नाशिकचा औद्योगिक इतिहास : १

Primary tabs

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
10 Apr 2017 - 2:54 pm

बॉलपेनच्या टाचणी सारख्या छोट्या तोंडापासून विमानापर्यंत हजारो उत्पादने बनवणाऱ्या नाशिकची एक औद्योगिक नगरी म्हणून जगभर आज ख्याती आहे. नाशिकमध्ये कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतींमधून मानवी जीवनाला आवश्यक असणाऱ्या जवळ जवळ सगळ्या उत्पादनाची निर्मिती आज नाशिक मध्ये होते. गंमत अशी आहे की देशांतर्गत जवळपास सगळ्या महत्वाच्या शहरांना रस्ते रेल्वे यांनी जोडलेल्या नाशिकची मुख्यत्वे उद्योगामुळेच अखिल विश्वाशी जरी अलगद नाळ आता जोडली गेली असली तरी नाशिकने आपलं गावपण छान जपलंय. त्यामुळे नाशिकचा आजवरचा औद्योगिक इतिहास आणि भविष्याकडे होणारी वाटचाल हा एक छान चिंतनाचा, अभ्यासाचा विषय होऊ शकतो. सद्य औद्योगिक क्षमता न्याहाळताना नाशिकच्या उद्योगांच्या वेगवेगळ्या दालनांमध्येही बघता येईल. उद्योगाची सद्यस्थिती वेगवेगळ्या अंगानी बघावी लागेलच कारण त्याशिवाय नाशिकच्या औद्योगिक भविष्याचा वेध घेता येणार नाही.
नाशिकचे सौन्दर्य नाशिककरांच्या निर्मिती कौशल्यामध्ये सामावले आहे. निर्माण क्षमता ही खरी नाशिकची ओळख आहे. नाशिकच्या आसमंतातच निर्मिती, उद्यमशीलता आणि व्यवसायासाठी सुद्धा आवश्यक पोषक द्रव्यं आहेत - अगदी पूर्वापार. कदाचित धक्का बसणारे असेल, पण हे सत्य आहे की नाशिक ही देशातली सगळ्यात मोठी बाजार पेठ होती. इसवी सनपूर्व दीडशे सालच्या सुमारास नाशिकच्या या बाजार पेठेचा दबदबा होता.शस्त्रास्त्रे, धातूची भांडी, सोन्याचे दागिने आणि उंची कपडे उत्पादन करण्याचे कसब इथल्या स्थानिक कारागिरांमध्ये होते. नाशिकची बाजारपेठ आणि इथले उद्योग यामुळेच नाशिक आपल्या अधिपत्याखाली ठेवणं हे इतिहासातल्या सगळ्याच राज्यकर्त्यांसाठी फक्त आवश्यकच नव्हते तर भूषणावहही होते याचे दाखले मिळतात. त्यामुळेच कदाचित सम्राट अशोकाच्या अंतापर्यंत नाशिकवर दिमाखात अधिपत्य गाजवणाऱ्या मौर्य राजवटी कडून नाशिक सातवाहन राजवटीने हिसकावून घेतले. सातवाहन राजवटीमध्ये नाशिकचे उद्योग व्यवसाय आणि एकूण बाजारपेठ अधिक समृद्ध केली गेली. इसवी सनाच्या सुरुवातीला म्हणजे इसवी सन एकच्या अलीपलीकडे कुशाण साम्राज्यातल्या नहपाना नामक शक क्षेत्रपाच्या अधिपत्याखाली नाशिक परिसर होता.
नाशिकची जगप्रसिद्ध पांडवलेण्याची निर्मिती या नहपानाने केली. नहपानाचा जावई रिषभ दत्ता प्रत्यक्ष नाशिक मध्ये कार्यरत होता. त्याने कोरलेले काही शिलालेख तिथे सापडतात. हे दोघे नाशिकच्या उत्पादनांची निर्यात रोमला करायचे असा उल्लेख इतिहासात सापडतो. नाशिक मधून भरजरी कपडे, मौल्यवान खडे किंवा गारगोट्या अशा वस्तूंची निर्यात भरूचच्या बंदरातून व्हायची.भरूच आणि तगारा ( आताच्या उस्मानाबाद जवळचे एक ठिकाण ) तसेच पैठण ( औरंगाबाद ) या मुख्य रस्त्यावरील वाहतूक नाशिक मधून त्याकाळी होत असल्याने नाशिकच्या बाजार पेठेला प्रचंड महत्व होते. इथल्या उद्योग व्यवसायामुळे त्या कालखंडात नाशिक एक अतिशय संपन्न शहर होते. बघदादच्या बाजार पेठेत अतिशय आकर्षक नक्षीकाम आणि सोन्याचे जरीकाम असणारे नासिस किंवा नाचिस नावाने मिळणारे कापड हे मुळ नाशिक मध्ये तयार होते याचा शोध यरोपीय प्रवाशांना खूप पुढे बाराव्या शतकात लागला. नाशिक सिल्क मुळे नाशिक ही एक जग प्रसिद्ध उद्योग नगरी होती. चौदाव्या शतकात याच नाशिक सिल्कने तिथल्या बाजारपेठेत अक्षरशः विक्रीचा धुमाकुळ घातला होता आणि युरोपीय लोकप्रियतेचं शिखर गाठलं होत. इसवी सनाच्या ३५० च्या सुमारास नाशिक मध्ये अहिरांची राजवट होती. या अहिरांचा विशेषतः गोपालन आणि शेती व्यवसायावर भर होता. त्यामुळे इतर वस्तूंबरोबर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि शेती मधली उत्पादने यांची ही एक उत्तम बाजारपेठ नाशिकमध्ये तेजीत आली. पुढे आठव्या शतकात चालुक्यांच्या राजवटीमध्ये नाशिक मधून वस्त्र निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्यांचे तांडे चहूबाजूला दूरदूरवर इथे बनवलेली वस्त्रे घेऊन विक्रीस नेत असत.इथे बनवलेली भांडी सुद्धा हे तांडे विक्रीसाठी नेत. या इतिहासाची उजळणी इथे करण्याचा प्रपंच इथे एवढ्यासाठी घातला की अगदी ज्ञात इतिहासाच्या सुरुवातीपासून अनेक राजवटी बदलल्या अन्य अनेक स्थित्यंतरे झाली असली तरी नाशिकची औद्योगिक ओळख कधीच आणि कोणत्याच कालावधी मध्ये पुसली गेली नाही. ब्रिटिश राजवट संपे पर्यंत अनेक राजवटींमध्ये इथला उद्योग नाशिककरांची कारागिरी बहरतच गेली. त्यामुळेच कदाचित आज स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये नाशिकने आपली स्वतःची सांस्कृतिक ओळख न हरवू देता एका महत्वाच्या औद्योगिक नगरीचे कसब आजमावलंय हे कौतुस्कापदच आहे.

माहितीसंस्कृतीइतिहाससमाजजीवनमानतंत्रअर्थकारण

प्रतिक्रिया

पुंबा's picture

10 Apr 2017 - 3:29 pm | पुंबा

खुप आवडला लेख सर. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
-CEKian सौरा

प्रचेतस's picture

10 Apr 2017 - 4:19 pm | प्रचेतस

लेख छान.

नाशिकची जगप्रसिद्ध पांडवलेण्याची निर्मिती या नहपानाने केली

नाशिक लेण्यात सातवाहनांचे काही अगदी प्राचीन शिलालेख आहेत ते ही नहपानाच्या आधी सुमारे दोनशे वर्षापुर्वीचे.

नाशिकच्या लेण्यातील चैत्यगृहाटील भिंतीवर भट्टपालिकेचा एक लेख आहे. जिच्यात तिने हे त्रिरश्मी पर्वतावरील चैत्यगृह पूर्ण केले असा उल्लेख आहे. ही भटपालिका म्हणजे महाहकुश्रीची नात. हा हकुश्री म्हणजे कुमार हकुश्री ज्याचा उल्लेख नाणेघाटातील नागनिकेच्या प्रतिमालेखात आहे.

शिवाय पांडवलेणीतील १४ व्या क्रमांकाच्या लेणीत कृष्ण सातवाहनाचा
सादवाहनकुले कन्हे राजिनि नासिककेन
समणेन महामातेण लेण कारित

असा लेख आहे. हा कण्ह (कृष्ण) म्हणजे सिमुक सातवाहनाचा भाऊ. ह्याचे नंतर राज्यावरुन सिमुकाच्या पुत्रांशी वितुष्ट आले असावे.

अर्थत ह्याच लेखात नासिक ह्या स्थलनामाचा प्रथम उल्लेख येतो. अर्थात तेव्हा नासिक हे आहाराचे प्रमुख ठिकाण नव्हते तर तो मान तिथून जवळच असलेल्या आणि आज नाशिकचाचा एक उपविभाग असलेल्या गोवर्धनाला होता.

क्षत्रपांसोबतच्या वाढत्या संघर्षाने हळूहळू सातवाहनांची सत्ता क्षीण होत जाउन हा भाग सगळा क्षत्रपांच्या क्षहरात शाखेकडे अर्थात नहपानाकडे गेला. नहपान, त्याची मुलगी दक्षमित्रा आणि तिचा पती आणि नवहपानाचा जावई ऋषभदत्त ह्यांनी येथे विपुल दानधर्म केले अआणि काही विहारांची निर्मिती केली. क्षहरात क्षत्रपांचा निर्वंश करुन गौतमीपुत्र सातकर्णीने सातवाहनांची सत्ता तेथे पुनर्स्थापित केली.

वेल्हाळ's picture

19 Apr 2017 - 8:40 am | वेल्हाळ

याच शक नहपानाशी गोवर्धन गिरनारे गावाजवळ झालेल्या अंतिम युद्धात सातवाहन राजा सातकर्णी याने क्षहरात वंशाचा समूळ उच्छेद करुन हा प्रांत कायमस्वरूपी परदास्यमुक्त केला.
(म्हणूनच "क्षहरातवंसनिव्वंसकरस्स" ही पदवी पांडवलेणीच्या शिलालेखात सापडते.)
त्या विजयानिमित्त गुढ्या उभारुन साजरा केलेला नवा कालक्रम म्हणजे शक संवत् होय. (म्हणजे पहिलाच गुढीपाडवा देखिल नाशकातच साजरा झालेला..!)

ह्या युद्धक्षेत्राजवळची "सातपुर" औद्योगिक वसाहत अश्या प्रकारे सातवाहन कुलाचे नाव आठवुन देते...

नहपानाचा पराभव गोवर्धननजीक झाला मात्र त्याचा वंशविच्छेद हा कार्ले नजीक झाला. नाशिकच्या पराभवानंतर नहपान हा मावळात कार्ले लेणीनजीकच्या डोंगरारागांचा आश्रय घेऊन लपून बसला. गौतमीपुत्राने १५ दिवसाच्या आतच तेथवर स्वारी करून नहपानाचा निर्वंश केला.

बाकी गौतमीपुत्राच्या ह्या विजयाप्रित्यर्थ शक निर्माण करण्यात आला ही धारणा चुकीची आहे, हे संवत निर्माण केले ते कनिष्काने व पुढे शकांनी ह्याचे पालन केले म्हणूनच हे संवत शक नामाने प्रसिद्ध झाले. इसवी ७८ सालाची ही गोष्ट आणि गौतमीपुत्राने नहपान क्षत्रपाचा विच्छेद केला तो साधारण इस १२५ ते इस १३० च्या दरम्यान.

संदीप डांगे's picture

10 Apr 2017 - 4:20 pm | संदीप डांगे

सुधिरजी, खूप छान लेखमाला.
नाशिकच्या प्रेमात तर आपण बुडालो आहोच. येऊ द्या पटापटा... :-)

Ujjwal's picture

10 Apr 2017 - 8:40 pm | Ujjwal

पुढील भागाच्या प्रतीक्षेत..

वा! वाट बघतोय पुढच्या भागाशी.

एकेकाळी अंबड आणि सातपूर औद्योगिक भागात चिक्कार येणंजाणं असे. त्या सगळ्या आठवणी ताज्या होतील.

धर्मराजमुटके's picture

10 Apr 2017 - 9:58 pm | धर्मराजमुटके

छान लेख ! मात्र आपल्याकडं प्रत्येक गोष्टीचा फक्त भुतकाळचं सोनेरी असतो. वर्तमानकाळ / भविष्यकाळ असतो की नाही ते माहित नाही. एवढे निरिक्षण नोंदवून तात्पुरती रजा घेतो.

वरुण मोहिते's picture

11 Apr 2017 - 10:11 pm | वरुण मोहिते

येणं व्हायचे ..आठवणी ताज्या झाल्या

अत्रे's picture

12 Apr 2017 - 6:09 am | अत्रे

छान आहे लेख. पुढचे भाग वाचायला आवडेल.

लेखाच्या खाली संदर्भ दिले तर बरे होईल. म्हणजे पुस्तके/ऑनलाइन लेख वगैरे.

अनुप ढेरे's picture

12 Apr 2017 - 10:12 am | अनुप ढेरे

छान लेख.

पैसा's picture

22 Apr 2017 - 4:48 pm | पैसा

लिखाण आवडले

सुमीत भातखंडे's picture

28 Apr 2017 - 11:15 am | सुमीत भातखंडे

उत्तम सुरुवात. मस्त होणारे ही लेखमाला.

रुपी's picture

2 May 2017 - 2:31 am | रुपी

छान लेख!