परवशता पाश दैवे... २

Primary tabs

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
11 Nov 2009 - 11:33 pm

ही कथा नाही. हा (सुदैवाने) माझा अनुभवही नाही, म्हणजे थोडा माझा आहेच पण अगदी पूर्णपणाने नाही. हे माझ्या अनुभवाचे व काही करोड दुर्भागी आणि अश्राप जीवांच्या अनुभवांचे मिश्रण मात्र आहे. झेपल्यास वाचा. तसेही ढोबळमानाने काय घडले होते हे आपल्याला माहितच असते. वाचले नाही तरी, कमीतकमी मी तरी असे वागणार नाही एवढे स्वतःशीच ठरवा.

परवशता पाश दैवे... भाग १ , भाग २ , भाग ३

*************

मेन्साह

माझ्या डोळ्यासमोर अंधार झाला. कोणीतरी माझ्या तोंडात बोळा कोंबला. मला दोरीने घट्ट बांधले. मी सुटायची खूप धडपड केली. पण त्या राक्षसांच्या शक्तीपुढे माझे काहीच चालले नाही. मी खूप झटापट केल्याने अगदी थकून गेलो. मला अगोसीचा आवाज येत नव्हता पण ती पण खूप धडपड करत होती बहुतेक. शेवटी त्या माणसाने खूप जोरात मारले मला आणि मी अगदी निपचित झालो. माझ्या आजूबाजूला काय चालले आहे याचे भानच सुटले होते जणू. त्या माणसाने मला खांद्यावर टाकले आणि चालू लागला. मी जवळ जवळ बेशुध्दच झालो होतो. मला जाग आली तेव्हा मी एका मोठ्या घरात होतो. तिथे खूप अंधार होता. मला खूप भिती वाटत होती. डोळे अंधाराला सरावले तसे मला दिसले की त्या खोलीत माझ्यासारखीच अजून बरीचशी मुले होती. सगळेच अगदी भेदरलेले. काही तर माझ्यापेक्षाही लहान. मला अगोसी मात्र कुठेच दिसत नव्हती. काही मुले जागी होती. काही बहुतेक माझ्यासारखीच गलितगात्र होऊन पडली होती. बोलत मात्र कोणीच नव्हते. नुसतेच एकमेकांकडे बघत होते. थोडा वेळ असाच गेला, मी थोडा धीर करून बाजूच्या मुलाशी बोलायला गेलो तर माझ्या तोंडातून शब्दच फुटेना. हातपायही हलेनात. माझ्या लक्षात आले की तोंडात अजूनही बोळा आहे आणि हात पाय बांधलेले आहेत. मी काहीच करू शकत नव्हतो. चूपचाप पडून राहण्याशिवाय काहीच गत्यंतर नव्हते. सारखे रडायला येत होते. आईची आठवण येत होती. अगोसीचे काय झाले? ती पण इथेच आहे का? आमच्या गायब व्हायच्या दु:खाने घरी काय झाले असेल? माझ्या वेड्या साहसामुळे मी आणि अगोसी दोघेही चांगलेच अडकलो होतो. मी स्वतःला शिव्याशाप देण्याशिवाय काहीच करू शकत नव्हतो.

असा बराच वेळ गेला. बाहेर रात्र आहे की दिवस आहे हे पण कळत नव्हते. तेवढ्यात खोलीचे दार उघडले आणि दोनतीन माणसे आत आली. आत आल्या आल्या त्यांनी आम्हाला सगळ्यांना मारायला सुरूवात केली. काय चालले आहे काहीच कळत नव्हते. सगळी मुलं नुसती कळवळत होती. काही काहींनी तर तिथेच कपडे ओले केले. नुसती घाण झाली होती. थोडा वेळ असं मारल्यावर त्यांनी एका एका मुलाच्या तोंडातला बोळा काढून त्याला खायला द्यायला सुरूवात केली. काही मुलांनी खायला नकार दिला त्यांना तोंडात बोळा घालून परत खूप मारले. ते बघून बाकीच्यांनी निमूटपणे तोंडात कोंबलेले गिळले. सगळा प्रकार संपवून ते लोक परत खोली बंद करून निघून गेले. असे बरेच वेळा झाले. बाहेर दिवस रात्र येत होते जात होते, आम्ही त्या सगळ्याच्या पलिकडे गेलो होतो. विचार करून करून थकलो आणि नुसते ग्लानीत पडून राहत होतो. मधेच आमच्यात दोन चार नवीन मुलांची भर पडत असे.

एकदा मात्र दार उघडले, खायला दिले आणि आम्हाला सगळ्यांना बाहेर काढले. आज काही तरी नवीन घडत होते. अजून बर्‍याच खोल्या होत्या आणि त्यातूनही बरीच मुलं बाहेर आली. बाहेर रात्र होती. सगळ्यांना एका रांगेत उभे करून चालायला सुरूवात केली. तेवढ्यात मला अगोसी दिसली. बाप रे!!! कशी दिसत होती!!! मी तर ओळखलेच नसते. पण तिने पण बघितले नेमके माझ्याकडे आणि तिचे डोळे चमकले त्या बरोब्बर मला ओळख पटली. पण मी काय करू शकत होतो? काहीच नाही. नशिबाने काय वाढून ठेवले होते पुढ्यात, काहीच कळत नव्हते. नक्कीच काहीतरी पाप केले असणार आम्ही दोघांनी, या सगळ्याच मुलांनी, म्हणून हे असं झालं होतं. नक्कीच. आम्हाला बहुतेक त्या माणसं खाणार्‍या राक्षसांच्या गावी नेत होते बहुतेक.

चालण्यात जरा जरी उशिर झाला तरी लगेच चाबकाचे फटके पडत होते. रात्रभर चालत होतो आम्ही बहुतेक. बराच वेळ असे चालल्यावर अजून एक घर आले. परत तेच. तिथे एका खोलीत कोंडले आम्हाला. परत अंधार. परत मार. परत ते जबरदस्तीचे खाणे. तोंडात बोळा. उजेड पाहून तर किती दिवस झाले होते कोणास ठाऊक. पण अगोसी अजून जिवंत आहे आणि इथेच आहे हे समाधान होते. आणि तिच्यासाठी तरी हे सगळे सहन करणे भाग होते. संधी मिळताच इथून पळून जाऊ तिला घेऊन. सतत मनाला हेच बजावत होतो मी. जसजसे दिवस जात होते, माझेच मन कच खाऊ लागले, पण पळून जायच्या नुसत्या विचारानेच बरे वाटायचे. म्हणून मी सतत तोच विचार करायचो.

रात्रीचा प्रवास, परत मुक्काम, परत थोड्या दिवसांनी रात्रीचा प्रवास... किती दिवस गेले कुणास ठाऊक. एका रात्री.... एक खूप मोठे पांढरे घर आले. आणि त्याच्या बाजूला खूप मोठ्ठे पाणी होते. त्या पाण्याचा आवाज खूप होता. वाराही खूप होता. मी तर एवढं पाणी कधीच बघितलं नव्हतं. आम्हाला त्या घरात नेलं. तिथे बघतो तर माझी खात्रीच पटली. आपण नक्कीच राक्षसांच्या घरी आलो आहोत. सगळे राक्षस कसे अगदी धिप्पाड आणि पांढरेशुभ्र. त्यांचे चेहरे पण अगदी वेगळेच. भयानक. त्यांना बघून बर्‍याच मुलांची तर बोबडीच वळली. काही बेशुध्द पडली. आम्हाला परत एकदा एका मोठ्या खोलीत नेलं आणि बंद केलं. मधून मधून अगोसी दिसत होती. तेवढंच बरं वाटायचं. आईची लाडकी पोरगी, पण काय अवस्था झाली होती तिची !!! आईने बघितलं असतं तर जीवच दिला असता तिने. इथून पळून जाऊ तेव्हा आधी तिला नीट खाऊ पिऊ घालायचे आहे आणि जरा तब्येत नीट करून घरी न्यायचे. नक्की.

ज्या खोलीत आम्ही होतो तिथे आमच्या सारखे अजून बरेच लोक होते. पण हे मोठे लोक होते. चांगले आडदांड, हट्टेकट्टे. बाप रे !!! म्हणजे हे राक्षस मोठ्या लोकांना पण खातात की काय? आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसत होते. तोंडातले बोळे काढले तरी कोणीच बोलत नव्हते. बोलायची सवयच गेली होती. आणि खूप भितीही वाटत होती. हळूहळू ते मोठे लोक बोलायला लागले. पण त्यातल्या बहुतेकांची भाषाच समजत नव्हती. मग सगळे नुसतेच गप्प बसले. पुढे काय होणार याची बहुधा कोणालाच कल्पना नव्हती. हताश होऊन बसले होते सगळे.

अनानी

पहिले एक दोन फटके अंगावर पडले तेव्हा जाणवलंच नाही. पण मारणारा मारतच राहिला. असह्य झालं. कसा तरी उठून उभा राहिलो. दिवस उजाडला होता. पण मला मात्र डोळ्यापुढे अंधारच जाणवत होता. पावलं अडखळत होती. सुदैवाने फार चालावे नाही लागले. अशांतींचा तळ जवळच होता. तिथे सगळ्यांना नेऊन बसवले. सगळ्या श्रमाने पोटात नुसता खड्डा पडला होता. भूक लागली होती. थोड्या वेळाने एक माणूस आला आणि त्याने थोडेसे अन्न जमिनीवर फेकले आणि तो चालता झाला. ते तुकडे मिळवायला नुसती मारामारी झाली. जगायचं असेल तर अन्न मिळवलंच पाहिजे!!! मी पण घुसलो त्या गर्दीत आणि थोडेसे धुळीने माखलेले का होईना पण खाऊ शकेन असे तुकडे मिळाले. पाण्याचा हौद मात्र मोठा होता. पोटभर पाणी प्यायलो. आत्ता पर्यंत थोडा जीवात जीव आला होता. आजूबाजूला कोणी ओळखीचे चेहरे दिसताहेत का ते बघत होतो. माझ्या बरोबर गावातून आलेले चारपाच जण दिसले. त्यांच्या जवळ सरकलो. त्यांचीही अवस्था काही माझ्यापेक्षा वेगळी नव्हती.

सगळेच दमले होते, त्यापेक्षाही आता पुढे काय याचाच विचार चालू होता. हे अशांती म्हणजे फारच भयंकर लोक. अतिशय क्रूर. यांना सतत काही ना काही कारणाने बळी द्यायला माणसं लागतात. आजूबाजूच्या राज्यातून माणसं पळवतात त्यासाठी हे लोक. माझी तर खात्रीच पटली की आपलंही आता हेच होणार. आईची, घरची खूप आठवण आली. गाव डोळ्यासमोर दिसायला लागला. पण योग्य संधीची वाट बघत गप्प बसावे लागणार हे तर स्पष्टच दिसत होते समोर. भेटलेल्या लोकांशी हळूच बोलत बसलो. सगळ्यांचे म्हणणे माझ्यासारखेच पडले.

पुढचे दोनचार दिवस अशांती असेच आमच्यासारखे अजून लोक पकडून आणत होते. आणि आमची संख्या वाढत होती. अन्नाचे तर हालच होते. नुसत्या पाण्यावर दिवस काढत होतो आम्ही. चौथ्या दिवशी आम्हाला सगळ्यांना एका जाड दोरखंडाने बांधले आणि एका मागोमाग एक असे बाहेर काढून चालवायला सुरूवात केली. भयानक उन्हाळा होता. डोक्यावर सूर्य आग ओकत होता. आणि जंगलातून जाताना अजूनच त्रास होत होता. रस्त्यात कुठे साप तर कुठे अजून काही आडवे येत होते. चालणे फार जिकिरीचे होत होते. तसेच पाय ओढत चाललो होतो आम्ही. आमच्या आजूबाजूला सारखे अशांती सैनिक चालत होते. एखादा माणूस थोडातरी अडखळला किंवा हळू चालायला लागला की सगळी रांगच अडखळायची. आणि मग नुसता चाबकांचा वर्षाव चालू!!!

देवा, हे लोक काय सैतान आहेत की राक्षस? मला वाचव देवा....

तेवढ्यात रांगेच्या पुढून खूप आवाज ऐकायला यायला लागले. सगळ्यांना थांबवण्यात आलं. बराच वेळ आरडाओरडा ऐकू येत होता. शेवटी एक जोराची किंचाळी ऐकू आली आणि सगळाच आवाज बंद झाला. थोड्या वेळाने एक-दुसर्‍या कडून कळले की पुढे एकाने तो दोरखंड धारदार दगडाने हळूहळू तोडून पळायचा प्रयत्न केला होता. त्याच्या दुर्दैवाने तो दोरखंड तुटायच्या आतच काही सैनिकांच्या ते लक्षात आले. त्या माणसाला वेगळे काढून खूप मारले आणि मग त्याचे हात पाय तोडून त्याला तसेच, जिवंतच, रस्त्याच्या बाजूला टाकून दिले. पुढे जात असताना सगळ्या लोकांच्या नजरेस तो पडेल असा ठेवला त्याला, बाकीच्यांची हिंमत होऊ नये म्हणून. वेदनेने जवळजवळ बेशुध्दच झाला होता तो. आणि आम्ही गेल्यावर थोड्याच वेळात रक्ताच्या वासाने आलेल्या कोणत्यातरी जनावराने त्याला खाल्ला असणार. पण आता वाटतं, नशिबवान होता, सुटला बिचारा. थोडक्यात सुटला. पुढचे भोग तरी टळले त्याचे.

तीन दिवस सतत चालल्यावर आम्ही अशांतींच्या मोठ्या गावात पोचलो. गावातली पोरंसोरं आमची मिरवणूक बघायला जमली. आमच्या मागे ओरडत चालली होती. कोणी मधेच दगडं मारत होते. सैनिक त्यांना पिटाळत होते आणि पोरं परत परत जवळ येत होती. एकदाचे आम्ही अजून एका मोठ्या मैदानात पोचलो. तिथे असेच आमच्यासारखे बरेच लोक आधीच बसवलेले होते. चारी बाजूंना मोठे कुंपण आणि सैनिकांचा पहारा. आता मात्र हळूहळू माझं मन कच खाऊ लागलं होतं. पळून जायची जी काही थोडी फार आशा होती ती मावळायला लागली होती. रात्री खायला काहीच मिळालं नाही. पाणीही नव्हतं इथे. भुकेने ग्लानी आली.

सकाळ झाली. तेवढ्यात मैदानाचे दार उघडले आणि जे काही दिसलं त्यामुळे तर बहुतेक लोक पार घाबरून गेले. काही अशांती सैनिक आत आले आणि त्यांच्या मागोमाग दोनतीन उंच, धिप्पाड पण पांढरेफटक कातडी असलेली माणसं आत आली. त्यांचे केस पण वेगळेच होते. त्यांनी अंगात रंगीबेरंगी कपडे घातले होते. असली माणसं मी कधीच बघितली नव्हती. माझी खात्री पटली, हे नक्कीच राक्षस आहेत आणि या महाभयानक अशांती लोकांनी त्यांच्याशी मैत्री केली आहे. याच लोकांना ते माणसं खायला देत असणार. मी डोळे मिटून घेतले. ती माणसं सगळ्यांच्या जवळ जाऊन जाऊन त्यांचे हात, पाय, दात, डोळे बघत होते. सगळ्यांची तपासणी झाली. ते राक्षस माझ्याजवळ आले तेव्हा मला नुसता घाम फुटला होता. एकमेकांशी काहीतरी बोलत होते ते सगळेच.

थोड्या वेळाने सगळ्यांना खायला दिलं आणि परत एकदा आमचा प्रवास सुरू झाला. पळून जायची खूप इच्छा होत होती. पण तो विचार मनात आला की तो हातपाय तोडलेला माणूस डोळ्यासमोर यायचा आणि सगळं अवसानच गळून पडायचं. यावेळी आम्ही जवळजवळ पाचसहा दिवस चालत होतो. बरेच दिवस चालल्यानंतर एक दिवस एकदम खूप मोठं पाणी डोळ्यासमोर आलं. एवढं पाणी मी कधीच बघितलं नव्हतं. त्या पाण्याजवळ खूप मोठं पांढर्‍या रंगाचं घर होतं. आणि तिथे त्या पांढर्‍या राक्षसांचे अजून बरेच भाऊबंद उभे होते. सगळीकडे नुसते राक्षसच राक्षस. ते मोठ्ठं पाणी सारखं जोरात त्या घरावर आपटत होतं आणि त्याचा खूप आवाज होत होता. आम्हाला बघताच ते सगळे राक्षस ओरडायला लागले. एवढी माणसं खायला मिळणार म्हणून बहुतेक खुश झाले असावेत.

आम्हाला त्या घरात नेलं आणि एक भल्या मोठ्या अंधार्‍या खोलीत ढकललं. सगळे नुसतेच दमून पडले होते. कोणीही बोलत नव्हतं. हलत सुद्धा नव्हतं. पुढे काय होणार ते सगळ्यांनाच कळलं होतं. आता हे राक्षस आम्हाला खाणार. मनात निराशा दाटून आली होती. देवा... आईला सुखरूप ठेव. तिला कोणीच नाही माझ्याशिवाय. आत्ता पर्यंत इतके दिवसांत तिचं काय झालं असेल? माझ्या गायब होण्याने तिला किती त्रास झाला असेल?

आई... आई... आई... आई... !!!!!!!!!

आकोसिवा

पुढे काय झालं कळलंच नाही. जाग आली तेव्हा मी एका मोठ्या खोलीत होते आणि तिथे अजून बर्‍याच बायका होत्या. आणि त्यात अगदी लहान लहान मुली पण होत्या. बहुतेक जणी सुन्न झाल्यासारख्या गप्प बसल्या होत्या. काही लहान मुली रडत होत्या. काही बायका जमेल तसे त्यांना शांत करत होत्या. सगळ्यांना बांधून ठेवलं होतं. बहुतेक मलापण. हात पाय जास्त हलवता येत नव्हते. अंगात त्राणच नव्हते. किती दिवस मधे गेले होते कुणास ठाऊक. बाहेर रात्र आहे की दिवस तेसुध्दा कळत नव्हतं. मला एकदम माझ्या बाळाची आठवण आली. बाळ!!!!! काय झालं असेल त्याचं? भुकेने तडफडलं असेल. कोमी बिचारा एकटा काय करू शकेल त्याचं? मनात नुसती तडफड चालू होती.

बाळा!!! मी आले रे.

मधनंच त्या खोलीचं दार उघडायचं आणि एक माणूस काही खाणं आत टाकायचा. ते तुकडे ज्यांच्या जवळ पडतील ते भाग्यवान. दोन तीन दिवस असेच गेले. भुकेने, विचारांनी डोकं थकून गेलं होतं. एक दिवस ती माणसं आत आली आणि सगळ्यांना दोरखंडाने गच्च बांधून टाकले. आणि बाहेर काढून चालवायला सुरूवात केली. किती दिवस चालत होतो माहित नाही. पण चालताना मधे मधे बर्‍याच बायका खाली पडायच्या. त्यांच्या कडे ढुंकूनही न बघता त्या लोकांनी आम्हाला चालवतच ठेवले. काय झाले असेल त्या बायकांचे? बाप रे!!! विचारही करवत नाही.

एक दिवस चालता चालता मला एकदम एका झाडाखाली माझं बाळ दिसलं. काही समजायच्या आतच मी त्या झाडाकडे धाव घेतली. त्याच क्षणी मोठा काडकन् आवाज झाला आणि माझ्या पाठीवर आगीचा डोंब उसळला. मी भानावर आले. माझं बाळ नव्हतंच तिथे. मला भास झाला होता. आवाज आणि चाबकाचे फटके मात्र चालूच होते. शेवटी मी खाली पडले... पुढचं आठवत नाही.

देवा!!! कसले रे हे लोक? हा काय प्रकार चालू आहे? त्यापेक्षा मरण का नाही देत मला? अजून किती छळ करणार आहेस माझा? माझं बाळ सुखरूप असेल ना?

एका रात्री, तो प्रसंग, ज्याची भिती होती, तो आलाच. मी खूप ओरडले, रडले, नुकतीच बाळंत झाले आहे, परोपरीने विनवले... पण त्याने सोडले नाही. रात्रभर चालू होते. पहिल्या तिघांनंतर मी बेशुध्द झाले. नंतर काय झाले ते माहित नाही. परत शुध्दीवर आले तेव्हा मला दोन माणसांनी एका काठीला बांधून खांद्यावर घेऊन चालले होते. मला शुध्द आलेली बघून लगेच खाली उतरवले आणि पाणी पाजून चालायला लावले.

दिवसा चालायचे आणि रात्री मुक्काम... मुक्काम झाला की, आज कोणाची पाळी हाच विचार सगळ्याजणी करायच्या. दिवसा चालणे बरे, रात्र नको असे चालू होते. दिवस जात होते, रात्री जात होत्या. आम्ही पाय ओढत ओढत चाललो होतो. जरा कुठे पाऊल अडखळले की चाबूक पडलाच पाठीवर. मधे एक तळं होतं त्यात उडी मारून जीव द्यायचा प्रयत्न केला काहीजणींनी, पण त्या माणासांनी त्यांना बाहेर काढलं आणि परत तेच.... जीवघेणी मारझोड. धड मेला जीवही जात नाही.

एक दिवस खूप मोठा आवाज यायला लागला. वाराही सुटला होता. थोड्या वेळाने एक मोठ्ठे पांढरे घर दिसले. एवढे मोठे घर!!! बाप रे!!! आणि जसजसे ते घर जवळ आले तसतश्या बायका किंचाळायला लागल्या. असले भयानक लोक याआधी कधीच बघितले नव्हते आम्ही कोणी. पांढरेफट्टक!!! विचित्र चेहरे!!! केस सोनेरी!!! तोंडावर पण केसच केस. शी: !!! भयानक. राक्षसांनी जबरदस्तीने आम्हाला सगळ्यांना त्या घरात नेले आणि एका मोठ्या खोलीत ढकलून दिले.

खोलीत मिट्ट अंधार आणि.... अक्षरशः किळसवाणी दुर्गंधी. आमच्या आधीच अजून बर्‍याच बायका तिथे होत्या. खोलीत उभं रहायची पण जागा नव्हती. आणि खालची जमीन अगदी निसरडी आणि ओली झालेली होती. खोलीत पाऊल टाकल्या टाकल्या काहीजणीतर भडभडून ओकल्या. आधीच्या वासात अजून भर पडली. त्या वासाने श्वासदेखील बंद झाला. तशाच थकव्याने आलेल्या ग्लानीत सगळ्या दाटीवाटीने उभ्या होतो. बायका आळीपाळीने बसत होत्या. पण खाली बसायची पण इच्छा होत नव्हती इतकी खालची फरशी घाण होती.

सकाळ झाली तसा खोलीत थोडा उजेड आला. डोळे खरेतर अंधारालाच सरावले होते. तो थोडासा उजेडही सहन होत नव्हता. उजेडामुळे त्या भयानक वासाचे कारणमात्र कळले. त्या बायका त्यांचे सगळे विधी तिथेच, बसल्याजागीच, करत होत्या बहुतेक. आणि काहीजणी तर... त्या घाणीतच ते सगळं मिसळलेलं. त्यानेच ती जमीन निसरडी झालेली. पण ज्या बायका तिथे आधी आल्या होत्या त्या आता त्या सगळ्याच्या पलिकडे पोचल्या होत्या. थोड्याच दिवसात मी पण निर्जीव होईन... तो पर्यंत धीर धरायचा...

ब्रिगेडियर विल्हेल्म व्हान डाइक

कमांडर्स लॉगबुक,
ता. २७ मार्च १६६७

अजून एक दिवस गेला. आज अजून माल आला. यावेळचा माल जरा बरा आहे. मागचे जहाज गेल्यापासून जवळ जवळ अडिचशे जिन्नस आले आहेत. यावेळी पुरूष कमी आहेत आणि मुलं व बायका जास्त आहेत. पुढचं जहाज येईपर्यंत पुरूष वाढवले पाहिजेत. नाहीतर जहाजाची फेरी तोट्यात जाईल आणि कंपनीच्या डायरेक्टर्सकडून तंबी मिळेल ती वेगळीच. काही तरी केलेच पाहिजे. दोन तीन दिवसांनी अशांतीला एखादी चक्कर मारावी आणि तिथल्या लोकांना जरा सरळ करावं हेच ठीक राहिल. पुरूष काय सगळे गायब झाले की काय एकदम? का हे हरामखोर अशांती त्या इंग्रजांना परस्पर विकत आहेत चांगला माल? आणि गाळ इथे आणत आहेत? लक्ष ठेवले पाहिजे.

नशीब, आजपण बहुतेकांनी जेवण घेतले निमूटपणे. एवढं चांगलं मिळतं ते खायचं सोडून फेकून देतात. परवा दोन बायकांना असं काही फोडून काढलं आणि बेशुध्द होईपर्यंत उन्हात उभं केलं की, नंतर सगळेच निमूटपणे जे समोर येईल ते खात आहेत. पण हा परिणाम आठदहा दिवस टिकतो. मग परत तेच. ते काही नाही. मधनं मधनं दोघाचौघांना फोडून काढलं पाहिजे, म्हणजे मग नीट राहतात. इलाज नाही. हडकुळ्या जिन्नसांना भाव येत नाही नीट आणि एवढी सगळी मेहनत वाया जाते. जेवढा माल जमलाय तेवढ्याची तपासणी सुरू करून द्यावी उद्याच. नाही तर जहाज आले की खूप गडबड उडून जाते. आणि जहाज दिसलं की हे रानटी राक्षस बिथरतात, जहाजात चढायला घाबरतात, अजिबात आवरत नाहीत कोणाला... आणि मग तपासणी उरकून घ्यावी लागते गडबडीत. डॉक्टर झूसना उद्याच हुकूम जारी करून टाकावा.

फादर व्हान डेर वाल नाराज आहेत. चर्चमधली उपस्थिती खूप कमी झालीय म्हणे. कमीत कमी रविवारी तरी उपस्थिती सक्तीची केली पाहिजे म्हणत होते. हरकत नाही. हुकूम जारी केला पाहिजे. म्हातारं खुश होईल तेवढ्यावर.

आजकाल घरची फार आठवण येते आहे. ख्रिस्टिनाचा वाढदिवस होता काल. सतरा पूर्ण केले. मागच्या पत्रात खूप हट्ट केला होता तिने... नाही जमले वाढदिवसाला जायला. सहा महिन्याची काय तीन महिन्याची पण सुट्टी नाही सध्या. सिझन चालू आहे... जंगलातून एकदा का पावसाळा चालू झाला की माल यायला उशिर होतो आणि माल कमीही येतो. याच दिवसात काय ती जास्तीची कमाई. जाऊ दे. जाईन तेव्हा तिच्यासाठी खूप छान छान वस्तू घेऊन जाईन. जमलंच तर खास तिच्यासाठी म्हणून दोन जिन्नस घेऊन जाईन. घे म्हणावं तुझ्या खाजगी मालकीच्या पोरी. खुश होऊन जाईल एकदम. असंच करावं.

पण यावेळी बायका जास्त आल्या हे एकापरीने चांगलेच. माल जाईपर्यंत मजा येणार एकंदरीत. बाकीचे लोक पण खुश आहेत. या ओसाड जागी बायकापोरं घेऊन रहायचं म्हणजे शक्यच नाही. आणि नुसतं रहायचं म्हणजे हे शिपाई एकमेकांचा जीव घेतील!!! जहाज येईपर्यंत मजा करा लेको. मग आहातच तुम्ही परत एकटे.... नविन माल येई पर्यंत.

चला, उशिर झाला. आजची पोरगी तयार झाली असेल एव्हाना.

क्रमशः

विचारअनुभवमाहितीइतिहाससमाजजीवनमानप्रवास

प्रतिक्रिया

शेखर's picture

11 Nov 2009 - 11:59 pm | शेखर

सुन्न........

शेखर

टारझन's picture

13 Nov 2009 - 12:23 am | टारझन

लै भारी !! ईंटरेस्टिंग वाटला हा भाग !! रोमहर्षक !! चित्ताकर्षक !!!
शेवटी साला हे गुलामांचाच मामला आहे हे कळायला थोडा लेटंच झालो ,
रामदासांचाच लेख वाचतोय की काय असं वाटून गेलं

- शिंपिन घर्टेकर्ते

रेवती's picture

12 Nov 2009 - 12:07 am | रेवती

:(
त्यावेळी झालेले अत्याचार वाचतानाही सहन होत नाहीत........
बिपिनभाऊ काही सुखानं राहू देत नाहीत बहुधा.....
(आनंदी गोष्टी लिहितच नाही काहो तुम्ही?)

रेवती

प्रभो's picture

12 Nov 2009 - 12:15 am | प्रभो

सुन्न.......

बिका, पुढचा भाग लवकर टाक....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

मी-सौरभ's picture

12 Nov 2009 - 12:32 am | मी-सौरभ

सौरभ

स्वप्निल..'s picture

12 Nov 2009 - 12:59 am | स्वप्निल..

:(

प्राजु's picture

12 Nov 2009 - 1:01 am | प्राजु

बापरे!! हे आहे काय नक्की??
वाचवत नाहीये...
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

(बंदिवान)चतुरंग

गणपा's picture

12 Nov 2009 - 2:02 am | गणपा

वाचायलाच जे इतक कठिण जातय, ज्यांनीं हे भोगल असेल त्याची कल्पनाच नाही करवत.. :(

चित्रा's picture

12 Nov 2009 - 9:39 am | चित्रा

भयंकर आहे हे सर्व. कुठचे काय काही अंदाज येत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Nov 2009 - 9:42 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

.

स्वाती२'s picture

12 Nov 2009 - 6:22 pm | स्वाती२

स्लेव्ह ट्रेड

मस्त कलंदर's picture

12 Nov 2009 - 9:35 am | मस्त कलंदर

:( !!!!


मस्त कलंदर..

नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

निखिल देशपांडे's picture

12 Nov 2009 - 9:45 am | निखिल देशपांडे

मोठ्या कष्टाने वाचतोय....
:(

निखिल
================================

सुनील's picture

12 Nov 2009 - 9:54 am | सुनील

अंगावर शहारे येताहेत वाचताना..

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Nov 2009 - 9:57 am | llपुण्याचे पेशवेll

हम्म. वाचतोय.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

वेताळ's picture

12 Nov 2009 - 10:19 am | वेताळ

पाश्चिमात्य लोक किती सभ्य आणि सुसंस्कृत आहेत ह्याचे सुंदर वर्णन केले आहे. किती कष्टातुन त्यानी प्रगती केली आहे. नाहीतर भिकार भारतिय लोक,कष्ट करायला नको,बाहेर जायला नको,का तर कामे करायला लाज येते. बसा म्हणाव कुढत दुसर्‍याची उणीदुणी काढत.
प्रगती होत नाही म्हणुन बोंबलाय रिकामे.
वेताळ

टुकुल's picture

12 Nov 2009 - 10:34 am | टुकुल

चांगल आहे अस पण लिहिता येत नाही..
वाचतोय एवढच बोलतो

--टुकुल

sneharani's picture

12 Nov 2009 - 10:58 am | sneharani

सुन्न.....!

सुमीत भातखंडे's picture

12 Nov 2009 - 12:19 pm | सुमीत भातखंडे

शब्द नाहीत. भयंकर प्रकार आहे सगळा.
वाचतोय.

अन त्यांना ती वर्तणुक देणार्‍यांच्याही भावना सुंदर शब्दात व्यक्त केल्यात बिका.

_/\_

इतर काही बोलायला शब्द उरलेले नाहीत.

राधा१'s picture

12 Nov 2009 - 3:11 pm | राधा१

.........

:SS :(

विनायक प्रभू's picture

12 Nov 2009 - 3:26 pm | विनायक प्रभू

काय बोलु?

परिकथेतील राजकुमार's picture

12 Nov 2009 - 4:46 pm | परिकथेतील राजकुमार

अगदी हिच प्रतिक्रीया देणार होतो बिका.

काटा आला अंगावर.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

आनंदयात्री's picture

12 Nov 2009 - 3:59 pm | आनंदयात्री

अनानी ची कथा वाचुन अ‍ॅपोकॅलोप्टो या चित्रपटाची आठवण झाली.
बाकी कथा गुंतवुन ठेवतायेत .. पुढचा भाग लवकर ..

-
आनंदयात्री

अक्षय पुर्णपात्रे's picture

12 Nov 2009 - 8:55 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री यात्री यांच्यासारखेच. अ‍ॅपोकॅलिप्टोमध्ये अशी शरीरांची सांडलवंड प्रभावीपणे चित्रित केली आहे.

मुक्तसुनीत's picture

12 Nov 2009 - 9:11 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो.
मानवाधिकारभंगाची अनेक उदाहरणे आपल्याला माहिती आहेत. गुलामगिरीचा इतिहास माहिती असला तरी त्यातल्या भीषणतेबद्दल आपण बर्‍यापैकी अनभिज्ञ असतो. (असेच अजून एक उदाहरण : "शिंडलर्स लिस्ट" आला आणि तोपावेतो ठराविक लोकांना पुस्तके वाचून माहिती असलेल्या शोकांतिकेचे दाहक, अमानवी दर्शन जगभरातल्या लोकांना घडले.)

बिपीनचे विशेष आभार.

विशाल कुलकर्णी's picture

12 Nov 2009 - 5:32 pm | विशाल कुलकर्णी

बिकाभाऊ काटा आला अंगावर. कुठल्याकुठे जावून पोहोचवलीत कथा. आधी कुठल्यातरी आदिवासी जातींच्या अंतर्गत संघर्षाची कथा वाचतोय असे वाटत होते तोपर्यंत एवढा भयानक धक्का ! :-(
सुन्न झालीत गात्रे !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

पुढे काय येणार त्याचा साधारण अंदाज होता त्यामुळे वाचायला धीर होत नव्हता. शेवटी वाचले एकदाचे. वाचन संपले आणि जाणवले मी थर थर कापतेय!

रामदास's picture

12 Nov 2009 - 6:27 pm | रामदास

गेल्याने देशाटन ..वगैरे सिध्द करून दाखवताय बाबा.
मिपाच्या इतिहासात एक लँडमार्क.
चारपाच चाबकाचे फटके वाचतानाच बसले.
पुढच्या भागाची वाट बघतो आहे.

सूहास's picture

12 Nov 2009 - 9:04 pm | सूहास (not verified)

..............................................................................................................................................................

सू हा स...