या मनी ध्यानी नसतांना मिळालेली ही सुंदर भेट तिला स्मितहास्य करायला भाग पाडायची. तसं तिच्या मनात हे असं काही घडेल याची पुसटशी शंकाही हजर नसायची. अशा अचानक वेळी त्यानं गुलाब दिला की नकळत किंवा स्त्रीसुलभ पुष्पप्रेमापोटी तिचा हात तो गुलाब घेण्यास आपोआप उद्युक्त व्हायचा. त्याचं निरागस हास्य, गुलाब पेश करण्याची आर्जवी अदा अन् डोळ्यांतला निर्मळपणा पाहून ती आपसूक त्याचा गुलाब स्वीकारायची.
अशा प्रकारे त्याने किमान चाळीसेक पोरींना गुलाब देऊन उपकृत केले होते. अर्थात त्यांनी त्याला त्याची परतफेड करावी अशी काही त्याची अपेक्षा नव्हती बरं का. प्रत्येकीने हसून गुलाबाचं स्वागत केलं मात्र काहीही टिप्पणी करण्यास त्या सरसावल्या नाही. किंबहुना त्यालाही गुलाब द्यावा अशी कृती कुणीच आमलात आणली नव्हती. एकाही मुलीला असं वाटलं नव्हतं की आपणही त्याला गुलाब द्यावा. तो मोळीभर गुलाबांची खैरात जरी करून गेला होता, तरी त्याची झोळी मात्र रिकामीच राहिली होती.
ते कॉलेजची अखेरचे वर्ष होते. डिग्री हातात पडताच सगळेच नोकरीपाठी धावणार होते. पोरीही आपापल्या उद्योगात डुबून जाणार होत्या. पुन्हा या मुली भेटण्याची शक्यताच नव्हती. त्या दिसूही शकणार नव्हत्या. येत्या काही महिन्यांत अनेकींचे हात पिवळे देखील होतील. आपण सगळ्याजणींशी गोड वागलो, एकीलाही दुखावलं नाही वा त्यांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाईल असे वागलो नाही, कित्येकिंच्या घरी तासनतास गप्पा झोडीत बसलो. त्यांना हसवलं, दुःख विसरायला मदत केली. त्यांनीही हसत खेळत आपल्याला मैत्रीची साथ दिली. त्या प्रत्येकीप्रति आदरभाव व्यक्त करायलाच पाहिजे. असा विचार करून शेवटची भेटवस्तू याअर्थी पाकळीच नाही तर आख्खे फूल देण्याचा मानस त्याने रचला होता तसेच प्रत्यक्षात आणलाही होता.
त्यांच्या लेखी तो एक चांगला निर्हेतुक मित्र, अडीअडचणी समजावून घेणारा स्नेही, योग्य सल्ला देणारा हितचिंतक होता. त्याचा सभ्यपणा त्यांना भावायचा. त्या त्याची अपुलकीयुक्त चौकशी करायच्या. कुठे रस्त्यात भेटला तर त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं करणं त्यांना जमत नसे. त्या आवर्जून थांबत अन् त्याच्याशी भर रस्त्यात बोलून घेत. आता कॉलेजनंतर तोही आपल्याला भेटेल की नाही ही शंकाच असल्याने त्यांनी विनाविलंब त्याचे गुलाब स्वीकारले. त्यांच्या तर मनात कुठला किंतु नव्हताच याच्याही नव्हता. प्रत्येक मैत्रीण गुलाब घेणार याची त्याला खात्रीच होती. त्यामुळे खिशाला चाट बसली तरी हा मौका सोडायचा नाही. हरेकीचा गुलाब पुष्पाने सत्कार करायचा असे त्याने ठरवलेच होते. त्याप्रमाणे एक चांगला दिवस योजून सर्व मैत्रिणींना गुलाबी गुलाब देऊन टाकले. रात्री निश्चिंत पडून तो हिशोब करण्यात गुंग झाला...
अशा अनेक रात्री गेल्या. तो कामाधामाला लागला. नोकरी मिळाल्यावर त्याच्या घरच्यांनी त्याचे दोनाचे चार करायची घाई केली. झालं, तो नवरदेव म्हणून बोहल्यावर चढला. यशावकाश संसारातही रममाण होऊन गेला. बघता बघता वर्ष संपत आलं.
आणि एका दिवशी सकाळ पासून त्याचा फोन खणखणत राहिला. जिला जिला त्यानं निःशंकभावनेने गुलाब दिला होता, त्या प्रत्येकीचा आवर्जून फोन येत होता. काय चाललेय, कसे चालेलय, तू कुठे, मी कुठे, यजमान काय करतात वगैरे वगैरे अनौपचारिक गप्पा करता करता कधी दिवस मावळला त्यालाही कळले नाही. त्याची बायको मोठ्या कौतुकाने त्यांच्या या फोनभेटीचा उत्सव न्याहाळीत होती. फोन संपला की तो त्याच्या बायकोला फोन केलेल्या मुलीचा स्वभाव, तिचं दिसणं, तिचा आवडता पेहराव, तिचे केस, वेणी, टिकल्यांचे प्रकार, वेशभूषेचे प्रकार, तिचे डोळे, चेहऱ्यावरील मुरमांची संख्या किंवा डाग, व्रण, हनुवटीवरील तीळ, नखांची लांबी, त्यावरील नक्षीकाम, तिच्या हातातल्या घड्याळाचा पट्टा, तुटलेला एखादा काटा, रंग उडालेली डायल, तिच्या अंगठा शिवलेल्या चपला, टाचा घासलेले शूज, तिचं वागणं, तिचं बोलणं... सगळं सगळं काही समरसून सांगत सुटायचा. त्याचं इतकं निरीक्षण असेल तेही प्रत्येक मैत्रीणीचं? तिला आश्चर्य वाटत होतं. मोठ्ठा आ करून ती त्याचं सर्वकाही ऐकत राहिली होती. अनेक शंका-कुशंका तिच्या मनात येत नसतील तरच नवल!
त्याचं तिच्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या त्रासिक भावाकडे लक्ष होतंच कुठे? तिच्या आश्चर्ययुक्त नजरेच्या खोल तळी उमटलेले भयभीत तरंग त्याला जाणवू शकत नव्हते, कळणारही नव्हते कारण त्या प्रत्येकीने फोन संपविताना त्याला शुभेच्छा देत म्हटलं होतं – ‘हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे!!!’
प्रतिक्रिया
14 Feb 2012 - 5:49 pm | कोल्हापुरवाले
खुपच भारी लीहील आहे
14 Feb 2012 - 5:55 pm | निश
मस्त लिहिलत आहात साहेब
14 Feb 2012 - 6:02 pm | चिरोटा
लेख आवडला.
अवांतर-ह्या सर्वजणी 'त्या १०%' मध्ये असतील अशी आशा करूया.
14 Feb 2012 - 6:38 pm | गणपा
आजच हे लिखाण आवडलं बर्का डॉक.
14 Feb 2012 - 7:26 pm | प्राजु
आजचं लिखाण खरंच आवडलं. आपल्या एकूणच लेखन कारकिर्दीपेक्षा वेगळं आहे... असेच लिहित रहा.
14 Feb 2012 - 8:25 pm | अन्नू
प्रदिर्घ काळानंतरचे हे आपले लिखाण हटके आणि छान आहे, त्यामुळे आवडले.
पण एक विचारु का?
आजकाल खरंच पुरुष आपल्या बायकांना त्यांच्या आयुष्यातील इतर मुलींबद्दलच्या अशा गोष्टी प्रामाणिकपणे आणि इतक्या सहज रितीने सांगतात?
आणि जे प्रत्यक्षात असे धाडस करुन सांगतात त्यांचे नंतर काय हाल होतात?
15 Feb 2012 - 8:20 pm | विश्वनाथ मेहेंदळे
अहो ती कथा आहे. मुळात आजकाल (किंवा कुठल्याही काळात) इतक्या मुली अशी आठवण ठेऊन फोन करतील का, असा प्रश्न नाही पडला ?? इतक्या वर्षात लिहून घेतलेले नंबर हरवतात, पत्ते बदलतात, फोन बदलतात आणि माणसे पण बदलतात की. सदर कथानायकाचा फोन इतक्या मुलींच्या कडे अजूनही होता हे आश्चर्य, आणि पुनरुक्तीचा दोष पत्करून सांगतो की त्यापेक्षा महान आश्चर्य म्हणजे मुलींनी appreciation लक्षात ठेवले. अशा मुलींबद्दल ऐकून उर भरून आला हो. ;-)
असो, लेख खूप आवडला, नेहमीपेक्षा वेगळा. नेहमीचे पण लेखन आवडतेच.
14 Feb 2012 - 8:44 pm | पक पक पक
आणि जे प्रत्यक्षात असे धाडस करुन सांगतात त्यांचे नंतर काय हाल होतात?
त्याच काय झाल ते बहुतेक पुढ्च्या भागात सांगतील.... ;)
पण डॉ.साहेब लेख आवडला ,(विषयात 'विशय' नव्ह्ता म्हणुनच लेखन खुप छान झाल असच म्हणेन..) :)
14 Feb 2012 - 9:06 pm | हंस
पण डॉ.साहेब लेख आवडला, (विषयात 'विशय' नव्ह्ता म्हणुनच लेखन खुप छान झाल असच म्हणेन..)
हेच म्हणतो!
14 Feb 2012 - 10:12 pm | पैसा
आजच्या दिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा डॉक्टरसाहेब!