होळी रे होळी
चहा पिताना नजर सहजच कालनिर्णयवर पडली आणि बुधवारी होळी आहे हे लक्षात आले आणि मन लहानपणच्या आठवणींमध्ये गेले.
"चला रे होळीची वर्गणी गोळा करूयात", देशपांड्यांचा मिलिंद ओरडला. "किती मागायची वर्गणी यावर्षी? पंचवीस रुपये मागूयात, माहितीयेना मागच्या वर्षी पैसे कमी पडले होते?" मिल्या बोलतच होता.
"ए मिल्या तुझा बाप दहा रुपये द्यायला खळखळ करतो आणि तू पंचवीस रुपयांच्या गोष्टी करतोयस", माझा टोमणा. "वीस रुपये मला ठीक वाटतात". ठरले तर मग, यावर्षी वीस रुपये वर्गणी. चार चार जणांनी कॉलनीतली एक एक इमारत वाटून घेतली.