एसटी पुराण
एस. टी. बस मध्ये बसला नाही असा माणूस विरळा. गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत, सरपंचापासून आमदार खासदारांपर्यंत, जुन्या काळातील राजापासून आजच्या राष्ट्रपतींपर्यंत, भिकार्यांपासून चोरांपर्यंत समाजातल्या सगळ्या लोकांनी एस. टी. बस मध्ये बसण्याचा अनुभव आयुष्यात एकदातरी घेतलेला असतोच. एसटी बस म्हणजे स्टेट ट्रांसपोर्ट बस. आपली महाराष्ट् राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस. जुन्या काळी म्हणजे स्वातंत्र मिळाल्यानंतर १९४८ साली सगळे खाजगी बस चालवणारे जावून सोनेरी छत व निळ्या रंगाची एसटी अहमदनगर ते पुणे येथे पहिल्यांदा धावली. आपल्यातल्या जुन्या लोकांपैकी बर्याच जणांनी असल्या जुन्या बस बघीतल्या असतील. त्यानंतर बर्याच बसेस आल्या अन गेल्या. त्यांचे अंतर्बाह्य स्वरूप बदलले. सार्वजनिक प्रवासासाठी महामंडळ अस्तित्वात आले. प्रवासास अनेक सुखसोई असणार्या बसेस आल्यात.
६० ते ८० च्या दशकाच्या शतकात एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणे हाच एक पर्याय होता. त्यानंतरच्या काळात खाजगी लक्झरी बस प्रवासासाठी उपलब्धझाल्यामुळे प्रवास बराचसा सुखकर झाला अशी प्रवाशांची समजूत झाली.
एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणे आताशा काही प्रमाणात कमी प्रतीचे मानले जावू लागले. शहरी भागातल्या प्रवाशांमध्ये एसटी महामंडळाबद्दल उणे बोलणे फॅशन झाल्यासारखे वाटते. काही प्रमाणात शहरी भागात तसेच संपुर्ण महाराष्ट्रात ग्रामिण भागात प्रवासासाठी एसटी बस शिवाय पर्याय नाही. 'गाव तेथे रस्ता अन रस्ता तेथे एसटी' हे ब्रीद वाक्य महामंडळाने ९९% खरे केले आहे. महामंडळ अनेक सामाजिक बंधने पाळून प्रवाशांकरता सोई पुरवते, भाड्यामध्ये सवलत देते. ती सवलत नाकारली तर महामंडळाचा नफा बर्याच प्रमाणात वाढू शकतो. तरीही केवळ सामाजिक दृष्टीनेच महामंडळ याकडे पाहत आलेले आहे. सरकार काही वेळा कर सवलत अन इतर नियमांमध्ये महामंडळालाही सुट देत नाही. सरकारने महामंडळाप्रती आपली दृष्टी बदलली पाहीजे. बर्याचदा खाजगी वाहतूकदार करणारे हे राजकारणी अन मोठे लोक असतात. ते सुद्धा महामंडळाची अडवणूक करतात. त्या त्या रुट वर कमी प्रमाणात गाड्या चालविल्या जातात. हे सार्वजनिक प्रवासास अहितकारक आहे.
भारतातल्या प्रत्येक राज्यात अशी एसटी धावते. तुम्ही त्या त्या राज्यात जर अशा एसटी बसने प्रवास केला तर तुम्हास आपल्या राज्यातील बससेवाच कशी चांगली आहे हे पटेल. काही प्रमाणात गैरसोई असतील तरीही सामायीक विचार केला असल्यास वरचे विधान आपणास पटेल.
आता बसबद्दल. माझ्या लहाणपणापासून मी लालपिवळी बस बघत आलेलो आहे.
त्यातून प्रवासही केला आहे. नंतरच्या आशियन गेम च्या काळात आशियाड बस सुरू झाल्या.
त्यांचा रंग हिरवा पांढरा होता.
आता जनता बस चा रंग लाल असतो.
शिवनेरी एसी बसचा रंग निळा आहे.
बसेसचे सिटस, अंतर्गत व्यवस्था आरामदायी झालेली आहे. तरीही त्यातल्या त्यात मला आपली लालपिवळी जुन्या बॉडीची बसच आवडते. जुन्या बसचे सीट सलग आहे. त्यात आशियाड बस सारखी तुटक सीटस असलेली आसनव्यवस्था नाही. ३+२ अशी आसन व्यवस्था जुन्या लाल पिवळ्या बसेस मध्ये असते. सीटस च्या पुढे (अन पुढल्या सीट च्या मागे) एक मोठी आडवी दांडी सलग असते. तिच्यावर डोके टेकून मस्त झोप लागते. खालचे छायाचित्र बघा.
(चित्रसौजन्य:amitkulkarni.info)
आशियाड अन आताच्या नविन जनता बस मध्ये अशी सोय नाही.
आशियाडमध्ये पुढला आडवा दांडा नसतो. एक छोटे हँडल आहे. सीटही तुटक तुटक असतात. त्यामध्येही हात ठेवण्याचे हँडल बसण्याच्या आड येते. सीटला पायबर मोल्डींग मध्ये बनवत असल्याने घमेल्यासारखा आकार आपल्या सीटच्या सोईसाठी दिलेला असतो. त्यात काही सीट 'मावतात' तर काही बाहेर 'सांडतात'. आशियाड बसमधले प्रवासी शक्यतो शेजार्यांशी बोलत नाही. केवळ नाईलाज म्हणून आम्ही आशियाड 'बस' मध्ये बसतो अन्यथा लक्झरी बस आम्हास परवडते/ आवडते अशी त्यांची गोड तक्रार असते. खरे म्हणजे त्या प्रवाशांनी खाजगी लक्झरी बसची 'गोडी' कधीतरी चाखलेली असते. खाजगी बसच्या प्रवास करण्याच्या वेळेचा भोंगळपणा, वेळकाढूपणा, त्यांचे टेक ऑफ पॉईंट्सवर थांबणे, सक्तीचे 'शहर दर्शन' हे त्यांनी घेतलेले असते. एसटी बस ही त्यातल्या 'दगडापेक्षा मऊ' वृत्तीने अन गॅरंटीड वेळेवर सुटणे-पोहचणे, सुरक्षीत असणे या गुणांवर ते आशियाड मध्ये बसलेले असतात.
एकूणच ज्याने प्रवास केलेला आहे त्याला आशियाड बस पेक्षा लालपिवळी बस चांगली वाटू शकते. लाल पिवळ्या बसमध्ये अस्वच्छतेचे प्रमाण जास्त आहे पण ते ग्रामिण भागातल्या बसमध्येच. शहरी भागात लालपिवळी बस सुद्धा (तुलनेने) स्वच्छ असते.
गावाकडच्या बसने प्रवास करण हा एक अनुभव असतो. कंडक्टर ड्रायव्हरला त्यांचे नेहमीचे प्रवासी ओळखीचे झालेले असतात. गावात शेवटची बस असेल तर ते अशा प्रवाशासाठी थांबतात. तो आल्यानंतरच बस निघते. बाजाराची बस म्हणजे एक जत्राच असते. भाजीपाला, घरगुती सामानसुमान, फावडे, पहारी, विळे, कुदळ, खताची पोती, चादरी विक्री करणार्यांच्या थैल्या आदी आसनांवर आसनांखाली विराजमान होतात. वरच्या टपावर भाज्यांची मोठी पोती, सायकली, एखादा पलंग ठेवलेला असतो. कंडक्टर त्या सगळ्यांची लगेजची तिकीटे विचारून काढत असतो. त्याचा या गर्दीत हिशेब जुळतो हे पाहून मला तर तो एखाद्या चार्टड अकाउंटपेक्षा मोठा वाटायला लागतो.
तर असे हे एसटी पुराण. यातल्या छोट्या छोट्या एककांबद्दल (units) नंतर कधीतरी लिहू. तुर्तास विस्तारभयास्तव येथेच थांबणे योग्य.
(लेखातील छायाचित्रे त्या त्या संकेतस्थळाच्या सौजन्याने)
प्रतिक्रिया
4 Aug 2010 - 2:08 pm | प्रचेतस
खरेच या लाल पिवळ्या गाड्या महाराष्ट्राच्या जीवनवाहिन्याच आहेत. मी ट्रेकिंगच्या निमित्तने बरेच वेळा दुर्गम भागात ह्या गाड्यांनी प्रवास केला आहे. जिथे ह्या गाड्या जाउ शकतात तिथे तश्या सो-कॉल्ड महागड्या लक्झरी बस जायचे धाडस करणारच नाहीत.
4 Aug 2010 - 2:19 pm | गणपा
सहमत.
4 Aug 2010 - 2:20 pm | चिरोटा
मस्त लेख. एस्.टी. मध्येही काही प्रकार होते- सुपर एक्स्प्रेस आणि नॉन स्टॉप.ह्या बसेसना मधल्या पिवळ्या पट्ट्याऐवजी पांढरा पट्टा असायचा.लाल अ़क्षरांत जलद्/अतिजलद लिहिलेले असायचे.प्रत्येक एस.टी.वर BOM46 असे का लिहिले असते कधी कळले नाही.
4 Aug 2010 - 3:52 pm | अर्चि
एस टि चे मुख्य कार्यालयाचा पीन कोड
4 Aug 2010 - 7:12 pm | चिरोटा
मुख्य कार्यालय परळला(४०००१३) आहे असे वाटायचे.४०००४६ हा पिनकोड एस्.टी. सोडली तर अनेक वर्षात कोठेही दिसला नव्हता. नेटवरुन तो पिनकोड माटुंग्याचा आहे असे कळले.सहसा माटुंग्याचा कोड-४०००१९(मध्य) किंवा ४०००१६(ले.ज्.मा) असतो.
5 Aug 2010 - 3:36 am | पाषाणभेद
BOM46 यात BOM म्हणजे बॉम्बे या अर्थाने नाही. बॉम्बे चे मुंबई कधीच झाले अन एस्टी वाले तर आधी पासूनच मुंबईच म्हणायचे म्हणा. तर BOM म्हणजे Bill of Material. गाडीचा मेटेंनन्स च्या हिशेब ठेवण्यासाठी BOM मेंटेन ठेवतात. आमच्या कडच्या साखरकारखान्याच्यादेखील प्रत्येक गाडीवर असे BOM लिहीलेले असते. मलाही असलाच प्रश्न पडला होता त्या वेळी. नंतर समजले की ते Bill of Material असते म्हणून.
4 Aug 2010 - 2:22 pm | गौरीदिल्ली
आम्ही लहान असताना एस टी ला लाल डब्बा म्हणायचो ... मस्त लिहिलय...
4 Aug 2010 - 2:23 pm | इन्द्र्राज पवार
फारच सुंदर लेख. समाजजीवनाशी अतूट असे नाते असलेली एस.टी. ~~ शहराकडे जाण्यासाठी फाट्यावर उभे राहुन "यस्टी" ची वाट पाहणे ही किती गंमतीदार बाब आहे तिचे वर्णन करण्यासाठी धाकटे माडगुळकर किंवा आजचे बिनीचे अनिल अवचटच हवेत. आता "ग्राम सडक सुधार" धडक मोहिमेंतर्गत खेड्यापाड्यातील अप्रोच रोड बर्यापैकी सुधारले आहेत, पण ज्या काळात रस्ता म्हणजे धुळीचा खकाणा अशी व्याख्या होती त्याकाळात रणरणत्या उन्हात, मोडक्यातुटक्या शेडचा आसरा घेतला ना घेतला असे करत, "दिलिप जर्द्या" ची देवाणघेवाण करत असलेली डोक्याला लाल-पिवळे-गुलाबी फेटे गुंडाळलेले रामराव, तानाजीराव, सदानंद, वसंतराव ही मंडळी आणि त्यांचे "उसाचे राजकारण, केडीसीच्या म्यानेजरला कसा तोडतो बघच उद्या" या खडाजंगीच्या बोलाचाली....
त्या शेडच्या बाजुला असलेल्या झाडाला टेकुन बसलेल्या हौसाक्का, बायाक्का, शांताकाकु, शकी, वच्छी, शारदी यांच्या दबक्या आवाजातील गप्पा ::
("व्हय गं, आंवदा सरूला दिवस गेल्याती न्हव?",
"व्हय बया, बघ तर, म्या म्हटलंत तिला यल्लमाला जावून्शी डोकं टेक तिच्याम्होर ! गेल्ली की म्हायल्या जत्रला, आनि आता बघ कशी मोरासारखी टण्णाना उड्या मार्तिया...."
"आसू दे मारू दे, माझ्या म्हायीरचीच हाया ती. लई केलया तिच्या आईनं माझ्यासाठी...")
हे चित्र लोभसवाणे आहे, आणि ते आणखीन पाहावे तोच गलका.... "आली आली रं"
लांबून निळा-पांढरा धुर आणि राखी रंगाची धूळ मागे बेदरकारपणे उडवत शेडकडे येणारी लालपिवळी "आपुली" यस्टी दिसली की, बस्स ! काय तो आनंद..... काय त्या कंडक्टराची मिजास..."ज्यादा जागा न्हाई, चारच चढा.." मग डझनभरांची अजिजी.... ड्रायवरभाऊंच्या बाजुने वशीला लावणे.... मग उपकार केल्याच्या भावनेने दोन्ही रावसाहेबांची सर्वांना जागा देण्याची तयारी.... ढिगभर गाठोडी पाहुन त्याचा उठणारा मस्तकशूळ.. मग "आसु दे रे राज्या, पोरीकडं सरकारी दवाख्यान्यात चाल्लोया, लई शिक हाया ती. घोंगडीच हाईती त्यात.." अशी एखाद्या जनाबाईची विनवणी....मग कंडक्टरचं ढेकळासारखं विरघळून जाणं.
फार सुंदर... घरचे चित्र आहे.... "एस.टी." म्हणजे.
4 Aug 2010 - 2:35 pm | पाषाणभेद
एकदम बारीक निरीक्षणाचे वर्णन. अशा जनाबाईची विनवणी ऐकून विरघळणार नाही तो कंडक्टर कसला? तो ही त्याच मातीतून आलेला असतो. त्याची नाळ अशीच एखाद्या जनाबाईशी जुळलेली असते. म्हणूनच एस्टी एक समाजजीवन जोडणारी रेषाच आहे.
अजूनही मी काहीच काम नसले की उगाचच एसटी स्टँड वर भटकतो. वेगळा न राहता प्रवाशांमध्ये मिसळतो.
4 Aug 2010 - 3:10 pm | समंजस
अचुक निरीक्षण आणि सुंदर(हृदयस्पर्शी) वर्णन.
4 Mar 2012 - 8:00 pm | प्रदीप
वर्णन.
अचानक हा जुना धागा वर आला आणि हा प्रतिसाद नजरेस पडला. गेलात तरी कुठे तुम्ही इन्द्रराज!
4 Aug 2010 - 2:44 pm | भाऊ पाटील
झकास लेख अन त्यावर इन्द्र देवांचा प्रतिसादही अति सुंदर!
4 Aug 2010 - 2:58 pm | वारा
पन्हाळा, वाघबीळ, गिरोली कोडोली मार्गे वाठार व पेठ वडगांव ला जाउन आल्या सारखे वाटले..
4 Aug 2010 - 3:25 pm | हेम
एकदम झक्कास लेख
ट्रेक संपवून आडनिड्या गांवात कोसळल्यावर, धुरळा उडवत येणार्या ला. पि. बशीला पायल्यावर कांय आनंद होतो ते अनुभवींनाच कळेल..
कोकणात आजही या बस म्हणजे प्राणवायू आहेत. . सकाळी पावणेसहाची कोल्हापुर- मालवण टपाल बस.. घाटी अन् मालवणीची झकास सरमिसळ असलेला प्रवास...
सध्याची परिवर्तन १ लंबर.. सुरुवातीला भाडं जास्त असेल या विचाराने लोक या बशीत जायला कचरायचे, म्हणून महामंडळाला बसवर लिहावं लागलं...'साध्या दरात' .
4 Aug 2010 - 3:27 pm | समंजस
व्वा! पाषाणभेदी साहेब एसटी वर सुंदर लेख टाकलाय. अभिनंदन !!
एसटीचं महत्त्व खुप आहे ग्रामीण भागात प्रवास करायला. एवढी स्वस्त आणि पक्के रस्ते नसलेल्या ठिकाणी जाण्याकरीता अर्थातच एसटी शिवाय पर्याय नाही. कित्येक दुर्गम ठिकाणी एसटी तोटा सहन करून चालवल्या जाते ती फक्त प्रवाशांच्या प्रवास सुविधेकरीता.
मला स्वतः ला तरी एसटीने प्रवास करणे आवडतं. जेव्हा शक्य असेल तेव्हा मी एसटीनेच प्रवास करतो.
खाजगी गाडयांनी (अवैध प्रवासी वाहने) यांच्या पेक्षा एसटी खरंच खुप सुरक्षीत वाटते.
4 Aug 2010 - 4:25 pm | दिपक
वाह पाभे.. जबराट मस्त लेख.. एसटी ची मजाच निराळी. लाल डब्बा पाहिला की मुंबई ते सावंतवाडी केलेल्या फेर्या आठवतात. एसटी बस स्थानक पण खुप आवडीचे ठिकाण. ते कानिफनाथ रसवंती गृह... :-)

4 Aug 2010 - 4:36 pm | जोशी 'ले'
मस्तच लिहिलंय ...
आमच्या लहानपणी एक बडबड गीत म्हणत असू ' लाल पिवळी एस टी थांब ना GA जरा , मामाच्या गावाला घेऊन जा ग मला ' त्याची आठवण झाली
4 Aug 2010 - 5:56 pm | मीनल
मला यस्टी लागते. त्यात आंबा, फणस, काजू यांच्या एकत्रित वासाने हमखास उलटी होते.
4 Aug 2010 - 6:01 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत !
माझ्या बाजूला तर कायम एक उंच हिराची केरसुणी घेउन लोक येउन बसतात.
5 Aug 2010 - 2:04 am | Pain
किती रे टोमणे तुझे
5 Aug 2010 - 2:05 am | Pain
किती रे टोमणे तुझे
4 Aug 2010 - 6:26 pm | बेभान
मन फ्रेश केलेस गड्या..
लोक नेहमीच परिवाहन महामंडळ सेवेबद्दल आठ्या घालताना दिसतात पण मला हे एस.टी. चे चालक वाहक दिवाळी, गुढीपाडवा या मोठ्या सणांनासुद्धा आपल्या घरच्यांसमवेत न राहता हे एस.टी. कर्मचारी ’प्रवाशांच्या सेवेसाठी’ कामावर असलेले दिसतात तेंव्हा वाटतं की कोण प्रवासी कधी यांना सुखरूप सेवेबद्दल त्यांना धन्यवाद तरी देत असतील काय? हो काही ठिकाणी गरज आहे ती व्यवस्थापन विकासाची. अमेरिकेतल्या बस सेवांकडुन बरेच काही घेण्यासारखे आहे. उदा. ज्याप्रमाणे तिथले वाहक प्रत्येक सुरुवातीच्या थांब्यावर बसमधील सर्व प्रवाशांचे स्वागत करून त्यानंतर आपली ओळख, आणि मग शेवटच्या थांब्यापर्यंत कितीवेळ लागेल, बस कुठे-कुठे आणि कितीवेळ थांबेल याची माहीती देतो, थांब्याआधी त्यांच्याजवळ असलेल्या माइक्रोफोनद्वारे त्या थांब्याची सुचना देणे इ. गोष्टी सुरू करण्यात काहीच प्रॉब्लेम नाही. काही लोक एस.टी. वाहकांना त्यांच्या उर्मट वागणुकीमुळे त्यांना Customer Relationshipचे शिक्षण देण्याचे सल्ले देतात पण हाच वाहक रोज जवळ जवळ २००+ हौशे, नवशे, गौशे, अडाणी, सुशिक्षीत, म्हातारे, तरणे, गाववाले, शहरी, वाडी-वस्तीवाले, अशां लोकांबरोबर ’डील’ करतो. सकाळी जर आपल्या मनाला न पटणारी गोष्ट झाली तर आपली दिवसभर तावाताव होते. तिथे हा माणुस, दिवसभर यांच्या वाटयाला असलीच कामे येत असतात. त्यातुन महत्वाचं एस.टी.ची अर्थिक जबाबदारी या वाहकाकडे. कोण पासवाले, कोण जेष्ठ नागरीक, कोण १/२ तिकीट, त्यातून प्रत्येकाचा थांबा त्याच्या लक्षात ठेवणं..आपल्याला नसतं बाबा जमलं.
एस.टी. चा प्रवास सुरक्षीत प्रवास, गाव तिथे एस.टी., प्रवासात कुठे बरं-वाईट झालं तर फुल नाय फुलाची पाकळी १-२ लाख तरी मिळतात. प्रवाशांची असली काळजी कारते काय खाजगी वाहतुक? वर या खाजगी वाहतुकींच्या वक्तशीरपणाबद्दल सर्वांनाच अनुभव असावा यावर यांचे ड्रायवर कधी-कधी तर्री लावुन, बेशिस्त वाहने चालवताना दिसतात. याउलट जर का एस. टी. चालकाने ठराविक वेळेआधी बस आणली तर त्याच्यावर वेगाच्या उल्लंघनाचे कारणे दाखवा शीट बनते असे एका एस.टी. कर्मचा-याकडून ऐकीवात आहे. एवढं असुनही दुर्दैवाची गोष्ट म्हणजे उन्हाळा, दिवाळीच्या ’सिझन’मध्ये अवैध वाहतुक बंद करण्यासाठी एस.टी. महामंडळाला पोलिसांना पैसे (लाच) द्यावी लागते हे ही मला एस.टी. कर्मचा-याकडुनच सांगण्यात आले. असो महाराष्ट्राची ही ’लाईफलाईन’(१५५०० बसेस १२००० कर्मचारी, ७०लाख रोजचे प्रवासी) धडधाकटपणे प्रवाशांच्या सेवेसाठी प्रगतशील राहो आणि दुसरे काय म्हणणार.
यांच्या जालावर कधी गेलोच नव्हतो ..झकास बनवली आहे साइट..http://www.msrtc.gov.in/msrtc_live/index.html
4 Aug 2010 - 7:54 pm | प्रभो
मस्त लेख रे पाभे...आमचा बाप यास्टीतच कामाला असल्याने (कारकून) मस्त वर्षातून दोन महिने पास मिळायचा....मला १८ पुर्ण झाल्यापासून मिळत नाही आता.. :( पण त्यामुळे जी लहानपणापासून सवय लागलीय यास्टीची ती अजूनही आहे.
कुठुनही कुठेही कितीही तास यास्टीने प्रवास करू शकतो... :)
4 Aug 2010 - 9:57 pm | कळस..
जयभीम प्रभो दादा काय बोललास रे ........
4 Aug 2010 - 8:59 pm | नाना बेरके
लेख फार मस्त लिहिलात राव तुम्ही. विषयही जिव्हाळ्याचा आहे. एष्टी आणि पोष्टमन ह्या दोनच गोष्टी, कामाच्या निमित्ताने का होईना पण, खेड्याशी नाते जोडून आहेत.
4 Aug 2010 - 10:33 pm | शिल्पा ब
महाराष्ट्रात कुठेही जायचं असेल तर स्वताची गाडी नाहीतर यष्टी याशिवाय प्रवास करूच नये...फारतर ट्रेनने जाता येईल...
एक दोनदा नीता का काय travel ने नाशिक ते सीबीडी असं यायचं होता, यष्टीला उशीर होता म्हणून.....गाडी चेम्बुरला स्वस्तिक पार्क जवळ थांबवणार होते...रात्रीची वेळ होती ...आणि आम्हाला त्या लोकांनी "पुलावरून गाडी जाणार म्हणून इथंच उतरायचं " असं करून उतरून दिलं .... अर्धवट झोपेत उतरलो आणि स्वतिक पासून बरेच लांब कि...रिक्षावाले एक दोनच...फारच त्रास झाला...
पुन्हा काही असल्या भानगडीत नाही पडणार.
लेख भारी आवडला...दिलेल्या वेळेवर यष्टी सुटते आणि ठरलेल्याच जागी नेऊन सोडते... आता लाल डबा थोडा (म्हणजे बरेचदा खूपच ) साफ केलेला नसतो...त्यामुळे फारतर एशियाडने जाते...शिवनेरी वगैरे भानगड अगदीच एशियाड नसेल तरच.. लहानपणच्या खूप चांगल्या आठवणी आहेत येष्टीच्या..
4 Aug 2010 - 11:54 pm | सुनील
महाराष्ट्रात कुठेही जायचं असेल तर स्वताची गाडी नाहीतर यष्टी याशिवाय प्रवास करूच नये
मान्य. स्वतःचे वाहन उत्तम. अर्थात, जिथे जाणार तिथे जर ओली पार्टी अपेक्षित असेल, तर स्वतःचे वाहन न नेणे (किमान स्वतः न चालवणे) हेच इष्ट!
अन्यथा, सरकारी उपक्रमाच्या वाहनांना (येथे एसटी) प्राधान्य देणे हेच योग्य. त्याची प्रमुख कारणे -
१) सरकारी उपक्रमांच्या तिकिट भाड्यात विमा अंतर्भूत असतो.
२) वाहन बिघडले तर पर्यायी वाहन उपलब्ध होण्याची शक्यता अधिक असते.
३) वाहन ठरलेल्या मार्गावरून, ठरलेले थांबे घेत जाण्याची खात्री असते.
बाकी, पाभे, लेख उत्तम. खिडकीची जागा मिळाली असेल तर, लाल डब्बादेखिल लांबच्या प्रवासात विलक्षण आनंद देऊन जातो!
4 Aug 2010 - 11:59 pm | ऋषिकेश
"गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एस्टी" म्हणणारी ही एस्टीच महाराष्ट्राची खरी जीवनवाहिनी आहे. सुंदर लेख
5 Aug 2010 - 12:16 am | पुष्करिणी
सुंदर लेख.
5 Aug 2010 - 12:36 am | घाटावरचे भट
मस्त लेख. लहानपणीच्या यष्टी प्रवासाच्या आठवणी जाग्या झाल्या...
5 Aug 2010 - 1:05 am | राजेश घासकडवी
पवारांची बारीक निरीक्षणंही आवडली.
महाराष्ट्राच्या खेडोपाडी पोचून अतिशय अल्प दरात सर्वांना प्रवास घडवणाऱ्या एसटीला सलाम.
या भारतवारीत दापोलीला जाताना लाल डब्बा प्रवासाचा अनुभव खूप वर्षांनी पुन्हा एकदा आला. भन्नाट वेगाने जाणाऱ्या बसच्या खिडकीत बसून केस भुरभुरल्याचं अजूनही आठवतंय. तीन तास तसं बसल्यानंतर केसांवरनं हात फिरवला की होणारा कडक स्पर्शही. बसचा धडाकेबाज प्रवास, मागच्या सीटवर बसायला लागलं तर बसणारे गचके, सिटांच्या मागच्या बाजूला करून ठेवलेल्या 'संजू (हृदयातून बाण) जयश्री' टाईप प्रेमाच्या घोषणा... खूप काही आठवलं.
5 Aug 2010 - 11:54 am | इन्द्र्राज पवार
धन्यवाद राजेश जी....
खरं तर खूप काही लिहिण्यासारखे आहे या ह्र्दयस्पर्शी विषयावर, विशेषतः ज्यांनी एस.टी.ने ये-जा करून आपले शिक्षण पूर्ण केले आहे, नोकरी केली आहे (माझी थोरली मावशी - जी जि.प.च्या प्रा. शाळेत सुमारे ४० वर्षे नोकरी करून हेड मिस्ट्रेस (गाव उच्चारी "थोरल्या मास्तरीणबाई") या पदावरून निवृत्त झाली, तिने तर नोकरीचे सारे आयुष्य एस.टी. प्रवास करून काढले, म्हणजे तीने जर लिहायचे मनात आणले तर याच विषयावर फार सुंदर लेखन करेल, इतकी साथ दिली आहे "यस्टी" ने प्रा.शिक्षक मंडळीना. ज्या दिवशी, ज्या गावातून, ती रिटायर झाली त्या दिवशी रितिप्रमाणे सरपंचाच्या हस्ते तिचा सत्कार तर झालाच, पण त्या दिवशी त्या रूटवर असलेल्या एस.टी.कंडक्टर आणि ड्रायव्हर या दोघांनीही तितक्यात एक फुलांचा गुच्छ प्राप्त करून "एस.टी. आगाराकडून आमच्या रोजच्या ताईंना....ज्यांनी इतक्या वर्षाच्या प्रवासात एस.टी.बद्दल एकही वाईट शब्द बोललेला नाही." असे भावपूर्ण उद्गार काढून तिच्या हातात दिला. उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आलेले आम्ही पाहिले. (मावशीही रडत होती).
ही खरी एस.टी.ची आत्मियता !
"सिटांच्या मागच्या बाजूला करून ठेवलेल्या 'संजू (हृदयातून बाण) जयश्री' टाईप प्रेमाच्या घोषणा"
हा एक वेगळाच वाङ्मय प्रकार (किंवा ग्राफिटी) आहे. खूप मजेशीर.
इन्द्र
5 Aug 2010 - 4:11 am | मिसळभोक्ता
आमच्या लहानपणी, लाल बस वरचा पिवळा पट्टा मागच्या दारावर (मागच्या चाकाच्या बाजूला) झुकायचा. तो नुस्ताचा आडवा झाला, तेव्हा दु:ख झाले होते.
25 Sep 2010 - 12:54 pm | चिगो
गर्दीत चेंबून घेत, खिडकीतऊन रुमाल टाकुन जागा "पकडून", लहानपणी एकदोनदा तर सरळ खिडकीतून आत घुसून, डायव्हरच्या केबिनमधे बसून, असा विविध प्रकारे केलेला प्रवास आठवला.. खरंच मजा होती यस्टी प्रवास म्हणजे..
25 Sep 2010 - 1:35 pm | आप्पा
जिल्हा सोलापुर, तालुका बार्शी, मु.पो. ------------
जय हो!!
25 Sep 2010 - 1:38 pm | अमोल केळकर
एस टीचा आता एक नवीन ब्रँड आला आहे शीतल
पुणे - दादर रुट वर. थोडक्यात एसी एशीयाड . शिवनेरी पेक्षा स्वस्त आणि एशियाड पेक्षा महाग
रेल्वे स्टाइल गरिबरथ :)
अमोल
25 Sep 2010 - 5:16 pm | साधामाणूस
श्री. पाषाणभेद यांचा लेख आवडला. त्यांनी शेवटच्या परिच्छेदात वर्णन केल्याप्रमाणे 'यष्टी'तून नेल्या जाणार्या विविध वस्तूंचे आणि एकंदरीत कोकण यष्टी प्रवासाचे छान वर्णन पु. लं. च्या म्हैस या कथेतदेखील आहे.
बर्याचदा ग्रामीण भागात ठराविक मार्गांवर ठराविक नंबरांच्या बसेस सोडत असत. आम्ही जेवणाच्या सुटीत घरी निघालो की स्टॅंडवर नेहमी MHQ 8840 ही बस थांबलेली दिसायची. तीही बरेच (तीनेक वर्षे तरी) दिवस.
श्री. बेभान यांचा प्रतिसादही आवडला.
25 Sep 2010 - 6:51 pm | योगप्रभू
एस. टी. मग ती लालपिवळी असो, हिरवी एशियाड असो किंवा निळी शिवनेरी असो कधीच मनातून जाणार नाही. शाळेच्या सहलीच्या वेळी हार घालून सजवलेली एस. टी बघितली की आम्ही मुले हरखून जायचो आणि सहल संपताना आम्हाला न्यायला आलेले सगळे आई-बाबा मंडळी कधी एकदा आमची एस. टी. दिसतीय याची वाट बघताना दिसत.
आमच्या लहानपणी सिटीबसचे तिकिट १० पैसे आणि एस. टीचे तिकीट सव्वा रुपया असे बघितले आहे. ते मोजून दिलेले पैसे हरवू नयेत म्हणून घामेजलेल्या मुठीत धरुन ठेवायचे.
लक्षात राहायची ती एस.टी. ची हिरव्या रंगाची रेक्झिनची खरखरीत सीट कुशन्स. बहुतेक ड्रायव्हर-कंडक्टर याच कव्हरच्या पिशव्या वापरत आणि स्टाफचा माणूस या पिशव्यांवरुन ओळखत. एका मराठी चित्रपटात अशोक सराफ धांदरटासारखा रेखा रावच्या मांडीवर बसतो. ती त्याच्यावर डाफरते. त्यावर माफी मागून अशोक म्हणतो, 'तरी म्हणलं यश्टीच्या शिटा येवड्या मऊ केव्हापासून झाल्या?'
सुटीत सायकलची तुटलेली घंटी आणि दोरी वापरुन घरातच एस. टी. चा आभास तयार करणे किंवा दिवाळीच्या सुटीत रिकाम्या काडेपेट्यांच्या एस. टी. बस तयार करुन, रंगवून किल्ल्यापुढे मांडणे.
कॉलेजच्या दिवसात आमचा वात्रटपणा चालायचा. बसमध्ये शेजारी वही ठेऊन बसायचे. कुणी विचारले तर 'बसलंय कुणीतरी 'असं बिनदिक्कतपणे सांगून टाकायचं आणि कॉलेजातला एखादा छान चेहरा येताना दिसला, की हळूच वही उचलायची आणि मग अर्धा तास छान जायचा.
तर हा आमचाही आठवणींचा कोलाज. मस्त विषय छेडला पाषाणभेद यांनी. :)
13 Oct 2010 - 12:03 pm | जिन्क्स
लहानपणी मला कोणी विचारले कि मोठ झाल्यावर काय होणार तर मी सांगायचो की एस. टी. ड्रायवर होणार.
ड्रायवरच्या मागच्या सीट वर बसुन तो गाडी कशी चालवतो हे पहाण्यात धन्यता वाटे (अजुनही वाटते) . जुन्नर - घाटघर हा प्रवास ट्रेकर्स मंडळी बर्याच वेळेला करतात. त्या मंडळींचा हा प्रवास केल्या नंतर एस. टी. बद्दलचा आदर द्विगुनित होतो.
तेवढं ते ३रा, ४था आणि ५वा गियर टाकतानी डायवर मामा क्लच दाबत नाही हे बघुन फार वाइट वाटे. डायवर मामा हि एक आळशी जमात आहे असा आमचा आजही समज आहे.
4 Mar 2012 - 12:15 pm | रघुनाथ.केरकर
मला ल हान पणा पसुनच वाटते की एस टी ड्राईव्हर हा एक न. ड्राईव्हर
4 Mar 2012 - 7:00 pm | गणामास्तर
लहानपणीचे एकट्याने केलेले पुणे- उस्मानाबाद प्रवास आठवले. प्रत्येक स्थानका वरील ते कानिफनाथ रसवंती गृह आणि नौशाद कोल्ड्रिंक्स सुद्धा आठवले..:)
सर्व आठवणींमुळे अंमळ हळवा झालो आहे.