लुई़ज बूर्ज्वा - खोडसाळ, 'डेंजर' स्त्री शिल्पकार

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in जनातलं, मनातलं
8 Jun 2010 - 11:58 pm

लुई़ज बूर्ज्वा - छायाचित्र - रॉबर्ट मॅपलथॉर्प

या संस्थळावर पूर्वी काही कर्तबगार स्त्रियांची चरित्रे वाचली होती. नुकत्याच मरण पावलेल्या लुई़ज बूर्ज्वाची कहाणी त्या माळेत शोभावीशी आहे. शास्त्रज्ञांचे जग जसे पुरुषप्रधान आहे, तसेच दृश्यकला क्षेत्रही विसाव्या शतकाआधी स्त्रियांना फारशी भीक घालीत नव्हते. त्यात ती स्त्री बंडखोर असेल, तर तिला अधिकच त्रास होत असे. आजही भारतीयांना पाश्चिमात्य स्त्री कलाकार फारच क्वचित परिचयाचे असतात. भारतात लुईजच्या मृत्यूची दखल इंग्रजी-मराठी वृत्तपत्रांनी घेतलेली दिसली नाही. म्हणून या खट्याळ, 'दुर्गुणी' कलाकाराचा परिचय करून देण्याचे मनात आले.

लुईजचा जन्म १९११ मध्ये पॅरिसच्या एका उपनगरामध्ये झाला. पॅरिसमध्ये कलाशिक्षण घेतल्यानंतर १९३८ मध्ये आपल्या अमेरिकन नवर्‍यासह ती न्यू यॉर्कमध्ये स्थायिक झाली. आपल्या अभिव्यक्तीसाठी तिने प्रामुख्याने शिल्पकला हे माध्यम निवडले. त्यात ती सातत्याने काम करत राहिली. आज ती विसाव्या शतकातील अत्यंत महत्त्वाच्या कलाकारांमध्ये गणली जाते, पण तिचे पहिले मोठे प्रदर्शन १९८१ मध्ये, म्हणजे वयाची सत्तरी गाठल्यावर, न्यू यॉर्कच्या म्यूझिअम ऑफ मॉडर्न आर्ट (MoMA) मध्ये भरवले गेले. यावरून एका स्त्रीला कलाजगतात प्रस्थापित होण्यासाठी किती झगडावे लागते, हे लक्षात यावे. MoMA मध्ये एकल प्रदर्शन झालेली ती पहिली स्त्री होती. त्यासाठी निव्वळ विसावे शतक नाही, तर १९८१ साल उजाडावे लागले, हे ही लक्षात घ्यायला हवे.

पुरुषांविषयीची तिची मते घडवण्यात लहानपणीच्या एका अनुभवाचा मोठा हात होता. आपल्या वडिलांचे आपल्याच दाईशी शरीरसंबंध असल्याचे तिच्या लक्षात आले, तेव्हा ती ११ वर्षांची होती. ही गोष्ट आईला ठाऊक असूनही ती सोईस्करपणे वा नाईलाजाने तिच्याकडे दुर्लक्ष करते, हेही लुईजच्या लक्षात आले.

पुरुषप्रधान जगातल्या या पुरुषी कटात सामील होण्याच्या स्त्री-पुरुषांच्या सनातन प्रवृत्तीला लुईजने आपल्या कलाकृतींत अनेक पध्दतींनी हाताळले. उदा. क्युम्युल १ (१९६९) हे शिल्प पाहा.

Cumul-I

त्याचे नाव क्युम्युलस या ढगांच्या प्रकारावरून घेतले होते. पण आकार बदलणार्‍या ढगांच्या रुपात एकाच वेळी स्त्रियांचे स्तन, पुरुषांची लिंगे वा डोक्या़खेरीज संपूर्ण शरीर झाकणारे ख्रिस्ती जोगिणींचे बुरखे-झगे यांचा आभास होतो. लुईज मात्र म्हणते, 'यात मला तर काही लैंगिक आकार दिसत नाहीत!' म्हणजे, दोष असलाच, तर तो पाहाणार्‍याच्या दृष्टीतच आहे.

'यानुसचा मोहोर' (१९६८) या शिल्पातही अशी गंमत आहे.

Janus - fleurison

यानुस हा दोन तोंडे असलेला एक ग्रीक देव होता. त्याला भूत व भविष्य दोन्ही कळायचे, असे मानतात. त्याच्या पारंपरिक, दुतोंडी चित्रणपध्दतीचा वापर करून लुईज आणखी एक खेळ करते. कापसाचे बोंड उलावे, असे दिसणार्‍या या मोहोरात दोन टोकांची तोंडे ही पुरुषाच्या लैंगिक अवयवांचा आभास निर्माण करतात, तर मधील उलून येणारा भाग हा स्त्रीच्या लैंगिक अवयवाचा आभास व्यक्त करतो. जणू परंपरेने पुरुषी मानलेल्या दुतोंडी देवाच्या चित्रणात दोन मेंदूंच्या जागी स्त्री आहे!

पुरुषप्रधान व्यवस्थेत कुटुंब हा एक मोठा घटक असतो. 'सेल' नावाच्या मांडणीशिल्प (इन्स्टॉलेशन) गटामध्ये (१९९०-९३) कुटुंबव्यवस्थेवरील टीका दिसते. उदा. खालच्या चित्रात दिसणारे घर हे लुईजचे बालपण जिथे गेले त्या घराची प्रतिकृती आहे. ते एका पिंजर्‍यात आहे, व त्यावर एक गिलोटिन लटकते आहे. स्त्री जोवर घराची जो़खडे झुगारून बाहेर येत नाही, तोवर ती अडकून राहणार व शेवटी क्रूर पध्द्तीने तिचा शिरच्छेद होणार, असा काहीसा भाव यात जाणवतो.

Cell

'मामेल' (१९९१) नावाचे तिचे हे रबर शिल्प पाहा.

Mamelles
अभिजात भित्तीशिल्पासारखी रचना असलेले हे शिल्प म्हणजे लोंबकळणार्‍या स्तनांची एक रांग आहे. स्त्री पुरुषांचे पोषण करते, पण अनेक पुरुषांना ती निव्वळ वासनेची एक वस्तू वाटते. स्त्रीलंपट पण मूलतः स्त्रीद्वेष्ट्या अशा या 'डॉन युआन' प्रवृत्तीचे लुईजला यातून चित्रण करायचे होते. 'एका स्त्रीकडून दुसर्‍या स्त्रीकडे फिरत राहणार्‍या, त्यांचा भोग घेणार्‍या, पण त्यांना काही न देणार्‍या अशा स्वार्थी पौरुषाचं हे चित्र आहे.' असे स्वतः लुईजने या शिल्पाविषयी म्हटले आहे.

लुईजचे खेळ नेहमी टीका करणारेच होते, असे नाही. उदा. 'नजरेला नजर' (१९७०) या गुळगुळीत, संगमरवरी शिल्पामध्ये एक हळुवारपणा जाणवतो. त्यात उभी लुईज ही जणू लुचू पाहाणार्‍या मुलांच्या मध्ये उभी असणारी आई वाटते.
Eye to Eye

पण गुळगुळीतपणा हा फसवासुध्दा असू शकतो. उदा: 'स्त्री सुरी' (१९८२) या अत्यंत आकर्षक दिसणार्‍या शिल्पात सुरीवजा धमकीही आहे.
Femme Couteau

स्त्री असण्यामागचा ताणही तिच्या 'आर्च ऑफ हिस्टेरिआ'सारख्या (१९९३) शिल्पांत दिसतो.

Arch of Hysteria

गृहिणी-सखी-सचिव असल्या पारंपरिक स्त्री-प्रतिमेला छेद देणारी आणि स्त्रीत्वातल्या मऊ-खडबडीत, आकर्षक-धोकादायक, खेळकर-जीवघेण्या अशा द्वैताला सामोरे जाण्यास भाग पाडणार्‍या लुईज बूर्ज्वाची ही काही उद् धृते:

मी नरकापर्यंत जाऊन परत आलेली आहे, आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की ते सर्व अद् भुत होतं.

जे म्हणायला लोकांना भीती वाटते, ते कलाकार व्यक्त करू शकतात.

स्वतःला व्यक्त करणं हे एकाच वेळी पवित्र आणि जीवघेणं असतं.

अधिक माहितीसाठी पहा.

कलासंस्कृतीइतिहाससमाजलेखमाहितीआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

9 Jun 2010 - 12:07 am | शिल्पा ब

ह्मम्म...नेहमीपेक्षा डेंजर आहे खरं...ताण व्यक्त करण्याची शैली आवडली.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

टारझन's picture

9 Jun 2010 - 12:14 am | टारझन

जगदंब ... जगदंब !!

- शिल्प ड

बेसनलाडू's picture

9 Jun 2010 - 12:21 am | बेसनलाडू

शिल्पकार आजी खोडसाळ नि डेन्जर आहेत, हे पटले.
(घाबरट)बेसनलाडू

भडकमकर मास्तर's picture

9 Jun 2010 - 12:32 am | भडकमकर मास्तर

अगायायायाया....
पहिलाच फोटो शेंडीला झिणझिण्या आणणारा...

जगात बरेच लोक इतर कोणाचीही पर्वा न करता त्यांना वाटेल ते करत असतात, एवढे मात्र जाणवले...
शिल्पे आचरट वाटली तरी जगाला फाट्यावर मारायच्या या धैर्याचे कौतुक वाटते...

मुक्तसुनीत's picture

9 Jun 2010 - 12:37 am | मुक्तसुनीत

उत्तम लेख. धन्यवाद.
या बाईंना खोडसाळ म्हणणे म्हणजे आपल्या मुला नातवंडाना "मेल्या, चहाटळा" म्हणण्याच्या जातीचे वाटले. टर्म ऑफ एन्डीअर्मेंट.

लैंगिकतेच्या (जेंडर आणि सेक्शुआलिटी , दोन्ही अर्थाने ) विषयासंबंधीच्या कलाकृती हा प्रकार विसाव्या शतकात तरी नवा कधी होता असे मला वाटत नाही. मात्र स्त्रियांचा कलेच्या प्रांतातला(सुद्धा) प्रवेश उशीरा झाल्याने त्यांनी त्यांची मते , त्यांची राजकीयता या क्षेत्रात आणली ,शतकानुशतके ज्याना संधी मिळाली नाही त्यांचे आवाज ऐकायला मिळायला लागले हे सारे स्वागतार्ह. प्रस्तुत आजीबाईना आमचा सलाम.

बिपिन कार्यकर्ते's picture

9 Jun 2010 - 2:23 pm | बिपिन कार्यकर्ते

जंतुंचे लेखन नेहमीच वाचनिय आणि नवीन काही सांगणारे असते.

बिपिन कार्यकर्ते

शिल्पा ब's picture

9 Jun 2010 - 1:21 am | शिल्पा ब

कदाचित लैंगिकता अशी उघड्यावर मांडणे हे सभ्य स्त्रीचे लक्षण नाही हि संकल्पना पूर्वापार चालत आली आहे....म्हणून असेल, बंडखोरी करताना असे विषय हाताळले असू शकतील...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

सन्जोप राव's picture

9 Jun 2010 - 6:44 am | सन्जोप राव

उत्तम परिचय. अशा मुलखावेगळ्या कलाकारांविषयी आणखी वाचायला आवडेल.
सन्जोप राव
ठोकर ना लगाना हम खुद है
गिरती हुई दीवारों की तरह

धनंजय's picture

9 Jun 2010 - 8:01 am | धनंजय

उत्तम परिचय आणि रसग्रहण

सहज's picture

9 Jun 2010 - 8:04 am | सहज

छान. अजुन वेगवेगळ्या कलाकारांची अशीच ओळख करुन द्या.

(आणी हो, मास्तर नोंद घ्या )

परिकथेतील राजकुमार's picture

9 Jun 2010 - 2:46 pm | परिकथेतील राजकुमार

अजुन वेगवेगळ्या कलाकारांची अशीच ओळख करुन द्या.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

Nile's picture

9 Jun 2010 - 2:15 pm | Nile

लै भारी. श्री. चिंतातुरजंतुंचे धागे म्हणजे अनोळखी खाद्य पदार्थ खाण्याच्या मजेसारखे असतात. मस्त.

-Nile

चतुरंग's picture

9 Jun 2010 - 9:26 pm | चतुरंग

लहानपणच्या तीव्र अनुभवांचे पडसाद संवेदनशील मनाच्या व्यक्तीच्या उत्तर आयुष्यात केवढ्या मोठ्या प्रमाणावर पडतात असे ह्या कलाकृती बघून वाटले.
(बाकी मनाला येईल ते करुन बघण्याचे आणि ते लोकांना दाखवण्याचे धारिष्ट्य असलेल्या अशा व्यक्ती बघितल्या की मी थक्क होतो!)

चिंजंचे लेखन वेगळ्याच धर्तीचे असते ह्या मताशी सहमत.

चतुरंग

शुचि's picture

9 Jun 2010 - 9:35 pm | शुचि

ओळख आवडली.

एक संवेदनशील, कोवळ्या मनावर लहानपणापासून झालेले लैंगीकता, स्त्रित्व, पौरुष यांचे संस्कार आणि त्या सर्व अनुभवांना वाचा फोडण्यासाठी व्यक्तीमधे असलेली सर्जनशीलता, धैर्य यांचा परीपाक ही अद्भुत शिल्पे असावीत. खूपशी प्रतीकात्मक - बाह्यचक्षू, ज्ञानचक्षू आणि अंतर्चक्षू तीहींच्या योगे नक्की कलाकारचं मन जाणून घेता येणारी.

मला 'मामेल' शिल्प आवडलं. मटाराच्या उललेल्या शेंगेसारखं दिसणारं. त्याचा अर्थ सुरेख.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

वाहीदा's picture

9 Jun 2010 - 9:53 pm | वाहीदा

लेख आवडला ...आजीबाईंना आमचाही सलाम

पुरुषप्रधान व्यवस्थेत कुटुंब हा एक मोठा घटक असतो. 'सेल' नावाच्या मांडणीशिल्प (इन्स्टॉलेशन) गटामध्ये (१९९०-९३) कुटुंबव्यवस्थेवरील टीका दिसते. उदा. खालच्या चित्रात दिसणारे घर हे लुईजचे बालपण जिथे गेले त्या घराची प्रतिकृती आहे. ते एका पिंजर्‍यात आहे, व त्यावर एक गिलोटिन लटकते आहे. स्त्री जोवर घराची जो़खडे झुगारून बाहेर येत नाही, तोवर ती अडकून राहणार व शेवटी क्रूर पध्द्तीने तिचा शिरच्छेद होणार, असा काहीसा भाव यात जाणवतो

वरिल कलाकृती विवेचन काहीसे न पटणारे आहे पण शेवटी कलाकाराचेच विवेचन ते, तिच्या पुर्वानुभवावर आधारित असेल ही कदाचित ..
एकदा असेच तस्लिमा नसरीन वर शोभा डे ने लिहिले होते की तस्लिमा ला पुरुष हा फक्त लैंगिक शोषण करणाराच का वाटतो ??
पण मला वाटते Man is also a 'Protector - a Fatherly Figure' . What probably she is missing is Fatherly Affection someone who could have understood her as a Girl Child. Probably Emotional Insecurity has made them so rebellious, that they wana hit back with Harsh Sword (which can either be pen or brush) in their hand हे तुमच्या ही लेखात जाणविले

पुरुषांविषयीची तिची मते घडवण्यात लहानपणीच्या एका अनुभवाचा मोठा हात होता. आपल्या वडिलांचे आपल्याच दाईशी शरीरसंबंध असल्याचे तिच्या लक्षात आले, तेव्हा ती ११ वर्षांची होती. ही गोष्ट आईला ठाऊक असूनही ती सोईस्करपणे वा नाईलाजाने तिच्याकडे दुर्लक्ष करते, हेही लुईजच्या लक्षात आले

कुछ यादें जिंदगी भर साथ चलती है.... और हर मोड पर अपना अक्स (प्रतिबिंब) छोड जाती हैं ! असे मला तरी जाणविले
~ वाहीदा

भडकमकर मास्तर's picture

10 Jun 2010 - 2:27 am | भडकमकर मास्तर

१. दादा कोंडके वगैरेंच्या डब्बल मीनिंग विनोदांना नाके मुरडणारे लोक ही वरची डब्बल मीनिन्ग कलाकारी आचरट / अश्लील आहे असे म्हणतील का?
२.हाच धागा या फोटोंसकट टारझनने काढला असता तर इथे टिकला असता का?

शुचि's picture

10 Jun 2010 - 2:35 am | शुचि

दादा कोंदकेच्या विनोदांना काही वैचारीक बैठक आहे का ज्याचं चिंतन करून कोणती इनसाइट मिळू शकेल?

जर टारझन यांनी ही चित्रं व्यवस्थित स्पष्टीकरणासहीत इथे डकवली असती तर का नसती राहीली? टारझन आणि चिंतांमधे फरक काय आहे?

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

II विकास II's picture

10 Jun 2010 - 8:24 am | II विकास II

दादा कोंदकेच्या विनोदांना काही वैचारीक बैठक आहे का ज्याचं चिंतन करून कोणती इनसाइट मिळू शकेल?
>> मुळातच ही तुलना चुकीची आहे. दादांना लोकांचे मनोरंजन करण्यात रस होता. त्यामुळे संवग विनोद हे त्यात येण्याची शक्यता मोठी होती. ह्या शिल्पकाराची शिल्पे ही एक प्रकारचा निषेध आहे. जरी ह्या शिल्पकाराला कोणी नावे ठेवली असती, बहीष्कार घालता असता, तरी तीने काम चालुच ठेवले असते ही शक्यता दादांपेक्षा जास्त आहे.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

II विकास II's picture

10 Jun 2010 - 8:17 am | II विकास II

१. दादा कोंडके वगैरेंच्या डब्बल मीनिंग विनोदांना नाके मुरडणारे लोक ही वरची डब्बल मीनिन्ग कलाकारी आचरट / अश्लील आहे असे म्हणतील का?
>>'डब्बल मीनिंग' येथेच बर्‍याच गोष्टी स्पष्ट होतात. ही चित्रे सरळ एकाच अर्थाची आहेत. जर शिल्पकराने त्यांचा तसा अर्थ नाहीच असे सांगितले असते तर 'वरची डब्बल मीनिन्ग कलाकारी आचरट / अश्लील आहे' अशी शक्यता आहे.

-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.

चिंतातुर जंतू's picture

10 Jun 2010 - 5:48 pm | चिंतातुर जंतू

प्रतिसादांबद्दल सर्वांस धन्यवाद. एका महत्त्वाच्या स्त्री कलाकाराचा परिचय करून देणे हा लेखाचा मूळ हेतू होताच, पण त्याशिवायही एक दीर्घगामी हेतू होता. एकंदरीत दृश्यकलांविषयी मराठी माणसाच्या मनात एक अढी, दुरावा, संशय, अज्ञान वगैरे असावे, असे वेळोवेळी जाणवले आहे. काहींना विविध प्रतिमा (विविध कारणांसाठी) आक्षेपार्ह वाटू शकतात, यामागे या अज्ञान, संशय वगैरेंचा मोठा हात असतो, असेही लक्षात येत गेले. यावर उपाय एकच, तो म्हणजे विविध प्रतिमांना लोकांसमोर आणत राहणे, व त्यांच्या अर्थबोधाविषयी उहापोह होऊ देणे. मग हळूहळू दृश्य-साक्षरता वाढेल, अशी आशा करता येते.

दृश्य-समज वाढवण्याच्या या प्रयत्नात सर्वांना एक आवाहनः

लुईजच्या कलाकृतींमधली एक लढाऊ स्त्रीवादी वृत्ती/भूमिका व लैंगिक प्रतिमांद्वारे त्या भूमिकेची झालेली अभिव्यक्ती येथे किंचित विशद केली होती. पण समजा, कलाकृतीचे नाव व वरील प्रतिमा एवढेच आपल्यासमोर ठेवले गेले असते, तर (म्हणजे वरील विवेचनाअभावी) त्यातल्या लैंगिक प्रतिमा आपल्याला उमजल्या असत्या का, हा प्रश्न सर्वांनी स्वतःला विचारावा.

अशा कलाकृतींच्या बाहेरच्या, म्हणजे रोजच्या जगातही प्रतिमांचा महापूर आहे, आणि त्यातल्या अनेकांतही लैंगिकता अंतर्भूत असते. तीही जर उमजू लागली, तर त्या (म्हणजे रोजच्या जगण्यातल्या) प्रतिमांचे आपण स्वतःपाशीच जे अर्थबोधन करतो, ते अधिक सशक्त होऊ लागेल; आणि मग लुईजची त्या स्त्री-वस्तू प्रतिमांच्या विरोधातली बंडखोरी कदाचित अधिक डोळसपणे लक्षात येईल. मग विवेचनाची गरज भासणार नाही; मग लुईजची शिल्पे अश्लील का नाहीत, हे उमजेल; आणि मग (जे आमच्या मते सर्वात महत्त्वाचे आहे) खालील आकर्षक प्रतिमा (जिला आपण सहसा अश्लील मानत नाही, आणि जिच्यासदृश प्रतिमा राजरोस या संस्थळावर दिसतात) त्या लुईजच्या शिल्पांहून अधिक आक्षेपार्ह का आहे, हेही उमजेल.

लिपस्टिकची जाहिरात
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

राजेश घासकडवी's picture

10 Jun 2010 - 6:27 pm | राजेश घासकडवी

उत्तम लेखन, योग्य प्रतिसाद व अत्यंत समर्पक उदाहरण.

अजून येऊद्यात...

प्रियाली's picture

10 Jun 2010 - 6:34 pm | प्रियाली

आणि पटला.

स्त्रीकलाकाराऐवजी पुरूष कलाकाराने अशा विषयावर कलाकृती निर्माण केल्या असत्या तर त्याचे असेच कौतुक केले गेले असते का असा प्रश्नही मनात आला.

चिंतातुर जंतू's picture

10 Jun 2010 - 6:45 pm | चिंतातुर जंतू

स्त्रीकलाकाराऐवजी पुरूष कलाकाराने अशा विषयावर कलाकृती निर्माण केल्या असत्या तर त्याचे असेच कौतुक केले गेले असते का असा प्रश्नही मनात आला.

यावरून एक सांगायची राहून गेलेली गोष्ट आठवली. लेखाच्या वर 'दुर्गुणी' लुईजचे जे खट्याळ छायाचित्र आहे, ते रॉबर्ट मॅपलथॉर्प या 'कु'प्रसिध्द छायाचित्रकाराने काढले आहे. त्याच्याविषयीची माहिती आणि त्याची छायाचित्रे जरूर पाहावीत.
वि. सू. छायाचित्रे कार्यालयातून पाहू नयेत. जालावरच्या दाईंच्या (नेट नॅनी) चाळणीपलीकडे येणार नाहीत बहुतेक.

- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

कानडाऊ योगेशु's picture

10 Jun 2010 - 8:25 pm | कानडाऊ योगेशु

लेखाच्या वर 'दुर्गुणी' लुईजचे जे खट्याळ छायाचित्र आहे,
खट्याळ नव्हे तर ते गोट्याळ छायाचित्र वाटते.तुम्ही लिहीले म्हणुन पुन्हा पाहीले आणि नको तेच दिसले. :O

पण धाग्याच उद्देश,तुमचे विवेचन उत्तमच.!

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2010 - 7:45 pm | बिपिन कार्यकर्ते

अतिशय उत्तम प्रतिसाद, लेखाइतकाच छान आणि महत्वाचा.

माझ्यापुरते, विवेचनाशिवाय मला या कलाकृती उमजल्या नसत्या. अजूनही उमजल्या आहेत असे नाही, पण एक स्टार्टिंग पॉइंट म्हणून नक्कीच उपयोग आहे विवेचनाचा.

बिपिन कार्यकर्ते

वाहीदा's picture

11 Jun 2010 - 2:09 pm | वाहीदा

सुंदर वैचारिक प्रतिसाद
पण कधी कधी कलाकारांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यात काही तथाकथीत सामाजिक सिमारेषांचे उल्लोघन (बापरे काय शब्द आहे 8| ) केले जाते. मग त्यात बंडखोरी आलीच (rebellious = बंडखोर ...शी बाई , मला कसा हा शब्द सुचला नाही :-( )
पण जसे प्रियाली ने विचारले ते माझ्या ही मनात आले हेच जर पुरूष कलाकाराने केले असते तर ... प्रतिमांचे अर्थबोधन वेगळे निघाले असते का ??
~ वाहीदा

मदनबाण's picture

10 Jun 2010 - 5:55 pm | मदनबाण

चिंतुभाऊ वाचतोय... :)

मदनबाण.....

"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget

भारतात देखिल असाच तुमच्या भाषेत बंडखोर म्हातारा आहे. हुसेन त्याचे नाव आहे. तो देखिल अशीच स्त्रीपुरुषाची नागडी चित्रे काढतो.त्याच्या पश्चात देखिल असेच कौतुक पर लेख येतील.
वेताळ

भारतात देखिल असाच तुमच्या भाषेत बंडखोर म्हातारा आहे. हुसेन त्याचे नाव आहे. तो देखिल अशीच स्त्रीपुरुषाची नागडी चित्रे काढतो.त्याच्या पश्चात देखिल असेच कौतुक पर लेख येतील.
वेताळ

घाशीराम कोतवाल १.२'s picture

10 Jun 2010 - 7:26 pm | घाशीराम कोतवाल १.२

तो देखिल अशीच स्त्रीपुरुषाची नागडी चित्रे काढतो.
भारतातील म्हातारा एम एफ हुसैन काढतो ना अशी चित्र पण कोणाची काढतो हिंदु देवदेवतांची काढतो म्हणुन तर आपल्या पार्श्वभागाला पाय लावुन कुवैतच्या आश्रयाला पळाला आहे

त्याच्या पश्चात देखिल असेच कौतुक पर लेख येतील.

किव येते तुमच्या बुध्दीची अहो
लुई़ज बूर्ज्वा ह्या बाईने कोणत्या जाती धर्माच्या देवदेवतांचा अपमान केलेला दिसत नाही पण ह्या म्हातारा एम एफ हुसैन समस्त हिंदु धर्माचा अवमान केला त्या म्हातार्‍या बद्दल एव्हडा कळ्वळा का बुवा ?
तुम्हाला

(आग्यावेताळ ) घाश्या कोतवाल

वेताळ's picture

10 Jun 2010 - 8:08 pm | वेताळ

माझ्या बुध्दीची किव केल्याबद्दल धन्यवाद रे. :D
तुझी बुध्दी महान आहे रे.
आम्ही बिचारे गरीब बापडे...कोणी काय बोर्ड वर चितारतो, कोणी वेडेवाकडे काही तरी शिल्पे बनवतो त्यातुन आम्ही कसला अर्थ काढणार? वरील चित्रात कुठे काय बनवले आहे हेच समजले नाही. वाचल्यावर समजले.मग बघ किती बुध्दी कमी आहे ते. =))
मला हुसेनबद्दल कळवळा किंवा तिरस्कार काही नाही आहे.मला फक्त तो इतका प्रसिध्द कसा झाला ह्याबद्दल कुतुहल आहे बाबा. ;)

वेताळ

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Jun 2010 - 2:49 pm | llपुण्याचे पेशवेll

वेताळाच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही प्रतिसादांशी सहमत.
(बंडखोर)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

अक्षय पुर्णपात्रे's picture

11 Jun 2010 - 11:12 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री जंतू, उत्तम परिचय आणि रसग्रहण. धन्यवाद.

चिंतातुर जंतू's picture

11 Jun 2010 - 3:45 pm | चिंतातुर जंतू

पुरुषाने अशी (बंडखोर) अभिव्यक्ती केली असती, तर त्याचे स्वागत कसे झाले असते, असा एक प्रश्न आला आहे. यात 'पुरुषाने' 'अशी' आणि 'बंडखोरी' याबद्दल थोडा खुलासा करावा लागेल:

  • 'बंडखोरी'च्या मागे साधारणतः दमनाची पार्श्वभूमी असते. उदा: लुईजची बंडखोरी ही पुरुषप्रधान संस्कृतीत होणार्‍या स्त्रीच्या लैंगिक व सामाजिक दमनाविरोधात होती.
  • बंड करणार्‍याची ओळख 'पुरुष' ही असेल, तर हे दमन त्याच्या पुरुष असण्याशी संबंधित असावे लागेल. म्हणजे दलित लेखकांनी मराठी साहित्यात केलेली वाटचाल बंडखोरी असूनही ती यात मोडणार नाही, कारण ती 'पुरुष' या ओळखीपेक्षा 'दलित' या ओळखीतून झालेली होती.
  • 'अशी' (म्हणजे लुईजसारखी): लुईजची बंडखोरी ही लिंगविशिष्ट दमनाविरुध्द होती, म्हणून त्यात (धक्कादायक वाटू शकतील अशा) लैंगिक प्रतिमा होत्या.

त्यामुळे 'पुरुषाची' 'अशी' अभिव्यक्ती बंडखोर ठरण्यासाठी त्यामागे पुरुषाच्या लिंगविशिष्ट दमनाची पार्श्वभूमी असावी लागेल. म्हणून (उदा.) निव्वळ उत्तान बायकांच्या प्रतिमा एखाद्या पुरुषाने आज या संस्थळावर टाकल्या, तर ती अशी बंडखोरी होणार नाही, पण जर कधीकाळी अशी वेळ आली की या संस्थळावर शाहरुख खानचे (पक्षी: आकर्षक पुरुषाचे; चूभूद्याघ्या ;-) ) छायाचित्र चालेल, पण मधुबालाची हास्यमुद्रा (पक्षी: आकर्षक स्त्री प्रतिमा; यात बहुधा चूभू नसावी :-) ) संपादित होईल, तर मग वरचे ओष्ठनलिकेसहित स्त्रीमुखाचे छायाचित्र टाकणे, ही एक (लैंगिक प्रतिमा असणारी) पुरुषी बंडखोरी होऊ शकेल.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

धनंजय's picture

11 Jun 2010 - 8:23 pm | धनंजय

पटण्यासारखा फरक आहे. "बंडखोरी"चे चांगले विश्लेषण.

मालकाने नोकराची वेंगाडून नक्कल करून निर्भर्त्सना केली तर आपण त्याला "छळ" म्हणू "बंडखोरी" नाही. मात्र नोकराने मालकाची वेंङाडून नक्कल केली तर अपण त्याला "बंडखोरी" म्हणू.

Nile's picture

12 Jun 2010 - 4:44 am | Nile

पटण्यासारखा फरक आहे. "बंडखोरी"चे चांगले विश्लेषण.

+१.
धनंजयांचे उदाहरणही आवडले.

-Nile

पुष्करिणी's picture

12 Jun 2010 - 4:51 am | पुष्करिणी

छान ओळख लुई़ज बूर्ज्वा बाइंची, प्रतिसादातून दिलेली उदाहरणं पण उत्तम.

पुष्करिणी