पेर्णा १:
पेर्णा २.
( काटा रुते कुणाला )
'बाट्या' हव्यात मजला
ऐकीत नाही कोणी
मिळतील का पुण्यात
ठावे कुणास नाही
विसरू कशी आता मी
इंदोरची ती बाटी
पुणे-तेथ कायुणे
भलतीच बात खोटी
स्वगृही करू पहातो
रुजतो अनर्थ तेथे
भार्या पुणेकरिण ती
हा दैवयोग आहे
सांगू कशी कुणाला
कळ आतल्या जिवाची
बाट्या न खात जगणे
मज शाप हाचि आहे
हे भाग्य वंचना की
काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी
मी रिक्त-पोट आहे.
प्रतिक्रिया
4 Aug 2023 - 3:29 pm | गवि
बाट्या हा त्या अप्रतिम डाळीसोबत येणारे आवश्यक संकट म्हणून त्यांकडे बघत असल्याने आपला पास. त्याच आमटीत मी आंबेमोहोर भात किंवा दोन तीन गरमागरम पोळ्या कुस्करून खाणे अधिक पसंत करेन.
बाकी कविता चांगली आहे .
4 Aug 2023 - 3:32 pm | प्रचेतस
आंबेमोहोरापेक्षा इंद्रायणी अधिक भारी लागेल असे नमूद करतो.
बाकी इकडे रामदेवला दाल बाटी लै भारी मिळते, इकडे आलात की खिलवीन.
4 Aug 2023 - 3:35 pm | गवि
आंबेमोहोर आणि इंद्रायणी हे दोन्ही आमचे जीव की प्राण. त्यात स्पर्धा नाहीच.
शिवाय घनसाळ, जिरगा आहेतच. अस्सल मिळत नाहीत नेहमी विशेषत: काळा जिरगा. मग गोवा येता जाता आजर्याहून उचलतो.
4 Aug 2023 - 3:53 pm | प्रचेतस
अस्सल आंबेमोहोर मिळणे हल्ली खूपच कमी झालेय. भोर साईडला मिळतोय ठराविक ठिकाणी, बाकी बहुतकरुन परराज्यातलाच येतो हल्ली, त्याला ती इथली चव नाहीच.
4 Aug 2023 - 3:37 pm | गवि
तुमच्या पुण्यात मिसळ वगैरे तामसी आहारावर भर असतो असे जाता जाता निरीक्षण. इकडे कोंकण मुंबई साईडला वाटाण्याची मिसळ असते. ती खरी अस्सल. तुम्ही मटकी वगैरे चबर चबर लागणारी कडधान्ये वापरता. पण असो.
4 Aug 2023 - 3:52 pm | प्रचेतस
पुण्यात सर्व प्रकारच्या तिखट, गोड, मटकी, वाटाण्याच्या, कुठलेही कडधान्य नसलेल्या, फक्त कांदा लसूण मसाला असलेल्या, आल्याचा रस्सा असलेल्या, काळा, तांबडा, लालभड सर्व प्रकारच्या मिळतात फक्त कुठे ते माहिती हवे, अस्सल पुणेरी मिसळही तुम्हाला खायला घालेन. बाकी ते वाटाणे रस्सा असलेली मिसळ मराठवाड्यातही मिळते, पांचट रस्सा आणि मोठमोठे वाटाणे, बोगस एकदम.
4 Aug 2023 - 3:53 pm | गवि
आता या सर्व मिसळी चाखणे आले. धन्यवाद.
मराठवाडा मिसळ : सहमत. आपली मते नेहमी जुळतात असे एक जाता जाता निरीक्षण..
4 Aug 2023 - 4:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>मराठवाड्यातही मिळते, पांचट रस्सा आणि मोठमोठे वाटाणे, बोगस एकदम.
एक दोन ठिकाणी मिसळ खाऊन सगळ्या मराठवाड्याच्या मिसळीवर मत व्यक्त करणारे मिपाकर बघितले की हसायला येतं. चालायचंच.
पिंपरी चिंचवडीत एका मिपाकराने अस्सल मिसळ म्हणून एक दोन ठिकाणी मिसळी खाऊ घातल्या आहेत. पानचटच मिसळी होत्या. अर्थात अजुन कुठे चांगली मिळतही असेल.
आपलं काम खाण्याशी.
-दिलीप बिरुटे
4 Aug 2023 - 4:05 pm | गवि
कोण हो तो मिपाकर?
5 Aug 2023 - 8:14 pm | कंजूस
१)रामदेव कुठे?
२) इतर ठिकाणी दालबाटीचे दोन प्रकारे खाणं मिळतं.
जेवणाच्या थाळी मध्येच दोन डाळबाटी मिळतात ते मी मांडू आणि आबूला घेतलेलं. किंवा फक्त दाळबाटी हवी असल्यास सहाची प्लेट येते.
तर तिकडे रामदेवराय कसं मिळतं?
5 Aug 2023 - 11:13 pm | प्रचेतस
ट्रान्स्पोर्टनगर निगडी, भक्ती शक्ती जवळ, आधी फक्त ट्रकवाल्यांचा ढाबा होता पण शहरी लोकांनी कब्जा केल्याने ट्रकवाले येत नाहीत, शनी/रविवारी किमान शेदीडशे लोक बाहेर वेटिंगवर असतात. राजस्थानी केर सांगरी, दाल बाटी फेमस. 7/8 प्रकार मिळतात दालबाटी थाळीचे. गुलाबी, राजस्थानी, रजवाडी वगैरे. मला दालबाटी विशेष आवडत असल्याने तिथं गेल्यास इतर पदार्थ खातो.
4 Aug 2023 - 4:08 pm | कंजूस
मुद्दा बाटीचा आहे इंदौरी.
दुसरे मिसळ दळण दळू नये.
----
अगदी इदौर'ला नाही खाल्ली पण मांडू'ला खाल्ली आहे.
कोणती प्रमाण माहिती नाही. याअगोदर अबूपहाड ठिकाणी खाल्ली आहे पंचारत्न(?) डाळीसह वीस वर्षांपूर्वी. पण २०१९ला कोणत्याही हॉटेलच्या गल्ल्यावर बाटीची ताटे दिसली नाहीत. "अभी दालबाटी कौन खाता है? पिझ्झा चालता हैl"
कविता आवडली. दालबाटी विसरा.
4 Aug 2023 - 4:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुद्दा बाटीचा आहे इंदौरी.
दुसरे मिसळ दळण दळू नये.
सहमत. काही लोक फार अवांतर करतात.
बाय द वे, भाजलेले रोडगे बाटीचा मुख्य प्रकार. आमच्याकडे फार असायचे पूर्वी. आता कमी झालं हे प्रकरण.
-दिलीप बिरुटे
4 Aug 2023 - 4:47 pm | चित्रगुप्त
आमचे बालपण इंदुरात गेले, त्यामुळे आम्ही इंदोरी बाटी असे इथे म्हटले आहे. बाकी मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात वगैरेत बाट्या बनतातच. त्यामुळे 'प्रमाण' बाटी असे काही नसावेसे वाटते. "अरे साब, एकबार हमारे सनावद की बाटी खा के देखो, बाकी सब भूल जाओगे" असे विविध जागचे लोक अभिमानाने म्हणतातच.
रच्याकने या एमपी, यूपी वगैरेंपेक्षा पूर्वीची 'माळवा' 'बुंदेलखंड' 'नेमाड' वगैरे नावे भौगोलोक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जास्त अर्थपूर्ण होती असे वाटते.
4 Aug 2023 - 6:31 pm | प्रचेतस
अगदी, गवि यांच्यासारख्या ज्येष्ठ मिपाकराने असे दळण सुरू करणे खेदजनक आहे.
7 Aug 2023 - 7:26 am | चित्रगुप्त
हवे तेवढे दळण येऊ द्या हो भौसायेब. ऋग्वेदातील बाटीचे उल्लेख, महाभारतातील वनपर्वात पांडव बाट्या खायचे त्याविषयीचे श्लोक, कामसूत्रातील शिलाजित मिसळून केलेल्या वीर्यवर्धक बाट्या, मॅसॅचुसेट्स युनिव्हर्सिटीतील प्राख्यात विदुषी रोझ मेरी मार्लो यांचा माळवा आणि बुंदेलखंडातील बाट्यांचा तौलनिक अभ्यासाचा प्रबंध, इजिप्तमधील तुतेमखानेम पिरॅमिडजवळील उत्खननात सापडलेली ममीकृत अखंड बाटी, हाइनीश श्लीमन याला ट्रॉयच्या उत्खननात सहाव्या थरात सापडलेल्या जळक्या बाट्यांच्या चळती ... इत्यादिंविषयी विद्वत्तापूर्ण माहिती, 'बाटी पिवळी पडली' चे ख्यातनाम लेखक स.त. कुडचडेकर यांचे 'साजुक तूप हा बाटीचा प्राणवायु आहे' हे अमर वाक्य .... असे कसलेही दळण येऊ द्यायला आमची काहीच हरकत नाही. ख्या.ले.स.त.कु.क. यांचे "दळण हा मिपालेखांचा प्राणवायु आहे" हेही लईच फेमस वाक्य आहे. तस्मात चालू द्या.
7 Aug 2023 - 6:18 pm | चौथा कोनाडा
हसुन हसुन फुटलाच पायजे ....
हा .... हा .... हा .... !
4 Aug 2023 - 4:38 pm | गवि
कंकाकांनी इंदौर बाटी असा खास वेगळा उल्लेख केल्याने इंदूर या विषयावर मत लिहिणे आले.
या गावाविषयी खूप ऐकले आहे. डॉ अवचट यांच्या पुस्तकात तिथले लोक कसे खास तऱ्हेवाईक पण शोकिन असतात ते वाचले होते. तेथील सराफा, खाऊ गल्ल्या, खीर आणि पान भांडार, कोणतीही कॅसेट आणून देणारा दावा करणारे दुकान (जुनी गोष्ट) शिवाय इथे आपला परम मित्र यकु याच्या वर्णनातून शासकीय मदिरालय आणि बरेच काही.
हापिसाच्या कामानिमित्त जे जाणे येणे असते त्यात इंदूर हे ठिकाण हल्लीच एकदा आले आणि शेवटी तो योग आलाच.
कॉन्फरन्स वगैरे प्रकरणातून एखाद्या गावी जरा मोकळे हिंडायला मिळणे दुरापास्त होते अनेकदा. त्यात जागा गावाबाहेर कुठे लांब असली की विचारूच नका.
मुक्काम असलेल्या सर्व जागी खास इंदुरी बेत म्हणून ते खूप ऐकून असलेले पोहे होते. मी एकूण तीन ठिकाणी पोहे खाल्ले. ते अत्यंत फिके वाटले. कोरडे देखील. मग कोणीतरी म्हणाले की पोह्यांच्या बाजूला ठेवलेली तर्री, रतलामी शेव, जिरावण किंवा तत्सम नावाचा मसाला असे सर्व त्यावर घालून घ्यायचे. मग तसे करून खाल्ले तेव्हा चांगले म्हणजे बरे लागले. पण पण पण.. इतके पदार्थ वरून ओतून घातले तर साध्या प्लेन भातालाही चव येईल..
मग इथली प्रसिद्ध जागा सांगा असे विचारून छप्पन दुकान नावाची जागा कळली. पहिल्या दिवशी गेलो आणि एक पॅटीस अतिशय भारी असतो असे स्थानिक रेकमेंडेशन आठवून तिकडे शोधले. तर हाय दैवा. गुरुवार किंवा गुरुवार दुपार म्हणून बंद.
मग पुन्हा दुसऱ्या दिवशी कशीतरी जुळवाजुळव करून एअरपोर्टला जाताना तिथे थांबलो. चार गोष्टी खाल्ल्या.
१. बटाटा कव्हर असलेले नारळ पॅटीस
२. इंदूरी प्रसिद्ध साबुदाणा खिचडी
३. इंदूरी शिकंजी (हिचा लिंबू सरबतरूपी शिकंजीशी काही संबंध नाही. हे एक घट्ट पियूष* होते.)
४. जॉनी हॉट डॉग या दुकानात एग बेंजो हा पदार्थ.(नावामुळे आकर्षित होऊन. मी शाळेत असताना बेंजो वाजवत असे) नाव हॉट डॉग असले तरी हे बन मध्ये भरलेले ऑमलेट कांदा होते.
मग अग्रवाल नामकिन या दुकानातून रतलामी शेव घेतली सोबत न्यायला.
तर.. मी जे अनेक वर्षांपासून ऐकून गेलो होतो त्या पार्श्वभूमीवर माझा भ्रमनिरास झाला. सर्वात प्रसिद्ध म्हणून सांगितलेल्या दुकानात खाऊन देखील अगदी सामान्य चव वाटली. मुंबईत "इंदोर की सुप्रसिद्ध साबुदाणा खिचडी" मिळते ती याहून सरस असते
मात्र इतर काही गोष्टी अत्यंत इंप्रेस करून गेल्या.
१. शहराची स्वच्छता. आश्चर्याने तोंडात बोट घालावे इतकी स्वच्छता (तोंडात बोट घालताना तसेही मी कोणाला पाहिले नाही. पण एक बोलण्याची पद्धत)
२. सर्वत्र केर टाकायला डब्यांची सोय.
३. मुद्दाम कुठेतरी कोपऱ्यात कचरा शोधून काढू असा निश्चय करून देखील बऱ्यापैकी भ्रमंतीत कुठेही कचरा सापडला नाही.
४. तेथील स्थानिकांना या स्वच्छतेचा आणि मिळालेल्या स्वच्छ शहर पुरस्काराचा अभिमान. त्यामुळे कोणी कोणाला घाण टाकू न देणे आणि सिस्टिमचा आदर.
५. कचरा गोळा करणाऱ्या खूप गाड्या. एका डेपोत तो नेऊन त्यावर प्रक्रिया करून बायो गॅस आणि त्यावर शहरात बसेस चालवतात. खरोखर अनुकरणीय.
६. मालपुवा रबडी हा एक पदार्थ मात्र अफलातून. फुल मार्क्स.
इति इंदूर पुराण..
4 Aug 2023 - 4:51 pm | टीपीके
छप्पन बकवास आहे, सराफा बेस्ट. त्यातही गोड पदार्थ सरस :)
पोहे खायचे असतील तर पुण्यात वाकडला इंदिरा शाळेसमोर एक टपरी आहे, कळकट आहे जरा, पण पोहे मस्त. वरतून काही टाकू नये, फक्त पोहे. ना ओले ना सुके, ना तिखट पण तरीही सुंदर लागतात.
4 Aug 2023 - 5:10 pm | चित्रगुप्त
अलिकडे इंदुरात रहाणे कमी झालेले असले तरी माझ्या अनुभवाप्रमाणे खास मुरलेले इंदूरकर छप्पनकडे फिरकत नाहीत, तर वेगवेगळ्या मोहल्ल्यात वेगवेगळ्या पदार्थांचे स्पेशालिस्ट असतात, त्यांचेकडे मुद्दाम तो पदार्थ खायला दुरून रसिक खवय्ये येतात. उदा. जेलरोडवरील (हल्लीचे नाव काहीतरी वेगळे आहे) 'पुरोहित' चे पोहे. सराफ्यातला 'जोशी का दहिबडा' वगैरे.
आता येत्या आक्टोबरापासून इंदुरात सलग सात-आठ महिने मुक्काम करणार आहे, तेंव्हा सर्व शोध घेता येईल. तसा आमच्या घराजवळचा 'भँवरीलाल मिठाईवाला' सर्वांचा बाप आहे. ( हे नाव 'भँवरीलाल' असे का लिहीतात कोण जाणे) एकूणेक सगळे पदार्थ उत्कृष्ट असतात. 'रबडी' तर फारच खास. त्यामुळे इथे तिथे जाण्याची गरजच पडत नाही.
रामुभैया दाते, कुमार गंधर्व, चिंचाळकर गुरुजी, राहुल बारपुते यांच्या काळचे इंदूर आता राहिलेले नसल्याची खंत जरी माझ्या पिढीच्या लोकांना वाटत असली, तरी नवीन स्वच्छ इंदौरही छान आहे.
4 Aug 2023 - 5:38 pm | टीपीके
तो राजवाड्या समोर पण एक आहे ना पोहेवाला? एकदा सकाळी सकाळी तिकडे खाल्ले होते पोहे, खरंच छान होते. आणि तिकडे वरतून डाळिंब पण टाकतात, छान लागते
बाहेर डाळ बाटी फक्त एकदा चोखी ढाणीला खाल्ली होती, पण आता नाही आठवत चव, पण इंदोर मध्ये राजस्थानी जेवणाचा खूप प्रभाव आहे त्या मुळे अनेक ठिकाणी चांगली डाळ बाटी मिळू शकते
6 Aug 2023 - 10:08 am | रामचंद्र
गावाविषयी खूप ऐकले आहे. डॉ अवचट यांच्या पुस्तकात तिथले लोक कसे खास तऱ्हेवाईक पण शोकिन असतात ते वाचले होते. तेथील सराफा, खाऊ गल्ल्या, खीर आणि पान भांडार, कोणतीही कॅसेट आणून देणारा दावा करणारे दुकान (जुनी गोष्ट) शिवाय इथे आपला परम मित्र यकु याच्या वर्णनातून शासकीय मदिरालय आणि बरेच काही.
अवचट आणि यकुंच्या लेखनाचा दुवा/धागा/संदर्भ मिळेल का?
6 Aug 2023 - 10:21 am | गवि
अवचट यांच्या नेमक्या कोणत्या लेखात आहे ते आता आठवत नाही. खास या विषयावर लेख असेलच असे नाही पण तपशीलवार वर्णन होते.
यकु काही काळ इंदुरात वास्तव्याला असल्याने त्या काळात मिपावर लिहिताना / प्रतिसाद देताना तो असे उल्लेख करत असे. शासकीय मदिरालय हा उल्लेख एका प्रतिसादात होता. शिवाय सर्वाँना तो इंदूरला कट्टा करू वगैरे म्हणून इच्छा व्यक्त करत असे.
6 Aug 2023 - 12:57 pm | रामचंद्र
अच्छा, त्वरित प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
6 Aug 2023 - 5:39 pm | कंजूस
यकुंचे लेख शोधून दोन चार वाचले. अगाध ललित लेखन आहे त्यांचं. गप्पिष्ट माणूस होता. नर्मदा प्रकरणही वाचलं आहे. अवचट कोणता आइडी?
4 Aug 2023 - 5:44 pm | कर्नलतपस्वी
इंदूर हे आमच्या वाफगावकरांनी समृद्ध केलेले गाव. त्यास इंदोर म्हणणे फारच खटकते.
काटा रुते कुणाला हे आमचे सर्वात आवडते नाट्य गीत व त्याचे अशा प्रकारे विडंबन आणी ते सुद्धा जिव्हा लोलुपता दर्शवण्यासाठी, ते सुद्धा देवलोकातील हिशोब नवीसा कडून...... शिव शीवा......
बराच काळ मरु स्थला मधील मत्स्य प्रदेश तथा केकय, बाल्हीक प्रांताच्या सीमेवर व्यतीत केल्यामुळे हा पदार्थ चांगल्याच ओळखीचा आहे.
खाता बाट्या तरी त्या
घसा खवखवे फार
उदरचा डोंगर होतो अन्
हृदयात गाठ्या हजार
एवढेच बोलून खाली बसतो.
4 Aug 2023 - 5:46 pm | कर्नलतपस्वी
खाता बाट्या तरी त्या
घसा खवखवे फार
उदराचा डोंगर होतो अन्
हृदयात गाठी हजार
4 Aug 2023 - 5:48 pm | चौथा कोनाडा
पिंचिंमध्ये अधून मधुन खातो दालबाटी, रामदेव धाबाला सुद्धा खाल्ली आहे .. झकास टेस्ट आहे.
इंदूरच्या सराफ्यात ही खाल्ली आहे तिथली आवडली होती !
बाकी चित्रगुप्तसाहेबांचे आर्त काव्य आवडले !
त्यांना लवकरात लवकर खायला मिळो ही मोदीचरणी प्रार्थना !
4 Aug 2023 - 6:10 pm | कर्नलतपस्वी
विदेशात राहून स्वदेशी (इंदोर ची) स्वप्न बघायची आणी पुणेकरांवर ठपका ठेवायचा,काय पटतं नाय ब्बुवा
6 Aug 2023 - 4:50 pm | चित्रगुप्त
आम्ही उभयता इंदूरचेच असल्याने अगदी 'कंड्या'वर भाजलेल्या नाही, तरी पातेल्यातल्या खमंग बाट्या अधून मधून करतच असतो. अगदी अमेरिकेत सुद्धा. त्यासाठी मुद्दाम बाटीचा जाडा आटा घेऊन जातो. त्यामुळे इथे वर्णिलेली तगमग ही स्वतःची नसली, तरी पुणेरी भार्या असणार्या काही नातलगांची आहे (आणि काळही पुष्कळ जुना आहे - जेंव्हा पुण्यात यूपी-बिहारवाले अगदी नगण्य असतील-वा नसतीलच)
(माळव्यातले 'कंडे' म्हणजे सुमारे दोन इंज जाड आणि फूटभर व्यास असलेल्या गोवर्या).
6 Aug 2023 - 5:28 pm | कर्नलतपस्वी
आहेत आणी कंड्या पिकवणे पण माहित आहे.
जन्मलो जरी इथे वाढलो मी कुठे कुठे
मन वेडे गुंतले उगाच मी राहीलो जिथे जिथे
गंमत करत होतो. हलकेच घ्या.
राजस्थानात आठ दहा वर्षांत भरपूर डाळ बाटी खाल्ली. लिट्टी चोखा सुद्धा एक असाच मस्त पदार्थ. बिहारी बाबूंचे आवडते खाद्य.
विडंबन आवडले.
6 Aug 2023 - 7:25 pm | चित्रगुप्त
आमच्या लहानपणी सुंदर छोकरीला ती 'कंडा' किंवा 'माल' असल्याचे म्हणत आणि आमचे एक आजन्म ब्रम्हचारी (पण जन्मभर आर्त लग्नेच्छू) मित्र त्यांना आवडणार्या बायांचा (त्यावेळी मी तीस वर्षांचा, तर ते पंचावन-साठचे असतील) ती करोलबागवाली 'केंडी', त्रिवेणीतली केंडी असा उल्लेख करत. त्यांचा डोक्याचा स्क्रू जरा ढिला होता. खूप विपरीत परिस्थितीत अवघे जीवन गेले, पण कदाचित स्क्रू ढिला असल्यानेच सदा आनंदी, उत्साही, आणि आपले लग्न नक्की होणार ही साठीतही आशा असल्याने 'केंड्या' हुडकणे नेहमी चाललेले असायचे. त्यांचा अंतही फार वाईट अवस्थेत झाला. त्यांचे वडील भारतातले प्रसिद्ध चित्रेकार होते. ते दिल्लीत रहात असल्याने या वर्णनावरून कदाचित विवेक पटाईत त्यांना ओळखतील.
6 Aug 2023 - 7:57 pm | कंजूस
Delhi food walks channel
बरेच विडिओ पाहिलेत.
बिहारी लिट्टी चोखा प्लेलिस्ट
https://youtube.com/playlist?list=PLDs8Vu-e-HxI_Llz3i1Y6wi1_po-8_Fly
4 Aug 2023 - 6:19 pm | विवेकपटाईत
इंदौरी बाटी, तुपाची धार. मिळमिळीत मिसळ पुण्याची छान. बहुतेक नोव्हेंबर महिन्यात इंदूरला जाण्याचा विचार करत आहे. खाऊ गल्लीची चव ही चाखणार.
4 Aug 2023 - 7:11 pm | कंजूस
बाटी प्रकार आणि त्यासोबत
दाल बाफले - बाटी, डाळ,तूप (ओंकारेश्वर)
चुरमा* बाटी डाळ - बाटीच्या आत गोड नसलेला चुरमा भरलेला असतो, डाळ आणि तूप. (मांडू)
डाळ बाटी चुरमा - साधी बाटी ,डाळ ,तूप आणि गोड चुरमा बरोबर देतात.( राजस्थानी प्रकार)
डाळ बाटी - बाट्या,तूप आणि डाळ (जळगाव ,अबू)
हे दाळबाटी शक्यतो थंडीत खातात. आणि पचविण्याची शक्ती असणारेच खातात. अन्यथा बाटी खाल्ल्यावर पोटात गुरगुर सुरू होते. कणीक कच्ची राहाते.
4 Aug 2023 - 7:32 pm | चांदणे संदीप
विडंबन काव्य उत्तम! आवडले.
अवांतर : दाल बाटी हा प्रकार मला अतिशय ओव्हररेटेड वाटतो. मी "अकरा" वर्षांचा असताना दवाखान्यात अॅडमीट होतो महिनाभर. रोज घरून डबा यायचा. दवाखान्यातलं जेवण घशाच्या खाली उतरायचं नाही. एके दिवशी आईने विचारलं, उद्या काय आणू खायला? मी म्हटलं : तुरीच्या डाळीची आमटी आणि भाकर! मराठवाड्यातल्या तुरीच्या डाळीच्या आमटीत कुस्करलेल्या भाकरीची सर ह्या दाल बाटीला पुढच्या कितीही जन्मात येणार नाही.
सं - दी - प
4 Aug 2023 - 10:12 pm | Bhakti
माझ्या आत्याने मला उकळत्या पाण्यात गोळा उकडून तळलेली बट्टी करायची शिकवली होती.काही वर्षे तर कधीही बट्टी करायचे :)
बाकी फक्कड फर्माईश केलीय लवकर पूर्ण व्हावी.
रचक्याने ते सराफा बाजार सोन्याची पेठ वाटायचं, मागच्याच महिन्यात एका व्हिडिओमुळे तो गैरसमज दूर झाला.
4 Aug 2023 - 10:54 pm | चित्रगुप्त
बडा सराफा आणि छोटा सराफा वेगवेगळे आहेत. बडा सराफा हल्ली खाऊगल्ली म्हणुन जास्त ठाऊक असला, तरी मुळात तो सराफाच आहे. त्याजवळच असलेला 'छोटा सराफा' त्यामानाने लहान गल्ली असून तिथे मुख्यतः सोन्याचांदीची दुकानेच आहेत.
-- "लाव रे तो व्हिडियो" तो विडू कोन्ता हाय ? (अगदी सहज सापडला तरच द्यावा)
5 Aug 2023 - 6:52 am | nutanm
इंदूरी जेवण प्रकार खाण्याचे खूपच एकाच सहलीत लक्षात. रहाणारया. सहलीत खूप. आनुभवले खूप छान अनुभवांतला एक अनुभव व माझ्या हौशी व वरचा अधिकारी पदावर च्या मेव्हण्यामुळे अविस्मरणीय अनुभवाची. केलेली एक सहल. व खरेदी तर त्याच्या उत्तम दर्जाच्या खरेदी करणयाची. साक्ष. मी तिथे. बाटी. हा प्रकार न खाता लहानपणीच सोळा सोमवार व्रताच्या उद्यापनात कणिक भिजविणाया. पासून . बाटया करणे मग भाजणे ,कुटणे खलबत्त्यात नंतर छान चाळून त्यात प्रमाणात गूळ व. साजूक तूप. घरी आजी आईने
मिळून कढविलेले तूप घालून उद्यापनाचे आजोबांचे ज्यावर देखरेखीखाली तयार केलेले सुंदर लाडू सोळा
सोमवारासाठीचे खाल्लेले व करतानाचे बघून अजून या वयातही उततम आठवतायेत. व घरी गॅस ,मिक्सर/फूडप्रो असताना काय जड असे वाटते पण माझे सिनिअर सिटीझन चे वय व मदतीशिवाय कोणाच्याही धीर होत नाही हा खटाटोप करायचा. पण वाटते तर खूपच.
5 Aug 2023 - 8:03 pm | रामचंद्र
पुण्यात काही जैन मंदिरांमध्ये (उदा. दादावाडी सारसबाग, ब्रह्मा हॉटेल चौक, सिंहगड रोड, इ.) रोज व खास बेत रविवारी जैन-राजस्थानी पद्धतीचे जेवण मिळते. तिथेच खाण्याची तसेच पार्सलचीही सोय असते, मात्र एकच पदार्थ स्वतंत्र मिळतो का संपूर्ण थाळीच घ्यावी लागते ते माहीत नाही. त्यात ती खास राजस्थानी पद्धतीची बाटीही मिळत असावी असं वाटतं.
6 Aug 2023 - 8:01 pm | कंजूस
पौष्टिक अन्न
पेढे,बर्फी,खीर,खिचडी, बासुंदी,मालपोवा,दालबाटी वगैरे पोटासाठी,शक्तीसाठी खाल्ले जात. आणि शक्यतो पुरुष खातात असा माझा समज आहे. महिला मंडळ मात्र चटकमटक आंबट,चिंबट चटकदार पदार्थ खातात.
6 Aug 2023 - 10:14 pm | चित्रगुप्त
---हा एक वेगळाच रोचक, संशोधन करण्यासारखा विषय आहे. जमल्यास यावर धागा काढावा. शहरी लोकांच्या आहारविषयक सवयीत गेल्या वीसेक वर्षात बराच बदल घडून आला असावा असे वाटते. ग्रामीण भागांविषयी फारसे ठाऊक नाही.
8 Aug 2023 - 12:20 pm | सुबोध खरे
कोणत्याही शहरातील प्रसिद्ध पदार्थ हे सर्वाना आवडतीलच असे नाही आणि याशिवाय मला आवडला म्हणजे माझ्या मित्राला आवडेलच असे नाही.
लष्करी नोकरीमुळे भारतभर भ्रमण केल्यावर एक लक्षात आले कि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे पदार्थ मिळतात ते सर्व १०० % पदार्थ मुंबई किंवा दिल्लीत कुठे ना कुठे मिळतातच. कारण तेथील रहिवाश्यांनि किंवा पर्यटकांनी ते पदार्थ या मोठ्या शहरात व्यवसायासाठी आणलेले असतात. मोठ्या शहरात साधारणपणे ते खपण्याची शक्यता असतेच.
बहुसंख्य वेळेस हे पदार्थ मूळ शहरात मिळतात त्याच दर्जाचे किंवा काही वेळेस जास्त चांगल्या दर्जाचे मिळू शकतात. परंतु फरक असा असतो कि हे पदार्थ खाताना त्यात्या गावचे/ शहराचे वातावरण मुंबई दिल्लीत येऊ शकत नाही. उदा. हुरडा तुम्हाला मुंबई पुण्यातही मिळू शकतो. परंतु शेतात बसून शेकोटीवर भाजलेला हुरडा खाण्याचे वातावरण कसे आणणार?
एकच गोष्ट म्हणजे बहुसंख्य ठिकाणी असलेले सुप्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्रेते हे प्रसिद्ध का होतात? तर त्यांचा दर्जा बहुतांशी उत्तम असतो आणि बहुतकरून वाजवी भावात. त्यामुळे अशा ठिकाणी आपण जरूर जावे परंतु तेथील खाद्यपदार्थांची दुसऱ्या ठिकाणच्या पदार्थांची तुलना करू नये. अन्यथा बऱ्याच वेळेस आपला अपेक्षा भंग होण्याची शक्यता असते.
उदा मथुरेला जाऊन पेढे घेतले तर तसेच उत्तम पेढे मुंबईत अनेक ठिकाणी नक्की मिळू शकतात. किंवा लखनौ ला जाऊन टुंडे के कबाब किंवा पेप्पर चिकन घेतले तर तसे कबाब किंवा चिकन मुंबईत सुद्धा मिळतं.
पण मथुरेच्या पेढ्याची रुची किंवा लखनौ च्या टुंडे के कबाब" ची रुची " हॅ, यात काय मोठंसं आहे" असे बोलून आपण स्वतःच घालवत असतो.
तेंव्हा एक विनंती आहे कि जिथे जाल तिथे आपली पाटी कोरी ठेवूनच जा म्हणजे अगदी एखाद्या ठार खेड्यात चुलीवर केलेली अंबाडीची भाजी आणि नाचणीची भाकरी चा आस्वाद तुम्ही पंचतारांकित रेस्टोरेंट मधल्या शाही पनीर इतकाच घेऊ शकाल.
12 Jul 2024 - 8:36 pm | चित्रगुप्त
आज योगायोगाने हा धागा उघडला. मी तर आपण असे काही लिहीले होते हे विसरूनही गेलो होतो आणि शेवटले काही प्रतिसादही वाचलेले नव्हते. पण एकंदरित मजा आली सगळे प्रतिसाद वाचताना. सगळ्यांचे अनेक आभार.