परवशता पाश दैवे... १

Primary tabs

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
10 Nov 2009 - 3:43 am

ही कथा नाही. हा (सुदैवाने) माझा अनुभवही नाही, म्हणजे थोडा माझा आहेच पण अगदी पूर्णपणाने नाही. हे माझ्या अनुभवाचे व काही करोड दुर्भागी आणि अश्राप जीवांच्या अनुभवांचे मिश्रण मात्र आहे. झेपल्यास वाचा. तसेही ढोबळमानाने काय घडले होते हे आपल्याला माहितच असते. वाचले नाही तरी, कमीतकमी मी तरी असे वागणार नाही एवढे स्वतःशीच ठरवा.

परवशता पाश दैवे... भाग १ , भाग २ , भाग ३

*************

- १

थंडगार पहाटवार्‍याच्या झुळकीने आणि पक्ष्यांच्या आवाजाने मेन्साह हळूहळू जागा झाला. बराच वेळ तसाच बसून होता तो. आख्ख्या गावात ही त्याची सगळ्यात आवडती जागा होती. घरामागच्या अंगणातल्या भल्याथोरल्या झाडावरची ही जाडजूड फांदी. कधीही करमेनासे झाले की तो निवांत इथे बसायचा. कधी कधी तिथेच झाडाच्या बेचक्यातच झोपायचा तो. इथून सूर्य, चंद्र, तारे, गावाबाजूची नदी अगदी सगळं सगळं कसं स्वच्छ दिसायचं. खाली उतरलं की गावाच्या कुंपणामुळे नदी दिसायचीच नाही. आणि आजकाल सारखं सारखं नदीवर जाता पण यायचं नाही. आई सारखं लक्ष ठेवून असायची. आजकाल अचानक गावातली मुलं माणसं नाहीशी होत असतात म्हणे. कोणी म्हणतं की पूर्वजांचा कोप झालाय, कोणी म्हणतं की शेजारच्या गावातले लोक त्यांना पळवून नेतात. खरंच असावं ते... गायब झालेला एकही माणूस कधीही परत दिसला नाही. तेव्हापासून कधीही मनासारखं नदीत डुंबायची पण सोय नाही राहिली. मेन्साहला अगदी कंटाळा यायचा. नदीवर जायचं किंवा जंगलात हुंदडायला जायचं तर बरोबर भरपूर हत्यारबंद मोठे लोक असले तरच. पण त्यात काहीच मजा नाही ना!!! थोडं इकडे तिकडे गेलं की लगेच ओरडायला लागतात ते. आणि मोठ्या लोकांना कंटाळा पण फार लवकर येतो. चारपाच सूर मारले पाण्यात की लागलेच ओरडायला आटपा आटपा म्हणून. अगदी कंटाळवाणं झालं होतं त्याला. तरी बरं घरातल्या घरात खेळायला धाकटी बहिण अगोसी तरी होती. पण ती तरी काय आणि किती खेळणार. त्यात परत मुलगी. काही झालं की लगेच आईला हाक मारते. जाऊच दे. आज कसंही करून कुंपणाच्या बाहेर जायचं म्हणजे जायचंच. तेवढीच मजा. बेत पक्का. कोणी आलं बरोबर तर ठीकच. नाही तर एकटाच. तसा मेन्साह फारच स्वच्छंदी. एवढासा लहान पण उनाडक्या मात्र फार त्याला.

बर्‍याच वेळाने मेन्साह खाली उतरला. आईची नजर चुकवून हळूच घराबाहेर सटकला. सावधपणे फिरत फिरत कुंपणाच्या दिशेने सरकायला लागला. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं... त्याच्यामागे कोणीतरी आहे. गर्रकन वळून बघतो तो अगोसी त्याच्या मागेच उभी होती. हे एक लफडंच आता. हिला कसं टाळावं? आणि ही बरोब्बर जाऊन आईला सांगणार. त्यापेक्षा हिलाही सामिल करून घ्यावं हे बरं. नदीवर जायचंच आज. योग्य ती मांडवली झाली आणि बहिण भाऊ दोघे निघाले हळूच. कुंपणाच्या एका बाजूला एक अगदी लहानसा भाग थोडा मोकळा झाला होता. अगदी एखादं लहान मूल सरपटत जाऊ शकेल एवढं. दोघांनी मिळून ते भोक थोडं अजून मोठं केलं आणि सरपटत बाहेर गेले. समोरच नदी. मेन्साह आणि अगोसी धावतच गेले आणि नदीत उड्या मारल्या. मनसोक्त डुंबले दोघे. बर्‍याच वेळाने बाहेर आले आणि एका झाडाखाली अंग वाळवत बसले. तेवढ्यात मेन्साहला झाडामागे काहीतरी आवाज ऐकू आला. त्याने मान वळवली, पण त्या आधीच एक जाडजूड राकट हात आधी त्याच्या तोंडावर आला आणि मग डोळ्यावर.

डोळ्यापुढे अंधार व्हायच्या आधी त्याला अगोसी दिसली... एक भलामोठा माणूस तिचे तोंड दाबत होता.

- २

बाळाला पाजता पाजता ते झोपून गेलं. त्याला हळूच खाली ठेवून आकोसिवाने परत एकदा दाराकडे नजर फिरवली. दिवस पार डोक्यावर आला पण अजून कोमीचा पत्ता नाही. भल्या पहाटे उठून सावकाराकडे गेला होता. चारच दिवसापूर्वी सासरा वारला. त्याचं सगळं दिवसपाणी करायचं म्हणजे केवढा खर्च. नातेवाईक होतेच म्हणा मदतीला पण खर्चच खूप मोठा. सावकाराचं तोंड बघितल्याशिवाय उपायच नाही. पण सावकार म्हणजे मोठी असामी. पार राजापर्यंत पोच त्याची. त्याचं नुसतं दर्शन व्हायलाच नशिब लागतं. तो काय असा सुखासुखी भेटतो का... कोमीला उशिर होणार हे गृहितच होते. पण दिवस डोक्यावरून बाजूला गेला तरी अजून त्याचा पत्ता नाही. काळजीने आकोसिवा पार घाबरून गेली. आता कसं आणि कुठे शोधावं. परत हे बाळ लहान पदरात. आत्ताशी कुठे दोन अंधार्‍या रात्री होऊन गेल्या आहेत. अंगावरच पितंय ते अजून. सासरा होता आधाराला, तो ही गेला. अजून रांधायचं राहिलं होतं. दमून भागून कोमी येईल तर त्याला काहीतरी पुढ्यात सरकवायला पाहिजेच. त्याच विचारात ती उठली आणि चुलीपाशी जाऊन बसली. एकदम तिच्या लक्षात आलं... काटक्या संपल्याच आहेत की!!! हे मात्र फारच मोठं संकट आता. आता या वेळी कुठून आणू लाकडं? सकाळी पोराच्या रगाड्यात राहूनच गेलं. विसरूनच गेलं. आता मात्र काही तरी करणं आवश्यक आहे.

पण पोराला टाकून कसं जायचं? शेजारच्या अयावाला पोराकडे थोडावेळ बघ म्हणून सांगून ती रानाकडे निघाली. आत्तापुरत्या काटक्या मिळाल्या तरी पुरे. बाकीचं नंतर बघू. सगळ्या बायका सोबतीने सकाळीच जाऊन आल्या होत्या. एकटं दुकटं रानात फिरणं आजकाल फारच धोकादायक झालं होतं. काय काय ऐकायला यायचं. लोक अचानक गायब होतात म्हणे रानात. कोणी नदीतच गायब. म्हातारा आदोबायो म्हणतो की रानातले आत्मे फार असंतुष्ट झालेत सध्या आणि त्यांना माणसं खायची चटक लागली आहे आजकाल. माणूस गेला की परत त्याचं नखही दृष्टीस पडत नसे. जसा काही तो हवेतल्या हवेत विरघळून जातो. नाही म्हणायला काही तरूण पोरं गेली माग काढायला रानामधे. पण ती सुध्दा गायबच झाली. त्यानंतर परत कोणाची माग काढायला जायची पण हिंमत नाही झाली. शक्य तेवढं घोळक्याघोळक्याने रानात जायचं आणि लवकरात लवकर परत यायचं, हाच काय तो उपाय. आज मात्र नाईलाज म्हणून अगदी जीवावर उदार होऊनच चालली होती आकोसिवा.

रानात फार आत न जाता ती भराभर काटक्या गोळा करायला लागली. कुठे काही आवाज येतोय का यासाठी ती फार सावध होती. तेवढ्यात तिला काही तरी विचित्र जाणिव झाली. कोणीतरी तिच्या अगदी जवळ आले आहे हे स्पष्टपणे जाणवले. तिला आपण अगदी उलटे पालटे होत हवेत तरंगत आहोत असेही वाटले. मग तिला कळले की तिचा पाय एका दोरीत अडकलाय आणि ती झाडाला लटकते आहे.

डोक्यावर फटका बसण्यापूर्वी तिला एवढेच कळले, एक भलामोठा काळाकभिन्न धिप्पाड माणूस तिच्या बाजूला उभा होता.

- ३

शिपाई दारात उभे राहिले तेव्हा आतल्या बाजूला अनानी नुकताच जेवायला बसायच्या तयारीत होता. कालच्या शिकारीत भलं मोठ्ठं डुक्कर सापडलं होतं. दहाबारा लोकांना अगदी पुरून उरलं होतं ते. शेवटी अनानीच्या भाल्याच्या अचूक वारालाच बळी पडलं होतं ते. तरी सुध्दा पळत राहिलं ते. खूपच दमवलं बेट्याने. पण शेवटी सापडलंच. अनानीचा नेम अचूक. सकाळी सूर्य उगवणार नाही एखाद वेळेस, पण अनानीने भाला फेकला आणि तो लागला नाही असं होणारच नाही, असं आख्य्ख्या पंचक्रोशीतली माणसं छातीवर हात ठेवून म्हणायची. भलं मोठं डुकराचं धूड घेऊन सकाळीच परतले होते सगळे. एवढं मोठं डुक्कर बघून सगळेच खुष झाले होते. आपल्या वाट्याचं डुक्कर आईच्या तावडीत देऊन अनानी मस्त पसरला. त्याला जाग आली तीच मुळी डुकराच्या खमंग वासाने. तसाच तोंड धुवून तो जेवायला बसणार एवढ्यात दारात शिपाई हजर.

राजाने बोलावणं धाडलं होतं. काही दिवसांपासून गडबड चालूच होती. लवकरच त्यांच्या गावावर अशांति हल्ला करणार हे बहुतेक नक्की झाल्यातच जमा होतं. तसेही हे अशांति लोक जरा भांडखोरच. निमित्ताची वाटच बघत बसलेले. कुठे काही खुट्ट झाले की लगेच लढाया मारामार्‍या करायला धावतात. आणि त्यात परत आजकाल त्यांच्याकडे काहीतरी नवीनच हत्यारं आली आहेत म्हणे. नुसता आवाज होतो आणि समोरची दोनपाच माणसं जागीच पडतात, त्यांच्या अंगातून रक्त येतं, पण बाण नाही भाला नाही सुरा नाही... नुसताच आवाज येतो म्हणे. काही तरी चेटूक नक्कीच. पण अनानी असल्या चेटकाला वगैरे घाबरणार्‍यातला नव्हता. त्याच्या जन्माच्यावेळी गावच्या म्हातार्‍याने त्याच्यासाठी खास, रानातनं एक सिंहाचं नख आणलं होतं आणि त्याने त्याची नाळ कापली होती. अनानीला नेहमी तो सिंह आपल्या बाजूला आहे आणि आपले रक्षण करतो आहे असे वाटायचे.

शिपायांना पंगतीला घेऊन अनानीने जेवण पूर्ण केलं आणि निरोप घेऊन तो निघाला. नेहमीप्रमाणे आईच्या डोळ्याला पाणी आलं. पण माया तोडून, तिच्या नजरेला नजर न देता तो तिथून गडबडीने निघाला. नाहीतर त्याच्याही डोळ्यात पाणी आलं असतं. आणि सगळ्या गावभर त्याची छी:थू झाली असती. गावातले असेच अजून वीसपंचवीस लोकसुध्दा निघाले त्यांच्याबरोबर. दिवसभर चालल्यावर रात्री मुक्कामाला राजाच्या गावात पोचले ते. रात्री जेमतेम झोप लागते न लागते तोच, अशांतीचा हल्ला झाला. खूप गदारोळ झाला. अनानीने अगदी शिकस्त केली. चारपाचांना तर अगदी सहज लोळवले त्याने. पण शेवटी अशांतीच्या नवीन हत्याराने जादू केलीच आणि अनानी आणि त्याच्या साथीदारांना माघार घ्यावीच लागली. तेवढ्यात अंधारात कोणीतरी त्याला घट्ट पकडलं आणि दोरीने बांधलं. सकाळ होई होईपर्यंत सगळं शांत होऊनसुध्दा गेलं होतं.

अनानीचा राजा मारला गेला होता. सगळं उध्द्वस्त झालं होतं. अशांतींनी गाव जाळलं आणि जे सापडतील ते लोक, पकडलेले सैनिक वगैरेंना बांधून ते चालू पडले. नदी ओलांडताना अनानीने मागे वळून बघितले, त्याला क्षणभर भास झाला, तो सिंह अजून त्या गावाच्या वेशीवरच थांबला आहे. म्हणजे!!! सिंहाने साथ सोडली की काय? नाही नाही... असे कसे... आत्ता पर्यंत बेफिकिर असलेला अनानी एकदम भानावर आला आणि त्याच्या हातापायातले त्राणच गेले एकदम. तो खाली कोसळला.

पडता पडता त्याला एवढेच जाणवले... कोणीतरी त्याच्या अंगावर चाबकाचे फटके मारत आहे आणि त्याला मात्र त्याचे काहीच वाटत नव्हते.

- ४

गाडी शहराबाहेर पडली आणि गाडीचा वेग वाढला. वेग वाढला तसा गाडीतल्या एसीचा थंडावाही वाढला आणि हा सुखावला. मस्तपैकी पाय ताणून देत त्याने अंग मागे झोकून दिले. बाहेर पावसाळी हवा होती. मधेच थोडा पाऊसही लागला होता. हवा कुंद वगैरे म्हणतात तशी होती. पण हा मात्र बराच एक्सायटेड होता. बर्‍याच वर्षांपासून मनात होते ते आज पूर्ण होणार होते.

हळूहळू, जीव सुखावल्यामुळे, डोळेही जडावले. एकीकडे, जिकडे चालला होता त्याबद्दल, विचार चालू होते मनात. डोळे मिटता मिटता याचं मन एकदम पंचवीस तीस वर्षं मागे, भूतकाळात गेलं. असाच पावसाळी मोसम. शाळा सुरू होऊन दोनेक महिनेच झाले होते. अशीच कुंद हवा. कंटाळवाणा गणिताचा तास अगदी संपण्यात होता. पुढचा तास इतिहासाचा. म्हणजे आवडीचा. त्या तासाची वाट बघण्यात गणिताचा उरलेला तास बराच सुसह्य झालेला. बेल झाली आणि क्षणार्धात गणिताचं पुस्तक आत दप्तरात गेलं, इतिहासाचं पुस्तक बाहेर आलं. सातपुतेबाई बाहेर उभ्याच होत्या. त्या नेहमीसारख्या भरभर चालत टेबलापाशी गेल्या. या बाईही आवडीच्याच. इतिहास शिकवता शिकवता बरंच काही सांगायच्या. आयुष्यात समाजाकडे बघायची दृष्टी असते त्याचं भान बाईंनीच नकळत दिलेलं. अगदी गप्पा गोष्टी करत सगळं चालायचं.

त्या दिवशी मात्र बाईंनी जो धडा शिकवायला घेतला त्याने मात्र हा अगदी गुदमरून गेला. असंही घडतं जगात? माणसं अगदी आपल्यासारख्या दुसर्‍या माणसांशी असं वागू शकतात? आणि एक नाही दोन नाही करोडो माणसांनी हे भोगलं? शेकडो वर्षं हे चाललं होतं? कोणालाच काही वाटत नव्हतं? त्या इतिहासाच्या पुस्तकातली, सभ्य घरातल्या सन्मार्गी मुलामुलींना रूचतील अशी चित्रं एकाएकी बदलून, त्यांच्यामागची खरी भयानक चित्रं समोर आली. बाईंनी नुसत्या शब्दांनी ती उभी केली याच्या डोळ्यांसमोर. तेव्हापासून आजतागायत याला या विषयाबद्दल भयानक कुतूहल वाटत आलेलं. मोठं होता होता जमेल तेव्हा जमेल तसे वाचन करताना या विषयावर बरीच माहिती गोळा केली याने. शाळेत का कॉलेजात असतानाच 'एक होता कार्व्हर' नजरेस पडलं होतं. त्यातनं या लोकांच्या यातनांचं झालेलं दर्शन याला बरेच दिवस अस्वस्थ करून गेलं. ती अस्वस्थता पूर्णपणे गेलीच नाही कधी. अजूनही कधी कधी तो न पाहिलेला छोटा जॉर्ज मनात दिसतो. आई बापांपासून तोडला गेलेला, दुबळा, अशक्त, मायेचे फार कमी क्षण वाट्याला आलेला. पण भयानक चिवट.

याला या लोकांच्या शारिरिक कष्टांबद्दल, छळाबद्दल भरपूर वाचायला मिळाले होते. पण याला खरे वाईट वाटायचे, ते या लोकांच्या 'तुटण्याबद्दल'... आपापल्या आयुष्यात रमलेले हे लोक असे अचानक एकाएकी बाजूला फेकले गेले... आई बाप बायको नवरा मुलं बाळं आप्त... संपलं, एका क्षणात संपलं अगदी. कोणतीही पूर्वसूचना न देता, मनाची तयारी न होऊ देता... नियतीने घाला घातला आणि चालत्या बोलत्या स्वतंत्र माणसांचे केवळ बाह्य स्वरूप माणसाचे असलेले जनावर करून टाकले... या जनावराला मन, भावना वगैरे बाळगण्याची मुभा नव्हती. पण मन असे थोडेच जाते. ते तर सतत आपल्या बरोबरच येते आणि शेवटपर्यंत साथ देते. या लोकांना किती मानसिक यातना झाल्या असतील? आपल्याबरोबर काय होते आहे? काय होणार आहे? त्यात परत शारिरीक यातना. आप्तांचे, गावाचे शेवटचे दर्शन... त्या क्षणी पुढे काय वाढून ठेवले आहे त्याची काही कल्पना नाही... कसे झाले असेल त्यांना? जेव्हा कधी मरण आले असेल तेव्हा, आईच्या मऊमऊ हाताची आठवण आली नसेल? घरातून निघताना बिलगलेल्या बायकापोरांची याद आली नसेल? जे लगेच मेले नाहीत पण कित्येक वर्षं लांबलेलं दिर्घायुष्य ज्यांच्या नशिबी आलं त्यांचा जीव असा सुखासुखी गेला असेल? ज्यांच्यामुळे हे भोग वाट्याला आले त्यांना शाप दिले नसतील? आणि त्या लोकांना हे तळतळाट भोवले नसतील? त्यांच्या शेवटच्या क्षणी हे पाप त्यांच्या भोवती फेर धरून नाचलं नसेल?

सगळेच भयानक, अगदी मुळापासून हलवून टाकणारे. अंतर्मनात खोलवर हे अगदी रुतून बसलेले.

याला प्रत्यक्ष आफ्रिकेत जायचा योग आला, नोकरीनिमित्ताने. आफ्रिकेचे आकर्षण होतेच मनात. पण संचारही वाढला. त्यामुळे हा खुष होता. एके दिवशी कळलं की ज्या ठिकाणी या भयानक नाट्याचा एक फार मोठा अंक खेळला गेला ते ठिकाण हा नेहमी जिथे जायचा त्या गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. अंतर्मनातलं आकर्षण उसळून बाहेर आलं. कसंही करून तिथे जायचंच. विचार पक्का ठरला आणि एक दोन मित्रांना घेऊन हा निघाला....

क्रमशः

इतिहाससमाजजीवनमानप्रवासविचारअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

गणपा's picture

10 Nov 2009 - 4:25 am | गणपा

बिका जबरदस्त रे, वाचतान मध्येच काटा आला.
पुढे काय वाढल असेल याची कल्पना येतेय, पण तरीही उत्सुकता/उत्कंठा आहेच...
पुढचे भाग लवकर येउदेत...
याची माती करु नकोस ही नम्र विनंती..

प्रभो's picture

10 Nov 2009 - 7:10 am | प्रभो

मस्तय.......

वाट पाहतोय पुढच्या भागाची....लवकर टाका बिकाशेठ
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

मीनल's picture

10 Nov 2009 - 4:34 am | मीनल

वाचते आहे
मीनल.

घाटावरचे भट's picture

10 Nov 2009 - 5:49 am | घाटावरचे भट

मस्तच!!

मस्त कलंदर's picture

10 Nov 2009 - 6:36 am | मस्त कलंदर

वेगळी शैली आवडली....

लेख छान जमलाय यात वादच नाही.... नेहेमीप्रमाणे मस्तच... असं मनात असूनही यावेळेस म्हणावंसं वाटत नाही कारण जे काही आहे ते जीवाला चटका लावणारं आहे....तरीही ते घडलंय..आणि सत्य आहे.....कळत नाही एक माणूस दुसर्‍या माणसाशी इतक्या दुष्टपणे कसा वागू शकतो???

बाकी, वरच्या फोटोबाबत अदितीशी अगदी सहमत!!!!! परवशता.... दुसरं काय??

पुढचा भाग कधी??? संध्याकाळी???? :W

मस्त कलंदर..

नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

रेवती's picture

10 Nov 2009 - 6:51 am | रेवती

सुन्न झाले.

रेवती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Nov 2009 - 9:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

याला चांगलं कसं म्हणू?

अदिती

सुबक ठेंगणी's picture

10 Nov 2009 - 10:02 am | सुबक ठेंगणी

प्रभावी लेखन...सुन्न करणारं...
पुढच्या भागात काय होणार हे वाचायची उत्सुकता आहे पण आणि नाही पण. रूटस ची आठवण मलापण झाली.

सन्जोप राव's picture

10 Nov 2009 - 7:05 am | सन्जोप राव

पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे.
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.

नंदन's picture

10 Nov 2009 - 7:21 am | नंदन

प्रभावी लेखन, पुढच्या भागांची वाट पाहतो आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

आनंदयात्री's picture

10 Nov 2009 - 5:35 pm | आनंदयात्री

हेच म्हणतो. तुकडया तुकडयात कथा दिल्या आहेत उत्सुकता वाढली आहे. शिर्षकही सुंदर .. जुन्या आठवणी जागवणारे !!

यशोधरा's picture

10 Nov 2009 - 5:51 pm | यशोधरा

मीही पुढील भागांची वाट पाहते. पकड घेणारे लिखाण.

लवंगी's picture

10 Nov 2009 - 8:02 am | लवंगी

माणसातली माणूसकी संपली कि अशी पाशवी कृत्य घडतात..

आपल्याकडे गावातल्या गरीब मुलांना घरकामासाठी मुंबई-पुण्याकडे आणल जात.. का कुणास ठाऊक पण हा लेख वाचताना आई-बाबांपासून तोडलेली, गावच्या मोकळ्या हवेतून शहराच्या खूराड्यांत कोंडलेली, दिवसभराच्या काम रगाड्यात पिचलेली लहान मुल डोळ्यापुढे आली.

स्वाती२'s picture

10 Nov 2009 - 6:50 pm | स्वाती२

अगदी अगदी! काही मुलं तर घरच्यांनीच विकलेली!

Nile's picture

10 Nov 2009 - 7:59 am | Nile

कर्क, नंदन अन संजोप राव यांच्यासारखेच म्हणतो. पुढील भागाची वाट पहातो आहे.

विकास's picture

10 Nov 2009 - 8:11 am | विकास

उत्तम!

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

llपुण्याचे पेशवेll's picture

10 Nov 2009 - 8:14 am | llपुण्याचे पेशवेll

उत्तम. लवकर पुढचे भाग येऊदेत.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

मुक्तसुनीत's picture

10 Nov 2009 - 9:37 am | मुक्तसुनीत

लिखाण प्रभावी वाटले. जे पाहिले तसे मांडल्यामुळे प्रामाणिक वाटले. पुढील सचित्र भाग वाचण्यास उत्सुक आहे.

बाकी शतकानुशतके झालेल्या पिळवणुकीच्या कथा वाचताना खिन्न वाटले. कुंटाकिंटेची कहाणी, सोल्झेनित्सिन ची कहाणी, अ‍ॅन फ्रँकची कहाणी , वेगवेगळ्या शतकात , प्रदेशात घडलेल्या असल्या तरी ....."तुझी माझी धाव आहे दातापासून दाताकडे" हेच खरे.

निखिल देशपांडे's picture

10 Nov 2009 - 9:50 am | निखिल देशपांडे

पुढील भागाची वाट पहातो आहे.

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

टारझन's picture

10 Nov 2009 - 10:44 am | टारझन

प्रतिक्रियांवरून नजर फिरवल्याच प्रभावी लेखण असल्याचं जाणवतं !
रात्री वाचून प्रतिक्रिया अपडेटवू !

परिकथेतील राजकुमार's picture

10 Nov 2009 - 1:57 pm | परिकथेतील राजकुमार

उत्कंठा वाढली आहे बिका, पुढचे भाग पटापटा येउ द्या.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

sneharani's picture

10 Nov 2009 - 2:13 pm | sneharani

पुढचे भाग पटापट येऊ देत..

अवलिया's picture

10 Nov 2009 - 2:16 pm | अवलिया

उत्तम. प्रभावी लेखन !!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

श्रावण मोडक's picture

10 Nov 2009 - 2:21 pm | श्रावण मोडक

वाचतो आहे...

विशाल कुलकर्णी's picture

10 Nov 2009 - 4:10 pm | विशाल कुलकर्णी

वाट पाहतोय, लवकर येवू द्या पुढचा भाग !

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

सुनील's picture

10 Nov 2009 - 5:08 pm | सुनील

वेगळ्याच विषयावरील कथा वाटते आहे. हा भाग सुंदर. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Nov 2009 - 5:18 pm | बिपिन कार्यकर्ते

ही कथा नाही. नक्की काय आहे ते, आणि कसे आहे ते कळेलच पुढे.

बिपिन कार्यकर्ते

सुनील's picture

10 Nov 2009 - 5:24 pm | सुनील

"सत्य"कथादेखिल कथाच की! ;)

पुढील भागाची वाट पहात आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

हे अजून किती शतकं आपण सिद्ध करत रहाणार आहोत?
वाचताना कार्वर आठवला...
पुढे वाचायची उत्सुकता लागून राहिली आहे.

(बंदिवान)चतुरंग

मदनबाण's picture

10 Nov 2009 - 6:01 pm | मदनबाण

वाचतोय...

मदनबाण.....

प्रसन्न केसकर's picture

10 Nov 2009 - 6:10 pm | प्रसन्न केसकर

वाचायला मजा येतेय. असेच नेटानं लिहित रहा. माती करु नका.

विनायक प्रभू's picture

10 Nov 2009 - 6:27 pm | विनायक प्रभू

लिखाणाला धार चढतेय रे बिका.
हातातले काम संपले परत जरा नीट वाचतो.
काय ते तुला माहीत आहे.

खरंच 'रूट्स' व 'कुंता किंते'ची आठवण झाली!
सुधीर
------------------------
ही लिंक वाचा: http://tinyurl.com/yf7l59q

स्वाती२'s picture

10 Nov 2009 - 6:46 pm | स्वाती२

वाचत आहे.
>>तिला कळले की तिचा पाय एका दोरीत अडकलाय आणि ती झाडाला लटकते आहे.
ते पोचर प्राणी पकडतात त्याची आठवण झाली आणि ....

सुमीत भातखंडे's picture

10 Nov 2009 - 6:58 pm | सुमीत भातखंडे

उत्सुकता वाढत्ये.

सूहास's picture

10 Nov 2009 - 6:58 pm | सूहास (not verified)

.......

सू हा स...

वेताळ's picture

10 Nov 2009 - 7:19 pm | वेताळ

अजुन नीट कळाले नाही पण दुसरा भाग लवकर येवु दे.
वेताळ

भानस's picture

10 Nov 2009 - 8:29 pm | भानस

बिपिनजी अतिशय पकड घेणारेच आहे. सत्यकथन-अनुभव जे असेल ते. मन सुन्न झाले. लेखाचे शिर्षक आणि फोटो नेमके. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

प्रियाली's picture

14 Nov 2009 - 6:39 am | प्रियाली

इतिहास शिकवता शिकवता बरंच काही सांगायच्या. आयुष्यात समाजाकडे बघायची दृष्टी असते त्याचं भान बाईंनीच नकळत दिलेलं.

हेच हेच. १०१% सहमत.

इतिहास हा गुण मिळवायचा स्कोरिंग विषय असतो हे देखील मला सातपुते बाईंकडूनच शिकायला मिळालं. ;)