प्राचीन साहित्यातील वसंतोत्सव

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
15 Mar 2010 - 11:00 pm

वसंत ऋतू म्हटल्यावर त्याची सांगड बहरलेले आम्रतरु, फुललेले पलाशवृक्ष, शीतल वारे, कोकिळगान, रंगोत्सव व गंधोत्सवाशी घातली जाते. शिशिराच्या कडाक्याच्या थंडीनंतर वसंत ऋतू अवतरतो तेच झाडांच्या निष्पर्ण फांद्यांवर हिरवी, कोवळी, लुसलुशीत पालवी पांघरून! कवी, प्रेमी, कलासक्त, रसिक जनांसाठी वसंतोत्सव म्हणजे साक्षात पर्वणीच! होळी, वसंतपंचमी व शिवरात्री हे तिन्ही उत्सव ह्याच काळात येतात. आपले पूर्वज हा वसंत ऋतूचा उत्सव कसा साजरा करायचे ह्याचीही अतिशय रोचक वर्णने प्राचीन साहित्यात वाचायला मिळतात.

पौराणिक कथांच्या अनुसारे वसंत हा कामदेवाचा पुत्र! रूप व सौंदर्याचा साक्षात आविष्कार असलेल्या कामदेवाच्या घरी पुत्रजन्म झाल्यावर सारा निसर्ग बहरून येतो. वृक्ष त्याच्यासाठी नव्या पालवीचा पाळणा बांधतात, पुष्प-कुसुमे त्याचेसाठी नव्या वस्त्रांची भेट घेऊन येतात, शीतल-सुगंधित वारा त्याला झोका देतो आणि कोकिळ पक्षी आपल्या सुमधुर स्वरांनी त्याचे मनोरंजन करतो. असा हा सृजनोत्सव! म्हणूनच बहुधा वसंताला ऋतुराज म्हणत असावेत! त्याच्यावर आधारित संगीत राग 'बसंत बहार' ह्या नवचैतन्याचीच प्रचीती देतो.

प्राचीन साहित्यात वसंत ऋतूमध्ये 'वनविहार', 'डोलोत्सव', 'पुष्पशृंगार' व 'मदनोत्सव' मोठ्या प्रमाणावर नागरजनांमध्ये साजरा केला जात असल्याचे उल्लेख आढळतात.संस्कृत साहित्यात माघ शुक्ल पंचमीला मदनोत्सव साजरा केला जात असल्याची सुरेख वर्णने आहेत. सुगंधित केशर व कुंकवाच्या सड्यांनी सर्व नगर, रस्ते सुगंधित केले जात असत. त्या पीत-आरक्त वर्णाने सारे नगर जणू सुवर्णमयी भासत असे. सर्व जाती, लिंग, वय, श्रेणीचे लोक आपापसातले भेद विसरून ह्या वसंतोत्सवात सामील होत असत. नृत्य, गायन, वाद्यसंगीत, नाट्य इत्यादींचा आस्वाद घेत असत. केसांमध्ये फुले माळून हळद, कुंकू व तांदळाचे चूर्ण विखरून रंगांचा खेळ खेळत असत. वसंत विहारात स्त्रिया फुले, पाने गोळा करत; त्यांच्या आकर्षक माळा गुंफत; आम्रमंजिरी तोडत, केशर-कुंकुमाचे तिलक लावून कधी आपल्या प्रियतमाच्या कानावर फूल खोचून त्याला दृढालिंगन देत. उद्यानयात्रांत, वन-विहारांत स्त्री-पुरुष एकत्रितपणे मद्यपान करीत असत. सर्व स्तरांचे नागरिक वसंतोत्सवात सामील होत असत. रमणी, सुंदर स्त्रियांनी अशोक वृक्षाला लत्ताप्रहार करून त्याला 'फुलविण्या'चाही खास सोहळा असे. हिंदोळ्यांवर झुलणे हा ही वसंत ऋतूतील एक अविभाज्य भाग! त्यावेळी म्हणे 'हिंदोल' राग गायला जाई.

वसंतात व ग्रीष्मात पाण्यात वाळा, नागरमोथा, सुगंधी पुष्पे घालून तसे सुगंधित पाणी प्यायले जात असे. दुपारीही सर्वांगाला चंदनाची उटी लावून, अंगावर तलम वस्त्रे लेऊन, पंख्याचा वारा घेत रमणी विश्राम करीत असत. एका वर्णनात वसंत ऋतूतील सायंकाळी अभिजन आपला वेळ कसा व्यतीत करत ह्याचे फार मनोहर चित्र रंगविले आहे. सायंकाळी सौधावर सुगंधित जलाचे सडे घालून पांढर्‍या शुभ्र बैठकी मांडल्या जात. तिथे किंवा नगराबाहेरच्या उपवनांत, आम्रवाटिकेत सर्व अभिजन गायन, नृत्य, वादन, काव्य-श्रवण इत्यादी कलांचा आस्वाद घेत, मधुर फळांचे थंड रस अथवा सुरा नक्षीदार रजतपात्रांमधून प्राशन करत असत. त्याअगोदर सायंकाळी शीतल, सुगंधित पाण्याने स्नान करून, तलम मलमलीची वस्त्रे परिधान करून, गळ्यात मोगरा - जाई-जुई सारख्या शीतलता प्रदान करणार्‍या पुष्पांच्या माळा घालून, अंगाला चंदन-केशराची उटी, तिलक लावून ते ह्या सायंकालीन कार्यक्रमास सज्ज होत. मनोरंजन, तांबूलसेवन, शुकसारिका यांद्वारे रंजन अशा विविध मार्गांनी वसंत ऋतूमधील सायंकाळी व्यतीत होत असत.

आजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत अशी वर्णने वाचूनही मन उल्हसित होते. मदनोत्सव, दोलोत्सव, रंगोत्सव एवढ्या रसिकतेने साजरे करणारे हे लोक आपल्यापेक्षा एका परीने विचारांनी व आचरणाने प्रगत व अभिरुचीसंपन्नच म्हणावे लागतील ह्यात शंकाच नाही!

-- अरुंधती कुलकर्णी

http://iravatik.blogspot.com/

संस्कृतीवाङ्मयसमाजजीवनमानमौजमजाप्रकटनविचारलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

15 Mar 2010 - 11:14 pm | विसोबा खेचर

इतकी सुरेख शब्दचित्रं आहेत की लेख अतिशय देखणा झाला आहे..!

वाचून खूपच प्रसन्न वाटलं..

जियो...

आपला,
(वसंतप्रेमी) तात्या.

टारझन's picture

17 Mar 2010 - 2:43 am | टारझन

सुपर्ब ,.. एक वेगळाच लेख !

आपला,
(वसंत) टार्‍या.

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Mar 2010 - 11:21 pm | बिपिन कार्यकर्ते

वा!! वा!! ... वाचूनच प्रसन्न वाटले.

बिपिन कार्यकर्ते

प्राजु's picture

15 Mar 2010 - 11:34 pm | प्राजु

मस्त वर्णन आणि एकदम फ्रेश लेख!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

मिसळभोक्ता's picture

15 Mar 2010 - 11:47 pm | मिसळभोक्ता

उद्यानयात्रांत, वन-विहारांत स्त्री-पुरुष एकत्रितपणे मद्यपान करीत असत.

च्यामारी, जुन्याकाळी पब्लिक खुळं होतं खुळं !

(सॉरी मुसुशेठ, राहावलं नाही.)

पण ही स्त्रीपुरुषांची जॉईंट अ‍ॅक्टिव्हिटी फक्त वसंतऋतूपुरतीच मर्यादित होती का ? मला नाही वाटत.

मद्यपान, हे मद्यपानानंतरच्या अ‍ॅक्टिव्हिटीज साठी सब्स्टिट्यूट नसावं, बहुतेक.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

प्रकाश घाटपांडे's picture

16 Mar 2010 - 8:48 am | प्रकाश घाटपांडे

मद्यपान, हे मद्यपानानंतरच्या अ‍ॅक्टिव्हिटीज साठी सब्स्टिट्यूट नसावं, बहुतेक.

मद्यपान हे मद्यपानानंतरच्या अ‍ॅक्टिव्हिटीज साठी कॉन्ट्रिब्युट असाव ,बहुतेक.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

अरुंधती's picture

16 Mar 2010 - 12:31 am | अरुंधती

एक सुंदर होरी काव्य :

होरी खेलूँगी श्याम संग जाय,
सखी री बडे भाग से फागुन आयो री ॥१॥

फागुन आयो…फागुन आयो…फागुन आयो री
सखी री बडे भाग से फागुन आयो री

वो भिजवे मेरी सुरंग चुनरिया,
मैं भिजवूं वाकी पाग ।
सखी री बडे भाग से फागुन आयो री ॥२॥

चोवा चंदन और अरगजा,
रंग की पडत फुहार ।
सखी री बडे भाग से फागुन आयो री ॥३॥

लाज निगोडी रहे चाहे जावे,
मेरो हियडो भर्यो अनुराग ।
सखी री बडे भाग से फागुन आयो री ॥४॥

आनंद घन जेसो सुघर स्याम सों,
मेरो रहियो भाग सुहाग ।
सखी री बडे भाग से फागुन आयो री ॥५

(स्रोत : आंतरजाल) :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

16 Mar 2010 - 12:33 am | विसोबा खेचर

कुणी गायलं आहे का?

असेल तर कृपया दुवा द्या..

आपला,
(खुद्द मथुरेतली होळी अनुभवलेला) तात्या.

शुचि's picture

16 Mar 2010 - 12:41 am | शुचि

अजून एक सुरेख कविता - ही दर वर्षी माझ्या संगणकावर होळीच्या दिवशी वॉल पेपर असते.

पहली किरण को देखकर
स्मित अधरोंपर युं बोली
उषा की लाली मे डूबी
रंग उडाती आयी होली ||१||

सजधजकर आयेंगे साथी
आंगनभर सजती रंगोली
नाचेंगे और गायेंगे हम
मधुर स्वरोंसे भरेगी झोली||२||

याद आयेंगे प्रियजन सारे
दूर देशके सभी नजारे
कब फिर दिन आये दोबारा
बाबुल का घर और हमजोली||३||

(साभार - जाल)

***********************************
we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

अरुंधती's picture

16 Mar 2010 - 12:50 am | अरुंधती

तात्या,
हे अतिशय प्रसिध्द होरी गीत आहे. नक्कीच आंतरजालावर ऑडियो उपलब्ध असणार.... पण मला वसंत ऋतूवरील वेगवेगळ्या काव्यांचा शोध घेताना हे होरीगीत आंतरजालावर सापडले आणि अतिशय आवडले. वरील लेखास समर्पक वाटले म्हणून इथे टाकले. त्याची ऑडियो लिंक मिळाली तर देईनच! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

राघव's picture

16 Mar 2010 - 12:54 am | राघव

सुंदर वर्णन. :)

राघव

मीनल's picture

16 Mar 2010 - 2:27 am | मीनल

उत्तम लेखन . ही माहिती कुठून मिळाली?
सत्य की असत्य या बद्दल शंका नाही आहे. पण ही कवितेतून /गोष्टींतून/ पुस्तकातून /स्तोत्रांतून ही माहिती मिळवलीत का?
सोर्स काय हे जाणून घ्यायला आवडेल.
मी तुमचा ब्लॉग नुकताच वाचला. सर्वच लेख उत्तम आहेत.

मीनल.

अरुंधती's picture

16 Mar 2010 - 11:00 am | अरुंधती

'पद्मचूड़ामणि', 'जैन हरिवंश', कालिदासाचे 'मालविकाग्निमित्र', बाणभट्ट यांची 'कादंबरी', 'पद्मपुराण', जैनांचे 'उत्तर पुराण', 'जैनहरिवंश', 'कुमार पाल चरित', श्री हर्षाची 'रत्नावली', मृच्छकटिक, भोजराज यांच्या 'सरस्वती कंठाभरण', राजशेखर यांच्या 'काव्यमीमांसा' ह्या ग्रंथांत, जातककथांमध्ये वसंतोत्सवाची अतिशय रम्य वर्णने आढळतात. ह्याखेरीजही इतर अनेक ग्रंथ-काव्य-अभिजन साहित्यातून वसंत ऋतूचे व वसंत विहाराचे बहारदार वर्णन आढळते.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मेघवेडा's picture

16 Mar 2010 - 2:40 am | मेघवेडा

वाक्यावाक्यात शब्दवसंत!!
अतिशय सुरेख लेख!! मन प्रसन्न झालं अगदी!!

-- मेघवेडा

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मेघवेडा!

रेवती's picture

16 Mar 2010 - 2:52 am | रेवती

खूप छान लेखन!
डोळ्यांसमोर जून्याकाळचा वसंत ऋतू उभा राहिला. भरपूर कार्यक्रम असत ही नवी माहिती. त्यावरून 'आवळी भोजन' नावाचा आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवण्याचा कार्यक्रम पूर्वी असायचा ते आठवले.

रेवती

अरुंधती's picture

16 Mar 2010 - 12:17 pm | अरुंधती

आवळीभोजनावरून आठवलं.... लहान असताना वसंत ऋतूमध्ये आम्ही कायम जवळपासच्या बागेत वनभोजनाला जात असू. घरातूनच विविध पदार्थ करून न्यायचे, बागेत खेळ, गाणी, भेंड्या इत्यादीनंतर हिरव्यागार गवतावर स्वच्छ चादर/ सतरंजी अंथरून आमची अंगत-पंगत बसायची. त्या वृक्षलतांच्या सावलीत, पक्ष्यांच्या सान्निध्यात सर्वांबरोबर हसत-खेळत केलेल्या जेवणाची रुची काही औरच असायची!
नंतर झाडाखालीच तोंडावर रुमाल पांघरुन वामकुक्षी! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

हर्षद आनंदी's picture

16 Mar 2010 - 8:16 am | हर्षद आनंदी

मन प्रसन्न करणारा लेख...

सजधजकर आयेंगे साथी
आंगनभर सजती रंगोली
नाचेंगे और गायेंगे हम
मधुर स्वरोंसे भरेगी झोली

शुचीजी... लय भारी !!

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

मदनबाण's picture

16 Mar 2010 - 9:06 am | मदनबाण

मस्त लेख... :)
आम्रमंजिरी हा शब्द पहिल्यांदाच वाचला. :)

("उत्सव" प्रेमी)
मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

प्रमोद देव's picture

16 Mar 2010 - 9:14 am | प्रमोद देव

उल्हसित करणारे वर्णन. छान लिहिलंय.

त्यानंतर दिलेली दोन्ही गीतंही मस्त आहेत... चाली लावण्याच्या दृष्टीने . ;)

अरुंधती's picture

16 Mar 2010 - 11:09 am | अरुंधती

सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! हा लेख लिहिताना मलाच खूप छान वाटत होते. गेली कितीतरी वर्षे वसंत ऋतूबद्दलची अधाशासारखी वाचलेली वर्णने इथे पुन्हा लिहिण्याचा आनंद मिळाला! शिवाय लेख लिहिण्या अगोदर पुन्हा माहितीची पडताळणी करताना अजून काही सुरेख माहिती हाती लागली!! शुचि, होळीचं गीत सुंदरच! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

अरुंधती's picture

16 Mar 2010 - 9:03 pm | अरुंधती

व्ही. शांताराम यांनी काढलेल्या नवरंग ह्या अजरामर चित्रपटात काही सुंदर गीते आहेत, होळी, रंगपंचमी यांवर! अतिशय सुमधुर चाली, चपखल शब्द व स्वर्गीय स्वररचना....!
'अरे जा रे हट नटखट...', 'रंग दे रे...' केवळ अप्रतिम! मला अतिशय आवडणारा हा चित्रपट.... अगदी संध्यासकट! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

संदीप चित्रे's picture

17 Mar 2010 - 2:41 am | संदीप चित्रे

मन एकदम प्रसन्न करणारा लेख.
धन अरुंधती.
आज सकाळीच ऑफिसला येताना राग 'बसंत' ऐकला होता ('और सब राग बने बाराती...') आणि तात्याचा 'बसंतचं लग्न' ह्या अप्रतिम लेखमालेची आठवण निघाली होती.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

स्वाती दिनेश's picture

17 Mar 2010 - 2:48 am | स्वाती दिनेश

एकदम प्रसन्न लेख!
स्वाती