जननायक प्रभू राम अभ्युदय कादंबरीचे महानायक

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
6 Oct 2009 - 7:58 pm

जननायक प्रभू राम

शतकानुशतके रामकथा भारतीय समाजाला प्रेरणा देत आली आहे. विविध कालखंडात, वेगवेगळ्या प्रांतात राम कथेची विविध रूपे लोककलेतून, काव्यातून, नाटकातून, नृत्यातून, प्रकट केली गेली. महाराष्ट्रात गीत रामायणाच्या रूपाने राम कथा तेजाळली. मराठी भाषेला धन्यता लाभली असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सन 2005 मधे गीत रामायणाला 50 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने गीत रामायणाच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला.

हजारो वर्षांच्या कालप्रवाहात या कथेला अनेक रंगांचे वेष्टण लाभले. रामचंद्रांच्या, लोकोत्तर कार्याच्या प्रभावातून रामांचे प्रभू, भगवान, अलौकिक देवता म्हणून रूपांतर झाले. देवालयात त्यांची स्थापना होऊन विविध सण व धार्मिक कृत्ये निर्माण झाली. राम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या एकत्रित रूपात मूर्ती देवालयात सजल्या. राजाश्रयातून चित्रकला, स्थापत्य, मूर्तीकला, यांचा अनुपम विकास पावला व प्रचंड मंदिर संकुलांची स्थापना झाली. देव रूपात राम डाव्या हाताच्या खांद्याला धनुष्य व पाठीला मोजक्या काही बाणांचा भाता लटकवून व उजव्या हाताने भाविक भक्तांच्या मागण्यांना हवा तो आशीर्वाद देते झाले. ‘रामाने रावणास मारले‘ या मराठी भाषा व्याकरणातील भावे प्रयोगाच्या वाक्यात रामायणाची इति कर्तव्यता झाली असा आभास होऊ लागला.

संध्याकाळच्या परवचात पाठांतराचा मापदंड व संस्कृतोच्चार शुद्ध होण्याला मदत म्हणून रामरक्षा म्हणणे ब्राह्मण कुटुंबात अनिवार्य झाले. शिवाय रात्री-अपरात्री एकटे राहण्याची पाळी आली तर मनातल्यामनात किंवा भितीने अधिक गाळण उडाली तर मोठमोठ्यांने राम रक्षा म्हणून भीती घालवण्याला मानसिक आधार म्हणून ती उपयोगी पडू लागली. हनुमानाला शनिग्रहाचा वार आणि मंदिर वाटून मिळाले व तेलाचे सचैल स्नान घडू लागले. कीर्तनकारांनी रामनामाच्या जपाचे महत्व उपदेशल्याने जप माळ हातात घेऊन वृद्धांना विरंगुळा मिळाला. अंत-काळी ‘राम’ म्हणण्याने सर्व पापांचा नाश होणार व मोक्षपदाची प्राप्ती होणार असल्याने रामाला साकडे घालण्यात सार्थकता वाटू लागली.

रामांच्या चरित्राचे अवलोकन करता रामांनी कोणाही भक्ताला माझे फक्त नाम घे असे आश्वासन दिल्याचे संदर्भ सापडत नाहीत. रामांनी ज्ञान-कर्म-भक्ती मार्गाचे वर्णन करून गीता कथन केल्याचे वाचनात येत नाही. वनवासाच्या काळात सीतेच्या मनोरंजनार्थ पौराणिक कथा वा गुजगोष्टी करना राम दिसत नाहीत. बंधू लक्ष्मण व अन्य सहकार्‍यांबरोबर काही अध्यात्मिक चर्चा करून, त्यांच्या शंका-संशयांचे निराकरण केले असाही फारसा संदर्भ मिळत नाही. आसपासच्या राना- वनातील रयते मधील लोकांशी संपर्क करून रामानी त्यांना धार्मिक वा पौराणिक कथा कथन कसे आपलेसे केले असेल याचा ओहापोह मिळत नाही.

रामायण पूर्वकालीन राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती काय होती? त्या वेळच्या समस्या काय असाव्यात? दुष्ट व्यक्ती, वन्य जनावरांपासून, निसर्ग निर्मित धरणीकंप, महापूर, अवर्षण सारख्या प्रकोपांना त्यावेळी लोकांनी कसे तोंड दिले असावे?

शेती, वस्त्र, निवारा व अन्य जीवनावश्यक सुविधांची निर्मिती करणार्‍या कलांचे रक्षण व शिक्षण देण्याची पद्धती कशी असावी़? राक्षस संस्कृतीचा प्रभाव काय होता? शस्त्र निर्मितीसाठी धातू खाणींचा शोध, युद्धकला व अन्य विद्याभ्यास, काव्य-शास्त्र-विनोद यांचा विकास कसा साधला गेला असावा? रामांच्या चरित्रामुळे त्यामधे काय व कसा परिणाम झाला? असे अनेक विचार सामान्य माणसाला पडतात. रामायणातील व्यक्तिरेखा मनात काय काय विचार करत असाव्यात ? याचे कुतुहल प्रत्येकाला असते. रामायणातील काही प्रसंगातून रामांच्या व्यक्तीरेखेचे दर्शन करण्यासाठी अनेकांना लेखनाची प्रेरणा मिळाली.

आरंभ - 2005 च्या हिंदी विभागातील उत्कृष्ठ लेखनाचा पुरस्कार सुप्रसिद्ध कादंबरीकार श्री.नरेन्द कोहली यांच्या नावाने दिला आहे. यांनी हिन्दी भाषेत ‘अभ्युदय’ नावाची रामकथा कादंबरी रूपात प्रस्तुत केली आहे. त्या रामकथेतील राम त्यांनी जननायक स्वरूपात दर्शवला आहे. जन-सामान्यांच्या व्यथा, समस्या, दुःखे यांच्याशी राम कसे समरस होतात, त्यांच्या जीवनाची इति कर्तव्यता लोककल्याणाशी कशी जुळली आहे. रामांनी राजप्रासाद सोडून खेड्यापाड्यातील, वने, जंगलातील लोकांना ज्यांचा त्या काळातील सुधारलेल्या जगाशी संपर्क नव्हता अशा जाती-जमातींना आपलेसे करून घेतले. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाला प्रखर पराक्रमाची धार होती. अगतिक गांजलेली सामान्य जनता व स्वतःमधे मशगूल, ऐशारामी राजसत्तेमुळे त्यावेळच्या शस्त्रसंपन्न व आधुनिक पण निर्दयी राक्षस संस्कृतीला टक्कर देण्याची हिम्मत खंडप्राय देशात राहिली नव्हती. रामांसारखा लोकोत्तर नेता जनतेच्या मानसिकतेची रग जाणणारा व त्यांच्या सुख-दुःखांच्या जगात उतरून त्यावर यशस्वी मात कशी करायची याचा आदर्श घालून देणारा, चारित्र्य संपन्न राज्यकर्ता म्हणून तळपून दिसतो. ही त्या काळाची गरज होती. रावण वध हा फक्त स्वतःची पत्नी हरण केली गेली म्हणून तिला परत मिऴवण्यासाठीचा बदला किंवा सूड असा रामांच्या वैयक्तिक समस्येशी जोडलेला नसून त्यावेळच्या राजकारणाचा एक भाग म्हणून वापरला गेलेला डावपेच होता. सीता पळवली जावी असे ठरवले नसताना अचानक आलेल्या संकटाचा संधी म्हणून कसा वापर केला गेला. रामांनी मिळवलेली व नवीन बनवलेली शस्त्रे यामधून मरगळलेल्या व पराजित मनोवृत्तीच्या तरुणाईला शस्त्र विद्येचे तंत्र-मंत्र देऊन आपल्या समाजाचे रक्षण करण्याचा आत्मविश्वास जागृत केला. पुढे युद्धात उभे राहिल्यामुऴे वानर आणि अन्य अनेक जंगली व मागासलेल्या जाती जमातींमधील जनतेला अन्यायाविरुद्धच्या लढाईला सज्ज केले. प्रगत व प्रचंड संहारक शक्ती असलेल्या बलाढ्य सेनेचा यशस्वी मुकबला करून युद्धात विजय मिळवला.

श्री. नरेंद्र कोहलींच्या लेखनाचे महत्वाचे वैशिष्ठ्य असे आहे की संभाषणाच्या आधी घडणार्‍या मनोव्यापारातून व्यक्तिरेखांचा गाभा कसा असावा याचे त्यांनी केलेले वर्णन. त्यांच्या लेखनातून राम कथेतील रामांची व्यक्तीरेखा तळा-गाळातील लोकांच्या जननायकाची कशी आहे याची कल्पना येते. उत्सुक वाचकांनी ती कादंबरी व त्यांचे अन्य साहित्य जरूर वाचावे.

संकलन - विंग कमांडर (निवृत्त) शशिकांत ओक,

डॉ. नरेंद्र कोहलींचा अल्प परिचय

दि. 6 जानेवारी 1940 रोजी सध्याच्या पाकिस्तानातील क्रिकेटच्या बॅट्ससाठी प्रसिद्ध सियालकोट शहरात त्यांचा जन्म झाला. विभाजनानंतर वडील - परमानंद व आई - विद्यावती यांच्या समावेत त्यांचे बालपण व शिक्षण जबलपूरला झाले. पत्नी डॉ. मधुरिमा, मुलगे - कार्तिकेय व त्याची पत्नी डॉ. वंदना, व अमेरिकेत राहणारा अगस्त्य असा त्यांचा परिवार आहे, त्यांनी 1970 साली दिल्लीच्या रामजस कॉलेजामधून हिंदी साहित्यामधे पीएच डी मिळवली. लघुकथा, नाटके, विनोदी व सामाजिक गंभीर विषयावर त्यांनी विपुल साहित्य निर्माण केले आहे. या शिवाय चरित्रात्मक कादंबर्‍यांचे लेखन हे त्यांच्या साहित्याचे महत्वाचे वैशिष्ठ्य आहे.

रामायणावर आधारित ’अभ्युदय’ मधील श्रीराम लोकनायकाच्या रुपातून त्यांनी सादर केला. ’अभियान’ कादंबरीमधे श्रीकृष्ण व सुदामा यांच्या मित्रप्रेमाच्या कथानकावरील पार्श्वभूमीवर त्या काळातील राजकीय व सामाजिक समस्यांची उकल त्यांनी केली आहे. महाभारतावर आधारित यांच्या ’महासमर’ कादंबरीत महाकवी व्यासांनी रेखाटलेल्या प्रसंगातून सादर केलेल्या व्यक्तिरेखांचा व सध्याच्या परिस्थितील मानवी समस्या यांचा समन्वय कोहलींच्या आत्म प्रेरणेमधील लिखाणातून घडतो. महाभारताचा कणा गीता उपदेश आहे. कर्म मार्गाचा अवलंब करून मन, बुद्धी आणि मानवी संवेदना यांच्या मिश्रणातून तर्कनिष्ठ गीतोपदेश त्यांनी अद्वितीयपणे रंगवून नवा प्रकाश टाकला आहे. प्रकांड पांडित्य व प्रखर प्रतिभेचे दर्शन घडवणार्‍या आठ खंडातून त्यांच्या लेखनाचा उरक व प्रचंड आवाका कळून येतो.

डॉ. नरेंद्र कोहलींना विवेकानंद हे सामाजिक, राजकीय, धार्मिक व अध्यात्मिक बंधनातून भारतीयांना मुक्त करणारे महापुरूष वाटतात. ’तोडो कारा तोडो’ या कादंबरीतील विवेकानंदांचे प्रखर व्यक्तिमत्व हे त्यांना अपेक्षित भारतीयतेच्या स्वरूपाचे सत्यदर्शन घडवणारे आहे. त्यांच्या लिखाणामुळे हिंदी साहित्य जगताला सामाजिक जाणिवांचे अनेक धक्के बसले तर नवल नाही.

डॉ. नरेंद्र कोहलींची निवडक ग्रंथ संपदा

1) अभ्युदय - कादंबरी (पाने - 1292 - दोन खंड - किंमत - रु. 400)

2) महासमर - कादंबरी (पाने - 4150 - आठ खंड - किंमत - रु. 2100)

3) अभियान - कादंबरी (पाने - 232 - एक खंड - किंमत - रु. 5)

4) तोडो कारा तोडो - कादंबरी (पाने - 1716 - चार खंड - किंमत - रु. 600)

डॉ. नरेंद्र कोहलींचा पत्ता -

वैशाली, 175, प्रीतम पुरा , नई दिल्ली. 110088.

संस्कृतीवाङ्मयइतिहाससाहित्यिकसमाजशिक्षणरेखाटनसमीक्षाप्रतिभा

प्रतिक्रिया

टारझन's picture

6 Oct 2009 - 8:07 pm | टारझन

शब्द संख्या ?

निमीत्त मात्र's picture

6 Oct 2009 - 8:32 pm | निमीत्त मात्र

हे 'जननायक प्रभू' कोण? अम्हा मिपाकरांना 'विनायक प्रभू' माहित आहेत. त्यांचे हे बंधू का?

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Oct 2009 - 8:33 am | llपुण्याचे पेशवेll

ओकसाहेब,
धन्यवाद एका चांगल्या लेखकाची ओळख करून दिल्याबद्दल. हिंदी वाचन फारसं नसल्याने आणि त्यात फारसा रस नसल्याने त्यापासून सध्या तरी दूर आहे. असो..

अवांतरः 'जननायक प्रभू' कोण ते लेख वाचला असता तर कळले असते. असो. अभिव्यक्ती स्वांतंत्र्याच्या जमान्यात स्टिरीओटाईप प्रतिक्रिया येणे ही काही नवी गोष्ट नाही.

पुण्याचे पेशवे

अवलिया's picture

7 Oct 2009 - 9:25 am | अवलिया

धन्यवाद एका चांगल्या लेखकाची ओळख करून दिल्याबद्दल.

सियावर रामचंद्र की जय !!!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

अमोल केळकर's picture

7 Oct 2009 - 11:20 am | अमोल केळकर

असेच म्हणतो
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

प्रकाश घाटपांडे's picture

7 Oct 2009 - 10:16 am | प्रकाश घाटपांडे

संध्याकाळच्या परवचात पाठांतराचा मापदंड व संस्कृतोच्चार शुद्ध होण्याला मदत म्हणून रामरक्षा म्हणणे ब्राह्मण कुटुंबात अनिवार्य झाले. शिवाय रात्री-अपरात्री एकटे राहण्याची पाळी आली तर मनातल्यामनात किंवा भितीने अधिक गाळण उडाली तर मोठमोठ्यांने राम रक्षा म्हणून भीती घालवण्याला मानसिक आधार म्हणून ती उपयोगी पडू लागली. हनुमानाला शनिग्रहाचा वार आणि मंदिर वाटून मिळाले व तेलाचे सचैल स्नान घडू लागले. कीर्तनकारांनी रामनामाच्या जपाचे महत्व उपदेशल्याने जप माळ हातात घेऊन वृद्धांना विरंगुळा मिळाला. अंत-काळी ‘राम’ म्हणण्याने सर्व पापांचा नाश होणार व मोक्षपदाची प्राप्ती होणार असल्याने रामाला साकडे घालण्यात सार्थकता वाटू लागली.

वा अगदी मनातल बोल्लत. भुत काळात नेलत ओकसाहेब
गीत रामायण आपल्या गावा़कडे रेडीओवर ऐकत असू. आपला रामनवमी उत्सव लई भारी असायचा. सारवलेले मंदिराचे प्रांगण, मांडव डहाळे टाकून, सडा टाकून सजवलेले अंगण व ओटा, त्यावर पडलेली मोगरा,जाई व पारिजातकाची फुले , रामजन्माला आलेली गावकर्‍यांची अलोट गर्दी. दत्तु आरोट्याचा लाउस्पीकर लाऊन त्यावर रामजन्माचे किर्तन होई.त्याने गीतरामायणाची यल्पी( ग्रामोफोनची लांब तबकडी) पण आणली होती. राम सीता लक्षमण यांच्या मूर्तींना इतके विलक्षण पद्ध्तीने सजवले जाई कि मुर्तीतला राम हा जणु खरा धनुर्धारी रामच भासे. (रामाच्या अलंकाराची , वस्त्रप्रावरणाची वेगळी पेटीच् होती) पण हा उत्सव खरे तर भाउबंदकीतल्या ईर्षेतून व्हायचा . राममंदीर घाटपांड्यांचे कि सार्वजनिक असा तो वाद दोन पिढ्या चालला होता. त्याची कागदपत्रे इतिहासही अयोध्येच्या राममंदिरासारखा वादग्रस्त होता तसेच रोचक होता तो शेवटपर्यंत खर्‍या अर्थाने मला समजला नाही. मंदिर? त्या संबंधीत असलेली जमीन? त्याचा व जनामास्तर यांचा संबंध?(जनामास्तर आमच्या गटातले) आपल्या पक्षातले कोण शत्रू पक्षातले कोण? असे अचंबित प्रश्न मला त्या काळी पडत. मी काही विचारले की अजुन तू लहान आहे असे उत्तर मिळे.कोर्टात आमचे चुलत आजोबा या मंदिराच्या मुर्ती या कै. लक्ष्मीबाई हरी (कोम) जाधव यांनी बसवलेल्या आहेत असे प्रतिपादन करित.( हे कंसातील कोम काय दर्शवायचे कुणास ठाउक?) आमचे आजोबा म्हणत कि हे मंदिर सर्व घाटपांड्यांचे आहे. ते राममंदिर आमचे घर आणि आमच्या चुलत आजोबांचे घर यात सँडविच झाले होते. कोर्टात वाद प्रतिवाद वर्षानुवरषे चालूच होते.मंदिरालगत एक आड असा जुन्या कागदपत्रात उल्लेख होता. त्याची खातरजमा करण्यासाठी न्यायमुर्ती स्वत: आले होते. आयताकृती मंदिराच्या डायगोनली अपोझिट दोन आड होते एक आमचा व एक चुलत आजोबांचा.(जुडवा भाई सारखे) न्यायमुर्ती चक्रावून गेले खरा आड कोणता?(इकड आड तिकडे विहिर अशी अवस्था) शेवटी तो निकाल वडिलांचे हयातीत आमच्या बाजूने लागला आणि वडिल म्हणाले " आता मंदिर सार्वजनिक झाले तरी हरकत नाही. शेवटी देव सर्वांचाच आहे. तसही मंदिर हे सर्वांसाठी खुलच होते"
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विजुभाऊ's picture

7 Oct 2009 - 10:21 am | विजुभाऊ

‘रामाने रावणास मारले‘ या मराठी भाषा व्याकरणातील भावे प्रयोगाच्या वाक्यात रामायणाची इति कर्तव्यता झाली असा आभास होऊ लागला.

विंग कमाम्डर साहेब व्याकरणात सुद्धा थापा ;)
रामाने रावणाला मारले हा शुद्ध सकर्मक कर्तरी प्रयोग आहे.
रामाने रावणाला मारावे हा सकर्मकभावे प्रयोग होऊ शकतो.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत