एका लेखाची चाळीशी

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
19 Sep 2022 - 7:38 am

प्रास्ताविक :
माझ्या आयुष्यातील पहिलावहिला लेख मी ३९ वर्षांपूर्वी लिहिला. तेव्हा मी नुकताच एमबीबीएसची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. त्यानंतर एक वर्षे इंटर्नशिपचा कालावधी असतो. त्या काळी त्यापैकी सहा महिने ग्रामीण भागात राहायला लागायचे. मी पुणे जिल्ह्यातील एका खेड्यात माझे ग्रामीण प्रशिक्षण पूर्ण केले. त्या वास्तव्याच्या अनुभवावर आधारित मी प्रस्तुत लेख लिहिला. तो नंतर कॉलेजच्या वार्षिकात प्रसिद्ध झाला. यंदा त्या प्रथम लेखनाने चाळीशीत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त तो लेख जसाच्या तसा इथे प्रकाशित करीत आहे. लेखनाची भाषा आणि (अ)परिपक्वता वयानुरुप आहे हे वाचकांनी समजून घ्यावे ! 🙏

हा लेख वैद्यक विद्यार्थीविश्वाशी निगडित असल्याने त्यातील काही मुद्द्यांचे/ शब्दांचे संदर्भ समजण्याठी आधी स्पष्टीकरण देणे आवश्यक वाटते.

१. P.H.C. = Primary Health Centre

२. तेव्हा आमच्या वर्गासाठी पुणे विद्यापीठ क्षेत्रात ग्रामीण इंटर्नशिपची जी केंद्रे ठरलेली होती त्यापैकी फक्त शिरूर येथे प्रशिक्षणार्थी मुले व मुली एकत्र राहत असत. हे मोठे प्रशिक्षण केंद्र असल्याने तिथे एका ज्येष्ठ प्राध्यापकांच्या देखरेखीखाली तशी व्यवस्था केलेली होती. बाकी इतर सर्व केंद्रांवर एक तर फक्त मुलगे किंवा फक्त मुली अशी परिस्थिती असायची. माझ्या लहान केंद्रावर अर्थातच आम्ही फक्त चार मुलगे होतो.

३. Weaning : जन्मल्यानंतर बाळ अंगावर दूध पिऊ लागते. त्यानंतर काही महिन्यांनी अंगावरचे दूध कमी करत घन पदार्थांचा आहार वाढवायचा असतो. या प्रक्रियेला Weaning म्हणतात (मराठी शब्द सुचवावा).
…………………………………………………………………..........................................................................................................................

मुक्काम पी. एच. सी.

ok

जेव्हा शासकीय महाविद्यालयातून थर्ड एमबीबीएस पास झालो तेव्हा असे सांगण्यात आले, की तुम्हाला आता एक वर्ष सक्तीने सरकारसाठी राबावे लागणार आहे व त्याबद्दल पोटापाण्यापुरते पैसे मिळतील. त्यापैकी सहा महिने खेड्यात जावे लागणार होते. “शिरूर घ्या अन ऐश करा”, असे सिनिअर लोकांनी सांगितले. परंतु आपल्याला हवे ते केंद्र मिळण्यासाठी ‘जे काही करावे लागते’, ते न जमल्याने मला शिरूर मिळाले नाही. अखेर माझी अन्य एका खेड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमणूक झाली. मग दुसऱ्या दिवशी प्रवासास निघालो. एसटीचा प्रवास संपल्यानंतर खडकाळ रस्त्यावरून पायपीट चालू झाली. चालता चालता असे जाणवले की बरेच लोक कुतूहलाने माझ्याकडे बघत होते. टेरीकॉटचे कपडे व बूट एवढ्या दोन गोष्टी सुद्धा इथे लक्ष वेधून घ्यायला पुरेशा होत्या. आता त्या केंद्राचा पत्ता विचारायचा होता.
रस्त्यात दिसणाऱ्यापैकी त्यातल्या त्यात कमी खेडवळ माणूस गाठला. त्यांना विचारले,

“अहो इथे सरकारी दवाखाना कुठे आहे?” त्याने बरेच हातवारे करून पत्ता सांगितला आणि विचारले,
“काय नवीन डाक्टर वाटतं”
“ हो, इंटर्नशिपसाठी आलोय, प्रशिक्षण असतं आमचं”
“म्हंजे शिकावू डॉक्टर म्हना की !”
... च्यायला, अगदी चिमणीच पाडली साल्यानं.

अखेर मुक्कामी पोचलो. “प्राथमिक आरोग्य केंद्र” हे शब्द व त्याखाली आई-बाबा, दोन मुले आणि लाल त्रिकोण अशी चित्रांकित पाटी असलेल्या इमारतीत शिरलो. ओपीडी मध्ये बसलेल्या मेडिकल ऑफिसरची भेट झाली. मी आल्याचे पाहून ते एकंदरीत खूष झाले. कारण मागच्या बॅचचे इंटरन्स जाऊन चार दिवस लोटल्याने त्यांच्यावर ओपीडीतील सर्व पेशंटस बघायची वेळ आली होती. मग हॅलो, वेलकम, नाव, गाव, बाप काय करतो व पुढे काय करणार, इत्यादी गप्पा झाल्यावर सहा महिन्यातील कार्यक्रम समजला.

ok

सकाळ-संध्याकाळ ओपीडी काढणे हा त्यातला मुख्य भाग. याशिवाय नसबंदी शस्त्रक्रियेत मदत करणे, शाळांमधून जाऊन बालके तपासणे, क्षयरोग-कुष्ठरोग इत्यादी संबंधी जनजागृती करणे आणि जी काही शिबिरे होतील त्यात इकडून तिकडे करणे या गोष्टींचा समावेश होता. आमचे राहायचे क्वार्टर्स तसं बरं होतं. चौघांची राहायची सोय होती आणि मुख्य म्हणजे हे ठिकाण नर्सेस क्वार्टर्सच्या अगदी समोर होते. एक-दोन दिवसात बाकीचे तिघे आले आणि रूटीन व्यवस्थित चालू झाले.

ओपीडीला भरपूर गर्दी असायची. नव्वद टक्के लोकांची लक्षणे ठराविक असायची. एकंदरीत डोके व कंबर हे दुखण्यासाठी आणि हात व पाय मुंग्या येण्यासाठीच निसर्गाने दिलेले आहेत की काय असे वाटू लागे. व्हिटामिन B12 चे इंजेक्शन हे तिथले एक अत्यावश्यक ड्रग असायचे. या इंजेक्शनने खरोखरीच अंगात ताकद येते की काय असे मला सुद्धा शेवटीशेवटी वाटू लागलं होतं !

काही आजारांवर लोकांकडून गावठी इलाज हे प्राथमिकता म्हणून केले जात. त्यातून बरे वाटले नाही तरच पेशंट इथे येई. अशा इलाजांपैकी काही समजुती तर आपल्या बुद्धीपलीकडील आहेत. कावीळ झालेला माणूस जेव्हा आपल्याकडे यायचा तेव्हा त्याच्या गळ्यात ती विशिष्ट माळ घातलेली असायचीच. एखादी जखम झाली असताना भात खाल्ला तर जखमेत पू कसा काय होतो, याचे स्पष्टीकरण मला तरी माहीत नाही ! सर्पदंशाच्या बाबतीत, चावलेला साप विषारी होता का, हे ठरवण्यासाठी कोंबडीचा प्रयोग गावातील एका वैदूकडून सर्रास करण्यात येई. साप चावलेल्या जागेवर कोंबडीचे गुद्द्वार टेकवण्यात येई; जर कोंबडी मेली तर साप विषारी.

कुटुंबकल्याण कार्यक्रम हे आरोग्य केंद्राच्या कामकाजाचे महत्त्वाचे अंग असते. बाकी एखाद्या जोडप्याला मुलगा झाल्याशिवाय कुटुंबाचे ‘कल्याण’ होऊ शकत नाही, हे आपल्या लोकशाहीचे दुर्दैव नाही काय ? एक प्रासंगिक विनोद अजून आठवतो. केंद्रांमधील एक मल्टीपर्पज वर्कर होता. सहज घरची चौकशी केली,

“काय मग. मुलेबाळे किती?”
“ पाच मुली आणि एक मुलगा ! आपल्या सर्व सवलती सरकारने बंद केल्यास बघा !”
(त्याचाही अभिमान)
“अहो, निदान तुम्हाला तरी संततिनियमनाचे महत्त्व कळायला नको का ?”
“डॉक्टर, संततिनियमन म्हणजे काय - नियमाने संतती होत राहणे !!”

एकदा मुलगा झाल्यावर मात्र नसबंदी करून घेण्याकडे वाढता कल जाणवे; त्यातही अर्थात पुरुषापेक्षा स्त्रीचीच. बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेबाबत मात्र अजून गैरसमज असायचे. एकदा बिनटाक्याचे शिबीर होणार होते. तेव्हा जास्तीत जास्त संख्या जमवण्यासाठी लोकांना पटवायचे काम चालू होते. एका बाईचा नवरा फारच हट्टी निघाला. मी म्हणालो,

“अहो, पंधरा मिनिटात ऑपरेशन, लगेच घरी घेऊन जायचे. पुन्हा (सरकारतर्फे) पैसे पण जास्त आणि लगेच मिळतात” त्यावर तो वैतागून म्हणाला,
“डॉक्टर, आम्ही काय पैशासाठी आपरेशन करतो का? ते जादूवाली भानगड काय नगं. पद्धतशीर टाक्याचे आपरेशन होऊ द्या. पायजे तर आम्ही पैसे देतो !”

तांबी (कॉपर टी) बसवण्यासाठी जरा औदासिन्यच असे. यासाठी स्वतःहून येणाऱ्या स्त्रिया फारच कमी. त्यामुळे ओपीडीत लहान मुलाला दाखवण्यासाठी घेऊन आलेल्या बायकांना पकडावे लागे. तांबी बसवायचे काम दोन मिनिटाचेच असले तरी बाईला समजावून द्यायला मात्र दोन दोन तास जायचे आणि बसवल्यानंतर तीन वर्षे बाईने काही कुरकुर केली नाही, तरच डॉक्टरला खरा आराम !

अशा कितीतरी कार्यक्रमांमुळे रिकामा वेळ तसा मिळतच नसे. पण चुकून मिळालाच तर मात्र काय करायचे असा प्रश्न पडायचा. कारण “शिरूर संस्थान” सारखी करमणुकीची साधने येथे नव्हती. तसं टेबल टेनिस, कॅरम इत्यादी गोष्टी गौण आहेत; बरोबर मैत्रिणी नाहीत हे खरे दुःख ! पण रोजच्या संसारात मात्र येथे जातीने लक्ष घालावे लागे. साखरेचा भाव काय, रॉकेल कधी मिळणार आहे, हे बघावे लागे. एखाद्या दिवशी स्वयंपाकाच्या बाई येणार नसतील तर आम्हा चौघांपैकी एकाला ओपीडीतून पळ काढून स्वयंपाकाची आघाडी बघावी लागे. एक प्रकारे भावी आयुष्याचीच ही इंटर्नशिप नाही का?

एक स्वस्त आणि मस्त करमणूक आयुष्यात प्रथमच येथे अनुभवली. ती म्हणजे तंबूतील थिएटर. इथे अनेक जुने हिंदी मराठी चित्रपट लागत. दर तीन दिवसाला नवीन चित्रपट येई. विद्यार्थिदशेत असताना मोजकेच चित्रपट पाहिले होते. ‘पूरब और पश्चिम’ पासूनचे अनेक जुने राहून गेलेले चित्रपट या मैदानावरील चित्रगृहात मोठ्या चवीने तृप्त होईपर्यंत पाहिले.

महिन्यातील दोन शुक्रवार मात्र घातवार असायचे. कारण या दिवशी पुण्याहून इंटर्नशिप नियंत्रण खात्याचे लोक भेट द्यायला यायचे. त्यांच्या करमणुकीसाठी जर्नल नावाचा एक रुक्ष प्रकार लिहून ठेवावा लागे. ते लोक त्याला प्रेमाने डायरी असे म्हणायचे. मग आदल्या गुरुवारी हे काम उरकण्यात येई. त्यांच्या भेटी दरम्यान त्या प्रकाराची अगदी बारकाईने तपासणी होई आणि मग 100 ग्रॅम डाळ म्हणजे किती चमचे घ्यायची, असल्या गोष्टींवरून सुद्धा चंपी होई. प्रशिक्षणार्थी डॉक्टर कामावर दांड्या मारत नाहीत ना हे बघण्यासाठी या खात्यातर्फे अधूनमधून अचानक भेट दिली जाई. एके दिवशी आमच्यावर अशी अचानक धाड पडली आणि आम्ही चौघेही हजर पाहून ते लोकच आश्चर्यचकीत झाले !

अधूनमधून आजूबाजूच्या लहान खेड्यांतील आरोग्य उपकेंद्रांना जावे लागे. या भेटींमधून मात्र खऱ्या भारत देशाचे दर्शन घडे. तिथे जीपमधून जाताना शरीर अक्षरशः ढवळून निघे. पावसाळ्यात तर काही गावच्या ओढ्यानाल्यांना इतके पाणी येई, की एकीकडून दुसरीकडे जाणे अशक्य व्हायचे. एकीकडे आपला ‘Insat 1 B’ अवकाशात भराऱ्या मारतोय अन दुसरीकडे हे ओढेनाले लोकांना गावाबाहेर पडू देत नाहीत. असे कितीतरी अडथळे आणि विसंगती.

ok

अशा या लहान खेड्यातील (आपल्या भाषेत इंटिरियरमोस्ट) समाजजीवनाचे दर्शन कित्येकदा मन हेलावून टाकणारे असे. दोन वेळेस पुरेसे अन्न, कपड्यांचे दोन जोड आणि एक कौलारू घर एवढे ज्याला प्राप्त झाले आहे तो खरोखरच इथला श्रीमंत म्हटला पाहिजे. तीन रुपये रोजगारावर पोट भरणारी एखादी स्त्री, जर आपल्या दोन वर्षाच्या मुलाला अजूनही फक्त अंगावरच दूध कसेबसे पाजत असेल, तर तिला weaning वर लेक्चर देणारे आपण कोण? दारू पिऊन बायकोला मारझोड करणारा नवरा हा आर्थिक व सामाजिक विषमतेतूनच निर्माण होत नाही का? ‘पेठ-डेक्कन-कॅम्प’ संस्कृतीत वाढलेल्या माझ्यासारख्याला तर ही विषमता फारच जाणवली. दारिद्र्य-रोगराई-दारिद्र्य हे एक दुष्टचक्र झालेले आहे. “सन २००० पर्यंत सर्वांसाठी आरोग्य” हे स्वप्न साकार होण्याआधी ‘गरिबी हटाव’ पूर्णतः साध्य होणे आवश्यक आहे.

अशा असंख्य विचारांनी अंतर्मुख झालेल्या अवस्थेत हे सहा महिने संपले. या ग्रामीण इंटर्नशिपचे फलित काय होते ? तर, माझ्या दृष्टीने जे ‘मेडिसिन’ होते - म्हणजे मधुमेह आणि हृदयविकार- त्या दृष्टीने ज्ञानात विशेष भर पडली नव्हती. परंतु, गेल्या साडेचार वर्षात फारशी जाणीव न झालेल्या सोशल मेडिसीनचे महत्त्व मात्र पुरेपूर पटले होते.
……………………………………………………………………………………...............................................
................................................................................................................................................
टीप :
जे वाचक 1990 नंतर जन्मलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी :

१. “गरीबी हटाव” ही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आवडती राजकीय घोषणा होती.

२. “हेल्थ फॉर ऑल बाय 2000” हे जागतिक आरोग्य संघटनेचे1980-1990 च्या दशकांतील ध्येय होते.

३. “दोन मिनिटाचे काम आणि तीन वर्ष आराम” ही जाहिरात तांबी हे गर्भनिरोधक साधन बसवण्याबाबत महाराष्ट्र शासनाने तयार केलेली होती.

समाजआरोग्य

प्रतिक्रिया

कंजूस's picture

19 Sep 2022 - 8:36 am | कंजूस

या वेळी कट्ट्याला आलो नाही . मागच्या वेळी मालक नीलकांतच्या कट्ट्याला भेटलो होतो. पुन्हा तसेच अकरा वाजता पळावे लागणार म्हणून आलो नाही.

कुमार१'s picture

19 Sep 2022 - 9:37 am | कुमार१

इथली पहिली धाव काढल्याबद्दल.
पुन्हा कधी भेटू..... सुयोग्य वेळ ठरवून.

शेखरमोघे's picture

19 Sep 2022 - 8:40 am | शेखरमोघे

नेहेमीसारखाच छान लेख. चाळीस वर्षान्पूर्वीच्या अनेक अडचणी आणि समजुती आजही कायम असाव्यात.
Weaning : मराठी प्रतिशब्द : स्तनपानसमाप्ती (जरा बोजडच आहे, सुचला तसा मान्डला)

कुमार१'s picture

19 Sep 2022 - 9:43 am | कुमार१

सहमती.
पण...

Weaning : मराठी प्रतिशब्द : स्तनपानसमाप्ती

नाही. कारण ही प्रक्रिया 'समाप्ती' नसते. ती काही महिन्यांची संक्रमण अवस्था असते. त्यामुळे इंग्लिशमधला ing प्रत्यय चपखल आहे.
रच्याकने...

स्तनपान हा अयोग्य शब्द आहे. तो "स्तन्यपान असा हवा.
स्तन्य = अंगावरचे दूध.

कुमार१'s picture

23 Sep 2022 - 1:47 pm | कुमार१

Weaning = दूधवियोग
असा एक शब्द सुचला आहे पण कितपत बरोबर होईल माहित नाही.

mayu4u's picture

27 Sep 2022 - 11:10 am | mayu4u

स्तन्यवियोग अधिक योग्य राहिल, वै म.

कुमार१'s picture

27 Sep 2022 - 11:17 am | कुमार१

चांगला आहे शब्द.

अन्यत्र झालेल्या चर्चेनुसार या इंग्लिश शब्दासाठी
दूध सोडवणे
हा वाक्प्रचार उत्तम वाटतो.
आभार !

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Sep 2022 - 9:10 am | ज्ञानोबाचे पैजार

चाळिस वर्षापूर्वीची परिस्थिती आता बरीचशी बदलली आहे. आणि मोबाईल आणि इंटरनेटच्या प्रसाराने ती अजून वेगाने बदलत आहे.

चाळीस वर्षांपूर्वीचा लेख तुम्ही जसाच्या तसा दिला आहे (कोणतेही इतर संस्कार न करता) असे गृहीत धरुन लिहितो की तेव्हाही तुमची लेखनशैली छान होती. प्रत्येक मुद्द्याचा बारकाईने विचार करुन वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत लिहिण्याची हातोटी तेव्हापासुनच आहे.

Weaning साठी मराठीत "उष्टावण" हा शब्द आहे. लहान बाळांना पहिला घन आहार देण्याच्या कार्यक्रमाला "ऊष्टावण काढणे" असे म्हणतात.

साधारण कोणतीतरी खीर बनवून मग ती मामाच्या सोन्याच्या अंगठीने बाळाला चाटवायची असे या कार्यक्रमाचे स्वरुप असते.

पैजारबुवा,

पाषाणभेद's picture

19 Sep 2022 - 9:47 am | पाषाणभेद

उष्टावण छानच शब्द आहे.
लेख व तेथील अनुभव छान आहेत. आता आर्थिक परिस्थिती ग्रामिण भागात सुधारलेली आहे.
गाव कोणते होते इंटरशिपचे?

प्रचेतस's picture

19 Sep 2022 - 9:29 am | प्रचेतस

लेख आवडला. तेव्हाही तुमचे लेखन उत्तमच होते.
बाकी Weaning वर भारतरत्न पां. वा. काणे यांनी लिहिलेल्या धर्मशास्त्राच्या इतिहासात मजेदार माहिती आहे मात्र येथे अवांतर होईल म्हणून लिहित नाही.

चौथा कोनाडा's picture

28 Sep 2022 - 8:39 pm | चौथा कोनाडा

Weaning वर भारतरत्न पां. वा. काणे यांनी लिहिलेल्या धर्मशास्त्राच्या इतिहासात मजेदार माहिती आहे. मात्र येथे अवांतर होईल

प्रचूवल्ली सर, एक वेगळा धागा जरूर यावा.

चौथा कोनाडा's picture

28 Sep 2022 - 8:40 pm | चौथा कोनाडा

Weaning वर भारतरत्न पां. वा. काणे यांनी लिहिलेल्या धर्मशास्त्राच्या इतिहासात मजेदार माहिती आहे. मात्र येथे अवांतर होईल

प्रचूवल्ली सर, एक वेगळा धागा जरूर यावा.

मुक्त विहारि's picture

19 Sep 2022 - 9:48 am | मुक्त विहारि

हा लेख वाचतांना, मेळघाटातील मोहोर, ह्या पुस्तकाची आठवण झाली..

मेळघाटात, असेच वातावरण आहे

डाॅक्टर कोल्हे यांच्यावर आधारीत पुस्तक आहे

जमल्यास जरूर वाचा

1.

उष्टावण

>>>
हा देखील या प्रक्रियेसाठी पूर्ण पटत नाही कारण उष्टावण म्हणजे फक्त “पहिला घन आहार” देणे. ‘विनिंग’मध्ये अंगावरचे दूध कमी करत करत संपूर्ण घन आहाराकडे वाटचाल करणे असे अभिप्रेत आहे. त्यामुळे हा सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी असतो.
" ing " चा भाव शब्दात यावा.

2.

Weaning वर भारतरत्न पां. वा. काणे

>>>
रोचक. सवडीने अन्यत्र वाचू.

कर्नलतपस्वी's picture

19 Sep 2022 - 9:51 am | कर्नलतपस्वी

माझ्या आयुष्यातील पहिलावहिला लेख मी ४० वर्षांपूर्वी लिहिला

लेख वाचला तेव्हा पाटी कोरी होती. वाटले पहिल्या लेखाला पहीला प्रतिसादक बनण्याचा मान मिळणार.

जोपर्यंत प्रतिसाद पुर्ण केला तोवर कंजूसभौच्या गळ्यात हे पदक पडलं.असो परत कधीतरी.

पण बाकी पहिलं सगळं भारी असतयं बघा.
पहीली शाळा,पहीला काॅलेजचा दिवस,पहीला नोकरीचा दिवस,पहीला कांदेपोह्याचा कार्यक्रम, पहिली रात्र आणी बरेच काही.

हे सर्व अनुभव वेरूळ लेण्यातील शिल्पा सारखे मनावर कोरले जातात आणी कधीच पुसत नाहीत.

लेख मस्तच झालाय.
" देवीचा रोगी कळवा हजार रूपये मिळवा" ,असे चुन्याने भिंतीवर सर्व गावात लिहीलेले असायचे.

एक लहान मुल म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) बद्दल तिथल्या डाॅक्टर इतक्याच माझ्या आठवणी. एकच सांगतो.

नसरापुर ,भोर संस्थानातील महत्वाचं गाव. संध्याकाळचे चार एक वाजले असतील. शांत पसरलेल्या गावात अचानक आरडाओरड सुरू झाली. आजोबांच्या वाड्यासमोरच डाॅक्टर रहात होते. धोतराच्या एक काठीवर बनवलेल्या झोळीत एक न दिसणारा रोगी घेऊन आदिवासी लोकांची वरात डाॅक्टरां च्या घरासमोर थांबली. आगंणात खेळत असलेल्या मुलांनी गराडा घातला. वाटलं फुरसं,घोणस असं काही चावले आसलं.

काहीच कळत नव्हत.आमच्यातल्या एका मोठ्या मुलाने गौप्यस्फोट केला, अरे,त्याने 'ते'. कापलयं. सगळ्यांच्या लक्षात आलं. अशा गोष्टी शिकवायला लागत नाही.

डाॅक्टर डोक्याला हात लावून बसले. कुठलीच हात्यारे नाही काय करायचे. आडगाव असल्यामुळे वाहतूक साधन नाही.
शेवटी मुक्कामाच्या एस टी ला गावातल्या ठाणेदार आणी डाॅक्टर ने पुण्याकडे पिटाळले. कुठलेच विषय नसणाऱ्या गावात हा विषय बरेच दिवस पुरला.

१९७३ साली दुष्काळग्रस्त भागातील तत्कालीन सरकारने पाझर तलाव ,नाला बंडीग आणी अशी बरीच दुष्काळी कामे काढली होती. नुकताच मॅट्रिक झालो होतो. नोकरीच्या शोधात होतो.

जातो का? नोकरी आहे म्हणून विचारणा झाली. एका पायावर तयार झालो. कुठे जायचंय "कळमोडी",भीमाशंकर च्या जंगलात एक खेडेगाव. गेलो पण या गावाने जो हिसका दाखवला की खरोखरच कळ मोडली. ती पहीली नोकरी, अनुभव जसाच्या तसा डोळ्यासमोर आहे.

पण आता नाही परत कधीतरी.

मुक्त विहारि's picture

19 Sep 2022 - 9:57 am | मुक्त विहारि

जरूर लिहा

कुमार१'s picture

19 Sep 2022 - 10:26 am | कुमार१

अभिप्राय, पूरक माहिती आणि अनुभवकथन याबद्दल आपल्या सर्वांचे आभार !

१. ,

मेळघाटातील मोहोर,

>>>> उपयुक्त माहिती. पाहतो.
..
२.

पहीली शाळा,पहीला काॅलेजचा दिवस,पहीला नोकरीचा दिवस,पहीला कांदेपोह्याचा कार्यक्रम, पहिली रात्र आणी बरेच काही.
हे सर्व अनुभव वेरूळ लेण्यातील शिल्पा सारखे मनावर कोरले जातात आणी कधीच पुसत नाहीत.

>>> अ- ग - दी -च !
तुमचे अनुभव आवडले.

कर्नलतपस्वी's picture

19 Sep 2022 - 10:45 am | कर्नलतपस्वी

पोटफाडी
म्हणजे काय माहीतीच असेल.

प्रा. आ. के. बरोबरच गावात दुर लांबवर एक सहा बाय आठची दगडी उतरत्या कौलारू छपराची छोटीशीच खोली. या बाजुला सहसा कुणीच फिरकत नसे. अपघाती,खुन किंवा अनैसर्गिक मृत्यू झालेला मृतदेह ठेवायचे.वर्षाकाठी एखादा दुसराच. सफाई कर्मचारीच जवळपास सर्व काम करायचा. त्याचा त्याला अभिमान वाटायचा तर अशा वेळेस डाॅक्टर करता तो अर्जुनाचा कृष्ण असायचा.

अशिक्षित गावकरी त्याला पोटफोडी म्हणायचे.

पाश्चात्य वैद्यकीय शब्दसंग्रहाला समांतर असा गावकऱ्यांचा शब्दसंग्रह असे व तो ओळखणे, समजणे व औषधोपचार करणे नवीन सुरवात करणाऱ्या डाॅक्टर करता एक अव्हानच असे.

आपला काय अनुभव.

कुमार१'s picture

19 Sep 2022 - 12:19 pm | कुमार१

पाश्चात्य वैद्यकीय शब्दसंग्रहाला समांतर असा गावकऱ्यांचा शब्दसंग्रह असे व तो ओळखणे, समजणे व औषधोपचार करणे नवीन सुरवात करणाऱ्या डाॅक्टर करता एक अव्हानच असे.

>>> अगदी बरोबर !
असे काही खास ग्रामीण शब्द ऐकण्यात आलेले आहेत
जरा सावकाशीने लिहून काढतो

तुषार काळभोर's picture

19 Sep 2022 - 11:50 am | तुषार काळभोर

चाळीस वर्षात फरक पडलाय सुद्धा आणि नाही सुद्धा.

एकीकडे आपला ‘Insat 1 B’ अवकाशात भराऱ्या मारतोय अन दुसरीकडे हे ओढेनाले लोकांना गावाबाहेर पडू देत नाहीत. असे कितीतरी अडथळे आणि विसंगती.

यात सुधारणा झाली असली, तरी अजूनही पावसाळ्यात ओढे-नाले ओलांडता न आल्यामुळे शिक्षण, आरोग्य या सुविधांपासून वंचित राहावं लागणं हे खूपच सर्वसामान्य आहे. एक जवळचं उदाहरण. मांजरी खुर्द नदीच्या पलिकडे आहे. पावसाळ्यात (वेगवेगळे) ८-१० दिवस नदीवरचा पूल पाण्याखाली जातो आणि हडपसर किंवा पुण्यात येणार्‍या विद्यार्थ्यांचा खोळंबा होतो. नोकरदार आणि तातडीच्या रुग्णांना वाघोली-खराडी मार्गे हडपसर किंवा पुण्यात न्यावे लागते. मांजरी गाव पुणे मनपामध्ये समाविष्ठ होऊन ३-४ वर्षे झालीत. वेल्हा, मुळशी, आंबेगाव, जुन्नर या सह्याद्रीच्या कुशीतील खेड्या-वस्त्या-वाड्यांची स्थिती कशी असेल?

“सन २००० पर्यंत सर्वांसाठी आरोग्य” हे स्वप्न साकार होण्याआधी ‘गरिबी हटाव’ पूर्णतः साध्य होणे आवश्यक आहे.

हे हे हे! आता २०२२ सुरू आहे. आणि हा लेख अजून ४१ वर्षांनी तुम्ही "एका लेखाचे सहस्रचंद्रदर्शन" नावाने पुनर्प्रकाशित केला तरी तो Contemporary वाटेल.

“काय मग. मुलेबाळे किती?”
“ पाच मुली आणि एक मुलगा ! आपल्या सर्व सवलती सरकारने बंद केल्यास बघा !”
(त्याचाही अभिमान)
“अहो, निदान तुम्हाला तरी संततिनियमनाचे महत्त्व कळायला नको का ?”
“डॉक्टर, संततिनियमन म्हणजे काय - नियमाने संतती होत राहणे !!”

एकदा मुलगा झाल्यावर मात्र नसबंदी करून घेण्याकडे वाढता कल जाणवे; त्यातही अर्थात पुरुषापेक्षा स्त्रीचीच.

मला अशी किमान चार कुटुंबे माहिती आहेत. तीन मुली झाल्यावर नवर्‍याचा चौथ्या प्रयत्नासाठी आग्रह असतो आणि बायकोला आणखी एक बाळंतपण नको असतं. "आता पुरे" असा आग्रह बायकोने सुरू ठेवल्यास तिची परिस्थिती त्या चौथ्या बाळंतपणापेक्षा वाईट होते!

कुमार१'s picture

19 Sep 2022 - 12:34 pm | कुमार१

यात सुधारणा झाली असली, तरी अजूनही पावसाळ्यात ओढे-नाले ओलांडता न आल्यामुळे शिक्षण, आरोग्य या सुविधांपासून वंचित राहावं लागणं हे खूपच सर्वसामान्य आहे.

>>> +११११

अगदी बरोबर. अत्यंत वास्तव मांडलेत.

यासंदर्भात एकदा डॉ. अभय बंग यांनी एक प्रयोग केला होता. त्यात त्यांनी अगदी लहान खेड्यातील एका हगवण झालेल्या बालकाच्या केसचा अभ्यास केला. त्या बालकाचा आजार तीव्र झाला आणि त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी पोचेपर्यंत सुमारे २४ प्रकारचे अडथळे आले आणि ते योग्य रुग्णालयात पोहोचू शकले नाही. ते बालक दगावले. यावर त्यांनी एक अहवाल शासनाला सादर केला होता. त्या अडथळ्यांमध्ये आर्थिक परिस्थितीपासून अनेक नैसर्गिक, सामाजिक अडथळे वगैरे असे तपशील होते.
अशा प्रकारच्या अनुभवातून त्यांनी ‘आरोग्य सेवा’ संदर्भात एक छान विचार असा मांडलेला आहे :

“ One accurate measurement is infinitely superior to a thousand intelligent opinions”.

कुमार१'s picture

19 Sep 2022 - 12:39 pm | कुमार१

हे हे हे! आता २०२२ सुरू आहे. आणि हा लेख अजून ४१ वर्षांनी तुम्ही "एका लेखाचे सहस्रचंद्रदर्शन" नावाने पुनर्प्रकाशित केला तरी तो Contemporary वाटेल.

>>>
असे बिलकुल होऊ नये !
“आपण आशावादी असावे, ज्या काही सुधारणा होणे अपेक्षित असतात त्यात आपलाही वाटा असावा” वगैरे विचार डोक्यात कायम गर्दी करतात. परंतु इच्छा, अपेक्षा आणि वास्तव या फार वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

असो. बघूया काय होतेय...... निदान अजून वीस वर्षांनी !

चौकस२१२'s picture

19 Sep 2022 - 11:55 am | चौकस२१२

आणि मुख्य म्हणजे हे ठिकाण नर्सेस क्वार्टर्सच्या अगदी समोर होते
बरोबर मैत्रिणी नाहीत हे खरे दुःख !

काय हे डाक्टर ,, एकाच लेखात असा विरोधाभास !
अहो केवढे भाग्य होते तुमचे,,, विंजिनियर लोकांचे हाल काय असतात तुम्हाला माहित नाहीत बहुतेक,, अगदी निमशहरी भागात वसतिगृहात ७५० मुलं आणि १३ मुली असला प्रकार ....
असो गम्मत केली हो ...
लेख आवडला ...
मराठीतील "पंचायत " मालिका काढली तर प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेला शिकावू डॉक्टर अशिव व्यक्तिरेखा रंगवीत येतील !

कुमार१'s picture

19 Sep 2022 - 2:02 pm | कुमार१

असो गम्मत केली हो ...

गंमत आवडली तर !
त्याचं काय आहे ना....
निव्वळ एखादी क्वार्टर्स समोर असणे आणि दिवसाचे आठ तास प्रत्यक्ष एखादी सहकारिणी बरोबर काम करत असणे यात फार फरक आहे हो 😀
🙏

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Sep 2022 - 2:47 pm | राजेंद्र मेहेंदळे

खुसखुशीत लेख आहे. आपली लेखनशैली तेव्हाही छान होती असे मत नोंदवतो.
अजुनही नवशिक्या डॉ. ना खेड्यात ईटर्नशिप करावी लागते का? की प्रायव्हेट कॉलेजमधुन शिकलेल्यांना सवलत असते?

कुमार१'s picture

19 Sep 2022 - 3:15 pm | कुमार१

धन्यवाद.

अजुनही नवशिक्या डॉ. ना खेड्यात ईटर्नशिप करावी लागते का?

>>
अलीकडे खेड्यातील (बहुतेक) २/३ महिनेच असावी. (१०/९ महिने शहरातील रुग्णालयात).
सरकारी कॉलेजमध्ये इंटरनशिपचे बर्यापैकी विद्यावेतन मिळते.
खाजगी कॉलेजमध्ये विनावेतन करावी लागते.
माफ कोणालाच नसते.

वामन देशमुख's picture

19 Sep 2022 - 5:30 pm | वामन देशमुख

तुमचं पाहिलंवहिलं लिखाण आवडलं. लेखनशैली तेंव्हाही अगदी चांगली होती असे म्हणता येईल.

---

अवांतर:

शाळेत जाण्याचा रस्ता गावातल्या मुख्य बाजारपेठेतून जायचा. तेंव्हा लेखात दिलेली तांबीची वगैरे जाहिरात दिसायची. सुरुवातीला "दोन किंवा तीन मुले पुरेत" मग "दोनच पुरेत" शेवटी "मुलगा असो की मुलगी, एकच पुरे" अशी त्यात प्रगती होत गेली. (आणि आतातर मिपावर डिंकाचे लाडू खाण्याचे दिवस आलेत!)

नुकतेच बऱ्यापैकी मराठी वाचता येऊ लागले होते. मग लहानग्या जॉर्जच्या कुऱ्हाडीप्रमाणे जे दिसेल ते सगळे आम्ही वाचत सुटायचो आणि "तांबी म्हणजे काय?" असे प्रश्न मोठ्यांना विचारून मग रागावून घ्यायचो.

त्याशिवाय, "सुरक्षित अंतर ठेवा - दोन वाहनांत, दोन मुलांत" याचा अर्थ प्रभातफेरीला जाताना आपल्या पुढच्या मुलापासून थोडंसं अंतर ठेवायचे आहे. (हा अर्थ चक्क आमच्या इतिहासाच्या सरांनी आम्हाला सांगितला होता!)

"पाळणा लांबवा" म्हणजे बाळाचा झुलणारा पाळणा आपल्या डोक्याला लागू नये म्हणून तो दूर राहील अश्या प्रकारे त्या खोलीतून जावे. (हे आमचंच लॉजिक होतं!)

इतर पाठ झालेली वाक्ये म्हणजे -

जुलाब होता बाळराजा, मीठ साखर पाणी पाजा.
कुठलाही ताप, असू शकतो हिवताप.
येत कणकण तापाची, करा तपासणी रक्ताची.
देवीचा रोगी कळवा, १००० रुपये मिळवा.

---

शासकीय आरोग्य संबंधित जाहिरातींपैकी लक्षात राहिलेली कदाचित शेवटची म्हणजे - "बोल सखी बोल तेरा राज क्या है..." ही माला-डीची जाहिरात!

---

अतिअवांतर: लहानपणी मेलडी चॉकलेट खायचे आणि मोठेपणी माला-डी गोळ्या खायच्या हा आयुष्यातील आकर्षकतेपासून ते आवश्यकतेपर्यंतचा प्रवास चित्रित करणारी प्रदीर्घ कादंबरी कुणी लिहिली आहे का? 😜

कुमार१'s picture

19 Sep 2022 - 5:43 pm | कुमार१

धन्यवाद.
सुंदर प्र. !

लहानणी मेलडी चॉकलेट खायचे आणि मोठेपणी माला-डी गोळ्या खायच्याप

>>>
मस्त, आवडले !

इतर घोषणाही सर्व आठवल्या. त्या काळी अजून एक सुंदर व्यंगचित्र आरोग्य विभागाने काढले होते. त्यात नवव्या महिन्यात इतके पोट वाढलेला पुरुष दाखवला होता आणि खाली लिहिले होते :
“पुरुषांवर अशी वेळ आली असती तर त्यांनी नक्कीच प्राधान्याने कुटुंब नियोजनाचा विचार केला असता !”

कुमार१'s picture

30 Sep 2022 - 9:01 pm | कुमार१

नुकतीच माता बाल आरोग्य संबंधीची एक चांगली जाहिरात महाराष्ट्र शासनाने प्रसारित केली आहे.
त्यातले ब्रीदवाक्य सुरेख :

मातृत्वाचा सन्मान
हाच आपला अभिमान

MipaPremiYogesh's picture

19 Sep 2022 - 5:58 pm | MipaPremiYogesh

अरे वाह छानच डॉक. मस्त वाटले वाचून

चष्मेबद्दूर's picture

19 Sep 2022 - 9:28 pm | चष्मेबद्दूर

हा तुमचा पहिला वहिला लेख/ पाहिले लेखन असेल असं अजिबातच वाटत नाही. खूपच छान.

श्रीगणेशा's picture

20 Sep 2022 - 3:24 am | श्रीगणेशा

कुमार सर,
चाळीस वर्षांपूर्वीचा लेख म्हणजे थोडी तरी अपरिपक्वता अपेक्षित होती :-)
पण तुमच्या तेव्हाच्याही लिखाणात चिकित्सा, स्थिरता, परिपक्वता जाणवतात! _/\_

डॉ. अभय बंग यांचा हा विचारही आवडला:

One accurate measurement is infinitely superior to a thousand intelligent opinions

अभिप्रायाबद्दल धन्यवाद !
आज मीच माझा परीक्षक म्हणून या लेखाकडे पाहिल्यास काही विधानांचा किंवा मुद्द्यांचा मला पुनर्विचार करावा वाटेल.

वाचकांना लेख आवडला याचा आनंद वाटतो

शाम भागवत's picture

28 Sep 2022 - 12:31 pm | शाम भागवत

हे विचारही वाचायला आवडतील.
लेख छान हेवेसांन.

कुमार१'s picture

28 Sep 2022 - 12:41 pm | कुमार१

**हे विचारही वाचायला आवडतील.
>>>
लेखातील खालील उल्लेख:
१.

एकीकडे आपला ‘Insat 1 B’ अवकाशात भराऱ्या मारतोय अन दुसरीकडे हे ओढेनाले लोकांना गावाबाहेर पडू देत नाहीत.

>>>
देशातील सर्वांच्या मूलभूत गरजा भागल्याशिवाय आपण वैज्ञानिक प्रगतीवर किती लक्ष द्यावे आणि खर्च करावा हा खूप विचार करण्याचा मुद्दा आहे.

आजही माझ्याकडे याचे समाधानकारक उत्तर नाही !
परंतु, वैज्ञानिक, अर्थशास्त्रज्ञ आणि समाजधुरिणांची काही अभ्यासपूर्ण मते वाचनात आलेली आहेत. त्यावर मी विचार करत राहतो.

तरीसुद्धा विधानाच्या कोणत्या भागाकडे अधिक आणि प्राधान्याने लक्ष द्यावे हा पेच मला कोड्यात टाकतो.

कुमार१'s picture

28 Sep 2022 - 1:38 pm | कुमार१

२.

दारू पिऊन बायकोला मारझोड करणारा नवरा हा आर्थिक व सामाजिक विषमतेतूनच निर्माण होत नाही का?

>>>
प्रथम ही जी निंद्य व्यक्ती आणि प्रवृत्ती आहे त्या दोन्हीचा निषेध. पण असा पुरुष समाजात निर्माण व्हायला तो एकटा जबाबदार आहे का ? आजूबाजूचा समाज देखील कारणीभूत असतो ना?

या दोष- जबाबदारीची जर व्यक्ती आणि समाज अशी विभागणी करायची झाली, तर ती आपण कशी करावी:
99 :1
80 :20 का
50: 50 ?

पुन्हा एकदा विचारांच्या गर्तेत पडायला होते.

मस्त लिहिला होतात कि हा लेख चाळीस वर्षांपूर्वी 👍
बाकी लेखाशी सुसंगत अशा लहनपणी वाचलेल्या दोन सरकारी घोषणा अजूनही आठतवतात.
एक एस.टी. बसच्या मागच्या बोर्डावर लिहिलेली,
"तांबी बसवा... पाळणा लांबवा..."
आणि दुसरी ग्रामीण भागांत भिंतींवर लिहिलेली,
"गप्पी मासे पाळा...हिवताप टाळा..."

कुमार१'s picture

20 Sep 2022 - 12:41 pm | कुमार१

**"गप्पी मासे पाळा...हिवताप टाळा..."
>>>
ही जाहिरात तर अजूनही काही भिंतीवर दिसेल. या संदर्भातील माझा २००२ ते ४ च्या दरम्यानचा एक अनुभव लिहीतो.

त्या काळात मी पुणे लोणावळा लोकल ट्रेन ने नियमित प्रवास करत होतो. माझ्या डब्यात नेहमी एक रेल्वे कर्मचारी असायचे. साधारण दापोडी च्या आसपास ते आसनावरून उठून दारात जायचे आणि तिथून खाली जो नदीचा प्रवाह आहे त्यात त्यांच्या पिशवीतलं काहीतरी टाकायचे. माझा असा समज झाला होता की हा माणूस नदीत निर्माल्य टाकतो आणि त्यामुळे मनात एक प्रकारचे अढी निर्माण झाली होती( प्रदूषण वगैरे).

एकदा ते आणि मी असे दोघेच डब्यात होतो तेव्हा मी माझे कुतूहल शमवले आणि त्यांना विचारले की तुम्ही नदीत काय टाकता ?

तेव्हा ते म्हणाले, की मी गप्पी माशांसाठी जे खाद्य लागते ते टाकतो. जेवढे गप्पी मासे नद्यांमधून वाढतील तेवढे चांगलेच.
हे ऐकल्यावर मी त्यांचे कौतुक केले आणि त्यांना मनोमन वंदन केले !

चष्मेबद्दूर's picture

20 Sep 2022 - 11:18 am | चष्मेबद्दूर

आधीच्या प्रतिसादात लिहायचं राहिलं ते लिहिते. तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे, भात खाल्ला तर जखमेत पू होतो याचा मी देखील अनुभव घेतला आहे. माझ्या लहानपणी आम्ही काही वर्ष वालचंदनगरला राहायचो. तिथे एक शहा नावाचे डॉक्टर होते. ते नेहमी रंगीबेरंगी औषध गोळ्या द्यायचे. मी लहानपणी खूप धडपडी असल्याने मला नेहमी कुठे न कुठेतरी जखम झालेली असायची. तर, शहा डॉक्टरांकडे गेल्यावर त्यांचं सांगणं असायचं, भात खाऊ नको. बरं...नाही खात. दोन दिवसांनी ड्रेसिंगला गेल्यावर bandage काढले की त्यांचा पहिला प्रश्न, hmm, काय खाल्लं काल? किती भात खाल्ला?... नाही खाल्ला, पोहे खाल्ले फक्त! ... अगं पोहे म्हणजे भाताचा भाऊ ना? बघ किती पस झालाय ते... मग ते hydrogen peroxide टाकायचे आणि जखम स्वच्छ करायचे. आणि मला इतक्या वेळा लागलेलं असायचं की त्या सगळ्या भानगडीत माझं भात खाणं कमी झाल !
तर आजतागायत मला हा प्रश्न पडला आहे, की खरंच असं काही संबंध असेल का? की आपलं अनमान धपक्याने या गोष्टी घडतात?

कर्नलतपस्वी's picture

20 Sep 2022 - 12:06 pm | कर्नलतपस्वी

दक्षिण भारतीयांचे काय? ते तर नुसताच भात खातात.&#128528

कुमार१'s picture

20 Sep 2022 - 12:11 pm | कुमार१

@ च ब
भात खाल्ल्याने जखमेत पू होतो याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.
थोडे अधिक समजून घेऊ.

जखमेत पू होण्याचा अर्थ जंतुसंसर्ग होणे.
जर एखाद्या व्यक्तीला अनियंत्रित मधुमेह असेल तर त्याच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण हे जास्त असते आणि त्यामुळे कुठल्याही जखमेत जंतुसंसर्ग व्हायला सहज आमंत्रण मिळते.

पूर्ण ठणठणीत निरोगी व्यक्तीने भात खाल्ला काय किंवा पोळी भाकरी खाल्ली काय, त्याच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण हे नॉर्मलच असणार ना !

त्यामुळे वरील समज हा पूर्णपणे अशास्त्रीय आहे.

चष्मेबद्दूर, पुढे डॉक्टर कुमार यांनी भात आणि "रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण" संधर्भ दिला आहे त्या नुसार डॉक्टर शहा काळजी घेत असतील असे गृहीत धरले तर दोन शक्यता उदभवतात
१) लहानपणी आपल्याला मधुमेह झाला होता
किंवा
२) उगाच धोका नको म्हणून डॉक्टर शहा धरून चालले कि या मुलाला मधुमेह झाला आहे
पण असे गृहीत कसे काय एखादा चला वैद्य धरू शकेल?

पण या पैकी काहीच नसेल तर मग डॉक्टर शहा असे का विचारायचे ? डॉक्टर कुमार काही सांगू शकाल का ?

कुमार१'s picture

20 Sep 2022 - 3:52 pm | कुमार१

मी न पाहिलेल्या एखाद्या डॉक्टरांच्या पदवी किंवा अभ्यास शाखेबद्दल कोणतीही माहिती नसताना त्यावर मी टिप्पणी करणे योग्य नाही.

मी जे आधुनिक वैद्यक शिकलो त्यानुसार स्पष्टीकरण मी दिलेले आहे. त्याचे अनेक संदर्भ कोणीही जालावर सुद्धा पाहू शकतात.
याउपर जर काही वेगळ्या उपपत्ती/ सिद्धांत असतील तर त्या संबंधिताने पुढे येऊन मांडाव्यात एवढेच म्हणता येईल. अर्थात त्याचे संदर्भ दिल्यास बरे होईल.

चष्मेबद्दूर's picture

20 Sep 2022 - 7:06 pm | चष्मेबद्दूर

हे खरंय की नंतर जेंव्हा जेंव्हा काही जखमा झाल्या त्या वेळेला भात खाऊन / न खाऊन ज्या वेळेला त्या बऱ्या होणार तेंव्हाच आणि तशाच बऱ्या झाल्या. मला डॉ नी वरती उल्लेख केल्यामुळे माझ्या lahanapnchi आठवण झाली हे खरं.
आणि मी काही नंतर परत त्याची उकल करत बसले नाही. पण आता शोध घेतेच. काय भानगड होती ते....
(मला मधुमेह नव्हता आणि नाही.)

वामन देशमुख's picture

20 Sep 2022 - 1:11 pm | वामन देशमुख

भात खाल्ल्याने जखमेत पू होतो याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.

याबद्धल दुमत नाहीच, पण भात, वांगी वगैरे पदार्थ खाल्ल्याने पू होतो असे आमच्या लहानपणी सगळेच मोठे लोक (गावातील डॉक्टर्स देखील) सांगायचे.

मीदेखील आत्तापेक्षा लहान असताना खूप धडपड्या होतो आणि बऱ्याचदा कुठेतरी काहीतरी लागलेले असायचे. मग भात खायला मिळायचा नाही.

---

अवांतर १: पू, शेंबूड इत्यादी बाबी २०-३०-४० वर्षांपूर्वीच्या तुलनेत आजकाल कमी झाल्यात का?

अवांतर २: आमच्या शाळेच्या पुस्तकांत पटकी, विषमज्वर, गोवर, स्पायरोगायरा वगैरे रोग असायचे; आजकाल कमी झालेत का?

कुमार१'s picture

20 Sep 2022 - 2:20 pm | कुमार१

१.
आहार आणि आजार या संदर्भातील अभ्यास व संशोधन ही काही कायमस्वरूपी स्थिर असलेली गोष्ट नाही. टप्प्याटप्प्याने होणाऱ्या संशोधनातून जुने गैरसमज दूर होतात आणि नवीन उपपत्ती समोर येतात. या संदर्भातील मधुमेह आणि आहार या संदर्भात समजुती कशा बदलल्या ते सांगतो.

1980 च्या दशकात पोळी आणि भात यांच्या रक्तातील ग्लुकोज वाढवण्याच्या प्रमाणावरून खूपच बाऊ केला गेलेला होता.
मधुमेह झाला म्हणजे जणू काही भात बंद करायचा असे सल्ले अनेक डॉक्टरही देत असत. कालांतराने त्यात बदल झालेला आहे.
या दोन्ही धान्यांच्या glycemic इंडेक्स मध्ये जरी फरक असला तरी तो बाऊ करण्या इतका नक्कीच नाही. त्यामुळे भात बंद वगैरे सल्ला देणे साधारण 90 च्या दशकांमध्ये तसे बंद झाले.
इथे मुद्दा हा आहे, की एका वेळेस जे काही उष्मांक आहाराद्वारे मिळणार आहेत ते प्रमाणात ठेवणे महत्त्वाचे आहे.
सर्वसाधारणपणे रोजच्या महाराष्ट्रीयन जेवणात पोळी आणि भात हे एका जेवणात खाल्ले जाते. त्यातून गरजेपेक्षा जास्त उष्मांक शरीरात जातात आणि मग रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण जेवणानंतर झपझप वाढते.
त्यामुळे अलीकडे तज्ञांचे असे मत झालेले आहे की एका जेवणात एकच धान्य कर्बोदकांच्या रूपाने खाल्ले जावे- म्हणजेच पोळी किंवा भात यापैकी काहीतरी एकच एकावेळी खाणे योग्य. जोडीला प्रथिनांसाठी वरण पाहिजेच.
याच्या जोडीला कच्चे खाण्याचे प्रमाण वाढवणे आणि शिजलेल्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे हे ओघाने आलेच.

अमुक एक पदार्थ खाणे आणि जखमेत पू होणे यांचा मात्र काहीही संबंध नाही यावर मी ठाम आहे.

त्यामुळे अलीकडे तज्ञांचे असे मत झालेले आहे की एका जेवणात एकच धान्य कर्बोदकांच्या रूपाने खाल्ले जावे
यावरून आठवले
उत्तर हिंदुस्थानी मित्र म्हणतात कि आमच्य्या आहारात एक वेळीस एकतर राजमा चावलं/ मांसाहार किंवा मग रोटी + भाजी / मांसाहार असे असते
एकाच वेळी दोन्ही नसते
पण हे तरी खरे का?

कुमार१'s picture

20 Sep 2022 - 4:02 pm | कुमार१

एकूण आहार = 30 टक्के कच्च म्हणजे कोशिंबिरी
+
उरलेल्या 70 टक्के मध्ये कर्बोदके, प्रथिने आणि किमान मेद पदार्थ याचे योग्य ते प्रमाण ठेवले म्हणजे झाले. वरण, उसळ की मांसाहार हे ज्याने त्याने आपापले ठरवावे.

होतं काय की बहुसंख्या भारतीय आणि प. आशियाई आहारामध्ये कर्बोदके ठासून भरणे हे परंपरागत आहे.

अगदी महाराष्ट्राचेच बघाना :
पोट भरेपर्यंत पोळ्या/ भाकरी खायची आणि मग समाप्तीचा म्हणून पुन्हा भात वर ढोसायचा ! ज्या दिवशी उकडलेल्या बटाट्याची चमचमीत भाजी खातोय त्या दिवशी एक पोळी आपसूक वजा व्हायला हवी :)

याच्या जोडीला शारीरिक हालचाली, व्यायाम दिवसेंदिवस कमी होत चाललेले. साधे तीन मजले जिने उतरताना सुद्धा आपल्याला लिफ्ट पाहिजे. कोपऱ्यावर भाजी आणायला जाताना स्वयंचलित वाहन पाहिजे.

.... मग का नाही मोठ्या प्रमाणावर मधुमेह , इ. फोफावणार ?

Bhakti's picture

20 Sep 2022 - 4:19 pm | Bhakti

+१
पोळ्या कमी खाणं / न‌ खाणे हे समीकरण पक्क होत चाललंय.

सुरिया's picture

20 Sep 2022 - 2:27 pm | सुरिया

आमच्या शाळेच्या पुस्तकांत पटकी, विषमज्वर, गोवर, स्पायरोगायरा वगैरे रोग असायचे; आजकाल कमी झालेत का?

स्पायरोगायरा नावात रोग असला तरी ती वनस्पती/शैवाल असायची ना? आकृती काढताना त्याची ती डीएनए सारखी संरचना लक्शात आहे अजून.

होय ते शैवाल आहे.कदाचित जास्त प्रमाणात शरीरात गेल्यावर आजार उद्भवू शकतो.

कुमार१'s picture

20 Sep 2022 - 2:39 pm | कुमार१

२.
विषमज्वर बऱ्यापैकी होत असतो

पटकी : याचे प्रमाण खूप कमी झालेले आहे. परंतु पावसाळ्यात अधून मधून उद्रेक होतात. दहा वर्षातील भारतातील एकूण केसेसचा आढावा घेणारा संख्याशास्त्रीय अहवाल इथे वाचता येईल : https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC9099871/

गोवर : लसीकरणामुळे नियंत्रणात आहे परंतु तरीही आजार होतो. यावर्षी गेल्या काही महिन्यांमध्ये गंभीर(fatal) गोवराने झिंबाब्वे मध्ये किती हाहाकार माजवला आहे ते इथे वाचता येईल :
https://www.bloomberg.com/news/articles/2022-09-05/zimbabwe-says-measles...

कुमार१'s picture

20 Sep 2022 - 7:13 pm | कुमार१

३.
पू, शेंबूड इत्यादी बाबी २०-३०-४० वर्षांपूर्वीच्या तुलनेत आजकाल कमी झाल्यात का?
>>>
असे मला अजिबात वाटत नाही. शासकीय किंवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमध्ये येणारे अत्यंत खराब स्थितीतले काही रुग्ण पाहण्यात येतात. त्यांच्या जखमामधले पू सामान्य माणसाला बघणार नाही इतके भयानक असतात.

विविध ऍलर्जीचे प्रमाण तर वाढलेले आहे. त्यामध्ये नाक आणि श्वसन मार्गावर आघात होतोच
त्यामुळे शेंबूडनिर्मिती होतच असते.
असे भरपूर लोक दिसतात

प्राची अश्विनी's picture

20 Sep 2022 - 3:20 pm | प्राची अश्विनी

लागले ख आणि प्रतिसाद दोन्ही वाचनीय!

प्राची अश्विनी's picture

20 Sep 2022 - 3:41 pm | प्राची अश्विनी

लेख!

Bhakti's picture

20 Sep 2022 - 4:22 pm | Bhakti

छान लेख!

तर्कवादी's picture

20 Sep 2022 - 5:19 pm | तर्कवादी

छान लेख
या निमित्ताने "लाखों मे एक" या वेबसिरीजच्या दुसर्‍या पर्वाची आठवण झाली. बर्‍यापैकी वास्तव वाटावे असे चित्रण असलेली , सामाजिक आशय मांडणारी ही वेबसिरीज आवर्जुन बघण्याजोगी आहे.

कुमार१'s picture

20 Sep 2022 - 5:48 pm | कुमार१

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल वरील सर्वांचे आभार !

"

लाखों मे एक"

ही मालिका कोणत्या ओटीटीवर आहे ?

ही मालिका कोणत्या ओटीटीवर आहे ?

अ‍ॅमेजॉन प्राईमवर..

कुमार१'s picture

20 Sep 2022 - 6:42 pm | कुमार१

मग सवडीने नक्की बघेन.
धन्स.

तर्कवादी's picture

20 Sep 2022 - 7:58 pm | तर्कवादी

मग सवडीने नक्की बघेन.

जमल्यास अभिप्रायसुद्धा द्या.. अशा वेबमालिका फारसं कुणी बघत नाही. बहुतेकांना वेगवान थ्रिलरच फक्त बघायच्या असतात.

तर्कवादी's picture

20 Sep 2022 - 8:07 pm | तर्कवादी

मग सवडीने नक्की बघेन.

दुसरे पर्व बरं का .. म्हणजे पहिलेही तुम्ही बघू शकता पण मी ते पाहिलेले नाही त्यामुळे मी इथे फक्त दुसरे पर्व सुचवत आहे.

कुमार१'s picture

20 Sep 2022 - 8:19 pm | कुमार१

"लाखों मे एक"
ही मालिका मला प्राईम वर काही सापडली नाही. तुम्ही फार पूर्वी पाहिली आहे का?
आता त्यांनी काढली असावी
का पूर्ण नाव वेगळे आहे ?
भारताबाहेरच्या प्राईम मध्ये नाही ना?

तर्कवादी's picture

20 Sep 2022 - 8:32 pm | तर्कवादी

हा दुवा बघा
आता लॅपटॉपवर तरी दिसत आहे. फायर टीव्हीवर दिसते का ते पुन्हा बघतो.

कुमार१'s picture

20 Sep 2022 - 8:40 pm | कुमार१

दिसत आहे.
मी लाखोमेचे स्पेलिंग La एवढेच केलं होतं म्हणून गंडत होतं. Laa... आहे ते.
धनस

कुमार१'s picture

20 Sep 2022 - 6:42 pm | कुमार१

मग सवडीने नक्की बघेन.
धन्स.

नचिकेत जवखेडकर's picture

21 Sep 2022 - 12:34 pm | नचिकेत जवखेडकर

खूपच छान अनुभवकथन!
थोडं विषयांतर होतंय पण आयुर्वेदिक डॉक्टर ऍलोपॅथी औषधं देताना पाहण्यात आली आहेत. हे सरकारमान्य आहे का ?

कुमार१'s picture

21 Sep 2022 - 12:40 pm | कुमार१

हे सरकारमान्य आहे का ?

खरं म्हणजे नाही, परंतु आपल्याकडे नियमांची कडक अंमलबजावणी होत नाही.

मध्यंतरी आयुर्वेदिक डॉक्टरांना काही ठराविक प्रकारच्या शल्यक्रिया करण्यासाठी परवानगी दिल्याचे वाचले होते. त्यावर खूप वाद झाला
पुढे त्या प्रकरणाचे काय झाले ते माहित नाही. कदाचित न्यायप्रविष्ट असावे.

चौथा कोनाडा's picture

21 Sep 2022 - 1:18 pm | चौथा कोनाडा

सुंदर लेख !

“ हो, इंटर्नशिपसाठी आलोय, प्रशिक्षण असतं आमचं”
“म्हंजे शिकावू डॉक्टर म्हना की !”
... च्यायला, अगदी चिमणीच पाडली साल्यानं.

“अहो, निदान तुम्हाला तरी संततिनियमनाचे महत्त्व कळायला नको का ?”
“डॉक्टर, संततिनियमन म्हणजे काय - नियमाने संतती होत राहणे !!”

“डॉक्टर, आम्ही काय पैशासाठी आपरेशन करतो का? ते जादूवाली भानगड काय नगं. पद्धतशीर टाक्याचे आपरेशन होऊ द्या. पायजे तर आम्ही पैसे देतो !”

अश्या खुसखुशीत किस्स्यांमुळे लेख अ ति शय वाचनीय झाला आहे !
३०-३५ वर्षांपुर्वी माझा एक डॉक्टर नातेवाईक उमेदवारीच्या काळात पानशेतजवळच्या दुर्गम भागात प्रॅक्टीस करत असे ... त्याच्या बरोबर ५-७ दिवस राहण्याचा योग आला ... असेच काहीबाही किस्से घडायचे त्याची आठवण झाली !

खुप छान कुमार१ साहेब ... आणखी किस्से वाचायला आवडतील !

कुमार१'s picture

22 Sep 2022 - 7:25 am | कुमार१

धन्यवाद
तुमचे उत्साही रसग्रहण आवडले.

लेखातील सहा महिन्यांच्या कालावधीत आयुष्यातील एक गोष्ट पहिल्यांदा केली होती ती म्हणजे नीलपट (XXX) पाहणे.
परंतु हा लेख मुळात कॉलेजच्या वार्षिकासाठी असल्याने हे त्यात लिहीणे तेव्हा तरी नको वाटले होते.!

या चोरट्या अनुभवाबद्दल सविस्तर या धाग्यात लिहीलेलेच आहे.

कुमार१'s picture

29 Sep 2022 - 4:32 pm | कुमार१

दोन किंवा तीन मुले पुरेत च्या त्या जमान्यात लोकशिक्षणाच्या हेतूने हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. जरूर ऐका :

आता पेटेना माझी चूल
नको हे चौथ मूल…

https://youtu.be/UiCEopmJZSs

'युनिव्हर्सिटी ऑफ पूना', 'दोन किंवा तीन पुरेत' वगैरे चित्रांवरून काळ लक्षात आला आणि सोबतीला प्रत्यक्ष अनुभवाने सिद्ध झालेले लेखन, आवडलेच !

साधारण २०-२५ वर्षांपूर्वीपर्यंत मध्यम लोकवस्तीच्या गावातूनसुद्धा सरकारी दवाखाना असे, तिथे कंपाउंडर, नर्सबाई /मिडवाईफ असत. डॉक्टर 'रोज' OPD ला थोडावेळ / काहीवेळ का असेना उपलब्ध असत आणि क्रोसीन / मलेरियाच्या क्विनाईन सारखी औषधे 'विनामूल्य' उपलब्ध असत. मग पुढे शिक्षणसेवकाच्या धर्तीवर 'आरोग्य सेवक' आले आणि .......

ह्या लेखामुळे अनेक प्रसंग, अनेक व्यक्ती आठवल्या. मुद्देसूद लिहिण्याचे, प्रसंग खुलवण्याचे आणि उत्तम भाषा वापरण्याचे कसब हे तुम्ही फार कमी वयातच कमावले होते हे दिसून आले !

कुमार१'s picture

25 Sep 2022 - 2:52 am | कुमार१

*युनिव्हर्सिटी ऑफ पूना', >>>
पुण्याचे ब्रिटिशकालीन नाव लक्षात यावे हा हेतू होताच.
पुढे मी एमडी झालो तेव्हा मात्र नाव पुणे केले होते आणि त्या पदवीचे प्रमाणपत्र इंग्लिश व मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये असल्यामुळे आकाराने भले मोठे आहे !

अजून एक दिसेल. तेव्हा तशी प्रमाणपत्रे घाऊक प्रमाणावर छापलेली होती आणि एमबीबीएस चे कोणते वर्ष (एक दोन का तीन) ते चक्क बॉलपेनने लिहिले जात होते.
....
*पुढे शिक्षणसेवकाच्या धर्तीवर 'आरोग्य सेवक' आले आणि ग्रामीण महाराष्ट्रातून ठीकठाक दर्जाची....>>>
+११११
अधोगती.....

चामुंडराय's picture

28 Sep 2022 - 2:42 am | चामुंडराय

तुमच्या खास "कुमारेक लेखन शैलीचा" तरुण लेख आवडला.

तुम्हीच मिपा व इतरत्र प्रचलित केलेल्या शब्दात सांगायचे झाले तर लेख "रोचक" आहे. आणि लेखात तत्कालीन समाज जीवनाचे यथायोग्य दर्शन घडते.

"हगवणीवर बहुगुणी मीठ साखर पाणी" अशा भित्तीघोषणा बघितल्या आहेत किंवा "बाळाला द्या बॉन बॉन, बाळ होईल गुटगुटीत छान" अशा जाहिराती येष्टीत बघितल्या आहेत.

आयुर्वेदामध्ये पथ्य ह्या संकल्पनेला खूप महत्व आहे. कोणते खाद्यपदार्थ कोणत्या आजारासाठी तारक किंवा मारक आहेत ह्याबद्दलचा अभ्यास आहे. तेव्हा आधुनिक वैद्यकीय आणि आहार शास्त्राला कदाचित अजून ह्या गोष्टींचा उलगडा झाला नसेल काय अशी शंका मनात डोकावते.

कुमार१'s picture

28 Sep 2022 - 5:35 am | कुमार१

धन्यवाद !

१. खरं सांगायचं तर रोचक हा शब्द मी मराठी संस्थलावर येण्यापूर्वी अजिबात वापरत नव्हतो. मी तो इथेच कुठेतरी शिकलो. पूर्वी रुचकर शब्द माझ्या वापरात होता.

२.

कोणते खाद्यपदार्थ कोणत्या आजारासाठी तारक किंवा मारक आहेत

शंका योग्य आहे. आधुनिक वैद्यकातही ठराविक गोष्टी खाव्यात किंवा खाऊ नयेत असे काहींच्या बाबतीत सप्रमाण सिद्ध केले गेलेले आहे. ते स्पष्टीकरण आपल्याला समजते आणि पटते.

पारंपरिक माहितीच्या बाबतीत असे संशोधन संदर्भासहित स्पष्ट केलेले वाचायला मिळाले तर आनंदच होईल.

कुमार१'s picture

28 Sep 2022 - 8:44 am | कुमार१

आहार व आजार आणि आधुनिक वैद्यक यांची सुरेख सांगड गाऊट च्या बाबतीत घातलेली दिसते. अशा रुग्णांना जो आहार सल्ला दिला जातो त्यामध्ये:

*अमुक एक पदार्थ टाळा,
*अमुक एक प्रमाणात चालतील व
*अंड्यासारखे पदार्थ प्राणीजन्य असले तरी जरूर खा

असा संशोधनसिद्ध त्रिस्तरीय सल्ला दिलेला आहे. या संदर्भातील हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

लई भारी's picture

2 Oct 2022 - 8:25 pm | लई भारी

तुमची लेखनशैली तेव्हा सुद्धा मस्तच होती! आवडला लेख.

कुमार१'s picture

27 Jul 2023 - 6:39 pm | कुमार१

मध्यरात्री चिखलात अडीच किलोमीटरची पायपीट, प्रसूतीवेदना अन् पाऊस, गर्भवती महिलेचा मृत्यू ,मन सुन्न करणारी घटना.
सदर गर्भवतीला झोळीतून नेण्यात आले हे वाचूनही वाईट वाटले.

जव्हार तालुक्यातील नांदगाव येथील अन्य एका गर्भवतीची बातमी सुद्धा मन हेलावून टाकणारी आहे. तिला लाकडी ओंडक्यावर बसवून नदीतून प्रवास करून रुग्णालय गाठावे लागले.

रंगीला रतन's picture

27 Jul 2023 - 10:36 pm | रंगीला रतन

बस करा शेट जुने पुराणे धागे वर काढणे.

सुधीर कांदळकर's picture

29 Jul 2023 - 6:45 am | सुधीर कांदळकर

वाटते. डॉक्टर लोक संवेदनशील नसतात असा एक समज आहे. याला छेद देणारा आपला प्रतिसाद आहे. त्यामुळे बरे वाटले.