पावसाळी भटकंती: भिवगड / भिमगड (Bhivgad/Bhimgad )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
22 Jun 2018 - 5:11 pm

महाराष्ट्रातील "भटक्यांची पंढरी" असा प्रदेश म्हणजे, लोणावळा, कर्जत परिसर. त्यातील कर्जत हा केंद्रबिंदु धरला तर सुप्रसिध्द थंड हवेचे ठिकाण, माथेरान, सह्याद्रीतील कदाचित सर्वात प्राचीन लेणी, कोंढाणे, असंख्य धबधब्यांचे माहेरघर म्हणावे अश्या डोंगररांगा आणि राजमाची, ढाक, कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला, पदरगड, तुंगी, पेब, सोनगिरी उर्फ पळसदरीचा किल्ला, अपरिचित सोंडाईचा किल्ला अशा असंख्य गडांनी वेढलेले कर्जत गाव भटक्यांचे फेव्हरिट डेस्टिनेशन झाले नसते तर नवलच. कोणत्याही सुट्टीच्या दिवशी किंवा रविवारी तुम्हाला कर्जत स्टेशनवर टिशर्ट, स्पोर्टस पँट किंवा जीन्स घातलेले आणि भल्यामोठ्या सॅक घेतलेले असंख्य ट्रेकर्स दिसतील. याच कर्जतजवळच्या आणखी एका किल्ल्याची आज ओळख करुन घ्यायची आहे, "भीमगड किंवा भिवगड".
कर्जतपासून अंत्यत जवळ, बेताचीच उंची, शेजारीच असलेला "गौरकामत" हा पावसाळी धबधबा आणि दुर्गसंवर्धन झाल्यामुळे एकुणच प्रेक्षणीय गडमाथा, यामुळे अगदी सहकुटुंब भेट द्यावे असा हा किल्ला. पायथ्याच्या गावापर्यंत असलेला उत्तम रस्ता, पायथ्याशी नव्याने झालेली हॉटेल्स यामुळे एन पावसातील एखादा दिवस नक्कीच कारणी लागतो.
Bhivgad 1
इतिहासात घडलेल्या घटनामुळे प्रत्येक किल्ल्याला त्याची एक ओळख मिळाली आहे पण काही किल्ले असे आहेत की त्यांच्यावर काही महत्वाच्या घटना घडल्याच नाहीत आणि घडल्या असल्यास इतिहासाने त्याची नोंद घेतली नाही असे अनेक किल्ले आज विस्मृतीत गेले असुन उपेक्षित आहेत. अशाच अनेक गडापैकी एक गड किल्ले भिवगड. मुंबई- पुण्याहून जवळ असूनही गिरीमित्रांचे पाय येथे वळत नाही. नाही म्हणायला ढाक बहीरीला जाणारे भटके थोडी वाट वाकडी करून या किल्ल्याला धावती भेट देतात. पावसाळ्यात मात्र वदप गावामागे असलेला धबधबा पहायला येणारे काही पर्यटक या गडावर येतात. सतत उपेक्षित राहिलेल्या या गडाची माहिती सहजतेने सापडतही नाही.
कर्जतजवळचा हा चिमुकला गड किती दिवस बघायचा राहिला होता. अगदी दुसरा एखादा गड पाहून तास-दोन हाताशी असले तरी पटकन पाहून येण्याजोगा किल्ला, पण योग यायचा होता. १५ ऑगस्टला मित्रांबरोबर सुधागड झाला. बाकी सगळेजण परत आपापल्या घरी गेले. मला मात्र अजून एक दिवस जादाची सुट्टी हाताशी होती. तेव्हा परत जाण्यापुर्वी आणखी काही बघणे शक्य होते. कर्जतजवळचे सोंडाईचा किल्ला किंवा सोनगीर उर्फ पळसदरीचा किल्ला असे पर्याय होते. पण पावसात सोंडाई धोकादायक असतो आणि पळसदरीच्या जंगलात बिबट्याचा वावर आहे, त्यामुळे एकट्यादुकट्याने जाणे सुरक्षित नाही, सहाजिकच भिवगड नक्की केला आणि कर्जतला बदलापुर रोडवरच्या एका लॉजवर मस्त ताणून दिली.
Bhivgad 2
( भिवगड परिसराचा नकाशा )

भिवगड उर्फ भिमगड कर्जत जवळील वदप व गौरकामत या दोन गावांच्या मागे छोट्याश्या टेकडीवर उभा आहे. त्यामुळे भिवगडला जायचे तर वदप किंवा गौरकामत गाठावे लागते. अर्थात गौरकामतला जाणारी बस आधी वदपला जाते मग गौरकामत या शेवटच्या थांब्याला पोहचते. दुसर्‍या दिवशी वदपला जाण्यासाठी कर्जत स्टँडवर आलो, तो बस खुप उशीरा होती. सहाजिकच खाजगी गाड्यांना पर्याय नव्हता. कर्जत शहरातूनच उल्हास नदी वहाते. या नदीवरच्या पुलाला "श्रीराम पुल" असे नाव आहे. या पुलाजवळून सहा आसनी रिक्षा कर्जतजवळच्या विविध गावात जातात. कर्जत स्टेशनचा पुल ओलांडून नाष्टा करुन चालत वीस-पंचवीस मिनीटात श्रीराम पुल गाठला. रिक्षा लागलेलीच होती. थोड्यावेळात पुरेशी जनता आत भरल्याचे समाधान झाल्यावर डायव्ह्रर काकांनी स्टार्टर मारला. डुगडुगत रिक्षा धाउ लागली. आजुबाजुचा निसर्ग उधाणलेला होता. काही वर्षापुर्वी ट्रेकनिमीत्ताने याच कर्जतच्या वार्‍या झालेल्या होत्या. त्याच गावाने आता विश्वास बसणार नाही ईतकी कात टाकलेली होती. छोटेखानी कर्जत बरेच विस्तारले होते. पुढे तर अनेक धनदांडग्यांनी, अभिनेत्यांनी, राजकिय नेत्यांनी फार्म हाउसेस घेतल्याने श्रीमंती गाड्यांची वर्दळ जाणवत होती. त्यातच विकेंड कल्चरमुळे छोट्या छोट्या आदिवासी खेड्यातून घरगुती हॉटेल्स त्यात खाणे, पिणे आणि पाण्यात डुंबण्याच्या सोयीपर्यंत सर्व काही दिसत होते. हा बदल चांगला कि वाईट ? हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला. लांबवर सह्याद्रीची रांग आणि त्यात कळकराय सुळका चिकटलेल्या ढाक बहिरीने दर्शन दिले आणि मी मनाने या जगातून पुन्हा एकदा डोंगरांच्या राज्यात पोहचलो.
Bhivgad 3
( भिवगडाचा नकाशा )
Bhivgad 4
( गौरकामत गावातून दिसणारा भिवगड )
कर्जतपासुन ५ कि.मी.अंतरावर वदप गाव आहे. वदपच्या पुढे १ कि.मीवर गौरकामत गाव आहे. या दोनही गावातुन भिवगडावर अर्ध्या तासात जाता येते. गडावर जायचे तर गौरकामत गावात उतरायचे किंवा वदप असे दोन पर्याय होते.एकंदरीत गडाला दोन वाटा असतील तर शक्यतो एका वाटेने चढायचे आणि दुसर्‍या वाटेने उतरायचे म्हणजे गड पुर्ण पायाळून होतो. सहाजिकच मी गौरकामतला उतरलो.
गौरकामत गावातूनही एक वाट डोंगराच्या सोंडेवरुन भिवगडावर येते व हिच गडावर येणारी मुख्य व सोयीची वाट आहे कारण वदप गावातुन चढल्यास संपुर्ण किल्ला व अवशेष पहायला आपल्याला गौरकामत गावाच्या वाटेला अर्ध्यापेक्षा जास्त किल्ला उतरावा लागतो व गाडी वदप गावात असल्याने परत चढुन यावे लागते किंवा तसेच खाली उतरून किल्ल्याला वळसा मारून परत वदप गावात यावे लागते,त्यामुळे गौरकामत गावातुनच चढाई सोयीची.
Bhivgad 5
( गौरकामतमधील अवशेष )
किल्ल्याची जुनी व मुख्य वाट हीच असुन सर्व अवशेष या वाटेवरच आहेत. गौरकामत गावातून गडावर चढाई करताना सर्वप्रथम कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. त्या किल्ल्याचे प्राचिनत्व सिध्द करतात.
Bhivgad 6
या भागात खुप मोठया प्रमाणात घडीव दगड व गोटे पसरलेले आहेत. येथेच गडाचा मुख्य दरवाजा असण्याची शक्यता आहे.
Bhivgad 7
या ठिकाणाच्या उजव्या बाजुला कड्याच्या वरील अंगास दोन गुंफा कोरलेल्या दिसतात.
Bhivgad 8
या दोनही गुंफांना प्रमाणबद्ध दरवाजे खोदलेले असुन पहिली गुंफा ४०x ३०x १५ आकाराची आहे.
Bhivgad 9
या गुंफेच्या बाहेरील भिंतीवर चौकट खोदलेली असुन गुंफेबाहेर एक मानव व पशु कोरल्याचे शिल्प ठेवलेले आहे.
Bhivgad 10
दुसरी गुंफा या गुंफेच्या वरील बाजुस असुन अर्धवट खोदलेली आहे. पावसाळ्यात हा कडा शेवाळलेला असला तर या गुहांकडे जाण्याचा प्रयत्न करु नये.
Bhivgad 11
येथुन पुढील चाळीस ते पन्नास फुटाचा मार्ग कातळात खोदलेला असुन पायरीमार्ग आहे. या पायऱ्यानी वर आल्यावर काही बांधीव पायऱ्या व गडाची मातीत गाडुन गेलेली तटबंदी नजरेस पडते. या पायऱ्या चढुन आल्यावर आपला गडाच्या माचीत प्रवेश होतो.
चिंचोळ्या आकाराचा हा गड उत्तर-दक्षिण पसरलेला असुन गडाची समुद्र सपाटीपासुन उंची ८५० फुट आहे. गडाची लांबी रुंदी १००० x १५० फुट असुन गडाचे माथ्यावरील एकूण क्षेत्रफळ चार एकर आहे. आधी काहीश्या उपेक्षित असणार्‍या गडाकडे "दुर्गवीर" या संस्थेचे लक्ष गेले आणि बघता बघता गडाचा कायापालट झाला.
भिवगडाच्या डोंगराला त्यांनी खऱ्या अर्थाने गडपण प्राप्त करून दिले आहे. रविवार या सुट्टीच्या दिवशी गडावर मोहिमा करून गडावरील काही टाक्यांची सफाई करून त्यातील गाळ काढण्यात आला आहे. मातीत गाडलेली भिंत माती उकरून बऱ्यापैकी मोकळी करण्यात आली आहे. वदप गावाकडून गडावर जाणारी वाट दुरुस्त करण्यात आली असुन जागोजागी अवशेषांचे ठिकाण दर्शविणारे फलक लावले आहेत. एकदंरीत दुर्गवीर या संस्थेने गडाचे गतवैभव काही अंशी परत आणले. दुर्गवीरच्या या मावळ्यांना मानाचा मुजरा. अश्या संस्थाच्या कार्याला शक्य झाल्यास हातभार तर लावलाच पाहिजे पण शक्य झाल्यास आर्थिक मदत हेच खरे शिवकार्य. उगाच शिवजयंतीला डोक्यावर भगव्या पट्ट्या व फेटे बांधून, डोळ्यावर गॉगल आणि कर्णकर्कश्य हॉर्न वाजवत गावभर फिरणार्‍या तथाकथित शिवभक्तांच्या डोक्यात हे शिरेल तो सुदिन.
Bhivgad 12
( वदप गावातून दिसणारा भीवगड )
गडावर येण्याचा दुसरा पर्याय म्हणजे वदप गावातून गौरकामत गावाकडे जाताना वाटेत गौरमाता मंदीराकडे अशी पाटी दिसते. येथुन उजव्या हाताचा वाडीतून जाणारा रस्ता गौरमाता मंदिराकडे जातो.
Bhivgad 13
( दुर्गवीर संस्थेने अश्या पाट्या लावून चांगली सोय केली आहे )
मंदिराकडे रस्ता संपतो तेथे गाडी ठेवुन इलेक्ट्रीकच्या खांबाच्या बाजूने जाणाऱ्या पायवाटेने भिवगड डावीकडे ठेवत १५ मिनिटे चढल्यावर आपण भिवगडच्या खिंडीत येतो. खिंडीत पोहचल्यावर उजव्या बाजूची वाट ढाकला जाते तर डाव्या बाजूची वाट भिवगडावर जाते. या खिंडीतुन १० मिनिटात गडावर जाता येते.
Bhivgad 14
येथे समोरच कातळात खोदलेले पाण्याचे भुयारी टाके आहे असुन टाके पाण्याने पुर्ण भरल्यावर त्यातुन पाणी बाहेर वाहुन जाण्यासाठी कातळात चर खोदला आहे. गडावर पाण्याची एकुण नउ टाकी असुन त्यातील एक सातवाहनकालीन खोदीव खांबटाके आहे. नउ टाक्यापैकी सहा टाकी ओहरलेली असुन केवळ तीन टाक्यात वर्षभर पाणी असते पण पिण्यायोग्य पाणी फक्त भुयारी टाक्यात आहे. भुयारी टाक्याच्या वरील बाजुने बालेकिल्ल्यात जाणारी वाट आहे तर समोर जाणारी वाट एका खोदीव टाक्याकडे जाऊन संपते. ईतका छोटा माथा आणि कदाचित बेताची शिबंदी या किल्ल्यावर असणार तरी पाण्याची व्यवस्था मात्र चोख केलेली आहे.
Bhivgad 15
बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेत उजव्या बाजुला उतारावर कोरलेली दोन टाकी दिसतात तर मागील बाजुस जाणारी वाट किल्ल्याच्या सोंडेकडे जाते. या टोकावर काही खळगे असुन डोंगराचा पुढील भाग येथुन किल्ल्यावर प्रवेश करता येऊ नये यासाठी चाळीस ते पन्नास फुट खोल तासुन किल्ल्यापासून वेगळा केलेला आहे. येथुन गडावर येणारी संपुर्ण वाट नजरेत भरते व हि वाट वरून माराच्या टप्प्यात आहे. या वाटेवरून मागे फिरून बालेकिल्ल्याकडे जाताना एक छोटीशी घळ ओलांडुन आपला बालेकिल्ल्यात प्रवेश होतो.
Bhivgad 16
बालेकिल्ल्यावर प्रवेश करण्यापूर्वी एक वाट डावीकडे जाताना दिसते. या वाटेने पुढे गेल्यावर कातळात खोदलेले ५० x ४० फुट लांबीरुंदी असलेले प्राचीन खांबटाके दिसून येते.
Bhivgad 17
या टाक्याला जोडूनच उघडयावर अजुन एक खोदीव टाके आहे.
Bhivgad 18
या टाक्याच्या पुढे काही अंतरावर अजुन एक टाके आहे. हे सर्व पाहुन आल्यावाटेने परत बालेकिल्ल्याकडे निघावे.
Bhivgad 19
बालेकिल्ल्यावर प्रवेश केल्यावर समोरच खडकात खोदलेली दोन पुर्ण व दोन अर्धवट कोरलेली टाकी, खळगे व डौलाने फडकणारा भगवा ध्वज दिसतो.
Bhivgad 20
अर्थात इतके अवशेष असले तरी इतिहासाची पाने चाळली असता या किल्ल्याबाबत काहीही माहिती मिळत नाही.
Bhivgad 21
समोरील बाजुस वाड्याची मातीत अर्धवट गाडलेली भिंत दिसते.
Bhivgad 22
येथुन पुढे गेल्यावर समोरच्या डोंगरावर ढाक बहिरीची चढत जाणारी वाट दिसते. गडाच्या या टोकास मातीत गाडला गेलेला बुरुज व तटबंदी असुन येथे देखील डोंगराचा पुढील भाग तीस ते चाळीस फुट खोल तासुन किल्ल्यापासून वेगळा केलेला आहे. डोंगर तासल्याच्या खुणा येथे स्पष्ट दिसतात. गड राबता असताना येथुन गडावर प्रवेश नव्हता पण आता मात्र या घळीत तटबंदी कोसळुन हि घळ काही प्रमाणात दगडमातीने भरली आहे व येथुनच गडावर यायची वाट तयार झाली आहे.
Bhivgad 23
गडाच्या बालेकिल्ल्यावरील वाडा हा गडाचा सर्वोच्च भाग असुन असुन येथुन सोंडाई,इरशाळगड,प्रबळगड माथेरान डोंगररांगेपर्यंत दूरवरचा प्रदेश दिसतो. उत्तरेच्या बाजुला सह्याद्रीची सोंड खाली उतरली आहे, अन्यथा पेठचा किल्लाही दिसला असता. गडाचे अवशेष खुप मोठया प्रमाणावर मातीखाली गाडले गेले आहेत. गडाची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार अस्तित्वात नसले तरी त्यांचे अस्तित्व जाणवते. संपुर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात निवांत क्षण तसे दुर्मिळच, त्यामुळे तासाभरात गड पालथा घालून झाला तरी निवांत गवतावर बसून किल्ल्यावरुन दिसणारा नजारा पाहू लागलो.
Bhivgad 24
खाली वदप गाव आणि तिथला तलाव दिसत होता.
Bhivgad 25
तर एका बाजुला गौरकामत गाव आणि तिथला कोलाहल स्पष्ट एकु येत होता. एकदंरीत निवांत आयुष्य कसे असते ते समोर पहात होतो.
Bhivgad 26
गडमाथा गौरीच्या फुलांनी भरलेला होता. यावर्षीच्या गजाननाच्या आगमनाची चाहूल निसर्गाला लागली म्हणायची.
Bhivgad 27
अर्थात मी एकपैस बसलोय हे बहुधा पावसाला पहावले नाही. माथेरानच्या डोंगराकडून पाउस येताना दिसू लागला. अखेरीच गुमान उतरायचा निर्णय घेतला. गडावर गुरे चरायला आली होती. माझ्या चाहुलीने बुजून ती लांब पळाली.
Bhivgad 28
दरीत हा बंगला दिसला. बहुधा पडीक असावा.
Bhivgad 29
तर झाडावर मधमाश्यांनी पोळे केले होते. पावसाळ्यात भरपुर फुलोरा असल्याने त्यांना आता मधाची वर्षभराची बेगमी करता येणार होती.
Bhivgad 30
अखेरीस उतरुन खिंडीत आलो.
Bhivgad 31
इथून समोर उतरणारी वाट वदप गावाकडे तर डावीकडे वर चढणारी वाट ढाक बहिरीकडे जाते. याच वाटेने माझे मित्र निरंत सरदार व पुरुषोत्तम ठकार यांनी ट्रेक केला होता. त्याचे वर्णन या लिंक मधे आहे.
“ढाक ते भिवगड” – एक वाट अनगड - 2017
खिंडीतून वाटेने उतरताना एक मोठे आंब्याचे झाड लागते. शेजारच्या टेकडीवर "गौरकामत" हा पावसाळी धबधबा होता. पावसाळ्यापुर्ताच भरात येणार्‍या धबधब्यावर बर्‍याच जणांनचा कोलाहल एकु येत होता. पण मला भिजण्यामधे काहीच रस नव्हता. भीवगडाने दिलेले समाधान घेउन मी कर्जत गाठण्यासाठी वदपची वाट तुडवू लागलो.
पावसाळ्यातील एखादा सवडीचा दिवस पहा आणि सहकुटुंब ट्रेकची हौस भागवणारा, धबधब्याचा भिजायचा आनंद देणारा आणि प्रवासाची आणि एकंदरीत फारशी दगदग नसलेला हा गड नक्की पायाखाली घाला.
( काही प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )

तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भग्रंथः-
१) रायगड जिल्हा गॅझेटियर
२ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स
३ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट

प्रतिक्रिया

या गडाला टाटा करत तीनवेळा ढाक (गाव) केलय. छान जागा.
पुढच्या वेळेस इकडून वर जाईन तेव्हा या माहितीचा उपयोग होईल.

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Jun 2018 - 2:22 pm | ज्ञानोबाचे पैजार

अर्थात इतके अवशेष असले तरी इतिहासाची पाने चाळली असता या किल्ल्याबाबत काहीही माहिती मिळत नाही.

याचे थोडे आश्चर्य वाटले, आजूबाजुला रहाणार्‍यांकडूनही काही माहिती मिळाली नाही? एखादी दंतकथा देखील नाही?

पैजारबुवा,

दुर्गविहारी's picture

23 Jun 2018 - 10:53 pm | दुर्गविहारी

वास्तविक राजमाची, ढाक, कोथळीगडासारखे प्राचीन काळाशी नाते सांगणारे गड परिसरात आहेत. हा गडही त्याच काळातील असावा. पण आश्चर्य म्हणजे काहीच उल्लेख नाही.
मलाही हे गुढ उलगडले नाही.

नेहमीप्रमाणे नेटका व देखणा लेख.

कंजूस's picture

23 Jun 2018 - 9:34 pm | कंजूस

गुगल मॅप चांगला स्पष्ट दिसण्यासाठी स्क्रीन रेझलुशन किती असावे लागते?

दुर्गविहारी's picture

23 Jun 2018 - 10:54 pm | दुर्गविहारी

३०० di रिझोल्युशन वापरले तर फोटो सुस्पष्ट येतात.

यशोधरा's picture

23 Jun 2018 - 9:40 pm | यशोधरा

हिरवाई बघून डोळे निवले!

दुर्गविहारी's picture

23 Jun 2018 - 10:55 pm | दुर्गविहारी

धन्यवाद, यशोधरा ताई, एस सर.

निशाचर's picture

24 Jun 2018 - 5:01 pm | निशाचर

छान वर्णन

छान वर्णन लिहिले आहे, ढाक ला जाताना हा गड वेळेअभावी हुलकावणी देतो. वाटाडे म्हणतात भिवगडा वर काहीच नाही. त्यामुळे राहून गेलेला किल्ला,तुमचे लिखाण वाचल्यावर वाटते कि, एकदा मुद्दाम पहायला हवा.

प्रचेतस's picture

25 Jun 2018 - 8:43 am | प्रचेतस

अतीव सुंदर आहे भिवगड.

गोनीदांनी भिवगडाच्या पार्श्वभूमीवर 'त्या तिथे रुखातळी' नामक नितांतसुंदर कादंबरी चितारली आहे. भिवगडाच्या पायथ्याच्या चारपाचशे वर्षेपासून असलेल्या आम्रवृक्षाने पाहिलेलं कल्प कल्प.

दुर्गविहारी's picture

27 Jun 2018 - 10:45 pm | दुर्गविहारी

"त्या तिथे रूखातळी " या कादंबरीतील भिवगड वेगळा. त्यातल्या पहिल्या वाक्यात वरंधा घाटाचा उल्लेख आहे आणि पुढे शिरगावचा उल्लेख आहे. तो भिवगड म्हणजे जननीचा दुर्ग उर्फ कासलोडगड उर्फ मोहनगड आहे.

प्रचेतस's picture

28 Jun 2018 - 8:30 am | प्रचेतस

हो.
कादंबरीत त्यांनी भिवगडाला काल्पनिक गड असेच म्हंटले आहे.

कपिलमुनी's picture

25 Jun 2018 - 9:12 am | कपिलमुनी

घाट उतरत नसल्याने त्या भागातील किल्ले राहिले आहेत. या पावसाळ्यात प्रयत्न करून पाहतो

पावसाळी भटकंतीच्या या पहिल्याच धाग्याचे स्वागत केल्याबध्दल सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे आभार. यापुढचे पावसाळी भटकंतीचे धागे माणदेशी दुर्गांवर लिहीणार आहे. त्याचेही तुम्ही सर्वजण स्वागत कराल अशी आशा करतो. धन्यवाद.