अवघा रंग एक झाला....

Primary tabs

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
28 Oct 2008 - 4:59 pm

हे लेखन रेषेवरील उभा-आडव्या-सरळ-तिरप्या अश्या कुठल्याही अक्षरात बसत नाही असे नम्रपणे नोंदवू इच्छितो..! :)

'अवघा रंग एक झाला,
रंगी रंगला श्रीरंग..'

रघुनंदन पणशीकरांनी भैरवीतला हा अभंग सुरू केला आणि समस्त श्रोतृसमुदाय दिवाळीच्या मुहूर्तावर त्या भैरवीच्या अभ्यंगस्नानात नाहून निघाला, तृप्त झाला..!

रघुनंदन पणशीकर..

'तो मी नव्हेच..' मधल्या निप्पाणीतल्या तंबाखूच्या व्यापार्‍याचा - लखोबा लोखंडेंचा, अर्थात नटवर्य प्रभाकरपंत पणशीकरांचा सुपुत्र. गानसरस्वती किशोरी अमोणकरांचा शागीर्द! आजच्या तरूण पिढीतला एक अतिशय चांगला, कसदार आणि प्रॉमिसिंग गवई, ज्याच्याकडून अजून मोप मोप ऐकायला मिळणार आहे असा..!

रधुनंदन पणशीकर माझ्या अगदी चांगल्या परिचयाचे. मी त्यांना रघुनंदनराव किंवा रघुबुवा असं संबोधतो. एक चांगला रसिक आणि जाणकार श्रोता म्हणून रघुनंदनराव मला मान देतात, त्यांच्या बैठकीत बसवतात, मित्र म्हणून माझ्या खांद्यावर हात ठेवतात हा त्यांचा मोठेपणा! असो.

औचित्य होतं मुलुंडमधील महाराष्ट्र सेवा संघ या सांस्कृतिक कार्याला वाहून घेतलेल्या एका संस्थेने आज आयोजित केलेल्या
दिवाळी-पहाट या कार्यक्रमाचं! सुंदर सकाळची वेळ. तानपुरे जुळत होते, तबला लागत होता, मंचावर रघुनंदनराव गाण्याकरता सज्ज झाले होते.

'हे नरहर नारायण...' या बिभासमधल्या विलंबित रूपक तालातल्या पारंपारिक बंदिशीने गाण्याला सुरवात झाली. राग बिभास. शुद्ध धैवत, कोमल धैवत, दोन्ही अंगाने गायला जाणारा सकाळच्या प्रहरचा एक जबरदस्त इन्टेन्स्ड राग. बिभास हा तसा गंभीर तरीही आपल्याच मस्तीत हिंडणारा राग आहे. 'तुम्हाला असेल माझी गरज तर याल माझ्यापाठी!' असं म्हणणारा आहे. रघुबुवांनी बिभासची अस्थाई भरायला सुरवात केली. कोमल रिखब, शुद्धगंधार, पंचम, दोन्ही धैवतांचा अत्यंत बॅलन्स्ड वापर करत रघुबुवांनी बिभासमध्ये रंग भरायला सुरवात केली. सगळा माहोल बिभासमय झाला. 'हे नरहर नारायण..' ने एक सुंदर दिवाळी पहाट उजाडली..! विलंबितानंतर 'मोर रे मीत पिहरवा..' ही पारंपारिक द्रुत बंदिश अतिशय सुंदर गाऊन बिभासची सांगता झाली!

बिभासने पूर्वा उजळली होती, छान केशरी झाली होती. आता तिच्यावर रंग चढले ते हिंडोलचे. राग हिंडोल. एक जादुई, अद्भूत असा राग. त्यातल्या तीव्र मध्यमामुळे हिंडोलचा एक विलक्षणच दरारा पसरतो. त्याचं जाणं-येणं हे अक्षरश: एखाद्या हिंदोळ्यासारखंच असतं. 'तोडी, ललत, भैरव, रामकली हे असतील सकाळचे काही दिग्गज राग, लेकीन हमभी कछू कम नही..!' असा रुबाब असतो हिंडोलचा! :)

रघुबुवांनी आज हिंडोल चांगला जमूनच गायला, कसदार गायला. हिंडोलातल्या अद्भूततेला रघुबुवांनी आज अगदी पुरेपूर न्याय दिला.

"बन उपवन डोल माई,
ऋतुबसंत मन भावन
सब सखीयन खेल हिंडोले.."

ही मध्यलय एकतालातली मोगुबाई कुर्डिकरांची बंदिश. ही बंदिश आज रघुबुवांनी फारच सुरेख गायली. पाहा मंडळी, आपल्या रागसंगीताला, त्यातल्या रचनांनादेखील गुरुशिष्य परंपरेचा कसा सुंदर वारसा असतो ते! मोगुबाई या किशोरीताईंच्या माता व गुरू. त्यामुळे त्यांच्याकडनं ही बंदिश किशोरीताईंना मिळाली, व तीच तालीम किशोरीताईंनी रघुबुवांना दिली आणि म्हणूनच या थोर गुरुशिष्य परंपरेमुळेच ही सुंदर बंदिश आज तुमच्या-माझ्या पिढीला ऐकायला मिळाली/मिळत आहे!

हिंडोल नंतर रघुबुवांनी मध्यलय एकतालातला तोडी रागातला एक पारंपातिक तराणादेखील सुंदर रंगवला. त्यानंतर रंगमंचावर अवतरली ती आपली समृद्ध संगीत रंगभूमी. 'दिन गेले हरिभजनावीण..' हे कट्यारमधलं नाट्यपद रघुबुवांनी सुरू केलं! दारव्हेकर मास्तरांच्या अन् वसंतखा देशपांड्यांच्या कट्यारमधली सगळीच पदं अतिशय सुरेख आणि एकापेक्षा एक बढिया! सुंदर गंधर्व ठेका आणि अत्यंत कल्पक आणि प्रतिभावंत असं अभिषेकीबुवांचं संगीत असलेलं "दिन गेले.." हे पददेखील त्याला अपवाद नाही. रघुबुवा हे पद गाऊन श्रोत्यांना मराठी संगीत रंगभूमीच्या त्या वैभवशाली काळात घेऊन गेले असंच मी म्हणेन..!

त्यानंतर सारी मैफलच चढत्या भाजणीने रंगत गेली. रघुबुवांनी स्वत: बांधलेलं यमन रागातलं अतिशय सुरेख असं मधुराष्टक,
बोलावा विठ्ठल-करावा विठ्ठल, पद्मनाभा नारायणा, अवघा रंग एक झाला, हे अभंग रघुबुवांनी अतिशय उत्तम व कसदार गायले. श्रोत्यांची मनमुराद दाद मिळत होती. भैरवीतल्या 'अवघा रंग एक झाला..' मुळे खरोखरच अवघा रंग एक झाल्यासारखे वाटले. आजची ही मैफल म्हणजे गवई आणि रसिक श्रोते यांच्यातला एक उत्तम संवाद होता, एक अद्वैत होतं!

रघुबुवांची जमलेली मैफल..

खरंच मंडळी, रघुबुवांच्या आजच्या या संस्मरणीय मैफलीमुळे माझी दिवाळी अगदी उत्तम साजरी झाली. आजवरच्या माझ्या श्रवणभक्तिच्या मर्मबंधातल्या ठेवींमध्ये अजून एक मोलाची भर पडली, मी अजून श्रीमंत झालो, समृद्ध झालो!

दुग्धशर्करा योग -

मंडळी, आज माझं भाग्य खरंच खूप थोर होतं असंच म्हणावं लागेल. आजच्या रघुबुवांच्या मैफलीत मला भाईकाकांचे मधु कदम भेटले! भाईकाकांसोबत वार्‍यावरची वरात, रविवारच्या सकाळमध्ये चिपलूनच्या रामागड्याचं फार सुंदर काम करणारे मधु कदम! साक्षात भाईकाकांसोबत मराठी रंगभूमीवर,

"निघाली, निघाली, निघाली वार्‍यावरची वरात..!"

असं मनमुराद गाणारे मधु कदम!

मधुकाका आणि रघुनंदनराव यांच्यासोबत तात्या...

मधु कदम मुलुंडमध्येच राहतात. तेही आज मुद्दाम रघुबुवांच्या मैफलीचा आनंद लुटण्याकरता आले होते. मध्यंतरात ग्रीनरूममध्ये आम्ही बसलो होतो तेव्हा मधुकाकाही तिथे आले. रघुबुवांनी आणि मी त्यांना वाकून नमस्कार केला. मध्यंतरानंतर मधुकाकांनी आपणहून बोलावून मैफलीत मला त्यांच्या शेजारी बसवून घेतले. रघुबुवांच्या एखाद्या छानश्या समेला तो म्हातारा माझ्या हातात हात घेऊन दाद देऊ लागला! मंडळी, जेव्हा एक श्रोता दुसर्‍या श्रोत्याचा हातात हात घेऊन दाद देतो ना तेव्हा अभिजात संगीतातला तो क्षण खरोखरच अनुभवण्यासारखा असतो एवढंच सांगू इच्छितो..!

रघुबुवांचं अभंगगायन ऐकून म्हातारा हळवा होत होता, मनोमन सुखावत होता!

बोलताबोलता साहजिकच भाईकाकांच्या आठवणी निघाल्या.

"भाई? आता काय सांगू तुला? अरे आमच्यात सख्ख्या भावापेक्षाही जवळचं नातं होतं रे! ते माझे बंधु,सखा, गुरू.. अगदी सबकुछ होते रे.."

डोळ्याच्या कडा ओलावत म्हातारा माझ्याशी बोलत होता..!

"एकदा घरी ये ना रे माझ्या! अगदी भरपूर गप्पा मारू. इथे जवळच राहतो मी मुलुंडला.."

'पुलकीत' माणसं कशी असतात ते मी जवळून पहात होतो. आतल्या आत रडत होतो..!

मंडळी, इथे डिटेल्स देत नाही, परंतु आज मधुकाकांना एक कौटुंबिक दु:ख आहे हे मला माहीत आहे. काळाच्या ओघात केव्हाच मागे पडलेल्या या कलाकाराची आर्थिक परिस्थितीही खूप बेताची आहे. परंतु आज म्हातारा अगदी सगळं विसरून रघुबुवांचं गाणं ऐकत होता, त्यातल्या लयीसुरांशी एकरूप झाला होता!

ही एकरूपता, ही रसिकता कशात मोजणार? वरातीच्या निमित्ताने ' पुलं ' या मराठी सारस्वताच्या अनभिषिक्त सम्राटासोबत त्यांनी घालवलेला तो वैभवशाली काळ, ती श्रीमंती आज तुमच्याआमच्या नशीबी येणार आहे का?

असो,

अवघा रंग एक झाला.. या भैरवीतल्या अभंगाने मैफल संपली. मी रघुबुवांचा आणि मधुकाकांचा निरोप घेऊन निघालो..

निघतांना माझ्या कानात भैरवीचे सूर तर होतेच, परंतु मधुकाकांचे शब्दही होते..

"एकदा घरी ये ना रे माझ्या! अगदी भरपूर गप्पा मारू. इथे जवळच राहतो मी मुलुंडला.."

-- तात्या अभ्यंकर.

अनुभवआस्वादप्रतिभाकलासंगीतसंस्कृतीवाङ्मय

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

28 Oct 2008 - 5:16 pm | सखाराम_गटणे™

तात्या, तुम्ही नशीबवान आहात, म्हणुन इतक्या चांगल्या माणसांशी ओळख आहे.

--
आम्ही जालिय देशमुख आहोत.

अभिरत भिरभि-या's picture

28 Oct 2008 - 5:36 pm | अभिरत भिरभि-या

तुमचे लेख वाचले की एकदा अभिजात संगित समजुन घ्यावे असे वाटते.

यंदाच्या लेखात का कोण जाणे इतर लेखातल्या व्यक्तींशी होते मधु कदमां शी गळाभेट झाल्याचे वाटले नाही. अजून काहीतरी जाणून घ्यायचे होते; पण राहून गेले असे वाटले.

विसोबा खेचर's picture

28 Oct 2008 - 5:40 pm | विसोबा खेचर

यंदाच्या लेखात का कोण जाणे इतर लेखातल्या व्यक्तींशी होते मधु कदमां शी गळाभेट झाल्याचे वाटले नाही. अजून काहीतरी जाणून घ्यायचे होते; पण राहून गेले असे वाटले.

ही फक्त झलक होती, त्यांच्याबद्दल वेगळे लिहिणार आहे!

रघुबुवांची मैफल हा या लेखाचा मुख्य भाग आहे...

तात्या.

अभिरत भिरभि-या's picture

28 Oct 2008 - 5:45 pm | अभिरत भिरभि-या

:)

मीनल's picture

28 Oct 2008 - 6:21 pm | मीनल

मस्त लेख
रागदारी बद्द्ल माहिती.
ग्रेट व्यक्तिंशी ओळख, ती ही जवळून!

मीनल.

विकास's picture

28 Oct 2008 - 7:01 pm | विकास

लेख आवडला!

"अवघा रंग एक झाला.." हे गाणे मी कितीवेळा ऐकले असेन त्याची गणती नाही! माझ्या आवडत्या गाण्यांपैकी ते एक आहे. मधुकाका म्हणजे रविवारच्या सकाळमधील रामागडी म्हणल्यावर परत एकदा निरखून पाहीले आणि लक्षात आले! त्यांच्याबद्दल विशेष लेख वाचायला नक्कीच आवडेल!

सर्किट's picture

28 Oct 2008 - 11:36 pm | सर्किट (not verified)

नाटकंच झाला वो घरच्या कपड्यातला, सोसल !

आठवले. "रविवारची सकाळ" चे आम्ही मेजर फ्यान !

त्यातला "रामा" म्हणजे तर "सोनिया सुगंधु"! वा !!

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

आजानुकर्ण's picture

2 Nov 2008 - 8:17 pm | आजानुकर्ण

विकासरावांशी सहमत.

लेख आवडला!

"अवघा रंग एक झाला.." हे गाणे मी कितीवेळा ऐकले असेन त्याची गणती नाही! माझ्या आवडत्या गाण्यांपैकी ते एक आहे. मधुकाका म्हणजे रविवारच्या सकाळमधील रामागडी म्हणल्यावर परत एकदा निरखून पाहीले आणि लक्षात आले! त्यांच्याबद्दल विशेष लेख वाचायला नक्कीच आवडेल!

असेच म्हणतो.

आपला,
(सहमत) आजानुकर्ण

ऋषिकेश's picture

28 Oct 2008 - 7:04 pm | ऋषिकेश

ही एकरूपता, ही रसिकता कशात मोजणार? वरातीच्या निमित्ताने ' पुलं ' या मराठी सारस्वताच्या अनभिषिक्त सम्राटासोबत त्यांनी घालवलेला तो वैभवशाली काळ, ती श्रीमंती आज तुमच्याआमच्या नशीबी येणार आहे का?

काय बोललात तात्या!, मस्त!
लेख आवडला.. दिवाळी पहाट मस्त होती तुमची :)

- ऋषिकेश

प्राजु's picture

28 Oct 2008 - 7:11 pm | प्राजु

एकूण संगित मैफिलीचे वर्णन अगदी सुरेख झाले आहे. सोबत मधुकाका भेटल्यामुळे त्यात आणखी भर पडली.
आम्ही दिलेल्या शुभेच्छांमुळे आपल्या दिवाळीची सुरूवात अशी संगितमय आणि मोहवून टाकणारी झाली. त्यामुळे समस्त मिपाकरांना याचे श्रेय जाते ;) (ह. घ्या.)
मधुकाकांबद्दल आणखी वाचायला आवडेल..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

28 Oct 2008 - 7:15 pm | सहज

दिवाळीची सुरवात छान झाली की तुमची.

तात्या तुमचा चांगला सुर लागला आहे. लिहत रहा. राहीलेले सगळे लेखन आणा. तेच आमचं फराळाच ताटं :-)

छोटा डॉन's picture

28 Oct 2008 - 7:56 pm | छोटा डॉन

तात्या तुमचा चांगला सुर लागला आहे. लिहत रहा. राहीलेले सगळे लेखन आणा. तेच आमचं फराळाच ताटं

+१, असेच म्हणतो ...

ह्या निमीत्ताने "दिवाळी पहाट" ची मेजवानी झडली ...
जर एखादी "गाण्याची लिंक" देता आली असती तर आम्ही श्रवणसुखही घेतले असते ...

असो. लेख उत्तमच आहे नेहमीप्रमाणे ...
लिहीत रहा.
पुलेशु...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

प्रमोद देव's picture

28 Oct 2008 - 8:08 pm | प्रमोद देव

तात्या तुमचा चांगला सुर लागला आहे. लिहीत रहा. राहीलेले सगळे लेखन आणा. तेच आमचं फराळाच ताट!

सहजरावांशी सहमत!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Oct 2008 - 10:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे


तात्या तुमचा चांगला सुर लागला आहे. लिहीत रहा. राहीलेले सगळे लेखन आणा. तेच आमचं फराळाच ताट!

नंदन's picture

29 Oct 2008 - 11:50 am | नंदन

म्हणतो. व्यक्तिचित्र आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती दिनेश's picture

29 Oct 2008 - 1:51 pm | स्वाती दिनेश

तात्या तुमचा चांगला सुर लागला आहे. लिहत रहा. राहीलेले सगळे लेखन आणा. तेच आमचं फराळाच ताटं
सहजरावांना किती जणांनी अनुमोदन दिलय पाहतो आहेस ना? लवकर लिव बाकीचे..:)
दिवाळी पहाट छान उतरली आहे हे वेसांनल.
स्वाती

रघुनंदन पणशीकरांचे गाणे ऐकण्याचा योग अजून आलेला नाही पण तुमच्या लेखातून उत्सुकता अजून ताणली गेली हे नक्की!
(स्वतः प्रभाकरपंतांचा आवाज देखील एक नंबरी आहे. 'तो मी नव्हेच' मधे कीर्तनकाराच्या भूमिकेत एक पद त्यांच्या तोंडी आहे ते चिपळ्यांच्या तालावर त्यांनी एवढे सुरेख म्हटले आहे की ऐकणारे डोलायला लागतात.)
आणि मधु कदमांची भेट म्हणजे तर सोन्याला सुगंध! तात्या, तुम्ही नक्कीच उच्चीचे ग्रह घेऊन जन्माला आला आहात! :)
(त्यांच्या हलाखीबद्दल वाचून वाईट वाटले. आपण मिपाकर काही करु शकतो का त्यांच्यासाठी?)

चतुरंग

लिखाळ's picture

28 Oct 2008 - 10:26 pm | लिखाळ

तात्या,
लेख छान !
मधु कदमांबद्दल वाचायला आवडेल.. लवकर लिहा..
--लिखाळ.

चित्रा's picture

28 Oct 2008 - 11:55 pm | चित्रा

दिवाळीत असे छान कार्यक्रम प्रत्यक्ष बघायला मिळणे हे एक भाग्य. छानच झाले.

मधु कदमांबद्दल ऐकून थोडे वाईट वाटले, असे गुणी कलाकार बेताच्या परिस्थितीने गांजून जावेत हे बरे वाटत नाही. मध्ये रविवारची कहाणी पाहिले होते, त्यामुळे आठवणी ताज्याच आहेत.

वाटाड्या...'s picture

29 Oct 2008 - 12:02 am | वाटाड्या...

रघुनंदन पणशीकरांचे गाणे ऐकण्याचा योग अजून आलेला नाही पण तुमच्या लेखातून उत्सुकता अजून ताणली गेली हे नक्की!
+१..असेच म्हण्तो...

चतूरंग म्हणतात तसे..."(त्यांच्या हलाखीबद्दल वाचून वाईट वाटले. आपण मिपाकर काही करु शकतो का त्यांच्यासाठी?)"

कळवा..

मुकुल

डॉ.प्रसाद दाढे's picture

29 Oct 2008 - 9:24 am | डॉ.प्रसाद दाढे

रघुन॑दन पणशीकरा॑चा मीही फॅन आहे. अफाट गातात. आणि एव्हढे विद्वान गवई असूनही इतके विनम्र आहेत की बोलता सोय नाही. भाग्याची गोष्ट म्हणजे माझ्या आईला काही काळ त्या॑चे मार्गदर्शन लाभले आहे.
मधू कदमा॑ना पाहून एकदम भरून आल॑. त्या॑ची 'शिरपा शिरपा व॑ शिरपा ' ही हाक व 'हलू.. कोन??' आठवली. वार्‍यावरची वरातमध्ये घाटी आणि रविवार सकाळमध्ये कोकणी रामा कस्सले र॑गविलेत त्याला तोड नाही! तात्या त्या॑ना सा॑गा आम्ही त्या॑ना विसरलो नाही.. दाद अजूनही देतोच आहे. काय लागेल ती मदत (आर्थिक, वैद्यकीय व्हॉटेव्हर) करायला एका पायावर तयार आहोत.

मनातले बोललात दाढेसाहेब.
तसे विसरणं कठीण असतं चांगल्या लोकांना.
तात्या, आपले मैफील वृतांत सुंदर असतात.त्यात आणखी एक भर .
अवांतरः लग्न न करण्याचा एका फायदा .मैफील कधीही सजवता येते.

प्रभाकर पेठकर's picture

29 Oct 2008 - 2:49 pm | प्रभाकर पेठकर

मस्त लिहिलय तात्या. तन्मयतेने वाचलं. रघुनंदनरावांची मस्कतात एक खाजगी बैठक झाली होती. दुर्दैवाने तेंव्हा मी सुटीवर भारतात होतो. पण तेंव्हा 'रायगडला जेंव्हा जाग येते' च्या प्रयोगास हजेरी लावण्याचा योग आला. प्रयोग यथातथाच झाला पण प्रभाकर पणशीकरांचा औरंगझेब पाहण्या सारखा होता. नव्वदीतही आवाजाचा पोत, संवादाची फेक अंगावर काटा आणणारी. प्रयोग संपल्यावर त्यांना भेटायला ग्रीन रुम मध्ये गेलो होतो. दोन-चार गप्पा मारण्याचे भाग्य लाभले. एवढ्या मोठ्या कलाकाराला 'तुमचा अभिनय मला खूप आवडतो' हे प्रत्यक्षात सांगता येणे ह्यातही मोठा आनंद असतो. त्या गप्पांच्या ओघातच त्यांना कळले की मी मस्कतहून आलो आहे तेंव्हाच ते म्हणाले ,'अरे! आमचा रघु तिथेच गेला आहे.' असो. पुन्हा कधी योग येईल तेंव्हा जरूर त्यांचे गाणे ऐकू. आत्ता तरी तुमच्या शब्दसामर्थ्याने आम्हाला मोहून टाकले आहे.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

विसोबा खेचर's picture

30 Oct 2008 - 9:42 am | विसोबा खेचर

आवर्जून प्रतिसाद नोंदवणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे अनेक धन्यवाद...

आपला,
(कृतज्ञ) तात्या.

मनीषा's picture

30 Oct 2008 - 10:29 am | मनीषा

छानच ...
श्री मधु कदमांचा रविवारची सकाळ मधला रामा आणि वार्‍यावरची वरात मधला "--- साक्ष ऐकायला येणार का? चांगली साक्ष आहे " असं विचारणारा इरसाल गावकरी केवळ अविस्मरणीय..

सोनि's picture

2 Nov 2008 - 1:08 pm | सोनि

मला गाण फार काही कळ्त नाही, पण दिवाळी पहाट साठी आळंदीत माऊली समोर रघुबुवाना प्रथमच एकले,
अंगावर रोमांच उभे राहणे म्हण्जे काय ते अनुभवले...

सह्ही....

यशोधरा's picture

2 Nov 2008 - 1:18 pm | यशोधरा

सुरेख जमलाय लेख तात्या! भाग्यवान आहात तुम्ही!
एका कट्ट्यामधे जमलेल्या मैफिलीचे धनीमुद्रण ऐकवणार होते त्याचे काय झाले की!! :?
चतुरंगजी म्हणतात तसे मधुकाकांसाठी काही करता येईल का?

विसोबा खेचर's picture

10 Nov 2008 - 7:48 am | विसोबा खेचर

कालपरवाच रघुबुवांशी ख्यालीखुशालीच्या फोनवर गप्पा झाल्या तेव्हा त्यांच्या संकेतस्थळाबद्दल कळले. त्यातील मुरलीधर शाम ही एक-सव्वा मिनिटांची ध्वनिचित्र फित छानच आहे...

लौकरच मी आमच्या मधुभाईंच्या यमनच्या ध्वनिचित्र फितीचे काही तुकडे/झलक यूट्यूबवर टाकणार आहे आणि त्याबद्दल इथे लिहिणार आहे.. मधुभाईंचं कसदार ग्वाल्हेरी गाणं या निमित्ताने आपल्याला ऐकायला मिळेल..

ग्वाल्हेर परंपरा सांगणारे मधुभाई, उल्हास कशाळकर, यशवंतबुवा जोशी ही आताची काही मोजकीच नावं! नायतर विष्णू दिगंबर परंपरेचे नाव सांगणारे संगीतमार्तंड खूप आहेत पण गाण्याच्या नावाने मात्र बोंब! :)

असो,

आपला,
(गाण्यातला) तात्या.

धोंडोपंत's picture

10 Nov 2008 - 8:32 am | धोंडोपंत

क्या बात है | क्या बात है|

सही . उत्तम लेखन. आम्हालाही बुवांच्या मैफिलीत जाऊन आणलेत. तुमची दिवाळी पहाट खरोखर सोनेरी होती.

आपला,
(तृप्त) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)