परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ................?भाग - ५

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
30 Jun 2010 - 1:15 pm

image006

Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४

तेवढ्यात कॅमर्स माझ्याकडे येताना मला दिसला. एका दुसर्‍या अभ्याससत्राचा निमंत्रक न आल्यामुळे ते काम करशील का? असे तो मला विचारत होता. मी आनंदाने त्याला होकार दिला. त्याने मला त्यातील वक्त्यांची नावे सांगितली आणि त्यांची ओळख करुन घेण्यासाठी ते कुठे भेटतील तेही सांगितले. हे अभ्याससत्र ज्या सभागृहात होते ते मुख्य सभागृहापेक्षा खूपच लहान होते आणि श्रोत्यांची संख्या असेल जेमतेम २००/३००.

पहिले भाषण होते अतिंद्रीय शक्तीचे नावाजलेले अभ्यासक गॅरी श्वार्टझ यांचे. त्यांनी जे “After Life Experiments” नावाचे पुस्तक लिहिले होते त्यात त्यांनी केलेल्या बर्‍याच प्रयोगांची माहिती लिहिली आहे. त्या पुस्तकात त्यांनी हे सिध्द करायचा प्रयत्न केला आहे की चित्त/आत्मा वगैरे जे काही असते त्याचे अस्तित्व माणसाच्या शारीरिक मृत्यूनंतरही असते. ते एरिझोना विद्यापिठाच्या “Human Energy Systems Labs” या प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून काम करतात. त्यांचा या क्षेत्रातील आधिकार फार मोठा आहे. त्यांनी त्यांच्या विद्वत्तापूर्ण भाषणात त्यांचे विचार मांडले आणि असा खेदही व्यक्त केला की विज्ञानजगत या शोधांना फारसे गांभीर्याने घेत नाही. त्यानंतर फ्लोरिडामधल्या एका विद्यार्थ्याचे ’दूरदृष्टी” वर भाषण झाले. त्यानंतर एका जर्मन संशोधकाचे. त्यात त्याने आपण दुसर्‍याची मज्जारज्जूची व्यवस्था जाणीवपूर्वक कशी मृतवत करु शकतो हे सांगितले. मुख्य सभागृहामधे ऐकलेल्या कंटाळवाण्या शास्त्रीय भाषणांपेक्षा मला हे अभ्याससत्र आवडले कारण यात मेंदूच्या पलिकडे जाऊन शोध घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला होता आणि हे सगळे सगळ्यांनाच नवीन होते. परिषदेचा मुख्य विषय चेताशास्त्र हा असतानासुध्दा हे विषय चर्चेला आलेले पाहून मला फारच आश्चर्य वाटले. एका अभ्यासकाचा विषय तर चेतना आणि ध्यान धारणा हा होता तर दुसर्‍याचा कला, आत्मा आणि जाणीव असा होता. या सगळ्या चर्चांना चांगलीच गर्दी होती. एका सभागृहात कृत्रिम मेंदू आणि यंत्रमानवावर चर्चा चालली होती. मी कॅमर्सला या बाबतीत विचारले असता तो म्हणाला “ या विषयांवर आपल्याला इतकी थोडी माहिती आहे की जेवढे विचार ऐकायला मिळतील ते आपल्याला हवेच आहेत. काय सांगावे काहीतरी महत्वाचे हाती लागायचे. या बाबतीत माझी भूमिका १०० फुले उमलू देत अशीच आहे." आयोजकांनी जरी या कारणाने सगळ्यांना आपले विचार मांडायला परवानगी दिली होती तरी सगळ्या परिषदेचा कल हा वैज्ञानिक विश्लेषणाकडेच होता. मेंदूच्या कामाचे रहस्य हे विज्ञानाच्या नियमाने सिध्द व्हायला हवेत हे सगळ्यांचे स्पष्ट मत होते. मला पण हेच आपेक्षित होते. आठवड्याच्या आतच आपला मेंदू आपले चित्त तयार करतो हे मला पटायला लागले होते. हे जर खरे असेल तर आपण ज्याला सत्य समजतो ते बर्‍याच प्रमाणात चूक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आठवड्यात मला इतरही गोष्टी माहीत झाल्या त्या अशा –
१ स्वतंत्र इच्छाशक्ती हा एक भ्रम आहे.
२”मी” हा पण एक भ्रम आहे
३ चित्त हेही एक प्रकारचा भ्रम आहे किंवा ते स्वत:हून काहीही करत नाही.
हे सगळे कळल्यावर माझी अवस्था एखाद्या खोल विहिरीत पडल्यासारखी झाली. मी पुरता गोंधळून गेलो. एक सामान्य माणूस म्हणून मी या सर्व संशोधकांची भाषणे ऐकली होती आणि या क्षेत्रातला प्रवेश किती अवघड आहे हेही मला चांगलंच समजलं होतं. मला आश्चर्य वाटत होते की हे सगळे या लोकांना कसे पटत होते ? समजा तुमची प्रेयसी तुमच्या डोळ्यात बघून म्हणाली की हे एक अल्गोरिदम आहे तर तुम्हाला कसे वाटेल ?तशीच माझी अवस्था झाली. मला तर शेवटी असे वाटायला लागले की या सर्वांचा मेंदू आम्हाला हे ( आपण म्हणजे फक्त आपला मेंदूच आहे) पटवण्यासाठी प्रोग्रॅम केला आहे की काय !

मनाचा संक्षिप्त इतिहास
परवा परवा पर्यंत माणसाच्या मानसशास्त्रामधे मेंदूचा सहभाग आहे हे बहुसंख्य लोग मानायला तयार नव्हते. माणसाच्या मनाचा आणि मेंदूचे काहीतरी नाते आहे हे सांगणारा आणि तसे लिहून ठेवणारा या भागातला पहिला माणूस म्हणजे क्रोटॉनचा पायथॉगोरिअन अल्मिऑन. हे त्याने ५व्या शतकात लिहून ठेवले आहे. त्या अगोदर अशी समजूत होती की माणसाचे मन ह्रदयात आहे. उदा. इजिप्तचे पुजारी जेव्हा प्रेताची ममी तयार करायचे तेव्हा नाकावाटे सर्व मेंदू कोरुन बाहेर काढायचे पण ह्रदयाला मात्र हात लावायचे नाहीत. कारण ह्रदय हे माणसाच्या बुध्दीचे निवासस्थान समजले जायचे आणि मृत्यूनंतरच्या जगात त्याला बुध्दीची गरज भासणार आहे याची त्यांना खात्री होती. पुरातन काळात प्रेताचे विच्छेदन निषिध्द मानले जायचे त्यामुळे मज्जातंतुची माहीती असायचे काहीच कारण नव्हते. त्यामुळे भावना अनावर झाल्यावर ह्रदय धडधडायला लागायचे याचे कारण, ह्रदयात मन आहे असेच ते समजायचे. माणसाच्या मानसिक आणि बौध्दिक विश्वाचे केंद्र ह्रदयात आहे असा त्यांचा दृढ समज होता. गंमत म्हणजे एरिस्टॉटलसारख्या थोर वैज्ञानिकाचीसुध्दा याला पुष्टी होती. एक बुध्दिमान जीवशास्त्रज्ञ असल्यामुळे त्याला एक खात्री होती ती म्हणजे मेंदूसारख्या अवयाला (डोक्यातल्या भागाला) काहीतरी महत्वाचे काम असणारच. मेंदू हाताला गार लागल्यामुळे त्याने असे अनुमान काढले की या अवयवात रक्त गार करायची रचना निसर्गाने केली आहे. माणसाच्या मेंदूच्या (इतर प्राण्यांच्या तुलनेत) मोठ्या आकारचे, त्याने त्याचे पण मजेशीर स्पष्टीकरण दिले – माणसाला विचार करण्याची ताकद दिली असल्यामुळे त्याचे रक्त जास्त गरम होते म्हणून रक्त गार करण्यासाठी मोठी व्यवस्था लागते.

एल्मिऑनच्या सिध्दांताला हिप्पोक्रस व प्लॅटोसारख्यांचा पाठिंबा मिळाल्यामुळे सुदैवाने वरील समजूत मागे पडली. नंतर एरिस्टॉटलच्या विरोधाला न जुमानता रोमन काळातल्या वैद्यांनी या कल्पनेला उचलून धरले. त्यांनी अजून एक महत्वाचे काम केले, ते म्हणजे कर्मठ लोकांचा विरोध झुगारुन त्यांनी चक्क शवांचे प्रयोगासाठी विच्छेदन चालू केले आणि त्यात त्यांना झाडांच्या फांद्याप्रमाणे कवटीतून आणि मणक्यातून विस्तारत जाणार्‍या मज्जातंतूंचे अस्तित्व सापडले. १७ व्या शतकापर्यंत या शोधावर वाद चालले होते, जसे त्याच शतकात तत्वज्ञानी हेन्री मूर म्हणाला “हा माणसाच्या कवटीतला करड्या रंगाचा पदार्थ माणसाला विचार करायची ताकद देतो असे म्हणणे हास्यास्पद आहे." हे ही लक्षात घेतले पाहिजे त्या काळातली मेंदूची प्रतिकृती आणि आत्ताची प्रतिकृती यात महदंतर आहे. आपण आता मेंदू हे अब्जावधी न्युरॉन्सचे, विद्युत आणि रसायनांचे जाळे म्हणून ओळखतो. पण त्या वेळी ते असे समजत की मेंदूमधे असंख्य कप्पे आहेत आणि त्यात एक स्वर्गिय रसायन भरले आहे. हे रसायन, जे चैतन्य मज्जातंतूमधे असते, त्याच्या मार्फत शरीराच्या कानाकोपर्‍यापर्यंत आपल्या आज्ञा पोहोचवते. हा जो बदल झाला म्हणजे चैतन्यावर आधारीत मेंदूच्या कामाचे विश्लेषण करणे ते आता शुध्द विज्ञानाचा आधार घेऊन त्याच्या कामाचे विश्लेषण करणे, याच्यामुळे धर्माच्या कर्मठ पाठिराख्यांना अजिबात न आवडणार्‍या कल्पनेचा जन्म झाला असे म्हणायला हरकत नाही. मन, आत्मा, इत्यादींना मेंदूच जन्म देतो तीच ही कल्पना. थोडक्यात काय या सगळ्याच्या मागे मेंदूच आहे ही कल्पना.

अर्थात इतर शास्त्रीय कल्पनांप्रमाणे या कल्पनेलाही बराच विरोध झालाच. एका घटनेमुळे मात्र या कल्पनेच्या विरुध्द असलेल्या लोकांमधे खळबळ उडाली. त्याचे असे झाले- वर्ष होते १८४८. फिनीस गेज नावाचा एक कामगार एका रस्त्याच्या कामावर देखरेख करत असताना एक स्फोट झाला अणि एक इंच व्यासाच्या सळईचा तुकडा जो उडाला तो एखाद्या बंदूकीच्या गोळीसारखा, त्याच्या डाव्या गालात घुसून, डोक्याच्या पुढच्या भागातून जाऊन, डोक्याच्या वरच्या भागातून बाहेर पडला. बाहेर पडताना त्याने मेंदूचा बराच भाग आपल्याबरोबर नेला. आश्चर्य म्हणजे गेज त्या धक्क्यातून काही मिनीटातच सावरला आणि काहीच न झाल्यासारखा वागू लागला. ज्या डॉक्टरांनी त्याला प्रथमोपचार दिले, त्याने असे नमूद केले आहे की त्या घटनेनंतर त्याबद्दल, गेज इतर घाबरलेल्या लोकांपेक्षा जास्तच स्पष्ट बोलत होता. त्याच्या माहीती गोळा करण्याच्या क्षमतेला काहीही झाले नव्हते. कालांतराने मात्र त्याच्यात काहीतरी मुलभूत फरक पडला आहे असे जाणवायला लागले. डॉ. जॉन हार्लो, ज्यांनी त्याच्यावर उपचार केले होते ते म्हणाले – गेज हा एक अत्यंत कुशल, जबाबदारीने वागणारा कामगार होता. त्या अपघातानंतर त्याचे वागणे अनिश्चित झाले. तो केव्हा काय करेल याचा भरवसा रहिला नाही. त्याचे वागणे उध्दट वाटू लागले. त्याचा धर्माबद्दलचा अनादर कमालीचा वाढला. त्याच्या इच्छेच्या विरुध्द काही झाले की त्याला त्या व्यक्तीबद्दल घृणा वाटायला लागली. हा सगळ बदल इतका भयंकर होता की त्याचे मित्र म्हणायला लागले की हा गेज नसून दुसराच कोणीतरी आहे.
गेजच्या या अपघाताच्या काळात शास्त्रिय जगतात, विषेशत: फ्रेनॉलॉजीमधे (आता हे शास्त्र लोप पावले आहे कारण ते शास्त्र मेंदूचा आकार आणि तो करतो ते काम याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करत होते.) मेंदूचा प्रत्येक भाग हा वेगवेगळ्या कामासाठी राखून ठेवलेला आहे या बद्दल एकवाक्यता होती. उदा. मेंदूत आलेल्या एखाद्या संवेदनाचा यथाशक्ती अर्थ लावणे, माहिती गोळा करणे, आणि या सगळ्याचे विश्लेषण करुन त्या निर्णयाप्रमाणे वागणे या सगळ्यासाठी वेगवेगळ्या जागा ठरलेल्या असतात असे त्यांचे म्हणणे होते. पण गेजमधे झालेल्या बदलामुळे या जगात परत एकदा खळबळ उडाली कारण मेंदूत अशा काही जागा आणि व्यवस्था आहेत ज्या तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख आणि वागणे ठरवतात, हे प्रकाशात आले. त्यानंतरच्या काळात मेंदूचे काम आणि आपण जे जगात अनुभवतो, वागतो यांच्यातला संबंध शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक दुखापत झालेल्या मेंदूंचा अभ्यास केलेला आहे. या आभ्यासातूनसुध्दा अनेक नवीन व धक्कादायक बाबी बाहेर पडल्या.

श्री. व्ही. एस. रामचंद्रन यांनी त्यांच्या एका ऑर्थर नावाच्या तरुण रुग्णाची हकीकत सांगितली आहे. ऑर्थरच्या गाडीच्या अपघातात त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यानंतर तो असे म्हणायला लागला की त्याला भेटायला येणारे हे त्याचे आई-वडील नसून दुसरेच कोणीतरी, पण त्याच्या आई-वडीलांसारखे दिसणारे आहेत. सगळ्यांनी त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थ. जेव्हा जेव्हा तो त्यांना बघत असे तेव्हा त्यांना तो स्पष्टपणे सांगत असे की भले तुम्ही माझ्या आई-वडीलांसारखे दिसत असाल, पण तुम्ही माझे आई-वडील नाही. गंमत म्हणजे तो त्यांना दुरध्वनीवर मात्र लगेचच ओळखायचा आणि त्यांच्याशी गप्पा मारायचा. या प्रकारच्या रोगाला आत्तापर्यंत “कॅपग्रास” असे म्हणत. या प्रकारच्या रुग्णांची इतिहासात बर्‍याच वेळेला नोंद झाली आहे आणि त्याचे उत्तर मानसरोग शास्त्रज्ञांनी सिगमंड फ्रॉईडच्या “ओडिपस कॉम्प्लेक्स” मधे शोधले आहे. ( थोडेसे ओढून ताणूनच म्हणाना). हा कॉम्प्लेक्स थोडक्यात असा सांगता येईल – जेव्हा माणसाचा इगो तयार होत असतो त्यावेळी कधी कधी त्याला एकदम त्याच्या विरुध्द लिंगाच्या पालकाबद्दल आपुलकी वाटायला लागते आणि त्याच्या समान लिंगाचा पालकच नकोसा वाटू लागतो.

पण रामचंद्रन यांनी याचे उत्तर वेगळे दिले.ते म्हणाले...... त्याच्या मेंदूमधल्या एका दृष्टीच्या केंद्राचे भावनांच्या केंद्राशी असलेला संबंध त्या अपघातात तुटला असणार. त्यामुळे तो आई वडिलांना ओळखत होता, पण त्यांच्याबद्दल त्याच्या मनात त्या भावना मात्र मुळीच नव्हत्या. त्याच्यावर उपाय म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला सुरवातीला वेळ नसल्यामुळे तोतया पाठवल्याबद्दल त्याची क्षमा मागितली. त्याचा थोडा काळ उपयोग झाला पण त्यानंतर परत तो तेच म्हणू लागला. जर आपण नेहमी आपले जे सामर्थ्य वापरतो ते एकदम काढून घेतले तर काय होईल याची कल्पना करणे फार अवघड आहे. उदा. एखादी घटना बघितल्यावर त्याच्यावर भावना व्यक्त करायचे सामर्थ्य गेले तर आपली काय अवस्था होईल ?
या सगळ्या कहाण्यांचा मतीतार्थ लक्षात घ्या. या सगळ्या कहाण्या आपल्या पुरातन समजुतीला धक्का देत आहेत. चेताशास्त्राच्या अनेक पुस्तकातून अशा अनेक घटनांची नोंद झालेली आहे.मेंदूच्या एका कुठल्याही भागाला थोडी जरी दुखापत झाली तर आपल्या कुठल्यातरी क्षमतेवर त्याचा परिणाम निश्चितच होतो. याचाच दुसरा अर्थ असा होतो की जरी मेंदू सगळ्या क्षमता एकत्र करून त्याचा परिणाम दाखवतो पण त्यातल्या एखाद्या क्षमतेला जर धक्का पोहोचला तर त्या एकत्रित क्षमतेवर परिणाम झाल्याशिवाय रहात नाही आणि तो जाणवण्या इतपत असू शकतो.

मेंदूला इजा पोहोचायची कारणे ही अपघातच असतात असे नाही. शल्यविशारद काही आजार बरे करायला मुद्दाम मेंदूच्या एखाद्या भागाला शस्त्रक्रिया करुन इजा करतात. (चांगल्यासाठी, पण इजाच ती). मेंदूच्या सर्व केंद्रामधे दळणवळण असते आणि या सर्व केंद्रांचे काम एकामेकांवर चांगलेच अवलंबून असते हे सध्या माहित असल्यामुळे तसल्या शस्त्रिक्रिया करायला सध्या कोणी सहसा जात नाही. काही अत्यंत न टाळता येण्याजोग्या शस्त्रक्रिया अर्थातच केल्या जातातच पण तो शेवटचा मार्ग म्हणून. (माझ्या माहितीच्या एक स्त्री आहेत, त्यांच्या मेंदूत कसली तरी शस्त्रक्रिया झाली. त्यांनी तिखट खाल्ले तर त्याचा तिखटपणा म्हणे त्यांना त्यांच्या गालावर जाणवायचा. मी स्वत: या विषयावर त्यांच्याशी बोललो आहे. त्यांच्या या सांगण्याशी त्या अत्यंत ठाम होत्या. नंतर हळू हळू काही वर्षाने हे कमी झाले पण त्यांची तिखटाची चव फारच नाजूक झाली.) पण १९४० ते १९५० या दरम्यान अपस्मार या रोगावर उपचार म्हणून मेंदूवर (पुढच्या भागावर) अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच १९६० मधे ज्या शस्त्रक्रिया याच कारणासाठी करण्यात आल्या त्यामुळे मेंदू आणि स्व चा संबंध काय आहे यावरही बराच प्रकाश टाकता आला.

अगदी सामान्य माणसालाही हे माहिती असते की आपल्या मेंदूचे दोन भाग असतात- एक डावा आणि दुसरा उजवा. या दोन्ही आपल्या वागण्याच्या प्रकारांमधे योगदान असते. आपल्याला हे माहिती आहे की डाव्या भागात तर्कशास्त्र इ. सारख्या ज्ञानाचे केंद्र असते तर उजवा भाग हा भावना, कला, अंतर्ज्ञान इत्यादीचे केंद्र असते. वैज्ञानिकांच्यामते हे वाचल्यावर हे सगळे सोपे आहे असे वाटायला लागते. पण ते तेवढे सोपे आणि बरोबरही नाही. असो. पण हेमीस्फेरीक स्पेशलायझेशन” हा सिध्दांत मात्र बर्‍यापैकी मान्य आहे. मेंदूच्या या दोन अर्धगोलात संवाद असतो आणि तो त्यांना जोडणार्‍या एका मज्जारज्जूतून होत असतो. त्याचे नाव आहे “कॉरपस कॉलोसम” हा स्त्रियांमधे आकाराने किंचित मोठा असतो म्हणून स्त्रिया एकाच वेळी अनेक गोष्टींवर आपले लक्ष केंद्रीत करु शकतात असे मानले जाते. पण या दोन बाजूंचा संबंध काही कारणाने तुटला तर आपल्या डोक्यात दोन मेंदू तयार होतील का ? मग आपली स्थिती शरीर एक आणि मने दोन अशी होईल का ? काही शास्त्रज्ञांना हा प्रयोग करायची नशिबाने आयतीच संधी मिळाली.

अपस्माराचे झटके अनेक प्रकारचे येऊ शकतात. त्यातले काही अत्यंत तीव्र असतात तर काही सौम्य. त्यातला सगळ्यात वाईट प्रकार म्हणजे सलग झटके येणे, ज्याने रोग्याचे जगणे मुष्कील होते. १९६० सालात चेताशल्यविशारदांनी मेंदूच्या एका अर्धगोलातून तो झटका दुसर्‍या अर्धगोलार्धात पोचू नये म्हणून मधल्या “कॉरपस कॉलोसम” वर शस्त्रक्रिया करून त्या दोन भागांचा संबंध तोडायचा प्रयत्न केला. ही युक्ती बर्‍यापैकी यशस्वी झाली असे म्हणायला हरकत नाही कारण जगणे अशक्य असणार्‍या रुग्णांना या शस्त्रक्रियेमुळे बर्‍यापैकी शांत जीवन जगता येऊ लागले. या दोन मेंदूंच्या माणसांवर प्रयोग करायची संधी डॉ. रॉजर स्पेरी यांनी घेतली. असे पूर्वी कधीच झाले नव्हते. त्यांनी पुढील काही वर्षे या अभ्यासात घालवली आणि ते काम प्रसिध्द केले. ते काम इतके महत्वाचे ठरले की या कामासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. या अभ्यासाचा हेतू हा मेंदूच्या दोन भागांचा अभ्यास करणे हा होता, परंतू नंतर असे आढळून आले की या अभ्यासातून अजून काहीतरी पण महत्वाचे निष्पन्न होत आहे.

पुढे चालू.....
भाग - ५ समाप्त.

जयंत कुलकर्णी.

समाजतंत्रविज्ञानविचारलेखअनुभव

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

30 Jun 2010 - 2:17 pm | प्रकाश घाटपांडे

ममीचे वाचताना दिल या शब्दावरुन हिंदीत्/उर्दुत किती तरी काव्य प्रेम व हृदय यातील भावनिक संबंधांशी आहे ते आठवले
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

युयुत्सु's picture

30 Jun 2010 - 3:48 pm | युयुत्सु

+१

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

युयुत्सु's picture

30 Jun 2010 - 3:51 pm | युयुत्सु

या कल्पनांची थोडी अधिक चर्चा केलीत तर वाचायला आवडेल

१ स्वतंत्र इच्छाशक्ती हा एक भ्रम आहे.
२”मी” हा पण एक भ्रम आहे
३ चित्त हेही एक प्रकारचा भ्रम आहे किंवा ते स्वत:हून काहीही करत नाही.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

मीनल's picture

30 Jun 2010 - 5:12 pm | मीनल

सर्व भाग वाचते आहे.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/