‘बेस्ट’ प्रवास ‘वर्स्ट’ स्वानुभव

Primary tabs

लेखनवाला's picture
लेखनवाला in जनातलं, मनातलं
8 Nov 2020 - 9:15 am

0**0**0**0**0

ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि मार्चपासून सुरु झालेलं वर्क फ्रॉम होमचं सत्र संपलं, यावर्षी छत्री ही हातात घ्यावी लागली नव्हती इतका कडक लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम झालं होतं. आता खऱ्या अर्थाने कामावर जाणं क्रमप्राप्त झालं, आमचा कामावर जाण्याचा कोरोना अगोदरचा प्रवास घरापासून अर्धा तास चालत मध्य रेल्वे स्टेशन गाठणं आणि पुढच्या साधारण दहा मिनिटात ठाणे स्टेशन, तिथून ठाणे सॅटीस वरून टीएमटीच्या बसस्टॉपवर बस पकडून पंधरा मिनिटात शेवटचा स्टॉप, तिथून उतरून चालत दहा मिनिटावर ऑफीस, थोडक्यात सगळं वेळेवर भेटलं तर किमान एका तासात घरापासून ऑफीस, महिन्याकाठी प्रवासाचा खर्च निव्वळ सहाशे रुपये. कोरोना अनलॉक प्रकियेनंतर सरकारी कर्मचारी नसल्यामुळे रेल्वे प्रवास शक्य नसल्यामुळे मग ठाणं सर करण्याचा मार्ग बेस्ट बसशिवाय अन्य दुसरा कोणताही उरला नव्हता, त्याला कारणं म्हणजे स्वतःच खाजगी वाहन नव्हतं, कोणी ओळखीचा त्या रस्त्याने जाणारा दुचाकी किंवा चारचाकीवाला नव्हता, ओला उबेर प्रकरण परवडणारं नव्हतं आणि तसंही सोशल डिस्टसिंग बाळगत प्रवास करण्याचं थोतांड काही या शहराला मानवणारंही नव्हतं, पटत नसलं तरी खरं आहे हे, लोकसंख्या दीड कोटी, लोकसंख्येची घनता चौरस किलोमीटर सहाशेच्या आसपास आणि सोशल डिस्टसिंग पाळत सार्वजनिक वाहनांतून प्रवास करणं हे समीकरणच जुळत नाही. पण सरकारला असं सगळंच लगेच निर्बंध उठवत खुलेआम प्रवास करू देणं शक्य नव्हतं त्याच्यासाठी ‘आम्ही उपायोजना करत आहोत’ असं किमान चित्र उभं तरी करणं भाग आहे, बाकी ‘सोशल डिस्टसिंग’ च्या व्याख्येला वास्तवाची, तर्काची किती पार्श्वभूमी विचारात घेतली जाते हा मुळात मोठा प्रश्न आहे. सगळं सुरु करायचं फक्त मंदिर आणि व्यायमशाळा, सिनेमागृह, नाट्यगृह तेवढी बंद, आणि त्यावर रोजगार अंवलबून असणाऱ्याना काय सरकार रोजगार भत्ता देणारं आहे काय?

आता एरियात कोणीही जबरदस्ती मास्क घालून फिरत नव्हतं, लोकांना ही घरी बसून बऱ्यापैकी वैताग आला होता, हातात असलेला पैसा संपत आला होता, खूप सारी लोक ट्रेन चालू होण्याची वाट बघतायतं, काहींनी जवळच नवीन जॉबही शोधले. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी अवस्था आता कोरोना बददलची झालीय. कोणतही अप्रपू राहिलं नाहीय. फक्त हल्लीच ‘माझे कुंटूब माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत सरकारची माणसं आरोग्यविषयक चौकशी आणि मोहिमेचा स्टिकर नोंद करून दाराला चिटकवून निघून गेली तेव्हा थोडी उत्सुकता लोकांनी दाखवली.

तशी आता बऱ्यापैकी लोक गावाकडून आल्याची उदाहरणं आसपास होती. बाकी खूप साऱ्या गोष्टी सरकारनं सुरु केला होत्या. मंदिरे आणि व्यायामशाळा अजून सुरु करण्याचे आदेश नव्हते, नवरात्रीचे दिवस सुरु झाले, जवळ जवळ पन्नास-साठ पायऱ्या असलेल्या देवीच्या त्या एरियातला फेमस मंदिराला समोरच्या बाजूने भलामोठा टाळा आता कामावर जाताना नजरेस पडत होता, मंदिराचा दरवाजा इमारतीतल्या उघडझाप करायच्या लोखंडी लीपसारखा होता, त्यालाच लोखंडी टाळा ठोकला होता, मात्र इतक्या पायऱ्या असूनही मंदिराच्या आतला गाभारा खाली रस्त्यावरून स्पष्ट दिसत होता, आतल्या गाभाऱ्यात खूप साऱ्या महिलाभक्त सहजच नजरेस पडत होत्या. चौकशीअंती कळालं की यांना मंदिराच्या मागच्या बाजूने प्रवेश दिला जात होता. बाहेरच्या बाजूला दोनचार खणा-नारळ-ओटीची दुकानं नजरेस पडत होती. सत्य, सत्व आणि पवित्रता सगळं झूठ . ‘सत्यमेव जयते’ लिहलेली नोटच खरी.

बदल असा काही नव्हता लोकांच्या सवयीमध्ये. लोक अजूनही कचरा सर्रास कचराकुंडीच्या बाहेर फेकतात, अलगद चेहऱ्यावरचा मास्क काढत पचकन थुंकत लालेलाल रस्ते, भिंती करून टाकतात, लोकांच्या सवयीत जो मोठा बदल कोरोना नंतर अपेक्षित होता तसं काही झालं नाही, कार्यालयीन कामाच्या वेळाही काही बदलल्या नव्हत्या, रस्त्यावरची रहदारी ही पूर्ववत झाली होती. भिती अशी लोकांच्या मनात राहिलीच नव्हती की पोटची भूक त्यांना अस करायला भाग पाडत होती, माहित नाही? पण आता लोकांचा वावर असा होता की कोरोनाला ते “क्याझुअल अप्रचोच”ने घेत होते.

0**0**0**0**0

आज पहिला दिवस बस पकडून कामावर जाण्याचा. सहा महिन्यात तसं कुठे बाहेर जाणं झालचं नव्हतं, त्यामुळे का कोण जाणे कामावर जाण्याबद्दल उत्सुकता होती, बाकी प्रवासात घ्यायची काळजी म्हणून तोंडाला मास्क आणि सॅनिटायझरची बाटली सोबत घेवून खांदयाला बॅग अडकवत एल बी एस मार्गावरच्या ठाण्याच्या दिशेने जाणऱ्या बसस्टॉपवर आलो, बर्‍यापैकी गर्दी बसस्टॉपवर होती, इथं बसस्टॉपवर लाईनीत उभं राहणं हा प्रकार नव्हताच मुळी, कारण तशी सोयही नव्हती आणि सवय देखील, मेट्रो चारच्या चालू बांधकामामुळे रस्ते आधीच अरुंद झाले होते, त्यात बस प्रवाशांच्या वाढीव संख्येमुळे वाट अजूनच रोडावत गेली होती. येथून जादातर बस या ‘मुंलुंड चेकनाका’ हा लास्ट स्टॉप असणारी, आणि त्यापुढे ‘ तीन हात नाका’ लॉस्ट स्टॉप असणारी, म्हणजे साधारण दहा-अकरा बसस्थानकं. टोटल सहा सात किलोमीटर. इथून ठाणे स्टेशनला जाणारी एकही गाडी नाही, आता रेल्वे उपलब्ध नसताना बेस्ट प्रशासनानं नवीन मार्ग असणाऱ्या व जनतेच्या सोईच्या बसेस सोडायला पाहिजे होत्या पण असो. माझा प्रवास त्या पुढे पार ठाण्यात आतपर्यंत असणार होता, आणि तिथं थेट जाणारी एकच बस होती, आणि या बसची फ्रिकवेनसी म्हणजे एक बस गेल्यावर दुसरी बस यायला अर्धा तास, बरं ही गाडी येणारं घाटकोपर डेपोवरुन त्यामुळे ती इथं या बसस्टॉपवर आली की गाडी माणसांनी भरूनच येणं साहजिकच होतं. बरं डायरेक्ट इच्छितस्थळीला जाणारी गाडी पकडली तर खर्च फक्त दहा रुपये….. हो खूपच स्वस्त, ओला उबेरला हाच खर्च दोनशे ते अडीचशे रुपये. आता ही इच्छितस्थळाला जाणारी गाडी पकडली म्हणजे थेट प्रवास होत डायरेक्ट शेवटच्या स्टॉपला उतरायचं, आणि समजा इच्छितस्थळी जाणारी गाडी नाही भेटली तर चेकनाका किंवा तीनहात नाक्यावर उतरून तिथून पुढे जाणारं वाहन पकडा म्हणजे अधिकचा खर्च आणि वेळही अधिकचा जाणारं.

0**0**0**0**0

आता बसच्या त्या पाऊणतासाच्या प्रवासात वेळ कसा घालवावा यासाठी अगोदरच तजवीज करून ठेवली होती, ‘स्टोरीटेल’ नावाच अँप डाऊनलोड केलं, त्यात कांदबरी, कथासंग्रह व अनेक पुस्तक ऑडिओ फार्म मध्ये असतात, एकदा का कानाला एअरफोन लावून त्यात गुंतलो की वेळ कसा निघून जातो कळतही नाही, त्यात फक्त मराठी पुस्तकाचं सबस्क्रिशन निव्वळ नव्याण्णव रुपयाला महिना आणि सहा महिन्याचं सबस्क्रिशन चारशे नव्याण्णवला, मी तेच घेतलं सहा महिन्याचं, पुस्तकातला एखादा प्रसंग जिथे तो ऐकला असेल तिथल्या स्थळकाळासकट लक्षात राहतो, असं यापूर्वी पुस्तकं प्रवासात असताना कधी ऐकली नसल्यामुळे हा असा अनुभव नवीन होता, तो कसा ते वानगीदाखल सांगतो, समजा पुस्तकातल्या कथानकात एखादा खूनाचा प्रसंग असेल तर तो ऐकताना, त्या सिग्नलपाशी बस थांबली होती, त्यावेळी मनात तसं कल्पनाचित्र रेखाटलं जात, मेंदू तश्या प्रकारची आठवण तयार करतो. आणि मग नंतर कधीतरी आठवताना हा त्या सिग्नलपाशी बस थांबली होती तेव्हा ‘हे’ ऐकलं होतं अश्या प्रकारे मेंदू स्मृतीपटलावर आठवण आणू लागतो.

0**0**0**0**0

सकाळचे नऊ वाजले होते, बसस्टॉप वरून जाणारी प्रत्येक बस प्रवाश्यांनी भरूनच येत होती, आणि त्या आतल्या प्रवाशांपैकी कुणाला उतरायचं असेल तर बसचा ड्राइव्हर गाडी एकतर बसस्टॉपच्या मागे काही अंतरावर नाहींतर पुढे काही अंतरावर थांबवत होता, आता या अश्या परिस्थितीत बसस्टॉपवर थांबलेल्या लोकांना कधी मागे नाहीतर पुढे धावत जात गाडी पकडावी लागत होती, त्यातही काही लोक धावती गाडी पकडण्यात माहीर होते पण त्यामुळे अपघात होण्याचे चान्सेस होतेच की, लोकांना आता तातकळत उभं राहत एखादी त्यांना निश्चितस्थळी नेणारी बस येते का हे पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हतं, जवळजवळ आता अर्धा तास होत आला, यांत काही ज्येष्ठ नागरिक पण होते. आपल्याला इच्छितस्थळी सोडणारी गाडी दिसली की गाडी मागे धावत सुटायचं…. आणि अशीच गाडी पकडताना एकाचा तोल गेला…. बस गेली तशीच निघून…. पण तिथे असलेल्या लोकांनी घोळका केला …. अजून लोकं जमा झाली….. सुदैवाने विशेष काही झालं नाही, लोक मास्क सांभाळत बस ड्राईव्हरला शिव्या घालत होते, याशिवाय काही बसेसवर बस नंबर ही लिहिलेला नसतो मग आतल्या लोकांना विचारणा होते तिथूनही प्रतिसाद नाही आला की नजरा कंडक्टरला शोधतात त्यानेही प्रतिसाद दिला नाही की लोक अजून वैतागतात, एकमेकांकडे पाहत बेस्टला शिव्या घालत सुटतात. या अश्या गोष्टीची तक्रार कुणाजवळ करावी हेच अनेकांना ठाऊक नसतं, आणि असलं तरी आपलं नेहमीचं काम सोडून या तक्रारी प्रशासनाला सागणं ही ‘नुसती उठाठेव’ वाटते. या व्यतिरिक्त, अगदी हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असताना बसस्टॉपच्या बाजूला पत्ते खेळणं राजरोस चाललेलं होतं, एखादा गर्दुल्ला तिथंच बसस्टाँपवर घरी असल्यासारखं तगड्या त्या लोखंडी आसनव्यवस्थेवर टाकून लाळ काढत झोपलेला दिसतो. तिथंच दारु पिण्यासाठी प्लॉस्टिकचा ग्लासही बसस्टॉपच्या वरच्या कोपऱ्यात ठेवलेलं होतं.

0**0**0**0**0

मला वाटलं क्रांती होईल, लोक पेटून उठत सरकारला प्रश्न विचारतील, पण तसलं काही येथे होत नाही, बाकी सोशल मिडीयावर लोक रिऍक्ट होतात. इथली सरकारं लोकांसाठी काम करत असल्याचा नुसताच देखावा करत आहेत किवां त्यांना हे सगळं मॅनेज करता येत नाहीयं किंवा त्यांनीही सगळं रामभरोसे सोडून दिलयं. आजूबाजूच्या परिस्थितीवर जनता तीव्र प्रतिक्रिया दाखवत नसेल तर रस्त्यावर खडडे असलेली, रोजच्या जगण्याचे प्रश्न गंभीर करणारी, आरोग्य, कायदा यांची गैरव्यवस्था देणारीच सरकार पैदा होत राहतील यांत काही शंका नाही.

लोक म्हणतात या शहराला वेग आहे मी म्हणतो की ती वाताहत आहे, पडझड आहे, किंकाळी आहे.

दोन हजार आठला जेव्हा जग लेहमन ब्रदर्सच्या दिवाळखोरीची, आर्थिक मंदीची चर्चा करत होतं तेव्हा आपल्या येथे आयपीएलचा जोरदार शुभारंभ झाला, म्हणजे भयाण वास्तव जाणून घेण्याची कुवत नसलेल्यांना, किंवा त्यापासून दूर भटकवण्यासाठी पर्यायी व्यवस्था जोरकसपणे उभा करण्याचा हेतू सहज नजरेस पडतो, आता तर तंत्रज्ञान आणि मोबाईल असल्यामुळे या पर्यायी व्यवस्थेत गुंतून राहण्यास तास कमी पडत असल्याचं दिसतयं. मोबाईल, गेम, वेब सिरीज, युट्युब, सोशल मीडिया आणि जगणं.

यंदा ‘ड्रीम इलेव्हन’ आयपीएल स्पॉनसर करतयं, आणि त्यामुळे आधुनिक द्यूतयोग्य युधिष्ठिर करण्याचं काम जोरात सुरु आहे, एकदा का या सट्टेबाजीत मोठी रक्कम लागली की या रोजच्या धावपळीच्या आयुष्यातून तरी सुटका होईल असा आभास निर्माण करण्यासाठी आमचे प्रेरणास्त्रोत आदर्शवादी क्रिकेटखेळांडूची छबी वापरली जाते.

0**0**0**0**0

मूळातच एका सीटवर एकच प्रवासी हा तुघलकी निर्णय होता, कारण लोक तर उभ्याने प्रवास करणारच आणि तिथे एकमेकांला चिकटले जाणारच, आणि पुन्हा कंडक्टर सारखा फिरत राहणार, त्याऐवजी संपूर्ण बसमध्ये बसतील एवढेच प्रवासी घेण्याचा निर्णय अधिक व्यवहार्य वाटतो. असे नियम जनतेवर लादण्याअगोदर अधिकारीवर्गाने एकदा बसप्रवास करायला हवा होता म्हणजे जनता काय हाल भोगतेय ते कळेल.

आपला राग व्यक्त करायचा कुठे असा विचार करत मी टिविटरवर रागानेच टीवीट केलं “एका सीटवर दोघं बसले की कोरोना होतो आणि उभ्याने प्रवास केल्यावर सोशल डिस्टिनस पाळला जातो”. आणि ते टिवीट सगळ्यानां टॅग केलं, बेस्ट, बीएमसी,न्यूज चॅनेल, रिपोर्टर, सताधारी मंडळी, विरोधक ज्यांना ज्यांना शक्य होतं त्यांना केलं. पण रिप्लाय कुणाकडूनचं मिळाला नाही.

लोक या नियमाला वैतागले होते, खूपजण कंडक्टरची नजर हटली की सीटवर बसत, कंडक्टर कोणी एका सीटवर दोघे दिसले की वरून आलेल्या आदेशाला अनुसरून त्यांना हटकत असे. लोक कंडक्टरला प्रश्न विचारीत “एसी बसमध्ये, एसटीमध्ये हा रूल नाही फक्त बेस्ट गाडी मध्येच का?”, “आम्हाला तश्या ऑर्डर आहेत, तक्रार असेल तर वरती सांगा” त्यावरचं उत्तर.

बरं हा नियम एसी बस ला लागू नाही, ठाण्यातल्या टीएमटी बसना हा नियम लागू नाही. आता नव्याने छोट्या एसी बस बेस्टने सुरु केल्या होत्या, त्या बसमध्ये कंडक्टर नव्हता, काही ठराविक बसथांब्यावर कंडक्टर नेमले होते ते तिकीट प्रवाशांना तिकीट देणारं मग आत बसमध्ये प्रवेश…. या एसीबसमध्ये एका सीटवर दोघं बसू शकतात मात्र बस एसी असल्यामुळे तिकीट जास्त, या शिवाय ही बस त्या थांब्यावरच्या प्रवाशांना प्रवेश देत नाही जिथे कंडक्टर नेमलेला नाही, याला अपवाद फक्त एकच संपूर्ण मुंबई फिरायची पंचवीसचं तिकीट काढणारे. मग कोरोना काय फक्त मोकळ्या बसच्या एका सीटवर बसणाऱ्या दोन प्रवाशांना होणार होता काय?

0**0**0**0**0

त्या दिवशी रविवार होता कामावर जाणं गरजेचं होतं, वाटलं होतं गर्दी कमी असेल सुट्टीचा दिवस असल्याकारणाने, पण बसस्टॉपवर वर्दळ तशी होती नेहमीसारखीचं.आता मी बसस्टॉपपेक्षा बराच पुढे उभा राहिलो, मघासपासून अंदाज आला होताच, बस इथेच उभी राहिलं. आणि अंदाज खरा ठरला, बस उभी राहिली नाही पण वेग कमी झाला आणि मी गाडीत शिरलो, बसही तितकीशी माणसांनी भरलेली नव्हती, पण त्या बिनदाराच्या दरवाज्यावर कंडक्टर उभा होता, मी आता पायरीवर एक पाय ठेवून उभा होतो, त्याने मला आत येण्यास नकार दिला.

मी म्हटलं “एक तास झालायं एक गाडी बसस्टॉपला थांबत नाहीय”, तर तो म्हणाला ” दुसरी गाडी पकडा”, माझे आता दोन्ही पाय बसच्या आतमध्ये आपसूकच स्थिरावले, त्याने रस्सी खेचत बेल मारली, गाडी जाणार होती ती थांबली, तो म्हणाला “नाही म्हणजे नाही”, जशी बस थांबली तशी अजून लोक बसमध्ये चढण्यासाठी तिथं जमा झाली, बसच्या आतले प्रवाशी ही त्या बस थांबल्याच्या एका क्षणात हिरमुसले होत माझ्याकडे रोख करत म्हणाले “अरे उतर यार उशीर होतोय”, कंडक्टर बोलतच सुटला, म्हणाला “आम्हाला वरून ऑर्डर आहे किती लोक गाडीत भरायची यांची, जा माझी कंप्लेट कर हा बघ माझा बिल्ला, काढ फोटो!”, मला हे अनपेक्षित होतं, वाटलं होतं बसमध्ये चढल्यावर लगेच आत प्रवेश मिळणारं….. काय करू? उतरु काय ? की अरेरावी करत शिरू आतमध्ये, तो आता हात जोडू लागला “मी तुमच्या पाया पडतो पण बसमध्ये एन्टरी नाही”, मग मीपण म्हटलं “मला तीनहात नाक्याच्या पुढे जायचं मीच पाया पडतो”, पण नाही, तो काही ऐकायला तयार नव्हता, बाकी रस्त्यावर उभे लोकही काकुळतीला येत बोलत सुटली “ओ घ्या आता, आहेत त्यांना…. बस पण काय फुल भरलेली नाहीय….” आतली लोकही आता माझ्याकडे बघत उतर खालीची घोषणा करू लागली, मग मी नाईलाजाने त्या बसमधून उतरलो, प्रंचड अपमान झाल्यासारखं वाटलं, बस निघून गेली, बाकी रस्त्यावर उभ्या असणाऱ्यापैकी एकाने त्या कंडक्टरला आईवरून शिवी दिली, ओझरता का होईना कंडक्टरच्या ते कानावर पडलं, पण आता काही उपयोग नव्हता बस बरीच पुढे निघून गेली,

नंतर थोड्यावेळाने दुसरी बस पकडली, पण झाला प्रकार काही डोक्यातून जाईना, “जलिल होणं” म्हणजे काय ते कळतं होतं, सारखं वाटत होतं त्या कंडक्टरच्या बिल्ल्याचा फोटो काढायला पाहिजे होता किमान तक्रार तर करता आली असती, बेस्टच्या टिविटर हॅडलवर….. पण कोणी असा अपमान का करावा ….. मला त्या ‘ डोबिवली फास्ट’ मधला माधव आपटे आठवला, साला इथं काहीच राहिलेलं नाही चागलं, सगळी व्यवस्थाच सडलीय, आता कळालं तरुण मुलं उगाच परदेशी राहण्यासाठी उत्सुकत का असतात….. एकच जिंदगी जगण्यासाठी असताना अशी धक्के अपमान करत राहायला लावणा-या सिस्टीमचा का भाग बनावं?……

कधी कधी वाटत होतं कायदा हातात घेत बसच्या अधिक आत घुसायला पाहिजे होतं, मी ते सगळंच विसरु पाहत होतो. थोड्यावेळाने विचार केला आणि त्या कंडक्टरचा दोष कमी वाटला तो तर फक्त वरून आलेले आदेश पाळत होता. बाकी मला कंडक्टर म्हटलं की आमच्या ओळखीतले एक नातेवाईक आठवतात, ते बेस्ट मध्ये कंडक्टर होते, रिटायरमेंटनंतर आलेल्या पेंशनवर बाकी आयुष्याची गुजराण करण्याची स्वप्न पाहणारे, काही दिवसातच हदयविकाराच्या आजाराने गेले, जितके पैसे कमावले होते तेवढे सगळे त्या एका आजारात खर्च झाले, अंतिमक्रियेला आलेल्यापैकी एकजण म्हणत होता “असं चाळीस वर्षे खडड्यातून….. गाडीतून प्रवास होत राहिल्यावर हदय फुप्फुस हाडांचा खुळखुळा झाल्याशिवाय राहतोय काय?”…

0**0**0**0**0

आज सोमवार. माझा सगळा बघण्याचा ‘नजरिया’च चेज झाला होता, मी सतत बघत होतो की जसा माझा काल अपमान झाला तसाच आज आणखी कोणाचा अपमान होतोय का? थोड्याच वेळानं कळालं की असे तर अनेकांचे अपमान होतायतं…. गाडीत जागा असूनही उद्दामपणे बसस्टॉपवर न थांबवता बस जात होत्या……आता अर्धा तास होत आला अजून बस आलीच नव्हती, तितक्यात ती आली, एकच झुंबड उडाली….. तीन हात नाक्याच्या पुढे जाण्यासाठी दोन क्रंमाकाच्या गाड्या होत्या त्यातलीच ही एक. बस येताच आत शिरलो, मागच्या बाजूला उभा राहिलो, अजून लोक आत शिरत होते, तितक्यात एक जाडीभरडी बाई आत मध्ये शिरली, ती कशी या धावत्या गाडीत शिरली ही शंका माझ्या मनात उपस्थित झाली, तिच्या मागून अजून गर्दी आतमध्ये शिरली, कंडक्टर लोक धावत बस पकडत असलेले पाहून तावातावाने म्हणाला की “इथून एखादा जबरी पडला तर डायरेक्ट बस हॉस्पिटल जाईल”, “मग थांबवायची होती बस…. स्टॉपला” ती बाई सुद्धा रागानेच बोलली, “हो पण! आम्ही काय मुद्दाम करतो आहोत का? अख्खी बस भरल्यावर कशी काय थांबणार गाडी बसस्टॉपवर…..” त्या बाईचा डोकं फिरलं ती म्हणाली “ते लोक बघतील ना कसं चढायचं गाडीमध्ये तुम्ही गाडी थांबवा स्टॉपवर, मागच्या एक तासापासून उभे आहोत त्यांचं काय?, सहा महिने झाले लोकांजवळ जॉब नाही येत आणि दररोज दीडशे रुपये ओला उबेरला कोण घालवणारयं……”. मला तर बरं वाटत होतं, कालपासून झालेल्या अपमानाचा कोणीतरी बदला घेतला असं वाटत होता.

आता तो कंडक्टर पेटला आणि म्हणाला “एवढंच वाटतं तर मग तुम्ही मेल करा, जो काही त्रास होतो ना ते सांगा” “आम्ही का मेल करायचे तुम्ही सांगा ना लोक काय बोलतात ते” त्या बाईने लागलीच प्रत्युत्तर दिलं. आता कोण जाणे त्या कंडक्टरचा स्वाभिमान दुखावला गेला,त्याला प्रचंड राग आला, बोलणारा प्रवासी पुरुष असता तर खरोखर कानाखाली मारली असती इथंपर्यंतचा राग, त्याने बेल वाजवली गाडी थांबली आणि तो स्वतः गाडीतून उतरला, सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला, अगदी मलासुद्धा. असं काही होईल याची अपेक्षाच नव्हती, आपल्याला आलेला राग शमवण्यासाठी गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे असं वाटायला लागलं, ड्रायव्हरला कंडक्टर गाडीतून उतरला हे दिसताच त्यांनी ही जागा बघत गाडी आडोश्याला लावली, सगळे प्रवासी पाठमोरे होत कंडक्टर नेमका कुठे आहे ते पाहत होते, तो चालत येताना दिसत होता, बाई बोलली “हा कुठे गेला आता, जर माझ्यासमोर आला ना त्याला थोबडवतेच…..” आता गाडीतल्या प्रवाशांमध्ये चर्चा सुरू झाली, कोणी म्हणत होतो की आमचे पैसे परत द्या आम्ही जातो, कुजबुज वाढत गेली, मी विचार करत होतो या बाईत इतकी ताकद आली कशी बोलण्याची, तितक्यात ती बोलली “मी रिपोर्टर आहे….. तुमची कम्प्लेंट करते वरती तेव्हा कळेल तुम्हाला…”. आता ड्रायव्हर ही गाडीतुन खाली उतरला, कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघं चर्चा करू लागले, एक दोन प्रवासी खाली उतरले आणि त्यांनी कंडक्टर जवळ जाऊन तिकिटाचे पैसे परत देण्याची मागणी केली, पुढच्या काही क्षणातच पुन्हा कंडक्टर गाडीत आला आणि ड्रायव्हर त्याच्या जागी जाऊन बसला. थोडाफार राग त्याने गिळला होता तरी आत शिरताना तो म्हणाला “बघा आता एकाने दहा रुपये परत मागितले आणि ते दिले, हे नुकसान कुणाचं माझचं ना!” बस सुरू झाली, बाईचा ही नूर बराच बदलेला दिसला, वातावरण निवळलं. आता तिकीट वाटपाचा कार्यक्रम वापस सुरू झाला त्या बाईनेही माफी मागितली. “शेवटी पिळवणूक होते ते सामान्य माणसाची…..” बाई काही बोलायचं थांबत नव्हत्या.

0**0**0**0**0

कामावरून सुटल्यावर नेहमीची थेट जाणारी बस सुटली आणि मग आता इथून चेकनाक्याला जावं लागणार होतं, मग तिथं जाणारी टीएमटीची बस पकडली आणि ती बस ठाणे स्टेशनचा भोवाडा पार करत जाते, त्यामुळे आज जवळजवळ सहा महिन्यांनी ठाणे स्टेशन पाहता येणार होतं, तलावपाळीच्या भोवती असलेली रोषणाई बंद होती, समोर नजरेस पडणारं राम गणेश गडकरी नाट्यगृह ही अबोल दिसत होतं. ओझरतं का होईना ठाणं स्टेशन पाहता आलं, स्वप्नातही असा विचार केला नव्हता की संध्याकाळच्या सातच्या सुमाराला इतकी तुरळक गर्दी असेल, प्लॅटफॉर्मस रिकामी होते, स्टेशन परिसरातील इतर दुकान ग्राहकांनाविना भकास वाटत होती. जिथे इतर वेळी मुंगी शिरायलाही वाव नसतो, तिथं आता हत्ती सहज फिरेल असं वाटतं होतं, सगळ्यांना हप्ते देऊन बसलेले फेरीवाले दिसत नसलेले पाहून मनोमन राजकारण्यांनाचे चेहरे आठवून बरं वाटलं. परिसराची रया गेली का आली हेच कळत नव्हतं. स्टेशन परिसरातल्या ते भिकारी आता कुठे गेले असतील, लाखोची महिना भांडं देऊन दुकानं चालवणाऱ्या धंदेवाईक लोकांचं काय झालं असेल, गाडी जशी चेकनाक्याकडे जाऊ लागली तशी ट्राफिक सिग्नलपाशी भीक मागणारी तृतीयपंथीय, लहान लहान मुलं गजरे विकताना नजरेस पडत होती.

0**0**0**0**0

इतकी वर्षे रेल्वेला पर्यायी सेवा उपलब्ध न केलेल्या राज्यकर्त्यांमुळे कल्याण डोबिंवलीतल्या लोकांना मुंबईत येण्यासाठी घरातून सकाळी पाच वाजता निघावं लागत आणि रात्री बारा वाजता घरी यावं लागतयं, पण अजूनही राजकारणी धर्मवाद करण्यात गुंतलेले दिसतात, या खऱ्या नागरी प्रश्नांची उत्तर त्यांच्याजवळ नाहीत आणि असे प्रश्न निव्वळ जादा गाड्या सोडून सुटणारे नाहीत. थोडक्यात काय तर सामान्य जनतेला कुणी वाली न उरल्याचं दिसतं, हळूहळू हे सगळं बघून आपल्यालाच सिस्टमचा राग यायला लागतो, आपल्या सारखचं राजकारण्यानी या पदधतीने प्रवास करून बघावं मग कळेल दोन दोन तास उभ्याने तुम्ही मांडलेल्या सोशल डिस्टिगच्या व्याख्येत प्रवास केल्यावर कसं कंबरडं मोडतं.

0**0**0**0**0

बसतिकीट खरेदीसाठी रोकड व्हवहाराव्यतिरिक्त यूपीआय कोड आणि स्कॅनचा ही वापर आता होऊ लागला होता, मात्र हे स्कॅन क्यूआर कोड आणि यूपीआय आयडी बसप्रशासनाने बसमध्ये जागोजागी लावले असते आणि लोकांना ऑनलाईन व्हवहारासाठी अधिक उद्युक्त केलं असतं तर बरं झालं असतं. मोबाईल असण्याऱ्यासाठी रेल्वेसारखा मोबाईल तिकिटाचा पर्याय द्याला हरकत नाही.

इतकं तंत्रज्ञान प्रगत असूनही पुढची बस कधी येणारं हे ‘रामभरोसे’… बसगाड्यांना जीपीएस लावून ऍपवर माहिती कळवणं सहज शक्य आहे पण ती इच्छाशक्ती प्रशासनाची नाही किंवा त्यांना ते गरजेचे वाटत नाही, बेस्टचा एक टोल फ्री नंबर सुदधा आहे तो लावला असता कोणीही उचलत नाही. रामाच्या नावाने मत मागणारे ‘रामराज्य’ आण्याच्या नुसत्याच वल्गना करतात हे सहज दिसून येतं.

जिथं ‘डाटा’ हे नवीन ‘सोनं’ बनत असल्याच्या काळात बसप्रवाशांची एकूण संख्या, त्यांचे प्रवास करण्याचे मार्ग, त्यांचा वापर, गरज यांचा संगणकीय प्रणालीद्वारे डाटा एकत्रित करून अधिक सुधारित सर्विस बेस्टला देता येऊ शकतात. तसे प्रयत्न त्यांनी करायला हवेत.

मेट्रोच्या बांधकामामुळे अरुंद झालेल्या, खड्ड्यांनी भरून गेलेल्या रस्त्याने बस चालवायची, त्यात स्वतःच्या काळजीचा भाग म्हणून मास्क घालायचा, त्यात सतत घाईत असलेल्या, ओव्हरटेक साठी टपलेल्या विशेषतः दुचाकीमधून बसप्रवाशांना इच्छित स्थळी पोचवण्याच काम करणाऱ्या बस ड्राईव्हरना सलाम….. त्यांच्या मानसिक संयमाला सलाम…..

0**0**0**0**0

आणि काय आश्चर्य बेस्ट प्रशासनने बेस्ट निर्णय घेत तो एका सीटवर एकच जण बसण्याचा तुघलकी निर्णय बदलला. नवरात्रीचा मुहूर्त साधत महिलांसाठी ही ठराविक वेळेला का होईना पण ट्रेन सुरु झाली होती, बाकी सर्वसामान्य लोकांसाठी ही रेल्वे सुरू होण्याची चिन्हे दिसू लागलीयत.

0**0**0**0**0

समाप्त

–लेखनवाला

( All Copyrights with The writer . Permission from the writer is mandatory before publishing the article or the part thereof . Not to be shared in quotes , or paragraphs . If shared online, must be shared in totality . )

धोरणमांडणीवावरकथासमाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिसादमाध्यमवेधलेखबातमीअनुभवसल्लामाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

फक्त शहर अस्ताव्यस्त वाढली आहेत नियोजन म्हणाल तर काही नाही.
शहरांचे administration एकाच संस्थेच्या हातात नसल्या मुळे सावळा गोंधळ आहे.
राज्य सरकार,केंद्र सरकार,bmc, एमएमआरडी , किती तरी संस्था आहेत.
एकच अधिकारी नेमून किंवा महापौर ना सर्व अधिकार देवून बर्या पैकी सुधारणा होतील.
जबाबदारी फिक्स होईल.
बेस्ट ही काही वर्षा पूर्वी देशात अव्वल होती आता तिची अवस्था केविलवाणी झाली आहे.
कोणत्याच नवीन सुधारणा,सुविधा, बेस्ट मध्ये केल्या गेल्या नाहीत.
बेस्ट साठी वेगळ्या मार्गिका असणे खूप गरजेचं आहे पण तो प्रश्न तसाच रेंगाळत ठेवला आहे.
सीएसटी railway स्टेशन कडे बघून नियोजन कशाला म्हणतात ह्याची प्रचिती येते .
किती तरी वर्षा पूर्वी बांधलेले ते रेल्वे स्थानक आज सुद्धा गर्दी सामावून घेण्यास सक्षम आहे.
पुढच्या 50 वर्ष ची स्थिती बघून नियोजन करणे भारतीय संस्कृती मध्ये बसत नाही असे म्हणावे लागेल.

बाप्पू's picture

8 Nov 2020 - 12:22 pm | बाप्पू

लेख आवडला आणि पटला.

बाकी या सगळ्या समस्यांची मुळे ही अवाढव्य आणि एक्सपोनेन्शिअली वाढत जाणाऱ्या आपल्या लोकांसंख्येत आहेत.
सर्व महानगरे ही वाढत नाहीयेत तर सुजत चाललीयेत.

चौथा कोनाडा's picture

8 Nov 2020 - 1:18 pm | चौथा कोनाडा

जबरदस्त लिहिलंय ! काय ओघ आहे लिखाणाचा, तुमच्या समावेत प्रवास करतोय असं वाटंत राहिलं.
इतक्या समस्या असून आपण हे सहन करत कसं जगतोय हाच प्रश्न पडत राहतो, पण उत्तर नसल्यामुळं गप्प रहावं लागतं !
जाड्याभरड्या बाईचा अनुभव थरारक होता, आपण पुरूष आगतिक होत राहतो, स्त्रीया त्यांच्या अचाट धर्याने मार्ग काढत अ॑सतात !
(मी बर्‍याचदा पुण्यात पीएमपीने प्रवास करत असतो, विविध, विचित्र, कधी अपमानास्पद अनुभव येत असतात)
तुमच्या लेखनाला सॅल्युट _/\_
लेखनवाला, बहोत खुब !

कधीच नाही. स्टोरीटेल स्टॉपवरच ऐकून परतावं लागेल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Nov 2020 - 1:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय सकस, कसदार लेखन. वास्तव चित्रण, सामान्य माणसाच्या भावना. 'जलील होणं' ला फूटलो. आपण असा अनुभव कधी तरी घेतलेला असल्यामुळे अनुभव थेट भिडला. मिपावर अशाच कसदार लेखनाचा मी भूकेला आहे, मनःपूर्वक आभार. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

सतिश गावडे's picture

8 Nov 2020 - 1:51 pm | सतिश गावडे

लेखनाचा ढाचा बदलल्याने वाचणं सुसह्य झालं आहे. आणि हो खूप तळमळीने लिहीलं आहे, आवडलं.