नाशिकचा उद्योग ०३ : याज्ञिकीने तारले !

सुधीर मुतालीक's picture
सुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं
22 Apr 2017 - 4:14 pm

औरंगजेबाच्या मृत्यू नंतर म्हणजे इस १७०७ नंतर काही वर्षांनी पेशवाईचा ऱ्हास होई पर्यंत म्हणजे इस १८१८ पर्यंत नाशकात संपूर्ण मराठयांची राजवट होती म्हणजे पेशवाई होती. पेशवाई अवतरणे हा सर्वार्थाने एक प्रचंड मोठा बदल होता. पेशव्यांचा एकूणच मराठी मुलुखाच्या औद्योगिक उत्कर्षासाठी कसून प्रयत्न सुरु होता असे दिसते. पण त्या प्रयत्नांची दिशा आजच्या संदर्भातच नव्हे पण तत्कालीन जागतिक संदर्भात सुद्धा जी होती ती तशी का होती असा प्रश्न पडतो. युरोपातला उद्योग ज्वालामुखी सारखा अगदी तोंडाशी येऊन खदखदत होता. फार पुढे नव्हे १७५० साल युरोपातल्या औद्योगिक क्रांतीचे पडघम वाजु लागले होते. त्याचे पडसाद इकडे उमटू लागले होते कारण एकूणच हिंदुस्थानातून बनलेल्या उत्पादनांची युरोपातली मागणी घटायला लागली होती. ज्या इंग्लंडमध्ये उद्योग एका अदभुत पातळीवर - म्हणजे मशिन्सच्या आधारावर- होऊ घातला होता त्या इंग्लंडातली शैक्षणिक अवस्था आपल्या शैक्षणिक अवस्थे सारखीच होती. म्हणजे दोन्ही कडचे "बहुतांश" लोक हे शैक्षणिक दृष्ट्या मागासलेलेच म्हणावे लागतील. इंग्लंडात शिक्षणाच्या तेही प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचा कायदा खूप पुढे शंभर सव्वाशे वर्षांनी म्हणजे १८७० साली आला. इकडे इथे पेशवाई आणि हिंदुस्थानात अन्यत्र अन्य राजवटी असताना इंग्लंडमध्ये जशी ऑक्सफोर्ड आणि केम्ब्रिज महाविद्यालये होती तशा इकडेही पाठशाळा आणि मदरसे होते. फरक कदाचित असा असेल त्या महाविद्यालयात थोडेफार व्यावहारिक शिक्षण दिले जात असेल आणि इथे त्यावेळी फक्त धर्मविषयक शिक्षण दिले जात होते. इकडे आम्ही दळणवळणाला बैल वापरायचो ते खेचर वापरायचे. प्रवासाला आम्हीही बैलगाडी वा घोडे वापरले त्यांनी ही घोडे वापरले. रस्ते दोन्हीकडे नव्हतेच किंवा इकडे होते तसेच तिकडे होते. उलट मोगलांच्या काही राजवटींनी दगडांच्या फरशांचे रस्ते इकडे काही ठिकाणी बांधले होते. तिकडे खडी वापरून टेलफर्ड आणि मॅकडम यांनी रस्ते बांधले खूप पुढे १८२० सालाच्या सुमारास - म्हणजे पेशवाई संपल्यावर.

पण मग मुद्दा असा आहे की पेशवाई आणि अन्य राजवटींना तिकडून बंदरी व्यापारातून येणाऱ्या वेगवेगळ्या मानव निर्मित वस्तूंकडे बघून हे आपल्याकडे सुद्धा का नाही बनू शकत हा प्रश्न का नाही पडला ? तिकडून लोखंड आणि जस्त यायला लागलं होते. चष्मा, दुर्बिणी, घड्याळ, कॅमेरा, थर्मामीटर, कात्री, मेणबत्ती इत्यादी अशा अनेकविध वस्तू पेशव्याकडे इंग्रजांकडून खरिदल्या जात होत्या - अगदी साध्या घडीच्या पाकिटांपर्यंत ! आपल्या राज्यातल्या काही विद्वानांच्या एखाद्या शिष्टमंडळाला वा अभ्यासगटाला तिकडे काय चाललंय हे बघून येण्यासाठी पेशव्यांनाच नव्हे तर इथल्या कुठल्याच राजवटीला का नसेल वाटले ? इंग्रजांचे व्यापारी हिंदुस्थानभर इथल्या मार्केटचा अभ्यास करत फिरायचे. ३ एप्रिल १६२२ साली सुरतेच्या थॉमस ब्रॉकनेडला तंजावरला मार्केट सर्वेक्षण करायला गेलेल्या जॉन जॉन्सन नामक व्यापाऱ्याने पत्र लिहून कळवले होते की तंजावरात आपल्याला मिरे खरेदी करता येईल आणि आपल्याकडले लोखंड, शिसे आणि जस्त इथल्या मार्केटमध्ये विकता येईल. १७५७ साली वर,प्लासीमध्ये, इंग्रजांनी विजय मिळवल्या नंतर तातडीने हिंदुस्थाभर त्यांची दादागीरी सुरु झाली नव्हती ज्यामुळे आपल्याला काही हालचाल नसता करती आली. पूर्ण शंभर वर्षे नाशिक पुण्यात १८१८ पर्यंत पेशवाईच होती. पण बदलत्या काळातला विशेषतः इंग्लंडहुन येणाऱ्या विशेष चैनीच्या, नाविन्यपूर्ण वस्तू, आपण इथे का नाही बनवू शकत या कुतुहला अभावी इथल्या औद्योगिक उत्कर्षाच्या पेशवाईतल्या प्रयत्नांना फारसा अर्थ उरला नव्हता. राजवटी मधली अनास्था आणि अस्वस्थता भरीला दळणवळणातल्या अडचणी यामुळे बहुतांश समाज त्यातल्यात्यात भागवून, कमीतकमी गरजांमध्ये जगत असणार हे नक्की.

सर्वदूरच संपन्न लोकांची क्रयशक्ती रोडावली आणि कारागिरांचा आश्रय जवळपास संपायला आला होता. सबब पेशवेकाळात कारागिरांचा प्रचंड तुटवडाच निर्माण झाला. शिवाय इकडे बनत असलेले जिन्नस इंग्रज बघत आणि इथे मिळत त्यापेक्षा अत्यंत सरस वस्तू बनवून आणत. उदाहरणार्थ : चाकू. मेणबत्त्या इथे बनायच्या पण फिरंग्यांच्या मोमबत्त्यांची बातच वेगळी होती. बांगडया अगदी पुरातनकाळा पासून इथे होत्याच पण तरीही काचेची चित्रविचित्र भिंगे इंग्रजांनी इथल्या लोकांच्या माथी पेशवाईत मारलीच. तीच बाब अत्तराची जे इथे हवे त्या सुगंधाचे तयार व्हायचे. पण इंग्रजाने हा ही स्थानिक धंदा बंद पडला आणि इंग्रजी अत्तराची चटक लावली. पेशवाईत कुलुपांचा स्थानिक धंदा आणि उत्पादन बंद पडले. एकुणात त्यामुळे स्वदेशी मालाच्या खपाची पुरती वाट लागली होती. या सर्वाचा परिणाम या कालावधीमध्ये इथे एकूणच औद्योगिक उत्कर्ष न होण्यामध्येच झाला - इंग्लंडच्या तुलनेत. आणि दुसऱ्या बाजूला बाहेरुन येणाऱ्या वस्तूंचा रेटा वाढत चालला होता. बुद्धी आणि कौशल्याच्या जोरावर इंग्लंडमध्ये तयार झालेली कोणतीही नवीन वस्तू इथे त्यांच्या व्यपाऱ्यांमार्फत वर्षभरात खरेदी विक्रीला येऊ लागली होती.

एकूणच या सुमारास उद्योगांच्या पिछाडीमुळे आर्थिक घडीचा पार बोजवारा उडाला होता. पण उद्योगांच्या या पडत्या काळात नाशिकची अर्थव्यवस्था कोलमडून मात्र पडली नाही. नाशकात अर्थाजनाचा गुंता सोडवताना एक प्रघात प्रबळ झाला - याज्ञीकीचा. नाशकातल्या मंदिरांमुळे यात्रस्थांचा ओघ नाशिकला वाढला होताच. त्यामुळे पुढे सुमारे दीडशे वर्षे म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अखेर पर्यंत संपूर्ण नाशिकची अर्थव्यवस्था मुख्यत्वे याज्ञीकीवरच विसंबून होती. यात्रस्थांच्या स्थानिकांकडे होणाऱ्या व्यवस्थेमुळे आजुबाजुच्या शेतीमधून येणारे फळे, भाजीपाला, फुले, धान्य, दूधदुभते तसेच तांबे, चांदी यांची भांडी, दागिने, अन्य पूजेचे सामान, भेट वस्तू, या सगळ्या वस्तू आणि जिन्नसांना एक बाजारपेठ उपलब्ध झाली. वेगवेगळ्या जिन्नसांच्या ट्रेडिंगचा व्यापारही जम बसवून होता. पुढे १८६२ साली मध्ये नाशकात रेल्वे आली, १८६४ साली नाशिकची नगरपालिका अस्तित्वात आली आणि १८८९ मध्ये नाशिक रोड स्टेशन ते नाशिकचा मेंनरोड जोडणारी अडीच फुटी गेजची ट्राम आली. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी एकदा भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे स्वरूपही भव्य झाले. एका शहराच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या या संपूर्ण व्यवस्थेचे योगदान -विशेषतः समस्याग्रस्त काळात - सदैव नोंद घेण्यासारखे निश्चितच आहे.

मांडणीसंस्कृतीइतिहासप्रकटनमाहिती

प्रतिक्रिया

अभिजित - १'s picture

22 Apr 2017 - 4:48 pm | अभिजित - १

उत्तम माहिती. काही नाशिक करांशी बोलताना असे लक्षात आले कि ते गोदावरीला , गंगा म्हणतात. असे का ? म्हणजे गंगेवर गेलो होतो फिरायला इ इ .. एक तर गोदावरी ला गेलो होतो असे म्हणा. नाहीतर नदीवर जाऊन आले असे म्हणा. पण गंगा च का ?
आता पुणेकर किंवा इतर ठिकाणची लोक पण आपल्या गावातील नदीचे खरे नाव घेताना दिसली आहेत. जसे कि पुणेकर मुळा / मुठा म्हणतात. उगाच गंगा करत नाहीत. नाशिक कर असे का ?

पाटीलबाबा's picture

22 Apr 2017 - 10:04 pm | पाटीलबाबा

जसे दक्षिन काशी म्हनजे पैठन
तसे दक्षिण गंगा म्हंजे गोदावरी.

सतिश गावडे's picture

23 Apr 2017 - 12:50 pm | सतिश गावडे

आमचे श्रीवर्धनचे श्री हरिहरेश्वर दक्षिण काशी आहे.

पाटीलबाबा's picture

22 Apr 2017 - 10:07 pm | पाटीलबाबा

जसे दक्षिन काशी म्हनजे पैठन
तसे दक्षिण गंगा म्हंजे गोदावरी.

मराठी_माणूस's picture

24 Apr 2017 - 11:37 am | मराठी_माणूस

पैठणकर सुध्दा गंगाच म्हणतात.

पैसा's picture

22 Apr 2017 - 4:58 pm | पैसा

उत्तम लेख

दुर्गविहारी's picture

22 Apr 2017 - 8:30 pm | दुर्गविहारी

उत्तम माहिती देता आहात. एका वेगळ्या विषयावर नवीनच माहिती मिळते आहे. असेच पिंपरी चिंचवडवर काही लिहिता येतय का ते पहा.

पाटीलबाबा's picture

22 Apr 2017 - 10:05 pm | पाटीलबाबा

जसे दक्षिन काशी म्हनजे पैठन
तसे दक्षिण गंगा म्हंजे गोदावरी.

हा एकमेव प्रश्न मला ही अनेक वर्षे जाणवत होता, बोचत होता.. एका साधूने सांगितले होते हरिद्वारमध्ये आपले पूर्वज नेहमी दोन गोष्टी बोलत / करत.. असला हरी तर देई खटल्यावरी आणि पाय किती पसरायचे ते चादरीच्या साईझवरून ठरे!
साधी गोष्ट आपल्याकडे आर्यभट एकच होऊन गेला तिकडे शेकडो! कारण एकच मान खाली घालून चालावे!
अहो जेव्हा अवकाश पाहण्याचा उत्तम सीझन असतो तेव्हा आपले गणपती आल्यावर चन्द्रदर्शन वाईट असेच शिकवले गेले.
आपण नशीबवान आहोत किमान इस्रो काहीतरी तरी करत तरी आहे गेली 25-30 वर्षे! त्याच्या आधी?
कुपमुंडक होतो , आहोत आपण.

अर्धवटराव's picture

23 Apr 2017 - 4:46 am | अर्धवटराव

जग आपल्या अ‍ॅव्हरेज गतीने चालत होतं. राज्यकर्ते, सैन्य, बलुतेदारी, शेती, बहुजनांच्या जीवनावष्यक आणि अभिजनांच्या चैनीच्या वस्तुंचा व्यापार, हे सगळं एक दोन पाऊले मागेपुढे सगळीकडेच चालत होतं असं या लेखात दिसतय. त्यात युरोपातली युरोपात यांत्रिकीकरणाने कॅटॅलिस्टची भुमीका घेतली आणि तौलनीक दृष्ट्या आपण मागे पडलो. शिवरायांसारखे द्रष्टे राज्यकर्ते असते तर कदाचीत हे ट्रान्झीशन आपल्याकडेदेखील आलं असतं. यांत्रीकीकरणाने केवळ व्यापारात सुबत्ता आलि असं नव्हे तर त्यामुळे
युरोपात एकुणच जीवनाकडे बघायचा दृष्टीकोन बदलला असणार. पैसा आला, महत्वाकांकेक्षेला नवीन घुमारे फुटले, यंत्रांकडे इनोव्हेशन दृष्टीने बघणारे डोळे मग जीवनाच्या इतर अंगांकडे तसंच बघु लागले असतील. आणि एकदा कोणि शर्यतीत असं भांडवल घेऊन पुढे निघाला तर उत्तरोत्तर तो आपल्या कॉम्पीटीटरच्या पुढे जातच असतो.
अनाठाई स्थितीप्रीयता आपल्याकडे होतीच यात वाद नाहि. अजुनही ति आहे. पण आपण अगदीच नालायक वगैरे नव्हतो. आता तर उम्मीद भरपूर आहे (आता म्हणजे फक्त मोदी सरकारात नाहि बरं... २१व्या शतकाचं म्हणतोय मी)

अर्धवटराव's picture

23 Apr 2017 - 4:56 am | अर्धवटराव

आज जसं वेगवेगळे बिझनेस मॉडेल्स विकसीत झाले आहेत, इंग्रजपूर्व काळात राज्यकर्ते स्पेसीफीक असे काहि मॉडेल्स नाशकात डेव्हलप होत गेल्याचं दिसतं का? मराठा सत्ताकाळात धार्मीक अंगाने व्यापाराला चालना मिळाली, तत्पूर्वी तशी विशिष्ट कारणं काहि खास व्यापारांना उत्तेजना देऊन गेली असणार.

अवांतरः
मुतालीक साहेब फार व्यस्त असतात हे ठाऊक आहे. पण त्यांनी मिपावर थोडं जास्त फ्रिक्वेंटली येणं करावं हि विनंती.

पेशवाईत कुलुपांचा स्थानिक धंदा आणि उत्पादन बंद पडले.

हायला हे नवीनच समजलं. याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.

मस्त माहिती..आवडतेय मालिका..पुभाप्र..

फार छान होत आहे ही मालिका. लेख आवडला.