तटबंदी
जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी
ओतप्रोत जे असे
सांग ते का न तुला दिसतसे?
त्रिमितीच्या पिंजर्या वेढुनी
अमित असे जे वसे
सांग ते का न तुला दिसतसे?
धन-ऋण एकाकार होती त्या-
-स्थळी शून्य जे वसे
सांग त्या अभाव मानू कसे?
जड-चेतन सीमेवर धूसर
तटबंदी जी असे
सांग ती का न मला दिसतसे?